... आमचा जन्मसिद्ध हक्क !
`अध्यक्ष महाशय, पुज्य गुरुजनवर्ग आणि माझ्या प्रिय विद्यार्थीमित्रांनो,... स्वराज्य हा माझा जन्मसिध्द हक्क आहे आणि तो मी मिळविणारच, अशी सिंहगर्जना करून ब्रिटिश सरकारला हादरवून सोडणाया नरकेसरी लोकमान्य टिळकांचा जन्म, ज्याप्रमाणे एखाद्या चिखलात सुंदर कमळ उगवावे त्याप्रमाणे रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिखली या गावी झाला... त्यांच्या वडिलांचे नाव'...
... डोळे मिटून आणि मुठी घट्ट आवळून मागेपुढे झुलत मी टिळक पुण्यतिथीच्या दिवशी आमच्या कोकणातल्या गावातल्या शाळेत भाषणाला सुरुवात केली आणि `टिळकांचा जन्म चिखली या गावी झाला' या वाक्याशी येताच माझी गाडी गडबडली... टिळकांचा जन्म चिखलीत झाला, तर रत्नाइरच्या टिळक आळीत त्यांचे जन्मस्थान कसे, हा प्रश्न नेमका भाषणाच्या वेळी माझ्या डोक्यात वळवळला आणि मी पुरता भांबावून गेलो... कपाळावर घाम आलाय असं वाटून मी मुठ सोडून हात कपाळाकडे नेला... वळलेला तळवाही तोवर ओला झाला होता... मग तर मला काहीच सुचेना!
... `एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो... जय हिंद, जय महाराष्ट्र...' कसंबसं एवढं बोलून मी जागेवर येऊन बसलो, आणि टाळ्यांचा कडकडाट झाला... का ते मला अजून उमगलेलं नाही. लोकमान्यांचा जन्म नेमका कुठे झाला याचा शोध घ्यायचा मी नंतर प्रयत्नच केलेला नाही. कारण, त्यांनी स्वराज्यावर जन्मसिद्ध हक्क सांगितला म्हणजे ते नक्की रत्नांग्रीतच जन्मले याविषयी माझ्या मनात नंतर शंकाही उरलेली नाही. त्यामुळे उलट आता टिळकांच्या जन्मस्थानाविषयी कुणाशीही वाद घालायचीही गरजच नाही... कारण, रत्नारीच्या मातीवर आमचा जन्मसिद्ध हक्क आहे... त्यासाठी कोर्टात खेटे घालावे लागले तरी पर्वा नाही... आमच्या कितीतरी पिढ्या त्यातच संपल्यात...
`वादे वादे जायते तत्वबोध:' ही म्हण माहीत नसली, तरी नकळत तिचं तंतोतंत पालन करणारा कुणी तुम्हाला भेटला, तर `तुम्ही रत्नारीचे का', असा प्रश्न तुम्ही बिन्धास्तपणे त्याला विचारा... या प्रश्नाला होकारार्थी उत्तर मिळणार नाही... पण, `तुम्ही कसं ओळखलंत?' असा प्रतिप्रश्न आला, की तुमचा अंदाज खराय, याचा निम्मा पुरावच तुम्हाला मिळेल... कारण, प्रश्नाचं उत्तर द्यायचं हा आमचा स्वभावच नाही. प्रतिप्रश्न करून प्रश्नकर्त्याला निरुत्तर करायचं, हाही आमचा एक जन्मसिद्ध हक्कच आहे... `केवढा उंच झालायस रे... तुझं वय काय?' असं सहज कुंणाला विचारलंत, आणि `तुमचा काय अंदाज, किती असेल?' असा प्रतिप्रश्न आला, की, आमच्या मातीचा तो कस अजूनही तिळमात्र कमी झालेला नाही याची खात्री पटते आणि अभिमानानं ऊर भरून येतो...कोकणाच्या लाल मातीत रंगलेला, सागराच्या गाजेत रमलेला, `सड्या'वरच्या पारावर गप्पा मारत दिवेलागणीची वाट पाहाणारा कुणी दामले, लेले, नेने असो, नाहीतर पाठारावरच्या पाखाडीत राहाणारा कुणी सद्या, बुध्या, रावज्या, धोंड्या असो- प्रत्येकाच्या अंगात रत्नांग्रीचंच रक्त सळसळून वाहात असतं...
`काय रे बुध्या... वई नीट घट्ट बांधलीयेस ना?' असा सवाल संध्याकाळी पैसे हातावर ठेवताना एखाद्या सदुनानांनी विचारलाच, तर, `बगा हल्लवन...' असंच उत्तर सदुनानांना अपेक्षित असतं. त्यात `इकडेतिकडे' झालं, तर बुध्याचं कायतरी बिनसलंय, हे कुणी सांगायची गरज नसते.
`देवावरचं फूल उचलून' बोलायची तयारी असलेला आत्मविश्वास नसानसात भिनलेला, दोन अक्षरांपेक्षा जास्त अक्षरं उगीचच आडनावात `फुकट' घालवायची नाहीत असा ज्यांचा बाणा, ती माणसं बहुधा रत्नांग्रीत येऊन पहिल्यांदा स्थायिक झाली असावीत... त्यांच्यामुळेच `रत्नागिरी'चं `रत्नांग्री' झालं, आणि गावाच्या नावातलं अर्धं अक्षर वाचलं...
`परवडत नाही' असं तोंडानं उच्चारणं, म्हणजे, शब्द वाया घालवणं... पण त्याच हिशेबापायी अनेक उंबरठ्यांमध्ये येणारा गणपती दीड दिवसांनी `माघारी' जातो, असं म्हणतात... या दीड दिवसांचीसुद्धा काटकसर करून हा गणपती `दीड दिसां'चा केला, की `व' वाचतो... तेवढा एक `व', वाक्यात दुसरीकडे कुठेतरी उपयोगी पडू शकतो ना?... गणपती ही बुद्धीची देवता आहे. इतरांना दहा दिवसांत तो जितकी बुद्धी देतो, तेवढी मिळवण्यासाठी आमाला दीड दिवस पुरत असेल, तर उगीच दहादहा दिवस कश्याला वाया घालवायचे त्याचे?... असाही एक विचार त्यामागे असतोच.
अश्याच सणासुदीच्या दिसांत, घरात भरपूर `पाव्हणेरावळे' असले, की, फडताळातला तूप वाढायचा `तो' चमचा बाहेर काढला जातो... पानात तूप पडण्याआधी चमच्याच्या मधोमधच्या भोकातून धार मागं भांड्यात जाते, हे त्यांच्या लक्षात येत नसेल का, असा भाबडा प्रश्न पडणारा पंक्तीतला माणूस म्हणजे नक्कीच रत्नारीत आलेला पाव्हणा असायचा... निम्म्या पंक्ती आटोपल्या, की अर्धी पोळी `बाजूला' काढून ठेवावी आणि जेवणं उरकली, की त्या पोळीनं भाजीची कढई पुसून घ्यावी, म्हणजे `भाजीपण साफ, आणि पोळीलापण चव' हे शहाणपण इथल्या माहेरवाशिणीला शिकवायला लागत नाही, असं म्हणतात... दुपरी भांडी घासायला आलेल्या भिक्याला कढईला चिकटलेला भाजीचा रस दिसला, की, `वयनी, कुणी जेवायचं र्हायलंय की काय?' अशी खवचट शंका त्यानं घेतली, म्हणून कुणी रागवणार नाही!
...अमेरिकेनं हिंदी महासागरात सातवे आरमार आणून ठेवलान, तेव्हाची गोष्ट! ही बातमी पसरली, आणि रत्नारीत खळबळ उडाली. प्रत्येकजण सातव्या आरमाराची चर्चा करताना दिसायचा... अनेकांची तर झोपच उडाली होती... हिंदी महासागर तो आहे कुठे, सातवं आरमार म्हजी काय, ते म्हासागरात कश्या आणून ठेवलान, असे प्रश्न `आंगण्या'चा कचरा काढताकाढता एखादा गडी करायचा, आणि पंचाईत व्हायची. `तुला कश्या हव्यात नाही त्या पंचायती?' अशा `उत्तरा'नं प्रश्न पलटवले जायचे. मग आरमाराचं काल्पनिक चित्र मनात रंगवत तो निमूटपणे कचरा काढायचा...
.... पण अखेर या बैचैनीचा शेवट झाला. एका बातमीनं अमेरिकेचं ते सातवं आरमार माघारी गेलं... अजूनही ती आठवण कुणीकुणी सांगतं. त्याचं काय झालेलं, भिशानं `आरशा'च्या अग्रलेखातनं अमेरिकेला `हाग्या दम' भरलान. `आरमार मागं घेतलं नाही, तर परिणामांना तयार रहा' अशी कडक समज दिलान, म्हणूनच अमेरिकेनं आरमार मागं घेतलं, असं आम्हाला कुणीतरी सांगितलन... `आरशा'चा तो अंक अमेरिकेच्या कुण्या बड्या अधिकायाच्या हातात पडला, आणि त्याच्या सोबतच्या कुणीतरी `रटप' करत नुस्तं हेडिंग वाचलान... आणि ते इंग्रजीत सायबाला सांगतलान... यातलं खरं किती आणि खोटं किती हे आम्हाला माहीत नाही. पण दुसर्या दिशी अमेरिकेचं आरमार मागे गेलं होतं...
... सदुभाऊ पाटणकर हे नाव रत्नारीत एकदातरी जाऊन आलेल्या कोणत्याही देशवासीयानं नक्कीच ऐकलेलं असणार. अटलबिहारी वाजपेयी नुस्ते खासदार होते, तेव्हा रत्नारीला आले होते, आणि सदुभाऊंना भेटले होते... संघाची काळी टोपी आणि अर्ध्या चड्डीतल्या सदुभाऊना पाहून, आपल्या स्वप्नातला भाजप असाच असला पाहिजे, असं तेव्हा वाजपेयींना वाटलं होतं म्हणे... सदुभाऊचा नवा फलक उपक्रम पेपरात छापून आला, की मुंबईतला प्रत्येक चाकरमानी रत्नागिरिकर तो पेपर विकत घ्यायचा... काही पेपरांनी असा आपला खप वाढवला होता, अशी वदंता आहे...
आमरसाचा कारखाना सुरू झाला, आणि रत्नांग्रीच्या आंब्याचा रस डब्यातनं बाहेरगावी जायला सुरुवात झाली. माणसांना रोजगार मिळाले. कारखान्यातली माणसं संध्याकाळी काम संपवून घरी जायच्या आधी नळाखाली हात धूत, तेव्हा सगळी पन्हळी `पिवळीधम्मक' होऊन, आंब्याचा नुस्ता घमघमाट सुटायचा. या पाण्याला आमरसाची चव ना, म्हणून मग मालकानं हात धुवायला पातेली ठेवलान, आणि ते पाणी `मॆंगोला' म्हणून विकलान... अशी चर्चा नंतर कारखाना बंद पडेपर्यंत चालू होती...
... वरच्या आळीतल्या कुणाचा नातू अमेरिकेत गेला, आणि तो खोर्यान पैसा खेचतोय, असं कुणी कुणाला सांगितलन, तर, `पैसे मिळवायला अमेरिकेला जायला लागत नाही... अंगात धमक असेल तर, हितं, बसल्या जागेवर, बागेतनं पैसा मिळतो’ असं ठणकावून सांगायची हिंमतही या मातीतच असते...
आंगण्याच्या `गडग्या'वर उगवलेलं आंब्याचं रोपटं पुढं वादळ माजवणार, हे माहीत असतानाही दोन्ही घरांच्या प्रेमाची पाखर त्याला मिळावी आणि ते फोफावत जावं, पुढे रसाळ आंब्यांनी लगडल्यावर त्याच्यावरून दोन घरांत होणारे भांडणाचे तमाशे पाहात शेजारपाजायांनी `टाईमपास' करावा, हेही इथे नवं नाही...
.... गडग्यावरच्या आंब्यासाठी `बेड्याचा कणका' उचलून सख्ख्या भावकीवर धावून जाणार्या आणि आपल्याच वंशावळीचा उद्धार करीत शिव्यांची स्वैर खैरात करणार्यांच्या चुली वेगळ्या होत गेल्या... पण मुंबैत आल्यावर `भावकीतलं किचाट' विसरून एकसाथ गौरी-गणपतीला आणि दिवाळीच्या सुट्टीला गावकडे फिरकला नाही, तो `रत्नांग्रीकर' नव्हेच! सणासुदीला कोकणाकडे जाणार्या गाड्यांची गर्दी वाढते ते उगीच नाही...
असं असूनही, `परतीचं रिझर्वेशन' हा प्रकार मनावर घ्याची आमच्यात पद्धत नाही... आयत्या वेळी एस्टी स्टॆंडवर घिरट्या घालायच्या, आमदाराची चिठ्ठी मिळवायची, नाहीतर `वशिले' शोधायचे... मग स्टॆंडवर घुटमळणारा कुणीतरी बेरक्या समोर बरोब्बर उभा राहातो... मायाळू नजरेनं चाकरमान्याकडे पाहातो... `किती तिकीटं हवीत रे बावा तुला?' असा प्रेमळ प्रश्न विचारतो, `पैसे दे, आत्ता तिकिटं आणून देतो' असा एक आश्वासक दिलासाही देतो आणि उत्तराची वाट न पाहाताच हात पुढे करतो...पण चाकरमानी मुंबईचं पाणी पिलेला असतो... तो सगळ्या तिकिटांचे पैसे एकरकमी देणार नाही, हे त्या बेरक्या’ला माहीत असते... `असं करा, निम्मे पैसे आता द्या, उरलेले तिकिटं हातात मिळाल्यावर द्या' तोच तोडगा सुचवतो, आणि चाकरमान्याला हे पटतं. `उद्या सकाळी समोरच्या पानाच्या गादीवरनं तिकिटं घेऊन जा... मी तिकिटं तिथे ठेवतो' असं सांगून तो गर्दीत दिसेनासा होतो...
दुसर्या दिवशी तिकिटं मिळत नाहीत, तेव्हा आपण गंडवले गेलो, हे चाकरमान्याला लक्षात येतं... `निम्मेच पैसे देऊन आपणच कसा शहाणपणा केला, हे तो मुम्बईत आल्यावर शेजारच्यांना सांगतो...
... संध्याकाळी चाळीत सगळीकडे ही `वार्ता' झालेली असते...
प्रतिक्रिया
18 Oct 2009 - 3:59 pm | मदनबाण
लयं भारी लिवलयं... :)
मदनबाण.....
सुसंगति सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो | कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो |
18 Oct 2009 - 11:01 pm | श्रावण मोडक
दामले, लेले, नेने - ऑं? इतकं सरळ? तुम्ही नक्की रत्नांग्रीचेच?
18 Oct 2009 - 11:37 pm | दिनेश५७
म्ह्जी काय? रत्नाग्रीपास्नं कुत्र्याच्या भ्वॉकावर आमचं मूळ्चं गाव... मठात! आनि वाकड्यात कश्याला शिरायचं? म्हणून सरळ..
21 Oct 2009 - 8:35 am | पक्या
छान लिवलयं.
21 Oct 2009 - 9:07 am | प्रकाश घाटपांडे
घाटावरच्या मान्साला कोकन आन ते बी तळ कोकण म्हंजी आवळू वर गळु झाल्यावानी. समदी मान्स तिथ माशे खात्यात. नारळ फुकाट भेटत्यात. अशा काही समजुती असायच्या. तशी रत्नांग्रीला डुटीवर असतानी तिथल्या स्थानिक पोलिसांनी प्रेमानी आमाला ताडी, दारु पाजुन माशे खायला घालुन आदरातिथ्य केल्त ब्वॉ . ताडी डायरेक झाडावर्ल्या मडक्यातुन काडुन ताजी ताजी दिली व्हती
लेख आवाडला.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
21 Oct 2009 - 12:05 pm | विंजिनेर
ती नीरा अस्ती नाय का? ताडी आंबल्याव व्हती...
21 Oct 2009 - 9:20 pm | गणपा
ताडीच ती, निर्या साटी नव कोर मडक लागतया, नी त्या मडक्यात चुन्याची निवळी बी टाकत्यात.
हा पर जर लै टाईम झाला तर (सुर्य डोसक्यावर येई पत्तुर ) तर त्याची ताडीच होतीया.
-गणपा (भंडारी ) ;)
21 Oct 2009 - 9:24 am | विजुभाऊ
सुंदर! भाट्याच्या खाडीपलीकडच्या पावसच्या इतकाच हिरवागार लेख.
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
21 Oct 2009 - 9:26 am | यशोधरा
मस्त लिहिलय!
>>दुसर्या दिशी अमेरिकेचं आरमार मागे गेलं होतं... >> B)
21 Oct 2009 - 10:25 pm | टुकुल
मस्त लिहिल आहे...
अजुन येवुद्यात.
--टुकुल