यल्लमाच्या पायऱ्यावर सुनी संध्याकाळपर्यंत बसुन होती.
दिवसभर देवळात भक्तांची रेलचेल होती.
त्यांनी देवीपुढं ठेवलेले पुरणपोळी, शिकरण, नैवैद्य तिनं एका आडबाजुला साठवले होते.
आज दिवसभरं ती तेच खात होती.
अंधारायला आल्यावर सगळा प्रसाद फडक्यात बांधुन घराकडे चालु लागली.
यलम्माच देऊळ अगदीच लहान, एकाच खोलीचं.
पण इथे गुरव नव्हता म्हणुन सुनीनं बस्तानं बसवलेलं.
गुरवं सगळी तिकडे मोठ्या देवळाकडं, तिकडं ती कधीच जायची नाही.
नैवैद्य चोरणाऱ्या गावातल्या पोराठोरांना गुरवं हुसकावुन लावायची.
पण या 'मोठया' देवळाकडं जाणारा प्रत्येक भक्त यल्लम्माकडं यायचाच, एखादातरी नैवैद्य आणि थोडीफार चिल्लर देवीला ओवाळायचा.
देवीची ही ओवाळणी लुटायला गावातली पोरठोरं टपुन बसलेली असायची.
त्यातलीच एक सुनी, या लुटापुटीच्या खेळात सराईत झालेली.
सुनी असेल दहा-बारा वर्षांची, काळीभोर, चुणचुणीत.
तिच्याचसारख्या लहानग्या चोरांशी मात्र जोरदार भांडायची.
ते लहानगे चोर पण काही कमी नव्हते, गटागटाने येऊन तिचे आडबाजुला ठेवलेले नैवैद्य चोरून पराक्रम गाजवायचे.
खरतरं सुनीला हा खेळ मनापासुन आवडायचा.
घनघोर लढाया व्हायच्या, आक्रमणांचे नवे डावपेच आखले जायचे, तटबंद्या ऊधळुन दिल्या जायच्या, पण सुनी सगळ्यांना पुरून उरायची.
ईवल्यांचे महायुद्धच जणु. रोजचेच.
पण सुनी अजुन तरी अपराजित होती, यल्लम्मावरची तिची अलिखित सत्ता बिनघोर बजावत होती.
नैवैद्याचं फडकं घेऊन सुनी घरी आली.
आई कधीच अंथरूणाला खिळलेली, बाप अस्सल दारूडा, पिटुकला भाऊ मात्र तिच्या मागे मागे करायचा.
वनी, तिची मोठी बहीन वनिता, मुंबईला लग्न होऊन गेलेली. झोपडपट्टीत.
कधीमधी यायची, मुंबईच्या मोठमोठ्ठाल्या बाता सांगायची.
पण तिच्या एकंदर दशेवरुन सुनीला मुंबई कधीच आवडली नाही.
नकळत्या वयापासुन तिला यल्लम्माआईच जवळची वाटत आलेली.
दिवसभराच्या धावपळीने सुनी कंटाळली होती.
पिटुकल्या भावापाशी जाऊन सताड उघड्या डोळ्यांनी झोपली.
आधी ती देवळातच झोपायची, पण वासनांध टग्यांच्या भिरभिरत्या नजरांना घाबरून ती रात्रीचं घरीच यायला लागली.
सकाळ झाली. सुनी गावविहीरी कडं आंघोळीला निघाली.
पोहण्यात तिला अपरिणीत आनंद भेटायचा.
सकाळचा हा क्षण खास तिच्या आवडीचा.
बायका दंडावर धुणं धुत असताना हि मात्र कठड्यावरून मोठमोठाल्या खुपश्या टाकायची.
बायका नाकं मुरडायच्या, पोरीच्या जातीला हे बरं दिसत नाही म्हणायच्या.
तशी ती गावभवानीच होती, बायका तिला तुसड्यावानी वागवायच्या.
एखादी डांबरट बाई तिच्या झिपऱ्या धरून घरापर्यंत जायची. सुनी तेव्हा अगदीच बापुडी वाटायची.
या सगळ्याला ती आता सरावली होती.
आपली अवखळ नजर बायकांवर फेकुन रोजचा पोहण्याचा कार्यक्रम चालु ठेवायची.
मनसोक्त डुंबल्यावर सुनी पुन्हा घराकडं निघाली.
आईनं केलेलं चहा-पाव खाऊन तिला यल्लम्माकडं धावायचं होतं.
पण घरी वेगळीच गडबड चालु होती.
सुनीला उजवण्यासाठी गावातला बामनं आला होता. मुंबईचा वनीचा नवराही हजर होता.
नात्यागोत्यातल्या चार टाळक्यांच्या साक्षीनं सुनी सौभाग्याच्या पवित्र बंधनात अडकली.
वनीचा उष्टा नवरा तिचा जन्मोजन्मीचा साथीदार झाला.
कोवळ्या वयातली सुनी आता 'बायली' झाली होती.
थोरामोठ्यांचा आशिर्वाद घेऊन ती जोडीनं मुंबईला निघाली.
यल्लम्माच्या देऊळापाशी येताच तिची पाऊले थबकली.
भक्तिभावाने हात जोडत जराशी गहिवरली, जडभरल्या डोळ्यांनी अश्रुंची फुले वाहली.
गावकऱ्यांनी वाऱ्यावर सोडलेली ही 'शिंदळ' आज यल्लम्माला पोरकं करून चालली होती.
यल्लम्माचं देऊळ तिच्याकडं बघत विषण्ण हसलं.
ते लहानगे चोर कुतुहलाने तिच्याकडे पहात होते.
आत्ता यल्लम्मावर त्यांची अनिर्बंध सत्ता असणार होती. म्होरक्याच्या निवडीसाठी नवनव्या आघाड्या, डावपेच, कुटनीती ठरल्या जाणार होत्या.
हा खेळ अनादिकाळापर्यंत असाच खेळला जाणार होता.
प्रतिक्रिया
11 Sep 2015 - 9:29 pm | एक एकटा एकटाच
मस्त लिहिलीय
11 Sep 2015 - 9:33 pm | कविता१९७८
मस्त कथा, आवडली
11 Sep 2015 - 9:40 pm | एस
अतिशय ताकदीने लिहिलेली आणि फार वेगळी कथा. फक्त सर्व वाक्यांमध्ये जास्त करून भूतकाळ वापरायला हवा होता. शेवटचा परिच्छेद आहे तसा चांगला आहे. आणि कथा अजून खुलवता आली असती असे वाटले. अर्थात हे माझे वैयक्तिक मत झाले.
लिहीत रहा. ताकद आहे तुमच्या लिखाणात.
11 Sep 2015 - 9:56 pm | जव्हेरगंज
धन्यवाद स्वॅप्स,
आपला सल्ला विशेष आवडला. यावर नक्कीच विचार करीन.
अजुनही काही सल्ले आले तर स्वागतच आहे.
11 Sep 2015 - 10:06 pm | कैलासवासी सोन्याबापु
भाऊ जव्हेरगंज ,
दंडवत घ्या !! _/\_ काय लिहिलंय राव काय लिहिलंय!!सामाजिक कथा लिहिताना शेवटी वाचका समोर प्रश्न फेकायची लक़ब अन लहजा! मंटो वाचला आहे का तुम्ही? नसल्यास वाचा हे गॉड गिफ्ट अजुन झळाळुन उठेल!!
दिल जीत लिया भाई आपने!
(बालके) बाप्या
11 Sep 2015 - 10:45 pm | जव्हेरगंज
धन्यवाद सोन्याबापु,
आपल्या उत्स्फुर्त प्रतिसादाबद्दल विशेष आभार.
मंटो अजुन वाचला नाही. पण जरूर वाचेन.
11 Sep 2015 - 10:10 pm | सस्नेह
छान लिहिलय. अजून खुलवता यावी कथा.
शैली परिणामकारक आहे.
12 Sep 2015 - 6:03 pm | जव्हेरगंज
नोंद घेतलीय ताई.
11 Sep 2015 - 10:12 pm | पैसा
सुंदर लिहिलंय!
11 Sep 2015 - 10:44 pm | रेवती
कथा आवडली.
11 Sep 2015 - 11:17 pm | प्यारे१
+१ पैसा +१ रेवती.
सुन्दर लिहिलंय कथा आवडली.
11 Sep 2015 - 11:49 pm | रातराणी
सुंदर! परिणामकारक. डोळ्यासमोर उभी राहिली सुनी.
11 Sep 2015 - 11:55 pm | चाणक्य
आवडलं.
12 Sep 2015 - 12:05 am | चांदणे संदीप
कथा उत्तम!
फक्त शीर्षक नाही रूचल :(
बाकी, तुमच्या लिखाणात गाव दिसत! :)
12 Sep 2015 - 12:05 am | ज्योति अळवणी
कमी शब्दात अत्यंत परिणामकारक लिहील आहे.
12 Sep 2015 - 1:02 am | उगा काहितरीच
शिंदळ म्हणजे ?
12 Sep 2015 - 2:06 am | बोका-ए-आझम
मस्त कथा जव्हेरगंज! झुलवा या उत्तम बंडू तुपे यांच्या कादंबरीची आठवण झाली.
13 Sep 2015 - 9:06 am | जव्हेरगंज
‘मला येगळ्या वाटंनं जायाचंय्, ही मळल्याली वाट सोडून चालायचय्-’
व्वा मस्तच आहे. बुकगंगा वर काही पाने वाचली. गावरान शैली. मस्तच.
www.bookganga.com/Preview/BookPreview.aspx?BookId=5266439527779602785&Pr...
12 Sep 2015 - 3:26 am | पद्मावति
कथा खूप आवडली.
तुमची लेखन शैली अतिशय प्रभावी आहे. लिहीत राहा.
12 Sep 2015 - 4:45 am | कंजूस
लेखकास उगाच अमक्यासारखं लिही वगैरे सल्ले देणं म्हणजे ताजमहाल बांधणाय्रांस ------.
यल्लमा आणि तिथे काय चालतं/चालत होतं याचं कथारुपात वर्णन आवडलं.
12 Sep 2015 - 6:05 pm | जव्हेरगंज
:)
12 Sep 2015 - 8:43 am | जेपी
कथा आवडली.
12 Sep 2015 - 9:38 am | दमामि
मस्त!!!!
12 Sep 2015 - 10:47 am | नाखु
मामो ऑनः
"ही तसेच आधीची "भागी" एक बिर्याणी (बुंगाट लेखमाला द स्केअरक्रो),कुरकुरीत पापड आणी बरीच भेळपुरी आम्ही दोघ जसं सोसल(रूचेल) तितकच खातो,पचलं तर पाहिजेना पण म्हणून ऊठ्सूठ अन्नाला नावे ठेऊ नये असे आम्चे "हे" म्हणतात"
मामो ऑफ
मामो पंखा नाखु
12 Sep 2015 - 11:17 am | नीलमोहर
छान लिहीली आहे कथा..
12 Sep 2015 - 11:17 am | डॉ सुहास म्हात्रे
तुमची शैली सुंदर चित्रदर्शी आहे. कथा अर्थातच आवडली !
कारणाशिवाय प्रत्येक वाक्याला नवी ओळ करण्याने वाचन तुटक होते. त्यापेक्षा वाक्ये सलग ठेऊन आहेत तेच पॅराग्राफ वापरून आहे तेच लेखन जास्त प्रवाही वाटेल.
12 Sep 2015 - 6:09 pm | जव्हेरगंज
डॉक्टरसाहेब आभार.
चतुरभ्रमणध्वनीवरून टंकल्याने अंदाज लागत नाही.
काळजी घेईन.
12 Sep 2015 - 12:45 pm | सविता००१
खूप वेगळी आहे आणि छानच लिहिली आहे. पण शीर्षकाचा अर्थ काय आहे?
12 Sep 2015 - 6:18 pm | जव्हेरगंज
सविताताई धन्यवाद, वरती उगा काहितरीच यांनीही हाच प्रश्न विचारलाय.
खेडेगावात कुणाही बाईच्या बोलण्यात हा शब्द एखाद्यीविषयी तिरस्कार दर्शविन्यासाठी नेहमी येतो.
@संदिप - ते उपरोधात्मक वापरले आहे.
मामो खुसखुशीत :)
12 Sep 2015 - 11:49 pm | पैसा
छिनाल, व्यभिचारी स्त्री असा अतिशय वाईट अर्थ आहे. मात्र लोक सवयीने सर्रास वापरतात.
12 Sep 2015 - 11:55 pm | जव्हेरगंज
सहमत
13 Sep 2015 - 12:34 am | मनो
शिंदळकी == व्याभिचार
हा जुना मराठी शब्द आहे, शिवकालीन अथवा पेशवेकालीन कागदात तो येतो. उदाहरणार्थ रांझ्याच्या पाटलाने बदअंमल म्हणजे शिंदळकी केल्यामुळे त्याचे दोन्ही हात आणि दोन्ही पाय शिवाजीराजांनी तोडले. मोसे खोर्यातला कुलकर्णी रंगोबा पळून गेला कारण त्याला भीती वाटली कि त्याची हावाई नावाच्या स्त्रीबरोबरची शिंदळकी राजांपर्यंत पोचली तर त्याला जबर शिक्षा होईल.
13 Sep 2015 - 2:30 am | जव्हेरगंज
नवीन माहिती मिळाली, धन्यवाद.
अवांतर: कथेत मी 'शिंदळ' हा शब्द तिरस्कार या अर्थाने घेतला आहे. शीर्षक ही उपरोधीक दिले आहे.
कथेचा व्याभिचाराशी काहीच संबंध नाही. कुणाचा गैरसमज व्हायला नको म्हणुन हा खुलासा.
14 Sep 2015 - 1:27 pm | सविता००१
धन्स गं.
अजिबात माहीत नव्हता हा शब्द.
12 Sep 2015 - 6:21 pm | प्राची अश्विनी
सुरेख!
आवडली. पुढचा भाग लिहा की.
12 Sep 2015 - 7:53 pm | अजया
आवडली कथा.
12 Sep 2015 - 8:24 pm | अभिजीत अवलिया
मस्त कथा .....
12 Sep 2015 - 11:34 pm | dadadarekar
शिंदळीचा अशी शिवी आहे ना ?
12 Sep 2015 - 11:38 pm | प्यारे१
हो शिंदळीच्या अशी शिवी आहे.
- स्वल्पविराम विसरलेला.
12 Sep 2015 - 11:47 pm | जव्हेरगंज
'शिंदळीच्या' ही शिवी नव्यानेच ऐकली.
'शिंदळ' ही खास बायकांनी बायकांना दिलेली शिवी आहे.
उदा. ती शिंदळ गावभर उंडारत होती.
किंवा, कामाच्या नावानं बोंब, या शिंदळीला नुसतं आयतं खायला पाहीजे.
शक्यतो ही शिवी तोंडावर दिली जात नाही.
पाठीमागेच मापं काढली जातात.
13 Sep 2015 - 12:28 am | एस
'शिंदळीच्या' ही शिवी प्रसिद्ध आहे. बादवे मराठीतील 'शिव्यांचा कोश' असे एक पुस्तक आहे म्हणे. वाचायला पाहिजे.
13 Sep 2015 - 5:06 am | यशोधरा
येस्स, येस्स आहे. पुस्तक.
14 Sep 2015 - 1:36 pm | सुबोध खरे
शिंच्या म्हणजे शिंदळीच्या चे लघुरूप आहे.
शिन्दळकि करणारी स्त्री म्हणजे वेश्या आणि शिंच्या म्हणजे वेश्येचा मुलगा अशी ती शिवी आहे.
रांडेच्या आणि शिंच्या हे समानार्थी शब्द आहेत.
बाकी लेख सुंदर आहे तेवढे शीर्षक बरोबर नाही असे वाटते.
14 Sep 2015 - 6:03 pm | चांदणे संदीप
@ जव्हेरगंज: येग्झाटली यामुळेच त्या नाजूक कळ्यांसाठी 'शिंदळ' हा शब्दप्रयोग अगदी टोचतोय हो कधीचा.
@ खरे सर: माहितीबद्दल धन्यवाद!
(मनाला लावून घेतलेला)
Sandy
13 Sep 2015 - 7:07 am | मुक्त विहारि
आवडली....
13 Sep 2015 - 8:33 am | कैलासवासी सोन्याबापु
आज सकाळी एका मित्रासोबत चर्चा करताना कळले, आपलेच तुकोबाराय ह्यांनी सुद्धा ह्या "शिवी" चा उपयोग पुंड नकली गोसाव्यांस फटकारायला वापरला आहे तो असा
13 Sep 2015 - 10:08 am | प्यारे१
तुकोबांची/चा गाथा उघडून पाहा एकदा. झीट येईल असल्या शिव्या आहेत. एकदम असांसदीय ओ तुकारामबुवा!
13 Sep 2015 - 10:38 am | कैलासवासी सोन्याबापु
प्यारे भाय,
एकदम बरोबर बोललात!! तसेही गाथा किंवा दासबोध लोकं धार्मिक ग्रन्थ म्हणुन वाचतात तरीही माझ्यामते ती जगातली आद्य सेल्फ हेल्प बुक्स आहेत
13 Sep 2015 - 9:59 am | मदनबाण
सुरेख लेखन...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Manali Trance... ;) :- The Shaukeens
14 Sep 2015 - 2:08 pm | यमन
आवडली. यल्लमाच्या पायरीवर प्रत्यक्ष पोचवलत.
छान चितारलय.
14 Sep 2015 - 5:13 pm | तुडतुडी
तुकारामांच्या गाथेत अनेक गोष्टी आहेत . त्यातल्या आशयाकडे लक्ष द्यावं . शिव्यांकडे नाही . काही शिव्या ह्या तोंडी रुळलेल्या असतात . त्या विशिष्ट अर्थानेच दिल्या जातात असं नाही .
बाकी कथा . निशब्द . काय बोलणार . असल्या आईवडलांना फटकवायला पाहिजे चांगलं
14 Sep 2015 - 6:10 pm | जव्हेरगंज
काही शिव्या ह्या तोंडी रुळलेल्या असतात . त्या विशिष्ट अर्थानेच दिल्या जातात असं नाही .
>>>>>>>>
सहमत.
बायका कथानायिकेचा उल्लेख 'शिंदळ' असाच करत. खरा अर्थ बहुदा त्यांनाही माहीत नसावा. मलाही नव्हताच.