पायवाट म्हणाली, "सांभाळ!
अनवाणीच आहेस
ठाऊक नाही मुक्काम तुला.
प्रश्न सुरवातीला नसतोच,
ते येतात तेव्हा
उत्तरांचा शोध सुरू होतो,
वाटेकडं दुर्लक्ष होतं..."
वाट राखणं
हे तर जगणं, अन्यथा
सारेच प्रवास महामार्गी!
"महामार्गाचं बरं असतं,
तो बदलतो
माझं तसं नसतं
मी मातीचीच असते.
अनवाणी चालताना
पाय मळतील म्हणून सांगतेय..."
चालताना केव्हा तरी
वाट सुटली, भरकटली
आता पायाखाली केवळ
माती अन मातीच आहे
मी चालतोच आहे...
'मातीचे पाय'चा
दागिना मिरवत!
प्रतिक्रिया
15 Oct 2009 - 3:46 am | चतुरंग
काव्यप्रतिभेला खास दीपावलीचा बहर आलेला दिसतोय!
विचारात टाकणार्या प्रवासाची कविता आवडली.
'मातीचे पाय'चा
दागिना मिरवत!
हे फारच आवडलं! :)
(मातीचा)चतुरंग
15 Oct 2009 - 9:03 am | मस्त कलंदर
विचारात टाकणार्या प्रवासाची कविता आवडली.
प्रश्न सुरवातीला नसतोच,
ते येतात तेव्हा
उत्तरांचा शोध सुरू होतो.....
'मातीचे पाय'चा
दागिना मिरवत!!!!!!
हे जास्त आवडलं!!!!
(मातीचीच.....)मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
अवांतरः बिकांनी कालच्या प्रवासात 'वोमिटिंग बॅग' वर माती -२ ची टिपणं तर काढली नसतील????? :D
15 Oct 2009 - 5:00 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
"मातीचे पाय" ... आवडली कविता (कळली असं मान्य केलं तर!)
अदिती
15 Oct 2009 - 8:41 am | मदनबाण
व्वा.सुंदर कविता... :)
(प्रवासी)
मदनबाण.....
सुसंगति सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो | कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो |
15 Oct 2009 - 11:15 am | विमुक्त
छान कविता...
15 Oct 2009 - 11:35 am | वेदश्री
श्रावण,
वाटेला सोडून तू भरकटलास तरी तुझ्या चालण्यामुळे ती आपोआप येईलच तुझ्या अविरत चालणार्या पायांच्या मागेमागे.. पायवाटच आहे ना ती! शेवटी 'मातीचे पाय' हा तुझा जरी दागिना असला तरी तिचा तर श्वास आहे ना!!! नव्या पायवाटेला जन्म देणारा प्रवास आवडला.
संदीप खरेच्या 'एवढंच ना.. एकटे जगू' कवितेतल्या 'मातीच बरी, मातीच खरी.. मातीत माती मिसळत जगू' हे शब्द आठवले.
15 Oct 2009 - 11:44 am | अवलिया
पायवाटा ... !
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
15 Oct 2009 - 1:04 pm | sneharani
खरचं काव्यप्रतिभेला बहर आलेला दिसतोय.
कविता आवडली.
15 Oct 2009 - 5:16 pm | धनंजय
पायवाट-महामार्ग रूपक आवडले.
*मात्र कवितेतच रूपकांबद्दल ऊहापोह केला तर माझ्या मते रसापकर्ष होतो. उदाहरणार्थ : "वाट राखणे म्हणजेच जगणे, अन्यथा सारेच प्रवास महामार्गी" हे रूपकाचे कवीनेच केलेले स्पष्टीकरण वाटते. रूपकाचा अर्थ मनात उमलण्याची जी गंमत असते, तिला रसिक मुकतो.
.
अर्थात अर्थ लावून घ्यायलाही बराच मालमसाला ठेवला आहे - उदाहरणार्थ : "पायवाट मातीची आहे तशीच आहे, पण महामार्ग बदलतो" (म्हणजे नेमके कसा बदलतो, त्याचे प्रत्यक्ष= आधी कुठल्या वेगळ्या प्रकारचा असतो, मग खडी-डांबराचा होतो; आणि अप्रत्यक्ष = असा बदलल्यामुळे महामार्गाचे 'बरे' होते, ते कसे. शिवाय बरे होते यात व्यंजना आहे. खरे तर बरे होत नाही, तर माती तशी असणेच अभिमानास्पद आहे, ते प्रत्यक्ष डांबरी महामार्गाला आणि मातीच्या पायवाटेला लागू करून घ्यायचे.)*
15 Oct 2009 - 5:41 pm | स्वाती२
आवडली.