देखणं चेन्नई सेंट्रल

पराग१२२६३'s picture
पराग१२२६३ in जनातलं, मनातलं
13 Oct 2023 - 2:32 pm

MGR Chennai Central

पूर्वीच्या मद्रास प्रांताची राजधानी असलेलं चेन्नई महानगर संपूर्ण दक्षिण भारताचं प्रवेशद्वार म्हणून ओळखलं जात असे. अतिशय प्राचीन आणि समृद्ध संस्कृतीचा वारसा जपणाऱ्या अनेक खुणा या शहरात आजही पाहायला मिळतात. चेन्नई शहराच्या इतिहासाची ओळख त्यातून नव्या पिढीला होत असते. अशातीलच एक, वसाहतकाळात चेन्नईमध्ये उभारण्यात आलेली अतिशय देखणी वास्तू म्हणजे चेन्नईतील मुख्य रेल्वेस्थानकाची म्हणजे चेन्नई सेंट्रलची इमारत. आज या स्थानकाचं अधिकृत नाव पुरट्चि तलैवर डॉ. एम. जी. रामचंद्रन चेन्नई सेंट्रल असं आहे. आज हे स्थानक चेन्नई शहराला देशाच्या कानाकोपऱ्याशी जोडते. या स्थानकात आता 17 फलाट असून त्यातील 5 उपनगरीय गाड्यांसाठीचे आहेत. या स्थानकातून आज 100 पेक्षा जास्त मेल/एक्सप्रेस तसंच उपनगरीय गाड्यांची इथे ये-जा असते. त्यामध्ये काही ऐतिहासिक, तर काही अत्याधुनिक रेल्वेगाड्यांचाही समावेश आहे. त्यातून सुमारे 6,50,000 प्रवासी दररोज प्रवास करत आहेत.

दक्षिण भारतातील पहिला लोहमार्ग 1 जुलै 1856 ला मद्रास आणि वालाजाह रोड (अर्कोट) या दरम्यान सुरू झाला. 63 मैल लांबीचा तो लोहमार्ग मद्रास रेल्वे कंपनीनं वाहतुकीसाठी खुला केला होता. ती पहिली रेल्वेगाडी रोयापुरम रेल्वेस्थानकावरून सुटली होती. त्यावेळी चेन्नई सेंट्रल स्थानक अस्तित्वात नव्हते. रोयापुरम स्थानकावरचा वाहतुकीचा वाढता ताण लक्षात घेऊन चेन्नई सेंट्रल उभारलं गेलं 1873 मध्ये. त्याचवेळी उभारली गेलेली इमारत आता 150 वर्षांची होऊन गेलेली असली तरी आजही आपलं लक्ष वेधून घेते. या आकर्षक इमारतीचं आरेखन जॉर्ज हार्डिंग या ब्रिटीश वास्तुतज्ज्ञानं केलेलं आहे. ही इमारत आज चेन्नई शहराची सर्वात महत्वाची ओळख बनली आहे.

मद्रास सेंट्रल स्थानकाला दक्षिण भारतातील महत्त्वाच्या स्थानकाचा दर्जा मिळाल्यामुळे पुढील काळात या स्थानकातून नवनव्या रेल्वेगाड्या सुरू होऊ लागल्या आणि प्रवाशांची संख्याही वाढत निघाली. परिणामी या स्थानकात आवश्यक सुधारणा आणि स्थानकाचा विस्तार करण्याचा निर्णय मद्रास रेल्वे कंपनीनं घेतला. त्यानुसार 1900 मध्ये या स्थानकाचं नुतनीकरण पूर्ण झालं आणि रोयापुरम स्थानकावरच्या लांब पल्ल्याच्या गाड्याही चेन्नई सेंट्रलकडे स्थानांतरित करण्यात आल्या.

लाल-पांढऱ्या रंगातील चेन्नई सेंट्रलच्या दुमजली टुमदार इमारतीला मध्यभागी मुख्य मनोरा, तर इमारतीच्या चारही कोपऱ्यावर छोटे मनोरे आहेत. मुख्य मनोऱ्यावर चारही दिशांना लावलेल्या घड्याळ्यांच्या टोल्यांचा ठराविक वेळानंतर परिसरात घुमणारा आवाज येणाऱ्या-जाणाऱ्यांचं लक्ष त्या घड्याळांकडे वेधतो. या इमारतीत दुसऱ्या मजल्यावर विविध कक्ष आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळात या कक्षांचा वापर प्रामुख्याने रेल्वेने चेन्नईला आलेल्या आणि इथून पुढच्या प्रवासाला जाणाऱ्या ब्रिटीश अधिकाऱ्यांसाठी विश्रामगृह म्हणून होत असे. म्हणूनच या इमारतीतील जिन्यांची रचनाही प्रशस्त केलेली आहे.

चेन्नई सेंट्रल स्थानकात सुरुवातीला 6 फलाट उभारले गेले होते. त्यांच्यावर उन-पावसापासून प्रवाशांचं संरक्षण करण्यासाठी शेड उभारण्यात आलेल्या आहेत. या जुन्या पद्धतीच्या शेड्स आजही तिथं पाहायला मिळतात. पूर्वी रेल्वेगाड्या 7 डब्यांच्या असल्यामुळं सगळे डबे या शेड्सखाली मावत होते. पण आता या स्थानकातील अनेक फलाट 26 डब्यांच्या गाड्या उभ्याराहू शकतील इतके मोठे बनवण्यात आले आहेत. त्यामुळं जुन्या शेड्सच्या पुढे नव्या शेड्स घालावे लागले.

चेन्नई सेंट्रलहून आज भारतातील सर्व प्रमुख शहरांसाठी रेल्वेगाड्या सुटतात. इथून सुटणाऱ्या रेल्वेगाड्यांमध्ये राजधानी, शताब्दी, दुरोंतो, जनशताब्दी, उदय, हमसफर आणि वंदे भारत अशा प्रतिष्ठीत अतायधुनिक गाड्यांचा समावेश आहे. त्याचवेळी ग्रँड ट्रंक एक्सप्रेस, चेन्नई-हावडा मेल, बेंगलोर मेल, मुंबई मेल यासारख्या ऐतिहासिक रेल्वेगाड्याही या स्थानकातून सुटतात. ग्रँड ट्रंक एक्सप्रेस तर भारतातील पहिली एक्सप्रेस आणि सर्वात लांब पल्ल्याची रेल्वेगाडी ठरली होती. ती सुरुवातीला मेंगळुरू ते पेशावरदरम्यान धावत होती. ऐतिहासिक चेन्नई सेंट्रलच्या इमारतीत आज प्रवाशांसाठी फास्टफूड आणि इंटरनेट सेंटर्स, शॉपिंग मॉल, संगणकीकृत तिकीट यंत्रणा यासारख्या अनेक सुविधा पुरवण्यात आलेल्या आहेत.

लिंक
https://avateebhavatee.blogspot.com/2023/10/blog-post_13.html

संस्कृतीइतिहासमुक्तकप्रवासप्रकटनआस्वादसमीक्षालेखअनुभवविरंगुळा

प्रतिक्रिया

चौथा कोनाडा's picture

14 Oct 2023 - 2:38 pm | चौथा कोनाडा

सुंदर ओळख ! खरंच देखणं आहे चेन्नई सेण्ट्रल !
चेन्नईत डेप्युट असताना चेन्नई सेण्ट्रलला ५-७ वेळा जाणं झालंय पण वेळे अभावी तिथला परिसर निवांत पणे न्याहाळणे, भटकणे हे काही जाणे झाले नाही