काळजात (जनरल पब्लिक याला कॉलेज म्हणते!) असताना 'अर्न अँड लर्न' करत असल्याने काळजातल्या कार्यक्रमांमध्ये भाग घेण्याचा जरा कमीच चान्स मिळायचा पण तरीही वेळ काढून शेवटच्या वर्षी सांस्कृतिक कार्यक्रमातल्या अंताक्षरी खेळात भाग घेतला होता. प्रोफेसर विरुद्ध विद्यार्थी असा सामना होता. खेळतखेळत मी अंतिम फेरी गाठली आणि त्यात सामना टाय झाला. खुद्द काळजाचे प्रिन्सिपलच होते विरुद्ध! टायब्रेकर फेरी होती.. आर या पार.. एक शब्द देणार होते जो आपण म्हणायच्या असलेल्या गाण्याच्या पहिल्या दोन ओळीत येणे अपेक्षित होते. काळजातली (कॉलेज या अर्थाने नाही हो!) धडधड वाढली होती...
धडधड आणिक वाढवणारी नको ती भलामण लावून देत शेवटी एकदाचा शब्द ऐकू आला 'हंस'! मी आणि सर जवळपास एकाचवेळी सुरू झालो आमच्या गाण्यांनी.. त्यांचे होते 'दो हंसोका जोडा बिछड गयो रे..' तर माझे होते 'ओ हंसनी, कहा उड चली..'! दिलखेचक शब्दांमुळे की गाण्याच्या तालामुळे किंवा काय माहिती नाही पण सर्वांनी माझेच गाणे उचलून धरले आणि अख्खा हॉल अगदी सरांसकट तेच गाणे म्हणायला लागला. धुंद करणारा अनुभव होता अगदी! स्पर्धेच्या पंचांचा निकाल अर्थातच माझ्याविरुद्ध गेला कारण माझ्या गाण्यात 'हंस' नाही तर 'हंसनी' आली होती!!!
मंचावरून खाली उतरून पुढचे कार्यक्रम बघण्यासाठी प्रेक्षकांमध्ये जाऊन बसायला निघालो तेव्हा सरांनी कौतुकाने म्हटले,"इतकावेळ खेळताना एकही चूक केली नाहीस, मग आता शेवटच्या क्षणीच कशी काय चुकलीस तू?"
रंगेहाथ पकडणाराच प्रश्न होता तो.. गोरीमोरी होऊन मी फक्त 'जीवनतालमें भटक रहा रे मेरा हंसा' इतकेच हलक्याने गायले. सर खळखळून हसतच होते कितीतरी वेळ मग काहीवेळाने म्हणाले,"न जाणो मलाही या पोरीने युनिव्हर्सिटीतून बार केले तर.. या कल्पनेने घाबरला असणार तो तुला म्हणून बसला असेल भटकत..!" आता दिलखुलास हसण्याची वेळ माझ्यावर आली होती.
प्रतिक्रिया
23 Oct 2009 - 1:10 pm | अवलिया
कुठेही नी आल्याने गडबड होते हा सार्वत्रिक अनुभव असावा.
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
25 Oct 2009 - 1:08 pm | शक्तिमान
=)) =)) =)) =)) =))
काय शॉट मारला आहे नाना!
23 Oct 2009 - 2:02 pm | ज्ञानेश...
धाग्याचे नाव वाचल्यावर वाटले- विलासराव देशमुख आणि सुशीलकुमार शिंदे यांच्याबद्दल काही असावे!
"Great Power Comes With Great Responsibilities"
23 Oct 2009 - 2:09 pm | प्रमोद देव
की,जुन्या हंस दिवाळी अंकाबद्दल काही असावे. ;)
अवांतर: एक घडलेला विनोद.
पुस्तकात लिहिलेले होते... हंसा आणि हंसवा. ते एक विनोदी चुटक्यांचे सदर होते.
प्रत्यक्षात वाचणार्याने त्यावरील अनुस्वारासकट ते वाचले....वाचून पाहा. :))
कुणी निंदा,कुणी वंदा!
आम्ही जोपासतो
चाली लावण्याच्या छंदा!!
24 Oct 2009 - 3:15 pm | विश्वजीत
हाहाहाहा
25 Oct 2009 - 7:04 am | निमीत्त मात्र
कॉलेजला 'काळीज' म्हणणारे हे 'जनरल पब्लिक' नक्की कुठल्या प्रांतातले?
म्हणजे काय ते समजले नाही.
25 Oct 2009 - 8:58 am | शाहरुख
जनरल पब्लिक काळजाला कॉलेज म्हणते असे धागा-लेखिकेचे म्हणणे आहे.
मलाही धागा समजून घेण्यासाठी अधिक स्पष्टीकरण वाचायला आवडेल.
25 Oct 2009 - 10:37 am | वेदश्री
>कॉलेजला 'काळीज' म्हणणारे हे 'जनरल पब्लिक' नक्की कुठल्या प्रांतातले?
ओळखा पाहू!
>"न जाणो मलाही या पोरीने युनिव्हर्सिटीतून बार केले तर.. या कल्पनेने घाबरला असणार तो तुला म्हणून बसला असेल भटकत..!"
>म्हणजे काय ते समजले नाही.
दोन विद्यार्थी आणि एक प्रोफेसरना युनिव्हर्सिटीत बार करण्यात (बार करणे म्हणजे युनिव्हर्सिटीतल्या कुठल्याही कॉलेजमध्ये शिका-शिकवायला संधी मिळणार नाही असे) पुढाकार घेतला होता. तशी लायब्ररी, लॅबोरेटरी आणि क्लासच्या बाहेर कुठल्या गोष्टीच्या जास्त भानगडीत पडायला जायचे नाही पण अगदीच डोक्यात गेले तर छोट्यामोठ्या कारणांसाठी शिक्षा द्यायला माझी गँग स्वतःतच पूर्णपणे समर्थ होती!
25 Oct 2009 - 11:19 pm | निमीत्त मात्र
स्पष्टीकरणाबद्दला आभारी आहे. पण बार की डीबार? मला वाटतय ह्याला डीबार करणे म्हणतात. आणि ह्या सगळ्याचा हंस, अंताक्षरी ह्यासगळ्याशी काय संबंध आहे ते समजले नाही. 'विश्वजीत' ह्यांना ते समजलेले दिसते त्यांनी समजावून सांगितले तरी चालेल.
25 Oct 2009 - 8:47 am | प्रशांत उदय मनोहर
वा वा वा! मस्त.
"विद्यार्थी विरुद्ध अध्यापक" अंताक्षरीच्या आठवणीने अंमळ हळवा झालो. पुणे विद्यापीठात रसायनशास्त्रात एम.एससी. करतअसताना रसायनशास्त्रविभागातले शिक्षक + शिक्षकेतर कर्मचारी विरुद्ध विद्यार्थी अशी अंताक्षरी झाली होती.
गेलेऽऽऽऽ ते दिन गेले.
आपला,
(नॉस्टॅल्जिक) प्रशांत
---------
फळाची अपेक्षा ठेवू नये...ते विकत घ्यावे किंवा घरात उगवावे.
:?
माझा ब्लॉग - लेखणीतली शाई
25 Oct 2009 - 11:16 pm | विश्वजीत
भन्नाट किस्सा.
आणखी असेच भन्नाट किस्से सांगा ना.
26 Oct 2009 - 9:08 am | shweta
खरच वेदश्री,
जरा मनावर घे आणि अजुन असेच किस्से लिहित रहा.
जुन्या आठवणी जाग्या होतात.