===================================================================
उपनिषदे :
(१)... (२)... (३)... (४)... (५)... (६)... (७) उपनिषदांनी आम्हाला काय दिले ?... (८) ईशावास्योपनिषद...
(९) केनोपनिषद... (१०) अविद्या... (११) मुंडकोपनिषद... (१२) प्रश्नोपनिषद-१... (१३) प्रश्नोपनिषद-२...
(१४) कठोपनिषद-१... (१५) कठोपनिषद-२... (१६) ऊर्ध्वमूलमध:शाखमश्वत्थं...
===================================================================
अंतरंग (२)
आत्मा
मागील भागात आपण पाहिले की ."शरीरातील चैतन्य नष्ट झाल्यावर काय कायम राहते तसेच गाढ निद्रावश झाले असता कोणते तत्व जागृत राहून स्वप्नसृष्टी निर्माण करते "(कठ उपनिषद ) आणि मृत्युरूपी काळ्या लाकुडतोड्याने तोडला असता पुन:पुन्हा जोराने वाढणार्या या जीववृक्षाचे खरे मूळ कोणते ? (बृहदारण्यक उपनिषद ) या दोन प्रश्नांची उत्तरे देण्याकरिता "आत्मा " निर्माण झाला. याला केवळ "अमर" करून भागण्यासारखे नव्हते.
सुरवातीला आत्मा शब्दाचा प्रयोग वस्तूची सत्ता किंवा एकता अशा अर्थी होत असे. पण पुढे त्याला सातत्यभावाची जोड देण्यात आली. साततत्व म्हणजे अखंडपणा. अस बघा; रावणाकडॆ सत्ता होती पण अखंडत्व नव्हते. ज्यांना आपण अमर म्हणतो ते देवही कल्पांती नाहिसे होतात. आत्म्याला सत्ता आहेच पण सातत्यही आहे.
या दोन विचारांच्या आधारे तत्वविचार सुरू ,झाला. आज आपण भिन्न भिन्न उपनिषदे व दर्शने यांनी "आत्म्या" बद्दल काय म्हटले आहे ते पाहू.
" नायमात्वा प्रवचनेन लभ्यो न मेधया न बहुधा श्रृतेन " (कठ.१.२.२२)
आत्मा केवळ प्रवचनाने, कुशाग्र बुद्धीच्या साहाय्याने किंवा बहुश्रुतपणाने प्राप्त होत नाही. (त्यासाठी साधना करावी लागते.)
आत्मसाक्षात्कार हे मानवी जीवनाचे श्रेय मानले आहे.
" तमेव विदित्वाsतिमृत्युमेति नान्य:पन्था विद्यतेsयनाय " (श्वेता.२.८)
त्यालाच (आत्म्यालाच) जाणून मनुष्य मृत्यूच्या पलिकडे जातो. मोक्षप्राप्तीसाठी यापेक्षा निराळा मार्ग नाही.
" ऋते ज्ञानान्न मुक्ती: " ज्ञानावाचून मुक्ती नाही. स्वरूपाचा सक्षात्कार होण्यासाठी केवळ अध्ययन व्यर्थ आहे. ध्यानयोग व तत्वज्ञान यांचाच आधार घेतला पाहिजे
आत्मज्ञानासाठी पुढील सद्गुणांची आवश्यकता आहे.
सत्येन लभ्यस्तपसा ह्येव आत्मा सम्यग्ज्ञानेन ब्रह्मचर्येन नित्यम् !! (मुंडक ३.१.५)
सत्य, तपोचरण,सम्यग्ज्ञान व अखंड ब्रह्मचर्य या गुणांनी आत्मबोध होतो.
.
आत्मा प्रशस्ति
हा सूक्ष्म आत्मा फक्त मनाला कळतो. त्यात पंचप्राण आहेत. त्या प्राणांनी चित्त व्यापलेले आहे. त्या शुद्ध चित्तात आत्मा प्रगट होतो.
(मुंडक ३.१.९)
ब्रह्मज्ञस्थिति
यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसा सह !
आनंदं ब्रह्मणो विद्वान् न विभेति कुतश्चन !! (तैतरीय.३.४.१)
वाणी आणि मन जेथे पोहोचू शकत नाहीत, असा हा ब्रह्मानंद भोगणारा, निर्भय "मनोमय कोश" आहे.
परब्रह्मविद्या
आत्माच एक प्रथम होता.दुसरे काही नव्हते.चलनवलन नव्हते. आत्म्याने विचार केला, लोक उत्पन्न करावेत. (ऐतरेय.१.१,१)
(गाढ झोपेत) पक्षी आपल्या घरट्यात एकरूप होतात, तद्वत इंद्रियसमूह झोपेत आत्म्यात एकरूप होतो. (प्रश्न. ४.७)
सर्व लोक ज्या आत्म्याच्या योगाने रूप, रस,गंध,शब्द व स्पर्श आणि मै थुन इत्यादींना जाणतात, त्याच्याच योगाने आत्मज्ञानही मिळवता येते. मग काय उरले ? (काही नाही) हेच नचिकेतसने विचारलेले आत्मतत्व होय.(कठ.४.३)
तत्त्वमसि
स च एषोsणिमैतदात्म्यमिद सर्वम् ! तत्सत्यम् ! स आत्मा ! तत्त्वमसि ! ( छांदोग्य.६.१३.३)
तोच हा सूक्ष्मस्वरूपी आत्मा होय. हे सर्व सदात्मक आहे, तेच सत्य होय. व तो आत्मा तूच आहेस.
पुरे, नाही का ? आता दर्शने काय म्हणतात तेही बघू..
लोकायत चैतन्यविशिष्ठ देहाला आत्मा समजतात.
माध्यमिक बौद्धांच्या मते आत्मा म्हणजे शून्य होय.
जैन लोक जीवतत्त्वाला आत्मा समजतात.
न्याय-- आत्मा नित्य व विभुद्रव्यविशेष आहे.आत्मे व मने अनेक आहेत.
तांत्रिकांच्या मते विश्वोत्तीप्रकाशात्मक आहे.
अद्वैत -- (प्रत्यगात्मा) चैतन्यरूप, कर्तृत्व-भोक्तृत्वविरहित व परब्रह्माहून अभिन्न आहे.
आज आपण उपनिषदांमध्ये आत्म्याबद्दल आलेल्या निरनिराळ्या वचनांतील काही माहिती पाहिली. त्यावरून लक्षात येईल की निरनिराळ्या दृष्टिकोनातून आत्म्याचे वर्णन केले आहे. तसे कळावयास फार अवघड नाही. परंतु काही शंका असल्यास अवष्य विचारा. उत्तर देण्याचा प्रयत्न करीन पुढील भागात "ब्रह्म" बद्दल माहिती घेऊ.
शरद
प्रतिक्रिया
24 May 2016 - 8:38 pm | प्रचेतस
हा भागही आवडला. अर्थात थोडासा त्रोटक वाटला.
ह्यातला बराचसा भाग थोड्याफार फरकाने महाभारतातही येतो. तो महाग्रंथ पाचवा वेद म्हणवला जातो ते उगाच नाही.
24 May 2016 - 9:19 pm | सतिश गावडे
"मी" या जाणिवेभोवती माणसाने केव्हढे कल्पनाविश्व उभे केले..
25 May 2016 - 12:53 am | अर्धवटराव
खरच :)
25 May 2016 - 10:09 am | सतिश गावडे
डॉ. ईयान स्टीव्हन्सन यांच्या पुनर्जन्मावरील केस स्टडीज मी वाचल्या आहेत. तरीही जोपर्यंत ते सारे वैज्ञानिक निकषांवर उतरत नाही तोपर्यंत मी त्याचा "कदाचित असू शकेल" एव्हढाच विचार करतो. :)
24 May 2016 - 9:22 pm | यशोधरा
हा भाग अजून विस्ताराने वाचायला आवडले असते.
24 May 2016 - 11:52 pm | रमेश भिडे
>>>असा हा ब्रह्मानंद भोगणारा, निर्भय "मनोमय कोश" आहे.
ह्याचा नेमका काय अर्थ म्हणे?
25 May 2016 - 12:29 pm | प्रसाद गोडबोले
सुंदर लेख !
चार्वाक जैन बौध्द हे वेदांच , पर्यायाने उपनिषदांचे प्रामाण्य नाकारतात , तस्मात त्यांची कोणतीच मते उपनिषदांशी जुळणारी नसतील याचा साधारण अंदाज आहे पण बाकी च्या दर्शंनांचे काय ? न्याय्य दर्शनाचे मत तर सरळ सरळ उपनिषदोक्त अद्वैताच्या विरोधात दिसते ! इतर दर्शनांचे काय ? सांख्य ? योग ? वैशेषिक ? मीमांसा ?
ह्यातील आत्म्याला सत्ता आहे ह्या विधानाला आधार काय ? माझ्या अल्पस्वल्प वाचना नुसार आत्म्याला सत्ता वगैरे काहीच नाही ,
तंव शिष्य म्हणे जी ताता । ’माया चाले स्वरूपसत्ता’ ।
’अरे सत्ता ती तत्त्वता । माया जाण’ ॥२१ ॥
तरी मायेनें स्वइच्छा असावें । स्वरूपसत्तेनें नसावें ।
मनास आलें तैसें करावें । हें केविं घडे ? ॥ २२ ॥
आत्म्याला सत्ता वगैरे आहे असे वाटणे ही सुध्दा मायाच !!
जें जालेंचि नाहीं सर्वथा । तयावरी निर्गुणाची सत्ता ।
ऐसें हें ज्ञातेपणें बोलतां । तुज लाज नाहीं ॥ २५ ॥
असो आपण म्हणाला तसे की माया ह्या श्ब्दाचा उल्लेख उपनिषदात क्वचितच येतो , असे असल्यास उपनिषदे आत्म्याला सत्ता वगैरे कर्तृत्व लावुन निरुपाधी कसे ठेवतात हे जाणुन घेण्यास उत्सुक आहे .
पुढील लेखांच्या प्रतिक्षत -
आपला विनम्र
प्रगो
25 May 2016 - 6:02 pm | शरद
आत्म्याला (किंवा ब्रह्माला म्हणा) सत्ता नाही असे म्हणणे उचित नाही. फार संदर्भ देण्याऐवजी एकच उदाहरण घेऊ. आत्म्याचे वर्णन एका वाक्यात करावयाचे असेल तर ते असे " आत्मा सत्, चित्, आनंद रूप आहे". सत म्हणजे सत्ता, जे आहे ते, नुसते आहे ते नव्हे तर जे कधी नाहिसे होत नाही ते. नित्य असणारे सत म्हणजे अक्षर, अविनाशी. असत म्हणजे जड, चित म्हणजे जाणीव जाणीव असेल तरच ज्ञान होऊ शकते. तेव्हा चित म्हणजे ज्ञान असे म्हणावय़ास हरकत नाही आत्मा आनंदरूप मानला आहे. दु:खाचे निरसन वा एखाद्या इंद्रियाचे तर्पण करणारे सुख हा जीवाला जगात मिळणारा आनंद असतो. तो सापेक्ष आहे, क्षर आहे आत्मवस्तूचा आनंद हा सहज आणि निर्निमित्त असतो. अमृतानुभवात छान माहिती मिळते. .
लेख लहान असावेत म्हणून उपनिषदांतील (व दर्शानांतील) उदाहरणे वानगी दाखल देतो. छांदोग्य-बृहदारण्यक यांतील संदर्भ द्यावयाचे म्हटले तर ... मारुतीची शेपटीच होईल.
मनोमय कोश आपण तैत्तिरीय उपनिषदामध्ये बघू.