भोंडला, हादगा आणि भुलाबाईची गाणी : महिलांच्या व्यथा

गंगाधर मुटे's picture
गंगाधर मुटे in जनातलं, मनातलं
13 Jul 2011 - 10:11 pm

भोंडला, हादगा आणि भुलाबाईची गाणी : महिलांच्या व्यथा

              बालपणीच्या अशा फारच कमी आठवणी असतात की ज्या माणसाच्या आयुष्यभर सावलीसारख्या सोबत-सोबत चालतात. जीवनाने कितीही रंग बदललेत, आचार-विचारांच्या संरचनेत कितीही बदल झालेत तरीही त्या आठवणी मात्र वास्तवाचे कायम स्मरण करून देत असतात. एका अर्थाने ह्या आठवणी माणसाला “डोळस दृष्टी” प्राप्त करून देत असतात आणि सामाजिक जीवनमानाकडे बघण्याचा नवा दृष्टिकोनही देत असतात.

             माझ्या बालपणीच्या (१९७०-७५) काळात दळणवळणाची साधने एकतर फारसी विकसित झाली नव्हती किंवा ग्रामीण भागापर्यंत पोचलेली तरी नव्हती. एखादी मोटर सायकल जरी गावात आली तरी गावातील लहानसहान पोरं मोटरसायकल मागे धावायचीत. बुजुर्ग मंडळीही घराबाहेर येऊन कुतूहलाने बघायचीत. त्याकाळी गावातले दळवळणाचे सर्वात मोठे विकसित साधन म्हणजे सायकल. सायकलचा वापरही केवळ पुरुषांसाठीच असायचा. पत्नीला सुद्धा सायकलवर बसवणे लाजिरवाणे वाटायचे आणि कुणी जर तसा प्रयत्न केलाच तर ते चेष्टेचा विषय ठरायचे.  ग्रामीण जनतेचे दळणवळणाचे एकमेव साधन म्हणजे रेंगीबैल, छकडा, दमनी वगैरे. गावाला जोडणारे पक्के रस्ते उपलब्ध नसल्याने ग्रामीण माणसांचा संचारही मर्यादित असायचा. पावसाळाभर गावाचा संपूर्ण जगाशीच संपर्क तुटायचा, असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरू नये.

           इलेक्ट्रिक, टेलिफोन किंवा तत्सम साधने गावात पोचायची होती. टीव्ही, संगणकाचे नामोनिशाण नव्हते. गावात दिसलाच तर एकट-दुकट रेडियो दिसायचा. गावातील एखादा तरुण नोकरी करायला शहरात गेला की शहरातून गावाकडे परतताना हमखास काखेला रेडियो लटकवून आणि रस्त्याने गाणी वाजवतच गावात प्रवेश करायचा. लग्नामध्ये हुंडा म्हणून गोफ, घड्याळ, अंगठी, सायकल आणि रेडियो ही वरपक्षाची सर्वात मोठी मागणी समजली जायची. स्वाभाविकपणे मनोरंजनाची काहीच साधने उपलब्ध नसल्याने पारंपरिक सण साजरे करून त्यातूनच मनोरंजनाची गरज पूर्ण केली जायची.

        जी अवस्था दळणवळण व मनोरंजनाची; तीच वैचारिक देवाणघेवाणीची. सभा, मेळावे, परिसंवाद याचे लोण गावापर्यंत पोचलेच नव्हते. चालायचेत ते केवळ हरिनाम सप्ताह किंवा कीर्तन-प्रवचने.  हरिनाम सप्ताह किंवा कीर्तन-प्रवचने याप्रकारातला सर्वात मोठा दोष असा की हे वनवे ट्रॅफिक असते. त्यात चर्चेला वगैरे काहीच स्थान नसते. एकाने सांगायचे आणि इतरांनी ते भक्तिभावाने श्रवण करायचे. आपल्या सुखद:खांना व्यक्त करण्याचे व्यासपीठच उपलब्ध नसल्याने ग्रामीण जनतेची केवढी घुसमट झाली असावी, याचा अंदाज आता सहज बांधता येऊ शकतो.

       निदान पुरुष मंडळींना मारुतीच्या पारावर किंवा चावडीवर बसून गप्पा तरी करता येत होत्या. भावना व्यक्त करायला संधी मिळत होती, पण महिलांचे काय? त्यांना ना पारावर बसून गप्पा मारण्याची अनुमती, ना सुखदु:खाला व्यक्त करण्यासाठी एखादे व्यासपीठ उपलब्ध. त्यामुळेच महिलाप्रधान सण अतिशय जिव्हाळ्याने साजरे केले जात असावेत आणि त्यानिमित्ताने ग्रामीण महिला मनोरंजन आणि एकीमेकीचे क्षेमकुशल व्यक्त करण्यासाठी अथवा जाणून घेण्यासाठी या सणांचा वापर व्यासपीठासारखा वापर करून घेत असाव्यात.

       अशाच काही महिलाप्रधान सणापैकी भुलाबाईचा उत्सव हा एक सण. आश्विन शु.१० ते कोजागिरी पौर्णिमेपर्यंतचा काळ “आश्विनच्या भुलाया” म्हणून साजरा केला जातो. काही भागात याला हादगा म्हटले जाते तर काही भागात भोंडला. या काळात मातीच्या बाहुल्या/भुलाया मांडून दररोज नित्यनेमाने गाणी म्हटली जातात. खिरापत वाटली जाते. जसजसा काळ बदलत गेला तसतसे या सणांचे महत्वही कमी होत गेले.

       पण त्याकाळी छोट्या-छोट्या बालिकांपासून जख्खड म्हातार्‍या महिला सुद्धा यामध्ये गाणी गायनासाठी सहभागी होत असायच्या. त्या पैकी काही गाणी ऐकतांना माझ्या अंगावर काटा उभारायचा. तर काही गाणी ऐकून मन खूप-खूप उदास व्हायचे. काही गाणी मनाला चटका लावून जायची तर काही गाणी ऐकताना कुतूहलमिश्रीत प्रश्नचिह्न निर्माण व्हायचे.

रुणझुण पाखरा जा माझ्या माहेरा

माझ्या का माहेरी सोन्याची पायरी

त्यावरी बसजो शिदोरी सोडजो

माझ्या का मातेला निरोप सांगजो

तुझ्या का लेकीला बहू सासुरवास

होते तर होऊ दे औंदाच्या मास

पुढंदी धाडीन … गायीचे कळप

पुढंदी धाडीन … म्हशीचे कळप

सोन्याचे मंदिर, सोन्याचा कळस या धर्तीवर घराचे छत सोन्याचे असेल तर ते समजण्यासारखे होते, पण घराला चक्क सोन्याची पायरी? उलगडा व्हायचा नाही म्हणून मग खूप कुतूहल वाटायचे.

      भुलाबाईच्या गाण्याला तत्कालीन सामाजिक साहित्याचा आविष्कारच म्हणावे लागेल. साहित्य हा समाजाचा आरसा असतो असे म्हणतात. परंतू थोरा–मोठ्या कवी/लेखकांच्या साहित्यात तत्कालीन वास्तव प्रामाणिकपणे उतरलेलेच नसावे. त्या काळात संतकवी देवास भजण्यात गुंग, त्यांचे बहुतांश काव्यवैभव/प्रतिभा देवाचे गूण गाण्यात खर्ची पडली असावी. कवी हा तर मुळातच कल्पनाविलासात रमणारा प्राणी. वास्तववादी लेखन केले तर आपल्या काव्याला साहित्यिक दर्जा मिळणार नाही, या भयाने पछाडलेला. त्यातल्यात्यात कवी हे बहुतांश पुरूषच. त्यामुळे आपल्या दुखा:ला कोणीच वाली नाही हे बघून महिलांचा कोंडमारा झाला असावा. महिला विश्वाच्या सुखदु:खाचे लेखक, कवी किंवा गीतकारांनी नीट शब्दांकन केले नाही म्हणून आमच्या मायमाउल्या स्वतःच पुढे सरसावल्या असाव्यात आणि कदाचित त्यामुळेच अपरिहार्यपणे महिलांनी प्रस्थापित काव्याला फाटा देऊन स्वतःचे काव्यविश्व स्वतःच तयार केले असावे. कवी, गीतकार आणि संगीतकाराची भूमिका त्यांनीच चोख पार पाडली असावी आणि मग त्यातूनच आकारास आले असावे हादगा, भोंडला, भुलाबाईचे गाणे. या गीतामध्ये साठवलेली आहेत महिलांची अपार दु:खे. प्रकट झाली आहे साताजन्माच्या असहायतेची कारुण्यता. स्पष्टपणे प्रतिबिंबित झाली आहे अबला म्हणून आयुष्य कंठतांना वेळोवेळी झालेली कुचंबणा आणि मिळालेली हीनत्वाची वागणूक. त्यासोबतच अधोरेखित झाली आहे अठराविश्व दारिद्र्य लाभलेल्या संसाराचा गाडा हाकलताना झालेली दमछाक व ससेहोलपट अगदी ठळकपणे.

          वरील गीतात आईच्या घराला सोन्याची पायरी आहे असे म्हटले आहे. मग याला काय म्हणावे? कल्पनाविलास की अतिशयोक्ती? माहेरच्या बढाया की वास्तवता? मला मात्र यामध्ये एक भीषण वास्तविकता दिसते. ती सासुरवासीन जेव्हा सांगावा धाडण्यासाठी त्या पाखराला तिच्या माहेरगावी पाठविण्याचा बेत आखते तेव्हा तिचे माहेरघर पाखराला ओळखता यावे यासाठी तिच्या आईच्या घराची ओळख, खाणाखुणा सांगणे क्रमप्राप्तच ठरते. नेमकी येथेच तिची गोची झाली असावी. तिच्या आईच्या घराचे कवेलू, छप्पर, भिंती आणि दरवाजे हे नक्कीच सांगण्यायोग्य नसावे. खरं आहे ते सांगण्यासारखं नाही आणि खोटंही बोलायचं नाही अशी स्थिती जेव्हा उद्‍भवते तेव्हा अतिशयोक्तिपूर्ण कथन करून वेळ मारून नेणे, हाच तर मनुष्यस्वभाव आहे.  “जेव्हा एखाद्याकडे सांगण्यासारखे काहीच नसते तेव्हा तो बढाईचा आधार घेत असतो” हेच तर त्रिकाल अबाधित शाश्वत सत्य. मग तिने सोन्याची पायरी सांगितली त्याचा वेगळा अर्थ कसा घेणार?

         त्यावरी (पायरीवर) बसजो, शिदोरी सोडजो म्हणजे काय? निरोप घेऊन जाणार्‍या पाखराला सोबत नेलेली शिदोरीच खाण्यास सांगायला ती विसरत नाही. का? उत्तर अगदी सोपे आहे, पाखराला तातडीने जेवायची व्यवस्था आईच्या घरी होऊ शकेल अशी परिस्थिती आईचीही नाही, हे तिला पुरेपूर ठाऊक असावे. तसे नसते तर तिने सोबत शिदोरी कशाला दिली असती? आईचे गाव लांब आहे, तेवढी मजल गाठेपर्यंत रस्त्याने भूक लागेल हा उद्देश असता तर मध्येच वाटेवरच्या एखाद्या विहिरीवर किंवा नदीवर बसून शिदोरी खायला सांगितले असते. आईच्या घरी पोचल्यावर पायरीवर बसून सोबतचीच शिदोरी खावी जेणेकरून पाव्हणा उपाशी नाही याचे समाधान आईला लाभेल व आईकडे पाव्हण्याला तातडीने जेवू घालायची व्यवस्था नसेल तरी तिची या फ़टफ़जितीपासून सुटकाही होईल, असा कयास बांधूनच तिने पाखराला नेमकी सूचना दिली, हे उघड आहे.

           आता हे गीत बघा. या गीतामध्ये एका सुनेला लागलेली माहेरची ओढ आणि सुनेला जर माहेरा जाऊ दिले तर शेतीत कष्ट करणारे दोन हात कमी होतील, या भितीने त्रेधातिरपट उडालेल्या कुटुंबातील उर्वरित सदस्यांची हतबलताच दिसून येत आहे.

           नुकतेच लग्न होऊन सासरला नांदायला आलेल्या सुनेला तिच्या माहेरची आठवण होते, आईच्या आठवणीने जीव व्याकूळ झालेला असतो. तिकडे आईला सुद्धा लेकीची आठवण होऊन गहिवरलेले असते म्हणून मायलेकीची गाठभेठ करून देण्यासाठी बाप लेकीला घेण्यासाठी आलेला असतो. बाप घ्यायला आलेला बघून आनंदाने उल्हसित झालेली सून सासूला हळूच पण भीत-भीत विचारते.

हात जोडूनी पाया पडूनी

सासूबाई मी विनविते तुम्हाला

बावाजी आले घ्यायाला

जाऊ का मी माहेराला, माहेराला?

माहेराला जायची रीतसर परवानगी सूनबाई मागते आहे हे बघून सासू थोडी भांबावते. तिच्या समोर अनेक प्रश्न उभे राहतात. एक तर काहीना काही पैसा लागेलच जो घरात नाहीच. दुसरे असे की शेतीत कष्ट करणारे दोन हात पण कमी होणार. म्हणून ती सुनेला म्हणते.

कारलीचे बी लाव गं सूनबाई

मग जा आपल्या माहेरा, माहेरा

कारलीच्या बियाणाची लागवड करून माहेराला जाण्याचा सल्ला सुनेला मनोमन पटतो. ती बेगीबेगी लागवड उरकते आणि पुन्हा सासूला विचारते.

कारलीचे बी लावलेजी सासूबाई

आता तरी धाडा माहेरा, माहेरा

एक वेळ मारून नेता आली. कारलीचे बी लावून झाले पण आता पुढे काय? पुन्हा सासूबाई शक्कल लढवते.

कारलीचा वेल निघू दे गं सूनबाई

मग जा आपल्या माहेरा, माहेरा

सून पुन्हा काही दिवस कळ काढते, बियाणे अंकुरून वेल निघेपर्यंत बियाला पाणी घालते, वेलीचे संवर्धन करते आणि मग वेल निघालेला बघून पुन्हा एकदा आपल्या सासूला विचारती होते.

कारलीचा वेल निघालाजी सासूबाई

आता तरी धाडा माहेरा, माहेरा

सासूसमोर पुन्हा तोच यक्षप्रश्न. इकडे आड तिकडे विहीर. नाही म्हणता येत नाही आणि पाठवायला गेले तर संसाराचं अर्थशास्त्र कोसळते. कौटिल्याची अर्थनिती कळायला अर्थतज्ज्ञ किंवा अर्थमंत्रीच लागतो या सुशिक्षित समाजातील गोंडस समजुतीला उभा छेद देणारी एका अशिक्षित सासूची वर्तणूक.  मग तिथून पुढे नवनवीन युक्त्या लढविणे सासूचा नित्यक्रमच बनून जातो.

कारलीला फूल लागू दे गं सूनबाई

मग जा आपल्या माहेरा, माहेरा

कारलीला फूल लागले की माहेराला जायला मिळणार या आशेने सून मात्र आलेला दिवस पुढे ढकलत असते.

कारलीला फूल लागलेजी सासूबाई

आता तरी धाडा माहेरा, माहेरा

कारलीचा वेल मांडवावर गेलाय. वेल फुलांनी बहरून गेली. पण नशिबाच्या वेलीला बहर येईल तेव्हा ना.

कारलीला कारले लागू दे गं सूनबाई

मग जा आपल्या माहेरा, माहेरा

आता प्रतीक्षेची घडी संपली. कारलीला कारले लागलेत. आता तरी परवानगी मिळायला हवी की नाही?

कारलीला कारले लागलेजी सासूबाई

आता तरी धाडा माहेरा, माहेरा

आता कष्ट फळांस आले. कारली पण कारल्याने लदबदून गेली. पण कारली बाजारात नेऊन विकल्याखेरीज पैसा कसा येणार? म्हणून पुन्हा सासू सुनेला अगदी समजावणीच्या स्वरात सांगते

कारलीला बाजारा जाऊ दे गं सूनबाई

मग जा आपल्या माहेरा, माहेरा

कारलीला कारले लागलेत, कारली बाजारात गेली. आता मात्र नक्कीच परवानगी मिळणार अशी सुनेला खात्री आहे, म्हणून ती म्हणते

कारली बाजारात गेलीजी सासूबाई

आता तरी धाडा माहेरा, माहेरा

कारली बाजारात गेली आहे. शेतीत पिकवलेला माल बाजारात जाणे, हा शेतीतील कष्ट फळांस येणारा परमोच्च बिंदू. खरे तर हे गीत यापुढे आनंदाच्या क्षणांकडे वळायला हवे. एवढ्या मेहेनतीने पिकविलेली कारली बाजारात जाणे हा कष्टाचे फळ पदरात पडण्याचा क्षण. शेतकर्‍याच्या घरात लक्ष्मी येण्याचा एकमेव मार्ग म्हणजे शेतीत घाम गाळून पिकविलेला माल विक्रीस जाणे. माल विकायला बाजाराकडे गेलेला घरधनी घराकडे येताना लक्ष्मी घेऊन परतायला हवा. सोबत काहीना काही भातकं, खाऊ वगैरे आणायला हवा. पण इथून पुढे या गीतात तसे काहीच होत नाही. याउलट गीताच्या याच कडव्यापासून गीत विचित्र वळण घेते. निदान आतापर्यंत तरी कुठलाही खाष्टपणा न दाखविणार्‍या सासूचा स्वभाव इथूनच बदलायला लागतो. आजपर्यंत घरात एकमेकाशी गोडीगुलाबीने वागणारी माणसे आता नैराश्याच्या भावनेतून एकमेकांशी फटकून वागताना दिसत आहे. घरात चिडचीडपणा, उदासीनता वाढीस लागलेली दिसत आहे.

         नेमकं झालंय तरी काय? कारली मातीमोल भावाने तर नाही खपली ना? की कारलीच्या खरेदीला कोणी घेवालच मिळाला नाही? मनुष्यजातीचा स्वभाव त्याच्या आर्थिक स्थितीनुसार बदलत असतो हे समीकरण अर्थतज्ज्ञांच्या अर्थशास्त्रात बसत नसले तरीही तेच सत्य असावे. कारण या गीताचा शेवट नेमके तेच अधोरेखीत करून जातो.

आतातरी आपल्याला माहेराला जायला मिळणार की नाही या विचाराने ग्रस्त झालेली सून परत एकदा सासूला विचारती होते. सासूला खूश करण्यासाठी तिला तिच्या आवडीची कारलीची भाजी करून खाऊ घालते.

कारलीची भाजी केलीजी सासूबाई

आता तरी धाडा माहेरा, माहेरा

पण आता आर्थिक विवंचनेने ग्रासलेल्या घरातली सारी कहाणीच बदललेली असते. परिस्थितीसमोर निरुत्तर झालेली सासू चक्क सुनेसोबत त्रोटक स्वरूपात बोलायला लागते. तिची भाषा बदलते, भाषेची ढब बदलते आणि शब्दफ़ेकीची तर्‍हाही बदलते.

मला काय पुसते, बरीच दिसते

पूस आपल्या सासर्‍याला, सासर्‍याला

अगं सूनबाई, माझी ना नाही पण एक शब्द मामंजीला पण विचारून घे ना. असे म्हटले असते तर ते समजण्यासारखे होते पण सासूची आता तशी सहज आणि सौदार्हपूर्ण बोलीभाषाच बदललेली दिसत आहे कारण "मला काय पुसते, बरीच दिसते" हे वाक्य वाटते तेवढे सहज नाही. या वाक्यात उद्वेग, उबग, क्लेश, चिडचिड, ग्लानी आणि फ़टकळपणा ठासून भरला आहे.
मात्र तरीही "सासर्‍याकडूनच परवानगी घ्यायची होती तर इतके दिवस तुम्ही कशाला उगीच बहाणे सांगत राहिल्या" असा प्रतीसवाल सून करीत नाही. सासूची इच्छा प्रमाण मानून सून आता सासर्‍याला विचारायला जाते.

मामाजी, मामाजी बाबा आले न्यायाला

जाऊ काजी माहेरा, माहेरा

पण सासरा तरी वेगळं बोलणार? सुनेला माहेरी पाठवायचे म्हणजे निदान तिला जाण्यापुरता तरी घरात पैसा असावा की नाही? नसणारच. म्हणून तर तोही आपल्यावरची जबाबदारी दुसर्‍यावर ढकलून मोकळा होतो.

मला काय पुसते, बरीच दिसते

पूस आपल्या नवर्‍याला, नवर्‍याला

आता शेवटला पर्याय. तिची माहेराला जाण्याची हक्काची मागणी कोणीच समजून घेतली नाही. पण आता परवानगी देण्याचे अधिकार थेट नवर्‍याच्याच हातात आले आहे. तिच्या व्याकुळतेची तीव्रता नवर्‍याला तरी नक्कीच कळलेली असणार, असे तिला वाटते. तिला खात्री आहे की आता नक्कीच जायला मिळणार. बस्स एवढ्याच तर आशेपायी ती नवर्‍याला विचारायला जाते.

स्वामीजी, स्वामीजी बाबा आले न्यायाला

जाऊ काजी माहेरा, माहेरा

पण प्राणप्रियेच्या प्रश्नाला नवरा उत्तरच देत नाही. नवरा काय म्हणतो हे गीतात लिहिलेच नाही. गीताचा दोन ओळीत थेट शेवटच करून टाकला आहे.

”घेतलीय लाठी, हाणलीय पाठी,

तुला मोठं माहेर आठवते, आठवते……!!”

             पीएचडी, डी.लिट मिळवून किंवा वेदपुराण, कुराण, बायबल, कौटिल्य, चाणक्य किंवा हजारो पानांचे अर्थशास्त्राचे पुस्तक वाचूनही जेवढे गाव, गरिबी आणि शेतीचे अर्थशास्त्र समजून घेता येत नाही त्यापेक्षा जास्त वास्तववादी अर्थशास्त्र ह्या एका गीतात सामावले आहे, याची मला खात्री आहे.

                                                                                                                        गंगाधर मुटे
................................................................................................................................................

मी संकलीत केलेली भुलाबाई, हादगा, भोंडल्याची अधिक गाणी येथे उपलब्ध आहे.

कथाअर्थव्यवहारमांडणीवाङ्मयसमाजजीवनमानअर्थकारणराजकारणशिक्षणविचारलेखसमीक्षा

प्रतिक्रिया

प्राजु's picture

13 Jul 2011 - 10:48 pm | प्राजु

सुरेख!!!

अप्रतिम..

तरी ऑफिसमधुन जाताना घाईत वाचला लेख,
उद्या व्यव्स्थीत वाचुन व्यव्स्थीत रिप्लाय देतो..

ज्ञानोबाचे पैजार's picture

14 Jul 2011 - 10:52 am | ज्ञानोबाचे पैजार

या गाण्याचा सुखद शेवट ऐकला आहे
"आणा फणी घाला वेणी
जाउद्या राणी माहेरा माहेरा,
आणली फणी घातली वेणी
गेली राणी माहेरा माहेरा"

बाकी तुम्ही जो अर्थ काढायचा प्रयत्न केला आहे तो कदाचीत बरोबरही असेल.

गंगाधर मुटे's picture

14 Jul 2011 - 10:38 pm | गंगाधर मुटे

गाण्याचा शेवट सुखद करण्यासाठी

"आणा फणी घाला वेणी
जाउद्या राणी माहेरा माहेरा,
आणली फणी घातली वेणी
गेली राणी माहेरा माहेरा"

हा शेवट नंतर मुळ गीतात घालण्यात आला असावा. कारण

१) मुळ गीताची लय या कडव्याशी मेळ खात नाही.

२) मुळ गीताची रचनाशैली या कडव्यापेक्शा वेगळी आहे.

३) मुळ गीत संवादात्मक आहे. त्यामुळे हे कडवे मुळ गीताशी मिळतेजुळते असावे असे वाटत नाही.

मस्त कलंदर's picture

14 Jul 2011 - 11:51 am | मस्त कलंदर

"रूणूझुणूत्या पाखरा.." हे गाणं अशा पद्धतीनंही आहे हे माहित नव्हतं. त्याचं विश्लेषण अगदी मनोमन पटलं.
"कारल्याचा वेल..." म्हणताना मलाही सुनेला माहेरी जाऊ न देणार्‍या सासूचा राग यायचा. पण सुदैवाने आमच्याही गाण्याचा शेवट पैजारबुवांनी लिहिल्याप्रमाणं सुखद होता.
हे "घे काठी, घाल पाठी, घरादाराची लक्ष्मी खोटी" प्रकरण " शिंक्यावरचं लोणी खाल्लं कोणी.." मध्ये होतं. बहुतेक हे लोणी धाकट्या नणंदेनं खाल्लेलं असतं आणि दादाच्या मांडीवर बसून ती वहिनी चोरून खाते असं सांगते आणि मग दादासाहेब वहिनीला मारतात असं काहीसं हे गाणं आहे.

ज्ञानोबाचे पैजार's picture

16 Jul 2011 - 11:00 am | ज्ञानोबाचे पैजार

नणंदा भावजया दोघी जणी
घरात नव्हत तिसर कोणी
शिंक्यावरच लोणी खाल्लं कोणी
मी नाही खाल्लं वहिनीनी खाल्लं
आता माझा दादा येईल गं
दादाच्या मांडीवर बसेन गं
दादा तुझी बायको चोरटी
असेल मोठी गोरटी
घे काठी घाल पाठी
घरा घराची लक्ष्मी मोठी

असं काहीसं आठवतय.

मस्त कलंदर's picture

16 Jul 2011 - 11:07 am | मस्त कलंदर

हेच ते गाणं.

गंगाधर मुटे's picture

16 Jul 2011 - 11:38 am | गंगाधर मुटे

माझ्या संग्रही असलेल्या गीतात थोडासा फरक आहे.

लोणी खाल्लं कोणी : हादग्याची गाणी

सूड's picture

14 Jul 2011 - 12:14 pm | सूड

आमच्या शेजारी एक आजी राहत असत त्यांच्या तोंडून ऐकलेलं. गाणं नीट आठवत नाही, पण थोडंफार आठवतंय ते असं की खेळ खेळून परतताना एका सासुरवाशीणीला उशीर होतो. सासू-सासरे एवढंच काय नवरा सुद्धा घरात घ्यायला नकार देतो.
'आमची कवाडं आंब्याची कुलपं निघंनात तांब्याची' असं सांगून तिला माहेरी धाडतात. भर रात्रीची ती बया माहेरची वाट धरते, माहेरी वडील सांगतात 'आमची कवाडं साव्याची (सागाची?) कुलपं निघंनात चाव्याची'.
मग काय, वाटेत वाटसरु भेटतो त्याला म्हणते हे सगळे दागदागिने घे आणि मला अंधारडोहाची वाट सांग. शेवटी त्या डोहात उडी घेते ते तिच्या आईला स्वप्नात दिसतं, असं काहीसं होतं.

कच्ची कैरी's picture

14 Jul 2011 - 2:57 pm | कच्ची कैरी

हे वाचुन मला माझे लहाणपण आठवले आम्ही भुलाबाईला गुलाबाई असे म्हणायचो व सगळ्या मुली सोबत जाउन गुलाबाईची मुर्ती आणायचो व खूप गाने गायचो गुलाबाईचे !! ह्याविषयावर एक स्वतंत्र लेख लिहायला मला नक्की आवडेल ,वेळ मिळाल्यावर नक्की लेख लिहेल.

माहेरची ओढ लागलेल्या एका सुनेला सासरचे बनेल लोक निरनिराळ्या सबबी सांगून रोखून धरतात व अखेर काठी उगारुन स्वतःची झोटिंगशाही दाखवतात. इतकी साधी सरळ व्यथा वेदना या लोकगीतात असताना मूटेसाहेब त्याचे भलतेच इंटरप्रिटेशन करत सूटलेत. या गीतातून गाव, गरीबी आणि शेतीचे अर्थशास्त्र असले काहीही अभिप्रेत नाही. कारली बाजारात विकली गेली नाहीत, मग पुढचा भाग हा मुटेसाहेबांचा कल्पनाविलास. उगाच वडाची साल पिंपळाला कशाला?

तरुण स्त्रियांची सासरी होणारी कुचंबणा अनेक गाण्यांतून समान आहे.

अस्स माहेर सुरेख बाई खायाला घालतं
अस्स सासर द्वाड बाई कोंडुनी मारतं

संत एकनाथांनी तर या जाचाला विटलेल्या बाईच्या मनःस्थितीवर 'सत्वर पाव गं मला, भवानीआई रोडगा वाहीन तुला' हे भारुड रचले आहे. सासरच्यांना अद्दल घडावी, असे मागणे मागताना शेवटी ती म्हणते

एका जनार्दनी सगळेच जाऊ देत, एकटीच राहू दे मला
भवानीआई रोडगा वाहीन तुला.

भोंडल्याची गाणी, जात्यावरच्या ओव्या, बहिणाबाईंच्या कविता या स्त्रीमनाचे प्रतिनिधीत्व करतात. त्यात वेगळे अर्थ कसले निघणार? उद्या 'एक लिंबू झेलू बाई दोन लिंबे झेलू' हे भोंडल्याचे गाणे म्हणजे 'लिंबे बाजारात न खपल्याचे' किंवा 'लिंबाच्या अर्थशास्त्राचे प्रतिक' म्हणावे का?

पुन्हा बहुतांश लेख वाचनीय लिहिल्यावर शेवटच्या दोन ओळींत मुटेसाहेबांनी पुन्हा गंमत केलीय. ते म्हणतात.

<< पीएचडी, डी.लिट मिळवून किंवा वेदपुराण, कुराण, बायबल, कौटिल्य, चाणक्य किंवा हजारो पानांचे अर्थशास्त्राचे पुस्तक वाचूनही जेवढे गाव, गरिबी आणि शेतीचे अर्थशास्त्र समजून घेता येत नाही त्यापेक्षा जास्त वास्तववादी अर्थशास्त्र ह्या एका गीतात सामावले आहे, याची मला खात्री आहे.>>

अरे देवा! वेदपुराण, कुराण, बायबलच्या रांगेत अर्थशास्त्राला कशाला गोवताय? ते आपण नीट वाचलय का? एकच उदाहरण देतो. पूर्वी तर्कशास्त्र, वेदविद्या व राजनीति या तीनच विद्या मानल्या जात. पण कृषिकर्मादी अर्थशास्त्र (अ‍ॅग्रिकल्चरल ट्रेड इकॉनॉमिक्स) ही स्वतंत्र चौथी विद्या आहे, हा प्रथम पुरस्कार चाणक्याने केलाय. राजाने शेतकी खात्याचा अधिकारी कसा नेमावा, हे या ग्रंथातील प्रकरण शेतकर्‍यांनी वाचण्यासारखे आहे. त्यातील काही ओळी नमूद करतो.

दहिवराचा ओलावा व उन्हाची उष्णता मिळावी म्हणून धान्याचे बी सात दिवस व द्विदल धान्याचे बी तीन किंवा पाच दिवस पसरुन ठेवावे. ज्यांची पेर कांडी करुन करायची असते त्यांच्या कांड्याना मध, तूप, डुकराची चरबी माखून, वर शेण लाऊन ठेवावे. कंद लावताना ज्या ठिकाणी कापला असेल त्या ठिकाणी मधाचा व तुपाचा लेप करावा. कपाशीचे बी शेणाने चोपडावे. योग्य वेळी झाडांची आळी जाळून काढावी आणि त्यास हाडांचे व शेणखत घालावे. अंकुर फुटून वर आले म्हणजे त्यास ताज्या उग्र वासाच्या मासळीचे खत घालावे व 'स्नुही'चे दूध शिंपडावे. सरकी व सापाची कात एकत्र करुन धूर दिला असता त्याठिकाणी साप राहात नाहीत. धान्य व पिके जसजशी तयार होतील तसतशी काढून न्यावीत. शहाण्या शेतकर्‍याने शेतात गवताची काडीदेखील राहू देऊ नये.

आता शेतीबद्दलची इतकी बारीक निरीक्षणे नमूद करणारा चाणक्याचा ग्रंथ आपल्याला वास्तववादी वाटत नाही. त्यापेक्षा खोल अर्थ या एका जानपदगीतात सामावलाय, हे नवलच म्हणायचे.

गंगाधर मुटे's picture

16 Jul 2011 - 3:46 pm | गंगाधर मुटे

एका अशिक्षीत स्त्रीने लिहिलेल्या एखाद्या लोकगीतात संपूर्ण ग्रामीण अर्थ आणि सामाजिक व्यवस्थेचा अर्क सामावला असू शकतो,

ही कल्पनाच अमान्य असणे, हा तुमच्या प्रतिसादाचा अर्थ आहे.

तसे नसेल तर त्या गीताचा अर्थ लिहून दाखवा. समिक्षण करून दाखवा.

दूध का दूध और पाणीका पाणी - करून दाखवायची माझी तयारी आहे. :)

योगप्रभू's picture

16 Jul 2011 - 10:51 pm | योगप्रभू

<<एका अशिक्षीत स्त्रीने लिहिलेल्या एखाद्या लोकगीतात संपूर्ण ग्रामीण अर्थ आणि सामाजिक व्यवस्थेचा अर्क सामावला असू शकतो,>>

... हो अन्यत्र अनेक गीतांत असू शकेल, पण या लोकगीतातून ग्रामीण अर्थव्यवस्थेचा अर्क मुळीच दिसत नाही. सामाजिक व्यवस्थेचे म्हणाल तरी एकत्र कुटुंबव्यवस्था, तरुण स्त्रियांना स्वयंनिर्णयाचा अधिकार नसणे, सासरी सहन करावा लागणारा जाच, सासूचा बनेलपणा, सासर्‍याचे स्वार्थी मौन, नवर्‍याची हाणामारीवर उतरण्याची वृत्ती आणि माहेरच्या ओढीने व्याकुळ झालेली सून यापलिकडे आणखी काय दिसते, हे तुम्हीच समजाऊन सांगा मुटेसाहेब. कारली बाजारात विकली गेली नाहीत म्हणून घर अगतिक होते आणि गीत विचित्र वळण घेते, असे तुम्ही म्हणता. वास्तविक साध्या अर्थाला तुम्हीच विचित्र वळण देताय. कारली बाजारात विक्रीला गेली आणि सासूलाही कारल्याची भाजी खाऊ घातली. सर्व सबबी संपल्यावर सासूने सासर्‍यावर ढकलले. त्याने नवर्‍यावर ढकलले. वडील न्यायला आल्यावर नवर्‍याच्याही सबबी संपल्या आणि तो मारामारीवर उतरला. कारली विकली गेली नाहीत, हे कुठल्या ओळीत जाणवतेय, हे कृपया सांगावे.

कशातूनही काहीही अर्थ काढायचा झाला तर माझ्या मते पुढील बालगीत ग्रामीण अर्थव्यवस्थेचे आणि सामाजिक व्यवस्थेचे उत्तम प्रतिक आहे. पाहा कसे ते.

ये रे ये रे पावसा! तुला देतो पैसा
- ही पहिलीच ओळ शेतकर्‍याच्या वेदनेचे प्रतिक आहे. पाऊस काही वेळेवर पडत नाहीय (यातून ग्लोबल वॉर्मिंगची समस्या किती तीव्र झालीय ते दिसते) पावसाला ये रे म्हणून थकलेला शेतकरी अखेर त्याला पैसा द्यायची तयारी दाखवतो. ग्रामीण भागात पैसे चारल्याखेरीज कामे होत नाहीत, या सत्यावर हे शब्द झगझगीत प्रकाश टाकतात. काळ्या पैशाचे अर्थशास्त्र इथे दिसते.

पैसा झाला खोटा, पाऊस आला मोठा
- अर्थव्यवस्थेतील बनावट चलनाची समस्या यातून दिसते. शेतकर्‍याचा माल घेऊन त्याला खोटा पैसा देण्याच्या फसव्या व्यापारी वृत्तीला काय म्हणावे? बरं पाऊस उशिरा आला तो आला, पण एवढा पडला, की पेरण्याच वाया गेल्या.

ये गं ये गं सरी, माझे मडके भरी
- पेरण्या वाया घालवून पाऊस पुन्हा गायब झाला. त्याने इतकी ओढ दिली, की पिण्याच्या पाण्याचीही समस्या निर्माण झाली. आता एखादी सर यावी आणि निदान पिण्याच्या पाण्याचे मडके भरावे, अशी प्रार्थना शेतकरी करु लागला.

सर आली धाऊन, मडके गेले वाहून
- पाऊस आला, पण कसा तर अगदी राजकारण्यांसारखा. सगळे संपल्यावर आला विचारपूस करायला आणि जाताना घरातले मडकेही घेऊन गेला.

गंगाधर मुटे's picture

17 Jul 2011 - 9:58 am | गंगाधर मुटे

ये रे ये रे पावसा! तुला देतो पैसा

- ही पहिलीच ओळ मनुष्यप्राणी लाच द्यायला कसा उताविळ आहे, याचे प्रतिक आहे.पाऊस काही वेळेवर पडत नाहीय (यातून ग्लोबल वॉर्मिंगची समस्या किती तीव्र झालीय ते दिसते) पावसाला ये रे म्हणून थकलेला शेतकरी अखेर त्याला पैसा द्यायची तयारी दाखवतो. या देशात पैसे चारल्याखेरीज कामे होत नाहीत, या सत्यावर हे शब्द झगझगीत प्रकाश टाकतात. काळ्या पैशाचे अर्थशास्त्र इथे दिसते.

हे मला पटले. :) :)

पैसा झाला खोटा, पाऊस आला मोठा

- पण पाऊस म्हणजे काही या देशातली भ्रष्टाचारी शासन/प्रशासन यंत्रना नव्हे. त्यामुळे पैशाचे आमिष खोटे ठरले. पैसा खोटा ठरवून मोठा पाऊस आला. :) :)

बाकी दोन कडव्यांचे अर्थ पचन व्हायला फारसे कठीण नाहीत. :) :) :)

<<<< कृषिकर्मादी अर्थशास्त्र (अ‍ॅग्रिकल्चरल ट्रेड इकॉनॉमिक्स) ही स्वतंत्र चौथी विद्या आहे, हा प्रथम पुरस्कार चाणक्याने केलाय. राजाने शेतकी खात्याचा अधिकारी कसा नेमावा, हे या ग्रंथातील प्रकरण शेतकर्‍यांनी वाचण्यासारखे आहे.>>>>>

हे शेतकर्‍यांनी कशाला वाचावे?

शेतकी खात्याचा अधिकारी कसा नेमावा हे वाचायला सरकारला सांगा ना!

उठसुठ काहीही सांगायचे ते शेतकर्‍यालाच, अत्यंत चुकीचा प्रघात पडलाय या समाजात. आणि त्याच समाजाचे तुम्हीही सदस्य असल्याने, तुम्हीही तेच करता, असेच ना?

शेतकी खात्याचा अधिकारी कसा नेमावा, हे प्रकरण जरी राजाला उद्देशून असले तरी त्यात शेतकर्‍यांना जो सल्ला दिला आहे, तोच आणि तेवढाच मी उल्लेख केला. बियाणे कसे तयार करावे, याचा सल्ला शेतकी खात्याचा अधिकारी आणि राजाला उपयोगाचा नसतो.

<<उठसुठ काहीही सांगायचे ते शेतकर्‍यालाच, अत्यंत चुकीचा प्रघात पडलाय या समाजात. आणि त्याच समाजाचे तुम्हीही सदस्य असल्याने, तुम्हीही तेच करता, असेच ना?>>

मी फक्त समाजाचा सदस्य आहे. कोणत्या विशिष्ट समाजाचा नाही. तुमच्या भाषेवरुन तुम्ही त्रागा करायला लागलाय, असे वाटते. ठीक आहे. मी थांबतो. पण सांगावे लागणार ते शेतकर्‍यालाच कारण तोच परिस्थितीचा बळी आहे. शैक्षणिक अपयशाने जीवन संपवू पाहणार्‍या विद्यार्थ्यांना, कौटूंबिक कलहामुळे घटस्फोटाच्या उंबरठ्यावर असणार्‍यांना समुपदेशन केले जाते. तिथे आपण असेच म्हणायचे का?

गंगाधर मुटे's picture

17 Jul 2011 - 10:53 am | गंगाधर मुटे

तुमच्या याआधिच्या प्रतिसादाला उत्तर द्यायसाठी आलो तर तुमचा हा प्रतिसाद दिसला.
त्या प्रतिसादाला उत्तर द्यायची इच्छा आहे. पण तत्पूर्वी या प्रतिसादाला उत्तर.

<<<< हे प्रकरण जरी राजाला उद्देशून असले तरी त्यात शेतकर्‍यांना जो सल्ला दिला आहे >>>>>

जे चाणक्याचे वाक्य तुम्ही उधृत केले आहे, त्यात काहीच नाविन्य नाही. ते शेतकर्‍यांना आधीच मुखपाठ आहे. कदाचित चाणक्याच्याही आधी ती माहीती शेतकर्‍यांना असू शकते, यातही काही विशेष नाही.

<<<<मी फक्त समाजाचा सदस्य आहे. कोणत्या विशिष्ट समाजाचा नाही. >>>>

जात आणि धर्माचे अनुषंगाने समाज हा शब्द घ्यायचा म्हटले तर मला तुमचे साधे नावही माहीत नाही. त्यामुळे मी समाज हा शब्द जात आणि धर्माचे अनुषंगाने वापरलेला नाही.

शेतकरीसमाज, बिगरशेतकरी समाज, ग्रामिण समाज, शहरी समाज, आदिवासी समाज, पिडित समाज, सुशिक्षित समाज, कर्मचारीसमाज, राजकारणी समाज, विद्वान समाज, शोषक समाज, शोषीत समाज
यामध्ये ज्या अर्थाने समाज हा शब्द येतो, त्या अर्थाने मी समाज हा शब्द वापरला आहे.

पण तरीही "त्याच समाजाचे तुम्हीही सदस्य असल्याने" असा वाक्यप्रयोग मी टाळायला हवा होता. त्या अर्थाने माझी चूक झालीच. मात्र भविष्यात मी अशा चुका टाळायचा प्रयत्न करेन.

मी चाणक्याचा धर्माच्या-कर्माच्या आधारे विरोध करत नाही. शिवाय मी ज्यांना गुरूस्थानी मानतो ते सर्वच चाणक्याच्याच धर्माचे आहेत.
मी त्याच्या पांडित्याचाही विरोध करत नाही.
चानक्याचे पांडित्य शेतकर्‍यांना उपयोगाचे ठरले नाही, हा माझा मुद्दा आहे.

<<<<ठीक आहे. मी थांबतो. >>>>>

मला वाटते अशी टोकाची भूमिका घ्यायची गरज नाही. चर्चेनेच विचारांची देवान-घेवान होऊ शकते,
यावर माझा विश्वास आहे आणि तुमचाही आहे, याची मला खात्री आहे.
..............................................................
मुख्य मुद्दा कवितेचा. त्यासंदर्भात

<<<पण या लोकगीतातून ग्रामीण अर्थव्यवस्थेचा अर्क मुळीच दिसत नाही. सामाजिक व्यवस्थेचे म्हणाल तरी एकत्र कुटुंबव्यवस्था, तरुण स्त्रियांना स्वयंनिर्णयाचा अधिकार नसणे, सासरी सहन करावा लागणारा जाच, सासूचा बनेलपणा, सासर्‍याचे स्वार्थी मौन, नवर्‍याची हाणामारीवर उतरण्याची वृत्ती आणि माहेरच्या ओढीने व्याकुळ झालेली सून यापलिकडे आणखी काय दिसते, हे तुम्हीच समजाऊन सांगा मुटेसाहेब. कारली बाजारात विकली गेली नाहीत म्हणून घर अगतिक होते आणि गीत विचित्र वळण घेते, असे तुम्ही म्हणता. वास्तविक साध्या अर्थाला तुम्हीच विचित्र वळण देताय. कारली बाजारात विक्रीला गेली आणि सासूलाही कारल्याची भाजी खाऊ घातली. सर्व सबबी संपल्यावर सासूने सासर्‍यावर ढकलले. त्याने नवर्‍यावर ढकलले. वडील न्यायला आल्यावर नवर्‍याच्याही सबबी संपल्या आणि तो मारामारीवर उतरला. कारली विकली गेली नाहीत, हे कुठल्या ओळीत जाणवतेय, हे कृपया सांगावे.>>>

मी म्हणतो तेच खरे आहे, असे मी मानत नाही. पण योग्य समाधान झाल्याशिवाय काहीही स्विकारायला माझी तयारी नाही.
मी जे म्हणतो ते तुम्हाला पटत नसेल तर अधिक विस्ताराने खुलासा करण्याचा प्रयत्न करणे ही माझी जबाबदारी आहे.

तेव्हा आपण अधिक गंभीरतेने या कवितेवर चर्चा करू शकतो.
अर्थात तुमची इच्छा असेल तर....!

<<आपण अधिक गंभीरतेने या कवितेवर चर्चा करू शकतो.>>

मुटेसाहेब, मला वाटते, की जे मुद्दे मी मांडलेत ते निश्चितच पोरकटपणाने नव्हेत. बाकी चर्चा गंभीरतेने करण्याअगोदर दोन मुख्य प्रश्नांची उत्तरे आपण दिलेली नाहीत.

१) कारली विकली गेली नाहीत, घरधन्याला पैसा मिळालेला नाही, घर अडचणीत आलेले आहे आणि परिस्थितीने विचित्र वळण घेतलेले आहे, असे इंटरप्रिटेशन आपण कशाच्या आधारे केले आहेत?

२) या गाण्यातून ग्रामीण अर्थव्यवस्थेचे दर्शन कसे घडते?

मुळात जे गाण्यात अभिप्रेत नाहीच ते गृहित धरुन त्याच्या आधारावर नवी चुकीची विधाने केल्यास वाचणारे तरी मान्य कसे करतील? सासरी होणारा जाच, इतकीच या गाण्याची मध्यवर्ती कल्पना असताना उगाचय त्यात अर्थव्यवस्थेसारखे मोठेमोठे शब्द कशाला घुसडायचे?

बरं स्रियांच्या व्यथा-वेदना हा स्वतंत्र विषय असून त्याचे आपल्याजागी महत्त्व आहेच, परंतु कारण नसताना आपण धर्मग्रंथ आणि चाणक्याच्या अर्थशास्त्राला त्यात ओढून वर दुय्यम का लेखताय?

चाणक्याचे पांडित्य शेतकर्‍यांना उपयोगाचे ठरले नाही. नसेलही. कारण तो काही कृषिशास्त्रावरचा ग्रंथ नाही. तो राज्यशास्त्राचा ग्रंथ असून त्यात प्रामुख्याने राजकीय व्यवस्था आणि प्रशासनाचा उहापोह आहे. पण आजवर कुणाचे पांडित्य भारतीय शेतकर्‍यांना उपयोगाचे ठरले आहे? शेतकरी स्वतः अत्यंत हुशार असतो. त्याला पुस्तकी पंडितांनी काहीही शिकवण्याची गरज नसते. खरे तर बिगरशेतकरी अन्य कुठल्याही समाज घटकाने त्याला काहीही सांगता कामा नये. अगदी इतरांच्या सहानुभूतीचीही गरज नाही.

असो. शेतकर्‍यांना नसला तरी अभ्यासक/संशोधक/उद्योजक यांना चाणक्याच्या ग्रंथाचा कसा उपयोग होऊ शकतो, हे नुकतेच माझ्या पाहाण्यात आले. नाशिकच्या एका शेतकरी-संशोधकाने द्राक्षापासून मध तयार केल्याची बातमी नुकतीच वाचनात आली. हा मध नैसर्गिक मधाइतकाच उत्तम असून त्याचे आणखीही उपयोग होऊ शकतात. जंगले तुटत चालल्याने नैसर्गिक मधाचे उत्पादन घटत आहे. अशावेळी हा द्राक्षापासूनचा मध पर्यायी उत्पादन म्हणून वापरता येईल आणि यावर एक इंडस्ट्री उभी राहू शकते. तर सांगण्याचा मुद्दा असा, की द्राक्षापासून कृत्रिम मध चाणक्याच्या काळात बनत असे. तसा उल्लेख चाणक्याने या पुस्तकात केलेला आढळला.

हळद आणि कडुलिंबाच्या पेटंटचा लढा जिंकताना भारताला या वनस्पतींबाबतच्या जुन्या भारतीय ग्रंथातील नोंदींचा फार मोठा आधार पुरावा म्हणून मिळाला होता. त्यामुळे जुने पांडित्य कधी कुणाच्या उपयोगी पडेल सांगता येत नाही.

गंगाधर मुटे's picture

17 Jul 2011 - 10:55 pm | गंगाधर मुटे

सासरी होणारा जाच, इतकीच या गाण्याची मध्यवर्ती कल्पना नाही. पण खरे काय आहे ते शोधण्यासाठी आपल्याला मुद्देसुद चर्चा करावी लागेल. मुद्दा भरकटू नये यासाठी अवांतर चर्चा टाळावी लागेल.
त्यासाठी आपण एक बंधन आखून घेऊ.

पहिल्यांदा सुरुवातीचे दोन कडव्याचा अर्थ लावायचा. ते पूर्ण झाले की त्यापुढील दोन कडवे. ते पूर्ण झाले की त्यापुढील दोन कडवे.

पुढील प्रतिसादात मी पहील्या दोन कडव्याचा अर्थ मला जसा जाणवतो, तसा लिहिण्याचा प्रयत्न करतो.

तुम्हाला पहील्या दोन कडव्याचा अर्थ जसा जाणवतो, तसा लिहावा.

गंगाधर मुटे's picture

17 Jul 2011 - 11:36 pm | गंगाधर मुटे

नुकतेच लग्न होऊन सासरला नांदायला आलेल्या सुनेला तिच्या माहेरची आठवण होते, आईच्या आठवणीने जीव व्याकूळ झालेला असतो. तिकडे आईला सुद्धा लेकीची आठवण होऊन गहिवरलेले असते म्हणून मायलेकीची गाठभेठ करून देण्यासाठी बाप लेकीला घेण्यासाठी आलेला असतो. बाप घ्यायला आलेला बघून आनंदाने उल्हसित झालेली सून सासूला हळूच विचारते.

हात जोडूनी पाया पडूनी
सासूबाई मी विनविते तुम्हाला
बावाजी आले घ्यायाला
जाऊ का मी माहेराला, माहेराला?

सुनेला सासूला विचारावे, असे वाटणे ही गोष्ट घरात कौटूंबीक वातावरण सौदार्हाचे आहे, हे सिद्ध करते. नवर्‍याला विचारण्याऐवजी सासूला विचारणे याचा अर्थ ती सुसंस्कारीत आहे, सासूला सन्मान देणारी आहे, हेही स्पष्ट करते.

"सासू माझी कूरकूर करते, तिकडेच मरू दे तिले, भवानी आई रोडगा वाहीन तुले" असे म्हणणार्‍या सुनेपैकी ती नाही. निदान सासूविषयी तिच्या मनात काहीतरी किल्मिष आहे, असे कुठेही जाणवत नाही.

त्यावर सासूचे उत्तर असे-

कारलीचे बी लाव गं सूनबाई
मग जा आपल्या माहेरा, माहेरा

सासू सुद्धा सुनेला "सुनबाई" असे संबोधते.
इंदिराला इंदिरे म्हणणे आणि इंदीराबाई म्हणणे किंवा चंफतला चंफत्या म्हणणे किंवा चंफतराव म्हणणे किंवा गुरूला मास्तर्‍या म्हणणे किंवा गुरुजी म्हणणे यात आदरभाव असणे आणि नसणे हा फरक आहे, असे मला वाटते.

सासू सुनेला जाऊ नको असे म्हणत नाही. कारलीचे बी तेवढे लावून जा असे म्हणते.

असे म्हणते कारण कारलीचे बी लावायला पैसे देवून मजूर सांगणे प्रवडणारे नसावे किंवा
मजूराला द्यायला घरात पैसे नसावे.
मजूर उपलब्ध नसावे त्यामुळे सून माहेरा गेली तर कारलीची लागवड राहून जाईन अशी तिला भिती वाटत असावी.

सुनेला कारलीचे बी लावून जा म्हणणे यात कोणत्याही अंगाने सासूरवास आहे, असे मला वाटत नाही.

हा सासूरवासच आहे असे ठासून म्हणायचे झाले तर खालील बाबी गृहित धराव्या लागतील.

१) कोणतीही सासू ही सासूरवास करणारीच असते. किंवा
२) कोणत्याही सासूला सासूरवास करण्याशिवाय चांगली वर्तनूक करताच येत नाही.
३) कमित कमी कारली पिकवणारा शेतकरी तरी बेअक्कल असतो त्याला सुनेला माहेरी पाठवावे लागते, एवढे देखील साधे ज्ञान नसते. किंवा
४) कारली पिकवणारा शेतकरी निर्दयी किंवा कॄर असतो त्यामुळे सुनेला माहेरी जाण्यापासून वंचित करून तो असूरी आनंद मिळवित असतो.
५) ग्रामीण समाज अशिक्शित असल्याने सुनेला माहेरी पाठविण्याचे महत्व त्याला कळत नाही.
किंवा
६) ग्रामीण माणूस जे काही करतो ते मुर्खासारखेच करतो. चांगली वर्तणूक केवळ सुशिक्षित, तज्ज्ञ आणि विचारवंतच करू शकतात.

माझ्या विचाराची ठेवण वरील ६ कारनांशी मेळ खात नसल्याने मला हा सासूरवास करण्याचा प्रकार आहे , असे अजिबात वाटत नाही.

मला माहित नसलेल्या या कारणाखेरीज अन्य काही कारणे असतील की ज्यामुळे हा सासूरवासाचाच प्रकार आहे हे सिद्ध होते, तर ते मी जाणण्यास उत्सूक आहे.

विसुनाना's picture

16 Jul 2011 - 4:43 pm | विसुनाना

लेख आवडला.

निदान पुरुष मंडळींना मारुतीच्या पारावर किंवा चावडीवर बसून गप्पा तरी करता येत होत्या. भावना व्यक्त करायला संधी मिळत होती, पण महिलांचे काय? त्यांना ना पारावर बसून गप्पा मारण्याची अनुमती, ना सुखदु:खाला व्यक्त करण्यासाठी एखादे व्यासपीठ उपलब्ध.

-याबद्दल साशंक आहे. काही काळापूर्वी (आणि बर्‍याच ठिकाणी सध्यालाही) 'पाणी भरायला जाणे' (नदीवर, विहिरीवर,तलावावर इ.) हा खेड्यापाड्यातील स्त्रियांचा दररोजचा क्रम होता. त्यातून त्यांचे संवाद होत असत. (संदर्भ : अस्सल मातीतले लेखन - नागीण, नदीपार आणि मामाचा वाडा - लेखक: चारुता सागर.)

गंगाधर मुटे's picture

16 Jul 2011 - 5:10 pm | गंगाधर मुटे

काही काळापूर्वी (आणि बर्‍याच ठिकाणी सध्यालाही) 'पाणी भरायला जाणे' (नदीवर, विहिरीवर,तलावावर इ.) हा खेड्यापाड्यातील स्त्रियांचा दररोजचा क्रम होता. त्यातून त्यांचे संवाद होत असत.

- पाणी भरण्याची जागा
- धुनी धुण्याची जागा

यापेक्षाही गावाबाहेरची गोधरी हे स्त्रियांचे आपसात संवाद साधण्याचे महत्वाचे स्थान होय.

पण या ठीकाणी कामचलाऊ संवाद होऊ शकतो, चर्चेच्या किंवा अभिव्यक्ती व्यक्त करण्याच्या व्यासपिठासारखा या स्थानाचा वापर होऊ शकत नाही. :(