हा ताप माझ्या मागे हातधुन लागला आहे. स्नान पुजा करुन बाहेर पडलो,गोळ्या बदलुन बघते. मेडिकल मधुन दुसर्या गोळ्या घेतल्या, नन्तर माझ्या घड्याळाचा सेल बदलुन घेतला,फोटो शॉप मध्ये आतापर्यन्त काढलेले फोटो पेनड्राइव्ह मध्ये टाकुन घेतले. नन्तर रेल्वेस्टेशनवर जाऊन अमरकन्टकसाठी गाडीची चौकशी केली पण सुटेबल गाडी नव्हती. परत हॉटेलवर परत आलो.
माझा ताप वाढला होता,गोळी घेतली.मनात विचारान्चे काहुर माजले होते,का येत असेल ताप? एप्रिल मध्ये टायफॉइड झाला होता,ब्लडमधील एस.जी.ओ.टी. एस.जी.पी.टी. वाढलेले होते.लिव्हर फन्क्शन बिघडलेले होते,परिक्रमा काळात खुपदा बोअरचे पाणी पिण्यात आले होते,मान्डवगडाच्या पायथ्याचे गाव मतलबपुर येथे तर पाण्यात फ्लोराईड जास्त प्रमाणात होते,या सार्याचा तर हा परिणाम नसेल? यावर्षी पुणे मुम्बई येथे बदल्या झाल्या त्या काळात हॉस्टेलला राहणे,मेसचे जेवण,वेळेला बाहेर हॉटेलमध्ये खाणे. या सार्याचा हा परिणाम असणार त्यातच परिक्रमेच्या सुरवातीच्या दिवसात सह परिक्रमावासीच्या आग्रहाने एकेका दिवसात उरापोटी ३५/४० कि.मि. चालणे हेच झेपले नाही.
मैय्या! मला परिक्रमा करायची आहे हे मी मागची पन्धरावर्ष घोकते आहे.जवळ जवळ निम्मी परिक्रमा होत आली आहे.मला धीर दे. मला एकदम पुण्याच्या नर्मदाप्रसाद जोशी यान्ची आठवण झाली.भागवत बरोबर होते त्यावेळी यान्च्याशी फोनवर बोलणे झाले होते,किती आश्वासक स्वर होता त्यान्चा.किती मनापासुन त्यानी परिक्रमेबद्दल सान्गितले होते. नर्मदे हर नर्मदे हर म्हणत डोळे मिटून पडले होते,आणि माझा फोन वाजला,तो फोन नर्मदाप्रसाद जोशी यान्चा होता ते म्हणाले, बसने परिक्रमा करावी लागते आहे म्हणुन खन्त करु नको. तब्येत साम्भाळून जमेल त्याप्रमाणे परिक्रमा पुर्ण कर;ते महत्त्वाचे आहे.मला खुपच आश्चर्य वाटले याना माझ्या मनाची हाक कशी अॅकू आली?टेलेपथी? खुप आधार वाटला हुरुप आला, मी नक्की परिक्रमा पुर्ण करेन. भागवताना फोन केला ते अमरकन्टकहुन दिन्डोरीला पोहोचले आहेत. म्हणजे येत्या आठवड्यात त्यान्ची परिक्रमा पुर्ण होईल.उदयाही जबलपुरच.
आजही ताप आहेच. डॉ. घाडगे सरानी मागे लिव्हर फन्क्शन,टॉयफॉइड साठी दिलेल्या गोळ्यान्चे प्रिस्क्रिपशन घेउन त्या गोळ्या आणण्यासाठी हे बाहेर गेले मी नामस्मरण करीत पडून राहिले. येताना हे बसची चौकशी करुन आले,अमरकन्टकला जाणारी बस मैय्या पार करुन दिन्डोरीमार्गे जाते,आम्ही परिक्रमेत असल्याने मैय्या आम्हाला पार करुन चालणार नाही त्यामुळे आम्हाला मन्डला येथे जावे लागेल तिथुन मग पुढे कसे जायचे ते ठरवावे लागेल.
आज चौथा दिवस जबलपुरात आहोत,आमचे सारे बजेटच कोसळले. राणीचा फोन आला ,ती म्हणाली पैशान्चा विचार करायचा नाही पुर्ण बरे वाटले की मगच पुढे जायचे,यापुढची परिक्रमा बसने रेल्वेने मुक्काम वाटेतील मोठ्या शहरात चान्गल्या हॉटेलमध्येच करत पुर्ण करायची आणि नन्तर नाशिकला न जाता थेट दिल्लीलाच यायचे. हो ग बाई! किती काळजी करशील? मोरया तुझी क्रुपा! म्हणुन मी राणीची आई आहे. नर्मदे हर!
सकाळी स्नानपुजा केली,नास्ता करुन हॉटेल क्रुष्णा सोडले,खरेतर बसस्टॉप जवळच होता पण मला अशक्तपणा आला होता त्यामुळे रिक्षाने गेलो. मन्डला बस लागलेली होती.जबलपुरला आधी ति़कीट काढून मग नम्बरप्रमाणे बसमध्ये बसतात, हे चान्गले आहे. बसलो .बसही चान्गली होती .
मन्डला ९७कि.मि. वर होते रस्ताही चान्गला होता.रस्त्यात लागणार्या गावान्ची नावे ओळखीची होती,सुहास लिमये काका याच मार्गे पायी गेले होते असे लक्षात आले.
सव्वाबारा वाजता मन्डला येथे पोहोचलो.बसस्टॉप समोर आर के हॉटेलमध्ये मुक्काम केला. सन्ध्याकाळी मन्डला पाहाण्यासाठी बाहेर पडलो.येथील लोक हीच खरी माहिष्मती नगरी जेथे च आद्यशन्कराचार्य आणि मन्डनमिश्र यान्चा वाद झाला असे मानतात.मन्डलेश्वरचे लोक त्यान्चे शहर म्हणजेच माहिष्मती नगरी असे म्हणतात. असो.
बन्जर-नर्मदा सन्गमावर गेलो तिथे बान्धीव घाट नव्हता दोन्ही नद्याना भरपुर पाणी होते लोक अलीकडे-पलीकडे जाण्यासाठी नावेचा उपयोग करत होते.समोरच्या तीरावर महाराजपुर होते मन्डला आणि महाराजपुर म्हटलेतर जुळी शहरे होती नर्मदेवर दोन्ही शहरे जोडणारा पुल आहे. त्या घाटाजवळ पडक्या किल्ल्याचे अवशेष आहेत एक बुरुजही आहे. तिथेच पन्चमुखी शिवाचे छोटे मन्दिर आहे.सुबक कोरीव काम असलेली शिवशन्कराची उभी मुर्ती आहे. तिथेच दुसरीही दोन मन्दिरे आहेत त्यान्ची जडणघडण मशिदीप्रमाणे आहे. नन्तर रन्गरेज,पिप्पल हे दोन बन्जरनदीवरील घाट पाहिले.काही फोटोही काढले.पिप्पल घाटाजवळ बन्जरनदीवर पुलाचे काम चालु आहे. तो पुल झाल्यावर रस्त्यात येणारी बरीच जुनी पक्की घरे पाडावी लागणार आहेत,आणि प्रगतीच्या आड येणारी हीच खरी अडचण.
हॉटेलवर परत येताना अमरकन्टकच्या बसची चौकशी केली.सकाळी सव्वानऊ वाजता बस आहे. परत आलो.मैय्याची आरती केली. माईला माझ्या मोठ्या बहीणीला फोन केला.ती काळजी करतच होती.आम्ही सुखरुप आहोत दोनतीन दिवसात अमरकन्टकला पोहोचू असे तिला सान्गितले.क्रमशः
प्रतिक्रिया
7 Sep 2012 - 2:08 pm | sagarpdy
तब्येतीची काळजी घ्या. नर्मदामैया पाठीशी आहेच!
-
(परीक्रमेचे फोटो पाहण्यास उत्सुक) सागर
7 Sep 2012 - 2:13 pm | कवितानागेश
वाचतेय..
फोटो टाकायचे बघा की. :)
7 Sep 2012 - 2:53 pm | ५० फक्त
सगळे जण फोटो पाहायला उत्सुक आहेत, तुमच्या पिकासा आल्बम पब्लिक साठी ओपन करा आणि लिंक द्या, मोकळ्या वेळात मी अडकवतो इथं फोटो.
11 Sep 2012 - 11:12 am | खुशि
नमस्कार.
पिकासा ओपन केला आहे.
7 Sep 2012 - 7:16 pm | गणेशा
मिसळपाव ने नर्मदा परिक्रमा म्हणुन एक विभाग चालु करावा.. म्हणजे या असल्या सलग धाग्यांचा त्रास इतर भतकंती धाग्यांसाठी होणार नाही.. मग अगदी पाच पाच मिनिटाला जरी नविन धागे आले तरी काही हरकत नाही..
7 Sep 2012 - 7:22 pm | यशोधरा
इतके शारिरीक आणि ओघाने मानसिक कष्ट सोसूनही परिक्रमा पूर्ण करायला कुठून बळ मिळते? कोणती प्रेरणा असते?
खरेच जिद्दीचे काम आहे.
फोटो पहायची इच्छा आहे.
7 Sep 2012 - 9:47 pm | कौशी
सहमत.तब्येतीला जपा.
9 Sep 2012 - 11:33 am | शुचि
तेवढं फोटोचं घ्याच मनावर. बाकी चालू दे.
10 Sep 2012 - 9:13 am | स्पंदना
नर्मदे हर!
वाईट वाटल वाचुन. तुमच्या मनाची तगमग कळली.