"भारतीय - कसा मी? असा मी!" प्रकरण दुसरे, भाग-५ "सत्ता:लोकशाहीचा अनपेक्षित विजय"

सुधीर काळे's picture
सुधीर काळे in जनातलं, मनातलं
5 Feb 2011 - 9:39 pm

"भारतीय - कसा मी? असा मी!"
प्रकरण दुसरे, भाग-५
"सत्ता:लोकशाहीचा अनपेक्षित विजय"

मूळ लेखक: श्री. पवनकुमार वर्मा अनुवाद: सुधीर काळे
© सुधीर काळे (मूळ लेखकाच्या वतीने)
या लेखातील सर्व मतें मूळ लेखकाची आहेत.

----------------------------------------------------
वरिष्ठ, कनिष्ठपदांवरील त्यांचे भाट, दृष्ट लागणे. ईर्षा वगैरे.....
स्तुतीमुळे एक तर्‍हेच्या सामाजिक गरजेचे समाधान होते. पण स्तुती करणार्‍या आणि स्तुती करून घेणार्‍या दोघांनाही 'हे काय चालले आहे' हे माहीत असते. कारण स्वतःची पदोन्नती/बढती आणि वैयक्तिक फायदा या ध्येयांवरच स्तुती करणार्‍याचे लक्ष केंद्रित असते. जो अशी मदत करू शकतो तो त्या कनिष्ठ स्तुतीपाठकाला महत्वाचा असतो पण हे त्याचे महात्म्य तात्पुरते, क्षणभंगुर असू शकते! स्तुती करणारा आपल्या परीने वरिष्ठाची प्रतिष्ठा आणि महत्व वाढवू शकतो, पण स्तुतिपाठक कायमचा नसतो व म्हणून बदलला जाऊ शकतो. हे दोघांनाही माहीत असते. त्यामुळे असे संबंध एकमेकांबद्दलच्या अविश्वासाच्या ’भक्कम पाया’वरच उभे असतात. पहिल्या भेटीतल्या वागणुकीवरून कुणालाच कांहीं ग्राह्य धरता येत नाहीं. कारण प्रत्येक व्यक्ती तशी संशयितात गणली जाते! एकाद्या व्यक्तीचे औदार्य, त्याची परोपकारी वृत्ती गृहीत धरता येत नाहीं कारण त्यामागचे हेतू शंका घेण्याजोगे असू शकतात. एकाद्या व्यक्तीचे बाह्यरूप जरी सदिच्छा दर्शविणारे असले तरी त्यामागे दगाफटका करण्याचा कट दडलेला असू शकतो. कनिष्ठ लोकांना वरिष्ठांबद्दल मत्सर वाटत असतो आणि त्यामुळे त्यांची वाईट नजर (दृष्ट लागणे) वरिष्ठाचे नुकसान करू शकते ही आज ग्राह्य समजूत झालेली आहे. आधी उधृत केलेल्या श्री श्रीनिवास यांच्या गांवकर्‍यांबद्दलच्या अभ्यासात त्यांनी ही गोष्ट ताबडतोब हेरली. ते म्हणतात कीं मत्सर ही नेहमीचीच परिचित गोष्ट आहे. सुखवस्तू माणसाला इतर लोक आपला हेवा करत असतील याची जाणीव (व कांहींशी भीतीही) असते. मत्सर पहाणार्‍याच्या नजरेत दिसतो आणि ही मत्सराची बाब गांवकर्‍यांच्या मनात अगदी भिनलेली होती. त्यामुळे नजीकच्या आणि बरोबरीच्या लोकांबरोबर दुटप्पीपणाने आणि सावधपणेच वर्तन करावे लागते. भारताच्या सार्‍या महामार्गांवरून धावणार्‍या ट्रक्सच्या मागे नेहमी दिसणारे अतोनात लोकप्रिय "बुरी नजरवाले तेरा मुह काला" हे बोधवाक्य याच अर्थाचे आहे. भारतातल्या चित्रवाणीसंच बनविणार्‍या एका सर्वात मोठ्या कंपनीने आपले संच विकण्यासाठी मत्सरावर आधारित "Owner's pride, neighbour's envy" हे वाक्य असलेली जाहिरात अतीशय यशस्वीपणे वापरली होती. आपले उभे आयुष्य भारताच्या सांस्कृतिक परंपरांच्या अभ्यासात व्यतीत केलेल्या कपिला वात्सायन यांनी एकदा मला (मूळ लेखकाला) अतीशय गंभीरपणे सांगितले होते कीं भारतीयांच्या भावनातील स्थायी भाव ’ईर्षा’ हाच आहे. अगदी सुशिक्षित उच्चभ्रू समाजातही "दृष्ट काढणे" हा विधी अतीशय श्रद्धापूर्ण विश्वासाने पाळला जातो. मूठभर मिरच्यांवर मीठ शिंपडून ती ज्याला तर्‍हे-तर्‍हेची ’दृष्ट’ लागलेली असण्याची भीती असते अशा व्यक्तीच्या चेहर्‍याभोवती ’इडा पिडा टळो’ असे पुटपुटत फिरविली जाते आणि हे सर्व मिश्रण आगीत टाकले जाते. मिरचीच्या खाटाने जर डोळ्यात पाणी आले किंवा कुणाला खोकला आला तर लागलेली दृष्ट जळून गेली असे म्हणत दृष्ट काढण्यामागच्या गरजेचे समर्थन केले जाते!

प्रतिष्ठा आणि वैमनस्य यांची जोडी.....
भारतीयांभोवतीच्या सामाजिक वातावरणात उपजत संशयाची प्रवृत्ती सगळीकडे पसरलेली असते. महाभारत हे अतीशय गुंतागुंतीयुक्त महाकाव्य कपट आणि विश्वासघात या मानवी दुर्गुणांनी भरलेले तर आहेच, पण रामायण हे दुसरे महाकाव्य जरी "चांगल्याचा वाईटावर विजय" या सोप्या आणि सरळसोट विषयावर असले तरी तेसुद्धा संशय आणि शंका यांनी भरलेले आहे. प्रत्येक पात्राची आणि त्यांच्या प्रत्येक गुणाची शंकेच्या मुशीत वारंवार परिक्षा घेतली जाते आणि यातून सीतेचे पावित्र्य आणि लक्ष्मणाची निष्ठाही सुटत नाहीं. स्वतःच्या लाभाची अपेक्षा न ठेवता निस्वार्थीपणे केल्या जाणार्‍या समाजसेवेबद्दल कायमच दाट संशय असतो. या अविश्वासाच्या वातावरणामुळे दोन परस्परविरोधी पण एकत्र नांदणारी विश्वे जन्म घेतात, एक आदराचे/प्रतिष्ठेचे तर दुसरे वैमनस्याचे. जेंव्हां वरिष्ठांच्या शक्तीचे ’गुरुत्वाकर्षण’ जोरदार असते तेंव्हा आदराची/प्रतिष्ठेची भावना उघडपणे दिसते पण जेंव्हां वरिष्ठांची शक्ती कमी होते तेंव्हां वैमनस्याची भावना उघड होते आणि परिस्थिती समतोल असते तेंव्हां आदर आणि वैमनस्य या दोन्ही भावना एकत्र आणि समान दिसतात.
प्रतिष्ठेचा आणि वैमनस्याचा तर्कशास्त्रानुसार अभ्यास केल्यास एकाद्या कर्तबगार माणसाची शक्ती आणि सत्ता वाढत असते तेंव्हां त्याला सलाम करणारे असंख्य भारतीय असतात हे अगदी स्पष्ट होते. या उलट ज्या माणसाला वाईट दिवस आलेले असतात त्याची कांस त्याचा आधी उदो-उदो करणारे लोक सोडून देतात. इतर समाजांत अशी मनोवृत्ती नसते असे नाहीं, पण भारतीयांत ती जास्त भडक आणि पराकोटीची वाटते. उगवत्या तार्‍याचे कौतुक प्रमाणाबहेर व अतीशय प्रशंसेने होते तर पडलेल्या तार्‍याची निर्भत्सना अगदी असमर्थनीय भडकपणाने केली जाते. या स्वभाववैशिष्ट्याबद्दलचा उल्लेख जेंव्हां मी (मूळ लेखक) एका वयस्क माणसाशी बोलताना केला तेंव्हां त्यांनी "चढते सूरजको सब सलाम करते हैं" असे निर्विकारपणे उत्तर दिले. एकाद्या संघटनेतील पदक्रम जर सुरक्षित असेल आणि त्याला कुणी दुसरा आव्हान देत नसेल तर त्या संघटनेच्या शिखरावर विराजमान असलेल्या अधिकार्‍यांना आणि त्याच्या कृपाछत्राखालील कनिष्ठ अधिकार्‍यांना निर्विवाद आणि वादातीत निष्ठा प्राप्त होते. "समरथ कर नहीं दोष गुसाईं, रवि पावक सुरसरत की नहीं (समर्थ लोक कधीच चुका करत नाहींत, ते सूर्य, अग्नी आणि सुरसरिता (गंगा) यांच्यासारखे सदैव पावन असतात)" असे सांगत तुलसीदासांनी अगदी वर्मावर बोट ठेवले आहे. पण जेंव्हां पदक्रम भंग पावतो, उकलू लागतो तेंव्हा उच्च स्थानावरून घसरलेल्या पूर्वीच्या वरिष्ठांच्या दारुण परिस्थ्तीकडे पाहून कनिष्ठांना इतका आनंद झालेला असतो कीं तो लपवता येत नाहीं. राजकीय नेत्यांना याची चांगली जाणीव असते कारण त्यांच्या बाबतीत या आनंदाचे प्रदर्शन कनिष्ठ लोक अजीबात दोषी वाटून न घेता आणि अजीबात अवघड वाटून न घेता करतात. पूर्वी प्रदर्शित केलेली प्रतिष्ठा इतकी लगेच विसरली जाते कीं जणू कनिष्ठाला स्मृतिभ्रंशच झाला आहे असे वाटावे. पण भारतीय समाज असल्या वागणूकीला सामाजिक मान्यता देतो. भविष्याबद्दल अटकळी बांधल्या जातात व नवीन वरिष्ठ कोण असेल याचे आडाखे बांधले जाऊन ताबडतोब परिस्थिती सजीव होते व सार्‍या हालचाली नव्याने पुन्हा सुरू होतात! यालासुद्धा समाजाची मान्यता आहे. राजीव गांधी जेंव्हां ८४ साली एका ऐतिहासिक विक्रमी बहुमताने सत्तेवर आले तेंव्हां त्यांनाही जनतेला त्यांच्याबद्दल वाटणार्‍या या खळबळजनक कौतुकाबद्दल आश्चर्याचा धक्काच बसला असेल कारण राजकारणाला ते नवखेच होते. त्यांनी कांहींही केले तरी ते चूक समजले जात नसे. त्यांची सत्तेवरची पकड जोपर्यंत पक्की होती तोपर्यंत शंकेचे, संशयाचे ढग कुठल्याही क्षितिजावर कुठेही दिसत नव्हते.

चढत्या काळात सारे "आलबेल"
राजकारणात नव्याने प्रवेश केलेल्या आणि राजीवजींच्या ’आतल्या’ वर्तुळातल्या लोकांना राजीव गांधींची (आणि त्यांच्याबरोबर आपली) सत्ता त्रिकालाबाधित असल्याची कल्पना झाली असल्यास त्यांना एक वेळ नवखेपणाचा फायदा घेऊन माफ करता येईल. पण जसजशी परिस्थिती बिघडू लागली आणि त्यांच्यावर टीका करणार्‍यांची संख्या ज्या वेगाने वाढू लागली त्याबाबत राजीवजींना आणि त्यांच्या सहकार्‍यांना आश्चर्याचा धक्काच बसला असेल. आता त्यांनी टाकलेले प्रत्येक पाऊल चुकीचे ठरू लागले. खरे तर भारताच्या भूतपूर्व पंतप्रधान आणि त्यांच्या मातोश्री असलेल्या इंदिराजींनी (त्यांच्याच वधामुळे राजीव अचानक पंतप्रधानपदी आरुढ झाले होते) राजीवजींना जनतेच्या वागणुकीच्या अशा अपरिहार्यतेबद्दल स्वानुभवावरून सावध करायला हवे होते. त्यांच्यानंतर पंतप्रधानपदी आलेल्या नरसिंहरावांनीही त्यांना सावध करायला हवे होते, पण इतिहासाची पुनरावृत्ती पहायला राजीवजी जिवंतच नव्हते! भारतात लोकमताचा लंबक पाळीपाळीने ’कौतुक’ आणि ’नापसंती’ अशा दोन अतीशय विरुद्ध टोकांना स्पर्श करत असतो. आणि या दोन टोकांमधील जागा गटबाजी, कारस्थानें आणि दुफळी यांनी भरलेली असते.

भारतीय आणि गटबाजी
भारतीय लोक गटबाजीत अगदी रुळलेले असतात. दोन भारतीय एकत्र आले तर दोन पक्ष स्थापन होतील हे ’घिसे-पिटे’ वचन मुळीच चुकीचे नाहीं. तीन भारतीय पाच मिनिटे एकत्र काम करू शकत नाहींत असे उद्गार एकदा स्वामी विवेकानंदांनीसुद्धा काढले होते. प्रत्येक जण सत्तास्थानासाठी झगडतो आणि अशा झगड्यांमुळे त्यांची संघटनाच शेवटी खिळखिळी होऊन तिची दुःखद परिस्थिती होते. जर केंद्रस्थान बळकट असेल तर ते गटबाजीला चांगला आवर घालू शकते. पण तेही कांहीं काळच. परस्परांबद्दलच्या सततच्या संशयी वातावरणामुळे लोक कायम नवी-नवी समीकरणे शोधून सत्तेच्या जवळात जवळ जाऊ पहात असतात, कारण निष्ठेच्या क्षणभंगुरतेची कल्पना सर्वांनाच असते. विश्वासघात, दगाफटका, फंदफितूरीच्या अशा (दु)र्गुणांच्या गोष्टी ऐकायला नेहमीच सहजासहजी फसणारा श्रोतृवर्ग लाभलेला आहे. त्यांना विश्वास असतो कीं दुसरा पक्षच तत्वशून्य असून त्यानेच विश्वासघात केलेला आहे. अशा तर्‍हेच्या खात्रीमुळे ते स्वतः अशीच तत्वशून्य कृती प्रतिसाद म्हणून करतात. अर्थशास्त्रात सांगितलेच आहे कीं विश्वासघातावर आधारलेल्या क्रांतीचा उपयोग करून सत्ता उलथून पाडल्यास त्याचे आश्चर्यकारक परिणाम दिसून येतात. त्यामुळे राजाला नेहमी गुप्तहेर नेमून त्यांच्याकरवी मंत्र्यांची आणि उच्चपदस्थ अधिकार्‍यांची निष्ठा वेळोवेळी तपासून घ्यावी लागते. एकाद्या व्यक्तीच्या प्रामाणिकपणाबद्दल, नैतिकतेबद्दल फाजील विश्वास ठेवू नये तसेच एकाद्या व्यक्तीच्या लुच्चेगिरीबद्दल फाजील गाफीलपणाही दाखवू नये.

भारतीयांना असलेली एकाकीपणाची नावड!
सततपणे आपल्याला समर्थन देणारे नवे मित्र शोधणे हा भारतीयांना एकाकीपणावरचा एक रामबाण उपाय वाटतो. भारतीयांना एकाकीपणाचे किंवा एकांतवासाचे फारच वावडे असते. बालपणापासूनच भारतीय लोक एकाद्या गटात, जातीत, उपजातीत नातेवाइकांत किंवा मोठ्या कुटुंबात वाढलेले असतात. त्यामुळे स्वतःच्या हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी आपल्याशी शतृत्व करणार्‍याबरोबर दोन हात करण्यासाठी त्यांना विश्वासू लोकांचा एक चांगला आधार लागतो. त्यामुळे सगळ्याच मित्र संघटनांकडे तो अनेक गटापासून बनलेल्या आणि आपापसात कायमचे वैमनस्य असणार्‍या संघटना म्हणूनच पहातो. एक तत्व म्हणून एकीच्या भावनेला महत्व असते पण अशी एकी ही तात्पुरती, क्षणभंगुर आणि दूर कुठेतरी असते असाही विश्वास असतो. हे विश्व म्हणजे एक जोड नसलेली अखंडता आहे, पूर्णत्व हे अविभाज्य आहे, सारी मानवजात म्हणजे एक "वसुधैव कुटुंबकम्" स्वरूपाचे विशाल कुटुंब आहे अशा तर्‍हेच्या सैद्धांतिक कल्पना भारतीयांना आकर्षित करतात कारण त्या प्रत्यक्ष जीवनाशी अजीबात साम्य नसलेल्या असतात. प्रत्यक्ष जीवनातील वातावरण फुटीरपणाचे असते हे सर्व भारतीयांना माहीत असते व ते त्यांना पटलेलेही असते. शरीरातील पेशीप्रमाणे प्रत्येक गटाचे हितसंबंध सातत्याने विभागले जात असतात, पुन्हा एकजीव होतात आणि पुन्हा तितक्याच सहजतेने पुन्हा विभक्त होतात. सामाजिक संबंधांत वस्तुनिष्ठपणाची कल्पना भारतीयांना परकीच आहे. कुणीही त्याच्या आसपासच्या समाजावरील निष्ठांच्या पलीकडे जाऊ शकतो यावर त्यांचा विश्वासच बसत नाहीं. त्यामुळे आपल्या सामाजिक वातावरणाच्या बाहेर असलेल्या परकीयांबद्दलची त्यांची मते कायम धरसोड वृत्तीची लंबकासारखी सतत मागे-पुढे होणारी असतात: परकीय असल्यामुळे व त्यामुळे आपल्या समाजाच्या बाहेरचे असल्यामुळे त्यांच्याबद्दलचा अखंड अविश्वास एका बाजूला असतो तर ते आपल्या सामाजिक वातावरणाच्या बाहेरचे असल्यामुळे अशा वातावरणाचा त्यांच्यावर प्रभाव पडत नाहीं म्हणून त्यांच्याबद्दल असलेली गूढ तर्‍हेची निष्ठा दुसर्‍या बाजूला असते! बहुतांशी फसव्या शांततेच्या आवरणाखाली अनेक स्तरात विभागलेल्या आपल्या समाजात अथक शक्तीनिशी भारतीय पद्धतीने गटबाजी चालते आणि त्या गटबाजीला अदृश्य वैयक्तिक वैराचे आणि मत्सराचे खतपाणीही लाभते.

सत्तेच्या समीकरणानुसार बदलणारे भारतीयांचे वर्तन
जेंव्हां आपले महत्व केवळ आपल्या गुणांवर अवलंबून न रहाता सत्तेच्या सतत बदलत्या समीकरणावर अवलंबून असू लागते तेंव्हां इतरांनी दिलेल्या प्रतिष्ठेतील फरक हा एक गंभीर चिंतेचा विषय होतो. भारतीय लोकांकडे अदृश्य अशी अँटेना असते आणि ती सत्तेच्या समीकरणामधील फरक लगेच ओळखू शकते. आपण आधी चर्चिल्याप्रमाणे कुठलाही माणूस पदक्रमाच्या शिडीवर कुठे उभा आहे हे ओळखण्याची विद्या भारतीयांना चांगलीच अवगत असते आणि शक्तीच्या नव्या समीकरणाच्या त्यांच्या आकलनानुसार त्यांची वागणूकही लगोलग बदलते. त्यामुळे भारतीय लोक त्यांना मिळणार्‍या प्रतिष्ठेच्या प्रदर्शानाबाबतीत फारच संवेदनशील असतात. जर त्यांना दाखविलेली प्रतिष्ठा कमी झालेली दिसली तर ते त्यांच्या स्थानमहात्म्याच्या मानहानीचे द्योतक होते. जर प्रतिष्ठेचे प्रदर्शन "जैसे थे" राहिले तर त्याचा अर्थ आपले स्थान सुरक्षित आहे असे ते समजतात आणि प्रतिष्ठेचे प्रदर्शन उंचावले तर त्या व्यक्तीची पदोन्नती होण्याची शक्यता दिसून येते. ही प्रतिष्ठा कशी दिली जाते किंवा नाकारली जाते ती एक खास भाषाच आहे व ती भाषा एकाद्या व्यक्तीचे सत्तेच्या समीकरणातील स्थान अतीशय अचूकपणे आणि नेमकेपणाने सांगू शकते. स्वतःच्या लायकीनुसार जर प्रतिष्ठेचे प्रदर्शन झाले नाहीं तर भारतीयांना तो एक अपमान वाटतो. इतरांनी दर्शविलेली प्रतिष्ठा जर कमी असेल तर भारतीय माणूस डिवचला जातो आणि त्याच्या हातून त्याच्या मानहानीच्या मानाने खूप जास्त मोठा प्रमाद होऊ शकतो. भारतीयांच्या ’देशी’ मानसशास्त्रानुसार तीन तर्‍हेच्या अनुभवांकडे खास लक्ष द्यावे लागते. ते अनुभव आहेत मान, अपमान आणि अभिमान! भारतीयांच्या परस्पर संबंधांत योग्य आदर देण्याबद्दल आणि मिळण्याबद्दल फारच पराकोटीची संवेदनाशीलता असते हे उघड दिसते.

वैयक्तिक हितसंबंध सगळ्यात श्रेष्ठ
यात विरोधाभासाचा भाग असा आहे कीं स्वतःच्या प्रतिष्ठेबद्दलची ही अतिशयोक्तीपूर्ण जाणीव जितक्या सहजपणे जारी केली जाते तितक्याचच सहजपणे तिचा त्यागही करता येतो. आपल्या प्रतिष्ठेला धक्का लागलेले सहन करणार नाहीं असे जो शपथेवार सांगत असतो तो दुसर्‍याच दिवशी खात्रीच्या वैयक्तिक फायद्यासाठी तडजोड करायला तयार होतो. त्याच्या या दोन पवित्र्यांमधील विरोधाभास उघड असतो पण तो त्याला शेवटी नगण्य, गैरलागू वाटतो. जे लोक दांभिकतेवर प्रखर टीका करत असतात तेच खासगीत बोलताना व्यवहारीपणाचे महत्व समजल्याचे मान्य करतात. स्वाभिमानाचा त्याग करणे लाभदायक असेल आणि त्यामुळे जास्त उच्च दर्जाची सत्ता आणि स्थान मिळत असेल-तीही अतीशय थोड्या काळासाठी-तर झालेला विश्वासघात विसरला जातो. पण भारतीयाचे उत्कर्षाचे दिवस उतरणीला लागले कीं प्रतिष्ठा न मिळाल्याची भावना उफाळून येते. १९७० सालच्या दशकातील एका काँग्रेसच्या नेत्याने केंद्र सरकारच्या मंत्रीमंडळात आणि एका महत्वाच्या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून काम केले होते. त्याने जाहीरपणे सांगितले कीं ते त्यांची चामडी त्याकाळच्या पंतप्रधान इंदिरा गांधींच्या चपलांसाठी द्यायला तयार आहेत. त्याकाळी इंदिरा गांधींची सत्ता अजिंक्य, अभेद्य वाटायची. ते त्यांच्या कनिष्ठांकडून तसेच त्यांच्या बरोबरीच्या लोकांकडून ज्या मानमरातबाची, ज्या प्रतिष्ठेची आग्रही मागणी करत असत त्याच्या तूलनेत त्यांनी स्वतःचे स्वतःच केलेचे अवमूल्यन, मानहानी त्यातील विरोधाभासामुळे फारच भडक दिसली होती. अशा तर्‍हेने एका बाजूला प्रतिष्ठा असणे अगदी जरूरीचे मानणे आणि दुसर्‍या बाजूला स्वतःच्या मोठ्या हितसंबंधांसाठी तिला सहजपणे तिलांजली देणे हे भारतीयांच्या जीवनात अगदी रोजचे होते! असे करण्यामागचा मूळ हेतू भारतीयांना शंभर टक्के समजत असल्यामुळे अशा परस्परविरोधी वागण्यावर क्वचितच टिप्पणी होते. या संदर्भात श्री वर्मा यांना न्यूयॉर्कच्या केनेडी विमानतळावरील एक घटना आठवते. एका मंत्र्यांच्या सौभाग्यवती तिथे उतरल्या आणि त्या मंत्र्यांच्या स्वीय सचीवांना तिला उतरवून घेण्यासाठी येताना केवळ पाच मिनिटे उशीर झाला. झाले! बाई संतापल्या आणि भडकल्या आणि तो सचीव समोर येताच, "उल्लूके पठ्ठे, ये टाईम आनेका?" या शब्दांत किंचाळल्या. स्वतः एक ज्येष्ठ सनदी नोकर असलेल्या त्या स्वीय सचीवाने हा अपमान मुकाट्याने गिळला आणि 'मंत्र्यांचा स्वीय सचीव' या पदावर चिकटून राहिला!

संस्कृतीसमाजभाषांतरविरंगुळा

प्रतिक्रिया

फक्त हा भाग वाचताना रॉबर्ट ग्रीन यांच्या "४८ लॉज ऑफ पॉवरची" (मराठी अनूवाद 'सत्ता') प्रकर्शाने आठवण झाली. बघूया कीती मि.पा. जाणकार या लेखावर सहमत होण्याचे धैर्य दाखवतील ते.
पू.ले.शू.

प्रतिसाद आले म्हणजे आतल्या आत सुखावायला होते हे तर खरेच, पण जास्तीत जास्त 'मिपा'कर या लेखमालिकेतील लेख वाचतील आणि ते वाचून त्यांना मूळ पुस्तक (ज्यात श्री वर्मांनी अनेक संदर्भ परिशिष्टात दिलेले आहेत) वाचायची उर्मी येईल अशी आशा आहे.

अर्धवटराव's picture

6 Feb 2011 - 7:33 am | अर्धवटराव

हा लेख म्हणजे भारतीयांचा हमामखाना !! सगळेच नैसर्गीक अवस्थेत... अगदी "जसे आहे तसे"

वास्तवीक इतकं झणझणीत अंजन डोळ्यात घातल्यावर आग आग व्हायला हवी... पण मला फार मोकळं मोकळं, प्रसन्न वाटतय. कळायला लागल्या पासुन (आता कधी ते विचारु नका... हा वादग्रस्त मुद्दा आहे ) सामाजीक, राजकीय प्रश्न मनाला छळायचे. हे असं का? लोकांना समाजहीत, देशहीत कळत कसं नाहि? वगैरे प्रश्न भांडावून सोडायचे. या सर्व प्रश्नांमागची भारतीय (त्यात मी स्वतःची सुद्धा आलोच) मानसीकता बर्‍यापैकी उलगडायला लागलीय.

शतशः धन्यवाद काळे काका. पुढील भागाची वाट पाहतोय.

(भारतीय) अर्धवटराव

स्पा's picture

12 Feb 2011 - 11:14 am | स्पा

एक नंबर प्रतिसाद..
प्रचंड अनुमोदन

बाकी सुकाकाका
भन्नाट लिहित आहात
लगे रहो :)

सुधीर काळे's picture

6 Feb 2011 - 8:29 am | सुधीर काळे

वा, अर्धवटराव!
तुझा असा परिपूर्ण (अजीबात 'अर्धवट' नसलला!) एक प्रतिसाद शंभर प्रतिसादांच्या बरोबरचा आहे व तो वाचून अनुवाद करण्यातील प्रयत्न सार्थकी लागले असे वाटले.
प्रत्येक भारतीयाने (यात मीही आलो) या लेखमालेच्या वाचनाने 'दर्पणदर्शन' करावे 'याचसाठी करत आहे हा अट्टाहास'!
पुन्हा आभार!
काका

ह्म्म हे आसूड सहन होत नाहीत खरे. कोणी यावर प्रतिवाद केला पाहीजे. लेखक (मूळ) काही बोलतो आणि आपण निमूट मान्य करतो हे कसं चालेल?

आत्मशून्य's picture

6 Feb 2011 - 10:20 am | आत्मशून्य

वीचार बदलला म्हणून.

खरंच राग येतो. पण भारतातील नोकरशाही व खासगी क्षेत्रातील नोकरी बरीच जवळून पाहिली आहे. श्री वर्मांनी इथे जे लिहिले आहे ते, माननीय अपवाद सोडल्यास, बरेचसे बरोबर आहे.

तिमा's picture

6 Feb 2011 - 10:28 am | तिमा

त्यांच्या मातोश्री असलेल्या इंदिराजींनी (त्यांच्याच वधामुळे राजीव अचानक पंतप्रधानपदी आरुढ झाले होते

हे वाक्य त्यातल्या 'वधामुळे' या शब्दाने खटकले. हत्या हा शब्द योग्य ठरला असता.
आरेसेस वाले पण गांधीजींच्या हत्येला 'वध' असे म्हणतात, तेही तेवढेच खटकते.

बाकी लेख चांगला आहे.

धन्यवाद. तुमचे म्हणणे बरोबर आहे. मूळ टंकलिखितात तसा बदल केला आहे.

लेखातील विचारांशी बर्‍याच अंशी सहमत.. पण व्यक्त केलेले विचार प्रत्येक भारतीयाला लागू होत नाहीत हे इथे विचारात घ्यायला हवे.

बाकी काळेकाकांनी केलेला अनुवाद म्हणजे पर्वणी.. आणि तो तुम्ही पुढेही चालू ठेवावा ही नम्र विनंती..

- पिंगू

बद्दु's picture

6 Feb 2011 - 5:22 pm | बद्दु

काळे साहेब, तुम्ही अनुवादित केलेल्या या लेखकाच्या मतांवरची तुमची प्रतिक्रिया काय आहे?

बाकी,
मला असे वाटते कि हे एक सर्वसाधारण मत सर्वच प्रकारच्या समाजाला लागु होत असेल. भारतीय समाजच असा ( जो काही असेल तसा) आहे असे वाटायचे कारण नाही..इथे परदेशात तर वारंवार असे विचित्र अनुभव येतात की आपले जुने अनुभव परत तपासावे लागतात. असो..
अनुवाद उपलब्ध करुन दिल्याबद्दल धन्यवाद.

बद्दू-जी
इथे व्यक्त झालेली मतें संपूर्णपणे मूळ लेखकाची आहेत. भाषांतर करताना झालेल्या चुका अलाहिदा. त्या कमीत कमी ठेवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. पण 'वध'ऐवजी 'हत्त्या' (किंवा आता इंद्रा-जींच्या प्रतिसादात आलेल्या सनदी नोकरांबद्दलच्या मी केलेल्या उल्लेखातील कदाचित होऊ घातलेली सुधारणा) अशा सुधारणांचे मी स्वागतच करतो.
सुरुवातीला माझे मराठी फारच 'इंग्रजी छापा'तले होते पण ते सुधारत गेले आहे ते वाचकांच्या सकारात्मक सूचनांमुळेच!
माझी सर्वात प्रथम टीकाकार असते माझी सौ.! ती मला असे खूप मुद्दे सांगत असते व मी ते साभार लक्षात घेऊन त्यानुसार सुधारणाही करत असतो.
मला वर्मांचे पुस्तक आवडले व बरेचसे पटले म्हणूनच मी ते इथे मालिकेच्या रूपात share करण्यासाठी पोस्ट करत आहे. नाहीं तर केलेच नसते. पण इथली मतें श्री. वर्मांचीच आहेत. (भाषांतरातील 'चूक-भूल द्यावी घ्यावी'!)
माझे वैयक्तिक मत सांगतो कीं हा मनुष्यस्वभाव आहे व तो सार्‍या देशांतील लोकांना लागू आहे. कुठे कमी तर कुठे जास्त.
प्रत्येक भारतीयसुद्धा असा 'एका छापा'तला नसतो. कांही 'भाट' असतात तर कांही आपण-बरे-आपले-काम-बरे अशा स्वभावाचे असतात तर कांहीं परखडही असतात!
माझ्या नोकरीनिमित्त्य माझा खूप देशांच्या लोकांशी संबंध आला असला तरी माझा तिथल्या मनुष्यस्वभावांचा सखोल अभ्यास नाहीं म्हणून एवढेच नमूद करत आहे!
थोडेसे अवांतरः 'न्यूक्लियर डिसेप्शन'पासून मी अनुवाद करायचे मनावर घेतले ते अमेरिकन सरकारने केलेल्या स्वतःच्या आणि सार्‍या जगाच्या फसवणुकीने मला संताप आला म्हणून! ती माहिती सर्व मराठी लोकांपर्यंत पोचविण्यासाठी मी त्या पुस्तकाचे रूपांतर केले. तेथेही मते मूळ लेखकांचीच आहेत पण मला त्यांचे म्हणणे पटले म्हणूनच मी ते 'मिपा'वर व इतरत्र सादर केले.

इन्द्र्राज पवार's picture

6 Feb 2011 - 8:39 pm | इन्द्र्राज पवार

"....एका मंत्र्यांच्या सौभाग्यवती तिथे उतरल्या आणि त्या मंत्र्यांच्या स्वीय सचीवांना तिला उतरवून घेण्यासाठी येताना केवळ पाच मिनिटे उशीर झाला. झाले! बाई संतापल्या आणि भडकल्या आणि तो सचीव समोर येताच, "उल्लूके पठ्ठे, ये टाईम आनेका?" या शब्दांत किंचाळल्या. स्वतः एक ज्येष्ठ सनदी नोकर असलेल्या त्या स्वीय सचीवाने हा अपमान मुकाट्याने गिळला आणि 'मंत्र्यांचा स्वीय सचीव' या पदावर चिकटून राहिला!...."

~ या प्रसंगावर भाष्य करणे फार गरजेचे आहे. कारण एकतर श्री.वर्मा यांचे निरिक्षण चुकीचे असेल किंवा श्री.सुधीर काळे यांच्या एरव्ही अतिशय डौलदार असणार्‍या अनुवाद शैलीतील 'ज्येष्ठ सनदी नोकर वा स्वीय सहाय्यक' ची जागा चुकली असे.

याबाबतीत काही मुद्दे माझ्या नजरेसमोर येत आहेत (मला दिल्लीतील हे सेक्रेटरी Cadre चांगलेच माहीत आहे; त्याच्या अनुषंगाने हा प्रतिसाद....)

१. सर्वप्रथम श्री.वर्मा यानी वर्णन केलेला हा प्रसंग कोणत्या काळातील आहे? हे विचारण्याचे कारण असे की, श्री.मनमोहन सिंग पंतप्रधान झाल्यापासून प्रशासनाला व त्यातही उच्च पदस्थ अधिकार्‍यांना [जे आय.ए.एस. वा तत्सम दर्जाचेच असतात] खूप महत्व आले आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील खाजगी उद्योगधंद्यामध्ये अशा 'क्रीमी ब्रेन' ला जी डोळे दीपविणारी मागणी आहे हे पाहता सरकार आयएएस पातळीचे अधिकारी सरकारी नोकरीतून जातील असे कधीही इच्छित नाही. त्याला कारण लोकशाही ढाच्यात मंत्रीमंडळाला कितीही अधिकार असले तरी प्रत्यक्षात राज्यशासनाचे शकट ही तैलबुद्धीचे सनदी नोकरच चालवित असतात...याबद्दल खुद्द श्री.सुधीर जी देखील वेगळे मत मांडू इच्छिणार नाहीत.

२. घटनेचा 'काळ' यासाठी विचारत आहे की, १९७५ ते १९९० या कालावधीत असे हांजीहांजी करणारे संख्येने बर्‍यापैकी होते आणि त्या पंधरा वर्षात 'मंत्री' नावाच्या प्राण्याची भीती वाटावी असा दराराही असे. साहजिकच या प्राण्याच्या मादीलाही (पक्षी पत्नीला) 'साहेबा'च्या हाताखाली असलेल्या स्टाफवर वेळोवेळा अकारण तोंडसुख घ्यायची सवय लागली होते....(सर्वच मंत्र्यांच्याबाबतीत असे होत असेल असेही नाही...पण होत होते ही बाब नजरेआड करून चालणार नाही.)

३. पण आत्ता ती स्थिती नाही. कोणताही मंत्री आपल्या पत्नीला केनेडी विमानतळावरील प्रसंगासदृश्य वर्तणुक करण्याची अनुमती देणार नाही. त्यातही श्री.काळे लिहितात (जरी अनुवादित असले तरी...) तसा तो स्वीय सहाय्य्क 'ज्येष्ठ सनदी नोकर' असेल तर.....इथे नोकरशाहीप्रणालीनुसार 'गॅझेटेड ऑफिसर' ला 'सनदी नोकर' म्हटले जाते....क्लास-१.

४. केन्द्र सरकारमधील 'सचिव' पातळीची रचना खालीलप्रमाणे असते : {यांची कार्यप्रणाली आणि अधिकाराची व्याप्ती इथे सांगत नाही, कारण मग मूळ उद्देश भरकटत जाईल.}

(अ) कॅबिनेट सेक्रेटरी ~ सनदी पातळीवरील सर्वोच्च स्थान
(ब) को-ऑर्डिनेशन अ‍ॅण्ड पब्लिक ग्रिव्हन्सेस सेक्रेटरी ~ प्रत्येक खात्यासाठी असतात.
(क) सेक्रेटरी ~ सिक्युरीटी : स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप
(ड) अ‍ॅडिशनल सेक्रेटरी ~ विविध खात्याचे प्रतिनिधित्व करत कॅबिनेट सेक्रेटरी याना मदत करतात.
(इ) जॉईन्ट सेक्रेटरी ~ कायद्याच्या बाबी अभ्यासून त्या मंत्र्यांच्या खात्याना पुरविणे.
(फ) डेप्युटी सेक्रेटरी ~ मंत्री पातळीवरील मीटिंग्ज आयोजित करून प्रशासनपूरक नोंदी करणे.
(ग) अंडर सेक्रेटरी ~ मिनिस्ट्री आणि कॅबिनेट सेक्रेटरी यांच्या दरम्यान होत असलेल्या शासन निर्णयांची माहिती लिखित स्वरूपात देशातील सर्व खात्यांना कळविणे. (यालाच G.R. असे म्हणतात, ज्यावर अंडर सेक्रेटरी यांची स्वाक्षरी असते.)

वरील 'अ' ते 'ग' ही मंडळी 'आय.ए.एस.' दर्जाचीच असतात....याचाच अर्थ यांचे नोकरशाहीतील यांचे स्थान क्लास-१ चे असते....हेच ते 'सनदी अधिकारी'

आता मुद्दा येतो तो मंत्र्याच्या 'पर्सनल सेक्रेटरी'चा....वा मराठीत "स्वीय सहाय्यक" यांचा. मंत्रीमंडळाच्या प्रथेनुसार प्रत्येक मंत्र्याला (मग तो राज्य वा उप मंत्री असला तरी) एक स्वीय सहाय्यक असतो जो केन्द्र/राज्य शासनाच्या सेवेत असलाच पाहिजे अशी अट असते....आणि त्याचे पद असते 'स्टेनोग्राफर'.

हा स्टेनोग्राफर मंत्र्यासमवेत अगदी २४ तास असतो असे म्हटले तरी अतिशयोक्ती नसते....कारण 'स्वीय' ची कल्पना तशीच असते. बहुतेक मंत्री आपल्या मतदार संघातीलच एखाद्या स्टेनोची सरकारी खात्यातून वर्ग करून या पदासाठी निवड करतो....जो पर्यंत संबंधित मंत्री त्या पदावर (वा सत्तेत) आहे, तो पर्यंतच्या काळात या स्टेनोचे अगदी राज्य असते....म्हणजे याला ओलांडल्याशिवाय मंत्री भेटूच शकत नाही अशीच परिस्थिती असते. पुढे मंत्री महोदयांची खुर्ची जरी गेली तरी हा 'स्वीय सहाय्यक' परत पूर्वीच्याच संबंधित खात्यात परत येतो....'स्टेनोग्राफर' याच पदावर.

हा स्टेनो - अथवा स्वीय सहाय्यक - अगदी अरेतुरेच्या नात्यातील असल्यामुळे साहेबांच्या बंगल्यावर अगदी थेट स्वयंपाकघरात जावून बाईसाहेबांच्या आगेमागे करीत असल्याने साहजिकच याच्याबरोबर संबंध ठेवताना घरातील अन्य नोकरांच्या लायकीप्रमाणेच मंत्रीणबाई याच्याशी वर्तन करीत असतात, त्यानी केलेल्या अपमानाबद्दल या शिंगरूलाही काही वावगे वाटत नाही.....कारण बाहेर याचा रूबाब "हिंदकेसरी' सारखाच फाकडू असतो.

त्यामुळे केनेडी विमानतळावर झालेला 'तो' प्रसंग अशा स्टेनोच्या बाबतीत घडला असण्याची दाट शक्यता आहे. मंत्री अगोदरच भारत सरकारच्या एखाद्या खात्याच्या मीटिंगसाठी न्यू यॉर्कला आले आहेत आणि त्यांच्यासमवेत (By Default) जो लवाजमा असतो त्यात 'स्वीय सहाय्यक' म्हणून हा स्टेनोग्राफर दर्जाचा सरकारी नोकर असणार....आणि दुसर्‍यातिसर्‍या दिवशी बाईसाहेबानीही आली आहे अमेरिका सफरीची संधी म्हणून घेतली...व आल्या केनेडी एअरपोर्टवर....नियमानुसार (आणि प्रोटोकॉलनुसारही) तिथे त्याना न्यायला "ज्येष्ठ सनदी सचिव" येत नाही...येऊही शकत नाही, त्यामुळे जी व्यक्ती आली ती म्हणजे हा 'स्टेनो'च असणार....आणि शेवटी घरकी मुर्गी दाल बराबर...या तत्वानुसार पाच मिनिटे वेळ झाला म्हणून मग तो 'उल्लू के पठ्ठे...' हा पदवीदान समारंभ..!

आय.ए.एस. अधिकारी मंत्र्याच्या बायकोच्या शिव्या खाण्याइतके स्वस्त नाहीत.

इन्द्रा

इन्द्रा तुझ्या ज्ञानाला त्रिवार सलाम.
मी तुला एन्सायक्लोपिडिया म्हणतो ती काहि अतिशयोक्ती नाहि.
येवढी माहिती असुन तु इतका विनयशील आहेस. खरच गर्वा चा ग सुध्दा तु तुझ्या पाशी पोहचु दिला नाहिस हे कौतुकास्पद आहे. मिपा वर येउन तु इतकी माहिती देतोस म्हणुन सारख सारख यावेसे वाटते.
अभिनंदन

गोगोल's picture

7 Feb 2011 - 2:41 am | गोगोल

काही आहे का ज्यावर ईंद्रा केवळ एका ओळीचा प्रतिसाद देतील (ह. घ्या.)

प्रतिसाद आवडला.. तार्किक बुद्धी देखील आवडली.

इंद्रा-जी,
मूळ पुस्तकातले 'ते' वाक्य खाली कॉपी-पेस्ट केले आहे.
I recall an incident in New York some year ago, when the wife of a minister had arrived at JFK. airport, and the private secretary to the minister, a senior civil servant very conscious of his own esteem, was five minutes late in receiving her. When he met her, she exploded: 'Ullu ke patthe, ye time aane ka!
पुस्तकाचे कॉपीराईट हक्क २००४ सालचे असून प्रकाशनही २००४ सालचे आहे.
इथे a senior civil servant हे शब्द वापरले आहेत. त्याचा अर्थ स्टेनोग्राफर होतो कीं क्लास-१ ऑफीसर होतो याची कल्पना नाहीं. स्टेनोग्राफरचा पदक्रमात काय दर्जा असतो हेही माहीत नाहीं (म्हणजे class-1 or lower).
दुरुस्तीची जरूरी असेल तर जरूर सुचवावी म्हणजे मूळ टंकलेखनात ती बदलेन. जर इथे 'सनदी नोकर' हा शब्दप्रयोग बरोबर असेल तर तसेही कळविणे.
हा प्रसंग २००४ सालचा आहे की त्यापेक्षा खूप आधीचा याचा मूळ लेखनात उल्लेख नाहीं.
धन्यवाद

इन्द्र्राज पवार's picture

7 Feb 2011 - 9:28 am | इन्द्र्राज पवार

१. श्री.वडील....परत एकदा थॅन्क्स म्हणतोच.....जरी तुम्ही त्या औपचारिकतेबद्दल नाखुशी व्यक्त केली तरी !!
२. श्री.गोगोल...वेल, तुमच्या आपुलकीच्या कॉमेन्टवर काय बोलू? विषय चांगला असला [जसा वरील] की अभ्यासालाही वाव असतो आणि तसा तो करणे मला खूप आवडते शिवाय दिल्ली कारभार पध्दतीची मला बर्‍यापैकी माहिती असल्याने त्या निमित्ताने ती ताडताही येते. दीर्घ प्रतिसाद जर दिले नाहीत तर माझेच इथले काही मित्र "हा इन्द्राचा प्रतिसाद नव्हेच..." अशा खेळकर टपल्या मारतात....हीदेखील एक गंमतच.

३. श्री.सुधीर जी...
मूळ इंग्रजीतील संबंधित उतारा वाचला. मी वर प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे 'प्रायव्हेट सेक्रेटरी' असाच त्या पदाचा उल्लेख आहे [श्री.वर्मा यांचे फक्त निरिक्षण असे आहे की....A senior civil servant...]. याचा अर्थ असा बिलकुल होत नाही की तो प्रायव्हेट सेक्रेटरी 'ज्येष्ठ सनदी सेवक' असेल. 'सनद' ही संज्ञा Gazette संबंधित असून ती क्लास-१ स्तरावरील अधिकार्‍याना लागू होते.

'स्वीय सहाय्यक' हे पद स्टेनोग्राफर कॅटेगरीतील (क्लास-३....सी.एस.एस. = सेन्ट्रल सेक्रेटेरियट सर्व्हिसेस) असून अगोदर सांगितल्यानुसार मंत्री या पदासाठी 'आपला' माणूस कुठल्या खात्यात आहे तिथून मागवून घेऊ शकतो. या उलट मी असेही म्हणेन की दिल्ली सेन्ट्रल सेक्रेटेरियेटमधील काही धोरणी स्टेनोग्राफर्स मंत्रीमंडळ स्थापन होण्याच्या काळात पाण्यात गळ टाकून बसलेले असतातच.

(एखादा स्टेनो. मंत्र्याला कसा 'ड्राईव्ह' करतो हे जर जाणून घ्यायचे असेल तर अरूण साधू यांची राजकीय महत्वाकांक्षा या विषयावर गाजलेली 'सिंहासन' ही कादंबरी वाचावी. फार झकास वर्णन आहे अशा स्वीय सहाय्यकाचे.)

तुमच्या लेखातील मजकुरात आता दुरुस्तीची तशी आवश्यकता नाही....पण करण्याची तरतूद असेलच तर 'ज्येष्ठ सनदी नोकर' हे संबोधन काढून टाकून फक्त 'स्वीय सहाय्यक' इतकाच उल्लेख ठेवल्यास प्रसंग खटकणार नाही.

धन्यवाद.

इन्द्रा

सुधीर काळे's picture

7 Feb 2011 - 9:49 am | सुधीर काळे

श्री वर्मांनी "senior civil servant" हे शब्द कां वापरले आहेत त्याची कल्पना नाहीं, पण संपादकांना त्रास देऊन दोन्ही सुधारणा ('हत्त्या' आणि 'स्वीय सहाय्यक') करत आहे.
दरम्यान श्री. वर्मांनाही विचारत आहे कीं त्यांना काय अभिप्रेत होते. त्यांच्याकडुन उत्तर आल्यास मी तुम्हाला कळवेनच.
पुनश्च मनापासून आभार!

कापूसकोन्ड्या's picture

6 Feb 2011 - 10:08 pm | कापूसकोन्ड्या

अनुवाद कसा करावा?
हॅट्स ऑफ.
काळे साहेब विषय थोडा जनरल आहे आणि अवघडसुद्धा. भारतीय मानस चांगल्याप्रमाणे वर्णन केला आहे. पण जनरायलायझेशनमुळे खुपमर्यादा येत असाव्यात. शिवाय केवळ भांषांतर नाही तर अनुवाद करायचा आहे. त्यामुळे तुम्हाला
बौद्धिक सर्कस करावी लागत असावी. मुळ लेखकाच्या विचाराशी फारकत घेता येत नाहीच पण स्वतःचे विचार पण चार हात दूर ठेवावे लागत असतील.
असो.
पु ले शु
तुमच्या चिकाटीला सलाम.
काहीही म्हणा राग मानू नका पण फसवणुकिची मजा या लेखमालेला येत नाहीये.

गोगोल's picture

7 Feb 2011 - 2:40 am | गोगोल

चालू आहे... वाचायला मजा येत आहे.
परिच्छेदाला छोटेसे टाइटल देण्याची सूचना मनावर घेताल्याबद्दल आभार. त्यामुळे वाचन खूप सोपे झाले आहे.

जयंत कुलकर्णी's picture

7 Feb 2011 - 10:11 am | जयंत कुलकर्णी

काळेसाहेब,

फार छान !

भारतीय समाज असा का यावर मी एक लेख लिहीला होता. त्याची आठवण झाली. त्यात मी जे मत मांडले होते त्यावरून माझ्यावर जबरी टीका झाली होती. ते मत थोडक्यात असे होते -

माणुस जसा एकांतात वागू शकतो तसे दुसर्‍याच्या संगतीत वागू शकत नाही हे सत्य आहे. हेच आपण दुसर्‍या पध्दतीत मांडू शकतो " आपल्याला हवे तसे माणूस फक्त एकांतातच वागू शकतो". म्हणजे दुसर्‍या कोणाच्याही संपर्कात आल्यावर माणसाच्या वागण्यात फरक पडतो. अगदी एखाद्या प्राण्याच्याही. हा जो फरक पडतो त्यालाच व्यवहार म्हणतात. हे एकदा मान्य केले की त्या व्यवहाराचे नियम तयार होतात. हे तयार होताना जी रस्सीखेच व्हायची ती झाल्यावर या नियमांना समाज मान्यता देतो व त्यालाच आपण एक जगण्याची पध्दत किंवा धर्म समजतो. हे नियम या समाजामधील सुज्ञ किंवा ताकदवान लोक तयार करत असतात. असो मुद्दा हा नाही. मी त्या लेखात असे मांडले होते की त्या मुळे आपला समाज जो काही आत्ता आहे त्याचे उत्तरदायीत्व त्या नियमांकडे/धर्माकडेच जाते.

ऐकायला कटू असेल पण हे सत्य आहे. कदाचित माणसातल्या जनावराला काबूत आणण्यासाठी या नियमांमधे ताकद नसावी. ( अर्थात माणसाची जंगली माणसापासून ते आत्तापर्यंत झालेली वाटचाल ही चांगल्यासाठी झालेली आहे असे यात गृहीत धरले आहे.

काळेसाहेब चांगले भाषंतर चालले आहे. मस्त. आता खूपच सफाईदारपणा आला आहे.
Great !

जयंतराव,
आपला तो पूर्ण लेख वाचायला आवडेल. पण आपण म्हणता त्यात सत्याचा भाग खूपच आहे. पण त्याहून महत्वाची गोष्ट म्हणजे 'स्वयंकेंद्रित' मूळ मनुष्यस्वभाव!
आज-काल एक मोटरसायकलची जाहिरात पाहून मला या 'स्वयंकेंद्रित मूळ मनुष्यस्वभावा'ची खूप जाणीव होते. दोन शाळकरी मुले दोन मोटरसायकलवर बसून त्या खोटी-खोटी चालवत असतात. एक मोठया पॉवरची आहे ती एक मुलगा किक-स्टार्ट करतो तर दुसरा १५० सीसीची 'सेल्फ मारून' स्टार्ट करतो. एक जण पाच गियर टाकतो तर दुसरा म्हणतो कीं यात तर चारच गियर आहेत! शेवटी एक चिमुरडी पोरगी येते आणि त्या सेल्फवाल्या मोटारसायकलवर जाऊन बसते. त्यावर तो चिमुरडा रागावून आपल्या बापाला सांगतो, "मुझे नहीं चाहिये ये मोटरसायकल"
या छोट्याशा जाहिरातीत मूळ मनुष्य स्वभावाचे (bruised ego) जे दर्शन होते त्याला कुठेलाही धर्म, कुठलाही नियम बदलू शकत नाहीं असे मला वाटते.

मुकुन्दा_२८'s picture

11 Feb 2011 - 12:26 pm | मुकुन्दा_२८

लेखा च्या सुरवातीला आधी प्रकाशीत झालेल्या लिन्क दिल्यास उत्तम !! माझे काहि लेख वाचायचे राहीलेत.

मुकुन्द-जी,
आतापर्यंतच्या सर्व लेखांचे दुवे खाली दिले आहेत. वाचून जरूर प्रतिसाद द्या आणि सुधारणाही सुचवा.
धन्यवाद.
http://www.misalpav.com/node/15674 (Being Indian-"भारतीयः कसा मी? असा मी!"-प्रस्तावना)
http://www.misalpav.com/node/15799 (प्रकरण पहिले-परिचय-प्रतिमा विरुद्ध सत्यपरिस्थिती-भाग १)
http://www.misalpav.com/node/16025 (प्रकरण पहिले-परिचय-प्रतिमा विरुद्ध सत्यपरिस्थिती-भाग २)
http://www.misalpav.com/node/16141 (प्रकरण दुसरे, भाग-१: सत्ता-लोकशाहीचा अनपेक्षित विजय)
http://www.misalpav.com/node/16221 (प्रकरण दुसरे, भाग-२: सत्ता-लोकशाहीचा अनपेक्षित विजय)
http://www.misalpav.com/node/16328 (प्रकरण दुसरे, भाग-३: सत्ता-लोकशाहीचा अनपेक्षित विजय)
http://www.misalpav.com/node/16553 (प्रकरण दुसरे, भाग-४: सत्ता-लोकशाहीचा अनपेक्षित विजय)
http://www.misalpav.com/node/16641 (प्रकरण दुसरे, भाग-५: सत्ता-लोकशाहीचा अनपेक्षित विजय)