"भारतीय - कसा मी? असा मी!" प्रकरण दुसरे, भाग-२: सत्ता-लोकशाहीचा अनपेक्षित विजय

सुधीर काळे's picture
सुधीर काळे in जनातलं, मनातलं
8 Jan 2011 - 1:51 pm

"भारतीय - कसा मी? असा मी!"
प्रकरण दुसरे, भाग-२: सत्ता-लोकशाहीचा अनपेक्षित विजय

मूळ लेखक: श्री. पवनकुमार वर्मा अनुवाद: सुधीर काळे
© सुधीर काळे (मूळ लेखकाच्या वतीने)
या लेखातील सर्व मतें मूळ लेखकाची आहेत.

वेगवेगळे समाज ते छोट्यात छोट्या गोष्टींबाबत कसा विचार करतात व कसे वागतात हे दाखवतात. समाजांच्या वर्तणुकीचे ढाचे त्यांच्या विचारपूर्वक घेतलेल्या पवित्र्यावरून समजून न घेता एकाद्या किरकोळ घटनेच्या आधी किंवा तिच्या पाठोपाठ त्या समाजघटकांच्या प्रतिक्षिप्त क्रियेवरून ते समजून घेणे जास्त चांगले. आपल्याहून उच्च पदावर असलेल्या व्यक्तीच्या सान्निध्यात असताना भारतीयांची वर्तणूक आणि त्यांच्या शरीराच्या हालचाली खूपच बोलक्या असतात. एकादा मुत्सद्दी किंवा ज्येष्ठ प्रशासक कितीही विद्याविभूषित असो वा शिष्टाचार जाणणारा असो, तो आपल्या वरिष्ठाला त्याच्या नावाने किंवा (श्री./श्रीमतीसह) आडनावाने हाक मारत नाहीं तर नेहमीच sir किंवा madam या आदरार्थी संज्ञेने संबोधतो. कधी-कधी त्याच्या वाक्याच्या दोन्ही टोकांना-सुरुवातीला आणि शेवटी- तो sir किंवा madam या संज्ञा वापरतो. मंत्रीमहोदय त्याच्या दिशेने येताना दिसले तर तो अतीशय तत्परतेने बाजूला होतो, संभाषणात डोळ्याला डोळा भिडवायचे टाळतो, वरिष्ठ बोलत असताना नतमस्तक पवित्रा घेतो, साधारणपणे वरिष्ठाला प्रश्न विचारणे आणि विरोध करणे टाळतो. आपल्यात आणि वरिष्ठात योग्य अंतर राखतो जणू कांहीं जवळ जाण्याने त्यांना विटाळच होणार आहे! आणि जर वरिष्ठाने विनोद केला तर तो खूप जोरात आणि उत्साहात हसतो जणू असा विनोद त्याने जन्मात कधी ऐकला नव्हता!
आपल्या कनिष्ठांकडूनही तो अशाच वर्तणुकीची अपेक्षा करतो. खासगी क्षेत्रातील कंपन्यातील वातावरण व्यावसायिक असते व तिथे अशी अती अदबशीर वागणूक कमी दिसून येते. पण खासगी क्षेत्रातही अशा कंपन्या कमीच असतात. पदक्रमावर आधारित (hierarchical ordering) सामाजिक अवलंबनाचे तत्व भारतीयाच्या जीवनात सर्वव्यापी बनले आहे; अगदी 'यजमान'वाल्या पद्धतीपासून औद्योगिक संस्थांपर्यंत, धार्मिक संस्थांतील गुरु-शिष्य संबंधांपासून भारतीय विश्वविद्यालयांच्या विविध खात्यांमधील नोकरवर्गापर्यंत, ग्रामपंचायतीपासून सरकारी नोकरशाहीच्या उच्चतम स्तरांपर्यंत सगळीकडे ते पसरलेले आहे!
एकाद्या व्यक्तीच्या समाजातील पावलावर आणि हालचालीवर सत्तेतील पदक्रमाचे नियंत्रण असणे हा एक सार्वत्रिक अनुभव आहे पण एकादी व्यक्ती सत्तेच्या शिडीच्या कुठल्या पायरीवर उभी आहे हे जाणण्यात भारतीयांनी उच्च प्रतीचे कसब प्राप्त करून घेतले आहे. दोन अपरिचित भारतीयांची पहिली भेट बर्‍याचदा एक-दुसर्‍याचे समाजातील स्थान किंवा दर्जा ठरविण्यासाठी केलेली चाचपणीच बनते. इतर देशांत एकाद्याला त्याची लायकी, प्रतिष्ठा किंवा पायरी (औकात) विचारणे हा एक अपमानास्पद प्रश्न समजला जातो. पण प्रत्येक व्यक्तीला स्वतःची अशी पायरी असतेच व ती त्याने ओलांडायची नसते! पण एकाद्या व्यक्तीने ती ओलांडायचे साहस केलेच आणि त्या साहसात ती व्यक्ती जर अयशस्वी झाली तर त्या व्यक्तीला कुणाचीही सहानभूती लाभत नाहीं कारण इतर भारतीयांना असे अपयश म्हणजे त्या व्यक्तीला आपली पायरी सोडून वागल्याबद्दल मिळालेली ती एक योग्य शिक्षाच वाटते. पायरीबद्दलची जाणीव आणि कळकळ भारतीयांच्या रक्तात भिनलेलीच असते इतकी कीं महामार्गांवरून धावणार्‍या ट्रक्सच्या मागच्या बाजूलासुद्धा "आपली पायरी विसरू नकोस (अपनी औकात मत भूल)" असा संदेश वाचायला मिळतो!
पूर्वीच्या काळात एकाद्या व्यक्तीची पायरी तिच्या जाती-पोटजातीवरून ठामपणे ठरविता येत असे. आजही जात हा एकाद्याची पायरी ठरविण्यातील घटक आहे पण आज ती पूर्णपणे जातीवरून ठरविली जात नाहीं. म्हणून अशी पायरी ठरविण्यासाठी अन्य मार्ग अवलंबावे लागतात. तरी अशी पायरी ठरविणे ही भारतीयांसाठी एक अतीशय निकराची गरज असते. एकाद्या व्यक्तीला तिच्या पायरीबद्दलच्या माहितीशिवाय भेटणे म्हणजे एकाद्या विहिरीत तिच्या खोलीबद्दल अंदाज नसताना सूर मारण्यासारखे आहे. सत्तेच्या शिडीवर एकादी व्यक्ती कितव्या पायरीवर उभी आहे किंवा सरकारदरबारी किंवा समाजात तिचे किती 'वजन' आहे यावरून त्या व्यक्तीला मिळणारा प्रतिसाद, वागणूक, तिच्याबरोबर वागताना वापरली जाणारी शरीरभाषा[१] (Body language), शिष्टाचार, वापरले जाणारे संबोधन, तिची सामाजिक स्वीकृती वगैरे भारतीय समाज ठरवितो. सरकारदरबारी अत्युच्च स्थानावर असणार्‍या व्यक्ती किंवा वृत्तपत्रें/चित्रवाणी, औद्योगिक क्षेत्र, खेळजगत अशा क्षेत्रांत राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय कीर्ती संपादन केलेल्या व्यक्तींच्या बाबतीत दिली जाणारी श्रेष्ठता आणि आदर उघडच दिसतो. पण जिथे एकाद्या व्यक्तीची 'पायरी' उघड-उघड जाणवत नाहीं अशा ठिकाणी भारतीय लोक ती शोधून काढतात. त्यासाठी नव्याने परिचय झालेल्या व्यक्तीवर आपले वडील काय करतात, आपण कुठे रहाता, आपले शिक्षण कुठे झाले, आपले अमक्या-अमक्याशी कांहीं नाते आहे का, अमक्या-अमक्याशी ओळख आहे का यासारख्या वाढत्या भेदकतेच्या प्रश्नांची ते सरबत्ती करतात! असे वैयक्तिक प्रश्न विचारताना भारतीयांना कुठालाही संकोच वाटत नाहीं कारण दोन्ही व्यक्तींना असली चौकशी त्या दोन व्यक्तींमधील समतोल संबंध प्रस्थापित करण्यासाठी आवश्यक असलेली प्रस्तावना आहे हे माहिती (आणि मान्य) असते. अशा प्रस्तावनेनंतर आदर, अंतर आणि घसट याबाबतीत 'अतिपरिचयात् अवज्ञा' न होण्याची काळजी दोन्ही व्यक्तींना घेता येते. यातल्या 'कच्च्या खेळाडूं'ना असले प्रश्न अगदी निरुपद्रवी वाटतील पण ते तसे अजीबात नसतात कारण त्यांच्या उत्तरांत महत्वाचा आणि उपयुक्त गर्भितार्थ दडलेला असतो. वडिलांच्या माहितीवरून सामाजिक पार्श्वभूमी कळते तर रहाण्याच्या जागेवरून त्याच्या ऐश्वर्याची कल्पना येते, उदा. दिल्लीतील 'वसंत विहार' ही एक दिल्लीच्या उपनगरातील उच्चभ्रू वसाहत मानली जाते. तिथे रहात असणारी व्यक्ती सुखवस्तू, 'खाऊन-पिऊन-सुखी' असणार असे अनुमान काढता येते. पण 'वसंत विहार' ज्येष्ठ सरकारी अधिकार्‍यांची सहनिवास योजना म्हणून सुरू झाली होती. आज तेथे रहाणार्‍यांचे पिताश्री ज्येष्ठ सरकारी अधिकारी असणार असा त्याचा अर्थ होऊ शकतो. तसेच दिल्लीच्या 'ल्युटेन्स' भागातील रस्त्यांवर ऐसपैस बंगले आहेत. तिथे रहाणारे अशा बंगल्यांत भाडेकरू म्हणून रहात असले तरी ते सत्तेच्या शिडीवरच्या बर्‍याच वरच्या पायरीवर असणार असे अनुमान काढता येते. दिल्लीप्रमाणेच भारताच्या प्रत्येक शहरात अशा कांहीं 'पॉश' विभागांवर एक अदृश्य 'सत्ता-निर्देशांक' असतोच. अलीकडे अव्वल शिक्षणसंस्थांचे बुरूज राखीव जागांच्या धोरणाने आणि खुल्या प्रवेश-परिक्षांमुळे कांहींसे ढासळले असतील पण एकाद्या उच्च्चभ्रू शिक्षणसंस्थेतून बाहेर पडलेल्या व्यक्तीची ती शिक्षणसंस्थाच एक गुणनिर्देशिका बनते आणि त्यातून त्या व्यक्तीची 'पायरी'ही ठरते. एकाद्या व्यक्तीच्या स्थानाची कल्पना देणारे इतरही कांहीं असेच निर्देशक आहेत. उदा. एकाद्या व्यक्तीचे इंग्रजीचे उच्चार आणि बोलण्यातील सफाई त्याच्या सामाजिक पार्श्वभूमीबद्दल बरेच कांहीं सांगून जाते. कारण अशी सफाई फक्त उच्चभ्रू लोकांतच आढळते[२]. या चुकीच्या समजामुळे ज्यांना इंग्रजी नीट बोलता येत नाही असेही लोक अट्टाहासाने इंग्रजीत बोलू पहातात. यामुळेच असेल पण चांगले इंग्रजी बोलू न शकणारे पण यशस्वी आणि शक्तिशाली राजकीय नेते खुल्या व्यासपीठांवरून इंग्रजीची अवहेलना करताना दिसतात पण स्वतःची मुले मात्र इंग्लिश माध्यमांच्या शाळांत पाठवितात.
उच्चपदस्थांबरोबरचे नाते किंवा मैत्री याला असलेल्या महत्वाची भारतीयांना छान कल्पना असते व त्याची शेखी मिरवायला त्यांना कांहींच संकोच वाटत नाहीं. नव्याने ओळख्ह झालेल्या व्यक्तीला अशा नात्यांबद्दल आणि मैत्रीबद्दल सांगायची त्यांना जणू घाईच झालेली असते कारण त्यामुळे अशा नव्याने ओळख झालेल्या व्यक्तीवर छाप पडेल आणि त्यानुसार ती व्यक्ती आपल्याबरोबर वागेल याची अचूक खात्री त्याला असते. भारतीयांमध्ये एकाद्या व्यक्तीचे सापेक्ष महत्व जाणण्याबाबतचे कसब राडारसदृष अचूक असते असे मनोवैज्ञानिक अ‍ॅलन रोलंड म्हणतात. त्यांच्या या संवेदनशीलतेमुळे माणसाला आणि संदर्भाला योग्य अशा गोष्टी त्यांना सांगाव्या लागतात. या परिस्थितीत शब्दांचे अर्थ ऐकणार्‍याच्या स्वभावावरून, मतितार्थावरून आणि संदर्भावरून लावावे लागतात. एकाद्याने जर सांगितले कीं त्याच्यावर या तर्‍हेच्या संबंधांच्या जाळ्याचा परिणाम होत नाहीं किंवा तो त्या दृष्टीने स्वतंत्र आहे तर त्याच्यावर कुणीच विश्वास ठेवणार नाहीं. आजही एकाद्या व्यक्तीची प्रथमच ओळख करून देताना त्या व्यक्तीने जर दावा केला कीं त्याने मिळविलेले यश त्याने केवळ त्याच्या गुणवत्तेवर मिळविलेले आहे तर भारतीय लोक त्याच्यावर विश्वासच ठेवणार नाहींत व त्याच्यावर कुणाचे कृपाछत्र आहे, त्याची कुणाशी जानी दोस्ती आहे किंवा कुणाशी त्याचे लागेबांधे आहेत याचा शोध तो लगेच घेऊ लागतील.
भारतीयांना त्यांच्या सामाजिक स्थानाच्या (पायरीच्या) भुताने किती पछाडले आहे याचा प्रत्यय भारतीय वृत्तपत्रातील विवाहविषयक जाहिरातींवरून येतो. वृत्तपत्रांचे पहिले पान भले जगातील सर्वात मोठी लोकशाही राबविण्यातील अडचणींच्या बातम्यांनी भरलेले असेल, पण खरी कहाणी असते छोट्या-छोट्या जाहिरातींनी भरून ओसंडून वहाणार्‍या विवाहविषयक जाहिरातींच्या पानांनी! त्यातल्या सगळ्यात छोट्या भागाचे शीर्षक असते "Cosmopolitan". पण इतर १४ पानांवर जातीनिहाय विवाहविषयक जाहिराती असतात. त्यातल्या कांहीं जाहिरातींत "जातीचे बंधन नाहीं" असे लिहिलेले तर इतर कांहीं जाहिरातींत वधूच्या किंवा वराच्या गुणांनाच महत्व दिले जाईल असे लिहिले असते. पण प्रचंड संख्येने असलेल्या जाहिरातींत उच्च सामाजिक स्थान असलेल्या कुटुंबाशीच लग्नसंबंध जोडण्याच्या अपेक्षेचा ठळकपणे उल्लेख असतो. २६ जानेवारी २००३च्या टाइम्स ऑफ इंडियाच्या अंकात विवाहविषयक जाहिरातींबद्दलच्या सर्वेक्षणात "उच्च सामाजिक स्थाना"चा उल्लेख १५३२ जाहिरातींत आढळला होता. इतर अशाच अनेक जाहिरातींत "आदरप्राप्त कुटुंब (well-respected family)" किंवा "अब्रूदार कुटुंब(highly reputed family)" असे उल्लेखही असतात. भारतीय लोक उच्च सामाजिक स्थानाला सर्वात जास्त श्रेष्ठत्व कसे देतात हेच या जाहिरातींवरून लक्षात येते. त्यातही वराच्या किंवा वधूच्या स्थानापेक्षा त्यांच्या वडिलांच्या उच्च स्थानबद्दल जास्त तपशिलाने माहिती दिलेली असते. वडिलांच्या सामाजिक स्थानाच्या रूपरेषेबद्दल कल्पना देणारी लहानातली लहान माहिती अशा जाहिरातींत ठासून भरलेली असते. जातींबद्दल बंधन नाहीं असे लिहिलेले असले तरी वराचे किंवा वधूचे उच्च सामाजिक स्थान उघड करण्याच्या उद्देशाने बरीच आनुषंगिक माहिती त्यांत दिलेली असते. उदाहरणार्थ 'हिंदुस्तान टाइम्स'च्या १५ सप्टेंबरच्या अंकातील खालील जाहिरातीत वापरलेली शब्दरचना पहा:
परीसारखी सुंदर, सडपातळ, भरपूर उंची असलेली सुशिक्षित असलेली आधुनिक विचारांची कारखानदार कुटुंबातील सौंदर्यवान वधू पाहिजे. २७ वर्षाच्या, उंची १८७ सेंमी, गोरापान, सडपातळ अंगकाठी, रुबाबदार व्यक्तिमत्व असलेल्या एका अत्यंत श्रीमंत उच्चभ्रू हिंदू कुटुंबातील एकुलत्या एक मुलासाठी! वराचे वडील केंद्र सरकारच्या मंत्रीमंडळात अतीशय लोकप्रिय ज्येष्ठ मंत्री आहेत. मुलगा शाकाहारी असून त्याला कसलेही व्यसन नाहीं. वर लंडनमध्ये चांगल्या रीतीने प्रस्थापित असून त्याचा स्वत:चा व्यवसाय आहे. जातीची अट नाहीं. आपल्या सविस्तर माहितीसह लिहा......वगैरे वगैरे!
या जाहिरातीतील सगळ्यात मनोरंजक बाब नमूद करायला हवी ती म्हणजे वरपिता सर्व जगाला सांगू इच्छितो कीं तो केंद्रीय मंत्रीमंडळात मंत्री असून अतीशय लोकप्रिय आहे. म्हणजेच त्याचे मंत्रीमंडळातील स्थान बळकट असून त्याला डच्चू मिळण्याचा धोका नाहीं आणि हे वधूला आणि वधूच्या माता-पित्याला सांगण्याचा त्याचा हेतू या शब्दरचनेमागे असावा. आजच्या coalition सरकारच्या जमान्यात सरकारचे आयुष्य क्षणभंगुरच असते त्या दृष्टीने वरपित्याचे तो लोकप्रिय असल्याचे सांगणे तसे योग्यच आहे. उद्या खुर्ची गेली तरी त्याच्या लोकप्रियतेमुळे तो परत सत्तेवर येण्याची शक्यता आहे हे ध्वनित करण्याचाही हेतू या शब्दरचनेत असू शकतो. अर्थात् एकाद्या मंत्र्याला केवळ त्याच्या सत्तेशी असलेल्या सांनिध्याच्या संदर्भात असे विधान करावे लागले असण्याची आवश्यकता आहे, एरवी स्वतःच्या लोकप्रियतेबद्दल बोलायची कांहीं गरज नव्हती. पण उच्च सामाजिक स्थान असणे आणि तेही सत्तेच्या पदक्रमात हे भारतीयांना महत्वाचे वाटते. असे उच्च सामाजिक स्थान मान्यताप्राप्त आणि सहज इतरांना ओळखू येणारे हवे तसेच सत्ता, कृपाछत्र, लागेबांधे, प्रभाव, लाभांश आणि पैसा यासारखे फायदे देणारे असे हवे. नैतिकता किंवा लोकप्रियता किंवा एकाद्याने कुठल्या भल्या-बुर्‍या मार्गाने असे उच्च सामाजिक स्थान मिळविले आहे या बाबी दुय्यम किंवा गौण मानल्या जातात!


------------------------------------
टिपा:
[१] तोंडाने शब्दही न उच्चारता शरीराच्या अवयवांचा उपयोग करून मनातले सांगणे जसे मानेला दिलेला झटका, डोळ्यांची हालचाल, इ. मी वापरलेल्या "शरीरभाषा" या शब्दापेक्षा अधीक चांगला शब्द माहीत असेल तर वाचकांनी सुचवावा.
[२] माझ्या मतें हे मराठी भाषिकांबद्दल किंवा हिंदी भाषिकांबद्दलही तितकेच खरे आहे.

संस्कृतीसमाजजीवनमानराहणीप्रकटनभाषांतरविरंगुळा

प्रतिक्रिया

शुचि's picture

8 Jan 2011 - 8:39 pm | शुचि

काळेसाहेब शरीरभाषा = देहबोली :)
लेख अप्रतिम आहे. सुरेख भाषांतर केले आहे आपण. पुस्तक मस्तच आहे. किती विसंगती आहे आपल्या समाजात. हे पुस्तक आपल्यामुळे वाचावयास मिळत आहे याबद्दल आपले खूप आभार.

शुचीताई,
लेख वाचल्याबद्दल आणि इतका सविस्तर प्रतिसाद दिल्याबद्दल आभारी आहे.
देहबोली हा शब्द चपखल वाटला. माझ्या मूळ 'टंकलिखिता'त (manuscript मध्ये) बदलत आहे.
पुनश्च मनःपूर्वक आभार!

दोन भारतीय लोकांनपैकी १ जण जरी पायरी ओळखाय्ला गडबडत असेल /दूर्लक्ष करत असेल तर त्यां दोघांच्यात कम्यूनीकेशन गॅप त्वरीत वाढायला लागते, ते एक्मेकांशी सहजपणे/मो़कळेपणे (?) संवाद साधू शकतच नाहीत असे नीरीक्षण आहे. इन फॅक्ट मीपावर पण नाही काय ठरावीक लोक फक्त ठरावीक लोकांनाच प्रतीसाद देण्यात धन्यता मानतात हा त्यातलाच प्रकार ठरतो काय ? म्हणजे ही सवय भारतीय लोकांबाबत ओन्लाइन पण दीसून येते की. :)

पण आत्मशून्य साहेब फक्त भारतिय नाही हो परदेशी लोकांमध्ये देखील हीच लक्षणे आढळतात. अमेरीकेत स्त्रिया एन्गेजमेन्ट रिंग म्हणून हिर्‍याची अंगठी घालतात. मी असे ऐकून आहे की हा हीरा जितका मोठा तेवढी त्या स्त्रीच्या नवर्‍याची पत जास्त असते. कारण १ महीन्याच्या पगाराइतकी अंगठी घेण्याची सर्वसाधारण प्रथा आहे.
आपण लोक जातीपातीवरून जोखतो तर हे लोक वर्णावरून आणि कपडे/राहणीवरून अदमासा घेतात. पण मानवी स्वभाव सगळीकडे तोच तुलना करण्याचा. एकमेकांना जोखण्याचा.

ते एक्मेकांशी सहजपणे/मो़कळेपणे (?) संवाद साधू शकतच नाहीत असे नीरीक्षण आहे

हीच गोष्ट खटकते, कदाचीत माझे बोलणे अतीशयोक्त वाटेल पण भारतात असे लोक ऊदंड आहेत की जे समोरच्याची पत कळली नाही तर संवाद साध्ताना चक्क चाचपडायला लागतात, ततपप होते त्यांची..... नाटकीपणाची ही कमालच आहे. म्हणून बरेचदा मजा पण येते ह्यांचे नीरिक्षण करण्यात :)

आत्मशून्य-जी,
तुमच्या 'बारीक' निरीक्षणाबद्दल धन्यवाद!
'न्यूक्लियर डिसेप्शन'बद्दल 'मिपा'वर आलेला एक गमतीदार अनुभव सांगतो. या मालिकेचा शुभारंभ मिपावरच सुरू झाला. त्याच्या पहिल्या ५-६ प्रकरणांची हजाराहून जास्त वाचने झाली आणि त्यांना (माझी उत्तरे धरून) ३०-एक प्रतिसाद आले. मग वाचनांची आणि प्रतिसादांची (माझी उत्तरे धरून ५-६) संख्या घटू लागली व या मालिकेच्या सर्वात चांगल्या (१९व्या) प्रकरणाची केवळ २००-२५० वाचने झाली व केवळ ३ प्रतिसाद आले. शेवटच्या 'उपसंहारला' मात्र पुन्हा १२ प्रतिसाद आले. (आजही माझी वाचकांना विनंती आहे कीं त्यांनी या १९व्या प्रकरणाचे जरूर वाचन करावे, विशेषतः शेवटचा ३३ टक्क्यांचा भाग. हा भाग माझ्या श्रीदीपलक्ष्मीच्या दिवाळी अंकातील लेखात "अल-कायदाच्या भावी योजना" या शीर्षकाखाली आलेला आहे)
शेवटी-शेवटी तर फक्त मदनबाण आणि विकास पिसाळ हेच लिहीत. माझ्या लेखनातील त्रुटी त्या दोघांनी खूप सुधारल्या.
पण माझ्या लिखाणची खरी लोकप्रियता मला 'सकाळ'च्या वाचकांच्या प्रतिसादावरून कळली. मला चक्क वैयक्तिक आय.डी.वर 'फॅन मेल' येऊ लागली! हा अनुभव मला नवाच होता! (वाचकांनी माझा वैयक्तिक आय.डी. माझ्या इतरत्र केलेल्या लिखाणावरून शोधून काढला!)
खरं तर 'मिपा'चे सभासद well-read & having major literary accomplishments असे आहेत. पण माझे 'न्यूक्लियर डिसेप्शन'चे लि़खाण त्यांच्या पसंतीस उतरले नसावे. पण माझी कांहींही तक्रार नाहीं कारण 'मिपा'नेच मला मराठीत लिहिण्याचा आत्मविश्वास दिला. (त्या आधी मी फक्त आंग्लभाषेत लिहीत असे.)
तेंव्हा माझ्या प्रत्येक भावी लिखाणाचा 'नैवेद्या'चा मान 'मिपा'लाच मिळेल.

विनायक बेलापुरे's picture

9 Jan 2011 - 6:49 am | विनायक बेलापुरे

एकमेकाना जोखायची पद्धत कोणत्याही समूहात आढळते. अगदी पाळीव / वन्य प्राणी समूहात ही.
देहबोलीचा उल्लेख इथे झालाय म्हणून सांगावेसे वाटते की हस्तांदोलन करताना तरी दुसरे काय होत असते ? एकमेकाना अजमावणेच होत असते.

अर्थात एक गोष्ट खरी आहे की आपण भारतीय नव्या ओळखीत सुद्धा ज्याला पाश्चात्य खाजगी समजतात असे परश्न सहज विचारतो किंवा प्रतिक्रिया देवून टाकतो. उदा. जाड झालास हा तू !! ही प्रतिक्रिया पाश्चात्य अवाजवी किंवा अतिलगट केल्यासारखी समजतील.

पण त्याचे खरे कारण माणसाला अधिक जाणून घेणे आहे, जवळीक करण्याची ती पद्धत आहे असे मला वाटते.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

9 Jan 2011 - 1:09 pm | विश्वनाथ मेहेंदळे

>>अर्थात एक गोष्ट खरी आहे की आपण भारतीय नव्या ओळखीत सुद्धा ज्याला पाश्चात्य खाजगी समजतात असे परश्न सहज विचारतो किंवा प्रतिक्रिया देवून टाकतो.
अधोरेखित शब्द खूप महत्त्वाचे आहेत. आपण आपल्या वागणुकीचे, संस्कृतीचे मोजमाप पाश्चात्य पट्टीने करता कामा नये. अर्ध्या हळकुंडाने पाश्चात्य झालेले अनेक भारतीय हा मुद्दा विसरतात. २००६ साली एका नियतकालिकाने केलेल्या आंतरराष्ट्रीय सर्वे मध्ये मुंबई शहराला जगातील सर्वात उद्धट शहराचा बहुमान दिला होता. त्यासाठी जे निकष लावले होते ते पाहता या निकालाबद्दल काहीही आश्चर्य वाटत नाही. तिथेही हीच चूक केली होती.

मूळ लेखातील वरीष्ठाशी वागणे इ मुद्दे पण याच प्रकारातले आहेत. पाश्चात्य देशात वरिष्ठाला नावाने हाक मारतात म्हणून तेच बरोबर आणि आपण सर म्हणतो ते चूक असे नाही. हा त्या त्या देशातील संस्कृतीचा भाग आहे. अमेरिकेतील लहान मुले मित्राच्या पालकांना काका-काकी नाही म्हणत. Mr अमुक किंवा Mrs तमुक असे म्हणण्याची पद्धत आहे म्हणे (असे तेथील चित्रपट / मालिका पाहू वाटते. चुकीचे असल्यास अमेरिकेतील जाणकारांनी दुरुस्त करावे). असे आपल्याकडील मुलांनी केल्यास ते उद्धटपणाचे समजले जाईल.

पण साहेबांना किंवा वरिष्ठांना Sir किंवा Madam म्हणणे हेही भारतीय नाहींच. मग आपण अनुकरण कुठल्या पाश्चात्य देशाचे करतो एवढाच भाग उरतो. आज "महोदय"सारखे शब्द वापरले जात आहेत पण त्यांना अजून तसे स्थान नाहीं जे Sir किंवा Madam ला आहे.
तसे पहाता "इतो भवान्"सारखे (असे यावे, महाराज!) वाक्प्रयोग जुन्या संस्कृत नाटकांत आलेले माझ्या शाळेतील अभ्यासक्रमात वाचल्याचे मला स्मरते.
या लेखात मूळ लेखकाने भारतीय लोक सत्ताधार्‍यांना जो अतोनात बहुमान देतात त्याबद्दल लिहिले आहे व ते बरोबरच आहे असे मला वाटते.

विनायक-जी,
तुमचे म्हणणे बरोबर आहे. पण नव्याने परिचित झालेल्या व्यक्तीबरोबरचे आपले वागणे त्या व्यक्तीच्या गुणदोषापेक्षा त्याच्या सामाजिक स्थानावर अवलंबून राहू लागले कीं वाटते कुठे तरी चुकते आहे. या संदर्भात भगवान श्रीकृष्णाने केलेले 'सुदामा' या त्याच्या बालमित्राचे आदरातिथ्य आपण विसरू लागलो आहोत (आणि विसरू नये) असे वाटू लागते.

वाचतो आहे. 'वसंत विहार'चं उदाहरण वाचून 'पाळीव प्राणी'मधलं "शिवाय दिल्लीला तर डेप्युटी सेक्रेटरीच्या कुत्र्याने शेपूट आधी हलवली, तरच जॉईंट सेक्रेटरीचं कुत्रं उगीचंच कान हलवल्यासारखं करतं; असं ऐकून आहे", हे वाक्य आठवलं :)

'देहबोली' ह्या शुचींच्या सुचवणीला अनुमोदन. थोडा छिद्रान्वेषीपणा करायचा झाला तर 'एकाद्या व्यक्तीचे सापेक्ष महत्व जाणण्याबाबतचे कसब राडारसदृष अचूक असते' हे बहुतेक radar-like accuracyचे शब्दशः भाषांतर असावे. त्याऐवजी एकलव्य-लक्ष्यवेधसारखी इतर एखादी मराठीत अधिक रूढ असणारी उपमा चालून जावी, असं वाटतं.

झकास! सूचना चांगली आहे व तिचा मी नक्कीच उपयोग करेन.
पण आजच्या तरुण पिढीला एकलव्य आणि रडार या दोन्हीतला कुठला शब्द जास्त कळतो कुणास ठाऊक. मी आधीच्या प्रतिसादात लिहिलेले "सुदाम्याचे पोहे"सुद्धा किती लोकांना माहीत असतील?

चिंतामणी's picture

9 Jan 2011 - 9:36 am | चिंतामणी

पण प्रतिक्रीया द्यायला वेळ लागेल.