भाजे, कार्ला, कोंडाणे आणि बेडसे ही सर्व लेणी साधारण 1st cent. B.C. कालखंडातली आहेत. ह्यापैकी फक्त बेडसे लेणी बघायची राहिली होती. एकच दिवस भटकायला मिळणार होता; म्हणून येत्या रवीवारी बेडसे लेणी बघायचं ठरवलं. लेण्यापर्यंत चाललोच आहोत तर त्याच्या मागचा भातराशीचा डॊंगरपण बघुयात असा विचार डोक्यात आला. कामशेतहून टमटमने लेण्यापर्यंत जाता येतं, पण त्यात काय मजा नाही.
मग कसं जायचं?
विसापुर किल्यापासून एक डोंगररांग कामशेतच्या रेल्वे स्टेशन पर्यंत आली आहे. ह्याच डोंगररांगेवर बेडसे लेणी आणि भातराशी आहे. लोकलने कामशेतला उतरायचं... डोंगररांगेच्या माथ्यावरुन चालतं बेडसे लेणी गाठायची... मग भातराशी आणि शेवटी मळवली... असा बेत पक्का केला.
रवीवारी सकाळी ७.३० ला मी आणि माझा भाऊ प्रसाद कामशेतला पोहचलो. जुना पुणे-मुंबई रस्ता ओलांडला आणि समोरच्या डोंगररांगेवर चढायला सुरुवात केली. सरळ रेषेत चढून डोंगररांगेचा माथा गाठायचा आणि मग पायवाट शोधायची, असा विचार होता.
धुकं हळुहळू विरळ होत होतं आणि सकाळच्या कोवळ्या उन्हाची उब जाणवत होती. सारं रान दवाने ओलचींब भिजलं होतं. एखाद्या झुडपातून वेडाराघू (green bee-eater) हवेत झेप घ्यायचा, चोचीत काहीतरी पकडुन पुन्हा झाडीत नाहीसा व्हायचा. रंगीबेरंगी फुलपाखरं फुलांमधला मध खाण्यात दंग होती.
(White Lady)
(रान भेंडी)
(कारवी)
(गणेशवेल)
झुडपातून वाट काढत थोड्याच वेळात डोंगररांगेच्या माथ्यावर पोहचलो. सकाळच्या गार हवेत जरावेळ विसावलो. समोर दूरवर भातराशीचा डोंगर दिसत होता.
पुसटश्या पायवाटेवर चालायला सुरुवात केली. ही वाट रोजच्या वापरातली नव्हती, आणि पावसात बरच गवत माजल्यामुळे थोड्याच वेळात पायवाट नाहीशी झाली. बराच वेळ झाडा-झुडपात भटकल्यावर गुरांच्या वाटेला लागलो.
थोडं पुढे गेल्यावर लहानश्या पठारावर पोहचलो. पठारावर गुरांचा कळप चरत होता, गुरांना चाहूल लागू न देता झाडीतून आम्ही पुढे सरकलो.
पुणे-मुंबई मेगाहायवे वरुन मुंबई कडे जाताना कामशेत बोगद्याच्या उजव्या बाजूला डोंगरावर एक टॉवर दिसतो, आम्ही चालत असलेल्या डोंगररांगेवरच हा टॉवर आहे. टॉवर असलेल्या टेपाडाला डावी कडून वळसा घालून बोगद्यावरच्या खिंडीत असलेल्या वाघोबाच्या देवळात पोहचलो. दर्शन घेऊन पुन्हा चालायला लागलो. गवत तुडवत एका टेपाडावर आलो. इथून समोरच्या डोंगराच्या पोटात कोरलेली बेडसे लेणी दिसली. जरा हुश्श् झालं, कामशेतहून ३ तास चालल्यानंतर पहिल्यांदाच लेणी दिसली.
(फोटोच्या मध्यभागी लेणी दिसत आहेत)
लेण्याचा डोंगर आणि आमच्या मधे लहानशी दरी होती. लेण्यापर्यंत पोहचण्यासाठी अजीबात वाट नव्हती आणि उतार पण खूप जास्त होता. जरा मागे जाऊन योग्य वाट शोधावी असा विचार थोडावेळ डोक्यात आला, पण अशावेळी मी डोक्याचं अजीबात ऐकत नाही आणि मनाला लगामपण लावत नाही. मग काय?... उतारावरच्या रानात आम्ही दोघांनी उडी घेतली. झपाटल्या सारखे रान तुडवत उतरायला लागलो. पाठपीशवी, शर्ट सारखे काट्यात अडकत होते... अंग काट्यांनी ओरबाडुन निघालं... पण न थाबंता थेट लेण्याच्या जवळ पोहचलो आणि ओढ्यात आडवे झालो. ओढ्याच्या गार पाण्यानं सारा थकवा दूर केला. मग थोडं चढल्यावर लेण्यात प्रवेश केला.
इतके श्रम केल्यावर असं सुंदर शील्प बघण्यातली मजा वेगळीच; टमटमने इथे आलो असतो तर हे सुख नसतं मिळालं.
२००० वर्षांपूर्वी काही लोकांनी निर्माण केलेली कलाकृती आपण आज प्रत्यक्ष बघतोय, ह्यावर थोडावेळ विश्वासच बसत नव्हता. एखाद्या निर्जीव कातळातून असं सुंदर, चिरंतन शील्प कोरणाऱ्या लोंकाच्या प्रतीभे समोर नतमस्तक होण्याशिवाय दुसरा पर्यायचं उरत नाही. हे सौंदर्य शब्दामधे मी वर्णनच करु शकत नाही.
भारावून बराच वेळ लेणी बघीतली. तोपर्यंत लेण्यांची देखरेख करणारे सदुकाका आले. त्यांच्या सोबत घरुन आणलेलं खाऊन घेतलं.
मी विचारलं,"लेणी बघण्यासाठी थोडं तीकीट का ठेवत नाही? भाजे आणि कार्ल्याला तर आहे"
"कोणी येतच नाही इथे, मग तीकीट ठेऊन काय फायदा?"
खरंतर ही लेणी फार सुंदर आहेत, पण भाजे आणि कार्ल्याच्या मानानं जरा आडवाटेला असल्यामुळे फारसं कुणी येत नाही.
अतीशय थोडकं मानधन सदुकाकाला दिलं आणि लेण्याच्या वर चढून भातराशीच्या दिशेने चालायला लागलो. एका दगडावर प्रसादला साप दिसला. फारच निवांत होता, जवळ गेलोतरी त्याने पळायची घाई नाही केली.
(Gunther's racer)
वाट सापडत नव्हती, पण साधारण कल्पना असल्यामुळे गवतातुन वाट काढत चालत होतो. थोड्याच वेळात डोंगराच्या कड्यावर पोचलो आणि तळ न्याहाळू लागलो. पवनेच्या दोन काठावर तिकोना आणि तुंग, पवनेच्या पाण्यात पाय सोडून निवांत बसले होते.
आता उजव्या हाताला वळलो आणि पुन्हा जंगलात घुसलो. मला ओल्या रानाचा वास खूप आवडतो. कोवळ्या गवताचा, फुलांचा, झाडांवरच्या फळांचा, कुजणाऱ्या पानांचा मिळून वेगळाच सुगंध तयार होतो. हा सुगंध आला की फार प्रसन्न वाटतं मला.
जंगलातून बाहेर पडलो तेव्हा उजव्या हाताला भातराशीचा डोंगर होता आणि समोर लोहगड आणि विसापूर.
अजूनपण वाट सापडत नव्हती. सकाळ पासून चालून-चालून प्रसाद जरा कंटाळला होता.
म्हणाला,"तुला वाट माहिती नव्हती तर कश्याला आणलसं इथे?"
मी म्हणालो,"अरे, वाट तर मला कधीच माहिती नसते... तु कंटाळू नकोस... मस्त चालत रहा... "
थोडावेळ धडपडल्यावर जरा मळलेल्या वाटेला लागलो. सुमारे अर्धा तास चालल्यावर एक धनगरपाडा लागला. धनगरपाड्याचं नाव मालेगाव. गावातली लहान मुलं टायर सोबत खेळत होती. मला लहानपणची आठवण झाली... तेव्हा सायकलच्या दुकानतून वापरात नसलेला टायर घेऊन गावभर आम्ही हुंदडायचो... घरी आल्यावर टायर बघीतल्यावर आई ओरडते म्हणून घरात घुसायच्या आधी पडवीच्या छतावर टायर लपवून ठेवायचो... मजा होती तेव्हा...
धनगरपाड्यातून विसापूरच्या पायथ्याशी असलेल्या पाटण गावात जायला मळलेली वाट आहे. दिवसभर भरपूर पायपीट झाली होती, म्हणून भातराशीचा डोंगर न चढता पाटणला उतरायचं ठरवून टाकलं. अर्ध्या तासात पाटण आणि मग अजून पाव तास चालल्यावर मळवलीच्या रेल्वे स्टेशनला पोहचलो. लोकल मधे बसलो आणि पुण्याच्या दिशेने प्रवास सुरु केला. लोकलच्या खिडकीतून भातरशीचा डोंगर, दिवसभर भटकत होतो ती डोंगररांग बघीतल्यावर फार समाधान वाटलं.
------------------------------------------------------------------------------
सर्व वाचकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा... तुम्हाला ही दिवाळी आनंदाची, समाधानाची आणि भरभराटीची जावो अशी ईश्वर चरणी प्रार्थना...
जमल्यास माझ्या ब्लॉगला भेट द्या...
http://www.murkhanand.blogspot.com/
प्रतिक्रिया
13 Oct 2009 - 8:53 pm | सूहास (not verified)
किती जळवणार!!!!..एक हा ,एक ती दिपाली आणी एक तो गणपा...आयला एकत्र सुपारीच द्यावी का ह्यांची
सू हा स...
(http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/5111067.cms) नो-बेल ओबामा
13 Oct 2009 - 8:59 pm | बाकरवडी
मस्तच !!!! फोटो आणि वर्णनही !! :)
:B :B :B बाकरवडी :B :B :B
माझा ब्लॉग बघा :- बाकरवडी
13 Oct 2009 - 9:21 pm | प्रभो
मस्त रे
--प्रभो
13 Oct 2009 - 9:21 pm | लवंगी
इतक्या सुंदर भटकंतीमध्ये सहभागी करुन घेतल्याबद्दल धन्यवाद..
13 Oct 2009 - 10:25 pm | Nile
सुरेख लेणी आवडली.
तुझ्या भटकंतीचं एक नीटस संकलन करुन ठेव, पुढे मागे फार उपयोगाला येईल.
14 Oct 2009 - 12:51 am | स्वप्निल..
व्यवस्थित जमा करुन ठेव सगळं ... :)
असच मनसोक्त भटकायची इच्छा आहे .. लेणी मस्तच .. मला तरी यापुर्वी माहीती नव्हती ..
13 Oct 2009 - 10:26 pm | प्राजु
तुझं भटकणं बघितलं की खरोखर हेवा वाटतो तुझा आणि तुझ्या उत्साहापुढे नतमस्तक व्हायला होतं..
असाच डोंगरदर्यांवर प्रेम करत रहा.. :)
- प्राजक्ता पटवर्धन
http://praaju.blogspot.com/
13 Oct 2009 - 10:32 pm | गणपा
खरच विमुक्ता तुझा खुप हेवा वाटतो रे.
मस्त भटकंती करतोस, आणि तितक्याच नेटाने आम्हालाही घरबसल्या फिरवुन आणतोस. परत एकदा धन्यवाद.
पुढच्या भटकंतीसाठी शुभेच्छा.. :)
13 Oct 2009 - 11:46 pm | विश्वजीत
कधीचा करायचा आहे! असा विचार करून आम्ही नेहमी लोहगड / विसापूरलाच जातो. बघू केव्हा योग येतो...
भटकंतीचं वर्णन आणि प्रकाशचित्रे मस्त.
13 Oct 2009 - 11:48 pm | मी-सौरभ
सौरभ
14 Oct 2009 - 6:34 am | मदनबाण
मस्त लेख... मस्त फोटो. :)
"कोणी येतच नाही इथे, मग तीकीट ठेऊन काय फायदा?"
ह्म्म...बहुधा त्यामुळेच ही लेणी प्रेमवीरांच्या स्वाक्षर्यां पासुन रंगलेली दिसत नाहीत...इतरत्र कुठेही पाहावयास गेले असता बर्याचवेळी ही गोष्ट दिसते.
आपला अमुल्य ठेवा असल्या उनाड कार्यामुळे आपण खराब करतोय याचे त्यांना भानच नसते !!!
मदनबाण.....
सुसंगति सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो | कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो
14 Oct 2009 - 6:51 am | हर्षद आनंदी
बेडसे लेणी बघायला कामशेतच्या डोंगररांगेवरुन जाण्याची कल्पना आवडली. एकदम सही!!
फोटो आणि वर्णन नेहमीप्रमाणेच अप्रतिम....
राजगडला पहिल्यांदा गेलो, तेव्हा माझा एक मित्र विवेक... गडाच्या मुख्य डोंगरापाशी आल्यावर म्हणाला, "आपण का जातोय? काय आहे तीथे? कधी घराचे ३ मजले पण चढत नाही आणि आता ३००० फुट चढुन आलोय." त्यानंतर बरेच किल्ले सर केले, खुप भटकलो पण तो प्रसंग तसाच स्मरणात आहे.
14 Oct 2009 - 6:54 am | सहज
>मी म्हणालो,"अरे, वाट तर मला कधीच माहिती नसते... तु कंटाळू नकोस... मस्त चालत रहा... "
बोंबला! अरे तुला गाईड म्हणून नक्की केले आहे, मला नेताना माहीत असलेल्या रस्त्यावरुनच ने बर का. :-)
विमुक्ता अरे इतका फिरलायस तर ह्या सगळ्या ठिकाणी जायच्या एक सोपी व एक अवघड अश्या वाटांचा नकाशा बनव व पुस्तक काढ. बेस्ट सेलर होईल बघ!
और भी आने दो!!!
14 Oct 2009 - 7:52 am | विसोबा खेचर
क्या बात है!
14 Oct 2009 - 1:00 pm | ज्ञानेश...
विमुक्ताची प्रवासवर्णने वाचल्यावर वाटते की आयुष्याला अर्थ देणारा असा एखादा छंद प्रत्येकाला असला पाहिजे.
नतमस्तक!
"Great Power Comes With Great Responsibilities"
14 Oct 2009 - 1:04 pm | बिपिन कार्यकर्ते
तू वेडा आहेस रे !!!! :)
बिपिन कार्यकर्ते
14 Oct 2009 - 1:07 pm | अमोल केळकर
अप्रतीम निसर्ग..
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
14 Oct 2009 - 1:08 pm | sneharani
हे निसर्गावरचं नितांत प्रेम नितांत असचं राहू दे.
:)
14 Oct 2009 - 1:15 pm | श्रावण मोडक
छानच.
14 Oct 2009 - 1:17 pm | भाग्यश्री कुलकर्णी
फारच सुरेख.
14 Oct 2009 - 6:05 pm | यशोधरा
मस्त फोटो!
----------
दीपावलीच्या शुभेच्छा! :)
14 Oct 2009 - 8:23 pm | अनिल हटेला
सै रे !!
सुरेख वर्णन आणी फोटो !! :-)
बैलोबा चायनीजकर !!!
Drink Beer,
Save Water !!
;-)
14 Oct 2009 - 9:43 pm | सुमीत भातखंडे
नुसती छायाचित्र पाहून आणि वर्णन वाचूनच इतकं छान वाटतयं.
प्रत्यक्ष खूपच मजा आली असेल.
सुरेख वर्णन आणि अप्रतिम छायाचित्र.
आणि हे सगळं आमच्या बरोबर शेयर करण्याबद्दल धन्यवाद.
14 Oct 2009 - 10:19 pm | स्वाती२
धन्यवाद विमुक्त.
16 Oct 2009 - 11:10 am | विमुक्त
सर्वांचे मनापासून आभार...
तुम्ही म्हणता त्याप्रमाणे मी माझ्या भटकंतीचं नीट संकलन करुन ठेवणार आहे आता... :)
16 Oct 2009 - 8:31 pm | चतुरंग
आज अखेर माझा पाडाव झालाच. तुझे धागे उघडताना भीती वाटते रे विमुक्ता, की आता निसर्गाचे कोणते चमत्कार बघायला आणि वाचायला मिळणार आहेत?!
फारच सुरेख भटकंती. तू अक्षरशः मनाला येईल तसा भटकंती सुरु करतोस! भन्नाट आहेस.
सगळ्या फुलांचे फोटो एकदम जोरदार आलेत! नावंही दिली आहेस ते फार उत्तम.
(विस्मयचकित)चतुरंग
आणि हो, दीपावलीच्या शुभेच्छा!! :)