Being Indian-भारतीयः कसा मी? असा मी-प्रस्तावना
अनुवादकाचे निवेदन
दोन-तीन वर्षांपूर्वी मी श्री. पवनकुमार वर्मा यांनी लिहिलेले Being Indian हे पुस्तक वाचले. भारतीय लोक जसे वागतात तसे ते कां वागतात याची चर्चा या पुस्तकात आहे. उदा. आपण फितुरी कां करतो, पैसे कां खातो, दांभिक कां आहोत, आपले खायचे आणि दाखवायचे दात वेगळे कां असतात वगैरे वगैरे! मला तर हे पुस्तक वाचताना "आपण आरशात तर पहात नाहीं ना" असाच भास होत होता आणि संपविल्यावर वाटले कीं हे पुस्तक प्रत्येक भारतीयाने वाचले पाहिजे एवढेच नव्हे तर प्रत्येक पदवीच्या अभ्यासक्रमातही ते लावले गेले पाहिजे.
माझे वडील रोज गुरुचरित्र वाचायचे, माझी आई आजही शिवलीलामृताचा एक अध्याय रोज वाचते, मी कांहीं स्तोत्रें म्हणतो. त्याचप्रमाणे या पुस्तकाची दहा-एक पाने रोज प्रत्येक भारतीयाने वाचावी असे मला वाटते.
"न्यूक्लियर डिसेप्शन" हे पुस्तक मी खूपच अलीकडे वाचले. पण ते वाचल्यावर जसा मी प्रभावित झालो तसाच मी Being Indian वाचल्यावरही झालो होतो. पण त्यावेळी मी मराठीत लिहायला सुरुवात केली नव्हती. पुढे "ई-सकाळ", "उत्तम कथा" व त्यानंतर इथे *मिसळपाव*वर लिहायला लागल्यावर 'आपलं लिहिणं कांहीं अगदीच टाकाऊ नसावं' असे जाणवले. मग चांगल्या इंग्रजी पुस्तकांचा अनुवाद केला पाहिजे हे मनाने घेतले. जमेल कीं नाहीं याची खात्री नव्हती. पण "घरच्या संस्थळावर" ('मिसळपाव'वर) मी भीत-भीत "न्यूक्लियर डिसेप्शन" या पुस्तकाचे रूपांतर लिहू लागलो. त्याला 'मिपा'करांनी दिलेल्या प्रतिक्रिया पाहून 'सकाळ'ला याबाबत विचारायची मी हिंमत केली. 'सकाळ'ने हे लेखन मालिकेच्या स्वरूपात प्रकाशित करण्यासाठी निवडले व दर आठवड्याला एक प्रकरण असे तिथे हे रूपांतर प्रसिद्ध होऊ लागले. सकाळच्या प्रचंड वाचकांपुढे आपल्या लिखाणाचा काय परिणाम होतो हे पहाताना मी माझा श्वास रोखूनच धरला होता. पण तिथे प्रचंड प्रतिसाद लाभला. मला चक्क "फॅन मेल्स" येऊ लागल्या व 'फेसबुक'वर मला अनोळखी लोकांची मैत्रीची आमंत्रणे येऊ लागली!
"न्यूक्लियर डिसेप्शन" संपल्यावर "आता नवा प्रकल्प कुठला" अशी विचारणा 'सकाळ'च्या वाचकांकडून होऊ लागली व जर मूळ लेखकाची परवानगी मिळाली तर Being Indian चा अनुवाद करायचा हा मनसुबा मी जाहीर करून टाकला.
श्री. वर्मांचा पत्ता शोधायला सुरुवात केली. त्यात खूप प्रयास पडले पण सुदैवाने इथल्या 'जवाहरलाल नेहरू इंडियन कल्चरल सेंटर'चे (JNICC) प्रमुख श्री. सिंग यांच्याशी बोलतांना या पुस्तकाचा मी गप्पात उल्लेख केला व वर्मांबद्दल कौतुकाचे शब्द काढले. हा उल्लेख केल्यावर श्री. सिंग म्हणाले की ते श्री. वर्मांना 'गुरू'स्थानी मानतात व ते माझ्या वतीने शब्द टाकतील. दरम्यान Being Indian या मूळ पुस्तकाच्या 'पेन्ग्विन इंडिया' या प्रकाशकांना मी लिहिले तिथून मला वर्मांच्या एजंट श्रीमती मीता कपूर यांचा ID मिळाला. मग त्यांना लिहिले.
तेवढ्यात मला वृत्तपत्रातील एका बातमीवरून कळले कीं श्री. वर्मा सध्या थिंपूला आपले राजदूत आहेत. 'गूगल'वरून मी तिथल्या दूतावासाचा फोन नंबर शोधून तिथे फोन केला. श्री. वर्मा रजेवर होते पण त्यांच्या स्वीय सचिवाकडून मला त्यांचा ई-मेल ID मिळाला. मग मी श्री वर्मांना थेट लिहिले. मला होकार देण्यापूर्वी त्यांना प्रकाशकाकडून मिळालेला होकार पहायचा होता. 'सकाळ'च्या श्री. सम्राट फडणीस यांची होकाराची मेल आल्यावर मी ती श्री वर्मांना पाठवली. त्यानंतर एका तासात वर्मांनी मला परवानगी दिली!
शेवटी काल रात्री बसून मी प्रस्तावना अनुवादित केली. आता जसजशी प्रकरणे लिहून होतील तसतशी मी ती 'मिपा'वर प्रकाशित करेन.
'मिपा'करांनी "न्यूक्लियर डिसेप्शन"ला जसा प्रचंड प्रतिसाद दिला तसा या मालिकेलाही देतील अशी आशा करून सुरुवात करतो.
------------------------------------------------
Being Indian भारतीयः कसा मी? असा मी!
प्रस्तावना
मूळ लेखकः श्री. पवनकुमार वर्मा, भूतान येथील भारताचे राजदूत,
अनुवादः सुधीर काळे
©सुधीर काळे (मूळ लेखकांच्या वतीने)
(या लेखातील सर्व मते मूळ लेखकाची आहेत.)
------------------------------------------------
गंगा नदी हिमालयातून वहात जिथून खाली येते त्या हरिद्वारला सर्वच हिंदू लोक अतीशय पवित्र स्थान मानतात. इथून खाली उतरून आणि मध्य भारतातील अनेक मैलांचा सपाट प्रदेश पार करून गंगा शेवटी समुद्राला मिळते. हरिद्वारला चाललेल्या धार्मिक पूजा-अर्चा आणि प्रार्थना यांच्या गजबजाटात कांहीं लोक ऐन हिंवाळ्यातसुद्धा गंगेच्या बर्फासारख्या गार आणि उथळ प्रवाहात अनवाणी उभे असलेले दिसतात.
त्यांच्या हातात एक पारदर्शक काचेचे छोटेखानी तावदान असते आणि या वेगाने वहाणार्या गंगेच्या उथळ प्रवाहाकडे ते त्या तावदानातून अनिमिष नेत्रांनी तासन् तास पहात उभे असतात. त्यांच्या या पापण्यांची उघडझापही न करता गंगेच्या प्रवाहाकडे पहाणार्या दृष्टीची एकाग्रता शेजारीच दर्शनासाठी व उपासनेसाठी जमलेल्या भाविकांपेक्षा जास्त वाटते. पण या एकाग्र दृष्टीचा हेतू कांहीं वेगळाच असतो. कारण हे लोक प्रार्थनाही करत नसतात किंवा मृतात्म्यांसाठी मोक्षसाधनाही वगैरेही करत नसतात. त्यांची एकाग्रता केवळ गंगेच्या प्रवाहाबरोबर वहात येणार्या नाण्यांवर असते आणि वहात येणारी अशी नाणी दिसली कीं आपल्या पायांनी ते ती नाणी चापल्याने उचलतात (व म्हणूनच ते अनवाणी उभे असतात).
एक राष्ट्र म्हणून भारताच्या गुणदोषांचे व वैशिष्ट्यांचे चित्रण करणे ही फारच अवघड गोष्ट आहे. भारतीयांची व्याख्या करणेही महाकठिण. आणि आता हा समाज इतिहासाच्या काळोखातून एका जागतिकीकरणाच्या झगझगीत प्रकाशझोतात येण्याच्या परिवर्तनाच्या टप्प्यातून जात असल्याने हे काम आणखीच कठिण झाले आहे. भूतकाळाच्या संदर्भात आणि भविष्यकाळाच्या जडण-घडणीत आपण खरोखर कोण आहोत हे समजून घेण्याचा एक प्रयत्न या पुस्तकात करण्यात आलेला आहे. या प्रयत्नात अनेक धोके आहेत. भारत हा अतीशय विशाल व वैविध्यपूर्ण देश असल्यामुळे त्याचे वर्णन एकाद्या सोयिस्कर अशा ढोबळ व्याख्येने करणे अशक्यच आहे. कारण प्रत्येक सामान्य (किंवा ढोबळ) विधानाला उल्लेखनीय अपवाद असतात. प्रत्येक सारख्या वाटणार्या गोष्टीत मोठे निराळेपण दिसते. म्हणून या पुस्तकातील एकाद्या विधानाने कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या किंवा स्वतःबद्दलच्या समजांना धक्का देणारे वर्णन इथे दिसले तर त्याबद्दल अशा वाचकांची मी आधीच माफी मागू इच्छितो.
माझा उद्देश भारताबद्दल आणि भारतीयांबद्दल शक्य होईल तितके खरेखुरे चित्र रंगविणे हा आहे पण मला हेही माहीत आहे कीं सगळीकडे लागू होईल असे कुठलेच सत्य नसते, त्याला अपवादही असू शकतात.
मी इथे हेही नमूद करू इच्छितो कीं मी कित्येक ठिकाणी मी हिंदू आणि भारत हे शब्द एकाच अर्थाने वापरले आहेत ते कुठल्या आंधळ्या श्रद्धेपोटी किंवा दुरभिमानापोटी वापरलेले नसून केवळ भारत हा हिंदूंची प्रचंड बहुसंख्या असलेला देश आहे म्हणून वापरले आहेत. त्यातले कांही स्वभावविशेष असे आहेत की ते सर्व धर्माच्या सर्व भारतीयांना लागू होतात.
भारत आज आकाशात झेप घेण्यासाठी धावपट्टीवर सज्ज असलेल्या विमानासारखा उभा आहे पण या प्रगतीमागची कारणे सध्याच्या "Feel Good"च्या हर्षोन्मादाच्या लाटेपलीकडे जाऊन तपासली पाहिजेत. इतिहासाच्या मुशीत हजारो वर्षें राहिलेल्या आपल्या समाजाच्या वागणुकीचे पृथःकरण करताना हे लक्षात ठेवले पाहिजे कीं याबाबतीत कुठलेच चित्र पूर्णपणे काळे किंवा शुभ्र नसते. प्रत्येक गोष्ट बरोबर नसते वा प्रत्येक गोष्ट चूकही नसते. म्हणूनच अशा देशाचे आणि नागरिकांचे चित्र रंगवताना आपल्या ताकतीच्या पायावर आधारित जमा-खर्चाची कीर्दवही लिहिताना आपल्या सामर्थ्याबद्दल एक तर्हेचा समतोल साधून आपल्यातील कांहीं उघड दिसणार्या दौर्बल्याची नोंद घेऊन शेवटी आपल्या सामर्थ्यांमुळे आपला विजय होईल अशा विश्वास ठेवणे जरूरीचे आहे. आपली संस्कृती, आपला इतिहास आणि आपल्या समाजाची बांधणी यासारख्या गोष्टी जमा-खर्चाच्या कीर्दवहीत महत्वाची भूमिका बजावतात. याशिवाय आपली अथक चिकाटी, लवचिकपणा, आपल्या आकांक्षा व महत्वाकांक्षा याही महत्वाच्या भूमिका बजावतात. भारतीयांचे गोंधळ निर्माण करण्याचे (स्पष्टीकरण नसलेले) "कौशल्य", एकाद्या कमजोरीचे सामर्थ्यात रूपांतर करण्याची हातोटी आणि आपले सुदैव यांचाही या जमा-खर्चात समावेश केला पाहिजे.
या पुस्तकाबद्दलचे संशोधन अनेक वर्षें चालू आहे पण या पुस्तकाचा बराचसा भाग मी सायप्रसला भारताचा राजदूत असतानाच्या काळात लिहिलेला. मला अत्यंत प्रिय असलेल्या या विषयावर लिहिण्यासाठी सायप्रस या सुंदर बेटाने मला एक सुरेख पार्श्वभूमी आणि गजबजाटापासून दूर ठेवणारे अंतर मिळवून दिले. या पुस्तकाची कल्पना सुचविल्याबद्दल (त्यावेळी) पेन्ग्विन कॅनडाचे श्री डेव्हिड डेवीडार यांचे मी मनापासून आभार मानतो. तसेच पेन्ग्विन इंडियाचे श्री रवी सिंग आणि श्री व्ही. के. कार्तिक आणि या पुस्तकाचे संकलन केल्याबद्दल नंदिनी मेहता यांचेही मी आभार मानतो. या पुस्तकातील संदर्भाबाबत दिलेल्या त्रासाबद्दल मालिनी सूद यांच्याकडे मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. लिखाण करताना तनमनधन विसरून त्यात मग्न होण्याची माझी कामाची पद्धत हसतमुखने सोसण्याची माझ्या कुटुंबियांना आता संवय झाली आहे. भारतीय संस्कृतीबद्दल खूप ज्ञान असलेलील्या माझ्या दिवंगत आईची मदत मला संदर्भाबाबत होत असे. मुलगा वेदांत आणि माझ्या मुली मानवी आणि बताशा आणि त्यांचा मित्र रिषभ पटेल या सर्वांनी संशोधनकार्यातील माझे मदतनीस म्हणून उत्साहात काम केले आहे. माझी पत्नी रेणुका हिची सहनशक्ती आणि तिची मदत तसेच या पुस्तकाच्या विविध बाजूंवरील तिची मते यांबद्दल मी तिचाही ऋणी आहे.
प्रतिक्रिया
1 Dec 2010 - 10:56 pm | सुनील
चांगली सुरुवात.
पुढे वाचण्यास उत्सुक.
1 Dec 2010 - 11:21 pm | विलासराव
मस्त.
लिहा.
2 Dec 2010 - 12:59 am | कौशी
"न्यूक्लियर डिसेप्शन" चा अनुवाद पण वाचायला आवडेल.
2 Dec 2010 - 7:35 am | सुधीर काळे
"मी मराठी" या संस्थळावर श्री राज जैन यांनी माझ्या या सर्व लेखांचे ई-पुस्तकच बनविले आहे. त्याचा दुवा आहे http://www.mimarathi.net/node/3043
बहुदा सभासद नसलेल्यांनाही वाचता येते. (माझा एक सभासद नसलेला मित्र ते वाचू शकला!)
वाचा आणि कळवा आवडली ही मालिका कीं नाहीं.
धन्यवाद
2 Dec 2010 - 5:17 am | शुचि
वाचण्यास उत्सुक आणि थोडी भयभीत आहे की या पँडोरा बॉक्स मधून आपले भारतियांचे कोणते दुर्गुण पहवयास मिळणार आहेत.
2 Dec 2010 - 7:26 am | सुधीर काळे
नाहीं. घाबरण्यासारखे कांहीं नाहीं. प्रयत्नाने सुधारण्याजोगेच दुर्गुण आहेत. हे पुस्तक फक्त आपल्याला आरशात पहायला शिकविते!
2 Dec 2010 - 8:33 am | गांधीवादी
या लेख मालिकेच्या निमित्ताने दुर्गुण समजून घेऊन, प्रयत्नाने नक्कीच चांगले परिवर्तन घडेल, अशी आशा करतो.
पुढील लेखांच्या प्रतीक्षेत.
2 Dec 2010 - 5:41 am | नगरीनिरंजन
मस्त उपक्रम! पुढील लेखनास शुभेच्छा! वाट पाहत आहोत.
2 Dec 2010 - 7:32 am | मिसळभोक्ता
राजदूत व्हायला किती कोटी द्यावे लागतात हो हल्ली ?
2 Dec 2010 - 7:39 am | अरुण मनोहर
मराठीत हे पुस्तक वाचण्यास खूप उत्सुक आहे. श्री काळे ह्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
2 Dec 2010 - 8:00 am | नितिन थत्ते
छान ओळख.
पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत.
2 Dec 2010 - 8:29 am | मदनबाण
ही लेखमालिका देखील वाचण्यास उत्सुक आहे... पुढील सर्व भागांसाठी शुभेच्छा. :)
तुमच्या या प्रयत्नांमुळे भाषांतरीत पुस्तके वाचण्याचे समाधान मिळत आहे,आणि त्या बद्धल तुम्हाला धन्यवाद...
2 Dec 2010 - 9:57 am | सुधीर काळे
मदन, 'न्यूक्लियर डिसेप्शन'च्या लिखाणात तू आणि विकास पिसाळ अशा दोघांनी टंकनाच्या चुका, कांहीं-कांहीं जागचे अर्थ न कळणारे बोजड भाषांतर अशा बाबतीत अनमोल सहाय्य केले होते तसेच या मालिकेतही जरूर कर!
आधीच आभार मानतो.
2 Dec 2010 - 10:38 am | बद्दु
तुमच्या सिद्धहस्त लेखणीच्या माध्यमातुन आणखी एका पुस्तकाचे रसग्रहण करायला मिळणार याचा मनापासुन आनंद झाला. त्याबद्दल तुमचे आणि मिपाचे आभार.
मुळ लेखकाने हे पुस्तक केव्हा प्रकाशित केले याची माहिती मिळेल का? लेखक नेमके कोणत्या काळाबद्दल लिहित आहेत याबद्दल आधीच माहिती असेल तर पुस्तक आणि लेखक हे दोन्ही "कळायला "मदत होइल असे वाटते.
2 Dec 2010 - 10:59 am | सुधीर काळे
बद्दुसाहेब,
हे पुस्तक सर्वात आधी २००४ साली 'पेन्ग्विन इंडिया'ने प्रकाशित केले. पण यात येणारा मजकूर रामायण-महाभारतापासून २००४ पर्यंतचा आहे कारण लेखकाने भारतीयांच्या स्वभाव-वैशिष्ट्यांचा उगम शोधताना सारे संदर्भ वापरले आहेत.
2 Dec 2010 - 11:57 am | यशोधरा
काळेकाका, वाचते आहे..
2 Dec 2010 - 12:03 pm | परिकथेतील राजकुमार
मस्त उपक्रम सुकाका.
पुभाप्र.
2 Dec 2010 - 12:26 pm | Dhananjay Borgaonkar
खुप खुप शुभेच्छा तुमच्या नविन उपक्रमासाठी :)
2 Dec 2010 - 3:50 pm | निकित
काळे काका, लेखांची वाट पाहतो आहे.
भाषांतराबरोबरच तुमची मतं देखील वाचायला आवडतील.
2 Dec 2010 - 4:04 pm | मेघवेडा
मस्त सुरूवात हो काळेकाका. हाही उपक्रम हिट होणार यात शंकाच नाही!
2 Dec 2010 - 4:25 pm | पुष्करिणी
या उपक्रमासाठी शुभेच्छा
लेख मालिकेची सुरूवात छानच काळेकाका, पुढील भागांची वाट पहातेय.
2 Dec 2010 - 6:09 pm | सिद्धार्थ ४
ही लेखमालिका देखील वाचण्यास उत्सुक आहे....
2 Dec 2010 - 9:48 pm | सुधीर काळे
सर्व प्रतिसादकर्त्यांना धन्यवाद!
या प्रकल्पाचे लिखाण जोमाने चालू आहे. जसजसे एक-एक प्रकरण हातावेगळे होईल तसतसे इथे पोस्ट करेन. प्रत्येक प्रकरणाला दहा-एक दिवस लागतील असा अंदाज आहे.
6 Dec 2010 - 6:48 am | निनाद मुक्काम प...
फारच छान आत्म परीक्षण ह्या निम्मिताने करता येईल .भावी महासत्तेचे नागरिक ह्या कैफात एक अनिवासी भारतीय म्हणून जगणाऱ्या मला सत्य परिस्थिती व खरा भारत जाणून घ्यायला उत्सुक आहे .
6 Dec 2010 - 7:29 am | सुधीर काळे
प्रिय निनाद,
'मिपा'वर स्वागत!
तू म्हणतोस ते खरे आहे. म्हणून तुझे "प्रत्येक अनिवासी हा भारताचा स्वयंघोषित राजदूत असावा" हे वाक्य मनापासून आवडले! मीही एक अनिवासी भारतीय असल्याने असे करायचा आटोकाट प्रयत्न करतो.
Being Indian हे पुस्तक जरा क्लिष्ट असल्याने भाषांतराचा वेग आधी अंदाज केला होता त्यापेक्षा कमी आहे पण मी वेळ तेवढाच देत आहे. प्रकाशन थोडेसे लांबणार असे दिसते.
(अवांतरः आमच्या संकुलात रहाणारा माझा एक शेजारी गंमत म्हणून NRI ची व्याख्या "Not Required Indians" अशी करतो!)
6 Dec 2010 - 9:51 am | ऋषिकेश
अरे वा! चांगला उपक्रम आणि अनुवादही चांगला होत आहे.
बाकी, 'दौर्बल्य' वगैरे शब्द वगळता आले तर पहा (दुर्बलता शब्द आहे, दौर्बल्य ऐकलेला नाही)
6 Dec 2010 - 10:07 am | सुधीर काळे
धन्यवाद. मी 'दौर्बल्य' हा शब्द आहे आणि अगदीच न वापरातला नाहीं. मी तो अनेकदा वाचलेला आहे, उदा: मनोदौर्बल्य वगैरे.
तरी तुमची सूचना लक्षात ठेवत आहे.
6 Dec 2010 - 10:49 am | इन्द्र्राज पवार
श्री.सुधीर काळे यांच्या लिखाणाची स्वतःची अशी एक ठेवण आहे की, जरी त्यानी 'अनुवाद' असा उल्लेख केला नसता तरीदेखील ही मालिका त्यांची 'स्वतंत्र' असणार असेच वाटले असते, इतके ते आपलेसे वाटते. याला कारण म्हणजे त्या पुस्तकातील श्री.वर्मा यांच्या देशाविषयीच्या भावनांशी श्री.काळे मूलतःच एकरूप झालेले आहेत. "सचिन प्लेज नॉट फॉर द सेक ऑफ रेकॉर्ड...बट फॉर द लव्ह ऑफ द गेम..." नेमके हेच या उपक्रमाबद्दल म्हणतो.
"...कांहीं लोक ऐन हिंवाळ्यातसुद्धा गंगेच्या बर्फासारख्या गार आणि उथळ प्रवाहात अनवाणी उभे असलेले दिसतात...."
~ हे दृश्य मी स्वतः डोळ्यांनी (कित्येक वेळा आणि उत्तर भारतातील तत्सम ठिकाणी) पाहिले असल्याने या लोकांच्या श्रद्धेला मनोमनी (देवापेक्षा मोठा) नमस्कार केला आहे...नव्हे तो घडतोच घडतो. पंढरपूर येथेही अशीच भावना मनी निर्माण होते. पांडुरंगाच्या दर्शनापेक्षा त्यासाठी दिवसभर ताटकळत रांगेत उभे राहिलेले ते 'ग्यानबा-तुकाराम' वारकरी आणि त्यांच्या चेहर्यावरील भाव पाहणेच खर्या अर्थाने "देवदर्शन" आहे.
"...कुठलेच चित्र पूर्णपणे काळे किंवा शुभ्र नसते...."
~ या वाक्यात फार मोठे तत्वज्ञान दडलेले आहे. समजूतदारपणा दाखविला तर हेही सिद्ध होत जाते की निम्म्यापेक्षा जास्त वेळा आपण 'ऐकीव' पणावर विश्वास ठेवून ब्रश उचलला होता आणि चित्र रंगविले होते.
असो....लिहिणे गरजेचे नाही, तरीदेखील लिहायला आवडते की, तुमच्या या विषयावरील पुढील लिखाणाची उत्सुकतेने वाट पाहात आहे.
इन्द्रा