किती तपं लोटली या गोष्टीला! एक सुरेखसं तळं होतं. शांत, नितळ, स्वच्छ निळंशार पाणी. काठावरची हिरवीगार उंच उंच झाडं वाकून प्रतिबिंब पहायची त्यात. आभाळही आपली निळाई शोधायचं त्या तरल पाण्यात. चिमणी पाखरं जाता येता हळूच आपल्या इवल्याशा चोचीत इतकासा थेंब वेचून हलकेसे तरंग उठवून जात. सूर्याचे किरण सकाळ-संध्याकाळी त्या पाण्यात सोन्याच्या राशी ओतत असत. तळं खूप आनंदात होतं.
अचानक सगळं चित्र बदललं. कोणा एकानं गंमत म्हणून तळ्यात एक खडा टाकला. तळ्याचा थरकाप झाला. नितळ पाण्यावर कितीतरी तरंग उठले. त्या एकाला अजूनच गंमत वाटली. त्यानं आणखी एक खडा टाकला. तरंग उठतच राहिले. आता हा एक नवा खेळच झाला! कोणीही यावं, तळ्यात खडे टाकावे, कोणाचा खडा लांब जातो, किती जास्त तरंग उठतात अशा चढाओढी सुरू झाल्या. दोन तपं लोटली, खेळ सुरूच राहिला.
तळ्याच्या वेदनांचा विचारच नाही केला कुणी. खड्यांनी केलेल्या जखमा वहात राहिल्या, चिघळत राहिल्या. नितळ निळाईला हळू हळू रक्ताच्या लाल रंगानं वेढलं. खड्यांवर हिरवट, निसरडं शेवाळ पसरत गेलं, आणि पहाता पहाता त्या सुंदरशा तळ्याचं काळाकभिन्न, कुबट डोहात रूपांतर झालं. त्याचा भोवतालही बदलत गेला. पाखरांनी तळ्याची वाट सोडली. काठावरची झाडं सुकून गेली, निष्पर्ण, शुष्क खोडांवरच्या उजाड ढोल्यांमध्ये घुबडांनी घरटी बांधली.
आभाळानं तळ्यात डोकावणं सोडून दिलं. सूर्यकिरणांनीही पाठ फिरवली त्याच्याकडे. आता एकाकी तळं, तळं कुठं राहिलं? तो काळा डोह, घुबडांचे चीत्कार, ती निष्पर्ण खोडं, उजाड, भकास, एखाद्या भयकथेच्या पार्श्वभूमीसारखं! त्यालाही दोन तपं लोटली. डोह आहे तसाच राहिला, चैतन्याची वाट पहात!
आजच कुठूनतरी मंद, हलकासा सुगंध दरवळला वा-यासवे. प्राजक्त तर नाही हा? कुणा पाखराचे मंजुळ सूरही येताहेत कानी. कशाचे हे संकेत? तुला काय वाटतं, बदलतील दिवस तळ्याचे?
होय! नक्कीच बदलणार आहेत! कोणा एकानं त्या डोहातलं शेवाळ काढायला सुरुवात केलीय. हळू हळू ते शेवाळ, खडे सगळं निघून जाईल, तळ्याचं पाणी पुन्हा नितळ निळं होईल, सकाळ-संध्याकाळी सोन्याचं रूप घेईल, आभाळ पुन्हा उतरेल त्या पाण्यात. झाडं पुन्हा हिरवी होतील, पाखरं पुन्हा चोचीनं हलकेसे तरंग उठवतील, त्यांच्या इवल्याशा पावलांचे ठसे जपत तळं पुन्हा हसायला लागेल.
प्रतिक्रिया
10 Oct 2009 - 8:25 am | दशानन
:)
छान लिहले आहे.... एका तळ्याचे मनोगत.
***
"हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले,
बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । "
राज दरबार.....
10 Oct 2009 - 8:29 am | llपुण्याचे पेशवेll
लिहीले छान आहे. पण कशाबद्दल लिहीले आहे? तळे कसले रुपक म्हणून वापरले आहे?
आभाळानं तळ्यात डोकावणं सोडून दिलं. सूर्यकिरणांनीही पाठ फिरवली त्याच्याकडे
ही वाक्यं तर क्लासच.
राहून राहून मला तरी पुण्याबद्दल असेच वाटतं. प्रगतीच्या नावाखाली काँक्रिटच्या जंगलाचं डबकं.
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाचे सर्टीफिकेट झाले की त्याला अहंकार चिकटतो.
Since 1984
10 Oct 2009 - 8:36 am | यशोधरा
क्रांती, आवडले, पण मलाही रुपक कसले आहे ते समजले नाही.
10 Oct 2009 - 8:53 am | सहज
रुपक समजले तर आवडेल.
10 Oct 2009 - 9:03 am | विष्णुसूत
मस्त लिहिल आहे.
मला वाटते आहे कि हे रुपक आहे आपल्यातील प्रत्येकात असलेल्या ऑप्टिमीझम च ( मराठि शब्द?).
आशावाद?
फार सुन्दर !
10 Oct 2009 - 9:32 am | क्रान्ति
मन, भावना, जीवन आणि अर्थातच काका म्हणतात, त्याप्रमाणे आशावाद याचं आहे. :)
क्रान्ति
अग्निसखा
10 Oct 2009 - 9:35 am | अवलिया
मस्त.
आजकाल सगळीच लोक तळ्याकाठाबद्दल लिहायला लागलीत... सहजरावांचे हालच आहेत.
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
10 Oct 2009 - 10:43 am | युयुत्सु
९.५/१० मार्क
अर्धा मार्क मांडणीसाठी कापला :)
युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||
- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
10 Oct 2009 - 10:56 am | पर्नल नेने मराठे
ह्या तळ्यातपण कमळे नाहित [(
चुचु
10 Oct 2009 - 10:58 am | अवलिया
हल्ली फुलं कागदाची आणि चंद्र काचेचा असतो चुचुतै!
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
10 Oct 2009 - 11:02 am | पर्नल नेने मराठे
ह्म्म
चुचु
10 Oct 2009 - 11:35 am | क्रान्ति
हे घे ग चुचु.
क्रान्ति
अग्निसखा
10 Oct 2009 - 11:39 am | पर्नल नेने मराठे
ऐया ;;) काय सुरेख आहे ग!!
थन्क्स हं ....
चुचु
10 Oct 2009 - 11:53 am | श्रावण मोडक
'काही संवाद...' नंतर 'एका तळ्याची गोष्ट'! त्याआधी मौन. तिन्ही मनोगतं (धाडसानं हा शब्द वापरतोय) अतिशय बोलकी आहेत. आधीच्या दोनाप्रमाणेच हेही आशावादी. म्हणून आल्हाददायक. कडाक्याच्या उन्हाळ्यात खिडकीतून हवेची एक झुळूक यावी अशी. एकाच काळातील वेगवेगळ्या रागांची एक आटोपशीर बैठक वाटावी अशी. आता कोणी तरी भैरवीच्या दिशेनं जावं... :)
10 Oct 2009 - 1:41 pm | विमुक्त
रुपक वगेरे बाजूला ठेवून नुसत्या तळ्याचा विचार केला तरी वाचायला खूप छान वाटलं...
10 Oct 2009 - 2:09 pm | मनीषा
सुरेख , आशावादी रुपककथा ..
मस्त आहे
10 Oct 2009 - 4:21 pm | स्वाती२
आवडले.
10 Oct 2009 - 4:40 pm | टुकुल
मस्त..
10 Oct 2009 - 4:47 pm | अमोल केळकर
वाचायला छान वाटले. पण आशय कळला नाही :)
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
11 Oct 2009 - 8:44 am | क्रान्ति
रूपक आहे मनाचं. लहानपणापासून मन एखाद्या नितळ तळ्यासारखं निष्पाप, निर्व्याज असतं, तरूणपणही तसं अल्लड, चंचल असतं, पण तिथून पुढे जबाबदार्या वाढतात, आपल्याला वेगळ्या पद्धतीनं नव्यानं घडावं लागतं, त्यात कधी कधी आयुष्य साचलेल्या पाण्यासारखं गढुळत जातं. [दोन तपांचा संदर्भ तेवढ्यासाठीच.] पण आशेवर माणूस जगतो, त्यामुळे काही प्रसंग, काही व्यक्ती, काही नवं, चांगलं वाचन, नव्या जाणिवा यांच्या मदतीनं आपण त्या गढूळपणावर मात करून पुन्हा निष्पाप, निर्व्याज हसू मिळवू शकतो, असा थोडक्यात या रूपकाचा अर्थ आहे. बदलाला, बहराला वय नसतं. कितीतरी असे ज्येष्ठ नागरिक पहाण्यात आहेत, की ज्यांनी निवृत्तीनंतर आपले छंद जोपासायला सुरुवात केलीय, आणि त्यात ते यशस्वीही झालेत! तळं पुन्हा हसायला लागलंय!:)
क्रान्ति
अग्निसखा
11 Oct 2009 - 8:49 am | सहज
बदलाला, बहराला वय नसतं
सुंदर
11 Oct 2009 - 9:47 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
सुं द र!
10 Oct 2009 - 10:39 pm | प्राजु
सुरेख!!
- प्राजक्ता पटवर्धन
http://praaju.blogspot.com/
11 Oct 2009 - 7:05 am | धनंजय
( तळ्यात दगडाचे टप्पे-टप्पे काढायला आवडणारा - पण या जखमी तळ्यात नाही टाकणार दगड :-) )
धनंजय
11 Oct 2009 - 3:53 pm | भोचक
कुणास ठाऊक क्रांती हे मुक्तक वाचून कुसुमाग्रजांची याच आशावादी सुराची 'कणा' कविता आठवली. बाकी लेखन छानच. स्पष्टीकरणामुळे मुक्तक अधिक छान कळलं.
(भोचक)
तुम्ही पत्रकार आहात? कोणत्या पक्षाचे?
हा आहे आमचा स्वभाव
11 Oct 2009 - 6:05 pm | मीनल
ए वन क्लास लेखन.
टॉप!!!!!!
मीनल.
12 Oct 2009 - 1:33 pm | फ्रॅक्चर बंड्या
मस्तच...
12 Oct 2009 - 2:32 pm | विशाल कुलकर्णी
सुंदर !
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"