धडा

इडली डोसा's picture
इडली डोसा in जनातलं, मनातलं
22 Nov 2015 - 2:10 pm

नऊ - दहा वर्षांपूर्वीची गोष्ट . आमच्या कंपनीत आमचा एक ट्रेक करणारा ग्रुप होता. पुण्याच्या आसपास छोटे मोठे ट्रेक करायचो. कधी सकाळी जाऊन संध्याकाळी परत तर कधी मुक्कामी. फार भारी वाटायचं. कुठंही ट्रेकला जाताना नवीन कोणी सोबत येत असेल तर त्याला काय काय सोबत घ्यायचं , काय करायचं , कसं वागायचं याच्या असंख्य सुचना आम्ही द्यायचो. ट्रेकिंग म्हणजे 'अपने बायें हात का खेल'' असं झालं होतं.अशातचं एका मित्राने बातमी आणली कि नाशिक जवळ कुठेतरी दहा पंधरा दिवसांनी एक ट्रेकिंगची स्पर्धा होणार आहे. स्त्री, पुरुष आणि मिश्र अश्या तीन गटांत स्पर्धा होणार होत्या. मग काय आमची ग्रुप जुळवा जुळविची तयारी सुरु झाली. एक एक जण काहीतरी कारण देऊन सटकु लागला. शेवटी फक्त दोन मुलं आणि मी असे तिघेच उरलो. त्यामुळे मिश्र गटाचा असा आमचा ग्रुप ठरला. रोज सकाळी उठुन दोन किमी पळायचं संध्याकाळी जवळच्या टेकडीवर जायचं असा ट्रेनिंग प्लेन ठरला.

मी पळायला जायला तसा आळसचं केला. सकाळी वाटायचं संध्याकाळी ऑफिसमधून आल्यावर पळायला जाऊ आणि संध्याकाळी घरी आल्यावर काही ना काही कारण निघून राहून जायचं . तसं नाही म्हणायला दोन - तीन वेळा जवळच्या टेकडीवर जाणं झालं. तेच माझं ट्रेनिंग. बाकी दोघे मला सांगत होते कि ते रोज पळायला जातायेत. माझ्यामुळे ग्रुप मागे नको पडायला असे वाटुन मी पण मग एक दोन दिवस गेले पळायला . जास्त वेळचं नव्हता हातात. आज पळायला जाऊ उद्या पळायला जाऊ करता करता स्पर्धा उद्यावर येऊन ठेपली होती.

स्पर्धा नाशिक जवळ होती आणि रविवारी सकाळी लवकर सुरु होणार होती त्यामुळे आम्ही आदल्यादिवशीच नाशकात जाऊन राहिलो. दुसऱ्या दिवशी सात वाजता आयोजकांनी सांगितलेल्या ठिकाणी पोहोचलो. तिथून एक बस आम्हाला स्पर्धा जिथे सुरु होणार तिथे घेऊन जाणार होती. बसमध्ये आमच्या सारखेच इतर ग्रुप होते. त्यांच्याकडे बघून आम्ही कोण कोण आपल्याला 'कांटे कि टक्कर' देऊ शकतात याची चर्चा करु लगलो. आता थोडं दडपणही जाणवायला लागलं होतं. पण आम्ही आपले १००% देऊन स्पर्धा जिंकण्याचा निर्धार केला.

शेवटी एकदाचा तो स्पर्धा सुरु झाली असे जाहीर करणारा क्षण आला. आयोजकांनी शिट्टी वाजवली आणि एक एक ग्रुप पुढे सरसावू लागला. त्या बसने आम्हाला एका घाटात मध्येच सोडले होते. तो घाट उतरून आम्हाला आधि बसगड नावाच्या गडावर जायचे होते. त्यानंतर मध्ये थोडं जंगल आणि नदी पार करून हरगड नावाचा दुसरा गड सर करायचा होता. तो स्पर्धेतला शेवटचा टप्पा असणार होता. एका कागदावर स्पर्धेचा साधारण मार्ग दर्शवणारा नकाशा आम्हाला दिला होता. तोच आता आमचा मार्गदर्शक होता.

नियमांनुसार स्पर्धेच्या मार्गावर टाईम कंट्रोल (टिसी) आणि पॅसेज कंट्रोल (पीसी) असे दोन प्रकारचे थांबे अधून मधून असणार होते. आमच्याकडे एक कार्ड देण्यात आले होते. प्रत्येक थांब्यावर आमच्या कार्डावर शिक्के मारण्यात येणार होते. पीसी तुम्ही ठरवून दिलेल्या मार्गानेच जात आहात कि नाही ते तपासण्यासाठी आणि टाईम कंट्रोल तुमच्या ग्रुपची एकंदर वेळ नोंदवण्यासाठी होते. साधारण ८ वाजता स्पर्धा सुरु झाली. उत्साहाने आम्ही जवळपास पळतच तो घाट उतरला. बराच वेळ डांबरी रस्त्यावरून चालत पळत गेल्यावर एकदाचा पहिला टिसी थांबा आला. इथं पर्यंत पोहोचे पर्यंत आम्ही थोडे थकलो होतो. काही ग्रुप आमच्या पुढे होते तर काही मागे. अजुनही मिश्र गटात चुरस होती. खुल्या गटात मात्र एक गट विशेष लक्षवेधक ठरला होता. ही तीन मुले स्पर्धेच्या सुरुवाती पासून जे पळतच होती ती कधीच आम्हाला चालताना दिसली नाही. टाईम कंट्रोल थांब्यावरही सगळ्यात आधी तेच पोहोचले होते. या थांब्यानंतर मात्र डांबरी रस्ता सोडून जंगलातली वाट सुरु होत होती. आम्ही इथपर्यंत पोहोचायला दोन तास घेतले होते.

इथून पुढे बसगडाची चढाई करायची होती. आम्ही दिलेल्या नकाशाच्या आधारे मार्गक्रमण करत होतो. मध्ये एक दोन पीसी लागले आम्ही तिथे अजून गडमाथा किती लांब आहे याची चौकशी केली. पण अजून थोडं पुढे जा एक दोन टेकड्यांनंतर पोहोचालचं तिथे असे त्यांनी सांगितले. पुढच्या एक दोन टेकड्या म्हणजे जणुकाही एक दोन गडचं होते. त्यासंपेपर्यंत आमचा उत्साह बराच मावळला होता. आम्हाला तिघांना एका गतीने चढणे अवघड होत होते. मी चढताना सारखीच थांबत होते आणि त्यामुळे आमचा वेग मंदावला होता. कसही करुन गडमाथा गाठू आणि मग उतरताना जरा वेगात उतरू म्हणजे जे काही स्पर्धक आपल्या पुढे असतील त्यांना गाठता येईल अशी आमची खलबते चालू होती. अधून मधून तिघांच्याही पायात गोळे येत होते आणि मग आम्ही थांबुन पाणी पी ग्लुकॉन-डी खा असे करत पुढे जात होतो. वेळ भर दुपारची असली तरी वाटेवर बरीचशी झाडी असल्यामुळे उन्हाचा एवढा त्रास होत नव्हता. गडावर पोहोचण्याच्या थोडं खाली एक अतिशय चिंचोळी आणि धोकादायक वाट होती. एका बाजूला खडा काताळ आणि एका बाजूला खोल दरी. सावधपणे आम्ही तो टप्पा पार पाडला. ती पळणारी मुले गड उतरुन खाली येत होती. अजुनही ती पळतच होती. आम्हाला बघून थांबली. त्यांच्याकडुन कळालं कि ते पोलीस भरतीची तयारी करत होते आणि रोज १० किमी पळण्याचा त्यांचा रोज सराव खूप दिवसांपासून चालू होता. पोहोचाल गडावर ५ -१० मिनिटात असा धीर आम्हाला देऊन ते पुन्हा पळायला लागले. आम्हाला तेव्हढं अंतर पार करायला अर्धा तास लागला. शेवटी गडावर पोहोचलो. टीसी थांब्यावर शिक्का मारून घेताना कळालं की पुढच्या टीसीला आम्ही २ पर्यंत नाही पोहोचलो तर आमचा ग्रुप स्पर्धेतून बाद होईल. ते ऐकून सगळं बळ एकवटून आम्ही गड उतरायच्या मागे लागलो. आता उतरणीवर तर सटसट खाली येऊ असं वाटलं होतं पण कसचं काय आमच्या ग्रुप लीडरला उतरताना पायात बरेच गोळे येऊ लागले. त्यामुळे त्याची चाल खूपच मंदावली होती. गडमाथ्यावर आम्ही एक वाजता होतो. गड चढायला जरी आम्हाला तीन तास लागले होते तरी आपण एका तासात गड उतरून सहज पुढच्या टीसी थांब्यावर दोन पर्यंत पोहोचू असे आम्हाला वाटले होते. प्रत्यक्षात दोन वाजता आम्ही त्या थांब्या पासून फारच लांब होतो. जसे दोन वाजून गेले तसे आधी हळहळ आणि नंतर दडपणातून सुटका अश्या विचित्र मनस्थितीतून आम्ही गेलो. आता आपण स्पर्धेतून बाद झालो आहे तेव्हा जाऊ निवांत. आता घाई करायची काही गरज नाही असं आम्हाला वाटलं. कसे बसे तीन वाजता आम्ही त्या पुढच्या टिसी थांब्यावर पोहोचलो. आम्ही स्पर्धेतून बाद झालोच होतो पण आमच्या सारखेच खुल्या आणि मिश्र गटातले एक दोन ग्रुप तिथे होते जे आमच्या सोबत बाद झाले होते. सर्वानुमते आता हरगडाला जायची काही गरज नाही असे ठरले.

मग आता इथून लवकर बाहेर पडू म्हणुन जवळ नाशिकला जायला वाहन कुठे मिळेल याची चौकशी केली. तर हाय रे कर्मा तिथून अजून आठेक किलोमिटर चालून गेल्यावर एका पाड्याजवळ एसटी थांबा आहे आणि संध्याकाळी सहा ला तिथे नाशिकला जाणारी शेवटची बस येते असं कळालं. मग पुन्हा फरफट सुरु झाली. पण आता आमच्या सोबत बाकीचे ग्रुपवालेही होते. दिवसाच्या सुरुवातीला एकमेकांकडे स्पर्धक म्हणुन बघणारे आम्ही आता सहप्रवासी झालो होतो. त्यांचीही अवस्था आमच्या ग्रुपपेक्षा वेगळी नव्हती कोणी गड घाईत उतरताना पायाला लागून घेतलं होतं तर कोणाच्या पायाला चालून चालून फोड आले होते. सगळेच धीम्या गतीने एकमेकांना धीर देत चाललो होतो. हरगड जरी सगळ्यांनी टाळला होता तरी एक नदी आमच्या वाटेत आम्हाला ओलांडावीच लागणार होती. नदीत जास्त नाही पण गुडघाभर तरी पाणि होते. शूज ओले होऊ नये म्हणुन सगळ्यांनी ते हातात घेतले आणि त्यामुळे नदीतले गोटे टोकदार दगड लागून पायांना अजून जखमा झाल्या. पण सांगता कोणाला ? सगळे अर्जुन झाले होते. त्या पक्षाच्या डोळ्यासारखी आम्हाला ती सहाची एसटीच फक्त दिसत होती. आमची नऊ जणांची फौज क्षणभरच विश्रांती घेऊन पुन्हा चालायला लागली. एकमेकांना आधार देत 'साथी हात बढाना' सारखी गाणी म्हणत आम्ही चाललो होतो.

स्पर्धेच्या मार्गातून बाहेर पडुन आम्ही हा वेगळाच मार्ग घेतला होता त्यामुळे मध्ये टिसी ,पीसी नव्हते. त्यामुळे अंतराचा अंदाज येत नव्हता. जरी सांगणारा आठ किमी वर बसथांबा आहे म्हणाला होता तरी तो नक्की तेव्हढ्याच अंतरावर असेल याची काही खात्री नव्हती. एव्हाना साडेचार वाजून गेले होते आणि आम्ही एका कच्च्या रस्त्याला लागलो होतो. विशेष म्हणजे अत्तापर्यंत आम्हाला स्पर्धक आणि आयोजक सोडून दुसरा एकही माणूस दिसला नव्हता. त्यामुळे कोणाला रस्ता बरोबर आहे कि नाही हे विचारण्याचा प्रश्नचं नव्हता . आम्ही जो दिसेल तो रस्ता पकडून चाललो होतो. सुदैवाने अजून थोडावेळ चालाल्यावर एक आदिवासी पाडा लागला. त्यातल्या एकाशी बोलून कळाले कि आम्ही बरोबर रस्त्यावर आहोत आणि अजून अर्धा एक तास चाललो कि पोहोचू बस थांब्यावर. ऐकून हुश्श वाटलं. चालायला हुरूप आला. आपण वेळेत गाडी पकडणार अशी अशा वाटायला लागली. त्यामुळे कि काय आमची पाऊले त्यातल्या त्यात झपाझप पडू लागली.

आता थोडं अंधारून पण यायला लागलं होतं अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ झाला होता. रस्ता चढणीचा होता त्यामुळे सगळ्यांचा वेगही मंदावला होता. कोणीतरी पुढं जाऊन बस दिसली तर तिला थांबवावं असं सगळे म्हणत होते. पण पुढे जाणर कोण सगळेच लंगडे घोडे झाले होते. चढण संपेपर्यंत सहा वाजत आले होते. चढण पार केल्या केल्या आम्ही उभे होतो त्या उताराच्या खाली आम्हाला पडीक असा एसटी चा थांबा दिसल्या. सगळ्यांनी हुर्रे च्या आरोळ्या ठोकल्या. तेवढ्यात लांबून एसटी सुद्धा येताना दिसली. अरे देवा! आम्हाला अजून तो उतार उतरून त्या थांब्या पर्यंत पोहोचायला आमच्या गतीने पाचेक मिनिटं तरी नक्की लागणार होती. आता तो एसटी वाला नक्की आपल्याला सोडून जाणार म्हणून सगळे निराश झाले , दुसर्‍याच क्षणी उतारता उतरता कोणीतरी जोर जोरात ओरडायला सुरुवात केली. सगळ्यांनी मग त्याचं अनुकरण करत ओरडणे आणि हातवारे सुरु केले. त्यावेळी आम्ही किती दीनवाणे दिसलो असू ते त्या एसटी ड्रायवरलाच माहित. आमचा आरडाओरडा कामाला आला होता. ड्रायवर चक्क आमची वाट बघत थांबला होता. गाडीपाशी पोहोचून आम्ही त्याला असंख्य धन्यवाद दिले. त्याच्या चेहऱ्यावर 'त्यात काय एवढं ?' असे भाव होते. अर्थात त्याला आमची फरफट माहित नव्हती म्हणून.

सगळेच एवढे थकून गेलो होतो कि तिकिटे काढून झाल्या झाल्या कधी डोळे मिटले ते कळालं हि नाही. नाशिक बस स्टँड वर उतरताना पाय अक्षरश: मणा-मणाचे झाले होते. कसेबसे पाय फरफटत एका बस मधून उतरून दुसऱ्या पुण्याला जाणाऱ्या बस मध्ये चढलो. पहाटे कधीतरी आपापल्या घरी पोहोचलो. पेन किलर खाऊन मी झोपून गेले. दुपारी लंच नंतर जाऊ ऑफिसला असा विचार करून जरा उशीराचाच गजर लावला. सकाळी मैत्रिण जाताना हलवून गेली तिला पण लंच च्या वेळी फोन करून मी उठल्याची खात्री कर असं सांगुन मी परत झोपले. दुपारी तिचा फोन आला तरी मी झोपलेलेच होते. बापरे आता उठावं म्हणुन उठायला गेले तर एक सणसणीत कळ पायातून मस्तकात गेली. मला स्वत:च्या जोरावर पाय इकडून तिकडेही करता येत नव्हते. आता आपल्याला परत चालता येईल कि नाही या विचाराने मला रडू यायला लागलं. पण थोड्याच वेळात स्वत:ला सावरून मी हाताच्या आधाराने उठून बसले. पाय भयानक दुखत होते. पण थोडे थोडे हलवता येत होते. संध्याकाळी मैत्रिणीच्या आधाराने डॉक्टरकडे जाऊन आले. कोणतीही शारीरिक तयारी न करता अतिश्रम केल्याने आणि स्नायुंच्या डी-हायड्रेशन मुळे असे झाल्याचे त्यांनी मला सांगितले. मला याची थोडीफार कल्पना होतीच पण एवढा भयानक त्रास होईल असे वाटले नव्हते. तिथेच दृढ निश्चय केला कि इथून पुढे कोणताही ट्रेक किंवा असल्या स्पर्धा पुर्ण तयारीशिवाय करणार नाही आणि पुढच्या मोठ्या ट्रेकच्या तयारीसाठी मनात मनोरे रचायला सुरुवात केली.

जीवनमानkathaaप्रवासमौजमजाप्रकटनविचारलेखअनुभवमाहितीविरंगुळा

प्रतिक्रिया

मांत्रिक's picture

22 Nov 2015 - 2:22 pm | मांत्रिक

मस्तच! अगदी फ्रेश व अनोखा विषय! अगदी आवडला अनुभव! लेखनशैली सुद्धा खासच!

स्वाती दिनेश's picture

22 Nov 2015 - 2:32 pm | स्वाती दिनेश

अनुभव आवडला,
स्वाती

योगी९००'s picture

22 Nov 2015 - 4:20 pm | योगी९००

अनुभ॑व आवडला...लिखाण शैली सुद्धा आवडली.

नऊ-दहा वर्षापुर्वीचा हा अनुभव आहे. त्यानंतर काही प्रयत्न केलेत का?

इडली डोसा's picture

22 Nov 2015 - 10:33 pm | इडली डोसा

नंतर कोणत्याही स्पर्धेत भाग नाही घेतला पण भरपुर शरिरीक तयारी लागेल असे ट्रेक्स केले. ह्या अनुभवामुळे पुढे कोणताही अवघड ट्रेक करण्याआधी पुरेसा वेळ घेऊन नीट तयारी केली त्यामुळे नंतर असा त्रास कधी झाला नाही.

दत्ता काळे's picture

22 Nov 2015 - 4:33 pm | दत्ता काळे

अनुभव आणि लेखन आवडले.

"कोणतीही शारीरिक तयारी न करता अतिश्रम केल्याने आणि स्नायुंच्या डी-हायड्रेशन मुळे असे झाल्याचे त्यांनी मला सांगितले."

पॉइंट नोटेड

उगा काहितरीच's picture

23 Nov 2015 - 12:50 am | उगा काहितरीच

आधी ट्रेकवर जे लेख वाचले ते सगळे गुडी गुडी होते. ट्रेकची दुसरी बाजु दाखवून दिल्याबद्दल आभार..

मोदक's picture

23 Nov 2015 - 1:18 am | मोदक

अनुभव आणि लेखन आवडले.

अशा स्पर्धांच्या आधी किमान ६० / ७०% अंतर यशस्वी पूर्ण करण्याचा अनुभव असला की स्पर्धा सोप्या जातात असा एक आखाडा असतो. म्हणजे त्या दृष्टीने तयारी आहे की नाही हे लक्षात येते.

पुढील अनुभव वाचण्यास उत्सुक.

सहज करुन जाऊ असे वाटत असले तरी तसे नसते.

आमचा ट्रेकिंगचा एक अनुभव आठवला. हिमाचलमध्ये एका ठिकाणी बरेच खोल दरीत होतो. आठ दहा जणांचा ग्रुप होता. वरती येताना एका मुलीचा पाय घोट्यातून एवढा जोरदार मुरगळला की तिला उभं देखील राहता येत नव्हतं. मसाज कर, आयोडेक्स लाव असले सगळे प्रकार झाल्यावरही काही उपेग दिसेना. शेवटी अंधार पडायच्या आत तिला वरती घेऊन जाणं शक्य व्हावं म्हणून सगळ्यांनी तिला सांगितलं की दोन दोन जणं आळीपाळीनं खांद्यांचा आधार देतील तिला एका पायावर लंगडत लंगडत वर यावं लागेल. इलाजच नव्हता. तिची बॅकसॅक एकाने घ्यायची दोघांनी तिला सपोर्ट करायचा. मग दमले की खांदेबदल असे करत करत शेवटी दरीतून वरती यायला साडेतीन तास लागले. तसेच पुढे लंगडत बेसकँपला पोचायला रात्रीचे नऊ वाजून गेले होते. गुडुप अंधारात टॉर्चेस लावून कसेबसे पोचलो. तेव्हा स्वतःचीच नाही तर दुसर्‍याची जबाबदारी देखील येऊन पडू शकते त्यामुळे शारीरिक आणि मानसिक तयारी जबर लागते! :)

इडली डोसा's picture

23 Nov 2015 - 10:56 pm | इडली डोसा

कधी कोणती समस्या उद्भवेल काही सांगता येत नाही. त्या- त्या वेळी डोकं शांत ठेवलं तरच वेळ निभावुन नेता येते. हिमालयीन ट्रेक मधे तर अल्टिट्युड फॅक्टरपण तुमची वाईट अवस्था करु शकतो.

भाऊंचे भाऊ's picture

23 Nov 2015 - 8:23 am | भाऊंचे भाऊ

प्रीत-मोहर's picture

23 Nov 2015 - 8:46 am | प्रीत-मोहर

खूप छान लेखन इडो. हा धडा कायमचा लक्षात आहे.

अजया's picture

23 Nov 2015 - 9:00 am | अजया

व्यायामाच्या बाबतीत देखील हेच आहे.बिना वाॅर्म अप सराव नसताना अचानक हेवी कार्डिओ करणाऱ्या लोकांच्या पण असेच हात पाय गळ्यात येतात. तू या अनुभवाने धसकून न जाता ट्रेकिंग सुरूच ठेवलेस म्हणून कौतुक वाटले.

अमृत's picture

23 Nov 2015 - 9:32 am | अमृत

खरोखर ट्रेकची दुसरी बाजू सांगितलीत.

१०नंतर अभाविपच्या उन्हाळी शिबीरासाठी एका दुर्गम गावी गेलो होते तिथे दुसर्या दिवशी आजुबाजूच्या गावांचा सर्व्हे करायला जावं लागलं. त्या दिवशी भर उन्हाळ्यात काहीही तयारीविना केलेली २०-२५किमी ची पदयात्रा अजुनपण आठवली की अंगावर काटा येतो.वाटेत परत येताना भरपूर कैर्या तोडून आणल्या त्यामूळे रात्री जेवताना सगळ्यांना पन्ह प्यायला मिळालं होत. :-)

संदीप डांगे's picture

23 Nov 2015 - 10:42 am | संदीप डांगे

आताच्या वाळवंटात हिरवळ असलेला लेख.... आवडला.

मृत्युन्जय's picture

23 Nov 2015 - 10:47 am | मृत्युन्जय

मस्त लेख. ओघवत्या भाषेत लिहिल्याने अजुन आवडला. पुलेशु.

पद्मावति's picture

23 Nov 2015 - 12:15 pm | पद्मावति

खूपच मस्तं लेख.

बॅटमॅन's picture

23 Nov 2015 - 12:20 pm | बॅटमॅन

एक नंबर लेख. काश्मीर ट्रेक करताना माझीही अशीच अवस्था झालेली. तेव्हापासून पूर्वतयारी केल्याशिवाय कुठे जायचे नाही असे ठरवले आहे. (आणि बर्‍याच अंशी पाळलेही आहे.)

एस's picture

23 Nov 2015 - 12:55 pm | एस

पूर्वतयारी अशा ठिकाणी किती आवश्यक असते हे दाखवून देणारा लेख.

चांगला अनुभव आहे ,लेख आवडला !

आम्ही सुद्धा ह्या ट्रेक स्पर्धेला गेलो होतो. ६ जण होतो. पण आमचा वेगळाच किस्सा झालेला. पुण्याहून संध्याकाळी निघणार होतो. शिवाजी नगर हून एसटी ने जायच्या ऐवजी खासगी बसने जायचं ठरवलं आणि तिथेच चुकलं. ९ ला निघेल असं सांगितलेली बस खूप भांडण, मारामारी करुनही १२ च्या पुढेच निघाली. ७-७.३० ला नाशिक ला पोचलो. तिथून बसगड च्या पायथ्याला पोचायला परत एसटी आणि चालणं. स्पर्धा सुरू व्हायच्या आधीच बाहेर :). तरीहि विचार केला आलोय तर ट्रेक तरी करू. बसगड चढायला सुरूवात केली तर पब्लिक उतरत होतं. मग फुल्ल कल्ला करत बसगड केला आणि हरिहर स्किप मारून ५-५.३० वाजेपर्यंत शेवटच्या थांब्याला पोहोचलो. हरिहर स्किप झाल्याची खूप हूरहूर होती; त्यानंतर खूप दिवस हरिहर चुकत होता. मागच्या ४ वर्षात २ वेळा केला :).

रच्याकने अश्याच धड्यांचे नंतर किस्से होतात. ;)

इडली डोसा's picture

23 Nov 2015 - 10:59 pm | इडली डोसा

आम्हाला मात्र स्पर्धेच्या नादात ते निसर्गसौंदर्य नीट अनुभवताही आलं नाही. पुन्हा तिथे परत जायला मला नक्की आवडेल.

अभिजीत अवलिया's picture

23 Nov 2015 - 8:56 pm | अभिजीत अवलिया

ह्यावरून आम्ही मित्रांनी ऐन उन्हाळ्यात मे महिन्यात प्लान केलेला तोरणा ट्रेक आठवला. मुळात किल्ला किती अवघड आहे, वर पोचायाला किती वेळ लागेल ह्याचा काहीही अभ्यास न करता ट्रेक प्लान केला. पुण्याहून सकाळी लवकर निघून ८ वाजेपर्यंत वेल्हे गावी पोचायचे. तिथे नाश्ता करून थोडे खाण्याचे सामान बरोबर घेऊन किल्ला सर करायचा असे ठरले. पण सगळी आळशी मंडळी उठून वेल्हे मध्ये पोहचेपर्यंतच दुपारचे १२ वाजले. मग सर्वांनी तिथेच मुर्खासारखे भरपेट जेवण केले नी थोडेसे खाण्याचे सामान घेऊन किल्ला सर करायला सुरवात केली. मे महिन्यातले रणरणते उन, त्यात केलेले भरपेट जेवण. अवघ्या अर्ध्या तासात जवळचे पाणी देखील संपत आले. कसे बसे अजून १० मिनिटे चढलो आणी तेवढ्यात गडावरून काही गावकरी मंडळी येताना दिसली. वर पोचायला किती वेळ लागेल असे सहज विचारले तर लागतील तुमच्यासारख्यांना ४-५ तास तरी असे उत्तर मिळाले. लक्षात आले की कुत्रे देखील आपले हाल खाणार नाही आहे. गपगुमान सगळे खाली येउन पुण्याला परत आलो.

इडली डोसा's picture

23 Nov 2015 - 10:59 pm | इडली डोसा

तोरणाचे असे खूप किस्से ऐकुन आहे. कधी जायचा योग आला नाही याची हळहळ वाटते.

प्रतिसाद दिल्याबद्दल सगळ्यांचे आभार.

मधुरा देशपांडे's picture

24 Nov 2015 - 2:11 am | मधुरा देशपांडे

अनुभवकथन आवडले. अजून वाचायला आवडेल. खूप अवघड असे ट्रेक्स फारसे केले नाहीत, पण सोपे ट्रेक्स-ट्रेल्स करतानाही सुरुवातीला आणि आता, यात सवयीने बराच फरक पडलाय.

वेगळ्या प्रकारचे लेखन आवडले. नाहीतर याआधी ट्रेकचे फोटू, चढाईदरम्यान मित्रांच्या झालेल्या गोष्टी वाचायला मिळायच्या पण स्पर्धा असताना नक्की काय होते ते वाचायला आवडले.

विदुला's picture

7 Apr 2017 - 2:40 am | विदुला

छान लेख.

मस्त लेख.. वेगळाच अनुभव. लेख आवडला.