"भारतीय - कसा मी? असा मी" प्रकरण दुसरे, भाग-१: सत्ता-लोकशाहीचा अनपेक्षित विजय

सुधीर काळे's picture
सुधीर काळे in जनातलं, मनातलं
3 Jan 2011 - 2:16 pm

>"भारतीय - कसा मी? असा मी"
प्रकरण दुसरे, भाग-१: सत्ता-लोकशाहीचा अनपेक्षित विजय

मूळ लेखक: श्री. पवनकुमार वर्मा अनुवाद: सुधीर काळे
© सुधीर काळे (मूळ लेखकाच्या वतीने)

प्रकरण पहिले-भाग १
सत्तेचा घृणास्पद दुरुपयोग

दिल्लीच्या इंदिरा गांधी विमानतळावरील प्रयाणकक्ष (Departure Lounge) प्रवाशाला टाटा करायला आलेल्या अनेक मित्रांच्या आणि नाललगांच्या हसण्या-खिदळण्याच्या आवाजांनी भरून गेला होता. सुरक्षेच्या कारणावरून फक्त प्रवासीच या कक्षाच्यापुढे जाऊ शकत.

नव्या सहस्त्रकाच्या पहिल्या वर्षाच्या पावसाळ्यातील ती एक दमट सकाळ होती. वातावरणात खूप उकाडा होता. एका-एकी गाड्यांचा एक ताफा ब्रेक्सच्या कर्कश किंचाळ्या देत येऊन थांबला. पहिली गाडी ऍम्बॅसेडर होती. टपावर फिरता निळा दिवा होता. खांद्यावर स्वयंचलित बंदूक बाळगणारा एक शिपाई पुढच्या आसनावरून पुढचे दार उघडून चापल्याने खाली उतरला आणि त्याने अदबीने मागचे दार उघडले. एक तरुण पोलीस अधिकारी ऐटीत गाडीतून बाहेर पडला. लगेच हातातले 'वॉकी-टॉकी' सरसावत गणवेषातले हुजर्‍ये पुढे झाले आणि त्यांनी 'साहेबां'ना वाट करून दिली. दारावरच्या शिपायाचा नम्र सलाम स्वीकारत तो पोलीस अधिकारी पुढे झाला. बंदूकधारी पोलिसांनी त्या अधिकार्‍याला 'व्हीआयपी लाउंज'पर्यंत सोडले.
बाकीच्या प्रवाशांच्याबाबतीत सुरक्षाव्यवस्था कडक होती. क्ष-किरण यंत्रे, सामानाची हातांनी केलेली तपासणी, विमानात चढण्यापूर्वी स्वतःचे सामान कुठले ते ओळखून ते सुरक्षा अधिकार्‍यांना दाखविणे वगैरे. एक अद्ययावत् पोषाख परिधान केलेली मध्यमवयीन स्त्री आपले सामान ओळखण्यासाठी दालनाच्या बाहेर आली. तिच्या हातात तिची हॅण्डबॅग होती त्याला पोलिसांनी कायद्यानुसार हरकत घेतली व ती हॅण्डबॅग आत ठेवायला सांगितले. पण त्या स्त्रीने मागेही वळून न पहाता तिकडे दुर्लक्ष केले. पोलिसाने आवाज चढवला तरीही ती ढिम्मच! मग तो सुरक्षा अधिकारी पळत तिच्याकडे गेला. तो जवळ आल्यावर ती स्त्री त्याच्याकडे वळली आणि तिने त्या सुरक्षा अधिकार्‍याला "मी एक खासदार आहे इतकेही तुला समजत नाहीं?" असे फटकारले. चाबकाचा फटका बसल्यासारखा तो अधिकारी वरमला व तिची माफी मागत मागे सरला. व्हीआयपी लाउंजमध्ये बसून चहाचा स्वाद घेत असलेल्या त्या अधिकार्‍याला खात्री होती कीं तो ज्या सहजपणे तिथे आला ते योग्यच होते. त्या खासदारबाईंनाही प्रवेश करतानाचा नियम मोडण्यात स्वत:चे कांहीं चुकले असे वाटले नाहीं. दोघांची खात्री होती कीं त्यांच्या उच्च दर्जामुळे त्यांना असे नियम पाळण्याची गरज नव्हती, ते कायद्याच्या कक्षेबाहेर होते. दोघेही उच्चविद्याविभूषित भारतीय होते आणि गरज पडल्यास अतीशय वक्तृत्वपूर्ण शैलीत ते सर्व नागरिकांच्या समान हक्काच्या विषयावर ओघवत्या इंग्रजीत भाषण करू शकले असते!
लॉर्ड वेलस्लीचा आपल्याला (जरा जास्तच) 'पटलेला' उपदेश
प्रबळ लोकांनी आपल्या सत्तेचे प्रदर्शन करताना मितभाषी आणि विनम्र असण्याची परंपरा भारतीयांत नाहीं. १८व्या शतकात लॉर्ड वेलस्ली यांनी ईस्ट इंडिया कंपनीला लंडनमध्ये सांगितले होते कीं देशी लोकांची शरणागती मिळविण्यासाठी मोठमोठे राजवाडे बांधून त्यांच्यात दरारा आणि जरब निर्माण करणे आवश्यकच होते. ईस्ट इंडिया कंपनीला हा युक्तिवाद स्वीकारावा लागला व त्यानुसार कलकत्त्याचा गव्हर्नर पॅलेस बांधण्यात आला. ब्रिटिश गेल्यानंतर ५० वर्षें झाली पण आजही त्या भव्य वास्तूचा उपयोग याच कामासाठी केला जातो. तिथे १६८ नोकर दिमतीला असलेल्या आणि विशाल परिसर असलेल्या या वास्तूत पश्चिम बंगालचा राज्यपाल वैभवात पण इतरांपासून अलिप्त रहातो.
ब्रिटिश गेले आणि सत्तांतर झाले. त्या सत्तांतराबरोबर साजसरंजामाचे हस्तांतरही घडून आले. यात जगावेगळे असे कांहींच नव्हते. वसाहतवादाच्या गुलामीत उच्चपदावर असलेल्या जगातील सर्वच मंडळींनी आपल्यावर जुलूम करणार्‍यांच्या इतमामांचे आणि बडेजावाचे अनुकरण केले. पण भारतीय उच्चपदस्थ निराळे असू शकले असते. ज्या व्यक्तीने भारतीयांना स्वातंत्र्य मिळवून दिले आणि ज्या व्यक्तीला भारतीयांनी "भारताचे पिताश्री" असा सन्मान दिला त्यांनी तर सत्तेबरोबर मिळणार्‍या सर्व ऐषआरामांचा आणि बडेजावांचा त्याग केला होता. ते कधीही सरकारी राजवाड्यांत राहिले नाहींत. ते नेहमी रेल्वेच्या सर्वात कनिष्ठ वर्गाने प्रवास करत. ते स्वतःच्या साधेपणातच गुंग होते. एक पंचाशिवाय ते कधी दुसरे कांहीं ल्यालेच नाहींत. दिल्लीच्या राष्ट्रपतीभवनाचे रूपांतर गरीबांसाठीच्या इस्पितळात करायचे त्यांच्या मनात होते. भारताच्या नव्या सरकारातील नेत्यांना त्यांनी नम्रतेने रहावे व नम्रतेने राज्य करावे असे बजावले होते. त्यांच्या उदाहरणाचे १०० टक्के अनुकरण करणे नक्कीच अशक्य होते. त्यांच्यावर संपूर्ण विश्वास असणार्‍यांकडूनसुद्धा त्यांच्याइतक्या खडतर, साध्या, आदर्श आणि त्यागपूर्ण जीवनक्रमाची अपेक्षा करणे अशक्यच होते. पण त्यांच्या अनुयायांची प्रचंड संख्या पहाता या मूल्यांचा इतका सहजा-सहजी कसा विश्वासघात केला गेला व ती मूल्ये कशी इतक्या लवकर लुप्त झाली याचे आश्चर्य वाटते.
भारतीय नेत्यांची महात्माजींच्या शिकवणुकीपासून फारकत?
स्वातंत्र्यानंतर भारताने संसदीय लोकशाहीची राज्यपद्धती स्वीकारली आणि जवळ-जवळ अखंडपणे ती आजपर्यंत राबविली. भारताचे पहिले पंतप्रधान बनलेल्या नेहरूंचा संपूर्ण समतेवर आधारलेल्या प्रजासत्ताक राज्यपद्धतीवर नितांत विश्वास होता. भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद हे महात्मा गांधींचे कमिटेड आणि प्रसिद्ध असे भक्त होते. तरीही इंग्लंडचा ध्वज खाली येऊन आपला तिरंगा दिमाखाने फडकल्याबरोबर नेहरूंनी फ्लॅगस्टाफ हाऊस या ब्रिटिश सेनाप्रमुखाचे निवासस्थान स्वतःसाठी निवडले आणि भारताचे व्हाइसरॉय रहात असत त्या जगातील सर्वात मोठ्या राजवाड्यात राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद राहू लागले.
गांधीजींच्या विचारसरणीवरील त्यांची निष्ठा पहाता आणि त्यांना मिळालेली गांधीजींची शिकवण पहाता या दोन नेत्यांना या नव्या घरात जातांना कांहींसे दोषी वाटले असेल तर त्यात नवल नाहीं. पण नव्याने मिळालेल्या सत्तेचे प्रदर्शन करण्याची संधी वापरली नसती तर भारतीय आम जनता बुचकळ्यात पडली असती, तिची निराशा झाली असती आणि कदाचित् तिला तिच्या नेत्यांनी असे सन्याशासारखे रहाणे आवडलेही नसते. सत्तेमागे लागणे हा एक कायदेशीर मार्ग आहे आणि सत्ताधार्‍यांनी आपल्या सत्तेचा डामडौल मिरविण्यात कांहींच गै नाहीं अशीच मानसिक ठेवण आम भारतीय व्यक्तीची असते. स्वतःच्या संस्कृतीनुसार आणि स्वतःच्या परंपरागत राहणीनुसार लोकांच्या मनात वेगवेगळ्या विचारसरणी रुजत असतात. विसाव्या शतकाने सांस्कृतिक आणि ऐतिहासिक परंपरांपलीकडे जाऊन नव्या बेगडी आदर्शांचा जागतिक पातळीवर पुरस्कार केला. एका समान समाजाच्या निर्मितीचे रूसोचे (Rousseau) अठराव्या शतकातील जाहीर आवाहन सर्व जगातील जनतेच्या विविध विचारसरणीवर मात करते असे मानण्यात येऊ लागले. कांहीं ध्येये मान्य करण्यात आलई तर कांहीं संस्थांना अति पवित्र मानण्यात आले. पूर्वीच्या राज्यकर्त्यांनी "आपल्याच भल्यासाठी" दिलेले आदर्शवादी उपदेश स्वीकारण्यात आपलेच नुकतेच स्वातंत्र्य मिळालेले नेते सहज बळी पडत होते. या उपदेशाची परिणामकारकता आपल्या मूलभूत पचनशक्तीवर अवलंबून आहे हे आपल्याला गेल्या कांहीं दशकातील घटनांनी दाखविलेच आहे. कुठल्याही रोगांवर परिणामकारक असलेली विशाल गुणवत्ता असलेली रामबाण औषधें (Broad-spectrum antibiotics) वैद्यकशास्त्रात चालतात पण शेकडों वर्षांच्या प्रतिकाराची आणि प्रतिकारकशक्तीची परंपरा असलेल्या समाजांवर परिणाम करत नाहींत.
परंपरा आणि संस्कृतीचा परिणाम
एकादी राजकीय विचारधारा एकाद्या समाजात कशा प्रकारे प्रत्यक्षात दृढ होईल हे त्या त्या समाजाच्या परंपरांतील आणि ऐतिहासिक अनुभवांतील फरकांवर अवलंबून असते. जी राष्ट्रे सर्वात जास्त काळ लोकशाहीच्या मार्गाने राज्यकारभार करत आहेत अशा राष्ट्रांतील समाजांतसुद्धा हे उघडपणे दिसते. उदा. समानतेच्या आदर्शामुळे फ्रान्समधील राजेशाही संपुष्टात आली. पण इंग्लंडमध्ये लोकशाही आली तरी तिथली राजेशाही नष्ट झाली नाहीं. दोन्ही राष्ट्रे आज लोकशाहीच्या मार्गाने जात आहेत आणि समानतेबाबत त्यांना बांधिलकीही आहे पण इंग्लंडने आपली वंशावर आधारित राजेशाही जपली आहे आणि या सरंजामशाहीमुळे उच्चभ्रूंना वंशपरंपरागत मिळालेल्या वैभवात तिथले सामान्य लोक आनंद मानतात. अमेरिकेतही लोकशाही त्यांच्या जीवनातला एक जोश असलेला भाग आहे पण २०० वर्षें झाली तरी अद्याप एकही स्त्री किंवा कॅथॉलिक पंथीय केनेडींचा अपवाद सोडल्यास Anglo-Saxon [१] समाजातील प्रोटेस्टंट पंथाबाहेरील कुणीही व्यक्ती त्या देशाच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झालेली नाहीं[२]. वेगवेगळी राष्ट्रें आपल्या उद्दिष्टांकडे वेगवेगळ्या मार्गाने जातात आणि त्यांनी निवडलेल्या मार्गावरून आपल्याला त्यांच्या समाजाच्या स्वभावाबद्दल चांगली कल्पना येते. कुठल्या परिस्थितीत, कुठल्या प्रकारच्या परंपरेत ती वाढणार आहे याचा विचार न करता एकादी अतीशय चांगली कल्पना कुठेही लागू होईल अशा गैरसमजात एकाद्या समाजात वापरली तर ती यशस्वी होत नाहीं.
म्हणूनच भारताची समानतेवर आधारित समाजाबद्दलची प्रतिक्रिया विशिष्ठ आणि अद्वितीय अशा भारतीय संस्कृतीच्या आणि परंपरेच्या संदर्भात पहावी लागेल. कदाचित् नेहरू आणि प्रसाद यांना गांधीजींच्या शिस्तप्रिय आणि निर्भय साधेपणापासून दूर जाताना कांहींसे अस्वस्थ वाटले असेल. पण आज त्या दोघांना त्यांनी सुरू केलेल्या प्रथेची चढत्या भांजणीने लीलया झालेली वाढ पाहून धक्काच बसला असता. लखनऊसारख्या प्रादेशिक राजधानीत एकाद्या किरकोळ महत्वाच्या खात्याचा कनिष्ठ संचालकसुद्धा आपल्या सरकारी गाडीचे दिमाखात प्रदर्शन करत असतो. गाडीच्या मागे आणि पुढे नोकरशाहीतील पदक्रमातील (hierarchy) त्याचे उच्च पद जाहीर करणार्‍या जगावेगळ्या पाट्याही लावलेल्या असतात. पाट्या लाल रंगात तर वरची अक्षरें पितळेची! एवढेच नव्हे तर गाडीच्या टपावर आणि बॉनेटवर फिरता दिवा आणि बर्‍याचदा रस्ता मोकळा करण्यासाठी सायरनही लावलेला असतो. मंत्र्याचे महत्व केवळ तो कितींचा पोशिंदा असतो यावरच अवलंबून नसते तर त्याच्या कार्यालयाचे आणि घराचे क्षेत्रफळ, त्याच्या दिमतीला असलेल्या मदतनीसांची संख्या, त्याची गाडी कशी आहे-शुभ्र-सफेत अँबसेडर गाडी हवी, तिच्यावर अनेक एरियल्स हव्यात, फिरता लाल दिवा हवा, गाडीच्या सीट्ससाठी डाग नसलेले पांढरे शुभ्र अभ्रे हवेत वगैरे-आणि किती सुरक्षा कर्मचारी त्याचे रक्षण करायला आहेत वगैरेवरही अवलंबून असते! नोकरशहाच्या टेबलवरचा एकादा टेलीफोन कमी करण्यात आला किंवा त्याच्या नावाच्या पाटीवरील अक्षरांचा आकार लहान करण्यात आला तरीही हे नोकरशहा रुसतात व लहान मुलांसारखे भांडायला कमी करत नाहींत! हे कनिष्ठ मदतनीस, त्यांची साहेब मंडळी आणि मंत्री यांना माहीत असते कीं या सरंजामावरूनच त्यांचे महत्व सर्वांना जाहीर होते!
मंत्र्यांची आणि नोकरशहांची सत्ता-प्रदर्शनाची हौस
अशा तर्‍हेची वागणूक कदाचित सरकारी नोकर्‍यांत आणि नोकरशाहीत जास्त प्रचलित असेल पण अशा आपल्या पदक्रमाबद्दालचा आणि अशा पदांची द्योतक असणारी डामडौलाची प्रतीके, चिन्हे यांचा ध्यास खासगी नोकर्‍यांतही दिसतोच. हजारो वर्षांपूर्वी जातीय व्यवस्थेचा जन्म विशिष्ठ कामानुसार केलेल्या वर्गवारीनुसार झाला होता पण गेल्या कांहीं वर्षांत या जातीय व्यवस्थेचा इतका अधःपात झाला आहे कीं ती एक अतीशय दुराग्रही, सुरचित आणि सुस्थापित प्रणालीच्या सहाय्याने लादलेली जुलुमी प्रथा बनली आहे. या जातीय व्यवस्थेला अधिकृतपणे मान्यता नाही आणि लोकशाहीमुळे मिळालेल्या सत्तेतील सहभागामुळे तिचा गळफास बराच सैल झालेला आहे. (याची चर्चा नंतर आलेली आहे.) पण वेगवेगळ्या स्तरात विभागलेल्या समाजाची मनाची ठेवण रोजच्या व्यवहारात खूपच उघडपणे दिसते. पदक्रमावर आधारलेली रचना बदलत असली तरी भारतीयांच्या मनात खोलवर रुतलेली उच्च-नीचांतील परस्परसंबंधांबद्दलची त्रिकालाबाधित सत्यता आणि नैतिक अनिवार्यता यामुळे उच्चपदस्थांबद्दल आपोआप निर्माण होणारा परम आदर हे एक मानसिक-सामाजिक सत्यच बनले आहे. सत्तेच्या पदक्रमाच्या स्वीकृतीमुळे लोकशाही आणि समानता या आधुनिक कल्पनांच्या अर्थांना आणि त्यांच्या व्यवहारात आणण्याच्या प्रक्रियांना भारतीय रंग दिला गेला आहे.
भारतीय व्यक्तीला आपल्या सत्तेचे प्रदर्शन आणि पदक्रमानुसार असलेल्या त्याच्या स्थानाबद्दलची मान्यता यांच्यात जवळचा संबंध आहे. जेंव्हां एकाद्याची सर्व संपत्ती आणि ऐश्वर्य फक्त तो पदक्रमाच्या कुठल्या स्थानावर विराजमान आहे यावर अवलंबून असेल तर त्या स्थानाचे महत्व आणि त्या स्थानाचे ठामपणे केलेले प्रतिपादन अतीशय महत्वाचे ठरते. स्थानमहात्म्य सर्वांच्या नजरेत भरण्यासाठी त्या व्यक्तीचे स्थान त्याच्या कनिष्ठांच्या कसे वर आहे आणि त्याच्या वरिष्ठांच्या कसे खाली आहे हे सर्वांना दिसले पाहिजे. या सर्व समीकरणात परस्परविरोधी भावना किंवा धरसोड वृत्ती असता कामा नये. जातीय प्रणालीत दोन जातीतील उल्लंघनाला अनुमतीच नसे. पण या जुन्या ताठरपणाचे नियम आता अंधुक होऊ लागले आहेत पण पदक्रमाच्या महत्तेबद्दल असलेला ध्यास आजही आहेच, पण कांहीं ठिकाणी त्या ध्यासात गुंतलेले लोक पूर्वीपेक्षा अधीक वेडेपिसे झालेले दिसतात. पूर्वी स्थानमहात्म्य जन्मावर आधारित असल्याने दीर्घकाळच्या वहिवाटीमुळे सर्वमान्य असे. आज ते स्थान इतर मार्गाने मिळविण्याचे सामर्थ्य जनतेला मिळाले आहे. वर जाण्याचे असे मार्ग आज उपलब्ध झालेले आहेत. त्यामुळे लोकांचा दृष्टिकोन समानतेकडे झुकलेला नाहीं. उलट नव्याने निर्माण झालेल्या अनिश्चितता आणि नव्याने उपलब्ध झालेल्या संधींमुळे पदक्रमात कुणाचे स्थान कुठे आहे याबाबतची संवेदनशीलता फारच वाढली आहे आणि त्यामुळे स्थानाबद्दलचा आणि सत्तेबद्दलचा ध्यास अधीकच धारदार झाला आहे. भ्रष्टाचारसुद्धा आता केवळ संपत्तीसाठी वापरला जात नाहीं. आपल्यासारख्या समाजात प्रत्येक व्यक्तीच्या नैतिक संपत्तीचा सारखेपणा कधीच ठरविला जात नसल्याने प्रत्येक व्यक्ती आपली सत्ता आणि योग्यता ते इतरांच्यावर विचारपूर्वकपणे किती सत्ता गाजवू शकतात यावर ठरविते. भ्रष्टाचार आज पैशाइतकाच सत्तेसाठी केला जातो. आणि समाजातील सत्तास्पर्धेतील चढाओढीचा उन्माद केवळ एकाच गोष्टीमुळे चढतो आणि ती म्हणजे सत्ता नसेल आपली नैतिक योग्यताही ठरविली जात नाहीं आणि भ्रष्टाचाराचा उपयोग अशा सत्तेचा वापर करण्यासाठी केला जातो.
[१] Anglo-Saxon: पाचव्या शतकात जर्मनीतून आलेल्या आंग्लेस, सॅक्सन आणि जूट जमातीचे लोक. यांनी इंग्लंडमध्ये स्वत:चे राज्य स्थापले व ११व्या शतकात नॉर्मन्सकडून पराजय होईपर्यंत इंग्लंडवर राज्य केले.
[२] २००८ साली झालेल्या निवडणुकीत प्रथमच एक स्त्री राष्ट्राध्यक्षपदाच्या खूप जवळ आली (हिलरी क्लिंटन) आणि बराक ओबामा हा पहिला-वहिला अँग्लो-सॅक्सन नसलेलाच काय पण गोरासुद्धा नसलेला पण प्रोटेस्टंट असलेला कृष्णवर्णीय नेता राष्ट्राध्यक्षपदी निवडून आला.

राजकारणभाषांतरविरंगुळा

प्रतिक्रिया

प्रसन्न केसकर's picture

3 Jan 2011 - 5:48 pm | प्रसन्न केसकर

बेडकांच्या राजाची गोष्ट आठवली सुरुवातीचा भाग वाचुन.

केसकरसाहेब,
खरं तर मूळ पुस्तक वाचतानाच मलाही ती कथा आठवली होती आणि मी माझ्या 'टिपां'त त्याबद्दल उल्लेख करायला हवा होता. (Anglo-Saxon, Hillary,आणि Obama यांचा केला आहे त्याच धर्तीवर!)

नगरीनिरंजन's picture

3 Jan 2011 - 6:04 pm | नगरीनिरंजन

चांगले आणि अचूक असे विवेचन.

>>अशा तर्‍हेची वागणूक कदाचित सरकारी नोकर्‍यांत आणि नोकरशाहीत जास्त प्रचलित असेल पण अशा आपल्या पदक्रमाबद्दालचा आणि अशा पदांची द्योतक असणारी डामडौलाची प्रतीके, चिन्हे यांचा ध्यास खासगी नोकर्‍यांतही दिसतोच.

पूर्णपणे सहमत. सत्ता आणि अधिकारांची लालसा हे भारतात तांत्रिक क्षेत्रात स्वतःची प्रॉडक्टस् तयार न होण्याचे एक महत्त्वाचे कारण आहे असे मला वाटते. कामाला लागून पाच वर्षे नाही झाली तोच प्रत्येकाला टीम लीडर किंवा प्रोजेक्ट लीडर व्हायचे असते आणि व्यवस्थापन करायचे असते. या उलट इतर विकसित देशांत १५-२० वर्षं नोकरी झालेले लोकही एका सर्वसामान्य सदस्यासारखे तांत्रिक काम करतात आणि इतक्या अनुभवाच्या बळावर उत्तम दर्जाचे उत्पादन वा नवनवीन कल्पना अंमलात आणतात.

आरंभातच बीज अंताचे, गूढ अटळ ही दैववाणी
दु:ख क्षणाचे हर्ष क्षणाचा, मी तर अळवावरचे पाणी

वरील कविता कुणी लिहिली आहे?
तुमची असेल तर तुम्हाला एक कडक सॅल्यूट, मुजरा!

संजय अभ्यंकर's picture

9 Jan 2011 - 7:50 pm | संजय अभ्यंकर

लेख उशीरा वाचायला घेतला.

न नि, आपले अचूक निरिक्षण!

ज्यांनी जपानी कंपन्यांबरोबर काम केले आहे व ज्यांना त्यांच्या कंपन्यांना भेट देण्याची संधी मिळाली आहे त्यांनी हे पाहिलेच असेल कीं जपानमध्ये (कमीतकमी पोलाद कंपन्यांमध्ये) एक गोष्ट पहायला मिळते कीं अगदी चांगल्यात चांगल्या कंपन्यातही (ज्या अतीशय उच्च विश्वविद्यालयातील सर्वश्रेष्ठ गुण मिळालेले विद्यार्थी नेमतात) पदोन्नती अक्षरशः किती वर्षें काम केले यावर अवलंबून असते. आजची ताजी परिस्थिती माहीत नाहीं पण मी १९७२ ते १९९२ च्या दरम्यान तिथे नेमाने जात होतो आणि सगळीकडे पहिली पदोन्नती मिळायची १४-ते १५ वर्षांनी! ('सुबक ठेंगणी' मॅडम आजची परिस्थिती सांगू शकतील, पण हल्ली त्यांचे दर्शन 'मिपा'वर बर्‍याच दिवसात झालेले नाहीं.) जरा चांगली ओळख झालेले जपानी या 'लष्करी खाक्या'बद्दल (regimentation) माझ्याकडे बोलायचे सुद्धा!
असे असूनही जपानी लोकांनी पोलाद व्यवसायात कुठलाही सांगण्यासारखा नवा शोध लावला नाहीं. पण दुसर्‍यांनी लावलेले शोध जास्त परिणामकारकपणे राबविले!
तेंव्हा जलद पदोन्नतीमुळे असे कांहीं नुकसान होते असे मला तरी वाटत नाहीं!

यशोधरा's picture

3 Jan 2011 - 6:15 pm | यशोधरा

वाचते आहे..

अनुवाद वाचतो आहे. त्याबद्दल तुमच्या चिकाटीला दाद द्यावी तेवढी थोडीच. लहान लहान भागांमध्ये विभागला गेल्यामुळे पहिल्या भागाहून हा भाग अधिक वाचनीय झाला आहे.

आमोद शिंदे's picture

4 Jan 2011 - 2:31 am | आमोद शिंदे

अनुवाद वाचतो आहे.

त्याबद्दल तुमच्याही चिकाटीला दाद द्यावी तेवढी थोडीच.

पिवळा डांबिस's picture

4 Jan 2011 - 6:27 am | पिवळा डांबिस

लहान लहान भागांमध्ये विभागला गेल्यामुळे पहिल्या भागाहून हा भाग अधिक वाचनीय झाला आहे.
नंदनशी सहमत आहे! अशा प्रकारच्या लिखाणात मूलतः संवाद वगैरे नसतात त्यामुळे सलग मोठा एकच भाग हळूहळू इंटरेस्ट गमावतो. काळेकाका, हे नवीन टेकनिक वर्क होतं आहे आमच्यासारख्या एडीडीवाल्यांसाठी!!:)
अनुवाद वाचतो आहे. त्याबद्दल तुमच्या चिकाटीला दाद द्यावी तेवढी थोडीच.
तुमच्या चिकाटीला तर आम्ही कधीच दाद दिलेली आहे.:)
खरंच, सोपं काम नाहीये हे!

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

4 Jan 2011 - 8:20 am | निनाद मुक्काम प...

@Anglo-Saxon:
माझ्या मते हिटलर ला ह्या गोष्टीची कल्पना होती .म्हणून हिटलर ने ब्रिटीश राष्ट्रे फ्रेंच राष्ट्रासारखे खालसा केले नाही.अथवा प्रत्यक्ष सैन्य घुसवले नाही .(ब्रिटीश राजघराण्यात फार पूर्वी एक जर्मन वंशीय येऊन गेला .)
कारण इंग्लिश ताकद त्याच्या आरमारात होती .तर जर्मन हवाई आणि भूदल .
बाकी लेख मस्त झालाय . आणि इंग्रजांनी अनेक दशके आपल्या देशातील राजकारण /समाजकारण /मानसिकता ह्यावर दीर्घ अभ्यास केला .हे त्याच्या अधिकार्यांनी त्यांच्या मायदेशी पाठविलेल्या पत्रातून वेळोवेळी दिसून येते . बाकी शिवाजी महाराजांच्या राज्यभिशेकाचे वर्णन मिळवण्यासाठी .पुरंदरे ह्यांना लंडन गाठावे लागले .तेथे इंग्लिश वकिलाने ह्या प्रसंगाचे वर्णन आपल्या डायरीत लिहिले आहे . ती डायरी पहिली .
(म्हणूनच कदाचित गागा भट्ट ह्यांच्या हस्ते राज्याभिषेक झाला ह्यावर वादंग उठत नाही .कारण विदेशी व्यक्तीस खोटे पाडणे आपल्या देशी साहेबांना जमत नाही .अजून .)

सुधीर काळे's picture

4 Jan 2011 - 8:25 am | सुधीर काळे

वाचकांबरोबर झालेल्या विचारांच्या देवाण-घेवाणीहा परिणाम आहे. तुम्हा वाचकांकडे मी 'ग्राहक' म्हणून पहातो व त्यामुळे तुमच्या सूचनांचे नेहमीच स्वागत असेल. यापूर्वी 'न्यूक्लियर डिसेप्शन' लिहिताना अनेकांनी-विशेषत: मदनबाण आणि विकास पिसाळ या दोघांनी-मला खूप उपयुक्त सूचना दिल्या होत्या व त्यांचा मला खूप फायदा झाला.
असेच कळवत जा ही विनंती!

आमोद शिंदे's picture

4 Jan 2011 - 10:00 am | आमोद शिंदे

मदनबाण आणि विकास पिसाळ या दोघांनी-मला खूप उपयुक्त सूचना दिल्या होत्या व त्यांचा मला खूप फायदा झाला.

हे विकास पिसाळ दिसत नाहीत आजकाल. कुठे आहेत?

माझे असे मत आहे की भारतीय व्यक्तीला दुसरे लोक आपल्याकडे कोणत्या द्रुष्टिने पाहतात हे अत्यंत भावनिकरित्या महत्वाचे वाटते. म्हणजे असे की घरातली खाट मोडली असेल तरी त्यावर चादर झाकून खिडक्यांना रंग देणे हे जास्त महत्वाचे. कारण .. लोक काय म्हणतील ? ...

शेखर-जी,
खरे तर हे पुस्तक म्हणजे एका भारतीयाने भारतीय समाजाचे केलेले निस्पृह पण सुंदर आत्मपरीक्षण आहे. ते पुस्तक वाचताना मला सारखे मी आरशात पहातो आहे कीं काय असेच वाटत होते.

दोनदा उमटल्याने हा प्रतिसाद काढून टाकला आहे!

सहज's picture

5 Jan 2011 - 7:10 am | सहज

वाचतो आहे.

विजुभाऊ's picture

5 Jan 2011 - 12:01 pm | विजुभाऊ

चांगले लिखाण. भारतीय मानस अजूनही राजेशाही जमान्यातच वावरत आहे.
संस्थाने खालसा झाली , राजेशाह्या संपल्या..... लोकानी एम पी एम एल ए ना नवे राजे म्हणून स्वीकारलय.
कोणत्याही अधीकारपदावरील व्यक्तीला आपण " सर" म्हणून संबोधतो.
" सर" ही उपाधी इंग्लंडची राणी बहाल करत असते.
आपण ती सर्वाना अशीच वाटत असतो.
दुर्दैवाने हे आपल्या शिक्षणक्षेत्रातल्या तथाकथीत धेन्डाना सुद्धा ठाऊक नसते.
गुलामगिरीच्या मानसिकतेतून आपण अजून बाहेर आलेलो नाही.
एक राष्ट्र म्हणून अजूनही आपण स्वतःला समजत नाही.
राष्ट्र म्हणून आपल्याला अस्मिता मिळालेलीच नाहीय्ये

सुधीर काळे's picture

5 Jan 2011 - 2:52 pm | सुधीर काळे

विजूभाऊ,
जरा एक वेगळा विचार मांडू इच्छितो!
आपण मराठीत किंवा हिंदीत बोलत असताना भाऊ (विजूभाऊ), भाई (हिंमतभाई), भैय्या (राजूभैय्या) असल्या एतद्देशीय उपाधी वापरतोच. पण आपल्याहून उच्चपदस्थ असलेल्यांना किंवा वडीलधार्‍यांना आपण त्या-त्या भाषेतले आदरार्थी संबोधन वापरतो. उदा. मी माझ्या इंडोनेशियातील वडीलधार्‍या मंडळीना किंवा बॉसला (येथील प्रथेनुसार) पुरुष असल्यास Bapak (पिताश्री) किंवा ती व्यक्ती स्त्री असल्यास Ibu (मातोश्री) असे संबोधतो, Sir असे नाहीं. किंवा उर्दू किंवा हिंदी भाषिकांशी बोलताना तितक्याच सहजपणे 'जनाब' तोंडात येते. मराठी-हिंदीत साहेब किंवा साहब (हे शब्द कुठून आले आहेत कुणास ठाऊक!) वापरतो. खरे ना?
आता याची दुसरी बाजू. माझा हुद्दा जाणणारे किंवा वय ओळखणारे ब्रिटिश नागरिकसुद्धा मला Sir म्हणतात त्यात छद्मीपणाचा अजीबात लवलेशही नसतो.
त्यामुळे गुलामगिरीच्या मानसिकतेतून आपण अजून बाहेर आलेलो नाही हे तुमचे निवेदन बरोबर नाहीं असे मला वाटते.
आज भारतीयांना बाहेर देशी खूप सन्मानाने वागविले जाते. बाहेरदेशी असलेले भारतीय आपल्याला हेच सांगतील!
या उलट गरज लागल्यास मला एकाद्या गोर्‍याला 'फायरिंग' देताना अजीबात चाचरायला होत नाहीं. कारण ते सारे नैमित्तिक (issue-based) असते.
पहा पटते का!