.
.
- काही नवे करावे म्हणून - भाग १
- काही नवे करावे म्हणून - भाग २
- काही नवे करावे म्हणून - भाग ३
- काही नवे करावे म्हणून - भाग ४
- काही नवे करावे म्हणून - भाग ५
- काही नवे करावे म्हणून – भाग ६
- काही नवे करावे म्हणून - भाग ७
- काही नवे करावे म्हणून - भाग ८
- काही नवे करावे म्हणून - भाग ९
- काही नवे करावे म्हणून - भाग १०
- काही नवे करावे म्हणून - भाग ११
- काही नवे करावे म्हणून –भाग१२
- काही नवे करावे म्हणून - भाग १३
- काही नवे करावे म्हणून - भाग १४
- काही नवे करावे म्हणून - भाग १५
- काही नवे करावे म्हणून - भाग १६
- काही नवे करावे म्हणून - भाग १७
काही नवे करावे म्हणून-भाग १८
आणि हे सगळे मला कोण सांगत होते?तर भाईंची बायको.तिच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करून चालणार नव्हते.”वैनी,तुम्ही मला सांगितलंत,ते बरं केलंत.पण काय आहे ना?मी एकटी जाते म्हणजे काय?मी तयारीत असते हो.माझ्याकडे हत्यार असतं.जो माझ्या अंगावर हात टाकेल त्याला आधी पोटात दोन गोळ्या खाव्या लागतील इतकं नक्की.आणि इतक्या जवळून माझा नेम नक्कीच चुकणार नाही.पर्समधून बाहेरपण काढावं लागणार नाही,तुमच्या घरापासून माझं बोट चापावरच असतं”
तिने आ वासला होता,तिचा हात तोंडावर गेला.इतक्यात मी का आले नाही हे बघायला मयूच समोरून येताना दिसला आणि मी सुटकेचा श्वास सोडला. तिला तशीच सोडून आम्ही बरोबर चालायला लागलो आणि मला हसू फुटलं.बागेत जाईपर्यंत तर मला खोsखोs हसू येऊ लागलं होतं.
(क्रमश:)
********************************************************************************************
काही नवे करावे म्हणून-भाग १८
मयूला काहीच कळत नव्हतं.मी बागेत जाता जाता एलिफंट रॉकजवळ जाताना त्याला सांगायचा प्रयत्न केला पण माझ्या हसण्यामुळे त्याला काहीच समजत नव्हतं.बागेत गेल्यावर मात्र मी प्रयत्नपूर्वक हसणे थांबवून त्याला म्हटलं.”तुला माहितीय का,तुला येताना बघून आज मी किती टेन्शनफ्री झालेय ते.”
“काय झालं आता?ती भाईची बायको होती ना?काय बोलत होती?” मयूने विचारलं.
“ती भाईंची बायको असली तरी ती त्याच्यासारखी नसावी.ती मला सावध करत होती असं मला वाटतंय.”मी.
एकदम धसकून मयूने विचारलं,”म्हणजे?काय सांगतेस?”
“हो रे,ती म्हणाली की,’तुम्ही एकट्या कशा जाता कोळंबा वाटेने,आम्ही गावातल्या बायकापण कधी जात नाही.आणि ते दादा पण नसतात हल्ली तुमच्याबरोबर.’तर मी सांगितलं तिला की,आज तू परस्पर बागेत येणार आहेस म्हणून,तर ती म्हणाली,’खालूनच आवाज द्या त्यांना, याचाच अर्थ वाटेत धोका आहे असं ती सांगत होती बहुधा. असं मला वाटतं”या स्पष्टीकरणावर मयू वैतागून म्हणाला,”आणि तू त्याच्यावर हसतेस काय?”
“अरे,मी त्याच्यावर नाही हसले.मला इतकं टेन्शन आलं ते सगळं ऐकून.मग त्या घाबरगुंडीतून मी तिला जे काही सुचलं ते मी तिला इतक्या गंभीरपणे सांगितलं,आणि त्याच क्षणी तू येताना दिसल्यामुळे मला इतकं हायसं वाटलं आणि मग माझी थाप तिला पचली असेल का या विचाराने, ते सगळं आठवून मी हसतेय.”इतक्या विस्ताराने ऐकल्यावर मयू म्हणाला,”अग,म्हणजे तू तिला सांगितलस तरी काय ताई?”.
“अरे ते ऐकून मी इतकी अस्वस्थ झाले की,एक क्षणभर मला काही सुचलंच नाही.तू आजतरी असशील की,नाही हे पण कळत नव्हतं.ती मला सावध करतेय तर तिच्या कानावर काही कुजबूज आली असणारच.’आता आपल्या नवऱ्याने अजून काही घोळ घालून मला त्रास दिला आणि तोही अशा स्वरुपात,तर त्याचे काही खरे नाही,’ असे वाटून ती मला सांगायला इथे थांबली असावी. नाहीतर इथे उभी राहून ती माझी वाट कशाला बघेल?’’मयू हुंकारला.
मी पुढे बोलत राहिले.“पण तिच्याबरोबर काहीतरी असं बोललं पाहिजे की तिला ते पटून तिने ते नवऱ्याच्या अगर त्याच्यासोबत कोणी बोलत असेल त्याच्या किंवा अजून कोणालातरी सांगायला पाहिजे.आणि मग ते गावात पण पसरायला पाहिजे.”
“मग?तू काय सांगितलंस तिला?ती अचंब्यात कशाने पडली एवढी?कसला झटका दिलास एवढा?आणि वर हसतेयस नुसती.”मयू उत्सुकतेने म्हणाला.
“तू पण हसशील रे तिला काय सांगितलं ते ऐकून ?”मी उत्सुकता अजून वाढवली त्याची.तो वैतागून म्हणाला.“सांगतेस का आता?”
मला पुन्हा हसू येऊ लागलं होतं,पण थोडं आवरत,थोडं हसत मी म्हटलं,“अरे मी तिला सांगितलं,‘वैनी,तुम्ही मला सांगितलंत,ते बरं केलंत.पण काय आहे ना?मी एकटी जाते म्हणजे काय?मी तयारीत असते हो.माझ्याकडे हत्यार असतं.जो माझ्या अंगावर हात टाकेल त्याला आधी पोटात दोन गोळ्या खाव्या लागतील इतकं नक्की.आणि इतक्या जवळून माझा नेम नक्कीच चुकणार नाही.पर्समधून बाहेरपण काढावं लागणार नाही,तुमच्या घरापासून माझं बोट चापावरच असतं.’तितक्यात तू दिसलास आणि मी टेंशनफ्री झाले.मग जे हसू यायला लागलं ते आवरेचना.”
आता मयूही हसू लागला.“पुढच्या वेळी येताना वर्धनची केपा उडवायची तरी घेऊन ये.”त्याने सुचवले.
मी त्याला म्हटलं “नाही,नाही आधी तो पुढच्या वेळेचा बंदोबस्त करूया.”एव्हाना लालबहादूर आणि गुलाबबहादूर येऊन उभे राहिलेच होते.मी लालबहादूरला एलिफंट रॉकच्या बाजूकडील माझ्या बागेच्या गडग्याजवळ घेऊन आले.जिथे उभे राहिले की, मूळ रस्त्याकडून वाळलेल्या बागेच्या वाटेच्या सुरुवातीपासून एलिफंट रॉकपर्यंतची वाट दिसत असेच शिवाय तिथून वळणारी वाटही दिसत असे,जी खालून वर येताना वळत असे.
ती जागा दाखवून मी त्याला म्हटलं,“देखो बहादूर,अगले शनिचरसे मेरे आनेके टाईमपर आपको यहाँ खडा रहना है.मुझे नीचेसे आपकी मुंडी दिखना मंगता है,अगर नाही दिखी तो मी उपर नही आऊंगी और फिर आपको पगारभी नही मिले पायेगा उसदिन.”तो हुशार होता.त्याने लगेच गडगा आणि एलिफंट रॉकमधल्या जागेकडे बोट दाखवत म्हटले,‘’ये थोडा खतरनाक जगा है.’’
“हुं,तो मतलब तुम समझ गये,अच्छा है.” या माझ्या बोलण्यावर मयू हसतच म्हणाला,”वैसे तुम फिक्र न करो,दीदीके पर्समें पिस्तूल रहता है.”लालबहादूर हक्काबक्का होऊन एकदा माझ्याकडे आणि एकदा मयूकडे पाहू लागला.मी फक्त होकारार्थी मान हलवली.
इतक्यात इतर कुठेतरी काम करणारा त्याचा गाववाला त्यांना भेटायला आला.मग मला कळले की,हे गृहस्थ गुलाबबहादूरचे वडील आहेत आणि मुलाचा पगार ताब्यात घ्यायला ते हजर झालेत.मला कळेना हा काय प्रकार आहे.त्यांची ओळख लालबहादूरने माझ्याशी करून दिल्यावर त्यांनी गुलाबबहादूरकडे हत दाखवून सांगितले,“ये लडका पगार मिलनेके बाद दारू पीता है और जुगार खेलता है.पिचले हप्ते तो तीन दिन गायब था. उसके पहलेभी रात रातभर गायब रहता था.”
आता हक्काबक्का होण्याची पाळी माझी होती.हातर मोठाच धक्का होता.लालबहादूरकडे पाहिले.त्याने मान हलवली फक्त.“ये सब क्या है बहादूर?और जब ये नाही रहता था तब यहाँ कौन होता था? ”मी रागातच विचरल्यावर त्याच्या तोंडून उत्तर आले,”मैंही करता था पहले जब दोबार रातभर नाही आया तो ,पर जब पिचले हप्ते ये दूसरे दिन नही आया तो मैंने चचाको बुला लिया.फिर उन्होंने काम किया इदर इसके बदले.”
“फिर तुमने क्यों नाही बताया मुझे पहली बारही?”मी रागातच होते.
“मैंने उसको वार्निंग दिया था.उसनेभी ऐसा नही करूँगा बोलके माफी माँगी थी.सो एकबार छोड दिया.”तो उत्तरला.
“फिर जब दुसरी बार इसने ऐसाही किया तबभी नही बताया तुमने.”मी विचारल्यावर तो गप्प झाला.
मी रागाने अजून काही बोलणार इतक्यात त्या चचाने हात जोडत लालबहादूरऐवजी उत्तर दिले.“माफ करना बाईजी,मैंनेही इसे मना किया था,आप उसे कुच मत बोलना,गलती तो मेरीही है.मुझे माफ करना.फिर मैंने इधर आके उसका काम किया. ”
लालबहादूरवर जास्त रागावणे शक्य नव्हते,कारण त्याच्या इमानदारीचा प्रत्यय त्याने स्वत जडून डबलड्युटी करून दिला होता आणि आलेली अडचण स्वतः निवारली होती. माझ्या माघारी एखादे फळ गळून पडले तरी तो तसेच त्या झाडाखाली सुकवून ठेवत असे मला दाखवण्यासाठी,“देखो,ये दाना यहाँसे टूटके गिरा.”त्यावर असे पडलेले फळ खाण्याची परवानगी दिली तरी तो खात नसे.असा माणूस हातातून सोडणे म्हणजे मीच अडचणीत येण्यासारखे होते.
गुलाबबहादूरम्हणजे अक्षरशः सत्रा/अठरा वर्षाचा मुलगा होता.त्याला आतापासून दारू,जुगार ही व्यसने लागलेली होती. नेपाळ सरकार जे कॅसिनो चालवतात तिथे नेपाळी लोकांना जाण्याची,जुगार खेळण्याची बंदी असते.म्हणजे तिथे जुगारावर बंदी असूनही या मुलाला ही व्यसने लागलेली होती आठ दिवसांचा पगार दोन/तीन दिवसात संपवायला काहीच कसे वाटत नाही,असा मला विचार पडला.
मी त्याच्या वडिलांना विचारले,“आप क्या करते हो?”
“यही काम करता हूँ.”त्यांनी सांगितलं.
“कहॉं”मी.
“कुर्धेमें”,त्यांनी सांगितलं.कुर्धे गाव तिथून बऱ्यापैकी अंतरावर होते.
“फिर आप कैसे काम कर सकते है यहाँ?”मी विचारलं.
तर ते म्हणाले,“जोडीवाला सांभाल लेता हे .वहाँ अभी आम कच्चा है.”
“ठीक है, फिर आप यहाँ काम करो और इसे वहाँ भेजो,मंजूर है तो बोलो.मुझे यहाँ इसकी जरूरत नाही.वहाँके आम पकते पकते यहाँका काम खतम हो जायेगा.”मी निर्वाणीचे बोलले.तेही विचारात पडले.मग कबूल झाले.
मग पगार झाला. मी लालबहादूरला दोन दिवसांचा ओव्हरटाईम दिला.या चचाचे नाव सोमबहादूर.त्यांनाही सगळी कल्पना दिली.
मग अजून एक त्यांचे गाववाले आले.ते इथल्याच कोणाच्या तरी बागेत काम करीत असत. आदल्या वर्षी घरी जाताना उचल घेऊन जाणारेही भरपूर असतात नि वर्षानुवर्षे बांधलेले असतात बागमालकांशी.हे नवीन कळले.त्यांनी सांगितले,”आप तो इनको रूम बनाके दिया है.घर बसाके दिया है.इतना खर्चा कोई नाही करता.हम जमिनपेही सोते है.
“मैने तो उन्हें नीचे सोनेको ही मना किया है.मचानपर सोनेको बोला है.साँप,बिच्छूने काटा तो यहाँ क्या करेंगे जंगलमे?इसीलिये सावधानीसे रहनेको बोला है” या खुलाशावर ते ते म्हणाले,“वही तो बोल राहा हूँ इतना खयाल कोई नाही रखता.”
त्यावर,”सबकी अपनी अपनी राय है”असे म्हणत मी विषय बंद केला.
इतक्यात मयूने लालबहादूरला एका बाजूला घेऊन सगळे सांगितले आणि माझ्याकडे पिसूल असते ही गोष्ट त्यांच्या सगळ्या गाववाल्यांच्या कानावर घालण्याची सूचना केली.त्यानेही मान डोलावली.
आम्ही त्याच वाटेने खाली उतरून रस्त्याला लागेपर्यंत ते सगळे बंधापाशी उभे राहून पाहत होते.पातेरेमामी रस्त्यातच भेटल्या,म्हणाल्या,“शिता काकुनी सुरेखाताईच्यात बोलावलानी हाय.वाट बघतात थंय.”
आम्ही सुरेखाच्या घराकडे वळलो.तिच्या अंगणात आता बऱ्याच बायका होत्या.त्यात आजी आणि भाईची बायकोही होत्या.पण अभ्यास चालू नव्हता.बायका गप्पा मारत होत्या.मी पोचताच थोडी शांतता झाली.
“काय ग आजी,कशाला बोलावलंस?”मी तिच्याजवळ जात विचारलं.ती काही बोलणार इतक्यात सुरेखाच बोलली,“अग ताई,तू काय हल्ली इथे फिरकतच नाहीस.त्यासाठीच आज आमंत्रण देऊन तुला बोलावलंय.”
“अग,तुला तर माहीतच आहे,मी कशी घड्याळाच्या काट्यावर फिरत असते ते.उलट मी तुझी कॉफी किती मिस करते माहितेय का?”मी तिची समजूत काढण्याच्या स्वरात म्हटलं.
तर आजी ठसक्यात म्हणाली,“ काय करतेस?”
“अग,म्हणजे मला त्या कॉफीची खूप आठवण होते ग.”मी.
“होय तर,म्हणूनच हंय न येता परस्पर पलतंस ना?मी पण हंय वाट बगी असतंय त तुजो काय पत्तोच नाय.शेवटी आज पातेरनीस निरोप घेवन पाटवलंय ”आजी लटक्या रागाने बोलली.
“आता आलेय तर सुरेखा बघ,गप्पा मारत बसलीय ती.”मी पण लटकी तक्रार केली.
सुरेखा लगबगीने उठून आत गेली.दोनच मिनिटात ती आणि तिची मदतनीस बाई सगळ्यांसाठी चहा आणि माझ्यासाठी कॉफी घेऊन आल्याच.
कॉफीचा आस्वाद घेताना शिकवणी वर्गाच्या गप्पा झाल्या.आता तिथे कला कौशल्य वर्गही चालू झाले होते.सुरेखा त्यांना शिवणकाम शिकवत असे.आणि आपली आजी त्यांना एका सुईवरचे विणकाम शिकवीत असे.हे कळल्यावर मला आनंद झाला.आता जवळजवळ सगळ्या बायका एका जागी भेटत होत्या,बोलत होत्या,आपसातले हेवेदावे विसरून आनंदाने नवे काही शिकत होत्या.यामुळे गावातली भांडणेही कमी झाली होती.हे सगळे त्या बायकांच्याच तोंडून समजल्यामुळे मला सुरेखाच्या संघटन कौशल्याचे कौतुक वाटले.योग्य मार्गदर्शन मिळाले तर ही मुलगी कुठल्या कुठे जाईल,याचीही कल्पना आली.
“वा! सुरेखा,आता तुला काहीतरी बक्षीस द्यायला हवं.”मी कौतुकाने म्हटलं.
“चल ग ताई.तुझ्यामुळेच सुरु झालं हे सगळं.”ती लाजली.
“नाही,अग.फक्त कल्पना देऊन भागत नाही.ती राबवणारेपण असायला हवेत.त्याशिवाय कुठलंच काम पुढे जाऊ शकत नाही.तू नेटाने सुरुवात केलीस म्हणून हे झालाय.आता एकाच काळजी घे,हे काम थांबून उपयोगाचे नाही.”मी तिचे श्रेय तिला देत बोलले.
“म्हणजे ग?”तिने उत्सुकतेने विचारले.
“म्हणजे असं की,आता या बायका शिकताहेत,त्यांचे शिक्षण वाया जाता कामा नये.”मी तिला बजावले.
“म्हणजे ग?”तिची उत्सुकता अजूनच वाढली.सगळ्या विद्यार्थिनीही आपल्या हातातले काम करत कान देत होत्या.
“सांगते.आता या शिकल्या,मग पुन्हा या काय करणार?ज्यांना शक्य आहे त्या कापड आणि दोरे आणून काही शिवतील,काही विणतील.पण पुढे काय?आणि ज्या चांगल्या शिकल्यात पण ज्यांच्याकडे कापड किंवा दोरे आणायला पैसे नसतील तर त्याची कला फुकट जाईल.”या स्प्ष्टीकरणमुळे सुरेखाच्या लक्षात आलं मला काय म्हणायचंय ते,पण ती अजूनही बुचकळ्यात पडली होती.
“मग ग ताई ?पुढे कसं करायचं?”तिने विचारमग्न चेहऱ्याने विचारले.
मी तिला म्हटलं,”सगळ्यांना हातातलं काम बाजूला ठेवून इथे लक्ष द्यायला सांग.सगळ्यांशी एकदमच बोलते.सगळ्यांची संमती असेल तर छानच होईल.नाहीतर ज्यांना पटेल त्या यात भाग घेऊ शकतील.कितीजणी आहेत एकूण?”
“ या ना?अठेठेचाळीस,”सुरेखाने उत्साहाने सांगितले.
“त्यात तुम्ही तिघी,म्हणजे एकावन्न झाल्या.” मी गणिताला सुरुवात केली.”बरोबर?”
सगळ्या एका सुरात हसत ओरडल्या.“होssssss”
त्यांची उत्सुकता वाढलेली होतीच.त्या सगळ्या ऐकायला तयार झाल्या.मी म्हटलं,“तुमच्यापैकी कितीजणी काम करून पैसे मिळवतात?”तीन चतुर्थांश हात वर झाले.
“किती मिळवता?”माझी पुढची पायरी.“एकेकीने उत्तर द्या.”
कोणी दोनशे कोणी पाचशे,कोणी शंभर,असे आकडे सांगू लागल्या.उरलेल्या बाराजणींना विचारलं,”तुम्ही घरखर्च कसा चालवता?तुमच्या हातात घरखर्चासाठी पैसे येतात की, तुमचे यजमान खर्च करतात?”त्यातल्या काहीजणी आजीसारखे अंडी,कोंबड्या,दारची भाजी असे विकून कार्चाला जोड देत होत्या.काहीजणींच्या हातात घरखर्चासाठी पैसे येत होते.एकूण सगळ्याच कमावत्या होत्या.
मग मी,ज्या काम करून पैसे मिळवत होत्या त्यांना विचारलं,”त्या जर कामाला जातात तर इथे यायला वेळ कसा मिळतो?”
मग शेवन्तीने अभिमानाने सांगितले,“ताई,तुमच्या बागेत सकाळी सात वाजता काम सुरु झाला न?आणि तेवाच आम्ही हिते येयास लागलावना?मंग आमीच ठरवलाव की, आता कामाला सकाळी सात वाजता जायचा आणि हिते तीन वाजता येयाचा.ज्यांला कबूल नाय त्यांच्याकडं कामच नाय करायचा.”
“अरे वा!हे छानच झालंय.”मला नवलच वाटलं.पण एकीचे बळ भल्याभल्यांना वठणीवर आणते.आणि या बायकांना त्याची कल्पना आली होती.आता त्यांना पुढे जाण्यापासून कोणीच रोखू शकणार नव्हते.हीच वेळ होती यांना काही सल्ला देण्याची.आता हसू येतं आठवलं की,पण त्या क्षणी माझ्या डोक्यात घुमलेला आवाज होता शोलेमधल्या ठाकूरचा खर्जातला आवाज,“लोहा गरम है,मार दो हथोडा.”
मी त्यांना सांगायला सुरुवात केली,“तुम्ही आता एक महिला मंडळ स्थापन करा.आणि त्याची वर्गणी असेलआठवड्याला दोन रुपये.प्रत्येक सोमवारी न विसरता हे पैसे जमा करायचे सुरेखातैकडे.ती हिशेब ठेवेल.असे आठवड्याला एकवन्न बायकांचे १०२ रुपये जमा होतील.असे वर्षाचे ५२ आठवडे झाले की,जमा होतील ५३०४ रुपये.आणि ते बँकेत ठेवले तर त्यावर थोडंस व्याजी वाढेल.”आश्चर्याचा धक्काच बसला सगळ्यांना.फक्त दोन रुपये आठवड्याला आणि इतके पैसे जमा होतील,हे त्यांना खरंच वाटत नव्हतं.
थोडा कालवा झालाच. मग आजीने सुत्रे हातात घेतली.“गप्प बसा ग.ही सांगतेय ते खरा हाय.आपल्याला हिशेब करता येत नाय ना म्हणून समजत नाय.आपला किती नुस्कान होते ते.त्या मेल्या चाफेरकरान् माज किती फसवलान ते.आता नीट ऐका फुडे.”
पुन्हा सगळ्या गप्प झाल्या.“आता वर्षभर तुम्ही हे पैसे जमा करा.शिकलात की,या पैशातून साहित्य विकत आणा.ज्याला जे आवडेल ते काम करा.बनवलेल्या वस्तू नीट ठेवा.त्याला किती खर्च आला?किती दिवसात बनवली याचापण हिशेब ठेवा.”सगळ्या उत्साहित झाल्या.महिला मंडळ स्थापन झाले.अध्यक्षपदाची माळ आजीच्या गळ्यात एकमताने घालण्यात आली.खजिनदार आणि कार्याध्यक्ष अर्थातच सुरेखा.नियम ठरवण्यात आले.दर सोमवारी सभा घ्यायचे ठरले.सगळ्या नवीन काहीतरी करायचे या उत्साहाने फसफसत घरी गेल्या.
गेली नव्हती ती फक्त भाईंची बायको.आजी आणि सुरेखा माझ्या हाताला धरून आत घेऊन आल्या.तीही आमच्यापाठोपाठ आत आली.आजीने तिच्याकडे हात करत मला विचारलं,“काय ग, ही काय म्हणतेय?
ती म्हणतेय की,तुला धोका हाय म्हणून”,आजी म्हणाली.
“हो,त्या म्हणत होत्या खरं काहीतरी.”या माझ्या उत्तरावर आजी उसळली.“पण तू एकटी जातेसच कशी म्हणतय मी?त्या पातेर्नीला तरी हाक मारायची ना?”
“अग कशाला सगळ्यांना त्रास?मयू असतोच की माझ्यसोबत.”मी म्हटलं.“आणि घाबरायचं कशाला नि कोणाला?तिथेच मरण असेल तर घाबरून टळणार आहे का? आणि माझ्याकडे पिस्तुल असतं हे मी त्यांना सांगितलाय आणि तुम्हीपण गावात ही बातमी पसरवा.”
“शानीच हायस.”आजीने मला टपली दिली नि भाईंच्या बायकोल,“तू जा गो.”असे सांगितले.ती बिचारी माझ्यकडे वळून वळून पाहत गेली.
“दाखव गो मज पिस्तुल.कसा असता ता माज बगायचा हाय.”आजीने फर्मान सोडले.हातानेच तिला थोपवत मी आजीला विचारलं”हं,आता सांग तिने काय सांगितलन ते तुला.”.
“अग बाय,ती बोलत होती,की,भाई तुज्याविषयी दोन गड्यांशी बोलत असताना तिना आयकलान म्हणून.तू केवा येतस,केव जातस ह्याविषयी.म्हणून तुज सांगायास गेली.नंतर माज नि सुरेखास सांगायास आली.”आजी थोड्या रागाने, थोड्या काळजीने सांगू लागली.सुरेखाने ठामपणे सांगितलं.“आता ताई येण्याच्या वेळी मीच उभी राहत जाईन तिकडे.”
माझ्यावर असलेले त्यांचे प्रेम पाहून मी भारावून गेले.कोणत्या जन्माची पूर्वपुण्याई म्हणून मला हे लोक लाभले होते,या प्रश्नाचं उत्तर शोधायचं की भाईसारख्या लोकांचे बेत तडीला जाऊ न देण्याची त्यांची तळमळ पाहून धन्य व्हायचं या विचारातच मी तिथून परत निघाले.
(क्रमश:)
प्रतिक्रिया
30 Apr 2016 - 12:30 am | एस
च्यामारी ह्या भाईच्या!....
30 Apr 2016 - 9:22 am | मुक्त विहारि
गावातल्या लोकांचे बरे-वाईट अनुभव रसाळ शैलीत सांगत आहात.
1 May 2016 - 5:18 pm | नूतन सावंत
मुवि, तुम्ही पण आता गावातले होताय.ठकासी व्हावे महाठक हे समर्थांचे वचन सुरुवातीपासून लक्षात असूद्या.
30 Apr 2016 - 10:51 am | नाखु
मस्त..
रच्याकाने सतरा भाग झाले ते "गावाकडच्यांचे कैवारी " या धाग्यावर फिरकले नाहीत ते एकदाही,मोठा अचंबा वाटतो त्या मसिहांचा आणि त्यांच्या खांद्यावरून "शहरी" माणसांना शेलकी+विखारी गोळ्या झाडणार्यांचा ( मसिहांचे धागे बघा) नरोत्तम सापडतील आपसुक.
एक तर दुसर्याच नावाने सध्या वावरतोय.
शहरी चाकरमानी नाखु
30 Apr 2016 - 7:56 pm | विजय पुरोहित
छान झालाय हा पण भाग...
1 May 2016 - 4:40 pm | पिलीयन रायडर
मस्त!!!!
2 May 2016 - 1:08 pm | प्रियाजी
सुरंगी, वा! छान! तुझ्या समयसुचकतेची कमाल आहे. तुझ्या धाडसी स्वभावाचा परत एकदा प्रत्यय. तुला विनंती केल्यावर लगेच नवीन भाग टाकलास, धन्यवाद.
13 May 2016 - 9:11 pm | पीशिम्पी
आता पुढचा भाग कधी??
7 Jun 2016 - 4:57 pm | पीशिम्पी
आता पुढचा भाग कधी??
18 Jul 2016 - 10:03 pm | पीशिम्पी
आता पुढचा भाग कधी??
22 Nov 2017 - 2:13 pm | स्मिता श्रीपाद
याचा पुढचा भाग आला आहे का ?
4 Jan 2018 - 2:55 am | मुक्त विहारि
पुढचा भाग कधी?
12 Feb 2018 - 11:21 am | king_of_net
To good to be true........ like a fantasy!!!!
16 Nov 2018 - 10:27 pm | जीवनयात्री
सगळे भाग वाचले. भाईचं काय निकाल लावला हे पुढे वाचायला आवडेल.