भोंडला

क्रान्ति's picture
क्रान्ति in जे न देखे रवी...
21 Sep 2009 - 9:18 am

नवरात्राचे दिवस म्हणजे हादग्याचे, भोंडल्याचे, भुलाबाईचे दिवस. लहानपणीच्या भोंडल्याच्या संध्याकाळी आठवताना सुचलेलं काहीबाही!

सये बाई संसार मी भुलाबाईचा मांडला
अंगणात संध्याकाळी आठवणींचा भोंडला

रांगोळीनं पाटावर हत्ती रेखला देखणा
सेवा स्वीकाराया आला दारी गणेश पाहुणा
खेळ ऐलमा पैलमा गणरायानं मांडला
अंगणात संध्याकाळी आठवणींचा भोंडला

कमळाच्या मागे राणी, हन्मंताची निळी घोडी
धाडू माहेरी करंज्या, त्यांची आगळीच गोडी
मन भरून आनंद गाण्यांतून ओसंडला
अंगणात संध्याकाळी आठवणींचा भोंडला

कसं माहेर साजिरं, कसं सासर ते द्वाड
माहेरानं दिलं प्रेम, केली माया जिवापाड
सासरच्या वाटे काटे, श्वास उरात कोंडला!
अंगणात संध्याकाळी आठवणींचा भोंडला

बाळपणीचा भोंडला हरपला थोरपणी
कुठं शोधू ते अंगण ? कुठं वेचू आठवणी ?
विखुरल्या खिरापती, डबा कधीचा सांडला!
अंगणात संध्याकाळी आठवणींचा भोंडला

सोळा वर्षं भोंडल्याची गेली कधीची सरून
आता कोरडेच हस्त, गाणी गेले विसरून
फेर संपता संपेना; देह, प्नाण भोवंडला
अंगणात संध्याकाळी आठवणींचा भोंडला

शांतरसकविता

प्रतिक्रिया

सोनम's picture

21 Sep 2009 - 9:24 am | सोनम

कविता खुपच छान आहे......... :) :) मला ही लहानपणीचा भोंडला आठवला...... :( :( आमच्या शाळेत आम्ही भोंडला करत असायचा........आता उरल्या त्या फक्त आठवणी... :( :(

श्रावण मोडक's picture

21 Sep 2009 - 9:39 am | श्रावण मोडक

सोळा वर्षं भोंडल्याची गेली कधीची सरून
आता कोरडेच हस्त, गाणी गेले विसरून
फेर संपता संपेना; देह, प्नाण भोवंडला
अंगणात संध्याकाळी आठवणींचा भोंडला

अगदी बालपणची आठवण. पहिलीत वगैरे असेन. खिरापत हे आकर्षण आणि त्यापोटीची ती वाट पाहण्याची स्थिती. या कडव्यात म्हटलं तसं आता गेली ती वर्षं सरून...
अवांतर - प्नाण? प्राण?

पुष्कर's picture

21 Sep 2009 - 10:56 am | पुष्कर

म्हणतो. खूप भावपूर्ण कविता.

पुष्कर

विशाल कुलकर्णी's picture

21 Sep 2009 - 10:49 am | विशाल कुलकर्णी

छान कविता ! क्रांतीतै लगे रहो ! :-)

सस्नेह
विशाल
*************************************************************

आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

स्वाती२'s picture

21 Sep 2009 - 5:28 pm | स्वाती२

खूप छान कविता.

नंदू's picture

21 Sep 2009 - 5:30 pm | नंदू

सोळा वर्षं भोंडल्याची गेली कधीची सरून
आता कोरडेच हस्त, गाणी गेले विसरून
फेर संपता संपेना; देह, प्नाण भोवंडला
अंगणात संध्याकाळी आठवणींचा भोंडला

छानच.
कविता आवडली.
"भोवंडला" छान शब्दकळा.

नंदू

प्राजु's picture

21 Sep 2009 - 8:05 pm | प्राजु

फार फार सुरेख!!!
बाळपणीचा भोंडला हरपला थोरपणी
कुठं शोधू ते अंगण ? कुठं वेचू आठवणी ?
विखुरल्या खिरापती, डबा कधीचा सांडला!
अंगणात संध्याकाळी आठवणींचा भोंडला

मन उदास झालं गं हे वाचून.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

लवंगी's picture

22 Sep 2009 - 6:45 am | लवंगी

भोंडला चांगला ग, पण खूप उदास करुन गेला.

पद्मश्री चित्रे's picture

22 Sep 2009 - 9:39 am | पद्मश्री चित्रे

>>अंगणात संध्याकाळी आठवणींचा भोंडला

एक ओळ कित्ती तरी सांगून जाते..
सुरेख लिहिलं आहे

अजिंक्य's picture

22 Sep 2009 - 12:35 pm | अजिंक्य

छान कविता.
बाळपणीचा भोंडला हरपला थोरपणी
कुठं शोधू ते अंगण ? कुठं वेचू आठवणी ?
विखुरल्या खिरापती, डबा कधीचा सांडला!
अंगणात संध्याकाळी आठवणींचा भोंडला

आवडलं. बाकी वरील सर्व प्रतिक्रियांशी सहमत.
(कविता मनाला उदास करून गेली. अतिशय प्रभावी.)
पुलेशु.
अजिंक्य.

पर्नल नेने मराठे's picture

22 Sep 2009 - 1:53 pm | पर्नल नेने मराठे

१ लिम्बु झेलु बाइ २ लिम्बे झेलु ;;)

फेर संपता संपेना; देह, प्नाण भोवंडला
अंगणात संध्याकाळी आठवणींचा भोंडला :S

चुचु

मनीषा's picture

22 Sep 2009 - 3:49 pm | मनीषा

सये बाई संसार मी भुलाबाईचा मांडला
अंगणात संध्याकाळी आठवणींचा भोंडला
भोंडला छानच मांडला आहे ...
( कधी अचानक, कधी सहज येणारी सुख - दु:ख ही या भोंडल्याची खिरापत ना?)