`बाल'हट्ट

आपला अभिजित's picture
आपला अभिजित in जनातलं, मनातलं
30 Sep 2009 - 12:03 am

""बाबा, मला जादूचे प्रयोग बघायचेत.''
आमची "लाडली लक्ष्मी' हट्ट धरून बसली होती.
मध्यंतरी टीव्हीवर "छोटा चेतन,', "भूतनाथ'वगैरे पाहिल्यापासून तिची ही इच्छा अधिकच चिघळली होती. त्यामुळे गणपतीच्या आधीपासून अशा संधीच्या शोधात होतो. गणपतीत-नवरात्रात बरेच ठिकाणी जादूच्या प्रयोगांची जाहिरात होती, पण वेळ जमण्यासारखी नव्हती. अशा सार्वजनिक प्रयोगांना जाण्याबद्दल वावडं नव्हतं, पण तिथली सोय आणि व्यवस्था यांविषयी शंका होत्याच. एवढं करून गर्दीतून प्रयोग नीट दिसला नाही, तर सगळंच मुसळ केरात, असं वाटलं होतं. त्यातच अचानक गेल्या गुरुवारी "सकाळ'मध्येच जादूगार संजय रघुवीर यांच्या प्रयोगांची जाहिरात वाचली. प्रयोग रविवारी सकाळी भरत नाट्य मंदिरात होता. सर्वच बाबतीत सोयीचा होता आणि तिकीटदरही परवडण्याच्या घरातले होते. तातडीनं शुक्रवारी बुकिंग करून टाकलं. तरीही, सातवी रांग मिळाली म्हणून जरा नाराजी होतीच!
रविवारी फारशी काही कामंधामं नव्हती, त्यामुळे वेळेत नाट्यगृहात पोचलो. प्रयोगही बऱ्यापैकी वेळेत सुरू झाला. रत्नागिरीत असताना रघुवीर, जादूगार भैरव यांचे प्रयोग पाहिले होते. त्यावेळी ते फारच भव्यदिव्य वाटले होते. माणसाचे दोन तुकडे करणं, तलवारी खुपसणं, पेटीतला जादूगार गायब होऊन प्रेक्षकांतून बाहेर येण्यासारखे प्रयोगांनी विलक्षण गारूड केलं होतं. अगदी तसंच नाही, पण तत्सम काही पाहायला मिळेल, अशा समजात मी होतो. मनस्वी पहिल्यांदाच जादूचे प्रयोग पाहत असल्यानं, तिच्या विशेष काही अपेक्षा नव्हत्या बहुधा. बऱ्याचदा पालकच मुलांच्या इच्छाआकांक्षांविषयी चुकीचे ग्रह करून घेतात, हे या वेळी प्रकर्षानं जाणवलं.
सुरुवातीला हातचलाखीचे आणि नंतर काहीसे अवघड आणि मोठ्या स्वरूपाचे प्रयोग झाले. मला आणि हर्षदालाही कुठल्याच प्रयोगात काही गम्य वाटलं नाही. लाकडी बॉक्‍समधून ठोकळा गायब करणं, पत्ते मोठे करणं, झोपलेला माणूस तरंगवणं, अशा स्वरूपाचे प्रयोग अगदीच साधे आणि कालबाह्य वाटले.
लहानपणी गणेशोत्सवात, अन्यत्रही असे प्रयोग पाहून अनेकदा भारावलो होतो. किंबहुना, चार वर्षापूर्वी गोव्यात फिल्म फेस्टिव्हलला गेलो, तेव्हाही गर्दीत हातचलाखीचे खेळ करणाऱ्या एका कलाकाराच्या कलेनं खूप प्रभावित झालो होतो. हे प्रयोग मात्र अगदीच सामान्य दर्जाचे वाटले. जादूगाराची हातचलाखी, बोलण्याची आणि प्रेक्षकांशी संवादाची पद्धतही अगदीच सामान्य होती. अगदी रिकाम्या पिशवीतून पेट्या किंवा काही वस्तू काढण्याच्या प्रयोगांबद्दल मात्र थोडंसं अप्रूप वाटलं.
सादरीकरणाच्या बाबतीतलं बुद्धिदारिद्य्रही अगदीच त्रासदायक होतं. गबाळे कपडे घातलेले दोन सहायक आणि त्यांच्याहून जरा कमी गबाळे कपडे घातलेला जादूगार पाहायला पैसे देऊन थिएटरात कशाला यायचं, असाच प्रश्‍न निदान मला तरी पडला. "हे सगळं खोटं आहे,' हे माहीत असूनही निदान जादूगाराच्या हातचलाखीला दाद देण्याची संधी तरी काही वेळा मिळते. या वेळी त्याचाही अभाव जावणवला. एकंदरीत पैसे आणि वेळ फुकट गेल्याचा अनुभव मिळाला.
मनस्वी थोडीशी कंटाळली, पण एकंदरीत तिला फार काही दुःख झालेलं वाटलं नाही. ती बऱ्यापैकी आनंद घेत होती या प्रयोगाचा. शिवाय तिचा नेहमीचा खुराकही तिला मिळाला होता. आईवडिलांची संगतही होती. तिचं फारसं काहीच बिघडलं नव्हतं.
अर्थात, मुलांसाठीच्या कार्यक्रमासाठी अतिउत्साहानं जाऊन तोंडघशी पडण्याची ही माझी काही पहिलीच वेळ नव्हती! गेल्या वर्षी मनस्वीला पहिल्यांदाच बालनाट्य दाखवायला याच नाट्यगृहात घेऊन गेलो होतो. नाटक होतं - "हिमगौरी आणि सात बुटके'. अगदीच प्राथमिक दर्जाचे बालकलाकार, त्यांचं नाटकी बोलणं, कोणत्याही आधुनिक साहित्याचा समावेश नसलेला सेट आणि जुनाट, अतिप्राचीन सादरीकरण आणि संवाद यांनी अगदी उबग आणला होता. मनस्वीला त्यातली सर्वाधिक आवडलेली गोष्ट म्हणजे चेटकीण आणि तिचं हसणं! "पैसे वसूल' या संकल्पनेत तिला तेवढं पुरेसं होतं.
यंदा "माकडाचं लग्न' आणि तशाच प्रकारच्या तीन एकांकिकांच्या एकत्रित प्रयोगाला तिला घेऊन गेलो होतो. हे तरी बरे असतील, या अपेक्षेनं. ते "हिमगौरी'पेक्षा वाईट होते. सई परांजपेंच्या "झाली काय गंमत'चा गंभीर शेवट पाहून तर हसावं की रडावं, हेच कळेना. एकतर अनेक वर्षांपूर्वी लिहिलेली ही नाटकं. त्या वेळची सामाजिक, सांस्कृतिक परिस्थिती निराळी. ती नाटकं तशीच्या तशी उचलून सादर करायची अवदसा काय म्हणून या संस्थांना सुचली असावी, असाच प्रश्‍न नाटकाची सुरवात झाल्यापासून मला छळत राहिला.
हल्ली टीव्ही हा मुलांच्या आयुष्याचा एक भाग झाला आहे. "आई, ऐकलंस ना? शुद्ध पाणी ही प्रत्येक आईची जबाबदारी आहे. तू पण मला असंच पाणी दे' असं आमची अंगठ्याएवढी पोरगी स्मृती इराणीची जाहिरात पाहिल्यापासून आम्हाला गेल्या सहा महिन्यांपासून ऐकवत आहे. टॉम अँड जेरी, भीम, हे तिचे रोजचे स्वप्नातले आणि प्रत्यक्षातले सवंगडी झाले आहेत. राक्षस, देव, परी, यांच्याकडे भरपूर ताकद आणि शक्ती असते आणि त्यांचंच आयुष्य हे खरं आयुष्य, असा तिचा ठाम समज आहे. कॉंप्युटर स्वतः सुरू करून ती गेमसुद्धा खेळत बसू शकते. अशा पिढीतल्या या मुलांना जुनाट विचारांची, जुनाट सादरीकरणाची आणि अगदी सामान्य दर्जाची कालबाह्य बालनाट्ये का बरे दाखवतात ही मंडळी? त्यांच्या काळाशी, त्यांच्या विचारांशी आणि बुद्धीच्या एकूण आवाक्‍याशी साधर्म्य राखणारी नवी नाटके का बरे लिहीत नाहीत? त्यांना आपल्याशा वाटणाऱ्या व्यक्तिरेखा का बरे निर्माण करत नाहीत? त्यांना आवडेल आणि आपलेसे वाटेल, असे सादरीकरण का करत नाहीत? सत्तर-ऐंशीच्या दशकातली अतिआदर्शवादी विचारांची बालनाट्यं त्यांनी का पाहावीत? नव्या जमान्याला आणि आयुष्याच्या वेगाला साजेशी नाटकं पाहायला मिळणं, हा त्यांचा हक्क नाही?
असो. दिवाळीची सुटी लवकरच लागेल. पुन्हा बालनाट्यांचं पीक येईल. एका सर्वसामान्य पालकाच्या या विचारांची कुणीतरी दखल घेईल आणि या परिस्थितीत अल्पशी सुधारणा होईल, या अंधुक आशेवर हा विषय इथेच सुफळ संपूर्ण.

मुक्तकविरंगुळा

प्रतिक्रिया

संदीप चित्रे's picture

30 Sep 2009 - 1:24 am | संदीप चित्रे

बालनाट्य आणि जादूच्या प्रयोगांची अशी स्थिती आहे तर !
काळाशी सुसंगत नवीन संदर्भ घेऊन कसदार लेखन मुलांसाठी व्हावं या मताशी सहमत.
संदीप खरेची 'अग्गोबाई ढग्गोबाई' आणि इतर बालगीतं म्हणूनच तर वेगळी ठरलीयेत. म्हटलं तर संदीप त्यातून मुलांना 'लाईफ व्हॅल्युज' सांगतो पण त्यांना आवडतील अशा रूपकांतून.

प्राजु's picture

30 Sep 2009 - 9:27 am | प्राजु

अग्गोबाई ढग्गोबाई... !! बेस्ट आहे. यातली गाणी मुलांना जवळची वाटतात.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

युयुत्सु's picture

30 Sep 2009 - 9:06 am | युयुत्सु

नेहमीचे तेच तेच जादूचे प्रयोग बघायचा कंटाळा आला असेल तर Ursula Martinez चे जादूचे प्रयोग नेट वर बघा. तब्येत एकदम खूष होउन जाईल.

- युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||

अर्थ - कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल

आपला अभिजित's picture

30 Sep 2009 - 10:17 am | आपला अभिजित

नेहमीचे तेच तेच जादूचे प्रयोग बघायचा कंटाळा आला असेल तर Ursula Martinez चे जादूचे प्रयोग नेट वर बघा. तब्येत एकदम खूष होउन जाईल.

व्वा!

ऍडीजोशी's picture

30 Sep 2009 - 11:03 am | ऍडीजोशी (not verified)

ursula martinez सर्च केल्यावर ursula andress हेच नाव आलं राव सगळीकडे. आम्ही आपलं तिचेच प्रयोग बघून मनाचं समाधान करून घेतलं :)

कानडाऊ योगेशु's picture

30 Sep 2009 - 12:50 pm | कानडाऊ योगेशु

AXN चॅनेलवर दर गुरुवारी रात्री १० वाजता मॅजिक सेक्रेट्स रिव्हिल्ड का असेच काहीतरी शीर्षक असलेला कार्यक्रम लागतो.आतापर्यंत दोन एपिसोड झालेले आहेत आणि बघताना जाम मजा येते.