उपनिषदे-७ उपनिषदांनी आम्हाला काय दिले ?

शरद's picture
शरद in जनातलं, मनातलं
18 Jun 2016 - 3:22 pm

===================================================================

उपनिषदे :
(१)... (२)... (३)... (४)... (५)... (६)... (७) उपनिषदांनी आम्हाला काय दिले ?... (८) ईशावास्योपनिषद...
(९) केनोपनिषद... (१०) अविद्या... (११) मुंडकोपनिषद... (१२) प्रश्नोपनिषद-१... (१३) प्रश्नोपनिषद-२...
(१४) कठोपनिषद-१... (१५) कठोपनिषद-२... (१६) ऊर्ध्वमूलमध:शाखमश्वत्थं...

===================================================================

उपसंहार

आत्मा, ब्रह्म या संज्ञांप्रमाणे प्राण, सत्-असत् इत्यादींची माहिती देणेही आवडले असते पण उपनिषद-सागरातून किती घागरी उपसत बसलो तरी ते न संपणारे काम असल्याने आज उपसंहारात दोन तीन विषयाची चर्चा करू.
(१) एकं सद् विप्रा बहुधा वदन्ति ऋग्वेद १.१६४.४६
(२) विसंवादी मते
(३) उपनिषदांनी काय दिले ?

(१) एकं सद् विप्रा बहुधा वदन्ति
उपनिषदे ही काही कोण्या पंडिताने एखादा सिद्धात पटवून देण्याकरिता लिहलेले खंडन-मंडनात्मक
लेखन नव्हे अरण्यातील आश्रमात, मूलभूत पराविद्येचा-ब्रह्मविद्येचा शोध घेतांना, .ऋषींच्या मनात स्फुरलेल्या विचारांचे ते संकलन होय. हे उत्स्फुर्त विचार निरनिराळ्य़ा ठिकाणी, वेगवेगळ्य़ा काळात, अनेकांनी मांडले आहेत. त्यामुळे त्यांच्यात एकवाक्यता नाही. तसे शक्यच नव्हते. एकदाच असे घडले की उद्दालक आरुणि ह्या गुरूचे शिष्य याज्ञवल्क्य या दोघांनी अनुक्रमे छांदोग्य उपनिषद व ईशावास्य-बृहदारण्यक ही उपनिषदे लिहली. याज्ञवल्क्यांनी आपल्या गुरूचे पटलेले विषय शिरोधार्य मानले पण स्वत:चे स्वतंत्र विचारच आपल्या लेखनात मांडले. ऋग्वेदात म्हटले की "एकच सत् " विद्वान अनेक प्रकारांनी वर्णतात. त्याला अग्नि, यम वायू असे संबोधितात. मागील "महावाक्ये" या लेखात आपण पाहिले की "आत्मा-ब्रह्म यांचे एकत्व " ही कल्पना चौघांनी चार प्रकारे वर्णिली. असे हे विचारही कोणी गद्यात मांडले, कोणी पद्यात तर कोणी गद्य-पद्यात. कुठे प्रश्न व त्यांची उत्तरे सरळसरळ दिली आहेत तर कुठे प्रश्न विचारले आहेत असे धरून त्यांची उत्तरेच दिली आहेत..आता काय झाले आहे की या वेगवेगळ्या विचारसरणींमुळे काही विसंगती समोर येतात. त्याचाही विचार करावयास पाहिजे.

(२) विसंवादी मते

आज मी फक्त दोन तीन महत्वाचे मुद्दे येथे देणार आहे.

(१) ब्रह्म हे अविकारी आहे असे सार्वत्रिक मत आहे. हे जर स्विकारले तर छांदोग्य (३.१४.१) "सर्वं खल्विदं ब्रह्म....." येथे स्पष्टच म्हटले की हे सर्व चराचर जग ब्रह्ममय आहे. ब्रह्मातच याची उत्पत्ती, स्थिती व लय होतो.
आता ह्या दोन गोष्टी परस्परविरोधी वाटतात की नाही ? एकदा जगाला "ब्रह्म" म्हटले की त्याची उत्पत्ती वा लय कसे शक्य आहे ? असो. इथे यात फार वेळ न मोडता पुढे जावू.

(२) जगदोत्पत्ती हा असाच एक चक्रावणारा विषय आहे. ऋग्वेदातील नासदीय सूक्तात म्हटले आहे जगाच्या मूलारंभी "सत्" ही नव्हते आणि "असत्" ही नव्हते. सर्वत्र काळोख एखाद्या महासागराप्रमाणे भरून राहिला होता.
हाच धागा उचलून तैत्तिरीय उपनिषदात (२.७.१) म्हटले आहे "आरंभी हे सारे जग "असत्" होते. त्यापासून "सत्" झाले. त्यातून हे जग निर्माण झाले. ठीक. आता छांदोग्य (६.२.१,२,३) काय म्हणते ते पाहू. आरुणी म्हंणतात " बाळा, उत्पत्तीपूर्वी केवळ "सत्" होते. काही (विद्वान) म्हणतात, त्यापूर्वी केवळ "असत्" च होते. त्या "असत्" पासून "सत्" झाले. परंतु बाळा, असे कसे असेल ? "असत्" पासून (अभावापासून) "सत्" (भाव) कसे निर्माण होईल ? म्हणून हे बाळा, (उत्पत्ति) पूर्वी "सत्" असावे. त्या "सत्"ला वाटले की आपण विविध रूपे धारण करावीत म्हणून त्याने तेजाची, तेजाने जलाची, जलाने अन्नाची ..इत्यादी. दोन अगदी एकमेकाविरोधी मते.

(३) आता "सत्" ने जग कसे निर्माण केले याबद्दलही एकमत दिसत नाही. आपण काही उपनिषदे काय म्हणतात ते पाहू

"छांदोग्य" प्रमाणे "सत्" ने प्रथम तेजाची निर्मिती केली. तेजापासून जल, जलापासून अन्न.(६,२,३)

"ऐतरेय" प्रमाणे आत्म्याने "अंभ"(जल), अंतरिक्ष", त्यात मेघ, त्याखाली पृथ्वी व त्याखाली जल (१,१,२)

"तैतरीय" प्रमाणे ब्रह्मा पासून आकाश निर्माण झाले, आकाशापासून वायू, वायूपासून अग्नि, अग्नीपासून जल, जलापासून पृथ्वी,,, पंचमहाभूतांपासून जग झाले. इथे महत्वाचे म्हणजे पंचमहाभूते "निर्माण केली" नसून "निर्माण झाली" आहेत. सहज निर्माण झाली, केलेली नाहीत मायावादी अद्वैतापेक्षा अधिक वास्तववादी. (२.१)

" मुंडक " प्रमाणे " कोळी तंतू उत्पन्न करतो व पुन्हा ते परत घेतो; किंवा पृथ्वीवर जशा औषधी (वनस्पती) निर्माण होतात ,शरीरावर जसे लव व केस उत्पन्न होतात, तसे अक्षरब्रह्मापासून जग निर्माण होते."

" प्रश्न " प्रमाणे प्रजापतीने तप केले.तप करून एक जोडपे उत्पन्न केले. रयि व प्राण ही त्यांची नावे होत. या जोडप्याने अनेक प्रकारची प्रजा निर्माण केली. (१.२.४).

आता आजच्या प्रमुख भागाकडॆ वळू

उपनिषदांनी आम्हाला काय दिले ?

(१) याज्ञिक कर्मकांडापासून मुक्तता दिली. स्वतंत्र विचार करावयास शिकवले. विचार स्वातंत्र्य दिले.
(२) परा (ब्रह्म) विद्येचा शोध घ्यावयाचा असेल तर जड जगापासून दृष्टि वळवून मनाकडे पाहिले पाहिजे हे शिकवले.
(३) शरीरसदृश देवापासून एकदम वेगळी अशी निर्गुण, निराकार ब्रह्माची कल्पना दिली.
(४) शरीरात आत्म्याची कल्पना केली.
(५) आत्मा व ब्रह्म यांचे एकत्व सिद्ध केले. त्यामुळे मी (एक वैयक्तिक माणुस) आणि ब्रह्मांड (आजुबाजूची माणसे व परिसर) यांच्यामध्ये एक दुवा निर्माण केला.

(६) उपनिषदांत ऋषींनी निरनिराळी मते मांडल्यामुळे पुढे दर्शने लिहणार्‍यांची फारच सोय झाली. सांख्य, योग, द्वैत-अद्वैत कोणतेही दर्शन घ्या. प्रत्येकाला आपल सिद्धांत मांडतांना पूर्वासूरींचे मत म्हणून एखादे तरी उपनिषद उर्धृत करता येवू लागले. वेदांचे ज्ञानकांड मानले गेलेले उपनिषद हाताशी असणे फार फार महत्वाचे होते. उपनिषदांना दर्शनांची "गंगोत्री" म्हणतात. आणि बौद्ध दर्शनासारखे अवैदिक दर्शनही ह्याला अपवाद नाही.

(७) "संन्यास" आश्रमाचा स्पष्ट निर्देश सर्व वैदिक व उपनिषत्साहित्यात प्रथम मुंडक उपनिषदांत आढळतो. संन्यासाश्रमाची प्रशंसा येथे केली आहे. भारतीय संस्कृतीत हे महत्वाचे पर्व आहे.

(८) नीती व आहार यांच्याबद्दल उपनिषदात बरीच चर्चा आहे. माणसाने नीतीमान असलेच पाहिजे हा आग्रह आहे. तीच गोष्ट "सत्या"बद्दल. सत्य हे सर्वश्रेष्ठ मानले आहे. "सत्यमेव जयति" हा संदेश आहे. आहाराचा .नेहमीच्या वागणुकीवर होणारा परिणाम सांगून योग्य आहाराचे महत्व वर्णिले आहे.

(९) कथा व संवाद
गोष्टी ह्या जनसामान्यांचा विरंगुळ्यचा एक भाग. तत्वज्ञानाच्या गहन अरण्यात त्या कोठून सापडणार? खरे आहे. पण उपनिषत्कारांनी तिथेही आपल्या प्रतिभेचा आविष्कार दाखविला. त्यांनी आपला विषय समजण्यास सोपा व्हावा व लक्षात पक्का रहावा म्हणून संवादरूपात उपनिषदे लिहली व त्यात भरपूर कथाही दिल्या.

(१०) उपनिषदांनी आम्हाला भगवत्गीता दिली.

एक सुरेख श्लोक आहे
सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनंदन:!
पार्थो वत्स: सुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं मह्त् : !
!

सगळी उपनिषदे म्हणजे जणु गाईच., त्यांची धार काढणारा गवळी (तो तर साक्षात श्रीकृष्ण). ते अमृतसमान दूध ,गीता. बुद्धीमान बाळ अर्जुन ,याने त्याचे सेवन केले.,
गवळ्याच्या पोराची कमाल पहा. निरनिराळी मते मांडणार्‍या उपनिषदांमधून एक सुसंगत सूत्र शोधण्याचा प्रयत्न करावायाचा होता. सर्वसामान्य लोकांकरिता (अर्जुन त्यातला एक) तो पार पडलाही. आज गीतेत तुम्हाला अनेक उपनिषदांचे स्रार एकत्र पहावयास मिळते

मित्र हो, मोठा अवघड विषय. खरे म्हणजे अभ्यासू माणसाला आयुष्यभर पुरणारा. पण येथील वाचकांना निदान तोंडओळख व्हावी एवढ्या माफक उद्देशाने लिहलेले हे लेख. गोड मानून घ्या.

शरद .

संस्कृतीमाहिती

प्रतिक्रिया

सर्वच संस्कृतीतील आदिम आदिवासी समाजाच्या विश्व, विश्व निर्मीतीच्या कल्पना मजेदार असतात. शिवाय अगोदर एक कल्पना निर्माण करुन मग दुसरी कल्पना मग दोहोंच्या मिश्रणातुन तिसरी याने हा सर्व कल्पनेचा खेळ रोचक होत जातो.
त्यावर आधुनिक दृष्टीकोणातुन चिंतन करण्याचा प्रयत्न मात्र या गमतीदार खेळाला गंभीर वळण देतो.
किंवा माझी कल्पना विरुद्ध तुझी कल्पना हा प्रकार सुरु झाला तर मग पहायलाच नको.
ब्रह्म छान कल्पना आहे. ती एवढी विशाल केलेली कल्पना आहे तिच्या व्याख्येत तिच्या अतिव्याप्त व्याख्येत सर्वच विरोध विसंगती पोटात घेऊन पचवण्याची क्षमता आहे.
ब्रह्म काय आहे हे ही आहे ते ही आहे अस ही तस ही हो ही नाही ही सब कुछ
एक अत्रेंच्या नाटकात अत्यंत गंभीर प्रश्न विचारण्यात येतो. हे अमुक अमुक अमुक कस ?]
त्याच त्याहुन गंभीर उत्तर देण्यात येत ते हे हे हे असं.
असो.

धनंजय माने's picture

18 Jun 2016 - 7:57 pm | धनंजय माने

अरेच्चा, असा सगळा प्रकार आहे तर!

प्रचेतस's picture

18 Jun 2016 - 6:14 pm | प्रचेतस

लेखमाला खूप आवडली.
त्रोटक वाटली अर्थात. सविस्तर जाणून घ्यायला नक्की आवडलं असतं.

अनुप ढेरे's picture

18 Jun 2016 - 8:39 pm | अनुप ढेरे

लेखमाला आवडली!

फारच त्रोटक वाटली. माझ्या दृष्टीने उपनिषदांचे सामाजिक-ऐतिहासिक अवकाशातले स्थान समजून घेणे आवश्यक होते. नंतर कधीतरी तुम्ही यावर भरपूर सविस्तर लिहाल अशी अपेक्षा नम्रपणे व्यक्त करतो. अर्थात हेही नसे थोडके.

निनाद's picture

21 Jun 2016 - 12:32 pm | निनाद

याआधीच्या भागांचे दुवे देता येतील का?

शरद's picture

21 Jun 2016 - 5:22 pm | शरद

उपनिषद -१ http://www.misalpav.com/node/36022
उपनिषद -२ http://www.misalpav.com/node/36095
उपनिषद -३ http://www.misalpav.com/node/36147
उपनिषद -४ http://www.misalpav.com/node/36284
उपनिषद -५ http://www.misalpav.com/node/36296
उपनिषद -६ http://www.misalpav.com/node/36376
शरद

निनाद's picture

28 Jun 2016 - 1:17 pm | निनाद

संकलित दुव्यांबद्दल धन्यवाद शरदजी!

प्रसाद गोडबोले's picture

28 Jun 2016 - 1:37 pm | प्रसाद गोडबोले

आदरणीय शरद सर,

लेखमालिका अत्यंत आवडली :)

आपला विनम्र
सीझर मार्कस ऑरेलियस अ‍ॅन्टोनियस ऑगस्टस्
Vi Veri Veniversum Vivus Vici