===================================================================
उपनिषदे :
(१)... (२)... (३)... (४)... (५)... (६)... (७) उपनिषदांनी आम्हाला काय दिले ?... (८) ईशावास्योपनिषद...
(९) केनोपनिषद... (१०) अविद्या... (११) मुंडकोपनिषद... (१२) प्रश्नोपनिषद-१... (१३) प्रश्नोपनिषद-२...
(१४) कठोपनिषद-१... (१५) कठोपनिषद-२... (१६) ऊर्ध्वमूलमध:शाखमश्वत्थं...
===================================================================
उपनिषदे (२)
अंतरंग भाग-१
वैदिक समाज सुखसमाधानी, आरोग्यसंपन्न, उत्साही होता.. इहलोकातील सुखे मिळत होती व यज्ञ करून परलोकातील सुखांची सोय करून ठेवावयाची खात्री होती. पण या समाजातील काही विचारवंतांना हे पुरेसे नव्हते. सुखे क्षणभंगुर आहेत, समोर दिसणारे जगही नश्वर दिसत होते. आणि जगाची सुरवात कशी झाली असावी, कुणी निर्माण केले हे जग, तो निर्माता, असा कोणी असलाच तर, कसा असेल, असल्या प्रश्नांना यज्ञसंस्थेत उत्तर नव्हते. ऋग्वेदातील नासदीय सूक्त, "पुरुष" या कल्पनेत वरील प्रश्नांना स्पर्श केलेला आढळून येतो. या विषयांचा पा॒या घेऊन उपनिषत्कालिन ऋषींनी आपल्या तत्वज्ञानाची भव्य इमारत उभी केली. वेदातील ह्या कल्पनांचा विकास पुढे उपनिषदांनी केला असला तरी यज्ञसंस्थेबद्दल मात्र त्यांना अजिबात आदर नव्हता. त्या काळाला अनुसरून, कटकटी नकोत, म्हणून त्यांनी बोलावयाचे टाळले. पण सगळ्यांनी नव्हे, एखादा कोपर्निकस निघतोच. उपनिषदात "यज्ञ म्हणजे फुटक्या नौका" इतक्या कडक शब्दात यज्ञकर्माबद्दल तुच्छता दाखविली आहे.
सृष्टी, धर्म आणि नीति या तीन गोष्टींवर ऋषींचे लक्ष केंद्रित झालेले होते. यावर विचार करतांना जड जग कामाचे नाही हे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी आपली दृष्टी आंत, मनाकडे वळवली. धर्म व नीति यांबद्दल हे ठीक दिसते पण सृष्टी...... नाही पटत ? मग सांगा; आज Big Bang सिद्धांताने शास्त्रीय जगात खळबळ माजवली, पण त्या सिद्धाताचा उगम कोण्य़ा वर्तमानकालिन ऋषीच्या मनांत जागृत झालेल्या स्फुल्लिंगातच आहे तीन हजार वर्षांपूर्वी "नासदीय सूक्त" लिहणार्या, अरण्यात राहणार्या. अनामिक ऋषीलाही तसेच काही स्फुरले. आज आपण Big Bang आधी काय होते त्याचे पटणारे उत्तर देऊ शकत नाही. पण त्या अनामिकाने त्या॒चाही विचार केला, त्याच्या मनांत डोंगराआडून उगवणार्या सूर्याप्रमाणे, संपूर्ण विश्व उत्पन्न करणारे "ब्रह्म" हा विचार जन्मास आला. या विश्वनिर्मीतीच्या गूढ प्रक्रीयेबद्दल ऋषी इतका साशंक होता की तो म्हणतो " हे जे काही होते ते त्या "ब्रह्मा"लाच माहीत असेल किंवा... त्यालाही माहीत नसेल " सर्वात्मक "ब्रह्मा"लाही माहीत नसेल म्हणण्यात विचाराची झेप कुठे पोचली आहे हे लवकर लक्षात येत नाही. पण पुढील विचारवंतांना, पार ज्ञानेश्वरांना, त्याची भुरळ पडली आहे.
आत्मज्ञान किंवा ब्रह्मज्ञान हा उपनिषदांचा प्रधान प्रतिपाद्य विषय आहे. जरा ह्या आत्मा व ब्रह्म यांच्याबद्दल थोडेसे जाणून घ्यावयाचा प्रयत्न करू.
निसर्गातील कोणतीही प्रचंड वस्तू सजीव मानण्याची वृत्ती नाहीशी होऊन प्रत्येक गोष्टीचा तात्विक भूमिकेवरून विचार करण्याची पद्धत उपनिषदांनी स्विकारली. त्यामुळे " ज्याचे ज्ञान झाले असता बाकी सर्वाचे ज्ञान होते असे तत्व कोणते" असा प्रश्न मुंडक उपनिषदात विचारला गेला व सर्व उपनिषदांत त्याचा पाठपुरावा केला गेला. उदाहराणार्थ "सोन्याचे ज्ञान झाले तर सर्व अलंकारांचे ज्ञान होते" वा "सर्व लोखंडी अवजारांचे ज्ञान प्राप्त करून घ्यावयाचे असेल तर लोखंडाचे ज्ञान प्राप्त करून घ्या" हे मूलज्ञान म्हणजे आत्मज्ञान. आता ईश्वरप्राप्तीपेक्षा आत्मज्ञानाची ओढ लागली."शरीरातील चैतन्य नष्ट झाल्यावर काय कायम राहते तसेच गाढ निद्रावश झाले असता कोणते तत्व जागृत राहून स्वप्नसृष्टी निर्माण करते "(कठ उपनिषद) असला विचार आता करू लागले. दुसरा असाच एक प्रश्न (बृहदारण्यक उपनिषद)काव्यात्मक भाषेत विचारला आहे ."मृत्युरूपी काळ्या लाकुडतोड्याने तोडला असता पुन:पुन्हा जोराने वाढणार्या या जीववृक्षाचे खरे मूळ कोणते ?" याज्ञवल्क्यांनी ठाम उत्तर दिले "देहाच्या मृत्यूनंतर केवळ "आत्मा" जीवित राहतो " हे झाले जडातील अध्यात्मिक्त तत्वज्ञान..
कवितेच्या रसग्रहणात आपण पाहिले कीं अनोळखी शब्दांचे अर्थ आधी समजावून घेतले तर मग पुढचे काम सोपे होते. आधी आत्मा, ब्रह्म, प्राण, प्रणव, सत्-असत्, यांच्याबद्दल माहिती घेऊ.
आत्मन् ; हा शब्द वेदांत येतो पण बव्हंशी त्याचा अर्थ "अहम्" असा आहे.तसेच आत्मन् म्हणजे चैतन्य, जीवनशक्ती, प्राण, जीव असेही म्हटले आहे. या सगळ्यांचा उपयोग उपनिषत्साहित्याने केला आहे.
वेदांत अंतिम सत्याचा उल्लेख "पुरुष" किंवा ब्रह्म या संज्ञेने केला आहे. विश्वशक्तीला "देव" म्हणून भजू लागल्यावर त्याच्याशी आपले अभेद नाते आहे असे मनुष्य मानू लागला. बघा ना, बरेच लोक आमचे पूर्वज कृष्ण वंशातले, राम वंशातले असे म्हणतातच ना ? तसेच आत्मन् चे म्हणजे स्वत:चे या विश्वशक्तीशी म्हणजे "ब्रह्म"शी अभेदत्व आहे अशी एकदा कल्पना केली की आत्मा-ब्रह्म एकच झाले. बृहदारण्यकोपनिषदात "ब्रह्मभावश्चाहमात्मा ब्रह्म" (आत्मा ब्रह्म आहे) असा स्पष्ट उल्लेख केला आहे. सर्वव्यापी ब्रह्म जेव्हा व्यक्तीत असते तेव्हा त्याला आत्मा म्हणावयाचे. असा हा आत्मा शरीरात वास करतो त्याला काही मानसिक अवस्थांचा अनुभव येत असावा..मांडुक्य उपनिषदात जागरत्, स्वप्न्, सुषुप्ती व चौथी स्वसंवेद्य अश चार अवस्था वर्णिल्या आहेत. स्वसंवेद्य म्हणजेच तुरीय. या अवस्थेतील आत्म्याला अदृष्ट, अग्राह्य, अचिंतनीय, शिव, अद्वैत अशी अनेक विशेषणे दिली आहेत.
ऐतरेयोपनिषदात आत्मा हे जगाचे आदिकारण अथवा मूलतत्व असून त्याच्यापासूनच सृष्टीची उत्पत्ती झाली असे सांगितले आहे. प्रथम " ब्रह्म" व नंतर आत्मा असे म्हणून दोघांना एकच काम, आदिकारण, दिले की दोघेही एकच झाले.निरनिराळ्या ठिकाणी हा विचार मांडला आहे. "तत् त्वमसि " (छांदोग्योपनिषद) वा "सोsहमस्मि" यातही हेच सांगितले आहे,
थोडक्यात
(१) देहातील अविनाशी तत्च =आत्मा;
(२) विश्वातील अविनाशी तत्व =ब्रह्म;
(३) आत्मा-ब्रह्म यांच्यात भेद नाही.
हे ब्रह्म-आत्मा यांच्यातील अद्वैत, द्वैतवादी लोकांना आवडले नाही. त्यांनी प्रत्यगात्म्याला. "जीवात्मा" व ब्रह्माला "परमात्मा" अशा दोन संज्ञा दिल्या.
वरील पन्नास ओळीतील सार चार वाक्यात असे:
(१) देहातील अविनाशी तत्वाला म्हणावयाचे आत्मा,
(२) ब्रह्म आणि आत्मा याच्यात अभेद ,
(३) तूच आत्मा आहेस
(४) आत्मसाक्षात्कार हे परमलक्ष.
आत्म्यालाच जाणून मनुष्य मृत्यूच्या पलिकडे जातो. मोक्षप्राप्तीसाठी यापेक्षा निराळा मार्ग नाही. (श्वेताश्वतर उपनिषद )
(जरा मदत पाहिजे. जर एका आत्मा या विषयावर एवढे घडाभर तेल जाळले तर पुढील लेख उगीचच वाढत जातील. ब्रह्म, प्राण, प्रणव, सत-असत,... तर काय म्हणतोय, संक्षेपात लिहावे का ? तसा विषय अवघड असल्याने उदाहरणे देऊन सागावा लागतो. जर लेख लहान करावा असे सांगितलेत तर सूत्रमय लिहता येईल. काय करावे ?)
शरद
प्रतिक्रिया
20 May 2016 - 9:03 am | गणामास्तर
सरांच्या प्रतिक्षेत.
20 May 2016 - 9:12 am | यशोधरा
वाचून समजून घ्यायचा प्रयत्न करत आहे, जमल्यास अजूनही विस्ताराने लिहा, अशी विनंती.
20 May 2016 - 9:14 am | सतिश गावडे
भारतीय तत्वज्ञानाची छान ओळख होत आहे. तुमच्या लेखनावरुन डॉ. सर्वपल्ली राधाक्रिष्णन यांचे याच विषयावरील इंग्रजी लेखन आठवते.
मला वाटते तुम्ही सविस्तरच लिहावे. आत्मा ही संकल्पना भारतीय तत्वज्ञानाचा गाभा आहे. त्यामुळे जेव्हढे लिहता येईल तेव्हढे उत्तम.
20 May 2016 - 9:48 am | एस
अधिक विस्ताराने लिहा.
20 May 2016 - 1:20 pm | प्रसाद गोडबोले
आदरणीय शरद सर,
शि.सा.न.वि.वि,
लेख निवांतपणे वाचला. खुपच सुरेख ! पुढील काही शंका मनात उद्भवलेल्या आहेत , कृपया त्यांचे निराकरण करावे :
१)
संदर्भ ? ह्या वाक्याला संदर्भ काय ? माझा अल्पस्वल्प माहीती नुसार यज्ञांमध्ये बहुतांश करुन "इदं न मम" म्हणुन अग्नीत आहुती देतात , अर्थात मी माझे ही आसक्ती सुटावी ह्या साठी केलेली यज्ञ ही एक अप्रतिम साधना आहे. उपनिषदे शुध्द ज्ञानाचे समर्थन करतात हे मान्य , मात्र यज्ञांचा निषेध केल्याचे अजुन तरी माझया वाचनात आलेले नाही !
२)
ह्यावरुन तर सरळ सरळ असे दिसत आहे की श्रीमदाद्य शंकराचार्यांचा शुध्द अद्वैत सिध्दांतच उपनिशदांना मान्य आहे , मग पुढील चार महान आचार्यांचे सिधांत कोणत्या पायावर उभे रहातील ? मला हा प्रश्न अगदी लहान पणा पासुन पडत आहे की अहंब्रह्मास्मि , तत्वमसि , अयमात्मा ब्रह्म वगैरे महावाक्ये अगदी स्पष्ट पणे अद्वैतचाचा उध्घोष करत असताना इतर आचार्यांचे सिध्दांत , द्वैत , द्वैताद्वैत , विषिश्ठाद्वैत वगैरे उभे राहिलेच कसे?
माझ्य्या मते सुत्रमयता जास्त महत्वाची गोष्ट आहे , लेख छोटे छोटे करावेत , पण अधे मध्ये कधी आत्मा विषयावर जास्त स्पष्टीकरण लिहायचे झाले तर छोटेखानी पुरवणी लेख जोडता येतील ! अर्थात हे माझे मत !!
आणि दुसरी एक छोटी रिक्वेस्ट आहे , उपनिषदांच्या सविस्तर अभ्यासाला सुरुवात करण्या पुर्वी एक अति संक्षिप्य असा लेख लिहाल का की ज्यात उपनिषद , श्लोकांची संख्या , छद , कोणत्या वेदाचा भाग आहे ते , आचार्यांचे काही विशेष भाश्य , आणि उपनिषदाचा विषय आणि मांडणी कशी आहे इत्यादी ?
( इशावास्य्पनिषद वगळता कोणतेही उपनिषद सविस्तर अभ्यासले नसल्याने अन्य १७ उपनिषदांविषयी प्रचंड कुतुहल आहे एस्पिशीयली ती नचिकेताची गोष्ट कोणत्या उपनिषदात येते त्या !!)
लेख मनापासुन आवडला आहे , पुढील लेखांची वाट पहात आहे.
कळावे .
लेभ असावा .
आपला विनम्र
प्रगो
20 May 2016 - 4:37 pm | शरद
(१) यज्ञ म्हणजे फुटक्या नौका... मुंडक उपनिषद १.२.७
प्लवा ह्येते अदृढा यज्ञरूपा,,
सगळा श्लोक देण्याऐवजी मराठी भाषांतर देतो.
सोळा ऋत्विज, यजमान ब पत्नी मिळून अठराजनांनी करावयाचे यज्ञरूप निकृष्ट कर्म संसारसागर तरून जाण्याला धोक्याच्या नावेसमान आहे. अज्ञानी लोक त्याचा आश्रय घेतात. त्यांना जरा-मृत्यू पुन:पुन्हा प्राप्त होतो.
(२) यज्ञात आहुती देताना "इदं न मम" म्हणावयाचे असले तरी यज्ञ हा मुख्यत: इह व पारलौकिक सुखांसाठीच केला जातो.शतपथ ब्राह्मणात (२.२.१.६) सांगितले आहे "यज्ञ यजमानाची पापे जाळतो. त्यामुळे यजमानाला ब्रह्मतेज, संपत्ती आणि सुख मिळते." काम्य यज्ञात उत्तम पाऊस पडावा, शत्रूंचा नाश व्हावा अशा कारणांकरिता याग सांगितले आहेत, यज्ञाचे अध्यात्मिक स्वरूप किंवा पारमार्थिक अर्थ सामान्य माणसांकरिता नसणार हे उघड आहे.
(३) ऊपनिषदे अद्वैतवादीच. श्रीमदाचार्य शकरांनी उपनिषदांपासून तो घेतला. उपनिषदांवर टीकाही लिहल्या. (उलटे नव्हे.)
(४) उपनिषदांत अद्वैत आहे म्हणून सर्वांनी ते स्विकारले पाहिजे असे मुळीच नाही. त्यावर निराळे लेख लिहावयास पाहिजेत.
(५) लेखांच्या स्वरूपाबद्दल आपल्या सूचनांचा नक्कीच विचार करीन, धन्यवाद
शरद
20 May 2016 - 7:48 pm | आनन्दा
वैदिक काळातले यज्ञ बहुतकरून इंद्रादी देवांसाठी होत असत. आणि ते बहुतांश काम्य असत. परंतु उपनिषदांनी अद्वैत मत स्थिर झाल्यावर जे यज्ञ होऊ लागले म्हणजे बहुधा पुराणकाळातले, तोपर्यंत इंद्रादी देवांचे महत्व कमी होऊन पंचायतन प्रभृती देवता स्वीकारल्या गेल्या होत्या, त्या वेळेस यज्ञांचे स्वरूप देखील निष्काम होते. आज होणारे याग बहुतांश वेळेस काम्य असतात, पण निष्काम लोकांना देखील तेच याग निष्काम भावनेने करण्याची मुभा धर्माने दिलेली आहे,
हे बहुधा संक्रमणकाळातील असेल.
बाकी इदं न मम, म्हणजे हे माझे नाही, मी तुला दिले. आता हे माझे नाही याचा अर्थ "ते माझे नाही" असा होत नाही अर्थात "हे मी तुला दिले, या बदल्यात तु मला ते दे" असा होऊ शकतो.
बाकी शरदकाका, उपनिषदांवरील लेखात आत्मा आणि माया आली नाही तर चुकल्याचुकल्यासारखे वातेल, त्यामुळे लागेल तेव्हढा वेळ त्याला जाऊ द्या असे मला वाटते.
21 May 2016 - 3:35 pm | शरद
श्री. आनंदाजी,
आत्मज्ञान म्हणजे उपनिषद व उपनिषद म्हणजे आत्मज्ञान. तेव्हा उपनिषदावरील सर्व लिखाण आत्म्याभोवतीच घुटमळणार. पण "माया" मात्र स्वेताश्वतर उपनिषदाशिवाय मला कुठे आढळली नाही. तेव्हा "माया" या विषयावर येथे काही लिहले जाईल असे मला वाटत नाही. क्षमस्व. आपण म्हणता तो पुराणकाळ उपनिषत्कालानंतर काही शतकांनी आला. शरद’
24 May 2016 - 3:50 pm | मारवा
काम्य यज्ञात उत्तम पाऊस पडावा, शत्रूंचा नाश व्हावा अशा कारणांकरिता याग सांगितले आहेत, यज्ञाचे अध्यात्मिक स्वरूप किंवा पारमार्थिक अर्थ सामान्य माणसांकरिता नसणार हे उघड आहे.
यज्ञ मुळात इतका लौकिक कारणांसाठीच जर आहे तर त्याचे अध्यात्मिक स्वरुप सामान्यांकरीता नसणार अस विरोधी विधान करण्याचा अर्थच नाही समजला. एकतर ते काम्य आहेत लौकीक इच्छेसाठी वगैरे आहेत. असेच जर आहे तर त्यात आध्यात्मिक अर्थ स्वरुप मुळात येतेच कसे व त्यावर ते सामान्याकरीता नाहीत असे कसे?
यज्ञ तुमच्या मते गुढ आध्यात्मिक सामान्य माणसाच्या आकलाना पलीकडचे आहेत की
सामान्य काम्य क्रिया आहेत ज्या कुठल्याही आदीम समाजात कुठल्याना कुठल्या स्वरुपात आढळतात.
24 May 2016 - 4:02 pm | मारवा
ऊपनिषदे अद्वैतवादीच. श्रीमदाचार्य शकरांनी उपनिषदांपासून तो घेतला. उपनिषदांवर टीकाही लिहल्या. (उलटे नव्हे.)
हे मान्य आता शंकराचार्य त्यांच्या ब्र्ह्मसुत्र भाष्यात यज्ञात होत असलेल्या प्राणी हिंसेचे जे समर्थन करतात. ते त्यांचे समर्थन व्यक्तीगत मानावे की उपनिषद संमत मानावे ?
म्हणजे उपनिषद व अद्वैत चा प्रभाव असुनही शंकराचार्यांसाठी प्राणीहिंसा समर्थनीय कशी ?
मग त्यामानाने ज्ञानेश्वर ( त्यांची यज्ञसंस्थेवर केलेली टीका व प्राणीहिंसेचा विरोध पाहता) तुलनेने संवेदनशील व आधुनिक आहे असे मी म्हणालो तर ते गैर होइल काय ?
24 May 2016 - 7:46 pm | शरद
यज्ञातील कर्मकांडांचा भाग समजावून सांगण्याकरता ब्राह्मणे लिहली गेली. त्या काळी (इ.स.पूर्व२०००, अंदाजे) आर्य संस्कृत बोलत होते. म्हणजे संस्कृत येत असतांनासुद्धा संहितांचा खरा अर्थ कळणे सोपे जात नव्हते. आध्यात्मिक अर्थ तर अवघडच. काम्य यज्ञ जेव्हा सुरू झाले तेव्हा सर्वसामान्य लोक प्राकृत बोलत व संस्कृत फक्त उच्च वर्णियांकरता उरले होते.(बघा:संस्कृत नाटके). अशा वेळी राज्यकर्ते किंवा धनिक लोक आध्यात्मिक अर्थ जाणणे शक्यच नव्हते. काम्य यज्ञ म्हणजे उद्देश इहलोकीच्या फायद्याकरता. ह्याचा अर्थ यज्ञप्रक्रिया निराळी असा नव्हे. काम्य यज्ञ प्राकृतात होत नव्हते. आजचे उदाहरण घ्या. लग्नात भटजी म्हणतात किंवा दिवसांकरता म्हणतात त्या संस्कृताचा अर्थ शिकलेल्या किती लोकांना कळतो ?
उपनिषदांनी यज्ञसंस्थेला विरोध केला आहे. आद्य शंकराचार्यांनी यज्ञातील हिंसेचे समर्थन केले असेल(मला माहीत नाही, ब्रह्मसूत्रावरील टीका वाचण्याइतके माझे संस्कृतचे ज्ञान नाही ) तर ते वैयक्तिक मत म्हणावयास हरकत नाही. एखाद्या ग्रंथातील एखादा भाग तुम्हाला मान्य आहे याचा अर्थ त्या ग्रंथातील सर्व विचार तुम्हाला मान्य आहेत असे नाही. अद्वैताचा झेंडा फडकवणारे आद्य शंकराचार्य निनांतसुंदर भक्तीरचना करतातच. आणि सर्वाभूती एकच आत्मा आहे म्हणाणारे आजचे शंकराचार्य दलितांना कशी वागणुक देतात ?
तुमच्या कोणत्याही म्हणणे :"गैर" आहे किंवा "गैर नाही" असा शेरा मारावयास मी कोण?
शरद
24 May 2016 - 8:15 pm | मारवा
अहो ती एक आपली बोलीभाषेतली शैली असते तसे म्हणालो होतो की असे असे समजा तर असे गैर म्हणावे काय ?
त्यात जाणुन घेणे इतकाच हेतु होता. त्याहुन अधिक नाही.
एखाद्या ग्रंथातील एखादा भाग तुम्हाला मान्य आहे याचा अर्थ त्या ग्रंथातील सर्व विचार तुम्हाला मान्य आहेत असे नाही
आपला हा विचार फार आवडला.
आपण मुळ ग्रंथ वाचला नाही त्यामुळे माझे मत पुढे विस्ताराने मांडण्यात अडथळा येतो.
तरी मनापासुन धन्यवाद आपल्या प्रतिसादासाठी
24 May 2016 - 8:33 pm | प्रचेतस
खूप सुंदर प्रतिसाद.
शरदकाका,लिहित जा अशा विषयांवर.
25 May 2016 - 11:57 am | प्रसाद गोडबोले
+१ प्रतिसाद आवडला.
हा विचार खुपच सुंदर आहे .एखाद्या लेखातील एखादा भाग तुम्हाला मान्य आहे याचा अर्थ त्या लेखातील सर्व विचार तुम्हाला मान्य आहेत असेही नाही
शिवाय संस्कृताचे भाषांतर करतानाच कित्येक अर्थ निघतात मग विवरण करावयाचे झाल्यास अजुनच जास्त अर्थ निघु शकतात उदाहरणार्थ प्लवा ह्येते अदृढा यज्ञरूपा ह्याचा अर्थ शरद सर उपनिषदांनी 'यज्ञसंस्थेला विरोध केला आहे ' असा काढतात पण मला वाटते हा विरोध नसुन केवळ त्यातला (काम्य कर्मातील) केवळ फोल पणा दाखवला आहे . अशाच अर्थाचे श्लोक भगवद्गीतेतही येतात =
यामिमां पुष्पितां वाचं प्रवदन्त्यविपश्चितः ।
वेदवादरताः पार्थ नान्यदस्तीति वादिनः ॥ २-४२ ॥
कामात्मानः स्वर्गपरा जन्मकर्मफलप्रदाम् ।
क्रियाविशेषबहुलां भोगैश्वर्यगतिं प्रति ॥ २-४३ ॥
भोगैश्वर्यप्रसक्तानां तयापहृतचेतसाम् ।
व्यवसायात्मिका बुद्धिः समाधौ न विधीयते ॥ २-४४ ॥
त्रैगुण्यविषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन ।
निर्द्वन्द्वो नित्यसत्त्वस्थो निर्योगक्षेम आत्मवान् ॥ २-४५ ॥
गीता सरळ सरळ सांगते की वेद त्रैगुण्य विषय आहेत , अर्जुना तु ह्यां सर्वांच्या पार जा ...पण ह्याचा अर्थ गीता यज्ञ संस्थेचा निषेध करते असा होत नाही .
ह्या निमित्ताने गीतेतील हा भन्नाट श्लोक आठवला
न कर्मणामनारंभान्नैष्कर्म्यं पुरुषोऽश्नुते ।
न च सन्न्यसनादेव सिद्धिं समधिगच्छति ॥ ४ ॥
नुसती कर्मे केल्याने नैष्कर्म्य प्राप्त होत नसते अन नुसत्या सन्यासाने समाधी प्राप्त होत नसते , नुसती उपनिषदे वाचुन किती जणांना कळाणार आहेत ? ती आचरणात आणायला काहीतरी डॉक्टराईन हवाच ... माऊली म्हणतात तसे
देखैं उत्प्लवनासरिसां । पक्षी फळासि झोंबें जैसा ।
सांगैं नरु केवीं तैसा । पावे वेगा ? ॥ ४१ ॥
तो हळूहळू ढाळेंढाळें । केउतेनि एके वेळे ।
तया मार्गाचेनि बळें । निश्चित ठाकी ॥ ४२ ॥
तैसे देख पां विहंगममतें । अधिष्ठूनि ज्ञानातें ।
सांख्य सद्य मोक्षातें । आकळिती ॥ ४३ ॥
येर योगिये कर्माधारें । विहितेंचि निजाचारें ।
पूर्णता अवसरें । पावते होती ॥ ४४ ॥
नुसते सांगितल्याने सर्वांनाच उपनिषदोक्त तत्वज्ञान कळेल असे नाही , सर्व सामान्य जनांना कळण्यासाठी काही ना काही कर्मकांडाची , यज्ञसंस्थेची जोड असणे मला तरी आवश्यक वाटते ! यज्ञाथात्कर्मणोऽन्यत्र लोकोऽयं कर्मबन्धनः ।
तदर्थं कर्म कौन्तेय मुक्तसङ्गः समाचार वगैरे वगैरे
अवांतर :
ह्याला संदर्भ काय ?
अतिअवांतर : सर्वोपनिषदो गाव: दोग्धा गोपालनंदन: | पार्थो वत्स: सुधी: भोक्ता दुग्धं गीतामॄतं महत् || अशी आमची श्रध्दा आहे तस्मात गीतेचे संदर्भ दिले म्हणुन कोणी "विषयांतर झाले" असे म्हणणार नाही अशी आशा करतो !
25 May 2016 - 2:15 pm | मारवा
नु
सते सांगितल्याने सर्वांनाच उपनिषदोक्त तत्वज्ञान कळेल असे नाही , सर्व सामान्य जनांना कळण्यासाठी काही ना काही कर्मकांडाची , यज्ञसंस्थेची जोड असणे मला तरी आवश्यक वाटते !
यज्ञसंस्थेत पुरुषमेध अश्वमेध गोमेध सौत्रामणी यांचाही समावेश होतो.
यज्ञसंस्थेत शमिता सवित्र ही येतात
ही सर्व केवळ आत्मोन्नती साठी विशुद्ध बौद्धीक उन्नयना ची केवळ निरुपद्रवी साधने होती असे आपल्याला वाटते का ?
यामागे प्रचलित समाजव्यवस्था वर्गीय हितसंबंध राजकीय आर्थिक प्रवाहांचा कुठलाच परीणाम प्रभाव नव्हता असे आपल्याला वाटते का? त्यातील नियमांमध्ये झालेले बदल त्यातील सिम्बॉलिझम त्यातील कृत्ये ही एका आयसोलेटेड झोन मध्ये होत होती का ?
मुळात या संस्थेवर इतक्या बाजुंनी चार्वाक जैन बौद्ध उपनिषदे इतकी प्रखर टीका का झाली असावी ? याचा किमान आपण कधीतरी विचार करुन पाहावा असे सुचवितो.
असो
28 Jun 2016 - 11:53 pm | डॉ सुहास म्हात्रे
अत्यंत समतोल व वैचारीक प्रतिसाद !
एखाद्या ग्रंथातील एखादा भाग तुम्हाला मान्य आहे याचा अर्थ त्या ग्रंथातील सर्व विचार तुम्हाला मान्य आहेत असे नाही.
हे तर खास आवडले !
20 May 2016 - 3:22 pm | प्रचेतस
लेख उत्तम,
प्रगोचा प्रतिसादही आवडला.
20 May 2016 - 5:41 pm | स्पा
वाचतोय
24 May 2016 - 4:13 pm | सस्नेह
विस्ताराने तर लिहाच, शिवाय पुष्ट्यर्थ उपनिषदातले श्लोक दिले तर आणखी उत्तम होईल.
25 May 2016 - 1:25 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सर, लेखन वाचतोय, लिहित राहा.
-दिलीप बिरुटे