===================================================================
उपनिषदे :
(१)... (२)... (३)... (४)... (५)... (६)... (७) उपनिषदांनी आम्हाला काय दिले ?... (८) ईशावास्योपनिषद...
(९) केनोपनिषद... (१०) अविद्या... (११) मुंडकोपनिषद... (१२) प्रश्नोपनिषद-१... (१३) प्रश्नोपनिषद-२...
(१४) कठोपनिषद-१... (१५) कठोपनिषद-२... (१६) ऊर्ध्वमूलमध:शाखमश्वत्थं...
===================================================================
कठोपनिषद (२)
मनुष्य आत्मज्ञान मिळवण्याऐवजी ऐहिक सुखात का रमतो ? परमेश्वराने इंद्रियांना बहिर्मुख करून जणु त्यांना ठारच मारले आहे. आतील आत्म्याला पाहण्याऐवजी तो बाह्य सुखातच गुंतून रहातो. बुद्धिमान मनुष्य मात्र इंद्रियांना विषयसुखांपासून परावृत्त करून प्रत्यक्ष आत्म्याला पाहतो.
सर्व लोक ज्या आत्म्याच्या योगाने रूप, रस, गंध, शब्द, स्पर्श, मैथून इत्यादींना जाणतात, त्याच्याच योगाने आत्मज्ञान मिळविता येते. हेच नचिकेतने विचारलेले आत्मतत्व
या नंतरच्या ३-४ मंत्रात ह्या तत्वाचे विवरण आहे. अग्नि व ब्रह्म हे एकच आहेत. आत्मा हाच सूर्याचा व जगाचे अधिष्टान आहे. इहलोकी जे अविनाशी तत्व आहे तेच परमब्रह्मात आहे व जे परब्रह्मात आहे तेच इहलोकी आहे. ब्रह्माचे प्रकार अनेक नाहीत. ते एकमेव तत्व मनानेच जाणावे लागते.
शरीरामध्ये अंगुष्ठाएवढा पुरुष असतो.तो भूत-भविष्यावर सत्ता गाजवत असतो. त्याला जाणले असता देहाचे रक्षण करण्याची इच्छा रहात नाही. हा ज्योतीप्रमाणे धूमरहित असलेला पुरुष चिरजीवी आहे.
शुद्ध जलामध्ये शुद्ध जल टाकले असता ते एकरूप होते, त्याप्रमाणे ज्ञान प्राप्त झालेल्या मुनीचा आत्मा ब्रह्मस्वरूप होतो.
हा आत्मा आकाशात निवास करणारा सर्वगामी आदित्य आहे, अंतरिक्षातील वसु, कलशातील सोम आहे, मनुष्यांमध्ये, देवांमध्ये, जलामध्ये, पर्वतामध्ये, यज्ञामध्ये सर्वत्र हा सत्यरूप व महान आत्माच आहे.
नाशवंत शरीरधारी मानवाच्या देहातून आत्मा निघून गेला तर काहीच उरत नाही. माणुस प्राणवायूच्या योगाने नव्हे तर आत्म्याच्या योगाने जिवंत राहतो.
जन्म-मरणाच्या फेर्यात सपडलेल्या आत्म्याची अवस्था तुला सांगतो. काही मानव्चाच्या जन्मास येतात तर काही काही वृक्षादि स्थिरचर अवस्थेस प्राप्त होतात.
अग्नि एकच असतो, परंतु जगात प्रत्येक वस्तूमध्ये प्रवेश करून प्रतिवस्तूत राहिल्यासारखा वाटतो तसा आत्मा एकच असूनही प्रत्येक वस्तुमात्रात निवास करून त्याच्या बाहेरही राहतो.
सर्व भूतांच्या ठायी असलेला आत्मा जगातील दु:खांपासून अलिप्त असतो.
विविध रुपे धारण करणार्या आत्म्याला जे विचारवंत जाणतात ते आत्मज्ञानामुळे मुक्ती पावतात.
न तत्र सूर्यो भाती न चंद्रतारकं, नेमा विद्युतो भांति कुतोsयमग्नि: !
तमेव भान्तमनु भाति सर्वं तस्य भासा सर्वमिदं विभाति !! २.३.१५
त्या ब्रह्माच्या पुढे सूर्य प्रकाशित होऊ शकत नाही, तारे, चंद्र, वीज यांचाही प्रकाश पडू शकत नाही, मग अग्नीचा काय पाड ? तो प्रकाशित असल्यामुळे हे सर्व प्रकाशित दिसते. त्याचाच हे सर्व प्रकाशमान होते.
अश्वत्थवृक्ष रुपक
मूळ वर आणि शाखा खाली असा हा अश्वत्थ अनादि कालापासून आहे.तेच शुद्ध चैतन्य व तेच ब्रह्म होय. सर्व लोक त्याच्याच आश्रयाने आहेत. (गीता पहा)
याच्या भयामुळे अग्नि तापतो, सूर्य प्रकाशतो. याच्याच भयामुळे इंद्र, वायु कार्यरत होतात.
शरीराचा नाश होण्यापूर्वी जर इहलोकीच हे ब्रह्म कोणी जाणू शकला तर त्याला मुक्ती मिळते.
पंचमहाभूतांपासून निर्माण होणार्या इंद्रियांचे आत्म्यापासूनचे वेगळेपण जाणून बुद्धिमान माणुस शोकरहित होतो.
इंद्रियांपेक्षा मन श्रेष्ठ आहे, मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे, बुद्धीपेक्षा महान आत्मा श्रेष्ठ आहे. आत्म्याचे रूप दृश्य असत नाही, नेत्रांनी कोणी त्याला पाहू शकत नाही. मनाचे नियमन करणार्या बुद्धीने तो जाणता येणे शक्य आहे.
ज्यावेळी पाच ज्ञानेंद्रिये अंत:करणासह आत्म्याच्या ठायीच स्थिर राहतात, बुद्धी स्थिर राहते, त्या अवस्थेला श्रेष्ठ गती म्हणतात.श्रेष्ठ गतीला "योग" म्हणतात.
मानवी हृदयातून एकशे एक नाड्या निघाल्या आहेत. त्यातील एक सुषुम्ना नाडी मस्तकाचा भेद करून जाते. तिच्या द्वारे अंत:काळी प्राण गेला तर माणुस अमरत्व पावतो. उर्वरित नाड्यांतून गेला तर त्याला पुन्हा जन्म प्राप्त होतो.(काही सन्यास पंथांतील मृत देहाची कवटी फॊडण्याच्या
प्रथेचा उगम इथे असावा ?)
प्रेत झाल्यावर जीवात्म्याची स्थिती काय होते हा नचिकेतचा प्रश्न होता. या प्रश्नाचे उत्तर देताना यमाने जीवात्मा व परमात्मा यांचे स्वरूप समजावून सांगितले आहे. परमात्मा म्हणजे उपाधी रहित जीव व जीवात्मा म्हणजे उपाधीने युक्त परमात्मा असे सांगून पुढे शुद्ध आत्मस्वरूप म्हणजेच ब्रह्मस्वरूप होय व ते केव्हाही नष्ट होत नाही हे स्पष्ट केले.
तीन सिद्धांत :
(१) आत्मा आहे
(२) आत्म्यालाच आत्मा ओळखता येतो.
(३) आत्मा व परमात्मा हे भिन्न नसून एकच आहेत.
येथे कठ उपनिष्द संपले.
मित्रहो
आज उपनिषदांचा निरोप घेतो. या विषयावर स्वत: काही लिहण्याएवढा माझा अभ्यास नाही. परंतु मी चार ठिकाणी विद्वान लोकांनी लिहलेले गेली चाळीस वर्षे मोठ्या निष्ठेने वाचत आहे. कामात व्यग्र असल्याने ज्यांना इतका वेळ मिळणे अवघड आहे अशा मित्रांना , या विषयाचा परिचय करून द्यावा या लहानश्या इच्छेने हे लेख लिहले. सर्वश्री. डॉ. सिद्धेश्वरशास्त्री चित्राव, डॉ.श्री.द.देशमुख,, म.वा.वैद्य, पूज्य विनोबा व भारतीय संस्कृति कोश यांचा उपयोग करूनच हे लेख लिहले आहेत. चुका टाळण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केला आहे. तरीही कमतरता राहणारच, क्षमस्व,
शरद
प्रतिक्रिया
13 Aug 2016 - 8:52 pm | डॉ सुहास म्हात्रे
सुलभ शब्दांत उपनिषदांची तोंडओळख करून देणारी ही लेखमालिका खूप आवडली. संकृत न येणार्या आणि प्राचीन ग्रंथ क्लिष्ट वाटणार्या पण तरीही त्यांच्याबद्दल कुतुहल असणार्या लोकांसाठी ही मालिका पर्वणीच आहे.
अनेक धन्यवाद, शरदजी !
14 Aug 2016 - 1:51 am | आदूबाळ
लेखमाला फार आवडली.
ही काय भानगड आहे? याचे उल्लेख अनेक ठिकाणी वाचले आहेत पण नीट काही झेपलं नाही.
14 Aug 2016 - 6:54 am | प्रचेतस
संक्षिप्त स्वरूपातली एक उत्कृष्ट लेखमाला.
उपनिषदांवरच लेखन थांबवू नये. ब्राह्मणं, आरण्यकांवरही लिहावे ही विनंती.
14 Aug 2016 - 8:12 am | यशोधरा
उत्तम लेखमालिका. ह्या सर्व लेखांसाठी मनापासून आभार.
14 Aug 2016 - 9:55 am | एस
वरील प्रतिसादांशी सहमत. फार छान लेखमाला.
14 Aug 2016 - 11:05 am | दिगोचि
तुम्ही लिहिलेले मी हळुहळू वाचत आहे. कठोपनिशदाच्य पहिल्या भागाची लिन्क पाठवाल का? मला सापदला नाही तो भाग. धन्यवाद.
14 Aug 2016 - 11:24 am | शरद
http://www.misalpav.com/node/36887
शरद
16 Aug 2016 - 4:17 pm | टिके
लेख आवडला . उपनिषदांवर सोप्या इंग्लिश मध्ये लिहिलेले पुस्तक सुचवू शकाल का?
17 Aug 2016 - 10:00 am | शरद
नाही हो मराठीतले वाचतांना अडचणी येतात, तेव्हा मला इन्ग्रजी काय बोडक्याचे कळणार. आपल्याला मराठी पुस्तके मिळण्याबद्दल नक्कीच करता येइल. सोपे इंग्लिश ? नाही बा.
शरद
17 Aug 2016 - 4:28 am | अर्धवटराव
मालिका फार छान झाली.
यातलं बरचसं (किंवा काहिच) कळत नसताना देखील केवळ तत्कालीन ऋषीमुनींच्या उत्तुंग प्रतिभेचा अविष्कार म्हणुन हे वाचायला बरं वाटतं
17 Aug 2016 - 7:49 am | क्षमस्व
मालिका खूप आवडली।
काही गोष्टी डोक्यावरून गेल्या पण त्याला इलाज नाही।
पण इतकं विस्तृत लेखन इतक्या सोप्या शब्दात मांडल्याबद्दल धन्यवाद।
17 Aug 2016 - 11:45 am | ज्ञानोबाचे पैजार
लेखमाला अतिशय आवडली हेवेसांन
अजून विस्त्रुत लिहिले असते तरी सुध्दा ते वाचायला आवडले असते.
कधी वेळ मिळाला तर जरुर लिहा.
पैजारबुवा,