एक 'वजनदार' धागा...

चित्रगुप्त's picture
चित्रगुप्त in जनातलं, मनातलं
10 Sep 2011 - 1:16 am

....... तसे या लेखाचे पूर्ण शीर्षक - "गॅलिलिओचा बाप, चित्रकला, संमोहनशास्त्र, संगीत, गवंडीकाम, होमियोपाथी, ज्योतिषविद्या, न्यूटन, ताजमहाल आणि (ब्रम्हचर्यव्रताचरणमुक्तेच्छुंसाठी उपयुक्त -) एक वजनदार धागा" असे आहे. ... गोंधळलात ?

अहो,या सर्व गोष्टींमध्ये एक समान धागा आहे, तोही एक वजनदार धागा. म्हणजे बघा:
गॅलिलिओचा बाप एक संगीतज्ञ होता, तो संगीत रचताना काल- मापनासाठी हा 'वजनदार धागा' वापरायचा.
काही होमियोपाथ नेमके औषध हुडकण्यासाठी, तसेच चित्रकार, मूर्तीकार, गवंडी, सुद्धा हा वापरतात.
अमेरिका व अन्य देशात अनेकजण खरेदी करताना या धाग्याचा कौल घेतात म्हणे.
संमोहनशास्त्रात याचा उपयोग केला जातो.
ताजमहाल, पिरामिड वगैरे भव्य बांधकामे या धाग्याशिवाय करणे अशक्य.
न्यूटन व फोकाल्ट यांचे यावर आधारित शोध प्रसिद्धच आहेत.
अर्थात हा 'वजनदार धागा' म्हणजे "लंबक" अथवा पेंडूलम. बघा:
http://www.vaastuinternational.com/dowsing/vid_pendulum.gif
http://www.calacademy.org/products/pendulum/page1.htm

परंतु लंबकाच्या आणखी एका उपयोगाविषयी मी या धाग्यात सांगणार आहे.
दहा- बारा वर्षांपूर्वी लंबकाचे जे काही प्रयोग मी केले होते, त्याची हकीगत:

एक दिवस मला 'लंबकविद्या' नामक एक पुस्तक मिळाले, त्यात लंबकाच्या सहाय्याने भविष्यातील घटना जाणून घेता येतात, असे सांगितले होते.
पूर्वी आर्टस्कूल मध्ये शिकत असताना व्हीनस इ. चे पुतळे वा प्रत्यक्ष मॉडेल वरून रेखाटन करताना आम्ही लंबक वापरायचो, पण हे नवीनच काही होते.

पुस्तकात दिलेले सुरुवातीचे सोपे प्रयोग सहज जमले. ते म्हणजे लंबकाची दोरी हातात धरून हात अगदी स्थिर ठेवता येणे. त्यानंतर मुद्दाम हाताने गति न देता नुसत्या विचाराने लंबक उभा, आडवा, घड्याळाच्या दिशेने व उलट दिशेने फिरवता येणे, वगैरे.

आता प्रत्यक्ष भविष्य जाणून घेण्याच्या दिशेने प्रयोग करायचे होते; प्रचंड उत्सुकता दाटली होती.
ज्याची लवकर प्रचीती घेता येईल, अशी भविष्यातील घटना कोणती?
पत्नी त्यावेळी भगिनी मंडळात भिशीसाठी जायला निघालीच होती. चिठ्ठ्या टाकून जिचे नाव निघेल, तिला पैसे मिळत, तेंव्हा तिला जाण्यापूर्वी त्या सर्वांची नावे विचारून लिहून घेतली.

मग कागदावर एक अर्धवर्तुळाकृती आकार बनवून त्याचे - जितक्या बायका होत्या तितके - भाग पाडून प्रत्येकात एकीचे नाव लिहिले.
"शून्य" बिंदूवर हात अगदी स्थिर करत लंबक धरून ठेवला.
मग डोळे मिटून अगदी उत्कटपणे असा विचार केला, की जिला भिशीचे पैसे मिळणार असतील त्या भगिनीचे नाव कळावे. काही वेळाने लंबाकाने गति घेतल्याची हाताला जाणीव झाल्यावर डोळे उघडले. "उज्वला" या नावावर लंबक सावकाश पणे फिरत होता....
काही वेळाने पत्नी परतल्यावर तिने सांगितले की पैसे उज्वलाला मिळाले..... आम्ही थक्कच झालो.

मग काय, हा एक नवीनच नाद लागला. रोज काही ना काही प्रयोग करू लागलो.
लवकरच बर्‍याच लोकांना ही बातमी कळली, रोज कुणी ना कुणी भविष्य जाणून घ्यायला येऊ लागले.

... शेजारी राहणार्‍यांच्या गर्भार मुलीला मुलगा होणार, हे भाकीत खरे ठरले.
... एका परिचिताच्या दोन मुलींनी दहावी व बारावीच्या परिक्षा दिल्या होत्या, निकालाची प्रतिक्षा होती, त्यांना किती टक्के मार्क मिळणार, याचे भाकीतही बरोबर निघाले.
... एकाच्या मुलीचे लग्न अमुक वेळी होईल, व ती परदेशी जाईल, हेही बरोबर निघाले.
... एका मित्राने कुठल्याश्या सोसायटीत घरासाठी रक्कम जमा केली होती, पण तो जरा साशंक होता, त्याला पैसे काढून घेण्याचा सल्ला दिला, तो अगदी समयोचित ठरला.

लंबकाच्या सहाय्याने केलेली अशी अनेक भाकिते खरी ठरली. सुमारे वर्ष - दोन वर्ष मी यात बराच गुंतलो होतो, नंतर मात्र मी हा उद्योग पूर्णपणे बंद केला, त्याला खालील कारणे घडली:
१. कुणाचेही भविष्य जाणून घेण्यासाठी लंबकाचा प्रयोग करताना स्वत: अगदी तटस्थ, निर्विकार असणे अत्यंत गरजेचे असते. त्यामुळे मला माझे स्वत:चे आणि मुला-बाळांचे भविष्य जाणून घेणे कधीच शक्य झाले नाही. म्हणजे स्वत:साठी ही विद्या निरुपयोगी ठरली.
२. मी हा उद्योग हौस म्हणून, विनामूल्य करत होतो, हळू हळू इतके लोक येऊ लागले, की माझे वैयक्तिक/कौटुंबिक जीवन, चित्रकला, हे सर्व विस्कळीत होऊ लागले. यातून पैसा कमावण्याची इच्छाही नव्हती, आणि तसले व्यवहारचातुर्यही माझ्याकडे नाही.
३. पुढे काही पंजाबी व्यापारी, बिल्डर वगैरे येऊ लागले, त्यांना खूप मोठ्या रकमांची गुंतवणूक करायची असल्याने माझा सल्ला हवा असायचा. आता मात्र यातले गांभीर्य आणि धोका माझ्या लक्षात आला.
४. माझी सुरुवातीची उत्कंठा, कुतूहल हे आता शमलेले होतेच, त्यातून शेवटी एक दिवस एका बाईने तिची अंथरुणाला खिळलेली आई केंव्हा मरण पावणार असे विचारले, त्याच क्षणी मी हा लंबकाचा उद्योग पूर्णपणे बंद केला, तो आजतागायत.

माझ्यापुरता हा विषय इथेच संपल्याने मला भाकिते कशी करता आली, त्यामागे कोणते निसर्गनियम काम करत होते, वगैरेचा शोध घेतला गेला नाही.

हा झाला माझा अनुभव. अर्थात कुणी वेगळ्या प्रकारे हे करेल, वेगळे अनुभव येतील, काही नवीन मार्ग खुले होतील... त्यामुळे गंमत म्हणून करून बघायला हरकत नाही. आणि अगदी सुरुवातीला लिहिल्याप्रमाणे ब्रम्हचर्यव्रताचरणमुक्तेच्छु लोक्स पोरी-बाळींवर छाप टाकण्यासाठी याचा उपयोग करू शकतात, पण जरा जपून.

(अवांतर: काही लोक यातून प्रचंड पैका मिळवतात, असे ऐकून आहे, मात्र यात त्यांच्या व्यवहारचातुर्याचा, धूर्तपणाचा, संभाषणकौशल्याचा, 'पीआर' गिरीचा मोठा हात असणार. उदा. 'बॉलीवुड' मधील एका लंबकवाल्याची तीन महिने आधीपासून appointment घ्यावी लागते म्हणे).

या लेखात मला लंबकाच्या भविष्यकथन क्षमतेबद्दल कोणतीही मंडनानात्मक वा खंडनात्मक भूमिका घ्यायची नाही, हे नमूद करू इच्छितो. मात्र तुम्ही काही प्रयोग केलेत, तर जरूर कळवा. खालील दुव्यांवर उपयोगी माहिती मिळेल:
http://www.lettertorobin.org/companion/html/StudentGuide.html
http://www.pendulums.com/how_it_works.htm
http://www.newspiritservices.com/pendulum.html
http://www.crystaltiger.com/sa02003.htm
http://educationalelectronicsusa.com/p/shm-II.htm
http://en.wikipedia.org/wiki/Pendulum

कलासंगीतऔषधोपचारसंस्कृतीसमाजजीवनमानतंत्रविज्ञानसामुद्रिकज्योतिषमौजमजारेखाटनप्रकटनविचारमतसंदर्भशिफारसमाध्यमवेधअनुभवप्रश्नोत्तरेमदतमाहितीविरंगुळा

प्रतिक्रिया

लिंक बुकमार्क करुन ठेवलीये. नंतर वेळ काढून वाचतो आणि प्रयोगपण करता येतील का ते पाहतो.

- पिंगू

अन्या दातार's picture

10 Sep 2011 - 1:29 am | अन्या दातार

भारीच वजनदार आहे हो तुमचा धागा!
स्टार्ट टू एंड अगदी चौफेर फिरवलात लंबक आणि त्यातून तटस्थही राहिलात ;)
मान्यवरांचे प्रतिसाद वाचण्यास उत्सुक.

धनंजय's picture

10 Sep 2011 - 1:40 am | धनंजय

भारी अनुभव.
तुम्ही यातून निवृत्त झाला याबाबत वाईट वाटते. पुढील बाँबस्फोट कुठल्या गावात होणार याबाबत भाकिते करू शकणार्‍याची आज गरज आहे.

Nile's picture

10 Sep 2011 - 3:32 am | Nile

'चित्रगुप्ताला' "भविष्याचं काय?" असे विचारणारा 'धनंजय' असे चित्र डोळ्यासमोर उभे राहिले! ;-)

अमेरिकेत लंबक वापरणारांच्या संस्था, मंडळे इ. आहेत वगैरे वाचून मला पूर्वी वाटायचे, की मग हे लोक त्यांच्या दृष्टीने राष्ट्रीय महत्वाच्या गोष्टी (उदा. लादेन कुठे लपला आहे वगैरे) का जाणून घेत नाहीत?
या बाबतीत श्री. शशिकांत ओक हे हवाई दलात असताना त्यांचेकडे एक लंबकतज्ञ आला होता, त्यांनी त्याची चाचणी घेतली होती, असे काहीसे आठवते आहे, त्यांनी यावर प्रकाश टाकावा.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 Sep 2011 - 2:07 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>> पुढील बाँबस्फोट कुठल्या गावात होणार याबाबत भाकिते करू शकणार्‍याची आज गरज आहे.
अतिरेक्यांनी म्हणे पुढील बाँबस्फोटाच्या तारखाही दिल्या आहेत, आपल्याला लंबकाच्या साह्याने जर त्या तारखा आणि स्थळ कन्फर्म करता आले तर मोठी हानी टळेल.

-दिलीप बिरुटे

विनायक प्रभू's picture

10 Sep 2011 - 2:10 pm | विनायक प्रभू

अहो प्रा डॉ. ज्यांनी हे शोधुन काढायचे त्यांच्या कडे लंबक नाहीच आहेत मुळात.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 Sep 2011 - 2:14 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अहो प्रा डॉ. ज्यांनी हे शोधुन काढायचे त्यांच्या कडे लंबक नाहीच आहेत मुळात.

असं आहे काय...! :)

च्यायला, तुमचा 'लंबक' जरा दुसर्‍याच ' विषयाकडे' झुकू लागला आहे, असे दिसते.

-दिलीप बिरुटे

हे सर्व जरी खरे असले, तरी सर्वसामान्य माणूस जरा घाबरेलच असे काही करायला.... कारण असे भविष्य वर्तवणार्‍याच्या मागे एक तर पोलिसांचा ससेमिरा लागेल (कारण लंबकामुळे हे कळले, असे सहजासहजी कुणाला पटण्यासारखे नाही) दुसरे म्हणजे ती व्यक्ती अतिरेक्यांच्या नजरेत येइल...
संरक्षण खात्यानेच काही लोकांना यात पारंगत केले, तर बरे.

५० फक्त's picture

10 Sep 2011 - 10:40 pm | ५० फक्त

अहो प्रा.डॉ. हानी ट्ळायची शक्यता कमी, मिडियावाले तिथं जाउन बसतील कॅमेरे घेउन लाईव टेलिकास्ट करायला स्फोटाचं.

शाहरुख's picture

11 Sep 2011 - 8:25 pm | शाहरुख

'मायनॉरिटी रिपोर्ट' या पिच्चरची आठवण झाली..त्यातला प्रि-कॉग्जना तर लंबक पण लागत नाही !

आमच्या हॉस्टेलवर (कॉलेजात) एक घटस्फोटीत बाई होती ती त्राटकाचे प्रयोग करायची. मेणबत्तीच्या ज्योतीकडे एकटक बघणे वगैरे. मला हे सर्व प्रकार आवडत नाहीत.

पण लेख रोचक वाटला.

आत्मशून्य's picture

10 Sep 2011 - 3:03 am | आत्मशून्य

आम्हालाही (हे आदरार्थी एकवचन न्हवे बरका तर मी व एक हौशी सवंगडी होत) फासे वापरून "इमीजीयेट फ्यूचर प्रेडीक्ट" करायचा नाद लागला होता. दूर्दैवाने तो व्यसनामधे इतका बदलला की अत्यंत छाट्छूट गोश्टींसाठीही त्याचा वापर सतत करू लागलो उदा. आता सिंहगडला चक्कर टाकायची हूक्कि आली असेल तर गाडीला अ‍ॅक्सिडेंट होइल की नाही याचे भाकीत वर्तवण्यासाठी सूध्दा याचा वापर करून बघायचो, हे व्यसन वाढतच गेलं, कूठे थांबावे ही अक्कल नसल्याने वा या विषयावर सामजावणारे जेष्ठसे कोणी सोबत नसल्याने वाहवत गेलो ... काही चूकीच्या गोश्टीसाठी याचा वापर करायचा प्रयत्न केला आणि तेव्हां पासून फासे सोडा ज्योतीष-शास्त्राच्या कोणत्याही अपारंपारीक पध्दतीचा* अभ्यास करून त्याचा प्रयोग केला तर आमच्या हातून तो हमखास चूकतोच.

*अपारंपारीक पध्दती म्हणजे ग्रह-तारे सोडून इतर गोश्टींचा कथनाला वापर करणे होय, उदा. आयचिंग, पत्ते, टॅरोट कार्ड्स, टी लीवज, टेबल टीपींग, क्रिस्टल गेझिंग अथवा विचक्राफ्ट(बहूतेक.. ? आता निटसं आठवत नाही कोठून ते इंग्लिश व लॅटीन मंत्र व अकृत्या मिळवल्या होत्या ते) संबंधी काही स्पेल्स वगैरे वगैरे. ग्रह तारे संबंधी शास्त्रावर मात्र विश्वास नाही. कारण ते अथवा नाडीग्रंथामधील वर्तवलेले भविष्य कधी संपूर्ण खरं ठरल्याचा अनूभवच आला नाही :( नेपोलीयन प्रश्नावली म्हणूनही एक पूस्तक (बहूतेक अक्षरधारा ग्रंथ प्रदर्शन )मिळते (?) त्याचा ही मस्त अनूभव आला होता. १००% भाकीतं खरी ठरली होती. पण पून्हा तेच..... वहावत गेलो व काही चूकीच्या गोश्टींना वापर केला, त्यानंतर आजतागायत त्या पूस्तकाचा वापर भविष्य कथनाला (मला) करता आला नाही.

नंतर लोकोपयोगा यातील काही गोश्टी डीजीटल स्वरूप व संदर्भात साठवून पाहील्या परंतू जेव्हा ती अ‍ॅप्लिकेशन्स मी वापरली भाकीते खोटीच ठरली. नैराश्याने मी माझेच डेव्हलप केलेले प्रोग्राम्स कायमचे नश्ट करून टाकले. अर्थात सर्व गोश्टी डोक्यात अजूनही व्यवस्थीत आहेत व गरज पडल्यास अशी अ‍ॅप्लिकेशन्स पून्हा निर्माण करू शकतोच :) पण पूर्वानूभवामूळे आता यात कीडे करायचा तो हूरूप नाही आणी इश्वरदयेने त्याची आवश्यक्ताही.

फासे वापरून भाकीत करायच्या पध्दतीचा मॅचचे बेटींग करायला मस्त उपयोग झाला होता. तसच एका परीचीताने हॅरी पॉटर चे शेवटचे पूस्तक रीलीज होण्यापूर्वी टॅरोट कार्डचा वापर करून त्यातील काही गोश्टी अचूक जाणून घेतल्या होत्या. व सध्या यावरून केलेली भाकीतेही अचूक ठरल्याचा अनूभव आहे. एकूणच डोमिनोज व डाइस वापरण्यात मिळालेल्या प्रचंड यशामूळे कूमार वयामधे असताना प्रामूख्याने थ्रिल म्हणून (डोक्यात कीक बसणे याला म्हणतात ना ? )व तारूण्य सूलभ गोश्टींच्या हव्यासापोटी सदरील विषयांच्या अभ्यासाबाबत बर्‍याच प्रमाणात प्रयोगशील व जागृत होतो.... अशा गोश्टींच्या नादी लागून वाट लागे पर्यंत वहावत जाणे हा माझा जणू अलिखीत धर्मच होता.

सावधान :- ब्रम्हचर्यव्रताचरणमुक्तेच्छुंनी सदरील गोश्टि डोकं ताळ्यावर असतानाच व मन संपूर्ण शांत असताना कोणतेही विचारात गूरफटलेले नसतानाच कराव्यात. नाही तर वाट लागू शकते :)

विनायक प्रभू's picture

10 Sep 2011 - 9:55 am | विनायक प्रभू

लंबकाच्या सहाय्याने भविष्यातील घटना जाणुन घेता येतात.
१००% सहमत.
"लंबकविद्येचे" महत्व अफाट.

परिकथेतील राजकुमार's picture

10 Sep 2011 - 12:09 pm | परिकथेतील राजकुमार

लंबकाच्या सहाय्याने भविष्यातील घटना जाणुन घेता येतात.
१००% सहमत.
"लंबकविद्येचे" महत्व अफाट.

गुर्जींशी सहमत आहे.

लंबकाच्या सह्हायाने भविष्यातील काही गोष्टी घडवून देखील आणता येतात.

नेहमीप्रमाणेच माहितीपूर्ण व सकस लेखन. सतत काहीतरी भरिव व विचाराला चालना देणारे लेखन करणारे आंतरजालावर अत्यंत कमी लेखक आहेत, आणि चित्रगुप्त ह्यांचा नंबर त्यात बराच वर नक्की लागावा.

प्रतिसादाबद्दल आभार.
... लंबकाच्या सहाय्याने भविष्यातील काही गोष्टी घडवून देखील आणता येतात....
अशी काही उदाहरणे असल्यास अवश्य द्यावीत.

नितिन थत्ते's picture

10 Sep 2011 - 1:11 pm | नितिन थत्ते

:O

आँ ? अहो ते इथे कसं सांगणार? ;)

नगरीनिरंजन's picture

10 Sep 2011 - 1:29 pm | नगरीनिरंजन

>>"लंबकविद्येचे" महत्व अफाट.
अत्यंत सहमत आहे. मनोबलाने डावी-उजवीकडे लंबक हलवता येऊ लागला की भविष्यात काय होणार आहे त्याचा अंदाज येऊ लागतो. यात आणखी आत्मिक "उन्नती" झाली की लंबक उर्ध्व दिशेकडे नेता येतो. ही स्थिती म्हणजे अत्युच्च अनुभूतिची स्थिती होय. या स्थितीत भविष्य वर्तमानात आणून प्रतिसृष्टी निर्माण करण्याची सिद्धी प्राप्त होते. अशी स्थिती वारंवार आल्यास शारिरिक दुर्बळता येते असे काही लोक म्हणतात. पण तसे शास्त्रीय दृष्ट्या सिद्ध झालेले नाही.

योगी९००'s picture

10 Sep 2011 - 1:39 pm | योगी९००

__/\__

अक्षरशः १० मि. हसत होतो...

नगरीनिरंजन's picture

10 Sep 2011 - 3:08 pm | नगरीनिरंजन

गंभीर चर्चेतल्या गंभीर मतांवर "मी १० मि. हसत होतो" असे हतप्रभ, हतोत्साह, हतवीर्य करणार्‍या प्रतिसादांचे चिमटे घेऊन तुम्ही चर्चेचा चढता लंबक बळेच खाली आणायच्या प्रयत्नात आहात काय? धागाकर्ते इकडे लक्ष देतील काय?

योगी९००'s picture

11 Sep 2011 - 12:16 pm | योगी९००

माझ्या नुसत्या हसण्याने चर्चेचा चढता लंबक झुकायला लागला म्हणजे लंबकात काही दम नाही. गंभीर विषय चर्चेत थोड्याफार हसण्याने विषयाचे गांभिर्य अधीक वाढते असा आमचा अनुभव आहे. जेव्हा एखाद्या विषयाचा किंवा चर्चेचा लंबक चढता असतो, तेव्हा वाकडे किंवा रडवे तोंड करून त्या विषयाची खोली गाठता येत नाही. तेथे हास्यविनोदच 'कामी' येतो.

अवांतर:
बाकी हतवीर्य याचा अर्थ काय?

राजेश घासकडवी's picture

15 Sep 2013 - 6:44 pm | राजेश घासकडवी

चढता लंबक बळेच खाली आणायच्या प्रयत्नात आहात काय?

अशा प्रयत्नांना पूर्वी आमच्या भाषेत के एल डी (खडे लंबक पे डंडा) म्हणायचे.

चित्रगुप्त's picture

15 Sep 2013 - 7:53 pm | चित्रगुप्त

शिव शिव ...
'कावळा शिवला' मधला 'शिव' नव्हे, शिवलिंगातला 'शिव' बरे ...
(स्वगतः च्यामारी काय आपली दैवतं आहेत एकेक, आता या 'शिव लिंग' वरुनही कुणीतरी शिवराळ कोटी करेल) ).

शाहरुख's picture

11 Sep 2011 - 8:26 pm | शाहरुख

हाहाहा !!!

बाबा पाटील's picture

14 Sep 2013 - 11:09 am | बाबा पाटील

"लंबकविद्येचे" महत्व अफाट.,ही विद्या प्रत्येक प्राणीमात्रास अवगत असते,अन्यथा त्याचे जीवन व्यर्थ असते...

जरा 'लंबकाचे' महत्व विशद करा.

शाहिर's picture

10 Sep 2011 - 12:01 pm | शाहिर

देवाक कालजी !!

विनायक प्रभू's picture

10 Sep 2011 - 12:05 pm | विनायक प्रभू

आधी नाडी नंतर लंबक असे म्हणायचे आहे का तुम्हाला?

Nile's picture

10 Sep 2011 - 3:23 pm | Nile

नाडीचे कोडे सुटल्याशिवाय लंबकाचे गुपित कसे कळणार सांगा?

jaypal's picture

11 Sep 2011 - 12:45 pm | jaypal

लंबकाला नाडीनेच बांधलेले असते ना ?
म्हणजेच नाडी आणि लंबक एकमेकांना पुरकच आहेत तर.....

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 Sep 2011 - 1:54 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

च्यायला, ऐकावे ते, सॉरी वाचावे ते नवलच. लंबकाचे चित्र पाहिल्यावर गवंडी वीटाचे बांधकाम एका सरळ रेषेत यावे यासाठी असे लंबक वापरल्याचे पाहात आलो आहे, (मिस्तरी वापरतो त्या लंबकाला काय शब्द आहे, कोणी सांगेल काय ) पण भविष्याचा मागोवा घेता येतो म्हणजे आश्चर्यच आहे. :)

'सकून' पाहतांना पणतीला दोरा बांधून कोणत्या देवाने आपल्यामागे संकटाची भानगड लावली आहे असा शोध घेतांना अशा लंबकवजा कृती करणार्‍या माझ्या आज्जीची वरील धागा वाचून आठवण झाली. माझ्या आजीच्या अशा सकून पाहण्याच्या भानगडीमुळे आम्हाला अनेक देवाचे नवस 'विनाकारण' फेडावे लागले आहेत.

लंबकाच्या सहाय्याने केलेली अशी अनेक भाकिते खरी ठरली. सुमारे वर्ष - दोन वर्ष मी यात बराच गुंतलो होतो, नंतर मात्र मी हा उद्योग पूर्णपणे बंद केला,

अर्रर्र...........! मी प्राचार्य कधी होणार असे विचारायचे होते मला. :(

-दिलीप बिरुटे

मिस्तरी वापरतो त्या लंबकाला काय शब्द आहे, कोणी सांगेल काय ....
माझ्या माहितीप्रमाणे मराठीत 'ओळंबा' आणि हिंदीत 'सांवल' असे म्हणतात.

पाणी नेहमी समपातळीत रहाते, आणि वजन बांधून लटकवलेला धागा नेहमी त्या पातळीच्या लंबकोणात राहतो, हे प्राचीन मानवाला लागलेले महत्वाचे शोध. यामुळेच जगातील सर्व इमारती बांधणे शक्य झाले.
हल्ली इमारत बांधताना एका खूप लांब प्लास्टिकच्या नळीत पाणी भरून (तिचे एक टोक पाण्यात ठेऊन) ती नळी ठिकठिकाणी फिरवून समपतळीत खुणा करतात. प्रश्न असा, की प्राचीनकाळी अशी नळी नसताना ताजमहाल सारख्या प्रचंड इमारती साठी ही पातळी कशी निश्चित करत असतील? मिपाकरांपैकी वास्तुविशारदांना हे ठाऊक असेल, खुलासा करावा.

Nile's picture

10 Sep 2011 - 3:21 pm | Nile

त्याला आमच्या गावरान भाषेत वळंबा असे म्हणतात. त्याला दोनचार अजून नावं आहे असे ऐकल्याचे स्मरते.

"ओळंबा/वळंबा"मुळे शब्दसंग्रह वाढला, धन्यवाद.

बारीकसारीख घरगुती दुरुस्तीकरिता किंवा चित्रांची फ्रेम नेटकी लटकवण्याकरिता मी पूर्वी ओळंबा वापरीत असे. (म्हण घरगुती बनवलेला - धाग्याला कुठलेसे वजन बांधून. पण गरगुती वजन आणि गाठ ही वेडीवाकडी असल्यामुळे ऊर्ध्वापासून धाग्याचा कोन थोडा बदलतो. म्हणून धागा जितका लांब घेता येईल, तितका बरा : प्रमाद कमी होतो.) आजकाल मला असल्या कामांसाठी स्पिरिट लेव्हल वापरणे सोयीचे वाटते. भारतात मात्र ही वस्तू वापरलेली तितकी बघितली नाही. यासाठी कुठला मराठमोळा शब्द आहे काय? (किंवा इंग्रजी शब्दाचा मराठमोळा उच्चार तरी?)

स्पिरिट लेव्हल ला 'रेवल' म्हटलेले ऐकले आहे. भारतातील दुकानात ही सहजपणे मिळते, परंतु मिस्त्री लोक ही वापरायची जरा टाळाटाळ करतात, असा अनुभव आहे. बाकी विटेवर वीट रचताना ओळंब्याला काही पर्याय नाही.

Nile's picture

11 Sep 2011 - 12:43 am | Nile

मिस्तरी लोक लेव्हलही वापरतात पण वळंब्याचा उद्देश आणि लेवलचा उद्देश वेगळा. भिंत बांधताना(प्लास्टरच्या आधी, विटारचताना. विटा दिसणार नसतील तर इथे लेव्हलची काळजी सहसा केली जात नाही) भिंत वाय अक्षाला समांतर आहेना या साठी वळंबा वापरतात. वळब्यांच्या दोरीला वरती एक धातूचे सिलिंडर असते, त्याच्या बरोबर मध्ये छिद्र पाडून त्यातून दोरी सोडलेली असते. दोरीची लांबी कमी जास्त करता येते. दोरीच्या टोकाला धातूचा कोन सदृश(सर्क्युलर सिमेट्री) आकार जोडलेला असतो. त्याची त्रिज्या वरच्या सिलिंडर इतकीच असते. दोरीला गाठ इ. नसते.

jaypal's picture

11 Sep 2011 - 12:48 pm | jaypal

लोंबत्या बी म्ह्नत्यात ;-)

श्री. शशिकांत ओक हे हवाई दलात असताना त्यांचेकडे एक लंबकतज्ञ आला होता, त्यांनी त्याची चाचणी घेतली होती, असे काहीसे आठवते आहे, त्यांनी यावर प्रकाश टाकावा.

चित्रगुप्त धन्यवाद,
आपण म्हणता तसे प्रयोग पुर्वी विविध युद्धकाळात बॉम्ब कुठे पेरलेले आहेत व अन्य घातक उपकरणांच्या शोध कार्यात वापरले गेले होते. त्यानंतर तशाच पद्दतीने काश्मीरला मी पोस्टींगला असताना असे काही प्रयोग करून वरिष्ठांना ते निदर्शनाला आणावेत म्हणून मी पुण्यातील एक लंबकविद्या तज्ज्ञ डॉ. वि.ह. कुलकर्णी सरांना विनंती केली होती. त्यांनी मॅप डाऊझिंग करून असे करता येते, म्हटल्याने मला जास्त उतसाह होता. जरी काही अंशी अपयश आले तरी तो प्रयोग करून जर घातपाताची चाहूल शोधता आली तर अनेकांचे नाहक प्राण वाचतील अशी माझी भुमिका तेंव्हा होती. त्या दिशेने वाटचाल करून मी पुण्यातील माझ्या कार्यालयाजवळी परेड ग्राऊंड वरील सिमेंटच्या ब्लॉक्सचा बुद्धिबळाच्या पटाप्रमाणे वापर करून त्यावर चौरसांना उभे आडवे मार्किंग करून त्यावर ठळक वस्तू म्हणून काही वाहने वा वस्तू ठेवल्या. त्यानंतर फोन वरून त्यांनी त्या चौरसाच्या मॅप वरून ती वस्तू कोणत्या चौरसात आहे. ती व काय आहे ते कळवायची चाचणी केली गेली. त्याला प्रायोगिक यश आले. नंतर डॉ. वि. ह. कुलकर्णी सरांना वेळ मिळेना व अन्य काऱणांनी ती चाचणी लांबणीवर पडत गेली व नंतर माझ्या बदलीमुळे पुढे ती रेंगाळली ती रेंगाळली. तरीही अजून वेळ गेलेली नाही शिवाय मी आता पुण्यात स्थायिक झाल्याने मला त्यासाठी वेळ काढायला हरकत नाही. तरी कोणी असे दूरवरून डाऊझिंग करून असे प्रयोग करू इच्छित असेल तर मी मदतीचा हात पुढे करत आहे. झाला तर फायदाच होईल सेनादलांना.

चित्रगुप्तांचा हा धागा एक मजेशीर विडंबन आहे आणि ते आवडले, अशी प्रतिक्रिया लिहायला आलो. पण बाकीच्या प्रतिक्रिया वाचून खरोखरच लंबकशास्त्र म्हणून काही आहे की काय अशी शंका आली. हळूहळू कन्फर्मच झालं की असं काहीतरी खरंच आहे की हो.

अनेक प्रतिसाद अपेक्षेप्रमाणे खेचाखेची करणारे मजेदार आहेत हे पाहून बरं वाटलं.. पण काही प्रतिसाद पाहून, सिरियसली या विषयावर बोलणं होऊ शकतं हे कळून अक्षरशः अवाक झालो आहे.

आता संरक्षण दल आपल्या संरक्षणासाठी लंबक वगैरे किंवा मॅप डाउझिंग वापरु शकेल असं कळल्यावर रात्रीची झोप उडणार एवढं खरं.

गावाकडच्या गोष्टी आठवल्या. हातात तांब्याची वाकडी तार घेऊन जमिनीखाली पाणी शोधणारा कोणी बारक्या.
तांदूळ आणि नारळावर बसलेला एक माणूस आणि दुसरा नारळ हातात घेऊन हिंडणारा दुसरा जोडीदार. हाती नारळ घेऊन हिंडणारा जमिनीतल्या पाण्यावर पोचला की इकडचा बसलेला मनुष्य गरगर फिरू लागतो.. पण (शास्त्रीय टच देण्यासाठी) त्या दोन व्यक्तींचा रक्तगट एक असला पाहिजे.. वगैरे भानगडी आठवल्या..

असो. आता एखादे चुंबकशातस्त्र डेव्हलप करायला हरकत नाही..

चित्रगुप्त's picture

12 Sep 2011 - 12:26 pm | चित्रगुप्त

गवि यांचा प्रतिसाद...
....खरोखरच लंबकशास्त्र म्हणून काही आहे की काय ....

हे 'शास्त्र' आहे की नाही, असा नवीन वाद होउ शकतो.... म्हणजे यावर 'सायन्स' वा 'स्मिथसोनियन' मध्ये लेख येणे, त्यांनी मान्यता देणे, वगैरे.... अर्थात लंबकाचा उपयोग पाश्चात्य देशातच जास्त, त्यामुळे त्यांचे तेच जाणोत.
आपल्याकडला 'विद्या' हा शब्द चांगला.
अवांतरः सोळा विद्या व चौसष्ठ कला ( की सोळा कला व चौसष्ठ विद्या?) कोणकोणत्या ? कुणी सांगेल का?

कालपरवाच आमच्याकडच्या पेप्रात या लंबक'शास्त्राचे' क्लासेस अमुक अमुक तारखांना असण्याची जाहीरात होती.

योगी९००'s picture

10 Oct 2013 - 1:57 pm | योगी९००

लंबक आणि चुंबक शास्त्र यांचा एकमेकांशी काही संबंध आहे का? की केवळ फ्क्त यमकी संबंध?

चित्रगुप्त's picture

10 Oct 2013 - 3:23 pm | चित्रगुप्त

लंबक आणी चुंबक यांची सांगड घालून विशिष्ट चुंबके बसवलेले टेबल बनवून त्यावरच लंबकाचा प्रयोग करणारे एक होमियोपदी डॉक्टर माझ्या परिचयाचे आहेत. नेमके औषध हुडकण्यासाठी ते या पद्धतीचा उपयोग करतात. त्यांचेकडे अन्य डॉक्टरही आपापल्या पेशंटांसाठी येतात. रोज अश्या प्रिस्क्रिप्शनांचे गठ्ठे ते पटापट लंबक प्रयोग करून हातावेगळे करत असल्याचे बघून मला आश्चर्य वाटले होते, परंतु त्या विषयावर बोलण्यासाठी त्यांना वेळ नव्हता.
त्या चुंबकीय टेबलामुळे नेमके काय होते, हे ठाऊक नाही.
लंबकाचे आंदोलन वा भ्रमण पृथ्वीच्या चुंबकीय शक्तीमुळे होते, परंतु त्याचा भविष्याचा वेध आणि नेमके लागू पडणारे औषध समजणे, यांचा नेमका काय संबंध आहे, मुळात आहे की नाही, हे ठाऊक नाही.

कालच 21 पाहीला, त्यातल्या Monty Hall problem वर बराच काथ्या कूटला.. डाउजिंगमूळे खरचं यात मदत होइल नाही ?

चिंतातुर जंतू's picture

11 Sep 2011 - 12:04 am | चिंतातुर जंतू

सैन्यदलात अशा आगळ्यावेगळ्या तंत्रांचा वापर या विषयावरून 'मेन व्हू स्टेअर अ‍ॅट गोट्स' हा चित्रपट आठवला. बकरे मारण्यासाठी 'जेडाय वॉरिअर्स' प्रशिक्षित करण्याचे त्यातले अमेरिकन सैन्यदलाचे प्रयोग भलतेच विनोदी होते. आता जागतिक महासत्ता बनण्यासाठी आपल्या सैन्यालादेखील असं काहीतरी करून पाहायला हवंच, नाही का? त्यामुळे सैन्यात लंबकविद्या वापरण्यासाठी इथल्या वाचकांनी एक ऑनलाईन पिटिशन दाखल करावी असं सुचवेन.

- इतरांनी मारलेल्या बकर्‍यांना प्रेमाने खाणारा जंतू

नर्मदेतला गोटा's picture

11 Sep 2011 - 12:20 am | नर्मदेतला गोटा

आमच्या शेजारी एक भटजीबुवा राहतात

त्यांच्या जानव्याला ते बर्‍याच किल्ल्या अडकवतात.
आता या जानव्याच्या धाग्यालाही वजनदार धागा म्हणावे का ?

नर्मदेतला गोटा यांचा प्रश्नः
आमच्या शेजारी एक भटजीबुवा राहतात, त्यांच्या जानव्याला ते बर्‍याच किल्ल्या अडकवतात.
आता या जानव्याच्या धाग्यालाही वजनदार धागा म्हणावे का ?

उत्तरः का म्हणू नये? अवश्य म्हणावे.
आणि त्याचे अन्य उपयोग असतील तर तेही जरूर सांगावे.

विजुभाऊ's picture

14 Sep 2013 - 11:08 am | विजुभाऊ

काही लोक काही वेळा जानवे कानाला अडकवतात.
त्याचा आनि लम्बकाच काही सम्बन्ध आहे का?
तज्ञानी जिज्ञासुंच्या अज्ञानात भर घालावी.

१.५ शहाणा's picture

11 Sep 2011 - 11:17 am | १.५ शहाणा

स्पिरिट लेव्हल ला पाणसळ ह शब्द एकुन होतो

नगरीनिरंजन's picture

12 Sep 2011 - 8:44 am | नगरीनिरंजन

अगदी ओठावर येऊनही हा शब्द आठवत नव्हता.

साती's picture

12 Sep 2011 - 12:08 pm | साती

आमच्या गावात अशी दिसणारी पण लाकडाची पातळी मेस्त्री लोक काम करताना वापरतात.

नंदन's picture

12 Sep 2011 - 12:27 pm | नंदन

प्रतिसाद वाचतो आहे. बाकी अलीकडे गॅलिलिओचे ग्रह उच्चीचे आहेत, यात शंकाच नाही ;)

आशु जोग's picture

14 Sep 2011 - 12:38 am | आशु जोग

चित्रगुप्त

आपला लेख वाचला. रंजक वाटला.

मला वाटते. मन एकाग्र करणे महत्वाचे. लंबकाचीही जरुरी नाही

कुणीतरी कॉफी पिलवूनही भविष्य सांगतात.

......मन एकाग्र करणे महत्वाचे. लंबकाचीही जरुरी नाही...
खरे आहे, लंबकामुळे एकाग्रता सहज होते हे एक, व दुसरे म्हणजे योग्य तो चार्ट बनवला, की त्यातील योग्य त्या उत्तरावर लंबक फिरू लागतो, त्यामुळे उत्तर हुडकणे सोपे जाते.

परंतु मुख्य मुद्दा असा, की कोणत्याही पद्धतीने का असेना, मुळात भविष्य जाणून घेणे शक्य आहे की नाही ? असल्यास त्यामागे कोणता कार्यकारण भाव, कोणतेनिसर्ग नियम आहेत?

चित्रगुप्त's picture

14 Sep 2013 - 10:59 am | चित्रगुप्त

नवीन मिपाकरांसाठी दोन वर्षांपूर्वीचा हा धागा पुन्हा उपसत आहे.

मंदार कात्रे's picture

14 Sep 2013 - 3:30 pm | मंदार कात्रे

ब्रम्हचर्यव्रताचरणमुक्तेच्छु लोक्स >>> मस्त ;)

आशु जोग's picture

15 Sep 2013 - 8:35 pm | आशु जोग

तज्ञानी जिज्ञासुंच्या अज्ञानात भर घालावी
विजुभाऊ,
ज्ञानात भर घालावी हे ऐकले होते. हे काय नवीन !

बाजारात लंबक विद्येवर बरीच पुस्तके आहेत. परंतु कोणता पुस्तक योग्य मार्गदर्शन करू शकेल .? अक्षरधारा म्हणजे पुण्यातला ना . अत्रे सभागृह जवळचं..

चित्रगुप्त's picture

20 Nov 2021 - 2:18 pm | चित्रगुप्त

शशिकांत ओक यांच्या अलिकडील 'डॉ वि ह सरांना आठवताना... ' या धाग्यातील प्रतिसादात उल्लेख केलेला धागा तो हाच.

प्रकाश घाटपांडे's picture

20 Nov 2021 - 3:55 pm | प्रकाश घाटपांडे

माझ्यापुरता हा विषय इथेच संपल्याने मला भाकिते कशी करता आली, त्यामागे कोणते निसर्गनियम काम करत होते, वगैरेचा शोध घेतला गेला नाही.

मला वाटत काकतालीय न्याय शास्त्र इथे काम करत असावे.

इंद्रियातीत ज्ञानाचे अनुभव बहुतेक सर्वांनाच कधीकधी येतात असे वाटते. मला त्यापैकी हा प्रकार वाटतो.

तर्कवादी's picture

12 Jan 2023 - 6:55 pm | तर्कवादी

रंजक माहिती पण यात कार्यकारण्भाव असेल असे वाटत नाही. फक्त योगायोगाने काही भविष्य खरी ठरत असावीत असे मला वाटते

हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर's picture

12 Jan 2023 - 9:04 pm | हणमंतअण्णा शंकर...

पुस्तकात दिलेले सुरुवातीचे सोपे प्रयोग सहज जमले. ते म्हणजे लंबकाची दोरी हातात धरून हात अगदी स्थिर ठेवता येणे. त्यानंतर मुद्दाम हाताने गति न देता नुसत्या विचाराने लंबक उभा, आडवा, घड्याळाच्या दिशेने व उलट दिशेने फिरवता येणे, वगैरे.

इथेच मेख आहे.
१. हात स्थिर ठेवणे हा भास असतो
२. आणि मग वरच्या स्थिर हातात पकडलेला लंबक 'मनाने' हलवणे!

याचेच एक नेहमीचे वर्जन म्हणजे नारळ हातात धरून भूजल पाहणे.
एका ( उजव्याच बरं का) हाता शेंडीवाला नारळ तळहातावर आडवा जमिनीला समांतर ठेवायचा. शेंडी आपल्याकडे आणि टोक समोर. आणि मग जमिनीवर चालत राहायचे. जिथे भूजल असते तिथे नारळ टोकावर शेंडी आकाशाकडे करून तळहातावरच उभा राहतो!!

मेख -
१. तळहात जमिनीला समांतर स्थिर ठेवायला लागतो.
२. आणि मग वरच्या स्थिर तळहातावर असलेला नारळ पावलांखाली भूजल असल्यास लगेच ताठ उभा होतो!!!

आता कोणालाही ही 'विद्या' जमत नाही बरे!!

पायाळू लोकच/पुरुषच/मुलंच लागतात असंही आहे. आणि गंमत म्हणजे एकाही बाईला मी पाणक्या म्हणून पाहिले नाही.

याचे अजून एक वर्जन आहे - दोन तारा घेऊन पाणी पाहणे. नारळ नाही.

नारळात पाणी असतं म्हणून भूजलाबरोबर त्याची रिअ‍ॅक्शन होते असा युक्तीवाद मी एका पाणक्याकडून ऐकला.

आता अजून एक वर्जन -

एका तव्यात वाळू घ्यायची आणि त्यावर शेंडीवाला नारळ आडवा ठेवायचा. त्या नारळावर हळद कुंकू वाहून त्या नारळावर एक पुरुष बसेल. त्याने तवा, नारळ न हलवता, कोणत्याही आधाराशिवाय नारळावर बसायचे असते. बसणारा पुरुष आपण अ मानू. मग एक दुसरा पुरुष दोन उदबत्त्या पेटवेल. अर्थात हळद कुंकू वाहून. आता दुसरा पुरुष उदबत्ती हात-जोडलेल्या हातात घेऊन जमिनीवर इकडे तिकडे फिरेल. फिरणारा पुरुष आपण ब मानू. जसा जसा ब पाण्याच्या जवळ जाईल तसा तसा नारळ क्लॉकवाईज फिरेल. आणि समजा ब अगदी मोक्याच्या जागी उभा राहिला पाण्यावर, तर नारळ तव्यातल्या वाळूवर गरागरा फिरू लागेल. तो इतका जोरात फिरेल की अ ला फेकून देईल.

आता :
१. बसणारा माणूस अ हा स्थिर बसावा लागतो नारळावर चवड्या/तळपाय ठेऊन. स्किल स्किल!
२. असा तो बगळ्यासम स्थितप्रज्ञ अ, जो अफाट सिद्धीने स्थिर नारळावर तासंतास बसू शकणारा जणू साक्षात भूजलदेवतेचा पुतण्याच, तो प्रकांड हटयोगी संयमी अ, जर गरारा फिरून फेकला गेला तर अशा त्या जागी जिथे ब च्या पावलांखाली वसते ५ इंची पाणी, माझे राणी!!

----

बर्‍याच लोकांचा एक समज असतो की जमिनीखालून झरे वाहतात आणि काही ठराविक ठिकाणी या झर्‍यांचे डोह असतात. तिथेच बोअरवेल काढली तर भरपूर पाणी लागेल.

भूजल कसे असते याचा बेसिक अभ्यास असेल तर साधारणतः लक्षात येईल की वरील पद्धतींनी पाणी पाहणे हा निव्वळ मूर्खपणा असतो. अधिक माहिती अर्थातच विकीवर https://en.wikipedia.org/wiki/Water_table

चित्रगुप्त's picture

12 Jan 2023 - 10:42 pm | चित्रगुप्त

लंबक हा विषय माझ्या आयुष्यातून कधीचाच हद्दपार झालेला असल्याने त्याविषयी आता मला काहीच म्हणायचे नाही. खंडन-मंडन तर मला तेंव्हाही करायचे नव्हते. फक्त जिज्ञासेपोटी प्रयोग केले होते, ती शमल्यावर ते बंद केले.
मात्र आपल्या सर्वसामान्य तर्कापलिकडे बरेच काही असते, त्यापैकी एक म्हणजे 'इंद्रियातीत जाणीव' याचा अनुभव एक कलावंत म्हणून अनेकदा येत असतो, म्हणून हा त्यापैकी एक असू शकतो, असे मी वरील २०२१ च्या प्रतिसादात लिहीले आहे.

विकायचा आहे काय?
___________
फारच गंमतीशीर आहे.

घर आवरताना अधून मधून दिसतो तो लंबक. आता कुठे आहे ते लक्षात नाही. मिळाल्यास देईन तुम्हाला. पण त्याच लंबकात काही विशिष्ट शक्ती आहे असे नाही. कोणताही लंबक चालतो.