माळशेज - शिवनेरी सहल. सप्टेंबर २०११
रामराम!
सप्टेंबरात मिपा.करांकडून माझ्या माळशेज सहलीबाबत कौल मागितला होता ( http://www.misalpav.com/node/19017 ). त्यावेळी शैलेन्द्र, अजितजी, वल्ली, विक्षिप्त अदिती, योगप्रभू, परीकथेतील राजकुमार नि सुनील यांच्या उद्बोधक तर बाकी बऱ्याच जणांचा रंजक प्रतिक्रीया आल्या. त्यां सगळ्यांवर विसंबूनच आमची सहल सुरू केली आणि सुफ़ळ संपूर्णही झाली. सर्वांना धन्यवाद!
मुंबई - नाणेघाट रस्त्यावरचा जलविहार - माळशेज - मुक्काम - शिवनेरी - माळशेज - विश्रांती - मुंबईप्रस्थान असा कार्यक्रम केला.
रविवारी सकाळी मुरबाड - वैशाखरे सोडल्यावर नाणेघाट बाण दाखवणाऱ्या कच्च्या रस्त्यावरून गाडी आत घातली. थोडी पुढेच लावली नि चालू लागलो. शैलेन्द्रने सांगितल्याप्रमाणे बरोब्बर एक ओढा सोडून दुसरा ओढा घेतला आणि त्यात जी मजा केली तिला तोड नाही. वाटेवरची चाल आणि दृश्यं केवळ अप्रतिम.
MTDCचा चेक इन समय दु. १चा असल्याने त्या जेवायच्या सुमारास तिथे पोहोचलो. नि संध्याकाळी आजूबाजूच्या पठारावर फ़िरून आलो.
रविवारी दुपारपावेतो पिकनिकर्सची गर्दी पूर्ण ओसरली नि रविवार नि सोमवार रात्र फ़क्त आपणच त्या MTDCचे राजे असणार या सुखद जाणीवेने ‘काय प्लान केलाय’ अशी स्वतःची पाठ थोपटत MTDCच्या सह्ही जेवणावर आडवा हात मारला. रात्री साडेआठ-नवालाच ती सुखद जाणीव खर्र्क्कन् उतरून गेली कारण रविवारी रात्री तिथल्या Dormitoryमधे खास मुंबईहून आणवलेल्या बारबालांचा मुजऱ्याचा कार्यक्रम प्रचंड ढण्ढण् करत सुरू झाला, जो रात्री उशीरापर्यन्त चालला! प्रेक्षक कोण - तर रातोरात येऊन पाहुणचार घेऊन जाणारे मुंबईचे व्हीआयपी, जुन्नर मुरबाडची पिकाड पोरं, राजकीय नेते नि कार्यकर्ते! "शनिवारच्या रात्री खूप फ़्यामिलीवाले असतात त्यामुळे हा प्रोग्राम रविवारी रात्री करावा लागतो" हा तिथल्या काळजीवाहकाचा खुलासा! आठवडाभरातही कुणी नसणारच, मग हे लोक आठवडाभर असाच धिंगाणा घालत असणार बहुतेक. असो.
माळशेज घाट:
https://skydrive.live.com/redir.aspx?cid=a30bcc03a160c8c9&page=play&resi...
सोमवारी सकाळी शिवनेरीच्या रस्त्याला लागलो. अप्रतिम रस्ता. गणेशखिंड चढता चढता थोडेफ़ार फ़ोटो काढले नि पुढे निघालो. शिवनेरीसही एक फ़ायदा झाला तो म्हणजे सोमवार असल्या कारणाने अजिबात गर्दी नव्हती. शाळांच्या ट्रिपा नाहीत की कॉलेजचे दादा-ताई नाहीत. महाराष्ट्रभरातून भक्तीभावाने शिवनेरीवर आलेले ग्रामीण लोकांचे दोन चार गट मात्र भेटले. चुरगळलेल्या कपड्यांतले साधे शेतकरी नि अनवाणी बायाबापड्या. आपल्या देशाने तोवर आणखी एक शिवाजीराजा निर्माण केला तर ठीकच, अन्यथा शिवप्रभूंची स्फ़ूर्ती आणखी ४०० वर्षे तरी आपल्याला तारत राहील यात शंका नाही. वयवर्षे आठ आणि चारच्या आमच्या शिवम्, सनत् यांना शिवाजी महाराजांचा काय अभिमान! त्यासाठी आम्ही काही विशेष केल्याचं मला आठवत नाही. तो रक्तातूनच येतो बहुदा. गडावर एक वाटाड्या घेऊन पूर्ण किल्ला सावकाश पाहिला. शिवजन्मस्थानी डोकं टेकलं आणि परतीला लागलो.
शिवनेरीपासून ते माळशेजजवळच्या द्रुतगतीमार्गापर्यंतचा जवळपास १५ किमीचा जोडरस्ता अत्तिशय छान आहे. गाडी हळूहळू हाकावी, निसर्गाची भरपूर लेणी दिसतात. आमच्यासाठी तर डबक्यात टबबाथ घेत बसलेल्या म्हशी हेही अप्रूपच की! त्याचबरोबर माळढोक पाहिला, बुलबुल पाहिले, सुगरणीची घरटी नि ती विणताना सुगरण पाहिली, हिरवीग्गार पठारं नि काळेकभिन्न डोंगर पाहिले - अजून काय पायजे?
शिवनेरी:
https://skydrive.live.com/redir.aspx?cid=a30bcc03a160c8c9&page=play&resi...
MTDCत परतल्यावर येणारा तोटा पदरात घेऊन दुसऱ्या रात्रीचा मुक्काम मी रहित करून टाकला नि मुंबईच्या दिशेने गाडी सोडली. दिवसा उजेडी मुरबाड तरी पार करणं आवश्यक होतं. त्यामुळे नवीन प्लाननुसार ओझर, लेण्याद्री करता येणार नव्हते. ते पुढच्या वेळेस असं एकमेकांना समजावत आम्ही पुढे निघालो. तीच तर मजा आहे. वाट्याला येणारी सोय गैरसोय पदरात घेऊन इथे येणारा प्रत्येक जण ‘पुढच्या वेळचा’ बेत आखतोच!
निवडक चित्रं इथे टाकतो आहे. बाकी वरच्या दुव्यांवर आहेतच. इथे चीनमधे पिकासा दिसतं, पण चित्रं वर चढवता येत नाहीत. त्यामुळे गोची आहे. कृपया MSNवरच गोडी मानून घ्यावी! पिकासावरचे माझे अन्य फ़ोटो पहायला हरकत नाही.
https://picasaweb.google.com/kaunteya.deshpande
शुभास्ते पंथानः
कौन्तेय
प्रतिक्रिया
16 Oct 2011 - 10:49 pm | ५० फक्त
भारी रे, मस्त आले आहेत फोटो. एमटिडिसिच्या अनुभवाबद्दल वाईट वाटले.
17 Oct 2011 - 4:07 pm | किसन शिंदे
मला वाटतं ज्या ठिकाणी ही लोकं पाण्यात मज्जा करतायेत त्याच ठिकाणी बहुदा आपणही गेलो होतो.
17 Oct 2011 - 6:52 pm | प्रचेतस
अरे हा नाणेघाटाचा पायथा आहे. नानाचा अंगठा आभाळात झेपावलेला दिसतोय ना फोटोमध्ये.
16 Oct 2011 - 11:23 pm | आशु जोग
कौंतेय मला नावावरून राहून राहून वाटलं कुठेतरी ऐकलेय तुमचे नाव
16 Oct 2011 - 11:37 pm | प्रचेतस
महाभारतात ऐकले असेल.
17 Oct 2011 - 1:31 am | सुहास झेले
बघा आता आठवतो का ते...
किंवा राधेय वाचा. पुर्ण ओळख होऊन जाईल :) :)
16 Oct 2011 - 11:37 pm | प्रचेतस
फोटो आणि वर्णन सुरेख.
माळशेजच्या डोंगरदर्यांचे अजून फोटो पाहिजे होते.
17 Oct 2011 - 10:49 am | प्रशांत
+१
17 Oct 2011 - 4:13 pm | मेघवेडा
असेच म्हणतो. आणखी फोटो हवे होते. मस्त आहेत सगळेच.
17 Oct 2011 - 1:33 am | सुहास झेले
मस्त आले आहेत फोटो... !! :)
एमटीडीसीचा अनुभव वाईटचं आहे माझा आजवर.... काय करणार :(
17 Oct 2011 - 1:56 am | प्रभाकर पेठकर
मस्तं आहेत छायाचित्रं आणि सहल वर्णन.
17 Oct 2011 - 10:07 am | पिंगू
फोटो आवडेश आणि एमटीडीसी अनुभव तसा काही चांगला नव्हता ह्याशी सहमत.
- पिंगू
17 Oct 2011 - 12:03 pm | प्रास
फोटोज छान, वृत्तांत आवडला.
अजून कधी एमटीडीसीचा तुम्ही म्हणता तसा अनुभव आला नाही पण आता ही शक्यताही ध्यानात ठेवावी लागेल.
असो.
शुभेच्छा!
:-)
17 Oct 2011 - 7:07 pm | गणेशा
वृत्तांत छान ..
फोटो दिसले नसल्याने मात्र निराशा झाली...
17 Oct 2011 - 7:52 pm | कौन्तेय
सर्वांचे आभार!
गणेशा, या दुव्यांवर चित्रं दिसली तर पाहिजेत -
माळशेज घाट:
https://skydrive.live.com/redir.aspx?cid=a30bcc03a160c8c9&page=play&resid=A30BCC03A160C8C9!1664
शिवनेरी:
https://skydrive.live.com/redir.aspx?cid=a30bcc03a160c8c9&page=play&resid=A30BCC03A160C8C9!1746
शुभास्ते -
17 Oct 2011 - 9:05 pm | शैलेन्द्र
मस्त ,...
18 Oct 2011 - 3:36 pm | कौन्तेय
हाफ तुझी कृपा!
तुझ्यामुळेच मुख्य इव्हेण्ट यशस्वी झाला.
17 Oct 2011 - 11:25 pm | आशु जोग
कॅमेरा सगळ्यांकडेच असतो आजकाल
पण
फोटो फार थोड्यांचेच असतात चांगले
हे फोटो छान आहेत, आवडले. अगदी क्लीयर
18 Oct 2011 - 1:50 pm | कौन्तेय
हेऽ आशु,
... थँक्स! पण बरीचशी किमया निकोन एस्एल्आर्ची आहे म्हण. आणि बरीचशी पिकासा - नि उरलीच तर माझं थोडंसं.
‘गुगल+’वरही तुमचा काही संदेश आहे बहुदा. मला तशी जीमेल आलीए. पण मी चीनमधे आहे नि इथे फ़ेसबुक, गुगल+, ट्वीटर असल्या अति-उघड्या गोष्टींना स्थान नाही. त्यामुळे पाहता आलेला नाही.
18 Oct 2011 - 11:52 pm | आशु जोग
हो पण मिसळीला माओने परवानगी दिलेली दिसते
20 Oct 2011 - 2:00 pm | सुधांशुनूलकर
फोटो आणि वर्णन, दोन्ही छान.
पुढच्या आठवड्यात बाबासाहेब पुरंदरे यांच्याबरोबर शिवनेरीला जाण्याचा विचार आहे. जाऊन आल्यावर धागा टाकीन.
एक छोटीशी दुरुस्ती : फोटो क्र. ११ - हा पक्षी माळढोक नसून, पांढर्या मानेचा कृष्णबलाक (व्हाईट नेक्ड स्टॉर्क) आहे. माळढोक या परिसरात सापडत नाहीत, ते सोलापूर - नान्नज भागात आढळतात.
एमटीडीसी अनुभवाबद्दल वाईट वाटलं.
22 Oct 2011 - 8:06 pm | कौन्तेय
नूलकर साहेब,
धन्यवाद. तुमच्या कौतुकाबद्दल नि दुरुस्तीबद्दलही.
शिवनेरीवर बाबासाहेबांसोबत म्हणजे पर्वणी आहे. मी त्यांच्याबरोबर रायगड, सज्जनगड, प्रतापगड केलेला आहे. याही वयात त्यांची ही हिम्मत म्हणजे निव्वळ इच्छाशक्ती आहे.
शुभम् भवतु -