- काही नवे करावे म्हणून - भाग १
- काही नवे करावे म्हणून - भाग २
- काही नवे करावे म्हणून - भाग ३
- काही नवे करावे म्हणून - भाग ४
- काही नवे करावे म्हणून - भाग ५
- काही नवे करावे म्हणून - भाग ६
- काही नवे करावे म्हणून - भाग ७
- काही नवे करावे म्हणून - भाग ८
- काही नवे करावे म्हणून - भाग ९
- काही नवे करावे म्हणून - भाग १०
मला ऐकून बरं वाटलं,एक माणूस दारूतून सुटला तर बाळूच्या घरातले तिघेजण आनंदात राहणार होते.त्याच पैशातून त्याच्या घरच्या गरजा भागणार होत्या.पण ती पुढची बाब होती.आताच काय नी कसे सांगणार?तिचा आनंद आणि आशा लक्ष्मीकेशव कायम ठेवो.
************************************************************************
आज काम पूर्ण होणार होते.संध्याकाळी पाचच्या सुमाराला काम पुरे होईल याचा अंदाज आल्याने मी शेवंतीला चहाच्या वेळी विचारले की, "सामान किती शिल्लक आहे?"
“अजून खूप हाय.दोन दिस नक्की जातील?” तिने प्रामाणिकपणे उत्तर दिले.
“मग आज एक काम कर.आजीकडे जाऊन दोन कोंबडे मिळतात का बघ.मला हवेत असे बिलकुल सांगू नकोस.पैसे मी देते.आणि रात्री आमच्यासाठी मस्त कोंबडी आणि भाकऱ्या बनव.तीन/चार जास्तच माणसांचे बनव.पातेरेमामीना घे मदतीला.सगळे एकत्र जेऊ.जमेल ना?’”यावर तिने हसून मन डोलावली.
त्यापमाणे यथासांग सगळे काम साडेपाचच्या सुमाराला पुरे झाले. पुरे झाले.मी उरलेले पैसे लाक्षामामांच्या हातात दिले .वर प्रत्येकी १०० रुये दिले आणि त्यांना सांगितले की,”हे जे बोनस पैसे आहेत ते ह्यांना न देता ह्यांच्या बायकांच्या हातात द्या.हे दारू प्यायले तरी ह्याच्या घरातले जेवतील तरी.आणि आज रात्री आपण सगळे बाळूच्या घरी जेवणार आहोत.”
सगळे साहित्य गोळा करून सुरेखाचे सुरेखाकडे पोचवले.तुमची सामानाचे भाडे द्यायचेय म्हटल्यावर दोघेही नाराज झाले.”काय ताई तू?माझे मन बघतेस का?”सुरेखाने नाराजी प्रकट केली.
“अग, खरंच तुमचं दोघांचंही मन बघतेय.आज आपल्याला बाळूकडे जेवायला जायचं.इतके दिवस तुमचंच हापसतेय.आज मला पण संधी द्या.”बस,आता मात्र तिचा चेहरा खुलला.
“थांब,आधी कॉफी करते,तुझ्यासाठी.तू पैशांचं बोलली असतीस ना,तर आज तुला कॉफीच देणार नव्हते.”असं हसून म्हणतच ती उठली.इतक्यात आजी दूध घेऊन आलीच. सुरेखाने माझ्यासाठी मस्त कॉफी न् इतरांसाठी चहा केला.
आजीला म्हटलं ,”दोन कोंबडे हवेत,आहेत का?”
आजी हळहळली,”आदी नाय बोललीस?मी आताच शेवत्याक दिलंय दोन कोम्बडे.”
मी विचारलं,”कितीला दिलेस?’’
आजी म्हणाली,”१००रुपयास एक दिलंय,पावने येनार हायत म्हणाली.”
मी म्हटलं ,’’मग चला, आज आपण पण शेवन्ताकडेच जाऊयात पाहुणे म्हणून.’’
आजीने आ वासला. “अस्सा हाय तर,त्या शेवत्यापण चावनट.माज ताकास तूर लागून नाय दिल्यान अगदी.”कनवटीला हात लावून पैसे काढले.पन्नास रुपये मला देऊ करत म्हणाली,तु”ज काय तो भाव मी देयन् का?”
“अग,म्हणूनच तिला सांगितलं होतं.”या माझ्या उत्तरावर आजी फुरंगटली.
“तुला हे पैसे परत करायचेच आहेत का?”असं विचारल्यावर तिने होकारार्थी मन डोलावली फक्त.
‘’ठीक आहे.मग तुम्ही तिघे जेवायला या तर रात्री बाळूकडे.चालेल का?’या माझ्या प्रश्नावर ती उखडलीच.’’ही काय दानावर दक्षिणा ठेवतंस की काय?’’
‘’नाही ग,मला माझ्या आजोबांशी संबंधित थोड्या गप्पा मारायच्या आहेत आजोबांशी,म्हणून’’हे मात्र आजीला पटले.तिने मान वेळावततच माझे म्हणणे मान्य केले.
‘’आजोबा येतील ना तुला सांगितलेल्या निरोपावर,की,मी येऊ बोलवायला?”या प्रश्नाला आजीने उत्तर दिले,’’आता नुको काळोखात येव तू,मी आणीन त्यान्ला.आणि मी पण जातंय शेवत्याच्या मदतीस”असे म्हणून ती आजोबांना आणायला गेली.
लक्षामामा,बंड्या,धोंड्या, पातेरेमामा,सुरेखा,तिचे यजमान,मयू नि मी बाळूकडे जायला निघालो.वाट पुन्हा भाईच्या दारावरुनच होती.भाई अंगणातच होता.बंड्या,धोंड्या त्याच्या दारावरून पुढे जाताना पाहिल्यावर त्त्या दोघांना पाहून त्याने विचाले,’’कायरे,संपला काय सावतिणीचा काम?मग आजपण पैशे नाय वाटतं दिलान्?” हे ऐकताच मयू इतका चिडला की,त्याच्या अंगणातच उतरू लागला.मी हात धरून ठेवत मुद्दामच इंग्लिशमध्ये म्हटलं,” Just ignore him,that is his marketing strategy.”माझा आवाज ऐकताच भाई सकपकला.’’कोण वैनी की काय?अहो,आम्हाला कुठे इंग्रजी येतंय?काय ते मराठीत बोला.”
मग माझाही नाईलाज झाला,’’ तुम्हाला इंग्लिश येत नसणारच याची मला कल्पना आहे. मी तुमच्याशी बोलत नाहीय.तुमच्याशी बोलायची माझी इच्छापण नाही पण तुम्ही माझं नाव घेतलंय तर तुम्हाला सांगते,आता काही तुम्ही यांचे दलाल नाही मधल्या मध्ये कमिशन खाणारे तेव्हा मी त्यांना पैसे दिले की,नाही याची चौकशी तुम्हाला करायची गरज काय?आणि मी दिले नाहीत तरी ते तुम्हाला विचारायला येणार नाहीत एवढे नक्की.”
‘’अरे,तुम्ही तर रागावलात.”चेंगटपणे तो बोलला.
‘’ हो.मला रागच आला आहे.कशाला अहो-जाहोची नाटकं करताय?मला सावतीणच म्हणा.म्हणजे एक सावतीण आपल्याला भारी ठरली हे तुम्हाला आठवत राहील.”मी असं बोलत रागातच पुढे झाले.इतक्यात मागच्या अंगणात दारू पीत बसलेले ४/५ जण पुढे येऊन म्हणाले,’’कोण हाय?भायरून येवन् कोण दादागिरी करताय?”यांना भाईने चिथावले असण्याचा संभव होता.
मी बाकी सगळ्यांना ,तुम्ही गप्प बसायचं,” सांगून सरसावले.”कोण बाहेरून आलंय?माझी स्वत:ची जागा आहे या गावात.फक्त अजून घर बांधलेले नाही म्हणून मी इथे राहत नाही.शिवाय माझी नोकरी आहे.इथे गावात राहणारे लोक नोकरीधंद्यानिमित्त बाहेर राहत नाहीत का?म्हणून ते बाहेरचे ठरतात का?”एवढे बोलल्यावर त्यात दोन गट पडले.एक गट,’’ म्हणून काय झालं?’’ या मुद्द्यावर आणि दुसरा गट ”बरोबर आहे’’,या मुद्द्यवर चर्चा करू लागला.आम्ही पुढे सटकलो.जाता जाता भाईचे शब्द कानावर पडले,”रां**नो,बनवलान् तुम्हाला तिना,चला चालायला लागा,”
आम्ही सगळे मोठमोठ्याने हसतच पुढे गेलो.आवाज ऐकून भाई नक्कीच चरफडला असणार.
बाळूच्या घरातून मस्त वास येत होता.आजी आजोबा नातवाला घेऊन पोचले होते.आजी आणि पातेरेमामींच्या मदतीला सुरेखा गेली.लक्षामामा आणि टीम फ्रेश व्हायला गेली.माझ्या गप्पा आजोबांशी रंगल्या.माझ्या आजोबांबद्दल त्यांनी इतक्या आठवणी सांगितल्या ज्यांच्याबद्दल उडत उडतत ऐकले होते.
थोड्याच वेळात सगळे आले.जेवणाचा कार्यक्रम पार पडला.बघितले तर बाळू शांत होता.बंड्या,धोंड्यापण भाईकडे जाऊन आलेले वाटत नव्हते.पण मीही जास्त लक्ष दिले नाही. जेवण झाल्यावर लक्षामामा पुढच्या कामाचे कसे करायचे,याबद्दल विचारू लागले.
“आता पुढच्या महिन्यापासून दर महिन्याला एक फवारणी करायची.एक महिना कडूनिंब आणि एक महिना गोमूत्र अशा फवारण्या,फळ धरून मोठ्या लिम्बाइके होईपर्यंत करायच्या आहेत.तारखा मी सांगेन.शक्यतो दुसरा शनिवार रविवार ठरवूया. कारण मला रजाच असेल. मुद्दाम घ्यायला नको.आणि पुढेपण तसंच चालू ठेवू.” असे त्यांना सांगितले. आता सुरेखाच्या यजमानाना या नव्या प्रक्रियेत रस असल्याने त्यांनी लगेच मदतीचा हात पुढे केला.’’ताई, तुम्ही मला सांगा काय करायचे ते. मी पण आहे.मला हे सगळं शिकायचंआहे..”
‘’गावात कडुनिम्बाची झाडे आहे का?’’या प्रश्नावर पातेरेमामानी उत्तर दिले.”कैक हायत.”
“मग ठरले तर.दुसऱ्या सोमवारी पातेरेमामाना आठवण द्या आणि आणि साधारण दहा किलो भरेल इतका पाला आणवा.मंगळवारी सकाळी शंभर लिटर पाण्यात भिजत घाला.तो पाला तेवढ्या पाण्यात बुडाला नाही तर थोडे पाणी वर आणखी घाला.मोठ्या फांद्या घालू नका,फक्त पाला भिजत घाला आणि झाकण बंद करा. मी तुम्हाला रविवारी फोन करेन आठवण करायला.’’मी सविस्तर प्रक्रिया सांगितली.
”ताई, फवारणी यंत्र आहे आमच्याकडे.”सुरेखा म्हणाली.
‘ठीक आहे.सध्या वापरू तुमचे आणि आजच्या सारखेच भाडेपण देऊ.’’मी मंजुरी दिली.
आम्ही शेवटची बस पकडून रत्नागिरीत आलो.दुसऱ्या दिवशी मुंबईत येऊन नित्यक्रम चालू झाला.आल्यावर नवऱ्याला सगळे सांगितले.सगळे रामायण ऐकून तोही धास्तावला,”जमेल ना ग आपल्याला हे सगळे?कारण नेहमीच काही मला येता येणार नाही तुझ्यासोबत.”
“अरे,तू काही काळजी करू नकोस.मयू असतोच माझ्यासोबातीला नेहमी,आणि ज्या गावाच्या बोरी त्याच गावाच्या बाभळी.पुरून उरू आपण.”मी विषय संपवला.
अजून जमिनीच्या कागदपत्रांची शोधाशोध चालूच असल्याची बातमी मयूने दिलीच होती.पण आता त्या आदेशाची साईन्ड कॉपी तरी माझ्याकडे असल्याने थोडा धीर धरायला हरकत नव्हती.
साधारण तीन आठवड्यांनी आलेल्या रविवारी मी सुरेखाच्या यजमानांना फोन केला.त्यांनीही सगळे नीट करतो म्हणून सांगितले.
शुक्रवारी रात्रीच्या कोकणकन्या एक्स्प्रेसने शनिवारी सकाळी आम्ही दोघांनी रत्नागिरी गाठली.यावेळी मयू परस्पर आणि आम्ही तडक फणसोप गाठले.
सुरखा नि तिचे यजमान वाटच पाहत होते.शिवाय लक्षामामा नि टीम ही तयारच होती..त्यांनी बागेतच सगळी व्यवस्था केली होती. मागच्यासारखेच चहापणी नि जेवणाचे कॉन्ट्रॅक्ट शेवंतीला दिले होते.
मी ओढणी नाकावर बांधून बाकी सगळ्यांना दूर राहायला सांगितले आणि पिंपावरचे झाकण काढले.असा मिरमिरीत वास आला की,बस्स रे बस्स.लांब उभ्या राहिलेल्यांनी पण नाके धरली.चार दिवस कोंडलेला वायू हवेत उडून गेल्यावर मी त्यांना जवळ बोलावले.सुरेखा म्हणाली,’’काय ग ताई,काय हा भयंकर वास?असाच येईल का दिवसभर.?’’
‘’आग,मलातरी कुठे माहित होतं?मी पण पहिल्यांदाच घेतेय.आणि वास दिवसभर आला तरी आपली नाकं सरावतील थोड्या वेळात.”असे म्हणून कामाला सुरुवात केली.पहिल्यांदा पाण्यातला पाला काढून एक खड्डा खणून घेऊन त्यात टाकला नि त्यवर माती पसरली.तसा वास बराचसा कमी झाला.पावसामुळे पाण्याची कमतरता नव्हतीच.बरेच झरे,ओहोळ आसपास होते.पाणी आणून ते दोनशे लिटरचे पिंप पूर्ण भरले.
यावेळी फवारणीची सुरुवात मुख्य पाहुणे म्हणून नवऱ्याने केली.त्याच्यासाठी हे सगळेच नवीन होते.खूप मजेने तो असला की, या सर्वांसोबत कोणतेही काम करत असे..पाय मारून चालवायचे फवारणी यंत्र.
आळीपाळीने सगळेच पाय मारून चालवत होते.आईच्या वाडीच्या शेजारच्या वाडीतल्या मुलांसाठीही ते नवीन होते. कारण त्याभागात नारळाच्या बागा.आंबा असलाच कोणाकडे तर रायवळच,त्यमुळे तेही सगळे नाविन्याची मजा घेत हे काम करत होते.त्यामुळे काम मात्र भराभर होत होते.आज भरपूर माणसे असल्याने सगळ्यांनाच विश्रांती मिळत होती.
दुपारी शेवंती जेवण घेऊन आली तेव्हाच लक्षात आले की,काम आजच्याच दिवसात संपेल.लगेच सुरेखा तिच्या यजमानांसाठी आणि आमच्या तिघांसाठी फराळाचे पदार्थ घेऊन आली
‘’अग,आमचा काही उपास नाही.आमच्यासाठी कशाला हे फराळाचं?आम्ही भाजी भाकरी खाऊ.’’या माझ्या खुलाशावर ती म्हणाली,’’असुदेत.पण यातलंही घ्या थोडंथोडं,तू भाऊंना काय भाकरी खायला लावणार नुसती.”लाल माठाची पालेभाजी,भोपाळच भाजी भाकरी न लसूणचटणी हा शेवंतीचा बेत;त्यासोबत रताळ्याचा कीस न साबुदाण्याची गोड खिचडी.हा सुरेखाचा बेत.मग काय सगळ्यांनीच ताव मारला.
मी शेवंतीला शाबासकी देत म्हटलं,”वा! दोन दोन भाज्या कुठून मिळवल्यास ग?’’तिने लाजतच बळूकडे बोट दाखवले.”घराभायेरच्या पररड्यातच लावल्यात.चार आठ दिसाला निघते भाजी,जास्त झाली तर इकते पन.”
“मज्जा आहे बुवा तुमची. दारातल्या ताज्या भाज्या खायला मिळतात तुम्हाला.”तिने सुरेखाच्या यजमानांकडे बोट दाखवत म्हटले,”दादांनी िदलांनी बियाणा.”त्यांच्याकडे बघत,’’अरे व! छान केलंत हं तुम्ही.”यावर बोलण्यावर ते म्हणाले.“अहो ताई,तुमच्या मोठ्या कामात आमचा आपला खारीचा वाटा.”
“म्हणजे? मी नाही समजले.”
‘‘तुम्ही मोठं काम केलात,यांची दारू सोडवलीत.म्हटले यांना कामाला लावूयात.म्हणून चार/चार बिया दिल्यात.नीट केलानी तर पुढच्या वर्षाचं बियाणं त्यांचे तेच करतील.”ते नम्रतेने म्हणाले.
‘’अरे,वा! काय सांगताय काय? तिघांनीही सोडली दारू?”मी चकितच झाले.देवाने हे काम घडवायला माझं निमित्त केलं होतं.बाळूला रागापोटी मारल्याची खंत माझ्या मनातून निघून गेली, या बातमीने.आणि आजी म्हणते तशी दानावर दक्षिणाही दिली होती देवाने.बाळूने तर दारू सोडलीच,पण पुढच्याच ठेच नि मागचा शहाणा या म्हणीनुसार बंड्या नि धोंड्यानेपण दारू सोडली होती.”देवा,अशीच राहूदे रे यांची बुद्धी,पुन्हा त्या घाणीकडे जायची इच्छा होऊ देऊ नको ह्यांना,ही माझी विनंती नसून मागणी आहे असे समाज.”मीही करुणा भाकली.
सुरेखा घरी निघताना.म्हणाली,”ताई,भाऊना आणि मयुला घेऊन आज संध्याकाळी माझ्याकडे जेवायला यायचंस हं तू.”
‘’आज नको ग,काम आटपतंयतर आम्ही रात्रीच्या ट्रेनने जातो.म्हणजे उद्याला आराम करता येईल.न परवा आहेच ऑफिस.’’ती हिरमुसलीच.”अग भाऊ,आमच्याकडे ना येताच जाणार का?’’
“नाही ग, कॉफी प्यायला येऊना?’’मी आश्वासन दिले.
शेवंती संध्याकाळचा चहा घेऊन आली तेव्हा तिच्याबरोबर आणखी दोघीजणी होत्या.हातात छोट्या झाकलेल्या परड्या होत्या.तिने ओळख करून दिली,”ही सरला नि ही पार्वती.बंड्याभाऊ नि धोंडीदादांच्या कारभारनी.तुमाला भेटायला आल्यायत.”त्या दोघीनी हातातल्या परड्या शेवंतीच्या हातात देत मला लाजत लाजत नमस्कार केला.मीही प्रतिनमस्कार करत विचाले,”काय ग? का आला होता?” त्यांनी त्या परड्या पुन्हा घेऊन माझ्यासमोर धरल्या.मी शेवन्तीकडे प्रश्नार्थक नजरेने पहिले.
ती त्यांना म्हणाली,”बोला की,बाई?”तरीही त्या लाजतच होत्या.त्या तुमच्यासाटन् भेट घेऊन आल्या आहेत.
“भेट?का बरं?”
सरला थोडे चुणचुणीतपणे म्हणाली,”तुमच्याकारणे झालाय,त्यातला वाटा तुमालापन द्यायला होवा पण अजून भाजी तयार नाय झाली.म्हणून भारंगीची भाजी आणलीय.”आणि तिने परड्यारचा कपडा बाजूला केला. ‘’हं,आणि तू काय आणलंस पार्वती?’’ पार्वतीने फक्त हसत कपडा दूर केलाआतला खजिना पाहून माझे डोळेच विस्फारले,”भोपुड जी.”ती उत्तरली.भोपूड म्हणजे रानात उगवलेली अळंबी.नशीबवान लोकांनाच खायला मिळणारी ही भाजी.देवाने दानावर अजून एक दक्षिणा ठेवलेली दिसत होती.बेहद्द खुश होता माझ्यावर.भारंगीची भाजी बऱ्याचदा मिळते मुंबईत.......पण ही अळंबी मात्र एखाद दुसरा दिवसच असणार आणि तेव्हा तुम्ही त्या मार्केटमध्ये हवेत.शिवाय दरही चांगलाच चढा असतो.मला तर लॉटरी लागली होती.दोन्ही अनवट भाज्या नि त्याही एकाचवेळी नि त्याही भेट म्हणून मिळत होत्या.त्यादिवशी नशीब चांगलेच जोरावर होते.
मला भरून आले.मी त्याच्यासाठी काय केले होते,पण ‘लेकी बोले सुने लागे’ या, न्यायाने बाळूच्या माराच्या प्रसंगाने ते सुधारले होते,आणि या प्रेमळ बायका त्याचे श्रेय मला देत होत्या.आणि त्यासाठी त्यांनी जे केले होते त्यामुळे त्यांनीच मला विकत घेतले होते.
मी त्या परड्या हातात घेऊन अभावितपणे त्यांना,’थँक यू’ म्हटले आणि त्या दोघी परत लाजल्या.’’अशाच सुखाने संसार करा.आणि आता हे दोघे सुधारलेत तर बरंच झालंय पण पुन्हा काय गडबड केली तर मला कळवा.”मी मनापासून आशीर्वाद दिला.
त्य दिवशीचे काम संपले.मस्त मनासारखे आणि ठरवल्यानुसार काम झाले होते.सुरेखाकडे नेहमीप्रमाणे आजी दुध घेऊन आलीच होती.चहापान,कॉफीपान संपल्यावर सगळ्यांचे मागच्याप्रमाणेच पैसे दिले.पुढच्या कामची चर्चा सुरु झाली.
‘’पुढच्या महिन्यात कसं करायचं ताई?”सुरेखाच्या यजमानांनी विचारले.
“मला पुढच्या महिन्यात वीस लिटर गोमूत्र लागेल.आजी आणि पातेरेमामा या दोघांकडच्या गाईंचे मिळून महिनाभरात जमेल.मग बाकीचे आल्यावर दाखवते.पुढ्या महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी आजच्यासारखेच आम्ही येऊ.तेवढे तयार ठेवा.’’मी त्यांना सांगून आम्ही निघालो.इतक्यात सुरेखाने जेवणाचा डबा माझ्या हातात दिलाआणि हसतच म्हणाली,’’गाडीत जेवा.”कुठल्या जन्मीच्या पुण्याईने ही माणसे भेटली होती मला हे तो एक देवच जाणे!
पावसाळा असल्याने स्लीपर कोचची तिकिटेही मिळाली.जेवण सोबत होतेच,खीर,पुऱ्या, बटाट्याची भाजी, भात, वरण,लोणचे,घोसाळ्याची भजी असे साग्रसंगीत जेवण जेऊन ,”अन्नदाता,पाककर्तीच सुखी भव”असा आशीर्वाद भरल्या पोटाने नि तृप्त मनाने दिला.दमलेले शरीर बर्थवर पाठ टेकताच जी झोप लागली ती सकाळी मुंबईला पोचेपर्यंत.
(क्रमशः)
प्रतिक्रिया
27 Aug 2015 - 6:50 pm | राघवेंद्र
छान काम करत आहात. पु. भा. प्र.
27 Aug 2015 - 6:52 pm | एस
वा! सज्जनपणाही असा संगतीने पसरतो याची पुनरेकवार प्रचीती आली.
पुभाप्र!
28 Aug 2015 - 9:03 am | श्रीरंग_जोशी
हा भाग वाचून खूप समाधान वाटलं.
स्वॅप्स यांनी व्यक्त केलेल्या भावनेशी सहमत.
28 Aug 2015 - 1:04 pm | बहिरुपी
असेच म्हणतो!पु. भा. प्र.
27 Aug 2015 - 6:57 pm | शलभ
खूपच छान चाल्लीय मालिका.
27 Aug 2015 - 6:59 pm | नाखु
ही कथा माला !!
अस्सल अनुभव अस्सल माणसं!
पुलेप्र.
27 Aug 2015 - 7:18 pm | रुस्तम
हा भाग ही आवडला... नेहमी प्रमाणे... पुभाप्र!
27 Aug 2015 - 7:32 pm | स्रुजा
फार छान.
27 Aug 2015 - 7:59 pm | मुक्त विहारि
पुभाप्र.
28 Aug 2015 - 7:29 am | यशोधरा
मस्त लिहिलंय. खूप दिवसांनी आला हा भाग.
28 Aug 2015 - 8:28 am | पिलीयन रायडर
किती वाट पाहिली ग!!
काय गोड माणसं आहेत ग ही सगळी!
आता पटापट पुढचे भाग टाक..
28 Aug 2015 - 1:51 pm | वगिश
मस्तच. पुभाप्र.
28 Aug 2015 - 2:18 pm | मीता
मस्त लिहिलंय.
28 Aug 2015 - 4:19 pm | सुचेता
आवङतय नेहमी पेक्षा वेगळे वातावरण
31 Aug 2015 - 6:33 am | स्पंदना
ही शेतीची पारंपारिक पद्धत जर पुन्हा सर्व शेतकर्यात पसरली तर रासायनिक खतांच्या मार्याने खारवनारी माती पुन्हा पिकायला मदत होइल.
माणसं आणि माती दोन्हीची मशागत मस्त जमतेय!!
26 Dec 2015 - 11:49 am | शाम भागवत
काही नवे करावे म्हणून.- भाग १२