कमी जोखिमीचा गुंतवणूक पर्याय

सदानंद ठाकूर's picture
सदानंद ठाकूर in जनातलं, मनातलं
15 Oct 2009 - 7:18 pm

कमी जोखिमीचा गुंतवणूक पर्याय
डेब्ट म्युचल फंडात गुंतवणूक करण्याची संधी
आपणाला असे वाटते आहे का कि सद्या समभागांच्या किंमती जास्तच आहेत व म्हणून शेअर बाजारात किंवा इक्वीटी म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे जोखमीचे आहे. जर असे आपणास वाटत असेल तरीसुद्धा सद्याचे बँक ठेवीवरील अत्यल्प व्याज दर असताना व करपश्र्चात बँक गुंतवणूकीवरील अत्यंत कमी परतावा विचारात घेता आपण म्युच्युअल डेट फंडाचे योजनेत गुंतवणूक करणे फायदेशीर होऊ शकते.

बँकेतील ठेवीवरील व्याजातून टिडिएस कापला जातो तसेच या वरिल व्याजाचे उत्पन्नावर कर भरावा लागतो, तसेच मुदतपुर्तीपूर्वी रक्कम काढल्यास बँक कमी व्याज देते. मात्र डेट फंडात गुंतवणूक केली असता खालील प्रमाणे फायदे मिळतात:

• व्याज दरातील चढ उतारांचा फायदा मिळतो.
• करपश्र्चात बँकेपेंक्षा जादा परतावा मिळतो.
• टिडिएस कापला जात नाही.
• पैसे केव्हाही काढता येतात.

या योजनांची एनएव्ही रोजचे रोज जाहिर केली जाते. कर्ज रोख्यावरील व्याजदरांचा यावर परिणाम होत असतो. जेव्हा बँकाचे व्याजदर चढे असतात तेव्हा कर्ज रोख्याच्या किंमती कमी होतात व जेव्हा बँकाचे व्याजदर कमी असतात तेव्हा कर्ज रोख्यांच्या किंमतीत वाढ होत असते.
डेट फंड गुंतवणूकीद्वारे कर बचत:

म्युच्युअल फंड गुंतवणूकीचे अनेक फायद्यांपैकी सर्वात मोठा फायदा म्हणजे कर बचत. सद्याचे आयकर कायद्यानुसार म्युच्युअल फंडातून मिळणारा डिव्हीडंड हा गुंतवणूकदाराला करमुक्त मिळतो. त्याच प्रमाणे गु्तवणूक कालावधी एक वर्षापेंक्षा अधिक असल्यास होणारा भांडवली नफा दिर्घ मुदतीचा भांडवली नफा गणला जातो ज्यावर इंडेक्सेशनचा पर्याय न निवडता 10% कर बसतो व इंडेक्सेशनचा पर्याय स्विकारल्यास 20% कर बसतो. डेट म्युच्युअल फंड योजनांवरील डिव्हीडंड हा गुंतवणूकदाराला करमुक्त मिळत असला तरी म्युच्युअल फंड योजनेला डिव्हीडंड डिस्ट्रीब्युशन टँक्स भरावा लागतो.

नियमित उत्पन्नाकरिता डेट फंड:
आपल्या देशातील बहूसंख्य गुंतवणूकदारांची सर्वाधीक पसंती हि सुरक्षीत गुंतवणूक प्रकाराला असते. त्यामुळे गुंतवणूक करताना बँकेतल्या किंवा पोस्ट ठेवींना प्राधान्य दिले जाते. डेट फंड प्रकारचे योजनांमध्ये जोखिम कमी असते तसेच स्थिर उत्पन्न मिळु शकते. एका पहाणीनुसार देशात होणारे एकूण बचतीचे 95% पेंक्षा अधिक गुंतवणूक हि सुरक्षीत समजल्या जाणा-या बँक किंवा पोस्ट ठेवीं, रिझर्व्ह बँक बाँडस् अशा गुतवणूक प्रकारामध्ये केली जाते. जरी डेट फंडात सुरक्षीतता अधिक असली तरी म्युच्युअल फंडाच्या सर्वच योजनांप्रमाणे यातही मुद्दलाची किंवा ठराविक परताव्याची हमी दिली जात नाही.

डेट किंवा इंकम फंडाची गुंतवणूक निश्र्चित उत्पन्न देणा-या साधनांमध्ये केली जाते. एक व्यक्ती जेव्हा दुस-या व्यक्तीला कर्ज देते तेव्हा खालील बाबी आधीच निश्र्चित केलेल्या असतात.

• कर्जाची रक्कम (मुद्दल).
• मुद्दलावरिल व्याज दर.
• व्याज आकारणीची पध्दत.
• कर्जाची मुदत.
• तारण.

याप्रकारचे कराराचे जे कागद पत्र तयार केले जातात याला डेट मार्केटचे परिभाषेत 'पेपर' असे म्हटले जाते.

कर्जाचे प्रकाराप्रमाणे खालिल प्रकारचे प्रमुख पेपर्स प्रचलीत आहेत:
• सरकारी (केंद्र आणि राज्य सरकारांचे) रोखे. (Government Securities - G.Sec/Gilt).
• महामंडळे, निमसरकारी संस्था, नगरपालिका यांचे रोखे. (Debentures).
• सरकारि ट्रेझरी बिल्स (T Bills).
• खाजगी व सरकारी कंपन्यांचे रोखे (Debentures/Bonds).
• अर्थसंस्थांचे रोखे (Bonds).
• सिक्युरटाइज्ड डेट, पास थ्रू सर्टिफिकेटस् (PTC).
• कमर्शिअल पेपर्स (CP)
• सर्टिफिकेट ऑफ डिपॉझीट (CD).
• मनी मार्केटमधील साधने (C.B.L.O.)
• डेरिव्हेटिव्हज. (Futures)

1) भारतीय भांडवल बाजाराचे शेअर बाजार व रोखे बाजार असे दोन भाग आहेत. या दोन्ही बाजारांवरती सेबीचे नियंत्रण असते.
2) रोखे बाजाराचेसुध्दा दोन विभाग आहेत - कॉल मार्केट व डेट मार्केट. यातील कॉल मार्केटमध्ये एक दिवस ते 364 दिवसांपर्यंतचे मुदतीचे साधनांचे व्यवहार केले जातात. यापेक्षा जास्तय मुदतीचे साधनांचे व्यवहार हे डेट मार्केट मध्ये केले जातात.
3) डेट मार्केटचे सरकारी रोखे आणि कॉर्पोरेट रोखे असे दोन विभाग आहेत.
4) मुंबई व नँशनल स्टॉक एक्सचेंज या दोन्ही बाजारावर रोखे बाजार विभाग वेगळा आहे आणि येथे यांची खरेदि-विक्रीचे व्यवहार केले जातात.
5) रोखे बाजारात किमान व्यवहाराची रक्कम जास्त असल्यामुळे या बाजारात भारतीय व परदेशी अर्थसंस्था (FII), बँका, म्युच्युअल फंड, विमा कंपन्या, खाजगी भविष्यनिर्वाह निधी, केंद्रिय भविष्यनिर्वाह निधी, खाजगी अर्थसंस्था अशाप्रकारचे संस्थात्मक सदस्य भाग घेऊ शकतात. हा बाजार मुख्यत्वे घाऊक प्रमाणात व्यवहार करणा-यांचा आहे. किरकोळ व्यवहारांसाठी सध्या याप्रकारचा बाजार फारसा विकसीत नाही.

डेट फंडाचे बाबत खालील प्रकारची जोखिम असते:
पतजोखीम अर्थात क्रेडिट रिस्क:

भारत सरकारने जारी केलेल्या साधनाना सुरक्षीतता असते कारण त्याना भारत सरकारची हमी असल्यामुळे हे साधन जोखिमविरहित समजले जाते. मात्र अन्य कर्ज रोख्यांना पतजोखिम असते कारण ज्या संस्थेला/कंपनीला कर्जाची रक्कम दिलेली आहे ती कंपनी/संस्था:

• जर अडचणीत सापडली तर वेळेवर रक्कम परत करू शकत नाही.
• ठरलेल्या दराने व ठरलेल्या दिवशी व्याज देऊ शकत नाही, किंवा
• ती रक्कम पुर्णपणे बुडित खात्यातही जाऊ शकते.

व्याजदराची जोखिम:
रोख्यांची बाजारातिल किंमत त्यांचे दर्शनी किंमतीपेक्षा वेगळी असते. रोख्यांचे बाजारभावही वेगवेगळ्या कारणांमुळे बदलत असतात. त्यातील एक कारण म्हणजे, बाजारातील बदलणारे व्याज दर. बाजारातील व्याजदर वाढले कि रोख्याची बाजारातील किंमत कमी होते व व्याजदर कमी झाले कि किंमत वाढते.
क्रिसील (CRISIL) व (ICRA) अशासारख्या काहि प्रसिध्द पतमानांकन संस्था आहेत ज्या कंपन्या व त्याचे रोख्यांचे मानांकन वेळोवेळी जाहिर करत असतात ज्याव्दारे अशा रोख्यांची विश्वासार्हता तपासता येते. उदा. ज्या रोख्याना (AAA/P1) दर्जा दिलेला असतो अशा साधनातील गुंतवणूकीत सर्वात कमी जोखिम असते. मात्र काही वेळा थोडासा कमी पतदर्जा असलेल्या चांगल्या कंपन्यअचे रोख्यात जास्त परताव्यासाठी गुंतवणूक केली जाते. अनेकवेळा डेट फंडामध्ये प्रचलीत व्याजदरापेक्षा अधिक परतावा देतात याचे कारण कि विक्रीवरील भांडवली नफ्यामुळे जो प्रचलित व्याजदर कमी झाल्यामुळे होत असतो. योजनेतल्या रोखे/बाँड ची मुदत जेवढी जास्त तेवढी त्यांचे बाजारमुल्यांवर बदलत्या व्याज दरांचा अनुकूल अथवा प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता अधिक असते.
फ्लोटिंग रेट फंड, कँश फंड, लिक्वीड फंड यातिल गुंतवणूक हि कमी कालावधीचे पेपर्समध्ये केली जात असल्यामुळे बदलत्या व्याजदरांचा परिणाम या गुंतवणूकीवर फारसा होत नसल्यामुळे या योजनांतील परतावा हा बरासचा स्थिर असतो.

यातील गुंतवणूकीचे पर्याय पहाणेसाठी येथे टिचकी मारा

गुंतवणूकलेख

प्रतिक्रिया

कपिल काळे's picture

15 Oct 2009 - 10:03 pm | कपिल काळे

सुंदर परिचय- डेट फंडांचा. तो सुद्धा इतक्या सोप्या साध्या शब्दांत!
धन्यवाद!

सदानंद ठाकूर's picture

17 Oct 2009 - 4:49 pm | सदानंद ठाकूर

अधिक माहितीसाठी आपण माझे म्युच्युअल फंड विषयावरील मराठीमधील संकेतस्थळ पाहू शकता.
सदानंद
आनंदाने जगा, जगण्यात आनंदच आहे, आनंदाचे वाटप करा.
मला अन्यत्र भेटण्याची जागा