आणि कॉमन मॅन बोलला!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture
३_१४ विक्षिप्त अदिती in जनातलं, मनातलं
14 Aug 2009 - 2:38 pm

हं, कॉमन मॅन हे नाव थोडंसं आठवतंय ना (हल्ली कॉमनमॅनच्या जागी 'कॉनमेन' हाच शब्द एवढ्या वेळा आपण वाचतो की विचारावंसं वाटलं!) काल पद्मविभूषण आर. के. लक्ष्मण यांचा मानसपुत्र, 'कॉमन मॅन'वर आधारित एकपात्री कार्यक्रम पाहिला. लेखक: अनिल जोगळेकर, भाषांतरकारः गौतम जोगळेकर, संगीत: बंकिम आणि बाकी सर्व श्रेय प्रा. अजित केळकर यांचं; पण केळकर म्हणतात सर्व श्रेय आपल्या सगळ्यांमधे असणार्‍या असामान्य सामान्यांचं आणि हे असामान्यत्व चितारणार्‍या कार्टूनीस्ट आर. के. लक्ष्मण यांचं! एकविनोदाच्या अंगाने जाणारा तरीही अंतर्मुख करणारा कार्यक्रम असं याचं वर्णन एका वाक्यात करता येईल. आत्मनिवेदनाच्या रूपात समोर येणारा हा 'कॉमन मॅन' तंत्रज्ञानाची यथायोग्य मदत घेऊन एक तास आपल्याला हसवतो आणि शेवटी जबाबदारीची जाणीवही करून देतो.


अजूनही अनेकांना 'टाईम्स' उघडल्यावर 'यू सेड इट' किंवा 'कसं बोललात' नाही याची जाणीव होत असेल. माझ्यासाठी लहानपणी 'काही विनोदी दिसणारी, म्हणून व्यंगचित्रं' एवढंच त्याचं महत्त्व होतं. राजकारण, समाजकारण वगैरे शब्दांचा अर्थ समजेपर्यंत लक्ष्मण यांनी सदर बंद केलं होतं. आणि त्यानंतरच पंडीत नेहरू, कृष्ण मेनन, इंदीरा गांधी, आणिबाणी, बोफोर्स तोफांचा, चारा, युरीया, घोटाळा वगैरे गोष्टी कळत गेल्या. माझ्या पिढीने खुला बाजार, मुक्त अर्थव्यवस्था वगैरे गोष्टी आधी अनुभवल्या आणि नंतर समजल्या. पण 'कसं बोललात?' पाहून 'कॉमन मॅन'चा चेहरा नक्कीच माहित होता. पुण्यातल्या लोकांना सिंबायसिस महाविद्यालयातला या 'कॉमन मॅन'चा पुतळाही माहित असेल आणि काही मोजक्या लोकांना 'प्राण जाये पर शान न जाये' या चित्रपटातला शेवटी अवतरणारा 'कॉमन मॅन'ही माहित असेल. पण तरीही माझ्या आणि पुढच्या पिढीला या महान व्यंगचित्रकाराची महती कळणं, उमगणं कठीण होतं.

हा कॉमन मॅन बोलत नाही, तो नुसतीच नजर टाकतो, रस्त्यातून चालताना कानावर पडणारे संवाद ऐकतो, गृहिणींनी केलेलं गॉसिपही ऐकतो, भाषणांना गर्दी करतो आणि मुख्य म्हणजे राजकारण्यांच्या दलदलीमधे फसतो. पण तरीही त्याच्या चेहेर्‍यावरचे भाव काहीसांगून जातात आणि त्यामुळे अनेकदा राजकारणी हादरले. पंडीत नेहरुंच्या काळातले 'अनिवासी भारतीय' कृष्ण मेनन, महाराष्ट्रात दारूबंदी करणारे मुंबई इलाक्याचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई, आणिबाणी लादणार्‍या इंदीरा गांधी, त्यांच्या प्रशंसेत खळ न पडू देणारे तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष देवकांत बारूआ, जनता पक्षातले अनेक स्वयंभू नेते आणि मुख्य विदूषक राजनारायण, बोफोर्स तोफांच्या व्यवहारात हात शेकलेले राजीव गांधी, युरिया घोटाळ्यात अडकलेले तत्कालिन पंतप्रधान नरसिंहराव, असे अनेक चेहेरे काही रेघोट्यांनी आर. के. लक्ष्मण यांनी दाखवले; पण टिकून राहिला तो हा सामान्य माणूस! व्यंगचित्रकाराचं काम असतं कोणा एका माणसाची बाजू न घेता सत्य सांगणं आणि ते ही कोपरखळ्या मारत! आणिबाणीच्या काळात जेव्हा अभिव्यक्तीस्वातंत्र्यावर घाला घातला जात होता, तेव्हा तुरुंगात टाकण्याच्या धमक्या मिळत असतानाही लक्ष्मण यांनी खुद्द इंदिरा गांधींकडून शाबासकी मिळवली होती. कॉमन मॅनच्या समस्या त्याही काळात रोज 'टाईम्स'मधे येतच होत्या. चंद्रावर खड्डे आहेत म्हणजे तिथे रस्ते आहेत, याचाच अर्थ तिथे माणसंही आहेत हा विनोद आज आपण (आणि आम्ही खगोलाभ्यासकही) सहजच सांगतो, पण त्यातून व्यंग दाखवणारे लक्ष्मण कधीच सामान्यांचा आवाज बनले होते.

माझ्या आणि पुढच्याही पिढ्यांना या गोष्टी फक्त 'इतिहासा'च्या पुस्तकातूनच कळतील, पण अजित केळकरांच्या कॉमन मॅनने एका तासाच्या आत या गोष्टी दाखवल्या, सांगितल्या. अगदी १९६१ साली हे सदर सुरू झालं तेव्हापासून भारताचा राजकीय आणि काही सामाजिक इतिहास लक्ष्मण यांच्या कार्टून्सच्या आधाराने एका तासात जिवंत झाला. एक चित्र हजार शब्दांचं काम करतं असं म्हणतात, काही रेषांनी बनलेले चेहेरे आणि एखाददोन वाक्यांत टिप्पणी यांच्या सहाय्याने या असामान्य व्यंगचित्रकाराने गल्लीपासून दिल्ली हलवली. बॉम्बेचं मुंबई झालं म्हणून शहराची प्रगती झाली नाही, पण सामान्य मुंबईकराच्या वेदनामात्र टाईम्सच्या पहिल्या पानावर झळकल्या. पन्नास वर्षांपेक्षा जास्त काळ प्रसिद्ध होणारं हे सदर, त्याची खासियत एका तासात संपूर्णपणे दाखवणं अशक्यकोटीतलं काम, पण जोगळेकर-केळकर यांनी निवडक घटनांवर आधारित व्यंगचित्रं निवडून हा संपूर्ण काळ जिवंत केला, आणि तोही एका कुणा पक्षाची, पंथाची, धर्माची बाजू न घेता, एका कॉमन मॅनच्या नजरेतून! भारताच्या राजकारणाबद्दल अगदी मोजकी माहीती असणार्‍या परदेशी लोकांनाही कॉमन मॅनने एक तास खिळवून ठेवलं.

यू ट्यूबवरची कार्यक्रमाची एक झलक.

नाव, गाव, धर्म, पंथ, जात नसलेला अतिसामान्य अवतारातला कॉमन मॅन आता बोलला. आणि बोलला ते आनंददायी नक्कीच नव्हतं. मोरारजी देसाईंना मुख्यमंत्रीपदी असतानाही या कॉमन मॅनचा आवाज बंद करता आला नव्हता, कारण घटनेनेचसर्वांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलं आहे. पण आज मात्र कॉमन मॅनला दु:ख आहे की विध्वंसक लोक, धर्माच्या, जातीच्या, भाषेच्या नावाखाली आज अभिव्यक्ती चिरडून टाकण्याच्या गोष्टी करत आहेत, आणि दुर्दैवाने काही अंशी सफलही होत आहेत. सामान्य माणूस आज महागाई, दुष्काळ यांच्याबद्दल ऐकण्या-वाचण्याऐवजी आज देशात अंदाधुंदी माजवणार्‍या गोष्टी ऐकत आहे. चिमूटभर लोकं आपल्या सर्वांमधे असलेल्या या कॉमन मॅनला वेठीस धरून कॉमन मॅनच्या समस्या सोडवण्याऐवजी आपसांत झुंजवत आहेत. आता पुन्हा वेळ आहे सत्तांध लोकांना त्यांची जागा दाखवण्याची; पण कॉमन मॅनला भीती आहे ती पुन्हा एकदा भारतभूमीमधे हिंसाचार माजू नये. फ्रेंच आणि रश्यन लोकांनी आपापल्या देशांत सत्तांध लोकांविरुद्ध क्रांती केली होती आणि त्याची किंमत अशाच अनेक कॉमन मॅनच्या जीवनाने चुकवली होती. आपल्या भारतभूमीवर असा हिंसाचार माजू नये, असंख्य लोक त्यात बळी पडू नयेत अशीच या कलाकाराची इच्छा आहे. आणिबाणीनंतर इंदीरा गांधींना सत्तेवरून पायउतार करणार्‍या जनतेला पुन्हा एकदा आपल्या कर्तव्याची आठवण करून द्यायची आहे. आणि म्हणूनच कधीही न बोलणारा आर. के. लक्ष्मणांचा मानसपुत्र, जो आपल्या सगळ्यांचा प्रतिनिधी म्हणून गेली अनेक वर्ष टाईम्सच्या पहिल्या पानावर आपल्या दिवसाची सुरूवात करून देत होता, तो 'कॉमन मॅन' बोलला.

अजित केळकर यांच्या वेबसाईटवर या एकपात्रीची कार्यक्रमाची माहिती आहे.

कलासंस्कृतीविनोदइतिहाससमाजजीवनमानरेखाटनप्रकटनअनुभवमाहितीआस्वाद

प्रतिक्रिया

मदनबाण's picture

14 Aug 2009 - 3:03 pm | मदनबाण

छान लेख...
यू ट्यूबवरची कार्यक्रमाच्या दुव्या बद्धल धन्यवाद.
काल इ-टिव्ही मराठी वर लागणार्‍या कॉमेडी एक्सप्रेस या कार्यक्रमात या कॉमन मॅनला रेल्वे विषयक विषयावर बोलताना पाहिले.
(वाचक)
मदनबाण.....

Try And Fail, But Don't Fail To Try
Stephen Kaggwa

विसोबा खेचर's picture

14 Aug 2009 - 3:48 pm | विसोबा खेचर

छान लेख...
यू ट्यूबवरची कार्यक्रमाच्या दुव्या बद्धल धन्यवाद.

सहमत आहे..

(आर के लक्ष्मणचा चाहता) तात्या.

ज्ञानेश...'s picture

14 Aug 2009 - 3:08 pm | ज्ञानेश...

सुंदर आहे लेख.
हा एकपात्री प्रयोग कुठे झाला? पुन्हा होणार आहे का?

"Great Power Comes With Great Responsibilities"

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

14 Aug 2009 - 4:34 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

हा प्रयोग मी काल (१३ ऑगस्टला) 'आयुका'च्या ऑडीटोरियममधे पाहिला. पुन्हा कुठे होणार का कसं याची कल्पना नाही. पण सांगण्यासारखी आणखी एक गोष्ट म्हणजे खुद्द आर. के. लक्ष्मण त्यांच्या सौं.बरोबर तिथे आले होते.
आणि एकपात्री संपल्यावर सर्वप्रथम उभं राहून अजित केळकरांना दाद दिली डॉ. श्रीराम लागू यांनी!

अदिती

विकास's picture

15 Aug 2009 - 3:53 am | विकास

खुद्द आर. के. लक्ष्मण त्यांच्या सौं.बरोबर तिथे आले होते...
आणि एकपात्री संपल्यावर सर्वप्रथम उभं राहून अजित केळकरांना दाद दिली डॉ. श्रीराम लागू यांनी!

अरे वा!

सहज's picture

14 Aug 2009 - 3:18 pm | सहज

गेली ५० वर्षे ह्या कॉमन मॅन ने खरच गाजवुन सोडली. हॅटस ऑफ टू आर के लक्ष्मण! त्यांनी देखील गौरवलेला हा कार्यक्रम नक्कीच चांगला असणार.

सुंदर लेख आहे हो बै!

कॉमन मॅन व सौ. कॉमन मॅन असलेले एक व्यंगचित्र
If she manages to stop smiling for just a moment, we can get an idea of what she looks like!
If she manages to stop smiling for just a moment, we can get an idea of what she looks like!

श्रावण मोडक's picture

14 Aug 2009 - 3:13 pm | श्रावण मोडक

कार्यक्रमाचा परिचय छान.

निखिल देशपांडे's picture

14 Aug 2009 - 4:51 pm | निखिल देशपांडे

कार्यक्रमाचा परिचय छान.
एकदा पहावाच लागेल

निखिल
================================

दशानन's picture

14 Aug 2009 - 4:59 pm | दशानन

+२

असेच म्हणतो...
एकदा कार्यक्रम... बघायचेच !

***

तुझ सम नाही दुसरा ध्वज
तुझ सम नाही दुसरा देश
तुझ्यासाठीच जगणे हेच ध्येय
स्वप्न माझे अर्पावा तुझसाठी हा देह !

अवलिया's picture

14 Aug 2009 - 6:16 pm | अवलिया

असेच म्हणतो...

--अवलिया

मस्त कलंदर's picture

14 Aug 2009 - 6:19 pm | मस्त कलंदर

कार्यक्रमाचा परिचय छान.
एकदा पहावाच लागेल

मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

नंदन's picture

14 Aug 2009 - 11:07 pm | नंदन

सहमत आहे. कार्यक्रमाची ओळख आवडली.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

आर. के. लक्ष्मण यांना मॅगसेसे मिळाले त्याच्या दुसर्‍या दिवशी थोर व्यंगचित्रकार श्री. श्याम जोशी यांचे म. टा. मध्ये एक सुंदर व्यंगचित्र आले होते. माझ्याकडे ते कात्रण आहे. Scan केल्यावर ते देण्याचा प्रयत्न करीन.

आर. के. लक्ष्मण आपल्या केबिनमध्ये काम करीत बसले आहेत. शेजारच्या टेबलवरील वर्तमान पत्रात आर. के. लक्ष्मण यांना मॅगसेसे मिळाल्याची बातमी दिसते आहे. बाहेर त्यांचे अभिनंदन करण्यासाठी अनेक जण अक्षरशः फूल ना फुलाची पाकळी घेऊन उभे आहेत. यात सर्व नेते मंडळी आहेत - इंदिरा गांधी, चरणसिंग, राजनारायण, चंद्रशेखर, मोरारजी देसाई इत्यादी. सर्वजण आपापल्या राजकीय उंचीप्रमाणे श्याम जोशी यांनी काढले आहे.

बाहेर उभा असलेला कॉमन मॅन डोकावून आर. के. लक्ष्मण यांना सांगत आहे "ते रॉयल्टी मागायला आले आहेत."

एका थोर व्यंगचित्रकाराने दुसर्‍या थोर व्यंगचित्रकाराला केलेला हा एक सलाम.

नितीन

कपिल काळे's picture

14 Aug 2009 - 4:26 pm | कपिल काळे

वा वा, हा कार्यक्रम आवर्जून बघायला हवा.

ह्या निमित्ताने आर. कें. ची अनेक कार्टून्स आठवून गेली. लेखही चांगला. धन्यवाद!

(आर के लक्ष्मणचा चाहता) कपिल

विकास's picture

14 Aug 2009 - 4:33 pm | विकास

छान माहीती आहे! त्यांचे मराठीत भाषांतर केलेले (कार्टून्सचे आहेच, आठवणींचे) पुस्तक पण आहे. आत्ता नाव लक्षात नाही. युट्यूबच्या दुव्याबद्दल धन्यवाद (आत्ता त्याच्यावरच तहान भागवावी लागेल!).

बाकी विकीपिडीयावर काही गंमतशीर माहीती/निरीक्षणे कळली ती येथे चिकटवतो:

  1. He has never kept a diary nor worn a wrist watch in his entire life
  2. The Common Man in his cartoons never speaks anything.
  3. The Common Man has even travelled to Antarctica once in a cartoon.
  4. The Common Man speaks once in an early cartoon about Nehru. He tells Nehru even as he doesn't recognize him, "...Don't know all that Sir, but I'm voting for that man...!", pointing to Nehru's statue. (from the book 'Brushing Up the Years')
लिखाळ's picture

14 Aug 2009 - 4:55 pm | लिखाळ

कार्यक्रमाचा परिचय छान करुन दिलात. कार्यक्रम पाहण्याची उत्सुकता आहे.
-- लिखाळ.
दहशतवाद-भौगोलिक-जैविक असे आपत्तीचे प्रकार बदलतात पण सरकारची निष्क्रियता, भोंगळपणा बदलत नाही.

अनामिक's picture

14 Aug 2009 - 5:00 pm | अनामिक

अदिती, कार्यक्रमाची ओळख लेखातून छान करून दिलीस. आता हापिसात असल्याने दुवा उघडत नाही. दुवा आणि कार्यक्रम पाहण्यास उत्सुक आहे.

-अनामिक

ऋषिकेश's picture

14 Aug 2009 - 6:16 pm | ऋषिकेश

अदिती, कार्यक्रमाची ओळख लेखातून छान करून दिलीस. आता हापिसात असल्याने दुवा उघडत नाही. दुवा आणि कार्यक्रम पाहण्यास उत्सुक आहे.

अस्सेच म्हणतो
छान ओळख.. पुन्हा कुठे हा कार्यक्रम आहे कळलं तर कळव

ऋषिकेश
------------------
संध्याकाळचे ६वाजून १५ मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया एक सुमधूर गीत "हसते हसते, कट जाए रस्ते..."

शितल's picture

14 Aug 2009 - 5:21 pm | शितल

अदिती,
कार्यक्रमाची छान माहिती दिली आहेस.
आम्हाला १२ वीत असताना कॉमन मॅन वर एक चॅपटर होता. :)

स्वाती दिनेश's picture

16 Aug 2009 - 7:46 pm | स्वाती दिनेश

अदिती, कार्यक्रमाची ओळख छानच करुन दिली आहेस, कसं बोलतात, यु सेड इट ची आठवण झालीच आणि लक्ष्मणरेखा नावाचं त्यांच आत्मचरित्रपर पुस्तकही आठवलं.
स्वाती
यु ट्युबवरची क्लिपही पाहिली, झलक पाहतानाच वाटले अफाट दिसतो आहे कार्यक्रम, लाइव्ह/डीव्हीडी पहायचा योग कधी येतो आहे त्याची वाट पहाविशी वाटते आहे,
स्वाती

स्वाती२'s picture

14 Aug 2009 - 5:42 pm | स्वाती२

छान लेख. दुव्याबद्दल धन्यवाद.

एकलव्य's picture

16 Aug 2009 - 6:58 am | एकलव्य

धन्यवाद!

मुक्तसुनीत's picture

14 Aug 2009 - 5:43 pm | मुक्तसुनीत

अदिती ! सुरेख परिचय ! मनःपूर्वक धन्यवाद !

२८ जानेवारी १९८०

आजचा दिवस मला साजरा करू दे.

आज आर्. के. लक्ष्मणने लिहिली
आधुनिक भारताची सर्वश्रेष्ठ विद्रोही कविता
अर्धी रेषांत, अर्धी शब्दांत :
"नगरपालिकेने स्वच्छतेपोटी
कचर्‍याचे ढीग इथून हालवले
तर आम्ही भुकेने मरू."

आजचा दिवस मला साजरा करू दे.

कचर्‍यातील अन्नांश उचलून
जिवंत राहण्याचा हा हक्क
आपल्या घटनेत अंतर्भूत आहे का?
तसे नसल्यास,
सर्वजनिक वस्तूची चोरी केल्याबद्दल
आपले सरकार या लोकांवर
फिर्याद घालू शकेल की नाही?
-- हे प्रश्न जाणकारांनी धसाला लावण्यापूर्वी

आजचा दिवस मला साजरा करू दे.

- विंदा करंदीकर

लिखाळ's picture

14 Aug 2009 - 5:52 pm | लिखाळ

ओह्ह्ह्ह !!

-- लिखाळ.
दहशतवाद-भौगोलिक-जैविक असे आपत्तीचे प्रकार बदलतात पण सरकारची निष्क्रियता, भोंगळपणा बदलत नाही.

अमृतांजन's picture

14 Aug 2009 - 6:04 pm | अमृतांजन

आर. के. लक्ष्मण पुण्यात् औन्धमधे वास्तव्याला असायचे २००२-०३ चा काळ असेल. मी जेथे राहयचो त्यासमोरच्या बिल्डींग मधे; अर्थातच नेहमीच ग्यालरीत दिसायचे व अभिवादन करायचे. बरे वाटायचे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

14 Aug 2009 - 6:12 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लेख आवडला !

क्रान्ति's picture

14 Aug 2009 - 6:22 pm | क्रान्ति

मस्तच परिचय करून दिलास ग अदिती कार्यक्रमाचा! झलकही पाहिली. अगदी छान! आता कार्यक्रम प्रत्यक्ष पहायची उत्सुकता आहे.

[कॉमनमॅनची पंखी] क्रान्ति
अग्निसखा
रूह की शायरी

छोटा डॉन's picture

16 Aug 2009 - 11:11 am | छोटा डॉन

आत्ताच ओळख वाचुन वर क्लिपही पाहिली.
कार्यक्रमाची संकल्पना आणि सादरीकरण आवडले, एवढा सुंदर परिचय दिल्याबद्दल अदितीचे आभार ...

पाहु कार्यक्रम पाहण्याचा योग केव्हा येतो ते.

------
छोटा डॉन

प्रमोद देव's picture

14 Aug 2009 - 6:30 pm | प्रमोद देव

वा! अदिती ह्या कार्यक्रमाची ओळख चांगली करून दिलीस.
मात्र अजित केळकर जे म्हणाले....हा कॉम्या मला गावा-गावात,घरा-घरात पोचवायचा आहे ...तर तो त्या त्या प्रादेशिक भाषांमध्ये यायला हवा....नाहीतर फक्त इंग्लीश समजणार्‍या मूठभर लोकांतच तो प्रसिद्ध होईल...आणि मग तो कॉम्या न ठरता स्पेमॅ(स्पेशल मॅन)म्हणूनच ओळखला जाईल.

प्रकाश घाटपांडे's picture

14 Aug 2009 - 6:48 pm | प्रकाश घाटपांडे

सुंदर परिचय करुन दिल्याबद्द्ल ३_१४ विक्षिप्त आदिती यांचे आभार.
(संक्षिप्त)
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

पिवळा डांबिस's picture

14 Aug 2009 - 9:00 pm | पिवळा डांबिस

कॉमन मॅन हा अगदी घरातल्या माणसासारखाच होता...
यू ट्युबवरची चित्रफीत जरूर पाहीन...
एका वेगळ्याच विषयावर लिहिल्याबद्दल अभिनंदन!

Nile's picture

15 Aug 2009 - 12:30 am | Nile

आमच्याबद्दल्च्या कार्यक्रमाची माहीती दिल्याबद्द्ल धन्यवाद. नक्कीच पहायला हवा.

रसिकांनी आर. कें.चा इतिहास वाचावा. मालगुडी डेज-कार आर. के. ह्यांचे लक्ष्मण हे धाकटे बंधु.

अनेक वेळा चपला मिळुनही चालु न पडणार्‍या कॉमनमॅनला सलाम.

--कॉमन मॅन.

मन's picture

16 Aug 2009 - 3:28 pm | मन

करुन दिलीएस कार्यक्रमाची.
कधी झालाच कार्यक्रम इकडं पुण्यात, तर आवर्जुन जाइन.

आपलाच,
कॉमन मॅनोबा

यू ट्यूबवर झलकही पाहिली. प्रत्यक्ष बघायचा योग कधी येईल माहीत नाही पण अशी झलक तरी दिल्याबद्दल आभार.
'यू सेड इट'ने कित्येक वर्षे हसवले, अंतर्मुख केले होते त्याची आठवण झाली.

(कॉमनमॅन)चतुरंग

लवंगी's picture

16 Aug 2009 - 5:42 pm | लवंगी

पेपर उघडला कि पहिल कॉमनमॅन काय म्हणतोय हे बघितल्याशिवाय पेपर चाळला नाहि. नक्कि नक्कीच पहायला हवा हा कार्यक्रम.

प्रभाकर पेठकर's picture

16 Aug 2009 - 11:08 pm | प्रभाकर पेठकर

सुंदर लेख. अभिनंदन.
आर. के. ... एक प्रतिभासंपन्न व्यंगचित्रकारास प्रणाम.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

17 Aug 2009 - 9:26 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

अजित केळकर यांना मिपाची लिंक पाठवली होती. त्यांनी इमेलमधे मुंबईमधल्या दोन शोजची माहिती दिली आहे.

Wed.19th August 2009 at 7-00p.m. at Sathaye College, Vile Parle(East)

Sat.22nd August at 7-00p.m. at the NCPA Experimental Theatre.

अदिती

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

30 Sep 2009 - 12:01 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

जुना धागा उकरून काढल्याबद्दल क्षमस्व.

श्री. अजित केळकर यांनी त्यांच्या पुढच्या कार्यक्रमांची माहिती कळवली आहे, ती पुढीलप्रमाणे:

स्थळ: एस.एम. जोशी ऑडीटोरियम, गंजवे चौक, पत्रकार भवनाजवळ, नवी पेठ, पुणे
"R.K.Laxman's Common Man"- in English on Saturday 10th October at 7-00 P.M.

"गडकरी ते मतकरी", रविवार, ११ ऑक्टोबर, सकाळी ११ वाजता.

दोन्ही कार्यक्रमांची तिकिटे ८ ऑक्टोबरपासून सकाळी १० ते १२ मधे आणि संध्याकाळी ५-७ या वेळात उपरोल्लेखित ठिकाणी उपलब्ध आहेत. फोनवर तिकीटे बुक करण्यासाठी ८ ऑक्टोबरनंतर 09819253511या नंबरवर संपर्क साधावा.

(तात्या, अजित केळकर यांनी स्वतःच इथे लिहीण्याचा प्रयत्न केला, पण पूर्वपरवानगीशिवाय खाते उघडता येत नसल्यामुळे त्यांनी इमेल करून कळवले आहे. यासाठी काही करता येईल का?)

अदिती