काही नवे करावे म्हणून –भाग १२

नूतन सावंत's picture
नूतन सावंत in जनातलं, मनातलं
22 Sep 2015 - 5:17 pm

*************************************************************************************

पावसाळा असल्याने स्लीपर कोचची तिकिटेही मिळाली.जेवण सोबत होतेच,खीर,पुऱ्या, बटाट्याची भाजी, भात, वरण,लोणचे,घोसाळ्याची भजी असे साग्रसंगीत जेवण जेऊन ,”अन्नदाता,पाककर्तीच सुखी भव”असा आशीर्वाद भरल्या पोटाने नि तृप्त मनाने दिला.दमलेले शरीर बर्थवर पाठ टेकताच जी झोप लागली ती सकाळी मुंबईला पोचेपर्यंत.

(क्रमशः)

*************************************************************************************

बरोबर एका महिन्याने येणाऱ्या दुसऱ्या शनिवार रविवारी पुढची फवारणी करायचे ठरवले होते. त्याच्या आदल्या रविवारी मयू आणि सुरेखाच्या यजमानांना फोन करून आठवण दिली. त्यांना दुसरे फवारणी यंत्र मिळते का बघायला सांगितले होते.तेही तयारीत होतेच.मग मी घोसाळकराना फोन केला,ते म्हणाले,”मॅडम,काही कागद सापडले आहेत.तुम्ही कधी येताय?”
”मी उद्या बागेतल्या कामासाठी तिकडे आहे.पण तुम्हाला सुट्टी असेल ना?”मी विचारले.त”उद्या तीनच्या दरम्यान भेटू शकाल का?कलेक्टरसाहेबानी उद्या दोन मीटींग्ज लावल्या आहेत तर मला काही सुट्टी नाही.”

अरे वा!आंधळा मागतो एक डोळा नि देव देतो दोन डोळे.मी लगेच त्यांना भेटायचं ठरवून टाकलं.
मागच्या वेळेप्रमाणेच शुक्रवारी रात्री कोकणकन्या एक्स्प्रेस पकडून आम्ही शनिवारी सकाळी रत्नागिरीत आणि पुढे फणसोपलाही पोचलो.मयू स्टँडवरच भेटला सगळ्यांना घेऊन.पातेरेमामांच्या घरी लक्षामामा आणि टीम,शेवन्तासह हजर होते.शेवन्ताला दुकानात जाऊन सामान भरायला पैसे दिले.

दुसऱ्या फवारणी यंत्राची चौकशी केली तर ते मिळालेय असे कळले.पण त्याचे भाडे द्यावे लागणार होते.तरीही वेळ वाचणार होता.आता आमचे काम एकाच दिवसात पुरे झाले असते.पातेरेमामांनी गोमूत्राचे कॅन आधीच वर चढवले होते.पाण्याचे दोनशे लिटरचे पिम्पही वर नेऊन ठेवले होते.ते तिथेच पावसाच्या पाण्याने भरले जाणार होते.दोन्ही फवारणी यंत्रेही त्यांच्याकडेच होती.ती घेऊन आम्ही बागेत पोचलो.

बागेतले वातावरण खूपच सुंदर होते. बागेत हिरवळ दाटली होती.सारी झाडे टवटवली होती. हिरवट गुलाबी पालवीने सजली होती.काही पानांवर पावसाचे थेंब अडकून राहिले होते.मधूनच उघडीप देणाऱ्या सुर्यप्रकाशात त्याची शोभा अपूर्वच दिसत होती.ते दृश्य माझ्या डोक्यात पक्के कोरून राहिले आहे.मरेपर्यंत न विसरणाऱ्या क्षणात त्याची गणती आहे.रात्रभराचा शीण निघून गेला.नव्या जोमाने कामाला सुरुवार केली.

पिंप पाण्याने पूर्ण भरले होते.त्याले पाणी एका वीस लिटरच्या बदलीने कमी केले.त्यात गोमूत्र घालून ढववले.हे सारे काम लक्षामामा आणि टीमने केले.मी आज मुकादम बनून सुका दम देत लक्ष ठेवत होते.आता दोन ग्रुप करून कामाला सुरुवात केली. दहा/बारा झाडे होतात तोवर आमची अन्नपूर्णा आमच्यासाठी नाश्ता घेऊन आली. भरपूर ओले खोबरे घातलेले बटाटे पोहे आणि चहा.शेवंताच्या हाताला चवही छानच होती.

सुरेखाही माझ्यासाठी कॉफी घेऊन आलीच.आज मला फारसे काम नव्हते त्यामुळे माझ्या तिच्या गप्पा रंगल्या.बाळू आणि कंपनीची दारू सुटली का यावर चर्चा झाली.ती म्हणाली,”कमालच झाली ग ताई.अजून तरी काही बोलली नाही शेवंता आणि हे पण रोज संध्याकाळी चक्कर टाकतात त्या वाटेने.सगळं कसं आलबेल आहे ग.”

“हे बघ सुरेखा.तू या गावची सरपंच आहेस.तुला खूप काही करता येईल.तू ग्रॅज्युएट आहेस.आता तू प्रौढ शिक्षण वर्ग वगैरेही चालू करण्याच्या दृष्टीने विचार कर.बाहेर जायची गरज नाही.तुमचं अंगण एवढं मोठं आहे.आधी फक्त बायकांसाठी सुरु कर.त्यांना थोडं लिहावाचायला आलं पाहिजे यावर विचार कर.दिवसातून एक तास काढलास तरी काम होईल.जिल्हा परिषदेत जाऊन तिथल्या विकास अधिकारयांना भेट.ते पाट्या पेन्सीलींसाठी अनुदान देऊ शकतात का चौकशी कर.मीही चौकशी करते.”या माझ्या सूचनेवर सुरेखा हरखलीच.
“ताई ,छान ग.चांगली कल्पना आहे,पण मी करु शकेन का?”पुन्हा थोडी बावरली.
“अग,का नाही करू शकणार?तुझं काम प्रयत्न करायचं ते १००%,केलेस की झालं.आपण अजून प्रयत्न करायला हवे होते असं वाटणार नाही कधीच इतके प्रयत्न करायचे.म्हणजे निराश व्हायला होत नाही काहीही झालं तरी.”मी तिला समजावलं.”आणि तुला काय वाटतं?हे काही सोपं काम नाहीये.तुला गावातूनच विरोध होईल,प्रत्यक्ष नाही झाला तरी अप्रत्यक्ष होईलच.”
“म्हणजे कसं?”सुरेखाची शंका .
“अग,ज्या बायका शिकायला येतील त्यानाही घरातून विरोध होईल.सुरुवातीला दहा सोड, पाच जरी आल्या तरी त्यातल्या टिकतील किती हे नाही सांगता येणार.पण एक जरी आली नि टिकली तरी पुरे.तू तुझा उत्साह कमी नाही होऊ द्यायचा.’हसतील त्यांचे दात दिसतील’, हे लक्षात घेतलंस तरी पुरे.”यावर ती विचारातच पडली.मीही तिला जास्त न छेडता कामाकडे लक्ष घातले.
महिला सरपंच झोन म्हधून ती निवडून आली होती.पण अनुभव नाही आणि वय लहान त्यामुळे ती काय कामे करू शकते याची तिला स्वता:लाच जाणीव न्हवती.थोडा पुश अप मिळाला तर ती छान काम करू शकली असती.

नाश्ता करून पुन्हा काम सुरु केले.काही झाडे लहान असल्याने काम भराभर होत होते.शेवंता जेवण घेऊन आली तर निम्म्यापेक्षा जास्त काम संपले होते.तिच्यासोबत सरू नि पारुही होत्या.छानपैकी भाकऱ्या,वालाचे बिरडे शेवग्याच्या शेंगा घालून,मिरचीचा खर्डा आणि भोपळ्याचे भरीत असा बेत होता.”अरे वा!एवढं बिरडं कधी काढलंस ग.”मी कौतुकाने विचारलं.
“ह्या दोघी व्हत्या की मदतीला?’सरू नि पारुकडे हात करत ती म्हणाली.त्यापण छान हसत होत्या.
“काय ग बायानो,कसं चाललंय ग तुमचं?”मी त्यांना विचारलं.दोघी नुसताच होकार दिला नि खुदकन् हसल्या.काय लागतं यांना सुखी राहायला?किती सध्या अपेक्षा असतात?किंबहुना नसतातच.त्यामुळे आता जे चाललंय तेही त्यांना समाधान देत होतं.मलाही बरं वाटलं.

आम्ही जेऊन पुन्हा कामाला लागलो.आज काम संपणार हे नक्कीच होतं.आता मी मयू,लक्षामामा नि सुरेखाच्या यजमानाना बोलावून सांगितलं.”मला कलेक्टर ऑफिसमध्ये जायचं तीन वाजता.तर मी गेले तर चालेल का?तुम्ही दोघे काम पुर्ण कराल का?”त्यांनी होकार दिला.मी आणि नवरा निघालो.
सुरेखा म्हणाली,”ताई,हे ग काय मी संध्याकाळी तुला जेवायला नेणार होते.असं कर मग.आता तुझं तिकीट उद्याचंच असेल न?मग उद्या दुपारी तू आणि भावोजी माझ्याकडे जेवायला या.माझं एक काम पण आहे तुझ्याकडे.आणि रात्री इथूनच स्टेशनवर जा.’
“सगळं ठरवून ऑर्डरच देतेयस.माझी काय बिशाद नाही म्हणायची?”मी हसतच रुकार दिला.त्यादिवशीच्या मजुरीचे फवारणी यंत्राच्या भाड्याचे पैसे सुरेखाच्या यजमानांकडे दिले.मयूला मांडवी बंदरावर भेटायचे ठरवून आम्ही निघालो.

तीनच्या सुमाराला घोसाळकराना भेटलो.तेही वाट पाहत होते.कारण त्याच्यामागे अजून एका मिटींगचं खेकटं लागलेलं होतं.आम्ही जाताच त्यांनी आमच्यासमोर एक गाठोडं ठेवलं,आणि म्हणाले,”हे थोडे पेपर मिळालेत.तुम्ही बघा.मग बोलू.मी साहेबांकडे जाऊन येतोच पाच मिनिटात.”मी ते फूटभर उंचीचं गाठोडंउघडलं.त्यात वरच एक पेपर होता.त्यावर एक यादी होती.त्या यादीच्या अग्रभागी लिहिलं होतं,’ श्री मधुकर धर्माजी साळवी यांनी केलेल्या व्यवहारातील null and vaid केलेली साठ प्रकरणे- १ ते ३० प्रकरणे’.खाली त्या पकरणांच्या नंबरांची यादी अनुक्रमे होती.खाली तत्कालीन अधिकाऱ्याची सही व तहसीलदार कार्यालयाचा शिक्काही होता. म्हणजे ही यादी वैध होती. मी ती यादी हातात घेताच माझ्या अंगावर काटा आला. हाताला बारीकशी थरथर सुटली.घसा कोरडा पडला.नवऱ्याने तो बाकीचा गठ्ठा माझ्या हातून काढून घेतला.त्याने भराभर ते कागदपत्र चाळले.ते तीस प्रकरणांचे कागदपत्र होते. उरल्रले अजून सापडले नव्हते.

तो वरचा कागद हातात घेऊन मी वाचू लागले.पंचविसाव्या नंबरवर माझ्या आदेशाचा क्रमांक मला दिसला.फक्त त्यात एक अ अधिक होता. आणि पुढे कंसात मालगुंड असे लिहिले होते.मी पटकन नवरयाला, ‘ते प्रकरण काढ’, असे सांगितले.ते पाहून लक्षात आले की,हे मालगुंड इथल्या जमिनीचे पेपर असून त्या व्यवहारात देणारा आणि घेणारा असे दोघे साळवी किंवा जोशी नव्हते.जरा हायसे झाले.

इतक्यात घोसाळकर आलेच.”बघितलात?मी पण आधी हादरलोच होतो,नंबर पाहून.पण नंतर लक्षात आले की,हे वेगळे प्रकरण आहे.”

आता माझे डोकेही ठिकाणावर आले होते.मी सर्व यादी वाचून पुरी केली.त्यात माझ्या जमिनीशी सबंधित आदेशाचा नंबर कुठेही नव्हता. याचा सरळ अर्थ होता की माझ्या जमिनीचे कागदपत्र वैध होते.आता उरलेली तीस प्रकरणे सापडली नसती तरी चालली असती.हे पेपर बांधून ठेवणाऱ्या लिपिकाने डोके चालवले होते.दुसरी तीस प्रकरणे दुसऱ्या गठ्ठ्यात बांधलेली असणार.आणि त्यातरही अशीच यादी किंवा या यादीची प्रत असणार.एका मोठ्या तणावातून सुटका झाली होती.तरीही मी त्यांना विचारले,”मला आता काही करायला हवेय का?’
घोसाळकर हसत म्हणाले,”तुम्हाला ही यादी मान्य असेल तर तुमच्या अर्जाचे उत्तर म्हणून तुम्हाला ही कॉपी पाठवतो.म्हणजे आमचेही एक प्रकरण निकालात निघेल.”
आम्ही दोघांनी मान्यता देताच त्यांनी तयार करून ठेवलेले पत्र त्या यादीसाहित दिले.एक बाब निकालात निघाली होती.बाहेर पडलो तर समोरून कलेक्टरसाहेब श्री.जी.टी.बंदरी काही अधिकाऱ्यांसोबत येताना दिसले.समोरासमोर आल्याने आम्ही एका बाजूला झालो.याआधी श्री.बंदरी हे मुख्यमंत्रयांचे सचिव म्हणून मंत्रालयात काम करी असत आणि मी मंत्री आस्थापना शाखेतत काम करत असे.त्यामुळे ओळख होती.पण आता ओळखतील का अशी शंका आली.पण ते थबकले. म्हणाले,”जोडी आज इथे कुठे?आमच्या ऑफिसात काही गडबड नाही ना?”दुसरा प्रश्न अधिकाऱ्याना उद्देशून होता.त्या बिचाऱ्यांनना काही उमजेना.मी हसून म्हटलं,”तुम्ही असताना गडबड असेल का?”

इतक्यात घोसाळकरांनी त्यांच्या साहेबाना पुढे होऊन कल्पना दिली.लगेच ते बंदरी साहेबांच्या कानी लागले.”अरे,पण तो मेला ना.”मी होकारार्थी मान हलवली.
“सुटला बिचारा.आपल्यात दहन करतात म्हणून.या बाईने त्याला कबरीतून बाहेर काढला असता.”ते हसतच म्हणाले.”मला आवडतील हं तुमचे अनुभव ऐकायला.आता येणार असाल तेव्हा फोन करा.मग भेटू.”असे म्हणतत्यांनी आमचा निरोप घेतला.
घोसाळकरची चकित झाले होते.म्हणाले,”मॅडम,बोलला नाहीत साहेबाना ओळखता म्हणून.”
“अहो,मी ओळखून काय उपयोग? त्यांनी ओळख दिली तर उपयोग?आता कधी वेळ आली तर सांगेन तुम्हाला.”मी त्यांना अशावासन देऊन निघाले.

पण एक मात्र कबूल केलेच पाहिजे,की,हा तणाव कधीच बागेत काम करताना कधीही जाणवत नसे.

संध्याकाळी मयू काम पूर्ण करून आला.त्याला सांगितल्यावर तोही खूष झाला.मग आम्ही प्रशांतमध्ये जेवून ती ख़ुषी साजरी केली.

दुसऱ्या दिवशी जोशी साहेबाना भेटून त्यानाही एक कोपी दिली.तेही तणावमुक्त झाले.

सुरेखाकडे येऊन ही सगळी कथा सांगितल्यावर ते दोघेही अचंबित झाले,तसेच आनंदितही झाले.मग सुरेखाने मस्त जेवण केले होते त्याचा आस्वाद घेतला.खाडीच्या बोई तळलेल्या ,खेकड्याचे कालवण भात,चपात्या, सुकटीची चटणी असा मस्त बेत.आवरल्यावर तिला विचारले,”काय ग,काय काम आहे तुझं?’’

“सांगते ग, थोडा आराम कर.”मग इकडच्या तिकडच्या गप्पात थोडा वेळ गेला. थोड्या ळाने सुरेखाचे यजमान नवरा नि मयूला घेऊन बागेत गेले.तीनच्या दरम्यान् तिच्याकडे बायका जमू लागल्या.त्यात आजी,शेवंता,सरू,पारू,पातेरेमामी या माझ्या ओळखीच्या बायका शिवाय अजून दहा/बाराजणी आल्या. साधारणवय वर्ष २० ते ६५ असा वयोगट. सुरेखाच्या अंगणात चिवचिवाट सुरु झाला.सुरेखाने सगळ्यांची बसण्याची सोय केली.चहा दिला.माझी ओळख झाली.
चहा पाणी झाले.सुरेखाने बोलायला सुरुवात केली.,”ही माझी ताई,सड्यावरची बाग हिनेच घेतलीय.तिने मला काल एक काम करायला सांगितलंय,त्यबद्दलच तुम्हाला सांगायचं आहे.ताई कर ग सुरुवात.”सुरेखाने बॉल माझ्या कोर्टात टोलवला.
“तुमच्यापैकी कितीजणींना लिहिता वाचता येतं?” मी विचारलं. मुश्किलीने दोन/तीन हात वर झाले.
“कितीजणींना नुसती सही तरी करता येते?”अजून दोन हात वर झाले.”सुरेखा,खूप काम आहे बघ तुला.”सगळ्या टकमक पाहू लागल्या.”तुम्हाला शिकायची इच्छा आहे का लिहायला, वाचायला शिकायची?”मी पुन्हा विचारलं.आता कुजबुज चालू झाली.पाच मिनिटांनी मी पुन्हा विचारलं,”सांगा की?हात वर करा पाहू ज्यांची इच्छा असेल त्यांनी.”तेव्हा दहा हात वर झाले.या दहातले पाच माझ्या ओळखीचे होते.
“ठीक आहे. येत्या गुरुवारपासून इथेच शाळा भरेल.वेळ सुरेखामॅडम सांगतील.”मी घोषणा केली.
“नाही ताई,आत्तापासूनच याच वेळी शाळा सुरु करायची आहे.”सुरेखाच्या या उत्तरावर मी चकितच झाले.
“अग पण,पाट्या वगैरे लागतील ना?”या माझ्या प्रश्नाला उत्तर देत ती म्हणाली.
”सगळी तयारी केलीय. यांनी सकाळी रत्नागिरीहून पाट्या,पेन्सिली खडू फळा,अंकलिप्या आणि हजेरीपाटासाठी एक वही इतकं सगळं आणलंय.”मला आनंद झाला.एका छान कामाला सुरुवात होत होती.तिने आत जाऊन एक सहा इची कागदाची गुंडाळी आणि गोंदाची बाटली आणली.भीतीवर ती चिकटवली.त्यावर मोठ्या अक्षरात लिहिलेलं होतं,”हसतील त्याचे दात दिसतील.”ते वाचून मलाही माझे दात दाखवावेसे वाटले.

पुन्हा शेवंतीच्या मदतीने बाकीचे समान आणले.एका मेधीच्य खिळ्याला गुंडाळी सोडवून फळा टांगला.ज्यांनी हात वर केले होते, त्यांना एका बाजूला बसवून त्यांना पाट्या आणि पेन्सिली दिल्या. एका वहीत त्यांची नावे घातली. हजेरी घेतली आणि माझ्या हातात खडू देऊन ती म्हणाली,”कर उद्घाटन.”

मी फळ्यावर “श्री” काढला.तो अचानक दिसेनासाच झाला.

(क्रमश:)

जीवनमानअनुभव

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

22 Sep 2015 - 5:27 pm | मुक्त विहारि

पुभाप्र

मी फळ्यावर “श्री” काढला.तो अचानक दिसेनासाच झाला.

खरंच मलाही दिसेनासा झाला! फार छान आणि भावपूर्ण, सकारात्मक असं लेखन. पुभाप्र हेवेसांनल.

शलभ's picture

23 Sep 2015 - 2:10 pm | शलभ

+१

सस्नेह's picture

24 Sep 2015 - 4:26 pm | सस्नेह

अगदी सकारात्मक !

आनंदराव's picture

22 Sep 2015 - 6:04 pm | आनंदराव

वा वा ! छान च
फार उशीर केलात हो लेख टाकायला

बहिरुपी's picture

22 Sep 2015 - 6:24 pm | बहिरुपी

+१

पदम's picture

22 Sep 2015 - 6:28 pm | पदम

सर्व आपल्या डोळ्यासमोर घडतय अस वाटल. मस्तच पुढचा लेख लवकर येउ द्या.

रेवती's picture

22 Sep 2015 - 6:33 pm | रेवती

छान लिहिलय.

रुस्तम's picture

22 Sep 2015 - 7:02 pm | रुस्तम

हा पण भाग मस्तच... नेहमी प्रमाणे "पुभाप्र"

किती सुरेख लिहिले आहेस ताइ!शेवट तर फारच भावला. मलाहि 'श्री' नाहि दिसला.

पीशिम्पी's picture

22 Sep 2015 - 8:12 pm | पीशिम्पी

खरोखरच धन्य आहे तुमच्या जिद्दीची !!

भुमी's picture

22 Sep 2015 - 8:47 pm | भुमी

नेहमीप्रमाणेच , उत्तम लिहीलाय. पुभाप्र

डॉ सुहास म्हात्रे's picture

22 Sep 2015 - 8:59 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुरेख दृष्टीकोन, परिस्थितीची सुरेख हाताळणी, सुरेख लिखाण ! अजून काय ?!

पुढचे भाग लवकर लवकर टाका !

बहुगुणी's picture

22 Sep 2015 - 9:28 pm | बहुगुणी

तुमच्या जिद्दीला सलाम!

श्रीरंग_जोशी's picture

22 Sep 2015 - 10:02 pm | श्रीरंग_जोशी

या भागातल्या घडामोडी वाचून खूप चांगलं वाटलं.

साक्षरतेचे वर्ग हा उपक्रम तर अनुकरणीयच.

पुभाप्र.

स्वाती२'s picture

23 Sep 2015 - 1:54 am | स्वाती२

हा भागही आवडला!

रातराणी's picture

23 Sep 2015 - 11:44 am | रातराणी

अतिशय सुंदर!

ज्ञानोबाचे पैजार's picture

23 Sep 2015 - 11:58 am | ज्ञानोबाचे पैजार

खरच श्री काही वेळ दिसेनासा झाला होता.
मस्त लिहित आहात.
पुभाप्र

पैजारबुवा,

स्मिता श्रीपाद's picture

23 Sep 2015 - 12:12 pm | स्मिता श्रीपाद

>> मी फळ्यावर “श्री” काढला.तो अचानक दिसेनासाच झाला. >>
मला पण अचानक काही दिसेनासं झालं बघ ताई...
किती मस्त लिहिलयस गं.......तु अत्ता समोर असतीस तर तुला कडकडुन मिठी मारली असती....

प्यारे१'s picture

23 Sep 2015 - 12:23 pm | प्यारे१

ख़ास च.
सामाजिक सुधारणा करतो म्हणून आणि वेग वेगळे रंगीबेरंगी आलेख दाखवून होत नसतात. या अशाच चिमुकल्या पण मार्गदर्शक पावलांनी होतात. आपल्याला हार्दिक शुभेच्छा.

मीता's picture

23 Sep 2015 - 2:44 pm | मीता

अतिशय सुंदर!

नि३सोलपुरकर's picture

23 Sep 2015 - 4:24 pm | नि३सोलपुरकर

सुरेख लिखाण !

शेवट तर फारच भावला. मलाहि 'श्री' नाहि दिसला...

gogglya's picture

24 Sep 2015 - 2:08 pm | gogglya

पु भा प्र

कविता१९७८'s picture

24 Sep 2015 - 4:23 pm | कविता१९७८

मस्तच