===================================================================
उपनिषदे :
(१)... (२)... (३)... (४)... (५)... (६)... (७) उपनिषदांनी आम्हाला काय दिले ?... (८) ईशावास्योपनिषद...
(९) केनोपनिषद... (१०) अविद्या... (११) मुंडकोपनिषद... (१२) प्रश्नोपनिषद-१... (१३) प्रश्नोपनिषद-२...
(१४) कठोपनिषद-१... (१५) कठोपनिषद-२... (१६) ऊर्ध्वमूलमध:शाखमश्वत्थं...
===================================================================
अंतरंग-४
ब्रह्म(आ)
पूर्वपीठीकेचा भाग थोडक्यान आवरून आज आपण उपनिषदांमध्ये "ब्रह्म" बद्दल काय लिहले आहे ते पाहू
(१) केनोपनिषद
प्रथम आचार्य शिष्याच्या, "मनाला प्रेरणा कोणी दिली, कोणाच्या इच्छेने लोक बोलतात, डोळे व कान यांचे कार्य कोणत्या देवाने सुरू केले "(१.१) इ. प्रश्नांची उत्तरे देतांना सांगतात " जेथे आत्मा जातो (प्रवेश करतो) त्या ब्रह्मात चक्षू, वाचा, मन जावू शकत नाहीत; ते ज्ञात व अज्ञात याच्या पलिकडे आहे; तेथे वाणी कुंठित होते पण वाणीची उत्पत्ती त्याच्यापासून होते. जे कानाला ऐकू येत नाही, पण ज्यामुळे कान ऐकू शकतो, जे श्वासोच्छ्वास करत नाही, पण ज्यामुळे प्राण श्वासोच्छ्वास करतो, (१.३,१.५, १.७ १.८)
ते ब्रह्म होय, आपण ज्याची उपासना करतो ते नव्हे.. ज्याला कळले आहे असे वाटते त्याला ते कळलेले नसते. ते ज्ञान होण्याच्या पलिकडे आहे. संशयरहित ज्ञानाने मोक्ष मिळतो." (२.२-२.४)
"यतो वाचो निवर्तंते "असे सगळी उपनिषदे म्हणतात.
नंतर एक कथा सांगितली आहे.(तृ.खंड)
देवांचा विजय झाला तेव्हा त्यांना गर्व झाला. हा विजय आपल्यामुळे झाला आहे असे त्यांना वाटले तेव्हा त्यांच्यासमोर ब्रह्म प्रगट जाले. पण देवांना ते कोण हे कळेना. तेव्हा देवांनी अग्नीला त्याच्याकडे पाठविले. अग्नीने विचारले "कोण रे तू " मग अग्नीला ब्रह्माने विचारले "तू कोण ? तुझे सामर्थ्य काय "? अग्नी म्हणाला " मी सर्व जग जाळू शकतो" ब्रह्माने त्याच्यासमोर एक काडी टाकली व ती जाळावयास सांगितले. अग्नी ती काडी जाळू शकला नाही. मग वायू गेला व "मी सर्व जग उडवू शकतो " अशी वल्गना त्याने केली. पण ब्रह्माने त्याच्या समोर टाकलेली काडी तो हलवूही शकला नाही. ब्रह्म गुप्त झाले. मग आकाशात प्रगट झालेल्या हैमवती उमेने त्यांना सांगितले की ":ते ब्रह्म होते व त्याच्यामुळेच तुम्हाला विजय प्राप्त झाला आहे." ब्रह्माच्या समोर देवांचे सामर्थ्य कस्पटासमान आहे हे ही कथा सांगते.
(2) ईशावास्य उपनिषद
पूर्णमद: पूर्णमिदम् !
पूर्णात्पूर्णमुदच्यते !!
पूर्णस्य पूर्णमादाय !
पूर्णमेवावशिष्यते !!
ईशावास्य उपनिषदातील हा शांतिमंत्र फार महत्वाचा आहे. अर्थ:
हे ब्रह्म पूर्ण आहे. (त्यातून निर्माण झालेले) हे विश्व पूर्ण आहे. पूर्णातून पूर्णच निर्माण होते. पूर्णातून पूर्ण वजा केले तरी पूर्णच राहणार. पूर्ण ब्रह्मातून पूर्ण विश्व वजा केले, काढून टाकले तरी पूर्णच शिल्लक राहणार
(गणितात infinity मधून infinity वजा केली तरी infinity च शिल्लक राहते तसेच काही.)
मह्त्वाचे काय ? इथे शांकर अद्वैतातील "जगत्मिथ्या" ला फाटा मारला आहे.( मान्य की उपनिषदांवरील लेखात ही भाषा शोभत नाही, पण मिपावर लिहतांना हे आटुमाटु होत असावे. शिवाय उपनिषदांनी अद्वैताचा पुरस्कार केला असला तरीही शाकरमत म्हणजेच अद्वैत असा गैरसमज टाळला पाहिजे. माऊलींनीही जगाला मिथ्या नाही तर काव्यात्मक भाषेत "विलास" म्हटले आहे.)
ईशावास्याचे प्रणेते याज्ञवल्क्य हे जगाला त्याज्य समजत नव्हते. सर्व जग ईश्वरमय आहे. त्याचा त्यागपूर्वक उपभोग घ्या असेच त्यांचे म्हणणे होते. जनकाच्या दरबारात एकदा सर्व ऋषी जमले असतांना जनकाने ह्जार गायी उभ्या केल्या व तो म्हणाला "सर्वश्रेष्ठ तत्वज्ञानी माणसाने ह्या गायी घ्याव्यात" आता सगळ्यांना प्रश्न पडला काय करावयाचे ? याज्ञवल्क्यांनी मात्र ताबडतोब आपल्या शिष्यांना "गाई घेऊन जा" असे सांगितले. आपल्या ज्ञानाबद्दलच्या खात्रीबरोबरच त्यांना असे धन सोडावयाचे नव्हते. संन्यास घ्यावयाचे ठरविल्यावर त्यांनी आपली मालमत्ता आपल्या दोन बायकांमध्ये वाटून दिली.
(आत्मा=ब्रह्म) आत्मा सर्वव्यापी, शुद्ध, शरीररहित,, अखंड, स्नायूरहित, निर्मल, पापरहित, द्रष्टा, सर्वज्ञ, सर्वश्रेष्थ व स्वयंभू आहे. (८)
(3) कंठ उपनिषद
यमाने नचिकेताला केलेल्या उपदेशातील (३.१५) पुढील वाक्यांत ब्रह्माचे वर्णन असे आहे :
’ शब्द, स्पर्श, रूप, रंग, गंध व व्यय नसलेले अनादि, अनंत, महत व अचल असे आत्मज्ञान जाणले असता मनुष्य मृत्यूपासून मुक्त होतो."
आत्मज्ञान वा ब्रह्मज्ञान हाच सुटकेचा मार्ग असे जर " मृत्यू" च म्हणत असेल तर मान्य केलेच पाहिजे, नाही का ?
(४) मुंडक उपनिषद
(१) चार वेद, शिक्षा, सूत्र, व्याकरण, निरुक्त, छंद, ज्योतिष ही " अपरा विद्या " होय. अक्षरविद्या म्हणजेच ब्रह्मज्ञान ही " पराविद्या " आहे.
(१.१.५)
(२) ते ब्रह्म अदृष्य, अग्राह्य, आहे. तसेच, ते अगोत्र, वर्णरहित, डोळे , कान नसलेले, हात-पाय नसलेले, नित्य, व्यापक, विविधरूपी, अतिसूक्ष्म, अव्यंग, जगाचे उत्पत्तिस्थान, अशा स्वरूपात ज्ञात्यांना समजते.(१.१.६)
(३) प्रकाशस्वरूप, समीपस्थित, हृदयस्थ, महत्पद, समर्पित, चल, चेतन,उघडझाप करणारे असे ते ब्रह्म आहेहे शिष्यांनो, ते जे सर्वश्रेष्थ आहे, तेच ब्रह्म आहे.
(२.१.१.)
(४) दीप्तियुक्त, अणुपेक्षाही सूक्ष्म, सर्व जग व त्यातील प्राणी ज्यात आहेत, ते हे अक्षरब्रह्म होय. त्रेच प्राण, वाणी आणि म्मन आहे.ते सत्य आणि अमृत आहे. तेच प्राप्तव्य आहे.ते तू प्राप्त कर. (२.१.२)
(५) हृदयात निर्दोष व निष्कल ब्रह्म आहे. ते शुभ्र व अत्यंत तेजस्वी असणारे ब्रह्म ब्रह्मवेत्ते जाणतात. तेथे सूर्य, चंद्र-तारका आणि वीज यांना प्रवेश नाही मग अग्नीला प्रवेश कुठला ? त्याच्यामुळे जग प्रकाशित होते.त्या ब्रह्मामुळे जग आहे. (२.२.१०,११).
पुढील भागात आणखी दोन-तीन उपनिषदे बघू.
शरद
प्रतिक्रिया
5 Jun 2016 - 1:18 pm | रमेश भिडे
कंठ उपनिषद???
टायपो एरर असावी.
सविस्तर आणि सविस्तार येऊ द्या.
6 Jun 2016 - 12:11 am | प्रचेतस
नचिकेताची कथा महाभारतात पण वाचल्याची आठवतंय. शांतिपर्व किंवा अनुशासनपर्वात.
6 Jun 2016 - 9:59 am | एस
लेखमाला वाचत आहे.
6 Jun 2016 - 2:52 pm | प्रसाद गोडबोले
आदरणीय शरद सर ,
शि.सा.न.वि.वि.
सुंदर लेख !
खालील विधानावर चर्चा करु इच्छितो :
मागे आपण निर्देशित केल्याप्रमाणे आधी उपनिषदे आली आणि मग आचार्यांनी भाष्ये लिहिले , उलटे नाही , तस्मात , आचार्यांनी उपनिषदोक्त संकल्पनेला फाटा दिला आहे असे म्हणता येईल !
आचार्यांचया आधीचा आर्यसनातन वैदिक धर्म कोठेच सन्यास ( म्हणजे घर दार सोडुन जाणे ह्या अर्थाने ) हा शब्द वापरत नाही . उलट शंभर वर्शे जगणयाची इच्छा धरुन सर्व कर्मे निर्लिप्तपणे करत रहावीत असेच सुचवतो आणि पुढे जाऊन ह्याच्या शिवाय दुसरा पर्याय नाही असेही ठामपणे म्हणतो .
पण माणसाचे अगदी छोट्या छोट्या गोष्टीतही मन गुंतते हा एकदम सार्वत्रिक आणि सार्वकालिक अनुभव आहे . जडभरताची गोष्ट आपण ऐकलीच आहे !! आणि म्हणूनच बहुतेक आचार्यांनी ह्या सार्या मोहातुन जाताना कायम स्मरण रहावे म्हणुन जगन्मिथ्या म्हणले असावे की जेणे करुन ह्या मिथ्या मायेतुन बाहेर पडणे जास्त अवघड जाऊ नये !
जोवर चित्तशुध्दी होवुन ब्रह्मं सत्यम ही धारणा दृढ होत नाही तो पर्यंत चित्तस्य शुध्दये कर्मः करणे भागच आहे ! आणि एकदा का ही धारणा दृढ झाली की तेन त्यक्तेन भुञ्जीथा: म्हणुन त्यागपुर्वक अलिप्तपणे भोग घेत रहाणे किंव्वा जगन्मिथ्या म्हणुन संन्यास घेणॅ हा ज्या त्या साधकाचा चॉईस आहे असे मला वाटते ! कारण योगरतो वा भोगरतो वा संगरतो वा संगविहीनः । यस्य ब्रह्मणि रमते चित्तं नन्दति नन्दति नन्दति एव ||
माझ्या मते आचार्य आणि त्यांच्या नंतर झालेले सरेच अद्वैती संत सनातन वैदिक धर्माच्या मुळ सिध्दांतांना (ईशावायमिदं वगैरे ) आचरणात आणण्यासाठी सोपे आणि अधिक सोपे करत गेले असावेत. असा माझा आपला एक अंदाज आहे !
कळावे .
लोभ असावा.
आपला विनम्र
प्रगो
7 Jun 2016 - 11:14 am | शरद
सर्वसाधारण वाचकाला "ब्रह्म सत्य, जगत मिथ्या" एवढेच माहीत असते. त्यामुळे या अतिपरिचित विचारसरणीपेक्षा दुसरा, उलटा, विचारही उपनिषदात आहे एवढेच अधोरेखित करावयाचे होते. त्यामुळे परिचित पहिल्यांची; अपरिचित नंतर असे लिहले. बाकी यातील कालविपर्यास मान्यच. तुम्ही म्हणता ते कालदृष्ट्या बरोबरच.
" संन्यास"चा उल्लेख उपनिषदात नाही असे नाही. उदाहरणार्थ छांदोग्य अध्याय. दोन व तीन पहा. मुंडक(३.२.१०) मध्ये मुंडन केलेली व्यक्ती (म्हणजेच संन्यासी) हीच केवळ आत्मज्ञान-दीक्षेस सत्पात्र असल्याचा निर्देश दिसतो.
अद्वैती काय इतर कोणत्याही विचारवंतांना सामान्य लोकांकरिता आपल्या शुद्ध विचारसरणीला मुरड घालावी लागली आहे.
("माया" ह्या विषयावर एखादी लेखमाला सुरू करा ना !)
शरद
7 Jun 2016 - 11:20 am | यशोधरा
वाचते आहे.