ये बाहुपाशी हलकेच प्रियवरा
राजसा, का असा, दुर तू जाशी?
सखया तू येना जवळ लवकरी
बघ रे कधीची चांदरात झाली !
मिठीत तुझीया रे स्वर्ग साती
नाते अपुले, जणु मीन जळाशी,
तु घेना मज कुशीत झडकरी
प्रीतीची ज्वाला मनी भडकली !
विझवलेले सख्या दीप कधीचे
बहाण्यास तुझ्या.., पडले फशी,
धरू नकोस ना राग मजवरी
बघ रात्र सारी उडून चालली !
सोड ना आता रुसवा फुकाचा
कशास फसवे हे कलह प्रियेशी?
पंचप्राण घेवूनी उभी निजकरी
ये.. मिलनवेळा निघुन चालली !
विशाल.
प्रतिक्रिया
14 Oct 2009 - 11:48 am | श्रावण मोडक
अरेच्चा!
प्रियवरा, लवकरी, स्वर्ग साती, मीन जळाशी...
ही इतक्या कठीण भाषेत बोलत असेल तर प्रियकर कसा जवळ यायचा? कसा बाहूंत घ्यायचा? हे म्हणजे मिठीतील मि/मी पहिली की दुसरी, असा प्रश्न ऐन मिठीत विचारावा त्याचाच उलटा प्रकार!!! ;) तिला म्हणावं, जरा सोपी भाषा वापरत जा. बोलत जा प्रियकराशी. चर्चा नको करू!!! ;)
आधी मनात उमटलेला प्रतिसाद तो हाच, कविता म्हणून विचार केल्यानंतरचा असा:
जुन्या वळणाच्या भाषेतील कवितेचा प्रयत्न मात्र छान.
14 Oct 2009 - 11:51 am | सुबक ठेंगणी
पण थोडा वृत्ताचा गोंधळ झालाय असं वाटतं.
"झडकरी"शब्दानंतर एकदम "भडकली"शब्द मला अस्थानी वाटला.
त्याऐवजी "प्रीतीच्या ज्योती मनी तेवती"असं काहीतरी हवं होतं असं वाटलं.
14 Oct 2009 - 12:26 pm | प्रभो
छान..आवडली
--प्रभो
14 Oct 2009 - 12:47 pm | बेसनलाडू
असा काहीसा एकत्र प्रभाव असलेली कविता वाटली. म्हणजे पहिल्या गाण्यातील संकल्पनेला वरून दुसर्या गाण्याची फोडणी दिल्यासारखे.
(निरीक्षक)बेसनलाडू