जुन्या चहाची नवीन उकळी
जुन्या चहाला पुन्हा नव्याने उकळी आणू,
दात नसू दे, चणे खायला कवळी आणू!
अंदर नंगे बाहर चंगे सगळे येथे
ज्ञान पाजण्या कफनी थोडी ढगळी आणू!
ढंग, लहेजा, भाषा आपली आतषबाजी,
माळ लवंगी, बॉम्ब लक्षुमी-सुतळी आणू!
दुनियेला या कसले सोने लागुन गेले?
आपण आपली बाळ बाहुली (बेबी डॉलही) पितळी आणू!
गूण लागला नाही तरिही वाण लागु दे
ढवळ्या-पवळ्यासाठी ढवळी-पवळी आणू !
कृष्ण व्हायचे आहे पण वाजेना पावा,
दह्या-दुधा-लोण्याला शोधुन गवळी आणू !
~मनमेघ