काही नवे करावे म्हणून-भाग ८

नूतन सावंत's picture
नूतन सावंत in जनातलं, मनातलं
29 Jun 2015 - 7:28 pm
  • काही नवे करावे म्हणून - भाग १
  • काही नवे करावे म्हणून - भाग २
  • काही नवे करावे म्हणून - भाग ३
  • काही नवे करावे म्हणून - भाग ४
  • काही नवे करावे म्हणून - भाग ५
  • काही नवे करावे म्हणून - भाग ६
  • काही नवे करावे म्हणून - भाग ७
  • पण मी आणि नवऱ्याने त्यांना समजावले की,”झेरॉक्सवर कोणीही सही करणार नाही.आता तुम्हाला साईन्ड कॉपी लागणार नाही.कारण जागेचा ताबा तुमच्याकडे नाही. झेरॉक्स तुम्ही ठेवा आणि नाहीतर तुम्ही मला साईन्ड कॉपी द्या.”ते तर त्यांना शक्यच नव्हते.यावर वकीलहेबांकडेही यावर काही मार्ग नव्हता.शेवटी नाईलाजानेजोशीसाहेब ती कॉपी द्यालाआणि झेरॉक्स ठेवायला तयार झाले.
    (क्रमशः)
    ***************************************************************************************जोशीसाहेबाना देण्यासाठी झेरॉक्स काढताना दोनचार असाव्यात म्हणून जास्त प्रती काढल्या.
    पण आता इतक्या उशिरा कलेक्टर ऑफिस बंद झाले असेल आणि चालू असले तरी यावेळी काही काम पूर्ण करण्यासाठी तिथले लोक थांबले असतीलतर त्यांना त्रास देणे बरोबर नाही हे एक;आणि दुसरे म्हणजे आम्हीही खूप दमलो होतो.त्यामुळे प्रशांतकडे मोर्चा वळवला.छापैकी जेऊन फिरत फिरत घरी पोचलो

    मयू माझ्यसोबत असला तर काकानाही काही आक्षेप नसायचा.जाता जाता त्याला सोडून जावे म्हणून त्यांच्या घरी गेलो.काका शिक्षक होते.त्यांच्याशी गप्पा मारणे हेपण निवांतपणा देण्यासाठी कारणीभूत ठरले.

    दुसऱ्या दिवशी कलेक्टर ऑफिस गाठले.घोसाळकर आलेले होते.हसून स्वागत करत म्हणाले,”काल मला जोशीसाहेबांचा फोन आला होता.मला वाटलंच होतं तुम्ही आज याल म्हणून.”

    “हो न,काम झालंच तर ११ची गाडी मिळेल.म्हणून लवकरच आलो.फक्त तुम्ही असाल की नाही याचीच काळजी वाटत होती.”

    “पाहू,कॉपी दाखवा मला.”त्यांनी सांगितल्यावर मी त्यांना जोशीसाहेबांकडून मिळालेली प्रत दाखवली.ती मधुकर धर्माजी साळवी यांना मार्क केलेली केलेली होती पण अधिकाऱ्याच्या सहीच्या जागी स्टेनसिल साईन होती. तिथे शाईची वेगळी सही असावी लागते.ती काही तिथे नव्हती.ती स्टेन्सिलने केलेली सही वाचून ते म्हणाले,”ही सही केलेले रावसाहेब आता निवृत्त झाले आहेत.त्यामुळे मी तुम्हाला यावर सही देऊ शकेन.पण तुम्हाला तर माहीत आहेच.ते साठ प्रक्रणांबाबतचे कागदपत्र अजून सापडले नाहीत.तर तुम्ही थोडे थांबा.”मी आणि नवरा विचारात पडलो.आता काय करता येईल बरे?नवरा म्हणाला.”आपण या सही केलेल्या माणसालाच भेटून पाहू.”

    त्याने घोसाळकराना विचारले”,यांचे नाव काय?आणि ते कुठे राहतात.?”घोसाळकर हसले.त्यांच्या लक्षात आले होते.त्याला काय म्हण्याचे होते ते.म्हणाले.”इथेच रत्नागिरीतच राहतात.मारुतीमान्दिरला.मी माणूस देतो तुमच्याबरोबर.तो घेऊन जाईल तुम्हाला.”
    त्यांनी कोणाला तरी फोन केला आणि लगेच यायला सांगितले. पाचच मिनिटांत तो माणूस आला.त्याला सांगितलं की,’आम्हाला पवार रावसाहेबांचे घर दाखवून ये.तू आत जाऊ नकोस लगेच परत ये.’त्याप्रमाणे आम्ही निघालो,मयू त्याच्या एम.एटीवर आणि आम्ही रिक्षाने त्याच्यामागोमाग असे निघालो.आम्हाला घर दाखवून तो परत गेला.

    घर कसलं, मस्त एकमजली बंगलाच होता तो.सभोवती बाग,बागेत निरनिराळी फुलझाडे,फळझाडे .मयू म्हणाला,”चांगलीच कमाई केलेली दिसत्येय याने.”
    “चूप रे,लगेच एखाद्याबद्दल असे शेरे देऊ नयेत.”मी त्याला दटावले.एव्हाना फाटक उघडून आत शिरत नवऱ्याने दार वाजवले.एक तरुण हसतमुख मुलगी दार उघडायला आली.”मी मुंबईहून आलोय.मला घोसाळकरांनी पाठवलेय.पवारसाहेबांना भेटायचेय.”नवऱ्याने तिला सांगितले.
    “या ना.आत या.”असे म्हणत ती बाजूला झाली.आम्ही आत आल्यावर आम्हाला बसण्याची विनंती करून ती आत गेली.अलिशान सोफा,गालीचा,संगमरवराची फरशी पाहून मयूने माझ्याकडे पहिले.मी फक्त तोंडावर बोट ठून त्याला गप्प राहण्याची सूचना दिली.इतक्यात मघाचीच मुलगी हातात पाण्याचे ग्लास असलेला ट्रे घेऊन आली.ट्रे टीपॉयवर ठेवत,’चहा, कॉफी काय घेणार’, अशी विचरणा केली.आम्ही अर्थातच नकार दिला.ती मंद हसतच आत गेली.

    एक गृहस्थ तितक्यात आलेच.स्वच्छ धुवट कपड्यात ते होते.”मीच पवार.काय काम होतं आपलं?”नवऱ्याने स्वतःची ओळख करून दिली.माझी व मयूचीही ओळख करून दिली.मग मी त्यांना काम काय आहे ते सांगितले. मधुकर धर्माजी साळवीचा उल्लेख होताच ते जरा कावरे बावरे झाले.पण बोलले काहीच नाहीत.माझी कथा संपवून मी त्यांना ती जोशीसाहेबांकडून मिळवलेली प्रत दाखवलव त्यावर त्याची शाईची सही नसल्याचे सांगितले.ते अजूनही गप्पच होते.ती प्रत हातात घेऊन ते बारकाईने सही निरखून पाहत होते.माझ्या मनात आलं की,आता जर ह्यांनी म्हटलं की,हि माझी सही नाही तर....... तर आपण काय करणार?

    पण त्यांनी थोडया वेळाने त्या कागदाकडे बघत हलक्या आवाजात म्हटलं की, “हो.ही माझीच सही आहे.”पण इतक्या हलक्या आवाजात की,ते जणू स्वतःशीच बोलत होते;स्वतःलाच काही खात्री पटवून देत होते.मग आमच्याकडे पहात विचारले,”तुम्हाला माहीत असेलच या माणसाने काय गोंधळ घालून ठेवला आहे तो.?घोसाळकरानी सांगितले असेलच ना तुम्हाला?”आम्ही नुसतीच मान हलवली.

    “मी जरा त्यांच्याशी बोलून घेतो.चालेल ना साहेब?”त्यांनी नवऱ्याला विचारले.न चालवून करता काय?त्यानेही मान हलवीत होकार दिला.मी हात पुढे केला.

    काही लक्षात आल्यासारखे ते हसले.”मॅडम,काही काळजी करू नका.तुमचे बरोबर आहे. इतकी त्रासाने मिळवलेली कॉपी नाहीशी होऊ नये हे तुमच्या मनात येणारच.मी तुमच्यासमोरच त्यांच्याची बोलतोय.रेफरन्ससाठी राहूदे माझ्याकडे.माझ्या चुकीमुळे तुम्हाला त्रास होतोय हे समजतेय मला.”ते थोडे बाजूलाच असलेल्या टेलिफोनकडे गेले.आणि घोसाळकरांशी बोलू लागले.आम्हाला फक्त एकतर्फी संभाषण ऐकू येत होते.ते पण “हं,हां,हो,हो,हूं,हूं” असे हच्या बाराखडीतील.शेवटचे वाक्य ऐकून मात्र धीर आला.”मला काही त्रास तर होणार नाही ना?”त्यवर घोसाळकर काय म्हणाले ते समजले नाही.

    फोन ठेवून पवारसाहेब वळले आणि म्हणाले,”घोसाळकर म्हणाले,तुम्हाला जास्त अॅडमिनिस्ट्रेशनचा अनुभव आहे.तुम्ही सांगाल तसे करायाला सांगितले आहे.” तसे जरा हुश्श झाले झाले, पण अजून पेल्यात आणि ओठात अंतर होतेच.

    मी त्यांना सांगितले,”ही अर्जदाराला मार्क केलेली कॉपी आहे त्यावर तुमची शाईताली सही आवश्यक आहे.ती नजरचुकीने करायची राहिली आहे.ती तुम्ही आता तारीख न घालता करु शकाल का?तुम्ही नाही म्हणू शकता. पण मग मी लेखी तक्रार करू शकते तुमची.नंतर ऑफिसमध्ये बोलावून तुम्हाला सही करायला सांगतील.थोडा वेळ लागेल पण नंतर का होईना तुम्हाला सही करावीच लागेल.”

    “पण ती बाकीची प्रकरणे?त्यांचे काय करायचे? ”त्यांनी विचारले.

    “त्या प्रकरणांमध्ये तुम्ही आहात का?आणि अडकला आहात का?”या माझ्या प्रश्नावर त्यांनी जोरात नकारार्थी मान हलवली.”मग चिंता करू नका.हे प्रकरण स्वतंत्र आहे असे मला वाटते.ज्याअर्थी तेव्हाची ही स्टेनसिल सही तुमची आहे त्याअर्थी हे प्रकरण खरं असावं, असं मला वाटतं.तेव्हा तुम्हाला सही करायला काही हरकत नाही.कारण खरंतर ही तांत्रिक चूक आहे.”

    पवारसाहेब थोडे विचारमग्न झाले.इतक्यात मघाचीच तरुणी हातात पोह्यांच्या बशा आणि चहा असलेला ट्रे घेऊन आली. पवारसाहेबांनी, ”घ्या,घ्या, ” म्हणत पोह्यांच्या बशा आमच्या हातात द्यायला सुरुवात केली. माझी पाळी आल्यावर मी त्यांना नकार देऊन सांगितले,”तुम्ही सही करा आधी किंवा नाही म्हणून तरी सांगा.त्यशिवाय मला तुमच्या घरातले पाणीही नको.”

    पवारसाहेबांचा हात चटका बसल्याप्रमाणे मागे गेला.एका हातातली बशी आणि दुसऱ्या हातातली कॉपी टीपॅायवर ठेवत,त्यांनी चटकन हात जोडले.”मॅडम,मला माफ करा.माझ्यामुळे तुम्हाला नाहक त्रास झाला त्याबद्दल मी तुमची माफी मागतो.मी सही करतो पण माझ्या आतिथ्यधर्माला बट्टा लावू नका.प्लीज.”

    पुन्हा त्यांनी बशी उचलून माझ्या हातात दिली आणि तिथेच असलेले पेन उचलून त्या प्रतीवर सही केली.त्यादिवशी खाल्लेल्या पोह्यांची चव काही औरच होती.अर्धा ताप कमी झाला होता.तिथूनच त्यांची परवानगी घेऊन घोसाळकराना फोन लावला.ते म्हणाले,”आता असं करा.साडे अकराला दहा मिनिटे आहेत.तिथेच मारुतीमान्दिरजवळ तुम्हाला अकराची गाडी मिळेल. मी कंडक्टरशी बोललोय.तिथे साडेअकराला येते.पण गाडी पकडण्याआधी एक कॉपी माझ्याकडे तुमच्या भावाबरोबर माझ्या रेकॉर्ड्साठी पाठवून द्या.”

    आम्ही घाईनेच पवारांचा निरोप घेऊन निघालो.चालता चालता मयूकडे एक झेरॉक्स प्रत देऊन ती घोसाळकरांना द्यायला सांगितले.आणि स्टॅापवर पोचतोय तेवढ्यात बस आलीच.वाहकानेही नाव विचारून खात्री करून घेतली न बेल मारली.

    दहा दिवसांनी मी बाळूला फोन करून आठवण दिली.आणि मी कोणत्या दिवशी येणार त्याची आठवण देऊन माणसे वगैरे तयारीत ठेवायला सांगितली.पंचायातीत फोन करून यशवंताला मामांना बोलावून ठेवायला सांगितले. कोणत्या दिवशी मला गाईचे शेण आणि पाण्याचे पिंप सड्यावर बागेत हवेय याची पातेरे मामा मामींना सूचना दिल्या आणि चार दिवसांनी रत्नागिरी गाठली.मयू स्टॅंडवर आलाच होता.तसेच फणसोपपला गेलो आणि बाळूच्या घरी जाऊन त्याला भेटलो.बाळू छानपैकी टाईट होता.”वैनी,तुमी काळजी करू नका.मी मानसा सांगतलेली हायत.आमही उद्या नवाच्या ठोक्याला बागंत हजर होतो बगा.”

    तसा मयू फिस्कारला,”ए,नऊला काम सुरु झालं पाहिजे.तुमी नऊला येणार मग पानतंबाखू खाणार आणि साडेनऊला कामाला सुरुवात करणार.ते नाय चालणार.”त्यावर कसनुसं हसत बाळूने मान डोलावली.पुन्हा मयू गुरगुरला,”नुसती मान नको हवूस.वेळेवर आला नायस तर कानपटवीन बघ कसा तो?”यावर मी गप्पच बसायचे ठरवले.बाळू मात्र लगेच कबूल झाला,”नाय,नाय दादा.तुमी काळजीच करू नका.”पुन्हा मयूने दम भरला.मी कशाला काळजी करू?आता काळजी तू कर.”

    तिथून निघून पातेरेमामांकडे आलो.त्यांना आणि मामींना सूचना नीट समजल्यात हे पहिले.मामानी दोनशेलिटर पाणी राहिल इतके पिंप वर नेऊन ठेवलेच होते.ते पावासाच्या पाण्याने अर्धेअधिक भरलेही होते.शेण उद्या सकाळी टाकतो असाही सांगितले.मामा म्हणाले,”माजपण सांगीत्लान् हाय बाळून् उद्यासाठी.”मयूने उत्स्फूर्तपणे मामांना मॅानिटरशिप देऊन टाकली.,”मामा,नीटलक्ष ठेवा हं सगळ्यांवर.तुम्ही आमचा माणूस आहात.”मामींनाना उद्या सगळ्यासाठी दोनवेळा चहा आणण्याची ऑर्डर दिली.चहा साखरेचे पुडे त्याच्याकडे सोपवून दुध मात्र त्याच्याकडचे वापरायला सांगितले.त्याचा हिशेब रोजचा रोज चुकता करेन असेही त्यांना सांगितले.

    सुरेखा व तिच्या यजमानांना सदिच्छा भेट देऊन,मला उद्या दोनतीन बदल्या आणि एक मोठा टब लागेल तर तो त्यांच्याकडे आहे का ते विचारले.त्यांच्याकडे आहे म्हल्य्वर,’ उद्या आम्ही जाताना घेऊन जाऊ.’ असे सांगून आम्ही रत्नागिरीत परतलो.नेहमीच्या कार्यक्रमाप्रमाणे आधी मांडवी बंदरावर आणि मग प्रशांतमध्ये मस्त जेवून घरी आलो.आईकडे नेहमी काम करणारया मुलांपैकी चारजणांना निरोप पाठवले.उद्या माझ्याबरोबर वाडीत जायचेय असे सांगून सकाळी सात वाजता यायला सांगितले.

    सकाळी सगळे मयुसह बरोबर सात वाजता आले.त्यांना घेऊन रत्नागिरी स्टँडवर येऊन समोरच्या हॉटेलमध्ये नसता केला.बरोबर पुरीभाजी बांधून घेतली.बाजूच्या दुकानातून टोस्ट घेतले आणि फणसोपच्या गाडीत बसलो.

    साडेआठच्या सुमाराला सुरेखाकडे पोचलो तर सामान त्यांनी आधीच बागेत पाठवले होते.तिचे यजमान मला म्हणाले,”ताई तुम्ही काहीतरी नवीन करताय इतके तर समजले.पण काय करताय ते बघायला मी येऊ का?”मी लगेच त्यांना आमंत्रण दिले आणि आम्ही बागेत पोचलो तेव्हा नऊला दहा मिनिटे होती.आणि बाळूही त्याच्या टीमसह तिथे हजर होता.

    मी बागेत शिरताच सगळे माझ्यामागोमाग आत आले.पतेरे मामांनी आणलेले पिंप पाण्याने भरले होते.बाजूलाच एका पाथरीवर त्यांनी शेण ठेऊन ते वाहून जाऊ नये म्हणून, त्याला पळसाच्या पानाच्या मोठ्याथोरल्या पत्रावळीने झाकून ठेवले होते.सुरेखाच्या यजमानानी सोबत एक नारळ घेतला होता.सगळ्यांची हत्यारे आणि सगळी भांडी वगरे एकत्र करून त्यांनी नारळ फोडला.त्याचे पाणी सगळ्या ह्त्यारांवर आणि भांड्यावर शिंपडून चारी दिशेला शिंपडले.नारळ फोडून चार दिशेला खोबऱ्याचे तुकडे फेकले आणि शेरणी सगळ्यांना वाटली.मला जागेवाल्याला नमस्कर करायला लावला.आणि ‘जय लक्ष्मी केशव,जय भैरी,जय म्हपुरूस,’अशा जयघोषात काम चालू झाले.

    बाळूसोबत चार माणसे होती,पातेरे मामा धरून.काही जणानी खणायला सुरुवात केली झाडांच्या भोवतीने.काहीजण वाढलेले गवत वेली उपटू लागले.माझ्या बरोबर आलेल्या दोघांना मी निर्गुंडीची झाडे दाखून त्याच्या ठराविक आकाराच्या साधारण पाच वीत लांबीच्या फांद्या तोडून त्यांच्या दोन मोळ्या करा असे सांगितले.

    सुरेखाकडून आणलेला टब छान मोठा होता,मला हवा होता तेवढा मोठा.मी हातात पातळ रबरी हातमोजे चढवले आणि सोबत आणलेले पाव किलो देशी गाईचे तूप आणि अर्धा किलो मध त्यात ओतून मिश्रण फेसायला सुरुवात केली.केकचे मिश्रण फेसल्यासारखे मी फेसात होते.इतक्यात माझ्यसोबत आलेला मन्या म्हणाला,”ताई केक करतंस की काय?” मीपण गमतीने उत्तरले ,”होय रे, खाशील ना?”तोही मान डोलावून होकार देऊ लागला.

    ते मिश्रण एकजीव झाल्यावर त्यात शेण मिसळायला सुरुवात केली.तसा मन्या दोन पावले मागे सरकला.त्याला सगळे हसू लागले.त्यात मध्च्या अर्धाकिलोच्या डब्याने अंदाजे २० डबे शेण मिसळून झल्यावर ते त्या पिंपातल्या पाण्यात मिसळायचे तर आजच्या दिवसात सगळ्या झाडांना टाळमाती होणे शक्य नव्हते.उरलेल्या पाण्यत पाऊस पडला तरी प्रमाण बिघडे असते,ते वेगळेच.इतक्यात मामी,प्यायचे पाणी व चहा घेऊन आल्या.पाच सहा कपही त्यांनी आणले होते.

    सगळ्यांना चहा टोस्ट दिले. आम्ही बागेच्या मध्यावर होतो. इतक्यात चहा पिणाऱ्या मंडळीतील कोणीतरी ओरडले,”कोल्हा,कोल्हा बघा कोल्हा”, आम्ही सगळे,’ कुठेय ,कुठेय’ म्हणून पाहू लागलो तर बागेच्या एका कोपऱ्यात एक मोठा कातळ होता.त्यच्यावर तो उभा होता.थोड्याच वेळात तो आला तसा निघूनही गेला.बाळूच्या सोबत आलेले लक्षाकाका मला म्हणाले,”बाय,तुम्ही हिते हीर पडणार काय?पडणार असाल तर तो जिते उभा होता न तितंच पाणी लागेल बघा.” कोकणात कोल्हा दिसला तर शुभ मानतात.

    तोपर्यंत मी बादलीच्या मापाने मिश्रण पाण्यात मिसळायचे ठवले.एक बदली २० लिटरची होती. टबमध्येच अंदाजाने दहा हिस्से केले.वीस लिटर पाण्यात एक हिस्सा घालून अमृतपाणी तयार केले.

    निर्गुंडीचा भारा येऊन पडला होता.तिथल्या उपटून काढलेली वेली घेऊन दहा/बारा फांद्या एकत्र बांधून घ्यायच्या बाकीच्यांना शिकवले.असे सात/आठ झाडू तयार केले.आतापर्यंत दहा झाडांच्या भोवतीच माती खणून त्यावर टाळ पसरले होते.आता मी माझ्य्सोबत आणलेल्या मुलांना गवत वेली उपटायला सांगितल्या आणि त्यांच्यापैकी दोघांना वडाच्या झाडाखालची माती आणून टाळावर पसरायला लागा म्हणून सांगितले. सुरेखाचे यजमान, मयू त्यांना मदत करू लागले. जेवायची वेळ होईपर्यंत चार झाडे माती पसरून तयार झाली होती.

    पहाते तर काय सुरेखा आमच्यासाठी जेवण घेऊन आली होती.”अग गधडे,मी घेऊन आलेय पुरीभाजी.”पण ती कुठली ऐकायला?शेवटी आमच्यातली पुरीभाजी बाळूच्या टीमसोबत वाटून आम्ही तिने आणलेल्या बोईच्या कालवण भातावर आणि भाकरी,तळलेल्याबोईंवर ताव मारला.तृप्त मानाने पुन्हा कामाला लागलो.

    आता मी माझ्या ग्रुपमधले दोघे बाळूच्या टीमसोबत पाठवले.म्हणजे भराभर माती आणता येईल आणि पसरता येईल.

    बाकीच्यांना घेऊन मी पहिल्या झाडाजवळ अमृतपाण्याची बदली घेऊन आले.तिथल्या मातीला हात लाऊन कपाळाला लावला.मनोमन तिची प्रार्थना केली.यशाची मागणी करून निर्गुंडीच्या झाडूने बादलीतले अमृतपाणी ढवळले आणि मातीवर ते अमृतपाणी शिंपायला सुरुवात केली.प्रत्येक वेळी अमृत पाणी घेताना ढवळून घ्यायचे इतकेच लक्षात ठेवायचे. बुंध्यापासून सुरु करून बाहेरच्या बाजूला येत जितका झाडाचा विस्तार तितकी जमीन शिंपायची त्या अमृतपाण्याने.थोडक्यात भर दुपारी जेव्हा सावली झाडाखाली असते त्या सावलीतली जमीन भिजली पाहिजे. काही झाडे मोठी, काही झाडे लहान असल्यानेदुपारचा चहा मामी आणेपर्यंत आमची जवळजवळ दहा झाडे शिंपून झाली.

    सगळ्यांसाठी हे नवीनच काही तरी होते. चहाच्या वेळी सगळे उत्सुकतेने प्रश्न विचारत होते.पुन्हा चहा झाल्यवर कामाला लागलो. संध्याकाळची अजान ऐकू आली नयानगरमधून आणि अंकुश म्हणाला,”अल्ला आराडला बघा.आता सुट्टी.”सगळ्यांनी काम बंद केले.सुरेखाची भांडी आणि कालवलेले मिश्रण पातेरे मामाकडे ठवायचे ठरले.एकेकाने समान डोक्यावर घेतले.मामांच्या घरी आणून ठेवले.

    बाळू माझ्याजवळ येऊन म्हणाला,”वैनी ,थोडे पैशे गावतीत काय?”
    “काय रे काय ठरलं होतं?” मयूने ला दिला परस्पर टोला.
    “नाय.ते ह्यांनला द्यायचे होते.मग तुला दिले होते ना अॅडवान्स?त्यतले द्यायचे ना?”मी बोलले.त्या टीममध्ये कुजबुज सुरु झाली.

    मी विचारलं,”किती पैसे दिले ह्याने तुम्हाला.?”सगळ्यांच्या मना नकारार्थी हलल्या.मयूने बाळूची गचांडी धरली.”थांब,तुला कालच सांगितलं होतं ना,कानपटवीन म्हणून.”तो आता त्याला मारणार एवढ्यात मी मयूला रोखलं.”थांब, आता तो दमलाय.तुझी एकपण त्याला भारी आहे.”बाकीच्यांना मी काय ठरवलेलं ते सांगितलं.ते ऐकल्यावर एकच कालवा झाला.माझ्याकडे पण मी जास्त पैसे आणले नव्हते.कारण त्यादिवशी द्यायचेच नव्हते.

    लक्षाकाका म्हणाले,” उद्या आषाडी एकादशी हाय.थोडेतरी पैशे द्या वैनी नायतर कडक उपास पड्ल.”शेवटी प्रत्येकाला पन्नास रुपये देऊन वाटेला लावले.सुरेखाच्या यजमानांनी त्यांना जाताना विचारले,”मग उद्या उपास आहे तर याल ना कामाला?” त्यांना हो म्हणून ते सगळे गेले.

    आम्ही बस पकडून रत्नागिरीत.त्या चौघांना पैसे देऊन दुसऱ्या दिवशी सुट्टी दिली.कारण माती पसरून झाल्याशिवाय अमृतपाण्याचा शिडकावा करता येत नव्हता.आता माती पसरून झाली तर एक दिवसाचेच हे काम होते.

    दुसऱ्या दिवशी मी आणि मयूच फणसोपला गेलो.सुरेखाचे यजमान बसमधून उतरतानाच भेटले.तेही आमच्या बरोबर बागेकडे निघाले.पातेरेमामा बाळूच्या टीमची वाट पाहत होते.आम्हीही तिथेच थांबलो.नऊवाजले, दहा वाजले, अकरा वाजले, कोणाचाच पत्ता नाही.पातेरेमामा त्यांच्या घरी जाऊन बघून आले तर घरीही कोणी नाही.आता काय करायचं?सुरेखाचे यजमान म्हणाले,”तुम्ही घरी चला आता ताई.थोडा आराम करा.फराळासाठी सुरेखा वाट बघत असेल घरी.तिने आज मला तुम्हाला घरीच आण्याला सांगितलेलं दुपारी.महाते,ताई अशीहातावर भाकर घेऊन जेवते ते मला बरं नाही वाटत.”

    आम्ही सुरेखाकडे आलो.

    (क्रमशः)

जीवनमानअनुभव

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

29 Jun 2015 - 7:56 pm | मुक्त विहारि

लेखमाला पकड घेत आहे...

मस्त लिहिते आहेस सुरंगीताई!

एस's picture

29 Jun 2015 - 8:06 pm | एस

उत्सुकतेने वाचतो आहे.

कंजूस's picture

29 Jun 2015 - 8:29 pm | कंजूस

थोडं समजलं.

सूड's picture

29 Jun 2015 - 8:50 pm | सूड

वाचतोय.

स्पंदना's picture

30 Jun 2015 - 5:53 am | स्पंदना

टाळ म्हणजे काय?

बाकी पाण्याला हात लावणार नाही म्हणुन बरच काही साध्य झालं. नाहीतरं खा प्या आणि सुटा केल असत त्याने.

नूतन सावंत's picture

30 Jun 2015 - 8:53 am | नूतन सावंत

स्पन्दना,टाळ म्हणजे झाडांच्या कोवळ्या डहाळ्या.त्यांनाच टहाळ्या > टाळ असे म्हटले जाते.पावसाळ्यात बागेत वाढणारे अनावश्यक गावात ,झाडांवर चढणाऱ्या वेली,बांडगुळे ई. खडसून म्हणजे तोडून टाकायची. झाडांच्य बुंध्यापासून साधारण दोन फूट जमीन खणून त्या खड्ड्यात टाकून वरून माती पसरायची.आपल्या बागेतला असा अनावश्यक पालापाचोळा संपला तर रानातून घेऊन यायचा.

मुक्त विहारि's picture

30 Jun 2015 - 9:16 am | मुक्त विहारि

आमची ज्ञानलालसा, आम्हाला स्वस्थ बसू देत नाही.

टवाळ कार्टा's picture

30 Jun 2015 - 9:24 am | टवाळ कार्टा

वाचतोय :)

रातराणी's picture

30 Jun 2015 - 12:15 pm | रातराणी

घर पहावे बांधून,लग्न पहावे करून आणि आता बाग पहावी घेऊन!
ज्या धीराने तुम्ही प्रसंग आणि गावातली बेरकी माणसं हाताळताय, त्याला तोड नाही!

नाखु's picture

30 Jun 2015 - 12:25 pm | नाखु

आणि प्रांजळ कथन...

पुलेप्र.

उत्सुक नाखुस

पिलीयन रायडर's picture

30 Jun 2015 - 5:45 pm | पिलीयन रायडर

तुम्हाला एकदा भेटायलाच हवे.. फार म्हणजे फार भारी आहात तुम्ही!

नूतन सावंत's picture

30 Jun 2015 - 9:19 pm | नूतन सावंत

जरूर पिरा.नक्की भेटू.एकदाच का?नेहमी भेटू.

इशा१२३'s picture

30 Jun 2015 - 11:32 pm | इशा१२३

मस्त लिहिलेत अनुभव ताइ...वाचतेय.पुभाप्र

रुस्तम's picture

1 Jul 2015 - 12:45 pm | रुस्तम

पुभाप्र

मोहनराव's picture

1 Jul 2015 - 1:43 pm | मोहनराव

तुमचा धाडसीपणा आवडला बुवा आपल्याला. लेखमाला वाचतोय.
खर्‍ंच एका सिनेमाला शोभणारं कथानक आहे.

सतोंष महाजन's picture

1 Jul 2015 - 4:44 pm | सतोंष महाजन

सुरेख चाललय कथानक.

रुस्तम's picture

17 Jul 2015 - 11:35 am | रुस्तम

पुभाप्र