===================================================================
उपनिषदे :
(१)... (२)... (३)... (४)... (५)... (६)... (७) उपनिषदांनी आम्हाला काय दिले ?... (८) ईशावास्योपनिषद...
(९) केनोपनिषद... (१०) अविद्या... (११) मुंडकोपनिषद... (१२) प्रश्नोपनिषद-१... (१३) प्रश्नोपनिषद-२...
(१४) कठोपनिषद-१... (१५) कठोपनिषद-२... (१६) ऊर्ध्वमूलमध:शाखमश्वत्थं...
===================================================================
कठोपनिषद
कठ (कठवल्ली) उपनिषद दशोपनिषदातील तृतीय असून मृत्यूसंबंधीच्या तत्वज्ञानामुळे, तत्वज्ञान उपनिषदातील श्रेष्ठ उपनिषदांपैकी एक समजले जाते. हे कृष्ण यजुर्वेदाच्या कठ शाखेचे उपनिषद असून प्रणेते ऋषी आचार्य कठ हे होत. आचार्य कठ हे वैशंपायन ऋषींचे एक प्रमुख शिष्य होते व त्यांच्या विशेष कर्तृत्वाने त्यांच्या अनुयायांची स्वतंत्र शाखा कठ नावाने सुविख्यात झाली. यांची वस्ती पंजाबात इरावती नदीच्या पूर्वेस हल्लीच्या अमृतसर शहराच्या आसपास होती. "कठ"चा रचनाकाल "मुंडक" व "श्वेताश्वतर" यांच्या बरोबरचा समजला जातो.
उपनिषदाचे दोन अध्याय (विभाग) असून प्रत्येक अद्यायामध्ये प्रत्येकी तीन वल्ली (उपविभाग) आहेत. एकुण मंत्रसंख्या (२९+२५ +१७ व १५+१५+१९) १२० आहे.
कठ हे गद्य-पद्यात्मक आहे. सुरवातीचा भाग गद्यात्मक असून नंतर सर्व पद्य आहे.
कथा
"नचिकेत" हा "वाजश्रवस्" ऋषींचा मुलगा. वडीलांनी केलेया यज्ञात, यजमानाने सर्व संपत्तीचे दान करावयाचे होते. मुलाने "मला तुम्ही कोणाला दान करणार ?" असे सारखे सारखे विचारल्याने पित्याने त्राग्याने "यमा"ला असे सांगितले. पित्याचे आज्ञेप्रमाणे नचिकेत यमगृही गेला. यम बाहेर गावी गेला होता. यमपत्नीने आग्रह केला तरी न जेवता नचिकेत तीन दिवस उपाशी राहिला. यम आल्यावर त्याने चौकशी केली व नचिकेतवर प्रसन्न होऊन तीन वर दिले. यम-नचिकेत संवाद म्हणजे "कठ" उपनिषद.
पहिले दोन वर किरकोळ होते पण "तिसरा वर माग" असे यम म्हणाल्यावर नचिकेत म्हणाला,
"काही लोकांच्या मते मृत शरीरात आत्मा असतो तर काहींच्या मते तो त्यात नसतो.त्या संशयाविषयीचे यथार्थ ज्ञान तू मला करून द्यावेस १.१.२०
:यम म्हणाला,"शहाण्या माणसांनाच काय देवांनाही याविषयी संशय आहे. तुला यातील काहीही कळणार नाही. तेव्हा तू या ऐवजी शतायुष्य, विपुल धन, मोठे राज्य, रथारूढ अप्सरा असे काहीही माग." नचिकेत म्हणाला " तू देऊ केलेल्या सर्व गोष्टी अनित्य, अल्पजीवी आहेत. अमर असलेल्यांच्या जवळ भूतलस्थ, जरामरणनयुक्त, परंतु विवेकी असा कोणता मानव अतिदीर्घ आयुष्य मागेल ? मला आत्म्याबद्दल ज्ञान दे. नचिकेतला दुसरे काही नको." .१.१.२९
नचिकेतचा आत्मज्ञानाबद्दलचा निश्चय पाहून यम प्रसन्न झाला व त्याने बोलावयास सुरवात केली.
श्रेयस्-प्रेयस् यांमधील फरक
"श्रेयस् ’व "प्रेयस् "असे आयुष्याचे भिन्न परिणामी दोन मार्ग आहेत. श्रेय मार्गाने जाणार्याचे कल्याण होते त्रर प्रेय मार्गाने जाणारा ध्येयापासून दूर जातो.
श्रेयस्श्च् प्रेयश्च् मनुष्यमेतस्तौ संपरित्य विचिनस्क्ति धिर: !
श्रेयो हि धीरोsभि प्रेयसो वृणीते प्रेयो मन्दो योगक्षेमात् वृणीते !! (१.२.२)
"श्रेयस् " व "प्रेयस् " ही दोन्ही मनुष्याकडे येतात. शहाणा माणुस त्यांना वेगळे करून "श्रेयस् ’ची निवड करतो तर मन्दबुद्धी मनुष्य शरीरधारणेला उपयुक्त अशा पशुपुत्रादींनीयुक्त अशा "प्रेयस् " ची निवड करतो.
इहलोकीच्या अनित्य वस्तूंमध्ये मन गुंतल्याने अविवेकी मनुष्य अपराध करतो आणि परलोकाचा मार्ग त्याला दिसत नाही. केवळ हाच लोक आहे, परलोक नाही, अशा समजुतीमुळे तो पुन्हा पुन्हा माझ्या ताब्यात येतो. १.२.६
आत्मविद्या-प्रशंसा
( त्या आत्म्याविषयीचे ज्ञान ) बहुतेक लोकांना ऐकण्याससुद्धा अप्राप्य आहे.पुष्कळांना ते ऐकूनही समजत नाही. ज्ञान सांगणारा कुशल्वक्ता दुर्लभ आहे.समजावून घेणाराही दुर्लभ.अणुएवढाच असल्याने तर्कबुद्धीने त्या विषयीचे ज्ञान थोडेसुद्धा होत नाही १.२.८-९
यमकृत आत्मन् चे वर्णन
आत्मा हा अनादि, अनाकलनीय, गुहेत निवास करणारा, पाहण्यास कठीण आहे. आचार्यांच्या कृपेने हे आत्मविषयक ज्ञान ऐकून आत्मा शरीरापासून वेगळा आहे असे जाणतो आणि आनंदमय आत्म्याच्या ज्ञानाने आनंदमय होतो. १.२.१३
आत्म्याचे नित्यत्वs
यम म्हणाळा "ते अविनाशी तत्व ब्रह्म होय.हे जाणले असता ज्ञात्याला ब्रह्म किंवा परतत्व यांपैकी ज्याची इच्छा असेल ते प्राप्त होते, १.२.१६.
हा धारणाशक्तियुक्त आत्मा कधीही उत्पन्न होत नाही. तो अनादि, चिरकाल टिकणारा आणि क्षयरहित आहे. शरीराचा नाश झाला असता नाश पावत नाही. जरी मारणार्याला वाटले की मी याला मारले व दुसर्याला वाटले की मी मेलो तरी दोघांनाही आत्म्याचे ज्ञान झालेले नसल्याने हा मारीतही नाही,तो मारला जात नाही, हे त्यांना कळत नाही.१.२.१९ (गीता पहा)
शरीरात निवास करूनही शरीररहित असलेल्या महान आणि व्यापक आत्म्याला जाणले असता बुद्धिमान मनुष्य शोकरहित होतो. १.२.२२
नायमात्मा प्रवचनेन लभ्यो, न मेधया न बहुना श्रुतेन !
यमेवैष वृणुते तेन लभ्यस्तस्यैष, आत्मा विवृणुते तनुस्याम् !! १.२.२३
आत्म्याविषयीचे ज्ञान केवळ कोणी सांगून मिळत नाही;.केवळ बुद्धीने वा पुष्कळ विचाराने मिळत नाही. जो केवळ आत्म्याचेच चिंतन करतो त्यालाच ते ज्ञान होते. स्वत: आत्माच स्वताविषयीचे ज्ञान त्याच्यासमोर प्रगट करतो
आत्म्याचे माहात्म्य
हा आत्मा एवढा मोठा आहे की ब्राह्मण व क्षत्रिय त्याचे भातरुपी अन्न आहे व साक्षात म्रुत्यू त्याचे तोंडी लावण्यासारखे आहे. १.२.२५
जीवात्मा आणि परमात्मा
स्वत: केलेल्या कर्माचे फळ भोगणारा "जीवात्मा" आणि हृदयस्थ परमात्मा हे दोघेही ऊन आणि सावली यांच्याप्रमाणे परस्परविरुद्ध असूनही संलग्न आहेत असे ब्रह्मज्ञानी म्हणतात. १.३.१
आत्म्याविषयीचे ज्ञान केवळ कोणी सांगून मिळत नाही;.केवळ बुद्धीने वा पुष्कळ विचाराने मिळत नाही. जो केवळ आत्म्याचेच चिंतन करतो त्यालाच ते ज्ञान होते. स्वत: आत्माच स्वताविषयीचे ज्ञान त्याच्यासमोर प्रगट करतो
रथरूपक
हे नचिकेता, आत्मा हा रथात बसलेला मनुष्य, शरीर हा रथ, बुद्धी ही सारथी व मन त्याचा लगाम आहे. इद्रियेही या रथाचे घोडे आहेत , तर विषय हे त्याचे जाण्याचे मार्ग आहेत. इंद्रिये व मन यांनी युक्त आत्म्याला संसारी मनुष्य म्हणावे. ज्याचे मन ताब्यात नाही, त्या मानवाची इंद्रिये सारथ्याला न आवरता येणार्या स्वैर अश्वांप्रमाणे त्याच्या ताब्यात रहात नाहीत. मन कोठे वळवावे हे जाणणार्या विवेकी मनुष्याची इंद्रिये ताब्यात रहातात.
इंद्रियजयामुळे ब्रह्मप्राप्ती
अविवेकी, चंचल आणि अपवित्र मनुष्याला ब्रह्मपद प्राप्त होत नाही. विवेकी, निग्रही व पवित्र मनुष्यच ब्रह्म पदाला पोचतो १.३.३ ते ९
उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान् निबोधत !
क्षुरस्य धारा निशिता दुरस्यया, दुर्गं पथस्तत् कवयो वदन्ति !! १.३.१४
(हे अज्ञानी पुरुषांनो), उठा, जागे व्हा. श्रेष्ठ अशा आचार्याकडे जाऊन आत्मज्ञान मिळवा. वस्तर्याची पाजळलेली धार दुर्लघ्य असते, तद्वत तवज्ञानाचा मार्ग कठीण आहे असे ज्ञाते म्हणतात.
शब्द, स्पर्श,रूप, रस, गंध व व्यय नसलेले अनादि, अनंत, महत आणि अचल असे आत्मतत्व जानले असता मनुष्य मृत्यूपासून मुक्त होतो.
"कठ" मधील पहिला अध्याय संपला. संक्षेपात आढावा दुसर्या अध्यायानंतर घेऊ.
शरद
प्रतिक्रिया
6 Aug 2016 - 7:59 am | यशोधरा
श्रेयस/ प्रेयसबाद्दल थोडे लिहायला हवे होते का?
आत्मा हा अनादि, अनाकलनीय, गुहेत निवास करणारा, पाहण्यास कठीण आहे >> शरीररुपी गुहेत?
कर्माचे फळ भोगणारा "जीवात्मा" आणि हृदयस्थ परमात्मा - ह्यांच्याबद्दल थोडे लिहा, अशी विनंती. ह्यांमधील फरक काय व भिन्न असूनही संलग्न कसे?
6 Aug 2016 - 8:13 pm | शरद
श्रेयस् आणि प्रेयस्
श्रेयस् म्हणजे अधिक चांगले, हितकारक, शुभ
प्रेयस् म्हणजे अधिक आवडते
जीवनात काही गोष्टी आवडत्या असतात व काही हितकर. आवडत्या गोष्टी हितकर असतातच असे नाही. उदा. मधुमेह असेल तर गोड खाऊ नये हे हितकर पण लोक आवडते म्हणून श्रीखंड चोपतातच.
यम सांगतो की "."आत्मज्ञान मिळवणे हे हितकारक. पण ते मिळवतांना तुम्हाला आवडणारे विषयसुख सोडावे लागेल. सामान्य मनुष्य विषयांच्या मागे धावतो. तो शरीरधारणेला उपयुक्त अशा पशुपुत्रादींनी युक्त अशा प्रेयस् ची निवड करतो. हे नचिकेत, प्रिय व सुखप्रद अशा इच्छांचा तू विचारपूर्वक त्याग केलास सामान्य माणसे ज्या चित्तमय मार्गात बुडून जातात, फसतात, रुततात तो मार्ग तू सोडून दिलास."
जीवात्मा व परमामा हे एकच. सर्व उपनिषदे हेच सांगतात. तेव्हा ते दोघे "संलग्न" आहेत हे उघड आहे. जीवात्मा शरीरात असतो तर परमात्मा विश्वात, हृदयातही. जीवात्म्याला परमात्म्याची ओळख पटत नाही कारंण दोहोंमधील अविद्येचा वा मायेचा पडदा. त्यामुळे परमात्मा हा प्रकाश (ऊन) म्हटले तर पडद्याआतील जीवात्मा सावली म्हणावयास हरकत नाही.
शरद
6 Aug 2016 - 8:15 pm | यशोधरा
मनापासून धन्यवाद!
6 Aug 2016 - 11:58 am | आदूबाळ
हायला! एवढं डोकं होतं तर पहिले दोन वर किरकोळ कशाला मागायचे?
6 Aug 2016 - 3:35 pm | प्रचेतस
नचिकेत यमाची कथा महाभारतातद्खील वाचल्याचे आठवतेय पण नेमक्या कुठल्या पर्वात ते लक्षात येत नाहीये.
6 Aug 2016 - 7:39 pm | शरद
यम-नचिकेताची महाभारतातील गोष्ट अनुशासनिकपर्व, अध्याय एकाहत्तरावा येथे दिली आहे. पण त्या गोष्टीत व येतील गोष्टीत थोडे फरक आहेत. उदा. नचिकेत हा उद्दालकिचा पुत्र असे दिले असून नदीत वाहून गेलेली सामुग्री नचिकेताने आणली नाहीत म्हणून वडीलांनी त्याला " तू यमपुरीची वाट धर " असा शाप दिला. वगैरे. हे लोकप्रिय आख्यान ऋग्वेदातही आहे. (बहुधा वराह पुराणातही )
शरद..
6 Aug 2016 - 7:46 pm | प्रचेतस
हो बरोबर.
आता लक्षात आले.
7 Aug 2016 - 12:36 am | एस
हे उपनिषद माझे सर्वात नावडते उपनिषद आहे.