.
.
- काही नवे करावे म्हणून - भाग १
- काही नवे करावे म्हणून - भाग २
- काही नवे करावे म्हणून - भाग ३
- काही नवे करावे म्हणून - भाग ४
- काही नवे करावे म्हणून - भाग ५
- काही नवे करावे म्हणून – भाग ६
- काही नवे करावे म्हणून - भाग ७
- काही नवे करावे म्हणून - भाग ८
- काही नवे करावे म्हणून - भाग ९
- काही नवे करावे म्हणून - भाग १०
- काही नवे करावे म्हणून - भाग ११
- काही नवे करावे म्हणून –भाग१२
- काही नवे करावे म्हणून - भाग १३
- काही नवे करावे म्हणून - भाग १४
- काही नवे करावे म्हणून - भाग १५
- काही नवे करावे म्हणून - भाग १६
काही नवे करावे म्हणून –भाग १७
मी त्याला म्हटलं,”तू मामाला म्हणालास ना मी धंद्यात पडलोय,खरंच तू पडलाच आहेस.तुझ्या वडिलांनी तुला सल्ला दिला होता की, इमानदारीने वाग.हेच जर तू मला फोन करून कळवलं असतंस तर मी तुला परवानगी दिलीही असती कदाचित.पण नाही तुलाही मोह झालाआणि तू लबाडी केलीस .यातून धडा घेऊन तू जर काही शिकलास तर बरंच आहे.वडिलांचा सल्ला लक्षात ठेवलास तरच आयुष्यात काही प्रगती करू शकशील.आणखी एक, आपली भागीदारी तुझ्याकडूनच मोडली आहे तर आता मी तुम्हाला आंब्यात वाटा देणार नाही राखण्याचा पगारच देईन.कारण मलाही फुकट काही नको.”
(क्रमश:)
सचिनचा चेहरा अजूनच पडला.पण त्याला बोलायला तोंडच उरलं नव्हतं.
आम्ही सुरेखाच्या घरी आलो.सुरेखा अजूनही रागातच होती.”किती नालायकपणा ना ! इतका विश्वासघात. आयत्यावर कोयता मारायला अजिबात शरम कशी वाटत नाही म्हणते मी?हिम्मत तरी कशी झालीहो ?”ती फणफणली.
“आता तू शांत हो.झाली चूक त्याच्या हातून,पण आपण झालोच ना चोरावर मोर.”मी तिला समजावलं खरं पण मलाही खंत वाटत होतीच.वाईट एकाच गोष्टीचं वाटत होतं. पैशाचं नुकसान वाचवता आलं खरं ,पण इतक्या कष्टानंतर पाहिलं फळ तोडायचा आनंद मात्र चोरीला गेला तो गेलाच.तो नाही मिळवू शकले.
आणलेल्या फळातली पाच फळं तिच्या हातात देत मी म्हटलं,”जा ठेव देवापुढे .त्याला तरी मुहूर्तावर मिळूदेत.”
“अग,पण तुझ्या घरच्या देवाला ठेवायचं ना आधी?”तिने अडचण काढली.
“अग,माझा नि तुझा देव काय वेगळा आहे?मुंबईच्या देवाला हवे असते तर तर आंबे आपल्या हातानेच मुंबईत पोचले असते ना?इथल्या देवाच्या कृपेने ते तरी कष्ट वाचले ना? पट्ट्या ठोका,पेट्या बनवा,पेंढा घालून आंबे भरा,पेट्यांवर नावं घाला आणि एस.टी.वर पार्सल करा.या कामातून सुटका नि मुंबईला त्या पेट्या उतरून घेऊन व्यापाऱ्यांकडे पोचवा. ही सगळी कामे वाचली नाहीत का? म्हणून याच देवाला धन्यवाद देऊयात.”माझ्या स्पष्टीकरणावर ती हसली आणि देवघरात गेली.
दोन फळं आजोबांच्या धरली.म्हटलं,”आज माझं कर्तृत्वत्व बघायला माझे आजोबा नाहीत,पण तुम्ही मला त्यांच्या जागी आहात.माझ्या माहेरचे जयेष्ठ व्यक्ती म्हणून तुम्ही याचा स्वीकार करा.”त्यांनीही ती घेऊन माझ्या आजोबांसारखाच माझ्या डोक्यावर हात ठेवला.
सुरेखाच्या यजमानांनी फोन करायला सुरुवात केली.त्यांच्यानंतर मयू,नवरा आणि मी अशा तिघांनीही आपापल्या ओळखीच्या लोकांना फोन केले.आता गुरखा मोहिमेने वेग घेतला होता. आम्हा सगळ्यांच्या ओळखीच्या लोकांना, संध्याकाळपर्यंत, जास्तीत जास्त उद्यापर्यंत गुरखा असेल, तर सुरेखाच्या पत्त्यावर पाठवून द्यायचा निरोप देण्यात आला होता.आता वाट बघण्याखेरीज आमच्या हातात काहीच नव्हतं.
अडचण होती खरीच.आम्हाला मुंबईला आजच निघणे गरजेचे होते.आज गुरखा मिळायलाच हवा होता.जरी सुरेखाच्या यजमानांनी मी पाहीन म्हटले तरी बागेत एक माणूस असणे गरजेचे होते.त्यांनाही त्याच्या बागेची राखण करणे गरजेचे होतेच.पण आता निवांतपणे वाट पाहणे हेच काम होतं.
शेवंता येऊन विचारू लागली.”ताई,आजच्या जेवणाचे काय करता?बागेत घेऊन येऊ ना?”मी काही बोलणार इतक्यात सुरेखाच बाहेर येऊन तिला म्हणाली.”नाही ग ताई,भाऊ नि मयू इथेच जेवतील.तू बाकीच्यांचे जेवण घेऊन जा बागेत.”तिने आजी,आजोबानाही थांबायचा आग्रह केला.पण आजी म्हणाली,”नाय गो,आज सणाचा देवास निवेद नको? ह्यांला ऱ्हावूंदे.मी जातंय.”
सुरेखाने तिला आग्रह केला,”नैवेद्य दाखवून ये ना.”
“बघतंय”,असे म्हणत आजी निघून गेली.
आमच्या गप्पा रंगल्या.आज सकाळच्या तणावाचा मागमूसही राहिला नव्हता.
सुरेखाने देवाचा आणि गाईचा नैवेद्य काढून आम्हाला बोलावले.पंगतीचा थाट सुरेखच होता.एरवी आम्ही डायनिंग टेबलावर जेवायचो.पण आज रंगीत रांगोळीचा थाट, उदबत्तीचा वास,बसायला पितळी फुल्यांचे पाट,पुढे लांबसडक केळीचे पान,त्यावर पांढरे मीठ, दारातल्या लिंबाची पिवळीधमक फोड, लालभडक लोणचे, ओल्या खोबऱ्याची हिरवी चटणी, शेजारी टोमॅटो काकडीची कोशिंबीर,बटाट्याची सुकी पिवळी भाजी,ओल्या काजूची लाल मसाल्यातली उसळ,पुऱ्या,पुरणपोळ्या, पांढऱ्याशुभ्र भाताची मूद गोड्या वरणाच्या पिवळ्या आवरणाखाली दडलेली,त्यावर कणीदार तुपाचा गोळा विरघळत असलेला,अळूवड्या,पानाच्या उजव्या बाजूला एका वाटीत पातळ केलेले तूप,एका वाटीत कटाची आमटी,एका वाटीत नारळाचे दूध आणि पानाच्या डाव्या बाजूला तांब्याचे लखलखीत त्यांब्याभांडे असा खासा बेत होता.सुरेखा सुगरण होतीच,पण आज तिचे पाककौशल्य आणि कलाकौशल्य यांचा सुरेख संगम झाला होता.
आजीही आलीच तितक्यात.तिच्या हातातही दोन डबे होते.”वायंच थांबा हां.”म्हणत सुरेखाच्या स्वयंपाकघरात गेली.थोड्याच वेळात सुरखा आणि ती हातात वाट्या भालेली ताटे घेऊन आल्या.पत्येक पानाच्या उजव्या बाजूला आजीच्या घरच्या चक्क्याचे श्रीखंड आणि मुगाचे पळीवाढे बिरडे असलेल्या वाट्याही विराजमान झाल्या.माझ्या आग्रहानुसार सुरेखाही आमच्यासोबतच जेवायला बसली.वाढायचे काम तिच्या मदतनीस बाईंनी केले.हसत खेळत जेवणे उरकली.पुरणपोळी आणि तीही नारळाच्या दुधातून,अहाहा !
चारच्या दरम्यान माझ्या मावसभावाचा फोन आला.तो एक गुरखा सोबत घेऊनच येत होता.जीव भांड्यात पडला.आता खरेतर एकाच महिन्यासाठी गुरखा हवा होता.पण एका झाडाला पुन्हा मोहोर आल्यामुळे त्यासाठी वेळ लागणार होता.त्यामुळे दोन महिने गुरखा असणे आवश्यक असणार होते. एव्हाना माझ्या भावाला रत्नागिरीतच इथली हकीकत कळली होती.त्यामुळेही मला समक्ष भेटणे आणि गुरख्याची रुजवात करून देणे या दोन्हीसाठी तो येत होता.हा माझा भाऊ फणसोपच्या आधी लागणारे गाव, भाट्ये गावचा सरपंच होता.आणि तो या गावातील लोकांना चांगले ओळखत होता.
अर्ध्या तासातच तो एका गुरख्याला घेऊन पोचला.नेपाळहून आलेला तो विशीचा मुलगा होता.गोरा रंग उंच,अंगाने बारीक, गंभीर चेहरा, पण त्यावरचे डोळे अतिशय पाणीदारअसून खांद्यावर एक डफल बॅग होती.भावाने आल्या आल्या नवऱ्याला नमस्कार करीत म्हटले,”काय? धमाल केली म्हणे तुम्ही लोकांनी.या गावातल्या लोकांना इंगा दाखवलात ना?”त्यावर नवऱ्यानेही माझ्यकडे हात करत,हसत त्याला म्हटले,”तुम्हा रत्नागिरीकारांना दुसऱ्यांच्या नांग्या छान मोडता येतात.या गावातले खेकड्यासारखे तिरप्या चालीचे लोक तुमच्यासारख्या लोकांमुळेच सरळ होणार.”
सुरेखा सगळ्यासाठी चहा घेऊन आली.तिचेही त्याने तिच्या कामाबद्दल कौतुक केले आणि गुरख्याची ओळख माझ्याशी करून दिली,’’ताई,हा बघ गुरखा,आजच नेपाळहून आलाय.याचे नाव लालबहादूर गोरखा.”त्याने मला हात जोडून नमस्कार केला.
“देखो बहादूर,तुम्हारा नाम बहुत बडे आदमीका नाम ही,उनके लिये हमारे दिलमें बहुत आदर है.कृपया उस आदरको ठेस लागे ऐसी हरकत कभी नही करना.”मी त्याचाशी बोलायला सुरुवात केली.
त्याने नुसती मान हलवून होकार दिला.
”जानते हो क्या काम करना है?”त्याने पुन्हा नुसतीच मान हलवत होकार दिला
”कुकरी है ना तुम्हारे पास?”या प्रश्नावर त्याने तशीच मान हलवत,ती चटकन काढूनच दाखवली.
“चलाते हो की नही?यहाँ जरुरत पडेगी.”असे विचारल्यावर त्याने हसतच मान हलवली.
मी भावाकडे वळून विचारलं,”अरे हा मुका आहे की काय?”
तेव्हा कुठे बहादूरमहाशयांना वाचा फुटली,”जी,जो बोलोगे वो करुँगा.”
मग पगार ठरला.दर शनिवारी पगार द्यायचा असेही ठरले.
“ठीक है,चलते है जगहपर.” मग आम्ही बागेत आलो.भावालाही ही बाग बघायची होतीच.त्यानेही फिरून सारे पाहिले.फळांचा आकार, मार्चमधले उत्पन्न,नव्याने आलेला मोहोर पाहून तो खूष झाला.”ताई,पुढच्या वेळी मी पण तुझा शिष्य होणार.”त्याने जाहीर केले.
आम्ही बहादूरला दोन्ही बागा दाखवल्या.अजून एक गुरखा शोधतोय म्हटल्यावर तो म्हणाला,”मेरा एक सगेवाला है,उसकू बुलाऊँ क्या?”
“कहाँ है?”मीविचारलं
“रत्नागिरीमें, दुसरे सगेवाले के पास.”त्याने सांगितल्यावर माझा पुढचा प्रश्न.”अभी आ सकते है?”
“जी,हाँ,”त्याच्या उत्तरावर पुढचा निर्णय लगेच घ्यावा लागणार होता.आम्ही लगेच निघायचे ठरवले.सुरेखाच्या यजमानांना आमच्या बरोबर येण्याची विनंती केली.बागेत असलेल्या लोकांना आणखी दोन तास थांबायची विनंती केली.आम्ही लालबहादूरला सोबत घेऊन रत्नागिरीत येऊन, त्याच्या सगेवाल्याला भेटून बोलणे पक्के केले.याचे नाव गुलाबबहादूर.
या दोघांसाठी बागेत एक निवारा बनवणे आवश्यक होते.त्यासाठी दोऱ्या,ताडपत्री,खुंट्या असे समान विकत घेतले.बांबू सुरेखाचे यजमान देणार होते.त्याच्यांच सल्ल्याने मोठ्या पाच सेलच्या विजेऱ्या घेतल्या.
ते दोघे तिथेच स्वयंपाक करणार तर त्यासाठी एक तवा,तीन पातेल्या झाकणांसाहित,दोन चमचे,एक उलथणं, दोन ताटल्या,दोन ग्लास शिवाय पिण्याच्या पाण्यासाठी एक मडके,एक बदली,एक मग अशी खरेदी केली.शिवाय स्वयंपाकासाठी गहू,तांदूळ,तूरडाळ,कांदे,बटाटे,मसाले,मीठ, तेल अशी खरेदी झाली.दोन चादरी घेतल्या.एक नवा संसारच जणू मांडायचा होता.
लालबहादूरने हळूच “कूच आडवान्स मिलेगा क्या?कपडा खरीदना पडेगा.’”अशी मागणी रेटली.मग दुसऱ्याचीही चौकशी करून नवऱ्याने त्यांना ‘दो जोडी कपडे’ अन्डररवेअर्ससह घेऊन दिले.शिवाय कोकणच्या काटेकुट्यांमध्ये वावरण्यासाठी भक्कम चामडी चपला घेतल्या. कोकण रेल्वेच्या कृपेने, पोटासाठी, नेसत्या वस्त्रानिशी,पायात फाटक्या हवाई चपला घालून इतक्या दूरवर आलेल्या लोकांची खरंच कमाल वाटतेआणि ढुंगणाजवळ काम उपलब्ध असताना आळशीपणा व बदमाशी करणाऱ्यांचीही त्याहून कमाल वाटते.
या शिवाय दोन कोयते घेतले.जळणासाठी लाकडे तोडण्यासाठी,आंब्यांच्या झाडांना लागणारे टेकू तोडण्यासाठी,निवडंगाच्या कुंपणाची डागडुजी आणि नवी लागवड करण्यासाठी ते आवश्यक होतेच.आता त्यांना घेऊन एका हॉटेलमध्ये नेऊन जेऊ घालणे आणि पुन्हा बागेत नेऊन सोडण्याचे काम मयूवर सोपवूले.आजची रात्र ते बागेतल्या मचाणावर काढणार होते.काही प्रॉब्लेम आलाच सुरेखाच्या यजमानांनी आपल्याकडे येण्याचे त्या दोघानाही सांगितले.या शनिवारपर्यंतचा पगार आगाऊ दिला.
आमच्यापरीने त्यांची तयारी करून देऊन आणि नीट काम करण्याचे म्हणजे एकावेळी एकानेच झोपण्याचे बजावून,आम्ही रत्नागिरी स्टेशन गाठले आणि दुसऱ्या दिवशी आमच्या कामावर हजर झालो.मयू आणि सुरेखाचे यजमान दररोज चक्कर टाकणार होतेच.
आमची फोनाफोनी चालू राहणार होतीच.आता मला पुढच्या शनिवारी जायचे होते.कोकांरेल्वेच्या कृपेने सकाळची दिवा-चिपळूण पॅसेंजर चालू झाली होती.त्यवेळी कल्याणला राहत असल्याने ती सोयीची होती.
ती सहा वाजता दिवास्टेशनातून निघून साडेबारा वाजता चिपळूण स्टेशनला पोचत असे.तिथून चिपळूण एस्टी स्टँडवर जाण्यासाठी कनेक्टेड एस्टी असे.शिवाय प्रायवेट बस किंवा शेअर रिक्षा अस.चिपळूण एस्टी स्टँडवर एक वाजता चिपळूण-पूर्णगड एस्टी फलाटावर लागलेली असे.ती साडेतीन वाजता रत्नागिरी एस्टी स्टँडवर पोचत असे.तिथून पावणेचारची रत्नागिरी-फणसोप पकडून चार वाजता मी बाग गाठत असे.
मयू त्याच्या वेळेनुसार कधी रत्नागिरी एस्टी स्टँडवर तर कधी फणसोपला भेटत असे.मग दोन्ही गुरख्यांचे पगार करून,बागेत फेरी मारून,असलेच तर तयार आंबे काढवून, सुरेखाच्या घरी जाऊन,त्यच्या यजमानांच्या मदतीने आंब्याचा पेट्या भरून ,मी रत्नागिरीत परतत असे.आंबयाच्या पेट्या असतील दुसऱ्या दिवशी सकाळी सुटणारी रात्नागिरी-दादर पॅसेंजरने दादरला उतरून, लोकने व्ही.टी.गाठून, त्या पेट्या क्रॉफर्ड मार्केटला पोचवून, व्यवहार पूर्ण करून,घर गाठत असे. जेव्हा पेट्या नसतील तेव्हा मात्र रात्रीची रत्नागिरी-नाशिक एस्टी पकडून कल्याण गाठत असे.
सुरुवातीचा एक शनिवार असा पार पडला.दुसऱ्या आणि तिसऱ्या शनिवारी मयू येऊ शकला नव्हता.सुरेखाच्या यजमानांना कशाला त्रास द्या?म्हणून त्यांनाही किंवा पातेरेमामांनाही वाटेत घर असल्याने येऊ शकत होते,पण त्यांनाही हाक न मारता, मी दोन्ही वेळा बाग गाठली होती.
चौथ्या शनिवारीही मयू परस्पर बागेतच येणार असल्याने मी एकटीच झपाझप चालले होते.आणि समोर आली भाईंची बायको.त्यांनी मला थांबवले.”वैनी,तुम्ही एकट्या कशा काय जाता हो कोळंब्याच्या वाटेने?आम्ही गावातल्या बायकापण कधी त्या वाटेने एकट्या दुकट्या जात नाही.तुम्हाला सुरेखाताई किंवा सीताकाकू बोलल्या नाहीत का?”
आतासुद्धा आमच्या आजूबाजूला घरे नव्हती.मी म्हटलं,”म्हणजे?”
“ते दादासुद्धा नसतात ना तुमच्याबरोबर आता?” ती उत्तरली,”आणि तुमचे येणेजाणे घड्याळाच्या काट्यावर असते.”मी सावध झाले.कुठेतरी काहीतरी शिजतय खरं,आणि नक्कीच तिच्या कानावर काहीतरी कुजबूज आली असावी,म्हणूनच ही मला सावध करतेय.
“हो.दादाला दोन शनिवारी काम होतं आणि आज तो पावसहून परस्पर मधल्या वाटेने बागेत पोचलाही असेल.”
“म्हणजे आज दादा असतील तर बागेत.पण खालूनच आवाज द्या आधी,”तिने मला सूचना दिली.
माझ्या डोक्यातल्या घंटांनी वाजायला सुरुवात केली.मी पगार द्यायला येते म्हणजे माझ्यकडे पैसे असतात आणि माझे वेळेनुसार अचूक येणे म्हणजे कोणाच्या डोक्यात दगा करण्याचा विचार आलाच तर तो हल्ला कुठे होईल याचा अंदाज घेतला.नक्की एलिफंट रॉकजवळच.कारण त्याच्याच पलीकडून वाट चढणीवर वळत असे नि पुढली आठ दहा फुटांची होई.धोका झाला तर तिथेच.तिथे कोणी लपले असेल तर बागेच्या बांधाशी उभे राहिलेल्या माणसाला दिसू शके.पण तिथे कोणी उभे असायला हवे त्यासाठी.शिवाय तिथे कोणीतरी उभे राहिले पाहिजे उभे राहिले हे सांगण्यासाठी तरी बाग गाठणे जरूरीचे होते.
आणि हे सगळे मला कोण सांगत होते?तर भाईंची बायको.तिच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करून चालणार नव्हते.”वैनी,तुम्ही मला सांगितलंत,ते बरं केलंत.पण काय आहे ना?मी एकटी जाते म्हणजे काय?मी तयारीत असते हो.माझ्याकडे हत्यार असतं.जो माझ्या अंगावर हात टाकेल त्याला आधी पोटात दोन गोळ्या खाव्या लागतील इतकं नक्की.आणि इतक्या जवळून माझा नेम नक्कीच चुकणार नाही.पर्समधून बाहेरपण काढावं लागणार नाही,तुमच्या घरापासून माझं बोट चापावरच असतं”
तिने आ वासला होता,तिचा हात तोंडावर गेला.इतक्यात मी का आले नाही हे बघायला मयूच समोरून येताना दिसला आणि मी सुटकेचा श्वास सोडला. तिला तशीच सोडून आम्ही बरोबर चालायला लागलो आणि मला हसू फुटलं.बागेत जाईपर्यंत तर मला खोsखोs हसू येऊ लागलं होतं.
(क्रमश:)
प्रतिक्रिया
25 Mar 2016 - 7:44 pm | एस
:-) हाही भाग मस्त. पुभाप्र.
25 Mar 2016 - 7:49 pm | DEADPOOL
ताई दोनदा प्रकाशित झालय!!
25 Mar 2016 - 7:53 pm | बहुगुणी
नेहेमीप्रमाणेच चित्रदर्शी लेखन.
पण आज रंगीत रांगोळीचा थाट, उदबत्तीचा वास,बसायला पितळी फुल्यांचे पाट,पुढे लांबसडक केळीचे पान,त्यावर पांढरे मीठ, दारातल्या लिंबाची पिवळीधमक फोड, लालभडक लोणचे, ओल्या खोबऱ्याची हिरवी चटणी, शेजारी टोमॅटो काकडीची कोशिंबीर,बटाट्याची सुकी पिवळी भाजी,ओल्या काजूची लाल मसाल्यातली उसळ,पुऱ्या,पुरणपोळ्या, पांढऱ्याशुभ्र भाताची मूद गोड्या वरणाच्या पिवळ्या आवरणाखाली दडलेली,त्यावर कणीदार तुपाचा गोळा विरघळत असलेला,अळूवड्या,पानाच्या उजव्या बाजूला एका वाटीत पातळ केलेले तूप,एका वाटीत कटाची आमटी,एका वाटीत नारळाचे दूध आणि पानाच्या डाव्या बाजूला तांब्याचे लखलखीत त्यांब्याभांडे
काय हे वर्णन! नुसतं वाचून भूक लागली हो!
26 Mar 2016 - 11:10 pm | प्रियाजी
अगदी खरं! दोनच दिवसांपूर्वीच्या होळीची आठवण झाली. सुरन्गी, जेवणाचे अगदी अचूक चित्र डोळ्यापूढे उभे राहीले. बाकी तुझयासाठी लेखाचे कौतूक काय नेहमीचे झाले. आता तुझ्याकडून भाईची बायको फसल्याने त्यांच्या झालेल्या फजीतीचे वर्णन पुढच्या लेखात वाचण्यासाठी आतूर.
27 Mar 2016 - 12:02 am | सखी
मस्त लेखमाला सुरन्गीताई. खूप दिवसांनी मिपावर आले आणि तुमची सगळी लेखमाला एका बैठकीत वाचुन काढली.
ज्या लोकांशी तुमचा संबध (चांगला वा वाईट) आला त्यांना खरच लक्ष्मी, सरस्वती आणि महिषासुरमर्दिनीचे खरच दर्शन झाले असे म्हणवेसे वाटते. लिहीत रहा आम्ही वाचत राहुच.
27 Mar 2016 - 12:22 am | यशोधरा
हाही भाग आवडला.
29 Mar 2016 - 11:34 am | नाखु
सुरंगी तै पुण्यात कधी येणार आहात काय मी नक्की भेटायला येईल.
लेखमाला पंखा नाखु
29 Mar 2016 - 7:02 pm | नूतन सावंत
नाखुजी,जेव्हा येण्याचे ठरेल तेव्हा नक्के कळवेन.
27 Mar 2016 - 7:30 am | रातराणी
मस्त!
27 Mar 2016 - 2:41 pm | Ram ram
नितांत सुंदर लिखाण, कर्तुत्ववान आहात हाे.
29 Mar 2016 - 7:04 pm | नूतन सावंत
धन्यवाद, राम राम.
29 Mar 2016 - 12:44 pm | मीता
मस्त लिखाण...
6 Apr 2016 - 3:10 pm | उल्का
आता सगळे भाग वाचले. मस्तच!
माझे माहेरचे गाव रत्नागिरी. त्यामुळे भाटे, मिर्या असे परिचित वर्णन वाचताना मजा आली.
आणि हो, इतरही लेखन वाचले. खूप छान.
1 May 2016 - 4:51 pm | शाम भागवत
काही नवे करावे म्हणून-भाग १८