.
.
- काही नवे करावे म्हणून - भाग १
- काही नवे करावे म्हणून - भाग २
- काही नवे करावे म्हणून - भाग ३
- काही नवे करावे म्हणून - भाग ४
- काही नवे करावे म्हणून - भाग ५
- काही नवे करावे म्हणून – भाग ६
- काही नवे करावे म्हणून - भाग ७
- काही नवे करावे म्हणून - भाग ८
- काही नवे करावे म्हणून - भाग ९
- काही नवे करावे म्हणून - भाग १०
- काही नवे करावे म्हणून - भाग ११
- काही नवे करावे म्हणून -भाग १२
- काही नवे करावे म्हणून - भाग १३
- काही नवे करावे म्हणून - भाग १४
- काही नवे करावे म्हणून - भाग १५
काही नवे करावे म्हणून- भाग१६.
पातेरेमामा सचिनला निरोप द्यायला त्याचा घरी गेले आणि आम्ही आंबे उतरायचे झेले, मोठे हारे, दोऱ्या इ. सामुग्री घेऊन आम्ही बागेत पोचलो.
बागेत प्रवेश केला आणि मीच काय ,पण सुरेखाचे यजमानही दचकले”हे काय?हे काय?’’असे म्हणत झाडांजवळ जाऊन पाहू लागले.मीही त्यांच्यासोबत पाहू लागले चार दिवसांपूर्वी पाहिलेल्या चाळीस पन्नास तयार फळांचा पत्ता नव्हता.चोरी झाली की काय?मी तर अवाकपणे नुसतीच पाहत होते.काहीच सुचत नव्हते.
इतक्यात पातेरेमामा आले.” म्हणाले,सचिनच्या आजीन् सांगाताल्यान् की,तो रत्नागिरीस गेलो हाय आणि त्याचो मामा काल आलेलो त्यास साचिनान् भेट देवच्यासाटी काल आंबे उतरलान् म्हणून.”
(क्रमशः)
***********************************************************************************
पातेरेमामांचे बोल माझ्यावर विजेसारखे कोसळले.त्याच क्षणी कोणी माझ्यावर बर्फाचे थंड पाणी ओतले आहे असा भास होत होता.मी सुन्नबधिर झाले होते.विश्वासघाताचा इतका सहज फटका मला चांगलाच हादरवून गेला होता.माझे शरीर संतापाने थरथर कापू लागले.
संताप माझ्यासाठी नवा नव्हता,ही बाग घेतल्यापासून. इतके प्रसंग घडले होते संताप देणारे,मी त्यातून बरेच काही शिकले होते.पण ओठ आणि पेल्यात असणारे कमी अंतर इतके जास्तही असू शकते हे जाणवून देणाऱ्या या प्रसंगाने मला हादरवून सोडले होते हे निश्चित .
एरवी मयूच्या प्रतिक्रियांकडे लक्ष देऊन त्याचा संताप थोपवणारी मी.पण आज माझे त्याच्याकडे लक्षच नव्हते.तरातरा बागेबाहेर पडणाऱ्या मयूला थोपवत नवऱ्याने त्याचे लक्ष माझ्याकडे वेधले होते.तो माझ्याजवळ येऊन माझ्या खांद्यावर हात ठेऊन म्हणाला,”ताई, तू काळजी नको करूस.तो कुठे जाईल जाऊन जाऊन?”
नवऱ्याने शांतपणे सुरेखाने दिलेली थंडगार पाण्याची बाटली माझ्यापुढे धरून मला पाणी पिण्यासाठी खुणावले.ते थंड पाणी घोटाघोटाने माझ्या तनामनाला शांतवू लागले.मी थोडी भानावर येऊन विचार करण्यासाठी सज्ज झाले.व्हायचे घडून गेले होते,त्यातून मार्ग क्लाढणे आवश्यक होते आणि त्यासाठी मला शांत डोक्याने विचार करणे आवश्यक होते.
शेखर म्हणजे आमचा राखण्दारही कुठे दिसत नव्हता.सुरेखाचे यजमानही गप्प झाले होते.त्यांना दोष देण्यात काहीच अर्थ नव्हता आणि त्यांनी साची हे काम कसे करेल याबाबतीत ग्वाहीही दिली नव्हती. म्हटलं,”चला.आजच्या मुहूर्तावर तोडा करायला आलोय ना आपण,बघूया,सचिनने आपल्यासाठी काही काम ठेवलंय का ते?”
“पण,ताई....”ते विमनस्क स्थितीत बोलूही शकत नव्हते.
माझ्या नवऱ्याने त्यांच्या खांद्याभोवती हात लपेटून त्यांना जवळ घेतले.
त्या एकाच कृतीने ते थोडे निवळले.त्याच्या लक्षात आलं की, जे घडले आहे,त्याचा दोष आम्ही त्यांना देणार नाही.माझ्या नवऱ्याने त्यांना सांगितलं,”काळजी करू नका.यातून तुमची ताई बरोबर मार्ग काढेल.तिला थोडा वेळ द्या.तीही हादरली आहे.” मग आम्ही दोन्ही बागातून फिरून दीड डझन फळे तोडली.गुढीपाडव्याचा मुहूर्त तर साधला.
किती फळे तोडली गेली आहेत याचाही अंदाज सर्व झाडांची पाहणी केल्यामुळे आला.
इतक्यात शेवंता चहा नाश्ता घेऊन आली.सुरेखाही माझ्यासाठी कॉफी घेऊन आली,तिला हे समजताच तीही चिडली.यजमानांना म्हणाली.”चला हो,त्यला व्हाणेनेच बडवते आता.”
मी तिला खुणेच शांत करत म्हटलं,”चला,मारामारी करायचीच झाली तर एक भिडू वाढला हे बरे झाले..पण आधी खाऊन घे. मलाही खाल्याशिवाय काही सुचणार नाही.अन्नमें प्राण आणि प्राणमें पराक्रम हे विसरू नकोस.”
शेवंत आज गुढीपाडवा म्हणून गुळाचा सांजा घेऊन आली होती.तिने अजून एक बातमी दिली.आता पातेरेमामान्च्या घरापर्यंत पाणी आल्यामुळे ती तिथून काल पाणी नेताना तिने आणि पातेरेमामीनी या दोघा भावांना जाताना पहिले होते आणि शेखरच्या डोक्यावर जड हारा असल्याचेही पाहिले होते. पण हाऱ्यात काय आहे तिला समजले नव्हते.माझी मात्र पक्की खात्री झाली होती की, हाऱ्यात माझ्या बागेतली फळे होती.सचिनच्या आजीनेही तसं कबूल केलंच होत.
सगळ्यांचा नाश्ता झाल्यवर बंड्या आणि धोंड्याला बागेतच थांबून राखण करायला सांगितले.राखणदाराचा प्रश्न पुन्हा उपस्थित झाला होता.त्यातून माझी बाग सड्यावर असल्याने आजूबाजूला घरे नव्हती.घरे नसल्याने जागमाग नाही. त्यामुळे तिथे आता दोन माणसे राखणीसाठी लागणार होती,तीही बेडर.काय करू आता?आणि एकदम लक्षात आले, गुरखा ! हो.आता गुरखेच ठेवायचे राखणदार म्हणून. शिवाय त्यांना शस्त्र बाळगण्याचा परवानाही असतो.
मी सुरेखाच्या यजमानांना म्हटलं,’काही करा पण आजच्या आज आपल्यासाठी दोन गुरखे पहा.पण गुरखेच हवेत आता आपल्याला.”
ते म्हणाले,”ते बघतो मी.कोकण रेल्वेच्या कृपेने हल्ली इथे खूप नेपाळी येतात. आजच्या आज कठीण होईल, पण ते मिळेपर्यंत मी पाहीन बागेकडे .तुम्ही काळजी नका करू.पण त्या भ** सचिनचे काय करायचे ते तुम्ही बघा. ह**** सा*.” आता त्यांचा राग प्रकट होऊ लागला होता.
बागेची जबादारी घेऊन त्यांनी त्यांनी माझ्या डोक्यावरचे ओझे एकदम हलके केले. नवरा, मयू ,सुरेखा आणि तिचे यजमान यांच्याशी मी सल्लामसलत केली .माझ्या मनातल्या कल्पना त्यांना सांगितल्या.त्यांनाही त्या पटल्या.मग एका विचाराने आम्ही पुढे काय करायचे ते ठरवले.
बंड्या,धोंड्या सोडून बाकीच्या सगळ्यांना घेऊन आम्ही सचिनच्या घराकडे मोर्चा वळवला.तिथे जाऊन पाहतो तर काय?गडग्याबाहेर बऱ्यापैकी गर्दी जमलेली.गावात बातम्या पसरायला वेळ लागत नाही.आणि रिकामटेकड्यांचीही कमी नाही.
त्या गर्दीत आजी आजोबा,तात्या,अण्णा,सुरेखाच्या साक्षरता वर्गातले विद्यार्थी-विद्यार्थिनी असे माझे हितचिंतक होते तसेच भाई,चाफेरकर यांच्यासारखे माझा परस्पर काटा काढला जातोय, यात आनंद मानणारेही होते.शिवाय माझे हितचिंतक म्हटले तरी सचिनचे कुटुंब गावातले आद्य रहिवासी असल्याने त्यांचे संबंध माझ्यापेक्षा आधी होते.त्यामुळे जे काय करायचे ते जपूनच करावे लागणार होते. शिवाय ते कायद्याच्या चौकटीत बसणारे असावे लागणार होते.मी ठरवल्याप्रमाणे घडेल ना?असा विचार माझ्या मनात डोकावला.
इतक्यात आजीने माझ्या पाठीवर हात ठेवला.म्हणाली,”आमी बागेतच येत होतो,पण हितेच समाजला काय झाला ते,म्हणून इथेच थांबलो.”आजोबांनी नेहमीप्रमाणे डोक्यावर हात ठेवला.मला धीर आला.
आम्ही बेडा ओलांडून आत शिरलो. मागोमाग सुरेखा,सुरेखाचे यजमान, आजोबा-आजी,तात्या,अण्णा आणि भाईही आत शिरले.मास्तर ओटीवरच बसले होते,त्याचा चेहरा शरमेने कोळपला होता.पण कुटुंबप्रमुखाचे, घरावर आलेल्या आपत्तीला तोंड द्यायचे, कर्तव्य ते करीत होते.माला त्यांच्याकडे पाहून काय बोलावे ते सुचलेच नाही आधी.
मयूनेच त्यांना विचारले,”सचिन आहे का घरात?”
त्यांनी नकारार्थी मन हलवली.इत्क्यार सचिनची आजी आतून बाहेर येत म्हणाली,”कोण रे?कोणास हवाय
सचिन?”
आम्हाला पाहिल्यावर ती पातेरेमामांकडे वळून म्हणाली,”काय रे पातेऱ्या,निरोप दिलंय ना मी तुज.सांगितलास नाय का ह्यानला?”पातेरेमामानी नुसतीच मान हलवली.
मास्तरांनी आम्हाला वर येण्याची विनंती केली.त्या शिक्षकाचा मान राखून आम्ही त्यांच्या ओटीवर चढलो.आजोबांनी त्यांच्या खांद्यावर हात ठेवत विचारले,”मास्तर,हे हो काय?”त्यांनी सचिनच्या आजीकडे बोट दाखवत म्हटले,”काय बोलू?यांनी काही बोलण्यासाठी ठेवलेच नाही.” त्या बाईनी चटकन उत्तर दिले कि,”मुलां काम करीत होतीत ना रात्रंदिवस, मग त्यांचापण हक्क नाही का?”आजीची बडबड चालूच होती,”सचिन नाय आता घरात.तो धंद्यावर गेलो हाय,तो आल्यावर या जावा.”यालाच चोराच्या उलट्या बोंबा असं म्हणतात.
आवाज ऐकून सचिनची आई आणि त्याचे दोन्ही भाऊ बाहेर आले.त्यात शेखरही होता. मी त्याला विचारले,”काय रे,आज बागेत नाही आलास?”
तो चाचारला.”नाही,.....ते....दादा....दादा ....म्हणाला की,.... आजपासून जाऊ नकोस.”
आधीच ठरल्याप्रमाणे त्याचे दोन्ही हात दोन्ही बाजूने नवरा आणि मयूने धरले.ते पाहताच आजी अजून संतापून म्हणाली.”तुमचा वेव्हार झाला सचिनबरोबरोबर आणि आता ह्यास कशास मधी घेता?सण खराब करायास आल्रेत.”
मी मास्तरांकडे पाहत हात जोडले.”मला तुमच्याकडे पाहून खरंच वाईट वाटतंय पण आता मी गप्प राहू शकत नाही.”ते मान खाली घालून आत निघून गेले.मी सचिनच्या आईला सांगितलं,”तुम्ही सचिनला निरोप पाठवून बोलावून घ्या.तो इथे अर्ध्या तासाच्या आत आला नाही तर मी याला चोरीच्या आरोपावरून पोलिसात देईन.”तिने लगेच दुसऱ्या मुलाला खूण केली. तो पळतच निघाला.आजीही हबकली,”पोलीस?पोलीस काय करणार आपसात?”तिचा आवाज मात्र आता चिरकला होता.
आम्ही सगळेच गप्प होतो.आता सचिनच्या आईने चहा करून आणला पण तो कोणीही घेतला मात्र नाही.तिचे डोळेही रडल्यासारखे भासत होते.ते चहाचे तक तिथेच ठेऊन ती आत निघून गेली.दहा मिनिटातच सचिनची रिक्षा येताना दिसली,त्याच अर्थ तो गावातच कुठेतरी लपून बसला होता.त्याला येताना बघितल्यावर मी अजूनच शांत झाले.आता डाव माझ्या हातात आला होता.तो डाव जिंकल्याशिवाय सोडणार नव्हतेच मी आता .
सचिन चा चेहराही उतरला होता,पण उसन्या अवसानाने त्याने पायऱ्या चढत मला विचारलं,”काकी मी निरोप दिला होता तुमच्यासाठी.मिळाला नाही का तुम्हाला?”
“तू मला निरोप दिला होतास?कोणाकडे?’मी सुरुवात केली.
त्याने आजीकडे बघत उत्तर दिलं.”नाही,म्हणजे घरातच सांगून गेलो होतो.”
आजीही तत्परतेने बोलली,”मी सांगितला होता पातेऱ्यास.”
आता मी त्याच्या आजीना बजावलं,”हे बघा,मघाशी तुम्हीच सांगितलंत की,’तुमचा वेव्हार झाला सचिनबरोबरोबर आणि आता ह्यास कशास मधी घेता?’,तर आता तुम्हीपण मध्ये येऊ नका.”आता आजोबानीही तिला सांगितलं,”वैनी आता तू गप्प बस.”
मी पुन्हा सचिनकडे वळले,”हं,बोल.कसला निरोप आणि कोणाकडे दिलाहोतास.?”मी पुढे बोलले,” एखादी गोष्ट दोन व्यक्तींनी मिळून करायची ठरवली आणि त्यात दुसऱ्यामुळे अडचण येणार असेल तर पहिल्या व्यक्तीची जबाबदारी दुसऱ्या व्यक्तीला फक्त निरोप द्यायचीच नाही, तर तो निरोप पहिल्या व्यक्तीला योग्य त्या वेळेत पोचला की नाही हे पाहण्याचीही असते,हे तुला कोणी शिकवले नाही का?”मी पुन्हा त्याला विचारलं,”तर मला सांग कसला निरोप,कोणाजवळ दिला होतास आणि कशाबद्दल?”
तो गप्पच.आता भाई बोलले,”अरे बोल काय ते.सावंतवैनी थोड्याच खाणार आहे तुला?”
मी रागाने त्याच्याकडे पाहून बोलले.,”तुम्ही काय वकीलपत्र घेतलंयत का त्याचं?”ते काही बोलणार इतक्यात त्तात्यांनी त्यांना फटकारले,”भाई,तू कशास तेल ओततो आहेस आगीत?”
“मी कशास तेल ओतू?मी आपला त्यास बोलायास सांगतोय.”भाईनी स्पष्टीकरण दिले.
त्यावर अण्णांनीही आपण माझा बाजूचे हे सिद्ध करण्याचा संधी सोडली नाही”,ते सांगायला तू कशास हवा?आता सचिनास बोलावाच लागेल.”
सचिनचे अवसान ओसरू लागले होते.तो घुटमळत म्हणाला.“नाही,ते काल आम्ही आंबे काढले बागेतले.त्याबद्दल.”
“त्याबद्दल काय?
त्याने पटदिशी उत्तर दले,”’काकी,तुम्ही समजा की, मी माझ्या वाट्याचे आंबे घेतले?”हे ऐकून मी,नवरा,मयू आणि सुरेखाचे यजमान हसायलाच लागलो.चोर तर चोर आणि वर शिरजोर.
हसू आवरत मी विचारलं“ समजाव बरं मला.कसला वाटा?”
तो गोंधळला,”ते ....ते ...भागीदारीचं ठरलेलं ना?”
मी पुन्हा शांतपणे,”कसली भागीदारी?”
तो अधिकच गोंधळला,”ते दहा टक्के भागीदारीचं ...ठरलं होतं ना...... आपलं.”
मी विचारलं,”कुठे आहेत कागदपत्रं?”हा प्रश्न ऐकताच सचिनच्या डोक्यात प्रकाश पडला,त्याचे सारे अवसान गळून तो एकदम हात जोडत माझ्या नवऱ्यापुढे वाकला.”काका,काका,मला माफ करा.माझ्या हातून मोठी चूक झाली.”
नवऱ्याने त्याला एका हाताने उठवून विचारले,”काय झालं?कसली चूक?नीट काय ते बोल.”
तो सांगू लागला.”काल माझे मामा आले होते,त्यांना समजलं की,यावर्षी मी आंब्याच्या धंद्यात पडलोय.तेव्हा ते म्हणाले,’अरे वा!म्हणजे यंदा आम्हाला घरचे आंबे खायला मिळणार तर.’त्यानंतर आज पहिला तोडा करणार म्हटल्यावर आणि तयार फळ पाहिल्यावर त्यांनी सांगितलं,’अरे या आंब्याचा भाव डझनाला दीड ते दोन हजार येईल मुंबईला.आजच तोडून पाठवू’.मी आधी तयार नव्हतो पण घरी आल्यावर आजीनेही भरीला घातले आणि दहा टक्क्याचा वाटा घेतला असे सांगायचे ठरले.रात्रीच्या गाडीने मामा त्या पेट्या घेऊन मुंबईला गेला.पण आता मला लक्षात आलंय की,माझं चुकलंय.मला माफ करा.”
“किती पेट्या आंबे निघाले?”नवऱ्याने विचारलं.
‘दहा”सचिनने उत्तर दिले.”पण प्लीज मला माफ करा.”
नवऱ्याने त्याला सांगितलं,”हे बघ,ह्या बागेचा मालक मी नाही.काकी आहे,तेव्हा चूक झाली,माफ करा, म्हणजे नक्की काय करा,हे तू तिलाच सांग.”बॉल पुन्हा त्याच्या कोर्टात टोलवून नवरा मोकळा झाला.
तसा माझ्याकडे वळत सचिन म्हणाला,”काकी,मला माफ करा.”
“म्हणजे नक्की काय करा?’या माझी प्रश्नावर त्याला काहीच बोलता आले नाही.”तू म्हणतोस तुझी चूक झाली.पण शेखरलाही तू आज बागेत जायला मनाई केलीस.याचा अर्थ स्पष्ट आहे की तुझी नीयतच बिघडली आहे.”अजूनही तो गप्पच होता.काही बोलण्यासारखे मुद्देच उरले नव्हते त्याच्याकडे.मी विचारलं.”तुझी चूक झाली हे तुला मान्य आहे तर त्या चुकीची भरपाई कशी करणार ते सांग आता?”
त्यावर तो अगदी हळू आवाजात बोलला,”तुम्हीच सांगा.”
“ठीक आहे. आता तुला नीट समजावून सांगते.तुझ्या मामाने तुला किमतीचा अंदाज बरोबर दिलाय.मलाही क्रॉफर्ड मार्केटमधल्या माझ्या ओळखीच्या दुकानदारांनीही तोच भाव सांगितलाय डझनाला दोन हजाराचा भाव ते आज द्यायला तयार आहेत, आता तुझ्यापुढे तीन मार्ग आहेत,सांगू?”त्यावर सचिनने फक्त होकारार्थी मान हलवली.”पहिला मार्ग.तीन डझनाची पेटी म्हणजे एका पेटीचे सहा हजार,या भावाने तू साठ हजार रुपये इथे ठेव,आणि दुसरा मार्ग.तू आणि तुझा भाऊ चोरीच्या आरोपाखाली तुरुंगात जायचं.तुझ्याकडे काही कागदपत्र नाहीत तुझी मालकी सिद्ध करायला,पण माझ्याकडे भरपूर लोक आहेत साक्षीदार म्हणून की हा माझ्या बागेत राखणीचं काम करत होता म्हणून.शिवाय काल तुम्ही बागेतून आंबे काढले तेव्हा तूही मुद्देमालासोबत होतास यालाही साक्षीदार आहेत माझ्याकडे .तिसरा मार्ग ताबडतोब मामाला फोन करून दहाही पेट्या मी देते त्या पत्त्यावर पोचत्या करायला सांग.”
साठ हजार नाहीतर तुरुंग ऐकल्यावर सचिन कोसळण्याच्याच बेतात होता पण तिसरा मार्ग ऐकून थोडा सावरला.तात्यानी अण्णांना टाळी दिली.”असा नाक दाबल्यावर काय तोंड उघडायासच लागेल आता.”अण्णांनी शेरा दिला”.यासच म्हण्टात चोरावर मोर.”
सचिनकडून मी एस्टीची पार्सलपावती ताब्यात घेतली.सचिन मयूसोबत ग्रामपंचायत ऑफिसात मामाला फोन करायला पळाला.माझ्या ओळखीच्या व्यापाऱ्याला मयूकरवी माझा संदर्भ देऊन आंब्याच्या पेट्या पोचताहेत,आणि त्या पेट्यांवर लिहिलेला तपशील कळवला.शिवाय पेट्या पोचल्यावर ग्रामपंचायत ऑफिसच्या फोनवर कळवायलाही सांगितले.
तासाभरात पेट्या पोचल्या असा त्या व्यापाऱ्याचा फोन आलाही.गुधीपाद्व्याची सकाळ खराब सुरु झाली तरी दुपारपर्यंत गुढीपाडवा साजरा झाला होता.वर्षाची सुरुवात छान झाली होती.
आम्ही निघालो.इतक्यात मास्तर पुन्हा हात जोडत बाहेर आले,”बाय,लक्षमीकेशवानेच वाचावलंन आज.”त्यांना नमस्कार करून आम्ही वळलो तर सचिनची आजीही हात जोडून उभी,मी त्यांना म्हटलं,”घरात मोठी माणसं लागतात ती लहानांना मार्गदर्शन करायला ,त्यानाचुकीचे सल्ले देऊन त्याची पाठराखण करायला नव्हे.तुम्हाला तुमच्या मुलाकडून बरंच काही शिकता येईल.”
सचिनही हात जोडूनच उभा होता. सुरेखाचे यजमान त्याला म्हणाले,”तू चांगली संधी नि चांगली माणसं गमावून बसलास.माझाही विचार केला नाहीस.तुझ्यासारख्यांमुळे गावाचे आणि गावातल्या माणसांचे नाव खराब होते.”
मी त्याला म्हटलं,”तू मामला म्हणालास ना मी धंद्यात पडलोय,खरंच तू पडलाच आहेस.तुझ्या वडिलांनी तुला सल्ला दिला होता की, इमानदारीने वाग.हेच जर तू मला फोन करून कळवलं असतंस तर मी तुला परवानगी दिलीही असती कदाचित.पण नाही. तुलाही मोह झालाआणि तू लबाडी केलीस.यातून धडा घेऊन तू जर काही शिकलास आर बरंच आहे.वडिलांचा सल्ला लक्षात ठेवलास तरच आयुष्यात काही प्रगती करू शकशील.आणखी एक गोष्ट, आपली भागीदारी तुझ्याकडूनच मोडली आहे तर आता मी तुम्हाला आंब्यात वाटा देणार नाही राखण्याचा पगारच देईन.कारण मलाही फुकट काही नको.”
(क्रमश:)
प्रतिक्रिया
15 Mar 2016 - 4:06 pm | मुक्त विहारि
एक नारी दस भाईं को भारी....
17 Mar 2016 - 3:58 pm | क्रेझी
+१
15 Mar 2016 - 4:11 pm | यशोधरा
वाचते आहे...
15 Mar 2016 - 4:28 pm | शलभ
मस्त.
15 Mar 2016 - 4:36 pm | एस
छान उलटवला डाव. मलाही खूप शिकण्यासारखं आहे.
व्यवहारज्ञानाबद्दल कोणी काही विचारले की मी त्यांना तुमच्या लेखमालेची लिंक देईन! :-)
15 Mar 2016 - 8:53 pm | श्रीरंग_जोशी
एस यांच्या प्रतिसादाशी सहमत.
पुढील भागाच्या प्रतिक्षेत.
15 Mar 2016 - 4:38 pm | कविता१९७८
मस्त
15 Mar 2016 - 8:30 pm | सुखी
सुरन्गी ताई,
तुमचं लिखाण वाचुन स्पुरण चढतं हो!!
खूप छान लिहीता (अन भाडंता देखील ;) ...)
19 Mar 2016 - 9:17 pm | नूतन सावंत
सखी,भांडण नेहमीच वाईट नसतं ग.जेव्हा स्वतःच्या रास्त हक्कासाठी भांडणं आवश्यक असतं तेव्हा भांडलंच पाहिजे आणि असं सगळ्यांनाच भांडता आलं पाहिजे असं मला वाटतं.
तुलाही स्पुरण चढलं हे मात्र आवडलं.
15 Mar 2016 - 8:51 pm | पिलीयन रायडर
ताई रॉक्स!!
16 Mar 2016 - 9:44 pm | Ram ram
सुरंगी तायी आमास्नी यकांदी पेटी धाडा की वानुळा म्हून
19 Mar 2016 - 9:19 pm | नूतन सावंत
नाही हो, आता बाग नाही.असती तर मिपाकरांना द्यायला सांगवेच लागले नसते.
17 Mar 2016 - 10:03 am | प्रमोद देर्देकर
स्थानिक गावकर्यां बरोबर कसे रहायचे याकरिता बर्याच शिकण्यासरख्या गोष्टी आहेत तै तुमच्या कहाणीत.
19 Mar 2016 - 9:22 pm | नूतन सावंत
ज्या गावच्या बोरी त्याच गावाच्या बाभाळी आहेत हे स्थानिकांना समजलं कीच विरोध बोथट व्हायला लागतो.
17 Mar 2016 - 10:13 am | रातराणी
ताई यू आर ग्रेट!
17 Mar 2016 - 2:56 pm | बापू नारू
हा भाग पण एकदम मस्त.....
17 Mar 2016 - 3:16 pm | जगप्रवासी
एकदम भारी डोक चालवून चेकमेट केलात. मान गये
17 Mar 2016 - 4:00 pm | क्रेझी
काय डोकं लावलं सुरन्गी ताई तुम्ही १लंबर :) पुढचा भाग लवकर टाका
19 Mar 2016 - 9:23 pm | नूतन सावंत
सगळ्यांचे आभार.
19 Mar 2016 - 9:37 pm | पैसा
मागचा भाग वाचताना कायतरी वैताग झाला असणार हे समजेलेलं. मधे कोणीतरी कोकणातले लोक आळशी आहेत का असा काहीतरी धागा काढला होता त्याला हे उत्तर. सध्या आम्हीही असल्या लोकांशी झगडून काहीतरी करतो आहोत. त्याना सहा आठ महिने काम दिले त्याची किंमत नसते. आमच्या जिवावर तुम्ही खाताय हे ऐकायला मिळाले आहे हल्लीच.
21 Mar 2016 - 8:30 pm | नूतन सावंत
21 Mar 2016 - 12:03 pm | नाखु
म्हणतात निरगाठ सोडवणे...
तुमच्या नोकरीतल्या मुरब्बीपणाचा आणि धोरणी संयमाचा नक्कीच उपयोग झाला असणार.
ही लेखमालाच जतन करावी लागणार.
कुठल्या तोंडानी या गाववाल्यांना आपले म्हणावे ( समस्त शेतकरी-गाववाले कैवारी लोकांनी किमान दोन-तीन्दा तरी या लेखमालेची पारायणे करावीत आणि मगच शेतकरी समस्यांसाठी (ढोंगी)गळे काढायची हिम्मत करावी)
प्रामाणीक कस्तकार्याला स्वतंत्र १० एकर शेती घेऊऊन दिल्याची बातमी अव्ग्रोवनमध्ये वाचली होती ती आठवली.
21 Mar 2016 - 8:07 pm | नूतन सावंत
नाखुजी,
या दोन गोष्टींव्यातिरिक्त माझ्या नवऱ्याचा माझ्यावर असलेला विश्वास आणि पाठिंबाही यांचाही उपयोग नेहमीच होतो.जर एखाद्या गोष्टीत मी कमी पडतेय असे दिसले त्याक्षणी ते पुढे होऊन सूत्रे हाती घेतील याचा विश्वास कायम मनात असतोच.
22 Mar 2016 - 11:39 am | नाखु
जीवन मित्राच्या (आणी संगीणीच्याही) साथीशिवाय आणि भक्क्म विश्वासाशिवाय संसारच काय बाकी लढाईसुद्धा व्यर्थ आहे .
21 Mar 2016 - 12:54 pm | मीता
भारी झालाय हा पण भाग . प्राप्त परिस्थितून मार्ग कसा काढायचा हे शिकण्यासारखा आहे यातून
1 May 2016 - 4:45 pm | शाम भागवत
काही नवे करावे म्हणून –भाग १७