काही नवे करावे म्हणून-भाग १५.

नूतन सावंत's picture
नूतन सावंत in जनातलं, मनातलं
4 Mar 2016 - 10:01 pm

1
.
.

  • काही नवे करावे म्हणून - भाग १
  • काही नवे करावे म्हणून - भाग २
  • काही नवे करावे म्हणून - भाग ३
  • काही नवे करावे म्हणून - भाग ४
  • काही नवे करावे म्हणून - भाग ५
  • काही नवे करावे म्हणून – भाग ६
  • काही नवे करावे म्हणून - भाग ७
  • काही नवे करावे म्हणून - भाग ८
  • काही नवे करावे म्हणून - भाग ९
  • काही नवे करावे म्हणून - भाग १०
  • काही नवे करावे म्हणून - भाग ११
  • काही नवे करावे म्हणून - भाग १२
  • काही नवे करावे म्हणून - भाग १३
  • काही नवे करावे म्हणून - भाग १४
  • काही नवे करावे म्हणून-भाग १५.

    आता जे गावकरी मला सकाळी भेटायला आले होते तेही त्याला बोलूलागले.एक म्हणाले "हे रे काय भाई? नवीन आलेल्या माणसाला मदत करायची सोडून तू खोडेच घालतोस? अशाने गावाचे नाव खराब होते ना."भाई गप्प.
    लगेच दुसऱ्याने सुरुवात केली, "भाई, तू इतक्या वेळा पडलंस पालथी मारून, तरी तुजां नाक वरच काय रे?" आता भाईनी मान खाली घातली." आता तर पायावर कुराड नाय मारलंस. कुराडीवरच पाय टाकलंस मेल्या!"
    तिसऱ्याने गौप्यस्फोट केला. "जोशान तुज बाग दिलंन नाय तर तू अशी मिळवणार की काय?" आता मात्र भाईने त्याच्याकडे जळजळीत नजरेने पहिले आणि बागेतून बाहेर पडला.
    (क्रमशः)

    अखेर गौप्यस्फोट झालाच.आता खरी गोष्ट निर्विवादपणे समजली.या बागेवर भाईंचा डोळा होता.साहजिकच आहे,घराच्या इतक्याजवळ, वाढलेले आयते ताट असल्यासारखी,कुंपणकाठीचा खर्च नसलेली बाग कोणाला नको असेल?पण त्यासाठी योग्य गुंतवणूक करणे या गृहस्थाला मान्य नसावे.त्यामुळेच मालकाला सतावून, जागा सोडायला भाग पडून, किंमत पाडून घ्यायचे उद्योग.

    जोशींचे मामा तिथेच बाजूच्या कोळंबे गावात राहत असल्याने,त्यांना त्रास देणे शक्य नव्हते.शिवाय जोशींना हव्या असलेल्या किमतीत जागा विकेपर्यंत त्यांचे मामा बाग सांभाळू शकत होते.

    अडचण मलाच होती.तिथे कोणीही निर्णय घेणारे नव्हते. मी नसताना काही त्रास दिला तर.शिवाय यांच्या कारवाईला कंटाळून अचानक बाग विकायचा निर्णय घेतला असता तर लगतचा कब्जेदार म्हणून आधी यालाच विचारावे लागले असते.शिवाय दुसरे गिऱ्हाईक लगेच मिळालेच असते याची खात्री नाही. गृहीतक बरोबर होते या गृहस्थाचे.
    त्यात आतापार्यंत दारात असलेले पाणी माझ्यामुळे बंद झालेले,शिवाय पाईपचा खर्च करावा लागणार होता ते वेगळाच.गावकऱ्यांचीही त्याच्यावर नाराजी राहणार होती कारण त्यांनाही पाणी लांबून आणावे लागणार होते.

    माझ्या डोक्यात घंटा घणघणू लागल्या होत्या. अजून काय काय करणार होता देव जाणे.जाऊदे,देवालाच पाहूदेत त्याच्याकडे.आपण आपलं काम करु.आपल्या वाटेत आला तर,आणि येणारच,तेव्हा त्याला प्रतिवाद कराययचाच.डोके झटकून कामाला सुरुवात केली.

    आता झाडे फळांच्या भाराने ओथंबून गेल्यामुळे फांद्या खाली येऊ लागली होत्या.त्यांना आधार देणे गरजेचे होते.लक्षामामांना जंगलाची माहिती असल्याने काही जणांना,जंगलातून त्या कामासाठी लागणाऱ्या टोकाला y आकार असलेल्या काठ्या तोडून आणून, त्या आंब्याच्या झुकलेल्या फांद्यांना लावून ठेवायच्या कामाला लावले.एक अगदी तीन फुटाचे झाड ३६ आंब्यांनी लगडले होते. त्याला फूटभर भराव असल्याने आतापर्यंत फळे जमिनीला टेकली नव्हती.त्यात फळही मोठ्या आकाराचे असल्याने फांद्या तुटून नुकसान होण्याचा धोका होताच.

    सकाळपासून पाण्याच्या गडबडीत मी या बाबीकडे लक्ष देण्याचे विसरूनच गेले होते.आता मात्र एका बाजूला फवारणी आणि एका बाजूला झाडांना टेकू देऊन झाडांना आधार द्याचे काम सुरु करायला हवे होते. ते सुरु करू दुसऱ्या कामाकडे वळलो.

    वेखंडाची फवारणीही सुरु केली.आम्ही अजून एक यंत्र भाड्याने घेतले असल्याने फवारणी उद्यापर्यंत पुरी झाली असती.या फवारणीचे तंत्र थोडे वेगळे होते.आतापर्यंत नुसत्या पानांवर फवारणी केली तरी चालत होते.बाहेरच्या बाजूने गोलाकार फिरत फवारणी करता येई.पण आता ही फवारणी फळांसाठी असल्याने पानांआड दडलेली फळे लक्षात घेऊन करावी लागणार होती.तशा सूचना सर्वांना देत प्रात्यक्षिक करून दाखवले.

    आताची एक नि पुढची महिन्याची एक अशा दोन फवारण्या वेखंडाच्या असणार होत्या.आता फळांवर रोख धरूनच कराव्या लागणार होत्या.वेखंडाच्या एक दोन फवारण्या मिळाल्या तर फळाचा रंग अगदी आकर्षक आणि तजेलदार दिसतो.

    दररोज पाणी मिळाल्याने ज्या झाडांची फळे गळत होती तीही गळ थांबली होती.आता पाण्याचाही प्रश्न नव्हता.सचिनला इथेच पाणी मिळणार होते.तोही निदान आतातरी नीट काम करतोय असे दिसत होते.आता दोघे भाऊ बागेतच झोपत होते.त्याला विचारलं,”काय रे?कसं वाटतंय नवीन काम?”
    तोही उत्साहाने हसतच म्हणाला,”छान वाटतंय.वेगळंच काम आहे.आतापर्यंत कधी केलं नव्हतं.उलट राखण्याच्या बागेतले आंबे लहानपणी पळवत असायचो.आता कधी विचार येतो,की, राखणे आणि मालकाला काय वाटत असेल तेव्हा. राखणे मागे लागायचे,दगड मारत आणि आम्ही पळून जायचो.त्या कैऱ्या तिखटमीठ लावून खायला किती मजा यायची.पण आता पडलेली पण खावीशी वाट नाही.”
    मी आणि नवरा हसलो.”मालकीतत्वाची जाणीव झालीय तर तुला? छान झालं.”मी शेरा दिला.तोही मनापासून,फवारणीच्या कामात,टेकू द्यायच्या कामात लक्ष घालत होता.त्याला पुन्हा म्हटलं,”आता तर बहुतेक झाडांना टेकू देऊच आपण.पण नंतरही एखाद् दुसऱ्या फान्दीला द्यावा लागेल,तिकडे लक्ष देऊन टेकू लाव हं,शिवाय लावलेले टेकू वाऱ्यामुळे सरकतील तर तेही नीट करत जा वेळोवेळी.”
    त्यानेही हसून होकार दिला.मग म्हणाला,” काकी, तुम्हाला सांगायचं राहिलंच.माकडांनी उच्छाद मांडलाय.आम्ही गलोल घेऊन येतो. दगडांनी पळतात तात्पुरते.”
    सुरेखाचे यजमान म्हणाले,’अरे,रश्शी बॉम्ब आणून उडव.म्हणजे आठ दिवस निश्चिती होईल.”
    “आज कसे नाहीत?”या माझ्या पृच्छेवर ते म्हणाले.”आता बागेत इतकी माणसे आहेत न् आजूबाजूलापण गलबला आहे रानात,त्यामुळे नाही यायचे.पण आता तुमची नि माझी बाग सोडली तर आंबापण नाही ना कुठे.”
    “हम्म” मी निश्वास सोडला.
    त्यावर ते म्हणाले,’पण नुसतेच कच्चे आंबे तोडून एक चावा मारून टाकून देणार.न फांद्यावर नाचून त्या मोडणार. नुसतंच नुकसान.”
    मला आठवण झाली माझ्या आजोळची.तिथे बंदुकीचा बार काढला जायचा हवेत..इथे बंदुकीचा बार काढण्याऐवजी फटाके फोडले जायचे.मी सचिनला म्हटलं,”आज आम्हाला सोडायला येशील तेव्हा फटाके घेऊन देते.करा दिवाळी.”
    तो बाकीच्यांना मदत करायला निघून गेला.ते म्हणाले,”आतापर्यंत तरी ठीक काम करोय.आताच खरी परीक्षा आहे.”
    “म्हणजे?”मी आश्चर्याने विचारले.
    “नाही,आता कुठे आंबा नाही ना?त्यामुळे चोरावा फार असेल,नीट राखण ठेवली पाहिजे.मीपण आता पुढच्या महिन्यात बागेतच जाणार झोपायला.”ते उत्तरले.
    “सचिनपण दहा टक्के का होईना मालकच आहे.म्हणजे आपल्या बागेतपण मालकच राखण करताहेत म्हणायला हरकत नाही”मी म्हटलं.तेही हसले.
    संध्याकाळी रत्नागिरीत आल्यवर त्याला रश्शी बाँब घेऊन दिले.दुसऱ्या दिवशी सगळी कामे निर्वेधपणे पार पडली.आम्ही सामान पोचवायला सुरेखाकडे आलो.
    आजी ताज्या दुधाची कासंडी घेऊन आली.सुरेखा माझ्यासाठी कॉफी नि इतरांसाठी चहा करायला पळाली.
    सुरेखाचे यजमान म्हणाले,’’ताई,पुढच्या महिन्यात पहिला तोडा करू शकू आपण.१७ तारखेला गुढीपाडवा आहे.चांगला मुहूर्त आहे.”
    मी विचारात पडले.“फवारणीच्या वेळी येईल ना आयडिया.नक्की कधी तोडा करायचा ते.”
    पुढच्या महिन्यात विधीमंडळाचे अधिवेशन चालू होणार होते.या काळात सुट्टीच्या दिवशीही ऑफिसला जावे लागते,पाटबंधारेखात्याच्या लोकांना इतके काम असते.सगळी कामे तत्काळ आणि तीही कालमर्यादेत बसणारी.त्यामुळे नवऱ्याला सुट्टी मिळणे अवघड होते.पण ते पाहू पुढच्या पुढे.
    आजी माझ्याजवळ येऊन बसली.ओच्यातून काहीतरी गुलाबी कागदात गुंडाळलेले काढून माझ्या हातावर ठवले आणि माझ्या कानशिलावर बोटे कडकडा मोडत म्हणाली,”माझी लक्शुमी ती.”माझ्या हनुवटीला आपली पाची बोटे टेकवून ओठापाशी नेत ”प्युच्च”असा आवाज काढून म्हणाली.”उघड ना !”
    मी खुणेनेच विचारलं,”काय आहे?”
    तिचा चेहरा खूप आनंदी दिसत होता.”तू उघड तर.”
    मी पुडी चाचपली.पुन्हा आजी म्हणाली,”उघड गो,”
    मी पुडी उधडून पहिली तर आत सोन्याचा दुहेरी चपलाहार.”अरे वा! चाफेरकर पावला म्हणायचं तुला,”मी हसून म्हटलं.”हां,चाफेरकर पावताय.लब्बाड मेलो.माज पावलंस ती तू.म्हणून तुजो हात लावल्याशिवाय घालूस तयार नाय मी.”मी उठून तिच्या गळ्यात तो चपलाहार घातला.तो चपलाहार जास्त चकाकत होता की आजीचा चेहरा?हे सांगणे कठीण होते.इतक्यात आजोबाही आले.आजीकडे पाहून त्यांचे डोळेही तितक्याच झळाळीने चमकून उठले.

    त्यांनीही माझ्या डोक्यावर हात ठेवला.ते काहीच बोलले नाहीत पण त्यांचा स्पर्श मला माझ्या आजोबांच्या स्पर्शाची आठवण करून देत होता.

    इतक्यात सुरेखा चहा-कॉफीचे कप घेऊन आलीच.तीही आजीकडे बघून खुश झाली,म्हणाली,”बरं केलंस.”
    इतक्यात भाई काही लोकांसह आले,म्हणाले,’ते पाइपचं काम करायचं होतं ना?त्यसाठी तुमचा कोण माणूस थांबणार ते मला सांगा.”आम्ही आज जाणार हे माहिती असूनही हे गृहस्थ आता उगवले होते.
    “कधी करणार आहात तुम्ही हे काम?”नवऱ्याने विचारले.
    मानभावीपणे ते उत्तरले,’’अहो,तुम्ही परवानगी दिलीतर आतासुद्धा?”
    “आता या काळोखात?”मी विचारले.
    ”काय करणार?गरज आहे आम्हाला न् गरजवंताला अक्कल नसते.”पुन्हा त्याच सुरात ते बोलले.
    “दिवसभरात कुठे गेलेली अक्कल नि कुठे गेलेले गरजवंत.?”मयू रागाने बोलला.
    नेहमीप्रमाणेच मी त्याला थोपवत मी म्हटलं,”पण आम्ही तर आता निघालो मुंबईला.”
    भाईसोबत आलेले लोक म्हणू लागले,”ताई,असा नका करू.पाण्याची अडचण सर्वांनाच झाली.”
    “मग आता तुम्ही सर्वजण हा खर्च करणार का?”मी विचारले.
    “आता करूकच लागतलो ना?”त्यांच्यतल्या एकाने मलाच उलट विचारले.
    ‘’का?’’मी उलट विचारलं.”तुम्ही का या माणसाच्या चुकीचा भुर्दंड भरणार?”भाईंचा चेहरा पडला.

    त्यांचा डाव माझ्या लक्षात आलाय आणि आतामी तो उधळून लावणार याची कल्पना त्यांना कल्पना आली.त्यांच्या सोबतच्या दुसऱ्याने मला विचारल,’’म्हंजे? म्हनणा काय तुमचा?’’

    “माझे म्हणणे इतकेच की,तुमचे सहज मिळणारे पाणी या माणसाच्या मस्तीमुळे बंद झालेय.ते त्यांनीच तुम्हाला पूर्वीप्रमाणे मिळवून दिले पाहिजे.आणि तुम्ही खर्च करणार असलाच तर तुम्ही सगळ्यांनी मिळून ह्यांच्या घरापासून पुढे पातेरेमामांच्या घरापर्यंत पाईप घाला.म्हणजे तुम्हाला पण पाणी जवळ मिळेल.असे मला वाटते. शिवाय ह्यांच्या अंगणात उतरा,पाण्याची भांडी घेऊन वर चढून या,हा त्रासही वाचेल.”माझ्या सविस्तर विवेचनावर सगळेच खुश झाले.फक्त भाई सोडून.त्याच्याकडे पाहता येत नव्हते इतका त्याचा चेहरा खाली झुकला होता.

    मी अजून एक झटका दिला.”भाई,तुम्ही आज रात्री तर नाही पण उद्द्या सकाळी काम सुरु करू शकाल.माझा प्रतिनिधी म्हणून सचिन आणि पातेरेमामा आळीपाळीने हजर राहतील.काय?राहाल ना?’’शेवटचे दोन प्रश्न सचिन आणि पातेरेमामांना होते.दोघेही खुश झाले.माझे काम करताना निष्कारण झालेल्या त्यांच्या अपमानाची भरपाई यामुळे होणार होती.भाई एकटाच तिथून निघून गेला.
    आजी म्हणाली,”मेल्या भाईस काय अक्कल येत नाय.उताणी चालत होतो.”.सगळे हसू लागले.

    बाकीच्यांनी सुरेखाकडे पैसे जमा केले. आम्हीही डबा घेऊन निघालोच.सचिन आम्हाला रत्नागिरी स्टेशनवर सोडायला आला. त्याला उद्यासाठी सूचना देऊन आम्ही निघालो.भाई या दोघांना दाद देतीलच याची खात्री नव्हती म्हणून मयूही चक्कर टाकणार होताच.तेवढी सावधगिरी बाळगणे आवश्यक होतेच.कारण पातेरेमामा अजूनही दारू पीत होतेच,शिवाय आम्ही नसताना सचिनलाही भाई दमात घेऊ शकत होते.

    पण दुसऱ्या दिवशी मयूचा फोन आला. सगळे काम नीटपणे पार पडले होते.

    मार्च महिन्याची फवारणी करण्याआधी मी सुरेखाच्या यजमानांना फोन केला आणि पहिला तोडा नक्की १७ तारखेलाच करता येईल याचा अंदाज घेतला.मग फवारणीसाठी मी एकटीनेच जायचे ठरवले.कारण नवऱ्याला अधिवेशन काळात पुन्हा सुट्टी मिळणे अवघड होते.मयू तर असणारच होता माझ्या सोबतीला.त्याप्रमाणे दुसऱ्या शनिवार-रविवारी जाऊन वेखंडाची फवारणी यथासांग पार पडली.ही या मोसमातील शेवटची फवारणी होती.

    फळांनी सुरेख रंग आणि आकार धारण केला होता.ज्या फळांवर ऊन पडत असे त्याच्यावर शेंदरी छटा चढली होती.पाहूनच आनंद होत होता.देठाभोवती खड्डा पडू लागला होता.तीनचार दिवसातच काही फळे उतरवण्यासाठी तयार झाली असती.सचिनला डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवायला सांगून मी निघाले.त्य्नेही मला निश्चिंत राहायला सांगितले.”काकी,तुम्ही अगदी काळजी करू नका.मीपण इथेच असतो आता झोपायला.”

    चार दिवसांनी गुढीपाडवा.आदल्या रात्रीच्या गाडीने नेहमीप्रमाणे सकाळी मयू स्टेशनवर आला होता.हल्ली नेहमी सचिन येत असे आम्हाला घ्यायला रिक्षा घेऊन.पण यावेळी तो दिसला नाही. गुढीपाडवा आहे म्हणून आला नसेल बहुतेक.

    गावाला गुढी उभारणे हा एक सोहळाच असतो.नवा कोरा बांबू तोडून आणायचा,त्यला न्हाऊ,माखू घालून,नवे अगर सोवळ्याचे वस्त्र नेसवायचे,त्यावर ऐपतीप्रमाणे चांदीचे, तांब्याचे,पितळेचे भांडे पालथे घालायचे.साखरेच्या गाठींची माळ घालायची,हार घालायचा.नंतर अंगणात सारवलेल्या जागेवर रांगोळी घालून,पाट मांडून, त्यावर ही गुढी स्थापन करायची.मग तिची पूजा करायची.या सगळ्या कामांमुळे सचिनला यायला मिळाले नसेल,असा विचार करून आम्ही दुसरी रिक्षा करून फणसोपला सुरेखाकडे पोचलो.तिथे लक्षामामा टीमसह हजर होते. सचिन तिथेही नव्हता.

    पातेरेमामा सचिनला निरोप द्यायला त्याचा घरी गेले आणि आम्ही आंबे उतरायचे झेले, मोठे हारे, दोऱ्या इ. सामुग्री घेऊन आम्ही बागेत पोचलो.

    बागेत प्रवेश केला आणि मीच काय ,पण सुरेखाचे यजमानही दचकले”हे काय?हे काय?’’असे म्हणत झाडांजवळ जाऊन पाहू लागले.मीही त्यांच्यासोबत पाहू लागले चार दिवसांपूर्वी पाहिलेल्या चाळीस पन्नास तयार फळांचा पत्ता नव्हता.चोरी झाली की काय?मी तर अवाकपणे नुसतीच पाहत होते.काहीच सुचत नव्हते.

    इतक्यात पातेरेमामा आले.” म्हणाले,सचिनच्या आजीन् सांगाताल्यान् की,तो रत्नागिरीस गेलो हाय आणि त्याचो मामा काल आलेलो त्यास साचिनान् भेट देवच्यासाटी काळ आंबे उतरलान् म्हणून.”
    (क्रमशः)

    जीवनमानअनुभव

    प्रतिक्रिया

    जेपी's picture

    4 Mar 2016 - 10:06 pm | जेपी

    वाचतोय..
    तुमचे लेखन गौरी देशपांडे यांच्या "विंचुर्णीचे धडे" या पुस्तकाची आठवण करुन देते.

    पुभाप्र..

    एस's picture

    4 Mar 2016 - 11:45 pm | एस

    वाचतोय. पुभाप्र.

    वा! वाटच पाहत होते पुढच्या भागाची.. आता वेळ मिळाल्यावर लगेच वाचेन.

    श्रीरंग_जोशी's picture

    5 Mar 2016 - 12:40 am | श्रीरंग_जोशी

    हा भाई म्हणजे एकदम पोचलेला इसम आहे.

    मुक्त विहारि's picture

    5 Mar 2016 - 9:04 am | मुक्त विहारि

    एक विनंती आहे.

    पुढचा भाग जरा लवकर टाकलात तर उत्तम.

    किचेन's picture

    5 Mar 2016 - 9:17 am | किचेन

    भाग ८ व१३ दिसत नाहि

    नाखु's picture

    5 Mar 2016 - 9:34 am | नाखु

    पण फार विलंबाने टाकत आहात...

    खूप सुंदर.पुढिल भागाची वाट बघतिये.

    इशा१२३'s picture

    6 Mar 2016 - 10:31 pm | इशा१२३

    मस्त ! पु भा प्र.
    लवकर टाका.

    यशोधरा's picture

    7 Mar 2016 - 8:29 am | यशोधरा

    वाचते आहे सुरंगीताई..

    प्रियाजी's picture

    7 Mar 2016 - 3:16 pm | प्रियाजी

    पैसा, भाग लवकर टाक ना. खूप उत्सुकता वाटते.तुझ्या लेखन्शैलीमुळेही वाचताना खूप गंमत येते.

    पिलीयन रायडर's picture

    7 Mar 2016 - 11:38 pm | पिलीयन रायडर

    किती दिवस वाट पहातेय ताई! हा ही भाग मस्तच. अता पटापटा टाक ग!

    शेवटच्या ओळितला व्टिस्ट डेंजर आहे! पुढचा भाग लवकर टाका..

    विशाल चंदाले's picture

    10 Mar 2016 - 7:00 pm | विशाल चंदाले

    आज सगळे भाग एकदमच वाचले आणि एखादा चित्रपटच डोळ्यासमोर चालू आहे अस वाटलं.
    पुढील भाग लवकर येउद्या.