- काही नवे करावे म्हणून - भाग १
- काही नवे करावे म्हणून - भाग २
- काही नवे करावे म्हणून - भाग ३
- काही नवे करावे म्हणून - भाग ४
- काही नवे करावे म्हणून - भाग ५
- काही नवे करावे म्हणून – भाग ६
- काही नवे करावे म्हणून - भाग ७
- काही नवे करावे म्हणून - भाग ८
- काही नवे करावे म्हणून - भाग ९
- काही नवे करावे म्हणून - भाग १०
- काही नवे करावे म्हणून - भाग ११
- काही नवे करावे म्हणून - भाग १२
- काही नवे करावे म्हणून - भाग १३
आजोबाही भेटले. आजी तर वर्गातच भेटलेली. त्यानाही सकाळची घटना कळली होती. त्याबद्दल मलाही शाबासकी मिळाली. जपून राहण्याचा सल्लाही मिळाला.
***************************************************************************************************
अशा रीतीने आम्ही एका महिन्यात कडूनिंब आणि एका महिन्यात गोमूत्र, अशा आळीपाळीने फवारण्या करत होतो.गावातल्या लोकांना हे सगळं नवीन होतं.मग आम्ही काम करत असताना बाहेरच्या बाजूने फेऱ्या मारत,खास अंतू बर्वा स्टाईलमध्ये विचारत."तुम्ही काय कृषी खात्यात काम करता का?" आम्ही फक्त हसायचो.मग पुढे जात आम्हला ऐकू येईल अशा आवाजात शेरा यायचा,"ह्यांच्या बापाशीनी काय अशी बागायत केल्यानी होती?"उत्तरादाखल आम्ही अजूनच मोठ्याने हसायचो.
डिसेंबरमध्ये आलो तर झाडांना मोहर धरलेला दिसला. पाहूनच जीव हरखला. मयूने लगेच हिशेब केला, "ताई, गेल्यावर्षी आपण जूनमध्ये आलो तेव्हा आंबे होते. आता बघ ना मोहोर आलाय आत्ताच. यंदा मार्चमध्ये आंबा निघेलही.शाब्बास ग माझी शेतकरीण ताई."
"अरे, सुरेशदादाच्या झाडाचं काय झालंय ते बघायची आठवण ठेवा हं संध्याकाळी. खरा रिझल्ट तेव्हाच कळेल आपल्याला." मला या झाडांचा मोहोर पाहून ते झाड पहायची उत्सुकता लागली होती. संध्याकाळी सुरेखाचा जेवणाचा आग्रह थोपवून काम आटपून घरी येतानाच ते झाड पहायला गेले. त्यालाही मोहोर आलेला पाहून तर आनंद द्विगुणित झाला.
सुरेशदादा आमचे स्वागत करत म्हणाला,"जादुगार आले.या.या." त्याच्या चेहऱ्यावरही आनंद होता. काकीही खुशीत होत्या. "खरीच जादू हां, आज तुजे काका असते तर भारी खूष झाले असते गो, वायच थांब, तुजी द्रिष्ट काढते." त्या कौतुकाने म्हणाल्या.
"काकी, माझी नको. त्या आंब्याची काढा आता दृष्ट. कारण आता मला कळेल ते औषध कसे काम करतेय ते आणि इतक्या वर्षांनी आंबे धरले तर नजर पडणारच येणाऱ्या जाणाऱ्याची." मी काकीना सावधान केले.
"होयतर, व्हाण नि बेली बांधणार हाय त्याला आता. "काकींनी जाहीर केले."पण आदी फळ दिसुदेत." फाटकी वहाण आणि तुटकी करवंटी एकत्र बांधून ती झाडाला बांधली की, नजर लागत नाही अशी समजूत आहे.
जानेवारीत सगळ्या झाडांवर अमदाबादी बोरांपेक्षा मोठ्या कैऱ्या दिसू लागल्या होत्या. पानेही अगदी तजेलदार. पण एका सहा फुट उंचीच्या डेरेदार झाडावरचा मोहोर मात्र जळून गेलेला दिसला. पानांवर काळी बुरशी पसरलेली."अरे देवा! तुडतुडा?"हा एक रोग असून त्यात अगदी लहान काळे किडे, झाडावर तुड्तुड् करत उडताना दिसतात, आणि त्यांच्या शरीरातून निघणारा स्त्राव किंवा अंडीही असू शकतात त्यांची ती; सगळ्या पानांवर पसरून काजळी पसरल्यासारखी सर्व पाने काळी,चिकट दिसू लागतात. सूर्यप्रकाश न मिळाल्यामुळे झाड अन्न तयार करू शकत नाही. परिणामी मोहोर सुकून जातो आणि जळल्यासारखा दिसू लागतो.
सुरेखाचे यजमान मला म्हणाले, "ताई, यंदा खूप तुडतुडा पडला आहे सगळ्यांच्या बागांमध्ये. आहे, तुमच्याच आणि माझ्या एका बागेत नाहीत कारण तिकडे पण मी हे तुमचे औषध घातलेले म्हणूनच बहुतेक. आता सगळे मला विचारायला लागले आहेत कि काय औषध घालता म्हणून?"
ही चौकशी बाळू, बंड्या आणि धोंड्या तसेच त्यांच्या बायका आणि सुरेखाकडेही आडून आडून होत होती.
पाहून मी काळजीतच पडले. माणसांनी अडचणी आणल्या तर त्याला तोंड देणे मला कधीच कठीण वाटले नाही पण निसर्गाच्या विरुद्ध जाऊन तात्पुरते यश मिळाले तरी शेवट विनाशच. "पण या झाडालाच काय झालं? आणि आता बाकीच्या झाडांवर पसरला तर?तर मग काय करायचं?" तर त्यांनी त्या विभागातल्या एका प्रगतीशील शेतकऱ्याचे नाव सांगितले आणि त्यांना भेटून त्यांचा सल्ला घ्यायला सुचवले. जवळच कुर्धे गावात श्री. बेहेरे म्हणून एक मोठे आंब्याचे बागायतदार व्यापारी होते.त्यांचा याविषयीचा मोठा अभ्यास होता. तिथेच राहत असल्याने रोज झाडांचे निरीक्षण करून त्यांनी अनुभव घेतले होते व तिथल्या कृतीशील गावकऱ्यांना मार्गदर्शन करत होते. त्यांना भेटल्यावर, त्यांनाही माझ्या बागेतल्या एकाच झाडावर पडलेलाआणि सुरेखाच्या यजमानांच्या एकाच बागेत जिथे हा अमृतपाणी आणि कडुनिंब, गोमूत्र फवारण्यांचा प्रयोग केला होता, तिथे तुडतुडा पसरलेला नाही हे ऐकून आश्चर्यच वाटले. त्यांनी बागेत येऊन पाहणी करण्याचे कबूल केले.
त्याप्रमाणे ते आले आणि त्यांनी पाहणी केली.म्हणाले, "आता झाडांनापण विदेशी औषधांचीच सवय झालीय, जरी तुमचे औषध या झाडांना मानवले असले तरी या झाडाची immunity power कमी पडलेली दिसतेय. शिवाय तुमच्या दर महिन्यातल्या फवारण्या पावसाप्रमाणे काम करत असाव्यात."
"म्हणजे काय? अजून स्पष्ट करून सांगता येईल का?" मी वेचारले.
"पाऊस पडला की झाडे टवटवीत दिसतात याचे कारण पक्त धूळ, माती धुतली जाते असं नाही, झाडांवरचे किटाणूही धुतले जातात, त्यांचा अन्नरस शोषणारे हे जीवजंतू, किटाणूही जमिनीवर पडून पडणाऱ्या पावसाच्या पाण्यामुळे वाहून हातात, आणि मरूनही जातात." त्यांनी समजावून दिले.
त्यांनी काही रासायनिक औषधे सुचवली नि मिश्रण करून त्यांची फवारणी करायला सांगितली. मला तर काहीच सुचेना. आता इतके झाल्यवर पुन्हा रासायनिक औषधांकडे वळायचे मनाला पटत नव्हते. पण काय करावे हेही सुचत नव्हते. तरी पातेरे मामांना पाणी आणून ठेवायला सांगतलं. उद्या औषधं घेऊन येते, असे सांगून लक्षामामा आणि त्यांच्या टीमला सांगून घरी आलो खरे, पण माझं मन अस्वस्थंच होतं.
संध्याकाळी मागच्या बाजूला समुद्रावर जाताना अंकुश आमच्या बागेत माडांना अळी करताना दिसला. तोही त्यांच्या झाडाच्या मोहराबद्दल आनंदित होऊन बोलत होता. बोलता बोलता नवऱ्याने त्याला म्हटलं, "अरे, मग आंब्याच्या झाडाला पण अळं कर छानपैकी."
"होय तर, करनार आहेच." मोहोर जळालेलं आंब्याचं झाड डोक्यात आणि अळं समोर पाहून मला एक कल्पना सुचली. नवऱ्याला सांगितली तर तो म्हणाला," अग,बाग तुझी,कल्पना तुझी. मला तर त्यातलं काहीच माहीत नाही. तू काय करशील त्यात मला जमेल तेवढी मदत करेन मी." त्यानेही पाठिबा दिला.
मग सुरेखाला फोन करून, तिला मला काय हवेय त्याची कल्पना दिली. तिनेही ते देण्याचे कबूल केले. पातेरेमामांना वर पाण्याचे पिंप भरून ठेवायला सांगितले, शिवाय पाव बादली भरेल इतके गाईचे शेण आणायला सांगितले.
दुसऱ्या दिवशी बागेत गेलो.सगळे हजर होतेच. सुरेखाचे यजमान म्हणाले, "ताई, औषधं कुठे आहेत? आणि हिने हा डबा दिलाय तुम्हाला द्यायला."
"नाही, ती बेहेरेनी सांगितलेली औषधं नाही आणली. तुम्ही काल म्हणालात की, तुम्ही तुमच्या बागेत पण हीच औषध घातलीत. तर मी सुरेखाकडून तेच औषध आणवलेय. मला वाटीभर मध, तुपाचे मिश्रण पाठवलेय तिने, आणि पातेरेमामा तुम्ही पाव बादली होईल इतके गाईचे शेण घेऊन आलायत ना? आपण आपलंच औषध करूया."
बाळू, बंड्याला त्या झाडापासून तीन फुटांवर एक फूट खोल, सहा इच रुंदीचा गोल खंदक खणायला सांगितले. माती बाहेरच्या बाजूला काढायला सांगितले. बुंध्यापासून टाळमातीसाठी तीन फुटापर्यंत खणून मग सहा इंची खंदक, नि त्याला लागून काढलेल्या मातीचा डोंगर. धोन्ड्याने औषध फेसायला सुरवात केली. टाळ आणि निर्गुंडीच्या डहाळ्या आणायला लक्षामामा गेले. सुरेखाचे यजमान अजूनही विचारात पडलेले. फवारणी यंत्रेही त्यांनी आणलेली होतीच.
माती खणून खंदक करून झाल्यावर दोन्ही बाजूला समोरासमोर फवारणी यंत्रे ठेऊन मी म्हटले, "चला, आता पाऊस पाडूया."त्यांचा चेहरा अजूनही विचारमग्नच होता. "अहो, पाउस पाडूया म्हणजे नुसत्या पाण्याची फवारणी करूया. काल बेहेरे काकांनी सांगितलं नव्हतं का पावसामुळे जीवजंतू पडून जातात म्हणून आणि पाण्यात वाहून जातात म्हणून. तर आता झाडावरून त्यांना खाली पाडायला आपण पाऊस पाडू. ते खाली पडून वाहून गेले तर इतर झाडांना धोका होऊ नये म्हणून तो खंदक खणलाय त्यात ते जातील. मग त्या खणलेल्या मातीवर आणि खंदकात औषध घालून टाळमाती करून माती झाकून टाकू. बाकी, अल्ला मालिक."
आता तेही समजले. "मग मीपण माझ्या एकतरी बागेत हा प्रयोग करून बघतो. पूर्ण बागेभोवती खंदक खणला की,काम होईल.प्रयोगच करायचा तर तो मोठ्या प्रमाणावर करून पाहतो."
मग झाडाला पूर्ण आंघोळ घातली. दोन्ही बाजूने पावसासारखा उंचावरून पाण्याचा मारा झाल्याने, खाली पडलेले तुडतुडे पंख ओले झाल्यामुळे उडता न आल्याने पाण्याबरोबर वाहत खंदकात गेले,पाने स्वच्छ झाली. पाण्याच्या जोराने जळलेला मोहोरही गळून पडला. नुसत्या काड्या उरल्या त्या लक्षामामा आणि टीमने तोडून काढल्या. टाळमाती झाली. खंदकही भरून घेतला. कशी गंमत असते, जे तुडतुडे झाड खात होते तेच आता झाडाचे खात होऊन खाद्य होणार होते.
खूष झालेले सुरेखाचे यजमान म्हणाले, "ताई, पुढच्या महिन्यात राखणे ठेवायला लागतील हां आपल्याला, बघाल ना कोणीतरी?" मी त्यांनाच विनंती केली. तेही बघतो म्हणत कबूल झाले. बाकीची नेहमीची फवारणी उद्या करायचे ठरवून आम्ही निघालो.
आम्ही परत रत्नागिरीत येताना जी रिक्षा घेतली होती, तिचा चालक आमच्याशी बोलू लागला. "काका, तुमच्या बागेत यंदा चांगलं फळ धरलंय. कोणाला देणार आहात का करायला?’’
"अरे, आता काम आम्ही करतोय तर कोणाला कशाला देणार?" नवरा म्हणाला. "राखणीला शोधतोय कोणीतरी, तसा कोणी चांगला विश्वासू असेल तर सांग."
मी विचारले,"तुला रे काय माहीत? तू कुठला?" कारण माझी बाग सड्यावर असल्याने सगळ्यांच्या दृष्टीस पडण्यासारखी नव्हती.
"अहो काकी, यावर्षी सगळीकडे तुडतुडा पडल्याने आणि लवकर फळ धरल्याने तुमच्या बागेची खूप चर्चा आहे. आणि मी या गावातलाच आहे. माझे नाव सचिन साळवी. ते चाफेरकर तलाठी राहतात ना त्याच्या समोरच आमचे घर आहे. माझे वडील शिक्षक आहेत. तो सुरेखावैनीकडे वर्ग भरतो ना, शिकवणीचा, त्याचेही त्यांना फार कौतुक वाटले." तो म्हणाला. मग इकडच्या तिकडच्या गप्पा होत आम्ही रत्नागीरीत पोचलो.
आम्ही उतरताना तो म्हणाला, "बागेची राखण मीच केली तर?चालेल का तुम्हाला?"
"तू?तू कसा करू शकशील? तू तर रिक्षा चालवतोस ना? तुला कसे जमेल? आता तर दिवसाच, पण नंतर रात्रंदिवस राखण लागेल." मी चकित होऊन विचारले.
"मी आणि माझा चुलतभाऊ आहे. तो दिवसा बघेल आणि रात्री आम्ही दोघे तिथेच झोपू." तो उत्तरला "आणि पैसे किती घेशील?" मी विचारले.
"पैसे नकोत मला. आंब्याचाच काय तो वाटा द्या." तो म्हणाला.गडी हुशार होता. दोन महिने काम करून जास्तीत जास्त फायदा कसा करून घ्यायचा हे जाणणारा होता.
"मी उद्या तुला काय ते सांगेन." असे सांगून आम्ही निघालो. विचार केला, गावातलेच असतील तर बरंच होईल. पण मी त्याला ओळखत नव्हते, म्हणून सुरेखाच्या यजमानांचा सल्ला घ्यायचे ठरवले. दुसऱ्या दिवशी फवारणीसाठी जायचेच होते, तेव्हा त्याच्या घरी जाऊन बोलायचे ठरले.
दुसऱ्या दिवशी फवारणीचे काम सुरु झाल्यावर सुरेखाच्या यजमानांना त्याच्याबद्दल विचारले. त्यांनीही मुलगा चांगला आणि निर्व्यसनी असल्याचे सांगितले. म्हटलं, "त्यांच्या घरी निरोप देऊ. संध्याकाळी भेटूयात म्हणून. पण तो आंब्याचा वाटा मागतोय, तो किती द्यावा?"
"आंब्यात वाटा मागतोय? हुशारच आहे. माझं ऐकाल तर पैशातच ठरवा. ते बरं पडेल. किंवा अडूनच बसला तर आज दिसणाऱ्या फळांवरून अंदाजे साधारण १०० पेटी आंब्याला मरण नाही, साधारण १० पेट्यापर्यंत ठरवा,कारण हे लवकरचं फळ आहे. नंतर राखण कशाला लातेय. यंदा आंबा कमी असल्याने तो फायद्यातच राहील. कारण दोन गडी, राखणे धरले तरी त्यांचा पगार तीन हजार. जास्ती जास्त तीन महिने धरले तरी नऊ हजार होतील." त्यांनी समजावून दिले.
"बघू, त्याच्या घरी जाऊ, काय ते नीट बोलून ठरवू. तुम्हीपण चला आमच्यासोबत. आता पेपर वगैरे करायला वेळ नाही निदान साक्षीदार तरी राहील आमच्या बाजूने." म्हणून आम्ही कामाला लागलो. नेहमीप्रमाणे शेवंता चहा, नाश्ता आणि जेवणाचे पाहणार होती. तिलाच निरोप द्यायचे काम दिले.
संध्याकाळी काम संपल्यावर आम्ही सचिनच्या घरी गेलो. त्याचे आई, वडील, आजी आणि दोन भाऊही हजर होते. ओळखीचा प्राथमिक कार्यक्रम संपल्यावर बोलणी सुरु झाली. त्याने सुरुवात केली, "हा माझा भाऊ राखणीचे काम करेल आणि मीपण रात्री तिथे झोपायला जाईन. एक आंबा इकडचा तिकडे होणार नाही, असा मी तुम्हाला शब्द देतो. दादा मला ओळखतातच"; तो सुरेखाच्या यजमानांकडे हात दाखवत म्हणाला.
"हो, तुला जेवढा ओळखतो तेवढा मी सांगितलाय, पण आता ह्या कामाबाबत काही मी तुला ओळखत नाही तेव्हा माझा विश्वास तोडू नकोस." तेही स्पष्टपणे म्हणाले.
"ठीक आहे, तू पैसे घेऊनच काम केलास तर बरं होईल." मी सुचवले. त्यावर तो म्हणाला, "बघा काकी, राखणीचं काम गडी करतात, तर मला आंब्यात वाटा हवा असण्याची दोन कारणं आहेत. एका म्हणजे आमची काही आंब्याची झाडं नाहीयेत आणि दुसरे म्हणजे नोकर म्हणून काम न करता भागीदार म्हणून काम करणं मला आवडेल." त्याचे स्पष्टीकरण मला पटले.
"ठीक आहे. मी तुला १०% भागीदार करून घ्यायला तयार आहे. कारण मला तुझा दृष्टीकोन आवडला. मान्य असेल तर बोल. त्यापेक्षा जास्त मी देणार नाही, त्यातही तुझे कल्याणच होईल." त्याची आजी म्हणाली, "कायतरी वाढवा ना."
म्हटलं,"आजी, तुम्ही काय धनजी नाक्यावर त्या माम्या बसतात त्यांच्याशी बाजार करता आहात का? मला नुसते राखणे ठेवणे जास्त परवडेल यापेक्षा." पुन्हा सचिन कडे वळत मी म्हटलं", बोल रे, तुला मान्य असेल तर हवं तर विचार करून सांग. आम्ही निघतो."पण तो कबूल झाला. मग आंबे काढण्याच्यावेळी दोनही बाजूचा किमान एक सदस्य हजर राहील, या अटीवर करार ठरला.
त्याचे वडील त्याला म्हणाले, "नवीन काम सुरु करतोयस, इमानदारीने कर." त्यावर त्यानेही होकार भरला. काही झाडांखाली छोट्या छोट्या कैऱ्या पडलेल्या दिसत होत्या. ही गळती झाडाला पाणी कमी झाल्याने होते. त्यामुळे मी त्याला त्या झाडांना पाणी द्यावे लागेल याची कल्पना दिली. सात आठ झाडांना ही समस्या होती. एक एक बदली पाणी काही दिवस घालावे लागेल याची कल्पना दिली.
"अहो, तो काय तुमचा नोकर आहे का, त्याल हे काम सांगताय ते?" आजी पुन्हा म्हणाल्या.
"अहो आजी, आता तो मालक आहे १०%. जशी मी ९०%काम करते तसे त्याने १०% काम करायलाच हवे. किंवा कोणाकडून करवून घ्यायला पाहिजे." या माझ्या बोलण्यावर तो म्हणाला," आजी, तू गप्प बस. मी करेन ते."
मग आम्ही निघालो, पुढची फवारणी वेखंडाची होती. वेखंडाचा कोकणात खूपच उपयोग होतो, साप वेखंडाच्या वासाने जवळ येत नाहीत. माझी आजी वेखंडाची पूड वापरून घराभोवती लक्ष्मणरेषा काढत असे दररोज, साप घरात येऊ नये म्हणून. त्यामुळे जेव्हा वाडीत सर्पिण तिच्या पिल्लांसह दिसली तेव्हापासून आम्ही सारेजण वेखंडाचे तुकडे जवळ बाळगत असू.
आता फळ क्रिकेटच्या बॉलपेक्षा मोठे झाले होते. यावेळी वेखंडाच्या एक दोन फवारण्या मिळाल्या तर फळाचा रंग अगदी आकर्षक आणि तजेलदार दिसतो. वेखंड पाण्यात उकळवून ते आटवून पुन्हा दहा लिटर आटवलेले पाणी दोनशे लिटर पाण्यात मिसळून फवारायचे.
त्याप्रमाणे दोन किलो वेखंड २० लिटर पाण्यात उकळून १० लिटर केले, आणि दोनशे लिटर पाण्यात मिसळून त्याची फवारणी केली. फेब्रूवारीत आम्ही आलो तेव्हा फळाची वाढ बचक्याएवढी दिसत होती. अजून एक नवल वाट पहात होते,मोहोर जळलेल्या झाडाला पुन्हा पालवी फुटून मोहोर डोकावताना दिसत होता.सगळेच खुश झालो. आता गावातल्या पाच सहाजणांनी आमची भेट घेतली. काय औषध घालता याची चौकशी करू लागले. त्यांच्या बागांचे नुकसान झालेले असल्याने आलेले लोक होते ते. मी त्यांना कल्पना दिली पण माझाही पहिलाच प्रयोग आहे तेव्हा जे काही करायचे ते स्वतःच्या जबाबदारीवर करा, असे सांगितले. शिवाय आता औषधे घालून जवळ जवळ महिन्याने मोहर दिसणार, मग तो वाढणार आणि आंब्याचे उत्पन्न येण्यास जून उजाडणार हेही लक्षात आणून दिले.
इतक्यात सचिन दोन कॅन पाणी घेऊन आला.
‘का रे, या वाटेने पाणी आणलंस?" मी विचारल्यावर त्याने सांगितले," भाईंनी पाणी कमी झालेय म्हणून नेऊ नका असे सांगितलेय. म्हणून मी घरूनच पाणी आणतो या झाडांना घालायला."
"मग मामांनी पाणी कुठून आणलं", मी विचारलं तर मामा म्हणाले, "कुटं आनलाय? पिपा रिकामी हायेत. माजपन पाणी न्हेव नुको म्हणून सांगितल्यान्."
"अस्सं, मग आता?" मी पुन्हा विचारात.
नवरा पाटबंधारे खात्यात काम करत होता त्यावेळी. त्याच्या ओळखींच्या इथल्या लोकांना बागेबद्दल कळले तेव्हा एकाने दिलेली माहिती आठवली. त्यांनी सांगितलं होतं,’बागेत जर विहीर खणायची असेल तर सांगा. आपल्याकडे एक शिपाई आहेत, ते पाणाड्याचं काम करतात.’
पाणाड्या म्हणजे जमिनीतले प्रवाह शोधणारा माणूस. हा माणूस जागेवर अनवाणी फिरून कुठे पाणी लागेल ते सांगू शकतो. बागेत पहिल्यावेळी काम करताना कोल्हा दिसला होता, त्या जागी विहीर पडण्याची सूचना लक्षामामांनी केली होती पण तिथे भला मोठा कातळ होता. तो फोडणे शक्य नव्हते निदान आतातरी. तर दुसरा मार्ग तरी करून पाहू, या विचाराने नवरा आणि सचिन यांना सचिनच्या रिक्षाने रत्नागिरीत पाठवून त्या पाणी शोधणाऱ्या गृह्स्थांना आणायला सांगितलं. मयूही त्याच्यांबरोबर गेला, तो आणखी मुलं कामासाठी घेऊन येणार होता.
"ताई, विहीर खणायची का?" सुरेखाचे यजमान अचंबित होऊन विचारू लागले. मला भेटायला आलेले इतर लोकांचेही कान टवकारले गेले.
"नाही, आजच्या दिवसात विहीर खणून होणार नाही. पण पाणी तर हवंच म्हणून एक कल्पना आलीय मनात. कायदा शिकतेवेळी एक उदाहरण होतं, ते आठवतेय. आपली जमीन वरच्या अंगाला आहे, म्हणजे पाणी इथूनच वाहत असावं. लक्षामामांनी ती कोल्हा उभा राहिलेली जागा सांगितली,ती बागेच्या एका कोपऱ्यात आहे. तिथे बांधाच्या पलीकडून प्रवाह गेला असेल तर काही उपयोग नाही, पण जर प्रवाह बागेतूनच गेला असेल तर तर खाली पंधरा फुटावर बाहेर पडलेले पाणी इथे पाच फुटावरही लागेल, असे गणित माझ्या मनात आहे, बघू ते पाणी शोधणारे काय म्हणतात ते तासाभरात , नाहीतर आहेच भाईशी पंगा."
त्यांनी हसू दाबत म्हटलं," मग सुरेखाला बोलावून घेतो गम्मत बघायला."
"बोलवा, बोलवा, आज काही झालं तरी त्याच्याशी भेट होणारच आहे, माझ्या मनासारखं झालं तर. बघालच तुम्ही." मीपण हसत सांगितले.
बाळूला बंड्या, धोंड्या सोबत घरी पाठवून पिकाव, फाववडी, कुदळी, घमेली, दोऱ्या असा सरंजाम आणायला पाठवून सुरेखालाही बोलवायला सांगितले. मला त्यांचा सकारात्मक दृष्टीकोन एकदम भावला. जागा मिळाली की, लगेच कामाला सुरुवात. सुरेखाला बाळूकडून काय चाललेय ते कळल्याने तीही येताना पूजेचे सामान दोन नारळांसह घेऊन आली. शोभत होती खरी नवऱ्याला बायको.
अर्ध्या तासातच नवरा त्या गृहस्थांना घेऊन आला.त्यांना कोल्ह्याची गोष्ट कळल्यावर ते म्हणाले,"अरे वा! तिथूनच सुरुवात करू." पायातल्या चपला काढून त्यांनी त्या जागेची पूजा केली.तिथे नारळ फोडला.जमिनीला हात लावून प्रार्थना केली.आणि दगडाच्या अवतीभोवती फिरू लागले. मध्ये मध्ये डोळे मिटून अदमास घेऊ लागले.बांधाच्या कडेला येऊन थांबले. माझे हृदय जोराने धडधडू लागले. इतक्यात ते बांधाच्या कडेकडेने थोडेसे पुढे येऊन पुन्हा आत वळले.पुढे पुढे येत एका जागी थांबले. म्हणाले," हिते चार फुटांवर पाणी लागंल. ती जागा बरोबर जो बांध फोडून भाई गुरे आत घालत असे तिथून जवळच होती. एव्हाना मयूही बाकीच्यांसोबत परतला होताच.
पुन्हा त्या जागेची पूजा आम्हाला दोघांना करायला लावून तिथेही नारळ फोडून प्रार्थना केली. आणि पहिला पिकाव मी मारला. आणि कामाला सुरवात केली. साधारण चार फूट व्यासाचा खड्डा खणायला सुरुवात केली. तासाभरातच जमीन ओलसर दिसू लागली.
आता लक्षामामांनी बाकीच्यांना बाहेर पडायला लावले. थोडावेळ थांबून निरीक्षण केले आणि शेवटचा घाव घातला. झुळूझुळू पाण्याची धार वाहू लागली. सगळ्यांनी आनंदाचा जल्लोष केला. पुन्हा एकदा त्या धारेचे निरीक्षण करून अगदी नाजूक हाताने त्यांनी काही माती काढली.धार मोठी झाली. पाण्याने तांब्या भारुन त्यांनी वर दिला.
अहाहा! माझ्या हातात अमृत होते नि माझ्या झाडांची संजीवनी. पाणी वाढू लागले तसे सगळे पाण्यात उड्या टाकायला पाहू लागले. पण लक्षामामांनी सगळ्यांना अडवले, "अरे मेल्यांनु, आधी नका आत येव,पाणी गदळतला. ताईस अवशदाक हवा निर्मळ पानी." ते स्वत:ही बाहेर आले. मला म्हणाले, "लक्षिमी हायस बाय तू. पाणी वाटल त्याच्याकडं न्हाय येत." त्या अनुभवी माणसाला थोडे झुकून नमस्कार करत मी तो आशीर्वाद स्वीकारला. सकाळी भेटायला आलेलेही अभिनंदन करून निघून गेले.
जेवायची वेळ झालीच होती. जेवण घेऊन आलेली शेवन्तीही ते पाहून हरखली. "अय्यो,ताई हीर काढलीत?"
"ही काय विहीर आहे? आणि काय हो बाई, तुमची विद्यार्थिनी अशुद्ध बोलतेय बघा." मी सुरेखाकडे पाहत तिची चेष्टा केली. सगळे जेवेपर्यंत खड्डा भरून पाणी बाहेर वाहू लागले होते. पातेरेमामा आणि एक दोघे पाणी काढून पिंपात ओतू लागले. तेही खूष झालेले, म्हणाले, "मेल्या भाईच्या नाकावरची माशी आता हलवायलास जायचा काम नाय. हितल्या हिते पानी." मयूही त्यांची फिरकी घेत बोलला," पण मामा आता तुम्हाला पैसे कमी मिळतील. काम कमी,पैसे कमी." त्यवर तेही वस्तादपणे उत्तरले," बरोबर.पण ताई लक्षिमी हाय, त्यातून आज खुशीत हाय, पैसं वाढवूनच द्येल पर कमी नाय करणार."
आता कामाला सुरु वाट करणार येवढ्यात भाई आपल्या बगलच्च्यांना घेऊन आलेच.त्यांच्मागून सकाळी भेटीला आलेले काही जण आले." ओ वैनी, हे काय करताय तुम्ही. आमचं पाणी बंद झालं ना!" भाईनी रागातच सुरुवात केली.
"हे बघा, ही माझी जागा आहे, इथे मी काहीही करू शकते, हे तुम्हाला माहीत आहे ना? असलंच पाहिजे." मी ठणकावलं.
"वा, वा! तुम्ही पाणाड्या आणून साग्रसंगीत शोध करून विहीर काढलीत आणि आमचं पाणी तोडलात," ते संतापून बोलले.
"अहो, विहीर खणायची तर पाणी कुठे पडेल हे शोधावंच लागतं. हे पण तुम्हाला माहीत नाही का?मी काय अख्ख्या बागभर खणत बसू का?" मी शांतपणे विचारलं.
"मग आता आम्ही काय करायचं?" त्यांनी अजूनच संतापून विचारलं.
"इथून पाणी न्यायचं." मी अजूनच शांतपणे बाँब टाकला. "कारण कायद्याने जमीन माझी असली तरी पाणी माझं एकटीचं नाही. तेव्हा तुम्ही इथून पाणी नेऊ शकता."
"हो, आता तुमच्या ओंजळीनी पाणी प्यायचे तेवढे राहिलंय." ते वैतागून बोलले.
आता शांत राहणे माझ्या मर्यादेत बसत नव्हते. "ही वेळ आणली कोणी? तुम्ही सचिन आणि पातेरेमामांना पाणी न्यायला मनाई करताना तुम्हाला ही अक्कल नव्हती का?"
"अहो, मला कुठे माहित होते ते तुमच्यासाठी पाणी नेतायत ते?" भाईंची गुर्मी ओसरू लागली होती.
"अरे वा! म्हणजे तुम्ही सगळ्याच गावकऱ्यांना तुमच्या अंगणात उतरायची मनाई केलीयत का?" या माझ्या प्रश्नावर ते निरुत्तर झाले." आता मात्र माझी खात्री झालीय की, तुम्ही मलाच मुद्दाम त्रास देताहात, तेव्हा तुम्हाला पाणी न्यायला मुभा आहे, पण तुम्ही माझे नुकसान व्हावे हा हेतू मनात ठेऊन असल्याने, तुम्ही माझ्या माझ्या जमिनीत यापुढे पाय टाकलात तर मी ट्रेसपासिंगखाली तुम्हाला अटक करवीन. पाणी नेण्यासाठी तुम्हाला पाईप वगैरे टाकायचे असतील तर ते कामही मी इथे हजर असतानाच तुम्हाला करून घ्यावे लागेल." मी खुंटा हलवून बळकट केला.
आता जे गावकरी मला सकाळी भेटायला आले होते तेही त्याला बोलू लागले. एक म्हणाले, "हे रे काय भाई? नवीन आलेल्या माणसाला मदत करायची सोडून तो खोडेच घालतोस? अशाने गावाचे नाव खराब होते ना." भाई गप्पच.
लगेच दुसऱ्याने सुरुवात केली, "भाई, तू इतक्या वेळा पडलंस पालथी मारून, तरी तुजा नाक वरच काय रे?" आता भाईनी मान खाली घातली." आता तर पायावर कुराड नाय मारलंस. कुराडीवरच पाय टाकलंस मेल्या!"
तिसऱ्याने गौप्यस्फोट केला. "जोशान तुज बाग दिलंन नाय तर तू अशी मिळवणार की काय?" आता मात्र भाईने त्याच्याकडे जळजळीत नजरेने पहिले आणि बागेतून बाहेर पडला.
(क्रमश:)
प्रतिक्रिया
24 Dec 2015 - 3:57 pm | नूतन सावंत
बऱ्याच दिवसाने लेख टाकला.दुवे द्यायचे राहिले.
24 Dec 2015 - 7:05 pm | मुक्त विहारि
काही नवे करावे म्हणून –भाग १३
http://www.misalpav.com/node/33117
24 Dec 2015 - 4:15 pm | रुस्तम
आता वाचतो .. :)
24 Dec 2015 - 4:33 pm | आनंदराव
मस्त
24 Dec 2015 - 4:54 pm | रुस्तम
हा ही भाग मस्तच...
24 Dec 2015 - 5:10 pm | नाखु
टंकला पण एक्दम फर्मास आणि जोरकस !!!
(तुम्हाला किमान कायद्यांची माहीती तरी होती ज्यांना नाही त्यांना हे गाव्गुंड काय त्रास देत अस्तील त्याची कल्पानाच करवत नाही)
24 Dec 2015 - 5:20 pm | पिलीयन रायडर
वा वा!! तुम्हाला खरड करणारच होते की पुढचा भाग कधी ते..!
हा ही भाग उत्तमच!!
ह्या गोष्टीचा कालखंड काय आहे?
24 Dec 2015 - 6:33 pm | अजया
:) पुभाप्र
24 Dec 2015 - 6:53 pm | यशोधरा
मस्त हा भाग!
24 Dec 2015 - 7:04 pm | मुक्त विहारि
आता कादंबरीचे नांव "काही नवे करावे म्हणून" असे न ठेवता "एक नारी दस गुंडों को भारी" असे दिलेत तर उत्तम.
26 Dec 2015 - 1:05 am | संदीप डांगे
मुविंशी बाडीस....
26 Dec 2015 - 2:37 pm | डॉ सुहास म्हात्रे
+१
24 Dec 2015 - 7:21 pm | एस
वाचनखूण साठवली आहे. पुभाप्र.
25 Dec 2015 - 9:38 am | DEADPOOL
मस्त!
25 Dec 2015 - 9:55 am | कुसुमिता१
खुप छान लेखमाला आहे ही..लवकर टाका पुढचा भाग!
26 Dec 2015 - 3:50 am | रेवती
वाचतिये. तुमच्या कष्टाचे व निरिक्षणशक्तीचे कौतुक वाटले.
26 Dec 2015 - 11:08 am | श्रीरंग_जोशी
नेहमीप्रमाणेच हा ही भाग खूप आवडला.
एखाद्या कामात निष्ठा अन कल्पकता याचे मिश्रण लावल्यास काय होऊ शकते याचा वस्तुपाठ तुम्ही घालून देत आहात.
तुमच्या बागेचे फोटो पाहावेसे वाटतात.
26 Dec 2015 - 12:22 pm | मुक्त विहारि
+१
1 Jan 2016 - 9:52 pm | नूतन सावंत
फोटो आहेत.पण जरा शोधावे लागतील.
1 Jan 2016 - 11:34 pm | कविता१९७८
मस्तच
23 Jan 2016 - 11:12 am | KALINDI
पुढचा भाग लवकर टाका.
28 Jan 2016 - 12:06 am | वेल
सुरंगी ताई, पुढचा भाग?
सॉल्लीड डॅशिंग आहेस ग तू. डोक्यावर हात ठेव माझ्या.
12 Mar 2016 - 1:16 pm | स्वीट टॉकर
तुमची हकीकत लिहायची हातोटी तर सुरेख आहेच, पण त्याहूनही पुढे म्हणजे तुमची पर्सनॅलिटी! स्पष्ट विचार आणि आचार, आणि निर्भयता . मला तुमचं प्रचंड कौतुक वाटत आहे.
पुढील भागांच्या प्रतीक्षेत.