===================================================================
उपनिषदे :
(१)... (२)... (३)... (४)... (५)... (६)... (७) उपनिषदांनी आम्हाला काय दिले ?... (८) ईशावास्योपनिषद...
(९) केनोपनिषद... (१०) अविद्या... (११) मुंडकोपनिषद... (१२) प्रश्नोपनिषद-१... (१३) प्रश्नोपनिषद-२...
(१४) कठोपनिषद-१... (१५) कठोपनिषद-२... (१६) ऊर्ध्वमूलमध:शाखमश्वत्थं...
===================================================================
प्रश्नोपनिषद
प्रश्नोपनिषद हे दशोपनिषदातील चतुर्थ असून सृष्टीच्या मूलस्थानापासून परमात्म्याच्या स्वरूपापर्यंतच्या अनेक समस्यांचा उलगडा करणारे एक महत्वाचे उपनिषद आहे. हे अथर्ववेदाच्या पिप्पलाद शाखेचे उपनिषद असून प्रणेते महर्षी पिप्पलादच आहेत.
या उपनिषदाची रचना योजनाबद्ध, सुसंघटित व मुद्देसूद आहे. म. पिप्पलादांकडे आलेल्या सहा शिष्यांचे प्रश्न व त्यांची उत्तरे असे याचे स्वरूप आहे. प्रश्न वेगवेगळे वाटले तरी ते म. पिप्पलादांच्या "सृष्टीची उत्पत्ती" या विषयीचे तत्वज्ञान या संबंधितच गुंफलेले आहेत.
अथर्ववेदाची मुंडक व प्रश्न ही दोन उपनिषदे. मुंडक आधीचे व प्रश्न नंतरचे. प्रश्नचे स्पष्टीकरण जास्त प्रगत वाटते.
"प्रश्नोत्तररूपी उपनिषद" म्हणून "प्रश्न उपनिषद" हे नाव. हे गद्य उपनिषद असून मंत्रांना "वाक्य" म्हणून ओळखले जाते. प्रश्नानुसार सहा अध्याय असून (अनुक्रमे १६+१३+१२+११+७+८ असे) एकुण ६७ मंत्र आहेत.
तत्वज्ञान
उपनिषदात खालील विषय हाताळलेले आहेत.
(१) ब्रह्म आणि द्वंदाची उत्पत्ती.
(२) प्राणाचे महत्व.
(३) निद्रा आणि स्वप्नमीमांसा.
(४) गाढ झोप म्हणजे ब्रह्मानंद.
(५) ॐकार ध्यानाने पापमुक्ती.
(६) लिंग शरीरकल्पना.
(७) अद्वैतपूर्ण अमरत्ववाद.
(८) "माया" म्हणजे "भास".
एवढ्या प्राथमिक माहिती नंतर उपनिषदाकडे वळू. ऒळीने सहा प्रश्न व त्यांची उत्तरे पाहू.
(आज थोडी वेगळी पद्धत वापरणार आहे. संस्कृत श्लोक देणार नाही. नाही तरी ६७ मंत्र देणे शक्यच नव्हते. त्या ऐवजी प्रश्न व त्याचे उत्तर मराठीतच बघू. संस्कृतचा अडथळा नसल्याने थोडी सुलभता वाढावी.)
प्रास्ताविक
सुकेश, सत्यकाम, सौर्यायणी, कौसल्य, भार्गव व कात्यायन हे सहा आचार्य ’परब्रह्म" जाणून घेण्याच्या इच्छेने हातात समिधा घेऊन शिष्यभावाने भगवान पिप्पलादांना शरण गेले. म. पिप्पलादांनी एक वर्ष आपल्या आश्रमात ब्रह्मचर्य व्रताने राहण्यास सांगितले व "मग प्रश्न विचारा मला माहीत असेल तर मी उत्तर सांगेन" असे सांगितले.
लक्षात घ्या. हे नुकतेच मुंज झालेले बटू नव्हेत. अभ्यासू, ज्ञानसंपन्न आचार्य आहेत. तरीही आपल्याला नसलेले ज्ञान मिळवण्याकरिता ते शिष्यभावाने म. पिप्पलादांकडे हातात समिधा घेऊन गेले. समिधा घेऊन जाण्यात एक संकेत आहे. समिधा यज्ञाच्या अग्नीत हव्य म्हणून टाकतात. समिधा राख होऊन अग्नीशी एकरूपs होतात. गुरूकडे जाताना अनन्य शरणभावाने "स्व"त्व जाळण्याची तयारी पाहिजे. म.पिप्पलादही या आचार्य शिष्याशी विनयपूर्वक बोलतात.
प्रश्न १
कात्यायनाने प्रश्न विचारला, "हे भगवन, हे सर्व जीव कोणापासून निर्माण होतात ? "
हा जीव-जडात्मक संसार अनित्य आहे हे कळले तरी त्याला निर्माण कोणी केले हा प्रश्न आहे. या असार संसाराचा त्याग करावयाचे हे ठीक, पण आपण ज्याचा त्याग करणार त्याचीही माहिती पाहिजेच ना ? जीवापासून जड किंवा जडापासून जीव निर्माण होवू शकत नाही हे सहज कळतेच मग हे भिन्न भिन्न निर्माण केले तरी कोणी ? हा प्रश्न.
भ.पिप्पलाद उत्तर देतात ;
"प्रजापतीने तप केले व मग रयि व प्राण ही जोडी निर्माण केली. रयि म्हणजे अन्न व प्राण म्हणजे अग्नी (भोक्ता). प्रजापति म्हणजे आपण सर्वसाधारणपणे ब्रह्मदेव म्हणतो तो.थोडक्यात "निर्माता". रयि व प्राण ही जोडी अरिस्टॉटलच्या जड-चैतन्य या जोडीशी मिळती-जुळती आहे. पिप्पलाद यांनी पुढे अनेक द्वंदे दिली आहेत. उदा. आदित्य=प्राण तर चंद्र =रयि. देवयान प्राण तर पितृयान रयि भोक्ता असतो दिवस=प्राण तर रात्र= रयि, वगैरे आपण पहातो की जीव हा भोक्ता व जड हे भोग्य असे निसर्गात दिसते. "माणुस" (जीव =चेतन) "अन्न" (भोग्य वस्तु=अचेतन) चा उपभोग घेतो. त्यांनी असेही सांगितले की इष्टापूर्त (यज व दान करणारे) यांना चंद्रलोक मिळतो व ते परत जन्म घेतात. तप, ब्रह्मचर्य, ज्ञान याच्या सहाय्याने आत्म्याचा शोध घेणार्यांना आदित्यलोक म्हणजे मोक्ष मिळतो व ते परत जन्म घेत नाहीत.".
थोडक्यात ऊत्तर :"चेतन व अचेतन वस्तुंच्या मिश्रणातून सृष्टी निर्माण झाली व या उभय गोष्टीच सृष्टीचे मूलभूत तत्व होत."
(१) प्रजापतीने सृष्टी निर्माण केली ही "पौरुषेय" उपपत्ती झाली.
(२) तैत्तिरीय उपनिषदातही सृष्टीकर्त्याने तप करून मग द्वंदे ( निरुक्त-अनिरुक्त, विज्ञान-अविज्ञान, सत्य-अनृत,) निर्माण केली असेच म्हटले आहे पण ती द्वंदे (दिवस व रात्र, पितृयान-देवयान,सूर्य व चंद्र यापेक्षा) जास्त संयुक्तिक वाटतात.
प्रश्न २
भार्गव विचारतो, "भगवन्, किती देव प्रजेचे धारण करतात ? लोकांना प्रेरणा कोण देते ? त्यातील वरिष्ठ कोण ? "
वेदकाळात अनेक देवता होत्या. त्यांचे त्या काळातील श्रेष्ठत्व वगैरे सोडून जर आपण हा प्रश्न आज विचारला तर धारण करणंणारा विष्णू, प्रेरणा देणारा बुद्धिदाता गणपति, व तुम्ही ज्या पंथाचे आहात त्या प्रंमाणे हरि हर, देवी अशी उत्तरे मिळतील. पण उपनिषदकाली भ. पिप्पलाद यांनी तात्विक उत्तर दिले आहे. ते एका गोष्टीने सुरवात करतात. ते म्हणतात
" आकाश, वायू, अग्नि, जल, व पृथ्वी ही महाभूते व वाचा, मन, चक्षू व श्रोत्र ही इंद्रिये हेही देवच आहेत. ते देव प्रगट होऊन एकदा भांडण करू लागले की, आम्हीच हे शरीर धारण करतो. त्या इंद्रियांना श्रेष्ठ देव प्राण म्हणाला, " असे समजण्याचा वेडेपणा करू नका. मी स्वत:ला पाच प्रकारे विभागून या शरीराला बळक्टी आणतो." पण त्यांचा विश्वास बसला नाही.
तेव्हा प्राण शरीर सोडून निघाल्यासारखा झाला. प्राण बाहेर पडू लागताच डोळे वगैरे इंद्रिये निस्तेज झाली. मधाच्या पोळ्यातील राणी मक्षिका बाहेर पडताच सर्व मक्षिका बाहेर पडतात, तद्वत प्राण बाहेर पडताच शरीराची स्थिती झाली. तेव्हा वाचा, मन इत्यादि.सर्वांनी प्राणाचे श्रेष्ठत्व मान्य केले. त्यांनी प्राणाचे खालील प्रकारे स्तवन केले.
हा प्राण सूर्य, पर्जन्य, इंद्र, वायू, पृथ्वी, रयि म्हनजे अन्न, सत् व असत्, अमृत आहे. रथचक्रात आरे एकजीव झालेले असतात, तद्वत प्राणात सर्व इंद्रिये एकत्र झालेली आहेत. चारी वेद, ब्राह्मण, क्षत्रिय सर्व प्राणामध्ये प्रतिष्ठित आहेत. तूच इंद्र, रुद्र, तेजोनिधी सूर्य आहेस. त्रैलोक्य प्राणाधीन आहे. आईप्रमाणे तू आमचे पालन कर.आम्हाला लक्ष्मी व बुद्धी दे.".
भार्गवाच्या तीनही प्रश्नांचे उत्तर "प्राण".
प्राणाचे श्रेष्ठत्व सांगणारी कथा छांदोग्य व कौषीतकि उपनिषदांमध्येही दिली आहे. तेथे एकेक इंद्रिय वर्षभर शरीराला सोडून गेले तरी शरीराचे कार्य चालूच राहिले. डोळे नसले तरी आंधळा जगू शकतोच. पण प्राण बाहेर जाऊ लागल्यावर सर्व इंद्रिये निर्जीव झाली. अशी कथा दिली आहे. पण येथे इंद्रियांबरोबर पंचमहाभूतेही समाविष्ठ केली आहेत.
प्राण हा केवळ इंद्रियांचाच राजा नसून तो विश्वातील सर्व देवतांचा अधिपती आहे हे या उपनिषदाने स्पष्ट केले आहे.
प्रश्न ३
कौसल्य विचारतो, "भगवन्, हा प्राण कसा निर्माण होतो ? या शरीरात कसा येतो ? शरीरात विभागून कसा राहतो ? याचे बाह्य व अध्यात्म रूप कसे आहे ? "
प्राणाचे मह्त्व कळले, तो विश्वाचा आधार आहे हे ही कळले पण माझा प्राणाचा संबंध केव्हा येतो ? तो माझ्या शरीरात असतो, तेव्हा. आता कौसल्याला शरीर-प्राण संबंध जाणून घ्यावयाचा आहे.
भ. पिप्पलाद म्हणतात, "फार खोलातील प्रश्न विचारलास, पण तू मोठा ज्ञाता आहेस म्हणून मी उत्तर देतो.
हा प्राण आत्म्यापासून निर्माण होतो.माणसाच्या सावलीप्रमाणे मानसाच्या शरीरात प्राण व्यापलेला आहे. इच्छेने शरीरात प्रान येतो.
राजा अधिकारी नेमतो, त्याप्रमाणे प्राण नेत्रादि इंद्रियांची नेमणुक करतो.
गुद व जननेंद्रियाचे ठिकाणी "अपान", मध्ये "समान" व नाक व मुखनासिका येथे प्राण स्वत: राहतो. "व्यान" बहात्तर हजार नाड्यांमध्ये राहतो. यांमध्ये एक ऊर्ध्वगामी नाडी आहे त्यात ’उदान" प्राण असतो. तुमच्या पापपुण्याप्रंमाणे तो पापलोकात वा पुण्यलोकात जातो.पुंय-पाप समान असेल तर मनुष्यलोकाला जातो. आदित्य रूपाने बाह्य प्राण जगवतो. तो "समान" डोळ्याच्या द्वारा सर्व सृष्टी पाहतो. ’समान" "व्यान"शी जोडलेला आहे. तेज म्हणजे "उदान" ते नष्ट झाले की माणुस मरणोन्मुख होतो. मनात लीन झालेला प्राण पुनर्जन्म घेतो. ज्या विचाराने जीव मृत्यू पावतो, त्याच विचाराने जीव पुनर्जन्म घेतो. उत्पत्ती, संकल्प, स्थाने व व्यापकत्व आदि प्रकारचे प्राणाचे आध्यात्मिक स्वरूप जाणून मनुष्य अमर होतो "
कौसल्याने एका प्रश्नात चार प्रश्न विचारले आहेत. प्राण आत्म्यापासून निर्माण होतो हे फार महत्वाचे. आपण नेहमी ’पंचप्राण" म्हणतो त्यांची स्थाने व कामे येथे सांगितली आहेत.
(१) हटयोगातील लेखात आपण पाहिले होते की सन्याशाचा प्राण टाळूतील ब्रह्मरंध्रातून जातो अशी समजूत आहे. त्याचे मूल येथे दिसते.
(२) इतना तो करना स्वामी, जब प्राण तनसे निकले !
गोविंद नाम लेकर, प्राण तनसे निकले !!
ही प्रार्थना का ? कळले ?
आज तीन प्रश्न घेतले. पुढील भागात उरलेले तीन प्रश्न व एकुण उपनिषदाचा आढावा घेऊ.
शरद
प्रतिक्रिया
27 Jul 2016 - 8:51 am | यशोधरा
हा लेख अतिशय आवडला. धन्यवाद.
27 Jul 2016 - 2:18 pm | अत्रुप्त आत्मा
छान मांडणी..
पु. भा. प्र.
27 Jul 2016 - 2:38 pm | प्रचेतस
हा लेखही आवडला.
अथर्ववेदाचे असल्याने तुलनेने अलीकडचे असावे.
27 Jul 2016 - 4:14 pm | ज्ञानोबाचे पैजार
वाचतो आहे.
पुढचा भाग लवकर टाका
पैजारबुवा,
27 Jul 2016 - 7:51 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आवडला भाग. पुढील भागाच्या प्रतिक्षेत.
-दिलीप बिरुटे
27 Jul 2016 - 9:50 pm | Lalit Vartak
Can't manage to type correct Marathi, hence..
Do you intend to publish all your articles at one place as a booklet or so?
I have copied and printed all the articles, so far for my collection. pl let me know. Thanks and regards.