ऊर्ध्वमूलमध:शाखमश्वत्थं

शरद's picture
शरद in जनातलं, मनातलं
17 Aug 2016 - 9:36 am

===================================================================

उपनिषदे :
(१)... (२)... (३)... (४)... (५)... (६)... (७) उपनिषदांनी आम्हाला काय दिले ?... (८) ईशावास्योपनिषद...
(९) केनोपनिषद... (१०) अविद्या... (११) मुंडकोपनिषद... (१२) प्रश्नोपनिषद-१... (१३) प्रश्नोपनिषद-२...
(१४) कठोपनिषद-१... (१५) कठोपनिषद-२... (१६) ऊर्ध्वमूलमध:शाखमश्वत्थं...

===================================================================

ऊर्ध्वमूलमध:शाखमश्वत्थं
ऊर्ध्वमूलमध:शाखमश्वत्थं प्राहुरव्ययम् !
छन्दासि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित् !! (भ.गीता १५.१)

(असा एक पिंपळ वृक्ष आहे कीं ज्याचे मूळ वर आहे आणि शाखा खाली आहेत आणि ज्याची पाने वैदिक मंत्र आहेत. जो या वृक्षाला जाणतो तो खरा वेदवेत्ता.)

(श्री. आदूबाळ यांनी वर "मूळ, खाली फांद्या" ही काय भानगड आहे ? असे विचारल्यावरून थोडक्यात माहिती दिली आहे.)

कठोपनिषदातील "अश्वत्थ" वृक्ष गीतेतही आहेच. तर हा अश्वत्थ, म्हणजे संसार वृक्ष. "हे माझे वडील, हे त्यांचे वडील," असे करत करत आपण मूळ पुरुषाकडे जातो. आता हा "मूळ" पुरुष, ज्याने हे सर्व विष्व निर्माण केले तो कोण ? ईश्वर. तो कोठे ? वर. कळले प्रपंच वृक्षाचे मूळ वर व फांद्या खाली का म्हटले आहे ? आता श्री. यांचा प्रश्न येईल की "असे आहे तर मला आजूबाजूला, या संसारात वर मूळ असलेला वृक्ष का दिसत नाही?" दिसेल की. तोही दिसेल. निसर्गात, एखाद्या तळ्याच्या काठी उभे रहा व पलिकडल्या वृक्षाचे पाण्यातील प्रतिबिंब पहा. काय दिसते ? मूळ वर, फांद्या खाली, ! जरा वार्‍याची हलकी झुळुक आली की हा वृक्ष नाहीसा होतो. संसाररुपी वृक्ष हा खर्‍या वृक्षाचे प्रतिबिंब आहे. पाण्यातील प्रतिबिंबा एवढेच क्षणभंगुर "अश्वत्थ" याचा अर्थ "उद्या नाही तो". म्हणूनच या वृक्षाला कठोपनिषदात व गीतेत "अश्वत्थ" म्हटले आहे.(अश्वत्थ म्हणजे पिंपळ=पिप्पल असा अर्थ असला तरी येथे संसार वृक्षाला पिंपळ म्हणण्यात गोडी नाही)
आणि जर तुम्ही या असार संसाराचे खोटेपण जाणून, पाणी म्हणजे अविद्येचा / मायेचा
पडदा, दूर सारून वरच्या खर्‍या वृक्षाला पाहिलेत, जाणलेत, तर तुम्हाला कळेल की हा अनादि कालापसून आहे, शुद्ध चैतन्य आहे "ब्रह्म" आहे. . .
पंधराव्या अध्यायात पुढील तीन श्लोकात या अश्वत्थ वृक्षाचे वर्णन केले असून त्याच्या फांद्या तोडत तोडत मूळाकडे, भगवंताकडे, कसे जावयाचे याचे वर्णन आहे. पण आपण आज गीता बघत नाही म्हणून ते "गुह्यतम शास्त्र "बाजूला ठेवून या अश्वत्थाची दुसरी बाजू पाहू.
हा आजूवाजूचा संसार म्हणजे "प्रतिबिंब" हे झाले "शांकर मत" पण माऊली मात्र तसे मानत नाहीत. त्यांचे म्हणणे हा वृक्ष तर ब्रह्माचा ’चिद्विलास्" आहे. सत् पासून असत् कसे निर्माण होणार ? तर हा विचारही "अश्वत्था" बद्दलचा दृष्टिकोन म्हणून लक्षात ठेवला पाहिजे.
शरद

संस्कृतीमाहिती

प्रतिक्रिया

आदूबाळ's picture

17 Aug 2016 - 11:00 am | आदूबाळ

वा! अनेक धन्यवाद!

फांद्या मायारूपी असतील तर मूळ खरं कशावरून असेल असा शंकेखोर विचार येऊन गेला.

सतिश गावडे's picture

17 Aug 2016 - 11:20 am | सतिश गावडे

या अश्वत्थ वृक्षाबद्दल पहिल्यांदा नववीत असताना कळले. सरकारने तेव्हा शालांमध्ये पहिला तास घोकंपट्टीसाठी अनिवार्य केला होता. त्याला "मुल्यशिक्षण" असे गोंडस नाव होते. त्या तासाला गीतेचा पंधरावा अध्याय घोकावा लागायचा. अर्थाशी काही संबंध नव्हता.

राही's picture

17 Aug 2016 - 11:29 am | राही

विवेचन सुंदर आहे पण त्रोटक वाटले. अधिक विवेचनाच्या अपेक्षेत.
'सत् पासून असत् कसे निर्माण होणार' हा सुंदर विचार अधिक विस्ताराने खुलायला हवा होता.