"भारतीय - कसा मी? असा मी!" प्रकरण दुसरे, भाग-४ "सत्ता:लोकशाहीचा अनपेक्षित विजय"

सुधीर काळे's picture
सुधीर काळे in जनातलं, मनातलं
31 Jan 2011 - 11:20 am

"भारतीय - कसा मी? असा मी!"
प्रकरण दुसरे, भाग-४
"सत्ता:लोकशाहीचा अनपेक्षित विजय"

मूळ लेखक: श्री. पवनकुमार वर्मा अनुवाद: सुधीर काळे
© सुधीर काळे (मूळ लेखकाच्या वतीने)
या लेखातील सर्व मतें मूळ लेखकाची आहेत.

आम्ही हिंदू आहोत ना? मग आम्ही नीतिमान असणारच!
बहुतेक सर्व हिंदू लोक सोयीनुसार कसेही अनीतिपूर्ण वागत असोत पण केवळ आपण हिंदू आहेत म्हणून स्वतःला खूप नीतिमान समजतात. स्वतःच्या नैतिक उच्चतेच्या धूसर (रेखीव नसलेल्या) कल्पना आणि स्वतःचे उघड-उघड अनैतिक आचरण यातील विरोधाभास त्यांना दिसतच नाहीं. म्हणूनच भारतीय लोक कुठल्याही गोष्टीला अगदी सहजपणे नैतिकतेचा मुलामा देऊ शकतात. तसे पहाता परंपरागत हिंदू धर्मात कांही रूढ संस्कारांत सांगितलेले आवश्यक प्रायश्चित्त घेऊन कुठलेही महापाप धुता येते. हिंदू देव-देवता दयाळू, अत्यंत क्षमाशील, सहजपणे खूष करता येणार्‍या असतात आणि त्याना सहजा-सहजी लांच देऊन खुष करता येते. खरे तर सनातनी हिंदू समाजाने नीतिविषयक कुठलेच सिद्धांत स्वीकारलेले नाहींत. एका संदर्भात एकादी अगदी निषिद्ध मानलेली गोष्ट दुसर्‍या एकाद्या संदर्भात करणे हे नुसते "चालते" एवढेच नाहीं तर तिचा गौरवही होऊ शकतो. नैतिकतेबद्दलची "सारं कांहीं चालेल"ची सोयीनुसार परिवर्तनशील परिस्थिती राजी-खुषी स्वीकारल्यामुळे प्रत्येक गोष्टींत उणे पहाण्याच्या छिद्रान्वेषी वृत्तीपासून हिंदूंना मुक्ती मिळाली आहे. आपल्या सर्वात पापी आचरणातसुद्धा ते नैतिकतेची बोच लागून भारावूनही जात नाहींत किंवा स्वतः निकराचे सद्गुणी आणि सदाचारी असल्याबाबतचा त्यांचा विश्वासही उडून जात नाहीं. कारण या क्षणभंगुर आणि तात्पुरत्या 'मिथ्थ्या' जगात कुठलीही गोष्ट कायमची बरोबर किंवा कायमची चूक असूच शकत नाहीं यावर त्यांचा दृढविश्वास असतो.

सोयीनुसार नैतिक-अनैतिक वागणूक
अशा सोयीनुसार परिवर्तनशील नैतिकतेच्या पायावर सत्ताधार्‍यांच्या/वरिष्ठांच्या भव्य-दिव्य आणि उघडपणे दिसणार्‍या प्रतीकांपुढे असंख्य भारतीय लोटांगण घालायला तयार असतात. फक्त वरिष्ठांच्या शक्तीचे हे प्रतीक सहज दिसणारे असले पाहिजे. या प्रतीकातून बाहेर पडणारा शक्तीचा स्त्रोत प्रचंड असला पाहिजे. सत्तेचा 'आश्रय' घेणार्‍याला होणारे फायदे स्वयंसिद्ध , उघड-उघड असायला हवेत. या अटी पूर्ण करणार्‍या वरिष्ठांपुढे मग भारतीय लोक नतमस्तक होतात. या वरिष्ठ लोकांतही पदक्रमानुसार (hierarchical) उच्च-नीचतेची वर्गवारी असते. त्यांना समाजात एक विशिष्ट प्रतिष्ठित स्थान असते व ते इतरांनाही प्रतिष्ठित स्थान मिळवून देऊ शकतात किंवा असलेल्या प्रतिष्ठित स्थानाची उन्नती घडवून आणू शकतात. सत्ता आणि केवळ सत्ताच इहलोक आणि परलोक सांभाळू शकते या चाणक्याने व्यक्त केलेल्या मतांमध्ये शंकेला कुठेच जागा नाहीं. सार्वजनिक क्षेत्रात नीतिमत्ता, सदसद्विवेकबुद्धी, तिची टोचणी किंवा ध्येयवाद यांना गरजेनुसार जरूर आवाहन करावे, किंबहुना मधून-मधून सोयीनुसार असे आवाहन करण्याची गरजही आहे याबाबत सर्वांचे एकमत आहे आणि या आवाहनाच्या गरजेबद्दल आणि त्याच्या समर्पकतेबद्दलही भारतीय लोकात सर्वसाधारण एकमत आढळते. प्रत्येक व्यक्तीचे जनतेला दाखविण्यासाठीचे 'बाहेर'चे व्यक्तिमत्व आणि स्वतःच्या महत्वाच्या हितसंबंधांसाठीचे आतले व्यक्तिमत्व अशी दोन व्यक्तिमत्वे असली पाहिजेत याला आता भारतीय समाजाची केवळ संमतीच आहे असे नसून त्याबाबत भारतीयांना पूर्ण समजही आहे. श्रेष्ठ लोकांनी धर्माचे ज्ञान असल्याचा आणि धर्मानुसार वागण्याचा आव नेहमीच आणला पाहिजे. असा आव आणणे ही एक गंमत म्हणून करायची किंवा ऐच्छिक गरज नसून ती एकाच वेळी नीतिमान व नीतीहीन परिस्थितीत जगण्याच्या भारतीयांच्या गरजेचे समाधान करते. नीतीपासून उघड-उघड आणि ढळढळीतपणे फारकत करून घ्यायला भारतीय लोकांना फारच अवघड वाटते. या विश्वात एक नैतिक तत्व आहे. लोक जन्माला येतात आणि त्यांच्या इहलोकात केलेल्या बर्‍या-वाईट कर्मानुसार त्यांच पुनर्जन्म होतो. नैतिक शिस्तीशिवाय असलेले जग फारच उघडे-नागडे होईल आणि जर त्यात भारतीयांच्या गुंतागुंतयुक्त मानसिकतेला पुष्टी देणार्‍या 'मार्मिक लबाडी'चा अभाव असेल तर ते भारतीयांना मुळीच पसंत पडणार नाहीं. थोडक्यात भारतीयांना खात्रीलायक पापक्षालन होऊन मोक्षाप्रत जाण्यासाठी नैतिकतेची गरज भासते. आणि जोपर्यंत नैतिकता वर्तमानकाळातील अत्यावश्यकतेच्या आड येत नाहीं तोपर्यंत तिला किंमत आहे हे भारतीय मान्य करतात.

इतक्या सहजपणे भारतीयांनी गुलामगिरी कशी काय पत्करली?
एक अतीशय प्राचीन आणि समर्थ अशी संस्कृती आणि शिष्टता[१] असलेल्या भारतीयांना पराभूत करून त्यांच्यावर इतके सहजपणे कसे राज्य करता येते याबाबत इंग्रजांना आणि त्या आधीच्या मोंगल आणि तुर्की आक्रमकांना नक्कीच आश्चर्य वाटले असणार! हिंदू संस्कृती परक्यांबरोबरच्या संबंधांबाबत उदार होती असा एक सार्वत्रिक गैरसमज आहे. खरे तर ती अशी कधीच नव्हती. ती सर्व परक्यांना म्लेंच्छ (अस्वच्छ, अनैतिक वागणूक असलेले) समजत असे. आतून अतीशय करारी अलिप्तता तर बाहेरून छोटीशी चूकही खपू न देणारा अभेद्य कोट या तत्वांवर हिंदू संस्कृती आधारित होती. सातासमुद्रापलीकडची परदेशवारी करणेसुद्धा अनैतिक मानले जाई. असे असताना या आपल्याला नेस्तनाबूत करणार्‍या अस्वच्छ आणि सामाजिकदृष्ट्या मान्यता नसलेल्या परदेशी म्लेंछांबरोबर काम करायला भारतीय इतके कसे काय राजी झाले? याचे कारण आहे कीं हे जेते आपल्यापेक्षा जास्त शक्तिमान् होते! व्यवहारी भारतीय माणूस बलवान जेत्यांबरोबर संगनमत करायला तयार होता. भारतीयांना परक्या जेत्यांबाबतचा वैयक्तिक तिटकारा होता, त्यांच्याशी संगनमत केल्यामुळे होऊ शकणार्‍या सामाजिक बहिष्काराची भीती होती, त्यांना शरण गेल्यामुळे लागणार्‍या काळिम्याची कल्पना होती आणि आपल्या हजारो वर्षांची परंपरा असलेल्या सुसंस्कृतपणा आणि शिष्टता यांचीही जाणीव होती तरीही "शक्तिशाली असणार्‍यांशी लढणे व्यर्थ आहे" हा व्यवहारी शहाणपणाच शेवटी विजयी ठरला असे दिसते. नव्या सत्तेच्या शक्तीचे अस्तित्व एकदा वादातीतपणे उघड दिसून आल्यावर आधी सहकार व मग संगनमत अशा क्रमाने या शक्तीला मान्यता देण्यात आली.

सत्ता ही ज्ञानापेक्षा श्रेष्ठ आहे?
महात्माजींच्या नेतृत्वाखालील स्वातंत्र्ययुद्धाच्या एकमेव अशा अहिंसायुक्त चळवळीमुळे सार्‍या भारतीयांचे आणि परदेशी लोकांचे डोळे इतके दिपून गेले कीं भारतीय उच्चभ्रू समाज आणि ब्रिटिश सरकार यांच्यातील उघड संगनमताकडे त्यांचे पूर्ण दुर्लक्ष झाले. ज्यांना आपल्या संस्कृतीचे आणि परंपरांचे सखोल ज्ञान होते अशा लोकांनी आपल्या परंपरागत भारतीय रीतीरिवाजांचा सार्वजनिकपणे त्याग करून ब्रिटिशांची बोलण्याची पद्धत, त्यांची वेषभूषा, त्यांच्या आचरणातील लकबी आणि त्यांची जीवनपद्धती यांचा स्वीकार केला. अर्थात् प्रत्येक साम्राज्यशाही आपल्या 'गुलाम' प्रजेच्या मनालाही गुलाम बनवू इच्छित असतेच. पण ब्रिटिशांना ज्या अभूतपूर्ण प्रमाणात यश मिळाले त्याला सर्व साम्राज्यशाहींच्या इतिहासात तोड नसेल. आणि हे यश ब्रिटिशांच्या अस्सल चातुर्याला किंवा त्यांच्या वादातीत लष्करी वर्चस्वाला नसून गुलाम झालेल्या प्रजेकडून अशा प्रयत्नांना न झालेल्या विरोधालाच द्यावे लागेल. त्या-त्या वेळच्या सत्तेबरोबर सोयिस्कर तडजोड करण्यामुळे ताबडतोब मिळणार्‍या ऐहिक फायद्यांच्या, नव्या सत्तेच्या 'पदक्रमा'त (hierarchy) चंचुप्रवेश मिळविण्याच्या, प्रतिष्ठेचे स्थान मिळविण्याच्या, झटपट प्रगती होण्याच्या आणि त्यातून मिळणार्‍या ऐश्वर्याच्या मोहापायी सत्तधीशांबरोबरच्या संबंधांच्या नैतिक बाबींबद्दल मनात चुकचुकणार्‍या पालीकडे भारतीयांनी सहज दुर्लक्ष केल्यामुळेच ब्रिटिशांना हे सहज शक्य झाले. त्यात अतीशय कठोर आणि समाजाने निषिद्ध ठरविलेल्या परदेशी लोकांबरोबरच्या जवळिकीकडेही सोयिस्करपणे दुर्लक्ष करण्यात आले. या तर्‍हेची जवळीक लाजिरवाणी आहे याबद्दल सुशिक्षित भारतीयांच्या मनात कधीच संदेह नव्हता पण उपनिषदाच्या चांदयोगात[२] थोडक्यात सांगितल्याप्रमाणे "सत्ता ही ज्ञानापेक्षा श्रेष्ठ आहे" यात दिलेल्या सल्ल्याप्रमाणे सत्तेपुढे नमते घेण्यातले फायदे दिसत असल्यामुळेच असे झाले.

निष्ठेचे मर्यादित प्रदान!
पदक्रमाच्या शिडीवर स्वतःसाठी जागा मिळविण्याचा प्रयत्न करणे हे सामाजिकदृष्ट्या मान्यताप्राप्त ध्येय झाले होते आणि असे प्रयत्न करताना सचोटीची वागणूकही त्या प्रयत्नांच्या आड येईनाशी झाली. वरिष्ठांना निष्ठा मिळालीच पाहिजे इथपर्यंत ठीक, पण अशा व्यवहारांतील नैतिकतेची अडचण आपणच दूर केल्यामुळे हे व्यवहार परिस्थितीनुसार निरंकुशपणे होऊ लागले. परकीयांना हे लक्षात यायला जरा जास्त वेळ लागतो पण भारतीयांमध्ये असा व्यवहारीपणा नेहमीचाच आहे! तुलसीदासांनी रामयणात म्हटले आहे: "सुर नर मुनि सबकी यह रीती, स्वार्थ लागी करहीं सब प्रीती"! निष्ठेच्या प्रत्येक देखाव्यामागे स्वार्थ आहे! परिस्थितीनुसार आणि व्यवहार्यतेनुसार वरिष्ठांना जे हवे ते त्यांनी मागितल्याबरोबर द्या पण सगळे नका देऊ. कारण वरिष्ठ बदलू शकतात आणि म्हणूनच सध्याची सत्ता उलथून पडल्यावर जी नवी शक्ती ती जागा घेईल त्या शक्तीलाही आपली तटस्थता किंवा अलिप्तता असण्याची कारणे दाखविणे जरूरीचे असते! असे वागताना भारतीय लोकांना आपण फसवेपणाने आणि दुटप्पीणाने वागत आहोत असे वाटतच नाहीं कारण आपली निष्ठा सोयीनुसार परिवर्तनशील असली पाहिजे यावर त्यांचा विश्वास असतो! आणि यात विश्वासघाताचा प्रश्न येईलच कसा कारण (त्यांच्या मते) कारण मूळची निष्ठा (विश्वास) कुठे संपूर्ण आणि चिरंतन होती? पण जोवर सध्याच्या पदाधिकार्‍यानंतर जो त्या पदावर आरूढ होणार आहे तो क्षितिजावर कुठे दिसत नाहीं आहे आणि सध्याच्या पदाधिकार्‍याची सत्ता जोपर्यंत शंकातीत आहे तोपर्यंत व्यवहारी भारतीय पूर्ण निष्ठेनेचे नव्हे तर पूर्ण गुलामी वृत्तीने त्याची सेवा करतो. बर्‍याचदा या भारतीयांची निष्ठा वैयक्तिक आहे कीं काय अशी परकीयांची चुकीची समजूत होते; पण भारतीयांची याबाबतीतील अलिप्तता सातत्यपूर्ण असते. भारतीयांनी ब्रिटिशांची सेवा कशी केली याबद्दलच्या चर्चेत निरद चौधरी लिहितात, "लोभापायी असलेली त्याची सहज दिसणारी गुलामी वृत्ती जितकी परिपूर्ण आणि निष्ठापूर्ण दिसते तितकीच त्याची भावनिक दुजाभावही परिपूर्ण असतो. हिंदू आपल्या बेइमानीला नेहमीच जिवाच्या आकांताने चिकटून राहिले पण परकीयांची त्यांनी सेवाही केली." ऐतिहासिकपणे आपण इतके सहजासहजी पराभूत का झालो पण अंकित कधीच कां नाहीं झालो याचे स्पष्टीकरण या आपल्या अलिप्ततेत, या सत्तेत 'अंतर्भूत' न होता तिच्याबरोबर 'संगनमत' करण्याच्या आपल्या क्षमतेत दिसून येते. हिंदूंचे वैयक्तिक विश्व, त्यांची संस्कृती आणि परंपरा यांची मोडतोड झाली असेल पण नाश झाला नाहीं. सर्व परकीय विजेत्यांची भारतीयांनी सेवा केली होती पण ब्रिटिशांचा अपवाद सोडला तर बाकीचे विजेते भारतातच राहिले व भारतीय जीवनात मिसळून गेले. (ब्रिटिश मात्र परत गेले) ब्रिटिशांनी जरी हे मान्य केले नाहीं तरी भारतीयांनी ब्रिटिशांवर खूप छाप पाडली यात मात्र शंका नाहीं.

देवांनासुद्धा स्तुतीचे वावडे नाहीं!

वरिष्ठ आणि वरिष्ठांबद्दल आदर दाखविण्याच्या भारतीयांच्या नैसर्गिक प्रवृत्तीमुळे वागणुकीचे कांही विशिष्ठ नमुने किंवा आकृतिबंध तयार झाले. लाचारीपायी खुषमस्करी करणे हा त्यातलाच एक प्रकार होता आणि आजही आहे. वरिष्ठांना आपल्या अहंपणाचे चोचले माजवण्याची गरज असते आणि लाचार याचकांनी ती पुरवायला हवी या समीकरणाला भारतात सामाजिक मान्यता आहे. आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या कनिष्ठ असलेले लोक उच्चपदस्थ आणि श्रेष्ठ लोकांच्या 'हो'त 'हो' मिळविण्यास व संधी मिळेल तिथे त्यांची स्तुती करण्यास तत्पर असतात असे श्री M N श्रीनिवास यांनी कर्नाटकातील एका खेड्याच्या मानवी सांस्कृतिक विकासशास्त्रावरील (Anthropology) आपल्या अभिनव अभ्यासात नमूद केले आहे. आपल्या प्रगतीसाठी वरिष्ठांच्या 'हो'त 'हो' मिळविणे आणि त्यांची स्तुती-खुषमस्करी करणे हे केवळ मान्यताप्राप्तच आहे असे नव्हे तर पुरस्कृतसुद्धा आहे आणि प्रत्येक वरिष्ठांकडे कमीत कमी एक तरी (आणि बर्‍याचदा एकाहून जास्त) असे खुषमस्कर्‍ये गोळा होतातच. ज्यांना वरिष्ठांच्या जवळिकीतून आपला फायदा करून घ्यायचा आहे अशा लोकांना योग्य वेळी योग्य योग्य इतक्याच अतिशयोक्तीने आणि आदराने बोलून वरिष्ठांबद्दलच्या आपल्या पराकोटीच्या निष्ठेबद्दल आणि आपल्या वरिष्ठाबद्दलचे शंकातीत एकमेवत्व दाखवून आपल्या स्पर्धकांना नमोहरम करावे लागते. जेंव्हां पंजाबचे भूतपूर्व मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांना नातवंड जन्मले तेंव्हां त्यांच्या अनुयायांनी त्यांचे अभिनंदन करण्यासाठी स्थानिक वृत्तपत्रात एक पूर्ण-पानी जाहिरात प्रसिद्धीला दिली होती. या अनुयायांत कांहीं (पूर्वी ते सत्तेवर असतानाचे) त्यांच्या मंत्रीमंडळातील सभासदही होते. या जाहिरातीत त्यांनी आपला परमानंद व्यक्त करण्यासाठी वापरलेल्या आठ स्तंभी मथळ्याचा नमुना पहा: "बादल कुटुंबात जन्मलेल्या चंद्रवत् चमकणार्‍या पुत्रजन्माबद्दल आम्ही त्या कुटुंबियांवर लक्षावधी अभिनंदनांचा वर्षाव करीत आहोत". स्तुती नर्म किंवा मार्मिक असून चालत नाहीं. ती अगदी उघड आणि अतिशयोक्तीपूर्ण असायला हवी. ज्याची स्तुती केली जात आहे त्या उपकारकर्त्याला तर अशी अतिशयोक्तीपूर्ण आणि उघड स्तुती ऐकून लाजायला किंवा गोरेमोरे व्हायला होत नाहींच आणि अशी स्तुती करणार्‍यालासुद्धा ती करण्यात अवघडल्यासारखे वाटत नाहीं. पहाणार्‍यांना तर हा प्रकार म्हणजे एक सुयोजित आणि आवश्यक असे सामाजिक आचरणच वाटते. वेदात सांगितलेच आहे कीं देवांनासुद्धा स्तुतीचे वावडे नाहीं!

चमचे आणि चमचेगिरी आता रूढ आणि मान्यताप्रप्त शब्द झाले!

खुषमस्कर्‍या किंवा 'चमचा' आणि मस्का मारणे किंवा स्तुती करणे हे शब्द आता संपूर्ण भारतात प्रचलित असून सर्वांना समजतात! एकाद्यावर "अमक्या-अमक्याचा चमचा" असल्याचा आरोप केला जाईल पण चमचा या शब्दाच्या तिरस्कारदर्शक अर्थामुळे चमचेगिरीला (स्तुती करण्याच्या कलेला) दिल्या जाणार्‍या मान्यतेला आणि महत्वाला अडचण येत नाहीं! वरिष्ठ कधी-कधी आपल्या कनिष्ठांच्या 'मस्काबाजी'ने त्रासल्याचे दाखवतील पण वरिष्ठांचा त्रस्त झाल्याचा अविर्भाव हे ढोंग आहे हे कनिष्ठांना माहीतच असते आणि हेसुद्धा माहीत असते कीं हा अपेक्षित त्रस्तपणाचा प्रतिसाद हा केवळ स्तुती खरी असल्याबद्दलचा लुटपुटीचा निषेध असतो आणि त्यामुळे वरिष्ठांना आवडो या न आवडो, स्तुतीपाठ चालूच रहातो. चमच्याचे आणि वरिष्ठाचे शारीरिक हावभाव एकाद्या सुरचितपणे बसविलेल्या आणि भरपूर सराव केलेल्या आचरणसंहितेनुसारच चालू असतात व त्यातून कनिष्ठ-वरिष्ट यांच्यातील पदक्रमस्थानांतील फरकाचे पुन्हा एकदा प्रदर्शन होते. पूर्वीच्या काळी एकाद्या कनिष्ठ व्यक्तीने योग्य ते बोलून आपल्या वरिष्ठापेक्षा असलेल्या आपल्या कनिष्ठ स्थानाची कबूली देणे हे मुस्लिम राजवटीच्या दरबारी चालीरीतीनुसार चालत असे. (मूळ लेखक वर्मांचे) वडील १९४७ सालाआधी मध्य प्रांतात जिल्हाधिकारी असताना त्यांच्या कर्यालयात काम करणार्‍या खास हुषार असलेल्या एका पट्टेवाल्याची कथा सांगायचे. एके दिवशी एक फोटो अचानक भिंतीवरून खाली पडला. त्याक्षणी तो पट्टेवाला हजरजबाबीपणे म्हणाला, "हुजूर, आपकी दहशतसे! (आपल्याला घाबरून तो फोटो पडला असावा!)" आजच्या पट्टेवाल्यांत असा कवित्वयुक्त हजरजबाबीपणा नसेल पण जर आजही मंत्र्यांच्या उपस्थितीत सनदी नोकरांची, खासगी कंपन्यांच्या मालकांच्या उपास्थितीत त्यांच्या उच्चपदस्थ अधिकार्‍यांची किंवा कुठल्याही सर्वसाधारण वरिष्ठ-कनिष्ठ संबंधांतील वागणूक पाहिल्यास हे लक्षात येईल कीं आजही पदक्रमाने बद्ध अशा संबंधांत स्तुतीचा वापर जोरात चालतो आहे!

======================================
टिपा:
एका वाचकाच्या विनंतीनुसार प्रत्येक परिच्छेदाच्या सुरुवातीला त्यातील मजकुरावर आधारित मथळा दिला आहे. तसे च अनुवादही सोपा केला आहे. सूचनांचे स्वागतच आहे.
[१] Culture साठी 'संस्कृती' व Civilization साठी 'शिष्टता' हे मराठी प्रतिशब्द वापरले आहेत. याहून चांगले प्रतिशब्द कुणाला सुचत असल्यास जरूर सांगावेत. योग्य वाटल्यास 'सकाळ'मध्ये प्रसिद्ध होणार्‍या लेखांत वापरेन.
[२] इथे लेखकाने Chandyog हा शब्द वापरला आहे. त्याचा उच्चार चांदयोग कीं चंदयोग? जाणकारांनी कृपया खुलासा केल्यास मी त्यांचा ऋणी असेन.

संस्कृतीसमाजप्रकटनविरंगुळा

प्रतिक्रिया

कच्ची कैरी's picture

31 Jan 2011 - 11:24 am | कच्ची कैरी

सत्ता ही ज्ञानापेक्षा श्रेष्ठ आहे"
या वाक्याशी पूर्णपणे सहमत नाही .बाकी लेख तर उत्कृष्ठ्च!

कच्ची कैरी-ताई,
बहुसंख्य भारतीय लोक सत्तेला महत्व देतात यात शंका नाहीं. आता राहुलबाळाच्या/सोनियाताईंच्या आसपासची वर्दळच पहा ना! अहो, लाभासाठी त्यांच्या 'पादुका'ही उचलतात! इतर पक्षातही परिस्थिती फारशी वेगळी नाहीं.
पण मी फक्त अनुवाद केलेला असल्यामुळे जास्त भाष्य करत नाहीं.

नरेशकुमार's picture

31 Jan 2011 - 3:42 pm | नरेशकुमार

भारतीय - कसा मी? असा मी.

देवांनासुद्धा स्तुतीचे वावडे नाहीं!

देवांना निंदेचे सुद्धा वावडे नाहीं. भरघोस निंदा करा,(आजकाल) काहीही फरक पडत नाही.

लेख मालिका सकाळ मध्ये येणार असे दिसते. त्याबद्दल अभिनंदन.

होय. पण माझे अर्धे पुस्तक अनुवाद करून झाले कीं सुरू करेन. कारण मग दर आठवड्याला 'हप्ता' भरावा लागतो!

नरेशकुमार's picture

31 Jan 2011 - 7:31 pm | नरेशकुमार

भारतिय माणुस देवाला विरंगुळा म्हणुन सुद्धा वापरतो.

सीता (मनात):- च्यायला जातंच नाहीये. आज शेवटचा दिवस आहे सेलचा. लवकर जाऊन येईन म्हणते. कसं बर घालवावं ह्याला? )
सीता(उघडपणे):- लंपट माणसा! राम मेला तर मी तुला मिळेन अशी अभिलाषा बाळगतोस? तूझा धिक्कार असो!
लक्ष्मण (मनात) :- बोंबला! खरंच की! दादाला जर का खरंच काही झालं तर ही आपल्या गळ्यात!

त्यामुळे वरील मुद्याशी अंशतः सहमति आहे.
बाकी, लेख/अनुवाद उत्तम आहे.

नरेशकुमार-जी,
तुम्ही उदाहरण म्हणून दिलेली 'विरंगुळा' ही सहज यांनी लिहिलेली पोस्ट मस्तच आहे. खरंच आपल्या देवादिकांबद्दल, त्यांच्या खास गुणदोषांबद्दल असे थट्टेखोर आपण किती सर्रास लिहितो, नाहीं कां?
पुढच्या महिन्यात माझ्या धाकट्या नातीचे बारसे आहे. त्यावेळी अशी १५-२० मिनिटात नाट्यवाचन या स्वरूपात सादर करण्याजोगी एकादी विनोदी, हलकी-फुलकी (पौराणिक किंवा सामाजिक) एकांकिका मी शोधत आहे.
'मिपा'वर पूर्वी प्रसिद्ध झालेली असल्यास किंवा 'मिपा'करांच्या संग्रहात असल्यास जरूर पाठवावी.
धन्यू!
काळे

आजचा भाग सुद्धा मस्त...
सुका पुढचा भाग लवकर येउंद्यात

शुचि's picture

31 Jan 2011 - 7:46 pm | शुचि

वाचते आहे. मस्त भाग.

सुधीर काळे's picture

1 Feb 2011 - 2:49 am | सुधीर काळे

स्पा आणि शुचीताई,
प्रतिसादांबद्दल धन्यवाद!

शेखर काळे's picture

3 Feb 2011 - 8:25 am | शेखर काळे

अशी भाषा वापरली आहे.

भारतियांची मानसिकता अगदी चपखल शब्दांत मांडलेली आहे. त्याबद्दल सुधीर यांचे व पवनकुमार वर्मांचे अभिनंदन.

[२] हे छांदोग्य ऊपनिषद असावे.

चमचेगिरी व खुषमस्करी ही तर आपल्या अनेक पुराणे व ऐतिहासिक गोष्टींत आलेली आहे. क्वचितच कोणा स्पष्टवक्तेपणाबद्दल काही बक्षीस मिळाले असल्याचा दाखला मिळतो.

पुढच्या भागांची आतुरतेने वाट पाहतो आहे.

सुधीर काळे's picture

3 Feb 2011 - 8:33 am | सुधीर काळे

शेखर-जी (काळे),
'घरच्या आहेरा'बद्दल धन्यवाद.
'छांदोग्य'चा अर्थ मला माहीत नाहीं. आपल्याला (किंवा इतर कुणा जाणकाराला) माहीत असेल तर कृपया सांगावा.