( १.यल्लम्माच्या आवारातल्या कथा आता 'शिंदळ' याच नावानं टंकत जाईन, प्रत्येक कथा स्वतंत्र ठेवण्याचा प्रयत्न असेल, अर्थात वाचकांना आवडले तरचं, उगाच मिपाची बँडविड्थ खर्ची नको- आभार
२. केवळ एक पार्श्वभुमी म्हणुन 'शिंदळ' ही कथा वाचा. www.misalpav.com/node/32762 )
शिंदळ : आक्रमकांची नवी फळी
यल्लम्माचं देऊळ गर्द अंधारात उभं होतं.
देवळाच्या चहुबाजुंनी प्रदक्षिणेसाठी कठडा होता. देवळासारखाच लहान. त्यावरच दत्ता पहुडला होता.
देवीची ओवाळणी लुटणारे इतर लहानगे चोर कधीच घरी परतले होते. एखाद-दुसरा मागे रेंगाळायचा, 'मोठ्या' मंदिराच्या अवजड पायऱ्यांवर बालसुलभ खेळ खेळायचा.
जेवणाच्या वेळा होत आल्यावर त्यांच्या आया त्यांना गावभर शोधत फिरायच्या.
अकस्मात आलेल्या आयांना बघुन ती लहानगी कारटी सैरावैरा पळत सुटत. त्यांच्याच घराकडे.
बेसावध क्षणी एखादं कारटं जागीच सापडायचं, पाठीत धपाका खायचं, बखोटीला धरून त्यांना ओढलं जायचं, जोरदार भोकाड पसरवणाऱ्या त्या लहानग्या कारट्याची वरात घरापर्यंत निघायची. कोणी एखादा खडतुस वटसरू वाकुल्या दाखवुन त्याला चिडवायचा. तसा त्या कारट्याला अजुनच चेव चढायचा, आवाज टिपेला पोहोचायचा, पायतानं झाडली जायची, बखोटीतुन सुटण्याचा आटोकाट प्रयत्न व्हायचा. बघणारे लांबुन मज्जा घेत, हा तमाशा नेहमी चाले.
पण दत्ताची आई त्याला शोधत आजपर्यंत कधीच आली नव्हती.
दत्ता हुशार मुलगा होता. भुऱ्या केसांचा, तपकिरी डोळ्यांचा, अल्लड वयातला.धुर्त, कावेबाज.
डोळे अगदी गरीब करून बोलायचा, समोरच्याला आपला लळा लावायचा.
रात्री अपरात्री टग्यांच्या टोळीत भटकायचा.
ही टग्यांची टोळी मुरलेल्या मातब्बर पोरांची.
कुणी त्याच्या वयाहुन थोराड, तर कुणी समवयस्क, कधी मधी एखाद-दुसरा मागे रेंगाळलेला चिंटुकला चोर ऊसळत्या ऊत्साहाने टोळक्यात सामील व्हायचा.
हे टोळकं ओढ्याच्या काठानं फिरत रहायचं. हातात सायकलचा जळता टायर घेऊन पाण्यातले खेकडे पकडण्याचा त्यांचा आवडता खेळ खेळायचं.
मिट्ट अंधारात दत्ता पाण्यात उतरायचा, बुवा त्याला जळत्या टायरने वाट दाखवायचा. गाळात हात घालुन दत्ता बऱ्याचदा दगडधोंडेच बाहेर काढायचा. निराश न होता तो आणखीनच खोलवर जायचा, काठावरल्या झाडाझुडपांच्या सांधीत तो खेकड्यांची बिळं शोधुन काढायचा. टायरच्या वासानं खेकडे बिळाच्या बाहेर येतात अशी त्या टोळक्याची घट्ट समजुत होती. बिळाबाहेर टायर धरला जायचा, बराचवेळ खेकडा बाहेर यायचा नाही. पण त्या अंधुक प्रकाशात बिळात थोडी हालचाल जाणवली की दत्ता लगेच झडप घालुन सगळा चिखल बाहेर काढायचा. हातातल्या चिखलात खेकड्याच्या नांग्या वळवळताना जाणवायच्या.
टोळकं हर्षोल्लित व्हायचं. हुऱ्ह्या-तुऱ्यांचा गदारोळ उठायचा.
तासाभराच्या मेहनतीत चार दोन खेकडे सहज मिळून जायचे. मिळालेले खेकडे वडाच्या झाडाखाली बसुन शेकोटीत खरपुस भाजले जायचे. नांग्यानांग्यांची वाटणी व्हायची. टणक कातडीच्या आतले पिवळट डेडाळ चिमुटभर पुडीत बांधुन आणलेले मीठ टाकुन चवीचवीने चाखले जायचे. माळकरी बुवा पण न रहावुन एखादा तुकडा गटकवायचा.
हा बुवा दत्ताचा खास दोस्त, हेटाळण्या झेलुन घेण्यात अव्वल. त्याचं घरदारं माळकरी, म्हणुन त्याला सगळे बुवाच म्हणत. केस कधीही कंगवा न फिरवल्यासारखे अस्ताव्यस्त, पण एका विशिष्ट लयीत. चेहऱ्यावर मख्खपणाचा बाजार, दाताड बाहेर आलेले. यांची भांडणंही बघण्याजोगी. आयली कुयली प्रकारच्या शिव्यांची यांच्याकडे बरीच सामग्री होती, ऐकणाऱ्यांची हसुन हसुन मुरकुंटी वळायची. कधीमधी दोघंही हातघाईवर यायची, थोराड टगे त्यांना अजुनच उचकावायचे. यातुनच गटतट पडायचे. दत्ता आणि बुवाला पुढे करून एकमेकांना शह द्यायचे. हा गदारोळ रात्री उशीरापर्यंत चालायचा.
लांबुन येणारं एखादं भटकं कुत्रं जरी दिसलं तरी हे टोळकं त्याच्या मागे दगडं घेऊन धावायचं. चौकाचौकात कुत्र्याचा पिच्छा पुरविला जायचा. सांधी कोपरे, पानटपऱ्या, झाडा-झुडपात लपलेल्या कुत्र्यांना शोधुन त्यांच्यावर यथेच्छ दगडफेक व्हायची. वर्मी घाव बसलेल्या श्वानांच्या कर्कश्य किंकाळ्या, टग्यांच्या आरोळ्या, शिव्यांच्या लाखोल्या याने यल्लम्माचा परीसर दणाणुन जायचा. या अथक परीश्रमाने टग्यांचे डोळे पेंगाळायचे. तसा तसा टोळक्यातला एकएक 'हिरा' घरी सुटायचा.
कोणी हळुचकन व्हरांड्यात झोपलेल्या भावंडांच्या पांघरूनात शिरायचा, तर कोणी मागल्या दारानं दबकत दबकत घरात प्रवेश करायचा. कोणी ग्रामपंचायतीच्या आवारात, तर कोणी यल्लम्माच्या छतावर चढुन गच्च ताणुन द्यायचा. कीर्र अंधारात गाव निपचित पडायचं.
गावाचं हे रूपडं अंगावर यायचं.
दत्ताचे दिवस हे असे भरीव चालले होते. असं नाही की त्याच्या घरी कमालीचं दारिद्र्य होतं. किंबहुना कुणाच लहानग्याच्या घरी नव्हतं. दिवसभर ही चिल्लीपिल्ली खेळायला म्हणुन एकत्र यायची. खेळात खेळ म्हणुन नैवैद्यही लुटायची. लुटापुटीच्या या खेळात त्यांच्या पोटांची खळगीही भरायची. एखादा अभागी लहानगा जीव मात्र केवळ भुकेले पोट भरण्यासाठीच अपरीहार्यपणे या खेळात ढकलला जायचा.
दत्ताही यातलाच. बाप खांदायला, आई शेळ्यांवर, मोठा भाऊ कधीच घरातुन पळालेला.
घराला दिवसभर कुलुप. किल्ली बाहेरच्या दिवळीत. दत्ताच्या भुकेसाठी.
भुक लागली की दत्ता घरी रायचा, सोबत चार दोन बालगोपाळ घेऊन. थकलेले, भुकेलेले ते लहानगे जीव दत्ताच्या घरी जेवते व्हायचे. कोणी घरूनच बांधुन आणलेला शिधा सोडायचं, कोणी देवळातले नैवैद्य घेऊन यायचं, तर कोणी दत्ताच्या ताटातलं भाकर कालवण यथेच्छ झोडायचं. या साग्रसामंत मेजवाण्या ऐण दपारी चालायच्या. प्रफुल्लित पोटाने हे लहानगे वीर नव्या ऊत्साहाने गावभर उंडारायला मोकळे व्हायचे.
सणावाराच्या दिवशी ते यल्लम्माला कधीच सोडायचे नाहीत. वेगवेगळ्या चवीचे नैवैद्य, पुरणपोळ्या, येळवण्याची आमटी, साखरभात, केळी, कोवळ्या नारळाचं लुसलुशीत खोबरं यांचा चवीचवीनं फडश्या पाडला जायचा. जोरदार आर्थिक कमाई सुद्धा व्हायची. मिळालेली कमाई थोडी थोडी करत गोळ्या बिस्किटांवरच खर्च व्हायची.
दत्ता या लहानग्या चोरांचा आवडता प्राणी, टग्यांच्या टोळीचंही बरचसं अडायचं त्याच्यावाचुन. बेरकी दत्ता असा दोन्ही गटात सक्रिय होता. आपली विशेष निकड दोन्ही गटांना जाणवुन द्यायचा.
दिवस सरत गेले, दत्ता संसारी झाला.
पोटासाठी आता तो रोजंदारीवर कामं शोधायला लागला.
त्याचं यल्लम्मा कडं येणं आपसुकच बंद झालं.
जगायच्या रहाटगाड्यात त्याला ते जमत नसे
दिवसभरं रोजंदारीसाठी तो गावाबाहेर, त्याची बायली गवताचं भारं आणायला रानोमाळ भटकलेली. घराला कुलुप. किल्ली दिवळीत. त्याच्या ईवल्याश्या छोटुकल्या पोरीसाठी.
दिवसभर ही ईवलीशी पोर वट्यावर बसुन एकटीच खेळायची, भेसुर रडायची, कधीमधी एखादी शेजारीन येऊन तिला दोन घास भरवायची.
ईवलुशी छोटुकली रडणं विसरत चालली. परिस्थितीपुढं निब्बर होत राहीली. लहानग्या चोरांच्या नादात तिची दुडुदुडु पाऊले एके दिवशी नकळतपणे यल्लम्माकडं वळली. बोजड देवळाकडं विस्फारल्या डोळ्यांनी पाहुन उत्तुंग शहारली.
यल्लम्माचं देऊळ तिला बघुन खुदुखुदु हसलं.
गावकऱ्यांनी वाऱ्यावर सोडलेली ही 'शिंदळ' देवळावर राज्य करायला आता सज्ज झाली होती.
प्रतिक्रिया
13 Sep 2015 - 2:01 pm | जेपी
मस्तच हो!!
13 Sep 2015 - 2:02 pm | एस
क्लास! चेतनागुणोक्ती आवडली.
13 Sep 2015 - 2:07 pm | एक एकटा एकटाच
पुन्हा एकदा
अभिनंदन स्विकारा मालक
मस्तच
अजुन येउद्यात
13 Sep 2015 - 2:09 pm | ज्ञानोबाचे पैजार
आवडली
खरेच मस्त लिहिली आहे.
येउद्या अजून.
पैजरबुवा,
13 Sep 2015 - 2:16 pm | पद्मावति
काय जबरदस्त लिहिलंय!
ते गाव, यलम्मा चे देऊळ, लहान चोर, टगे, अक्षरश: आमच्यासमोर प्रत्यक्ष उभे केलेत. सुरेख.
13 Sep 2015 - 2:21 pm | विशाल कुलकर्णी
सुरेख...
13 Sep 2015 - 3:00 pm | कैलासवासी सोन्याबापु
अप्रतिम!!
13 Sep 2015 - 3:14 pm | बोका-ए-आझम
कथा पण सुंदर.
13 Sep 2015 - 3:18 pm | सस्नेह
'येळवण्याची आमटी' फारा दिवसांनी भेटली !
13 Sep 2015 - 3:27 pm | प्यारे१
+१११
आवडली गोष्ट.
13 Sep 2015 - 4:17 pm | अभ्या..
अप्रतिम लेखन. त्या वातावरणात राहिल्याशिवाय ही भाषा येत नाही.
लुटूपुटूच्या "व्हय न्हाय अन लै" वापरुन लिहिलेल्या कथांपेक्षा हा अस्सल अनुभव अधिक उजवा.
13 Sep 2015 - 5:06 pm | हेमंत लाटकर
छान. पुढची कथा लवकर येऊ द्या
13 Sep 2015 - 5:36 pm | डॉ सुहास म्हात्रे
परत तेच म्हणतो. चित्रदर्शी लेखनशैली ! सगळा परिसर पोरांसकट डोळ्यासमोर उभा राहिला. पुभाप्र.
13 Sep 2015 - 7:45 pm | जव्हेरगंज
धन्यवाद मित्रहो.
यल्लम्माच्या आवारात बक्कळ कथा घडल्यात.
पण रोजरोज यल्लमाचे धागे टाकने बरं दिसणार नाही.
वेगवेगळ्या संमिश्र कथा टंकत जाईन.
अवांतर- आपले लिखाण लोकांना आवडते यासारखा दुसरा आनंद नाही.
13 Sep 2015 - 8:29 pm | चाणक्य
मस्त. पुभाशु.
13 Sep 2015 - 11:03 pm | चांदणे संदीप
वाचण्याआधीच तुम्हांला दंडवत ____/\____
आता वाचतो! (परत एकदा गावात जाण्यासाठी)
13 Sep 2015 - 11:19 pm | चांदणे संदीप
अप्रतिम लिहिलं आहे!
पण पुन्हा तेच झाल! शेवटच्या घासात खडा यावा आणि आधीच्या जेवणाची तृप्ती नकळत विरून जावी तस वाटल शेवटी 'शिंदळ' वाचून. कदाचित आमच्या भागात ह्या शब्दाचा अर्थ फारच वेगळा आहे.
माझ्या माहितीनुसार तरी एखादी मुलगी/स्त्री समाजात नावाला 'बट्टा' लागेल अस काही जोपर्यंत करीत नाही तोपर्यंत ती 'शिंदळ' ठरत नाही! त्यामुळे तुमच्या दोन्ही कथेतल्या चिमुरड्यांना 'शिंदळ' म्हटलेल अजूनतरी झेपलेल नाही. :(
पण, हेही मान्य करतो तुमच्या भागात मोकळ सोडलेल्या मुली/स्त्रिया यांना 'शिंदळ' म्हणत असावेत, त्यामुळे चालेल!
परत एकदा सांगतो, कथा अप्रतिम आहे!
14 Sep 2015 - 12:18 am | dadadarekar
छान
14 Sep 2015 - 12:58 am | उगा काहितरीच
मस्त ! आवडली कथा .
14 Sep 2015 - 1:48 am | किसन शिंदे
लेखनशैली सुंदर आहे फार तुमची. वाचकाला दाखवायचे असलेले चित्र शब्दाशब्दातून व्यवस्थित उभं करता आहात लेखनात.
14 Sep 2015 - 6:20 am | इडली डोसा
डोळ्यासमोर सरकत जाते कथा... आवडली.
14 Sep 2015 - 7:31 am | सिरुसेरि
छान कथा . देवीची ओवाळणी लुटणारे इतर लहानगे चोर म्हणजे "लहान मुले" का "उंदिर" ?
'शिंदळ' या शब्दावर आधारीत "सुई शिंदळ , घाली गोंधळ" असा वाक्प्रचार , म्हण ऐकण्यात आहे . तेव्हा 'शिंदळ' म्हणजे 'लहान' असाही अर्थ असतो का ?
14 Sep 2015 - 8:07 am | जव्हेरगंज
@ सिरुसेरि,
केवळ एक पार्श्वभुमी म्हणुन 'शिंदळ' ही कथा वाचा. www.misalpav.com/node/32762 )
यात तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळेल.
14 Sep 2015 - 11:36 am | बाबा योगिराज
जव्हेर भौ, येक लम्बर........
दोन्ही कथा आवडल्या.
और दिखाओ और दिखाओ...............
14 Sep 2015 - 11:51 am | नाव आडनाव
कथा आवडली.
14 Sep 2015 - 12:47 pm | बॅटमॅन
कथा लयच आवडली, एकदम अस्सल आहे.