संघटनापालट-2

अन्वय's picture
अन्वय in जनातलं, मनातलं
25 Oct 2009 - 8:53 pm

राज आणि काका बरेच दिवसांनी भेटत होते. बोलत होते. त्यामुळे बराचवेळ दोघे एकमेकांना डोळे भरून पाहात होते. नि:शब्द निरव शांतता त्या भव्य दिवाणखान्यात दाटून राहिली होती. मदतनीस आत निघून गेला होता.
"काय म्हणतेय तब्येत?'' त्या शांततेत राजचा स्वर घुमला.
"अजून ठणठणीत आहे. तू बघतोच आहेस.'' काका उपरोधाने बोलले.
कधीकाळी आपल्या आवाजानं भल्याभल्यांची भंबेरी उडवणाऱ्या काकांचा आवाज थकल्याचं राजला स्पष्टपणे जाणवत होतं. त्यांना बोलताना मधेमधे धापही लागत होती. त्यामुळं राज काळजीच्या स्वरात म्हणाला,
"काका त्रास होत असेल, तर मला केवळ तुमच्यासमोर बसून राह्यलाही आवडेल हं.''
"अरे बाळा, आम्ही तुला इथं काय आमचं बघायला बोलावलं का तोंड. एक काम कर तिथे त्या फोनजवळ बेल आहे. ती दाब जरा.''
राजनं बेलची कळ दाबली. तसा मदतनीस पळतच दिवाणखान्यात येऊन उभा राहिला.
"हे बंघ सूनबाईंना बोलावून आण जरा इकडे. आणि दादू आलाय का? असेल तर त्यालाही बोलावलय म्हणावं.'' काकांचं फर्मान घेऊन मदतनीस आत गेला.
थोड्याच वेळात दादूची पत्नी म्हंजे मोठ्या सूनबाई दिवाणखान्यात आल्या. वहिनीसाहेब आणि त्यांनी एकमेकांकडे पाहून औपचारिक स्मित केलं. पुन्हा काहीवेळ शांतता.
"हिला घेऊन जा आत आणि दोघीही जेवणाचा फक्कड बेत करा आमच्यासाठी,'' वहिनीसाहेबांकडे हात करीत काका म्हणाले.
"काय करू स्वयंपाक,'' सूनबाईंनी विचारलं.
"अगं, दोन वाघ एकत्र आलेत. ते काय गवत खाणारये काय?'' काकांच्या या वाक्‍यानं दिवाणखान्यात हशा पिकला.
वहिनीसाहेब आणि सूनबाई दोघीही आत निघून गेल्या. त्यापाठोपाठ मदतनीस गेला. आता त्या भव्य दिवाणखान्यात केवळ काका-पुतण्याच राहिले होते. दोघेही पुन्हा एकमेकांकडे बघत राहिले. मूकपणे.
काकांनी त्या मूकसंवादाला वाचा फोडली.
"बोला राज. काही तरी बोल. आतापर्यंत मी बोलत आलो आहे. आता तू बोल.''
"काका तुमच्या एका अक्षरालाही माझा आक्षेप नाही. त्याला प्रत्युत्तर मी देणारच नाही. अगदी पूर्वीपासूनच मी हे बोल्तो आहे.''
"मला माहित्येय तू बोलायचे टाळारेस. पण तू बोलायलाच हवे. मी खूप बोललो आहे. त्यामुळे तुला काय वाटलं असेल, तुझ्या काळाजाला किती घरे पडली असतील हे इतरांपेक्षा मी जास्त ओळखू शकतो राज.''
"काका, नका करू आग्रह. मला नाही बोलायचं काही.''
"अरे पोटचं लहान पोरदेखील आईचा राग आला, तर तिला चापटी मारतं. तू खूप संयम राखला. आता प्रतिक्रिया उमटायलाच हवी. आतल्या आता झुंजण्यापेक्षा भावना मोकळ्या कर. आज तू बोलणारेस आणि मी ऐकाणारेय.''
काकांच्या या आपुलकीतल्या आदेशानं राज गहिवरला. काकांचं आपल्यावर अजूनही प्रेम असल्याचं पाहून तो सुखावला. त्याच्या तोंडातून आपसूकच खदखद बाहेर पडू लागली.
"काका असं का झालं. माझं कुठं चुकलं. तोही तुमचाच आणि मीही तुमचाच आहे. ब्लड इज थिकर दॅन वॉटर असं म्हणतात. मग हे रक्त पाण्यासारखं पातळ का झालं. या घरातले सगळे असे का वागले माझ्याशी. आपल्या माणसाशी संवाद करण्यापेक्षा परक्‍यांची कानभरणी इथं मोलाची वाटली. हे थांबविता आलं नसतं का. तुम्हाला ते का जमलं नाही, काका?'' राज भावूक झाला होता.
"प्रत्येकवेळी मलाच दोष दिला गेला. मी विश्‍वासघातकी, पाठीत खंजीर खुपसणारा, अशी शेलकी विशेषणे मला लावली गेली. पण माझं तोंड दाराकडं व्हावं, अशी परिस्थिती या घरात कुणी निर्माण केली. एकवेळ तुम्ही स्वत: मला विश्‍वासघातकी म्हटलं असतं, तर मला चाललं असतं. पण मला खात्री आहे, तुम्ही ते कधीही करणार नाही. तरीही असं वाटतं की तुम्ही या सगळ्या गोष्टी थांबवू शकला असतात. पण नाही केलं तुम्ही ते. ही मुकसंमतीच म्हणायची का?''
राजच्या या वाक्‍यानं काक अस्वस्थ झाले. उद्विग्न होत म्हणाले,
"राज, मी घडवलंय तुला. कुठलाही शिल्पकार आपल्या कलाकृतीचे भंजन करेल का. कोणताही चित्रकार आपल्या सुंदर चित्राला काळा रंग फासेल का? मग मीच घडविलेली मूर्ती मी तरी कसा फोडून टाकेन?...''
--
काकांच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या दाट झाल्या होत्या. हात थरथरत होते. आवाजातही कंप होता. राजला त्यांनी मनमोकळं बोलतं केलं होतं, याचं समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होतं.
"राज, मी गप्प होतं म्हंजे षडयंत्राला माझी मूकसंमती होती असे नाही. पण काही गोष्टी समजूनही मी गप्प राहिलो ही माझी चूक होती. दादूला दरडवायला हवं होतं. पण ते नाही जमलं मला. माणूस आहे ना मी. त्याला नाही दुखावता आलं मला. तो एकटाच राह्यलाय ना माझ्याजवळ. तू तिकडे दुसरीकडे. त्याचाच आधार होता मला. तोही दूर जाईल, अशी भीती वाटत होती. हे या वयात पेलणारं नव्हतं. म्हणूनच त्याला काही बोलता नाही आलं.''
काकांना आपल्या चुकांची कबुली आपल्यासमोर द्यायची होती. त्यामुळेच त्यांनी आपल्याला बोलावलं. बोलतं केलं आणि स्वत:ही बोलते झाले. हे एव्हाना राजच्या लक्षात आलं होतं...
क्रमशः

राजकारणविरंगुळा