सोनाली माझ्या ऑफीसमधली एक सहकारी. नेमून दिलेले काम अगदी वेळेवर करायचे हई तिची खासीयत.
थोडिशी अल्लड खट्याळ,इनोसंट कोणी कधी चेष्टा केली तरी खेळकरपणे घेणारी.छोट्या छोट्या गप्पातही ती मनमोकळे इनोसंट हसायची तिचा जेंव्हा इंटर्व्ह्यू झाला तेंव्हा या मनमोकल्या हसण्याने तीने तो इंटर्व्ह्यू तीने सहज जिंकला होता.
ऑफिसात जनसंपर्काचे काम तिच्याकडे. विषेश करून प्रथमच आलेले क्लायन्ट ती फार सुंदर रीतीने हाताळायची. त्याना एकदम घरगुती वातावरणात आणून ठेवायची.
काय अशी जादू होती कोण जाणे पण तिच्याशी बोलल्यावर प्रत्येकाला ती अगदी घरातली एखादी बहीण्/वहिनी असावी अशीच भावना निर्माण व्हायची. अन त्यामुळे बोलताना येणार्या ऑफीशीयल व्यावसायीकतेची अडचण एकदम नाहिशी व्हायची.
एक दिवस तिचा फोन आला. तिचे वडील आजारी होते त्यामुळे ती काही काळासाठी ऑफीसात येणार नव्हती.
तिच्या वडीलांचा भिक्षुकीचा व्ययसाय होता. त्याना ब्लड कॅन्सर डिटेक्ट झाला होता. आजाराची स्टेज असाध्य होती. ते याच अजाराने जाणार हे सर्वाना कळून चुकले होते.
सोनाली च्या चेहेर्यावर या गंभीर आजाराची पुसटशी सुद्धा छाया नव्हती. आम्हाला सर्वानाच तिच्या या वागण्याचे आश्चर्य वाटत होते. वडीलांच्या मागे तिच्यावर पडण्यार्या जबाबदार्यांची तिला जाणीव नव्हती की ती तसे दाखवत नव्हती हे कळायला मार्ग नव्हता. ती तिची म्हातारी आई, लग्न झालेली मोठी बहीण एवढेच काय तिचे जवळचे लोक.
एक दिवस मला रात्री साडेनऊ वाजता माझ्या एका सहकार्याचा फोन आला. " सोनालीचे वडील गेले. लगेच इकडे ये? "
मी रात्री दहा च्या सुमारास तिच्या घरी पोहोचलो. फोन करणारा सहकारी बाहेरच भेटला. त्याने थोडेसे काही सांगितले
तिच्या घरातले दृष्य अक्षरशः सुन्न करणारे होते.
सोनाली आणि तिची म्हातारी आई दोघी एका कोपर्यात शांत बसून होत्या. वडील जमिनीवर एका गादीवर होते. जिवंतपणाची कोणतीच खूण त्यांच्या उरली नव्हती.
त्या एका खोलीच्या घरातच लुगड्याचे पार्टीशनकरून दोन खोल्या करण्यात आल्या होत्या . घरात इतर कोणीच नव्हते.
सोनालीला विचारले तेंव्हा ती रडत नव्हती पण तिचा अल्लडपणा हरवला होता. डोळे कशाचातरी वेध घेत शून्यात होते. वडील दुपार पर्यन्त खोकत होते ते खोकायचे बंद झाले त्यालाही जवळ जवळ चार/पाच तास उलटून गेले होते. त्यांच्या श्वास बंद झालाय आणि ते गेले हे सांगून डॉक्टर निघून गेले होते.
वाड्यातल्या आजूबाजूच्या घरातून टीव्ही सिरीयल चे आवाज येत होते.
सोनाली ला विचारून मी तिच्या नातेवाईकाना फोन लावले. बाहेरगावच्या नातेवाईकानी आत्ता एसटी नाही सकाळच्या गाडीने येतो असे सांगितले. सख्ख्या बहिणीने सुद्धा असेच सांगितले. गावातल्या नातेवाईकानीही अशीच काहितरी उत्तरे दिली. अंत्ययात्रा कधी काढणार याची विचारणा सुद्धाकेली नाही
सोनालीची आई काहीच बोलत नव्हती. जे काही होतय ते बहुधा तिला अपेक्षीत असावे .
मला फोन करणारा सहकारी संध्या काळपासून तिथेच होता . तो पोरगेलेसाच होता. त्याला काहीच कळत नव्हते. नातीवाईक ,शेजारी/पाजारी यांचे रीस्पॉन्सेस मला धक्कादायक होते. जिथे सांत्वन करायला यायला कोणी तयार नव्हते तेथे अंत्ययात्रेला कोणी येईल का हाच प्रश्न होता. मी माझ्या काही मित्राना फोन केले . सकाळी एका अंत्ययात्रेला जायचे आहे तयारी ठेवा असे सांगितले. पाचसहा जण तयार झाले.
माझ्या सहकार्याला मी घरी जाऊन यायला सांगितले
डॉक्टरांकडे जाऊन कायदेशीर बाबिची पूर्तता करून घेतली.
अंतयात्रेसाठी आमची अडचण अशी होती की आम्ही अधिकृत नातेवाईक नव्हतो. नुसत्या सहानुभूतीचा उपयोग नव्हता. सकाळी केंव्हातरी सोनालीची मोठी बहीण आली. तिच्या सासर्यानी अंत्ययात्रेची तयारी केली वाड्यातल्या इतर घरातल्या लोकाना गोळा करून आणले. पुरेसे लोक जमल्यावर अंत्ययात्रा निघाली.
हा प्रसंग मनाला चरा पाडून गेला. मनाशी ठरवले की आपण मेल्यावर आपल्या मुलाबायकोला आपल्या प्रेतासोबत असे एकटेच बसु द्यायचा प्रसंग येऊ द्यायचा नाही.
मनात अनेक वेळा त्या घटनेची सचित्र पारायणे झाली. डोळे मिटले की ते घरात भिंती शेजारी पडलेले प्रेत, अपिरीचित चेहृयाची सोनाली आणि ती तिची काहीच भाव व्यक्त न करणारी अबोल म्हातारी आई डोळ्यासमोर यायचे.
कोण्या माणासासोबत हे असे का घडत असेल हा प्रश्न पुन्हा पुन्हा पडायचा. एका मित्राला असाच हा प्रसंग सांगितला. त्याने दिलेले उत्तर फारच मार्मिक होते.
तो म्हणाला "लोका तुमच्या बरोबर संबन्ध ठेवत नाहीत कारण त्यासाठी तुम्हीसुद्धा त्यांच्यासोबत संबंध ठेवायचे असतात .कदाचित ते इतरांशी नेहमी फटकून वागले असतील त्यामुळे असू शकेल"
मला त्यावेळी हे उत्तर थोड्या वेळेसाठी पटले.
माणूस जिवन्त असेपर्यन्त हे ठीक आहे पण मेल्यानन्तरसुद्धा...................? माणूसकी...मरणान्तान्ती वैराणी.......वगैरेचं काय?
आपल्या संदर्भात हे असे होऊ नये ............... हे लिहितानासुद्धा माझ्या डोळ्यापुढे ते दृष्य येत आहे.
प्रतिक्रिया
20 Sep 2009 - 4:15 pm | मदनबाण
ह्म्म्...माझ्या मित्राचे वडील अचानक अॅटॅक येऊन गेले तेव्हाही त्यांच्या घरचे असे कोणी नव्हते, ना जवळचे नातेवाईक लवकर येऊ शकत होते...आम्ही मित्रांनीच शेवटी थोडी फार मदत केली...बिल्डींगमधुन त्यांचे प्रेत खाली आणताना त्यांचे (मृतदेहाचे) दोन्ही पाय माझ्याच खांद्यावर होते...तेव्हाही असेच काहीसे विचार माझ्याही मनात आले होते.
काही दिवसांपुर्वीच अजुन एका मित्राचे वडील गेले...जेव्हा मित्राला मी फोन लावला...(तेव्हा मला माहित नव्हते की त्यांच्या वडिलांना अॅडमिट केले आहे...)सहज बरेच दिवस फोन केला नव्हता म्हणुन मी त्याला कॉल केला होता...वडील कोमात गेले असं म्हणाला...जवळ स्मशानभूमी कुठे आहे हा त्याचा प्रश्न होता !!! त्याच्याही मदतीला मित्रपरिवारच कामी आला.
मदनबाण.....
तुम्ही किती जगलात ह्यापेक्षा कसं जगलात याला जास्त महत्त्व आहे.
काय होणार ?
http://www.timesnow.tv/videoshow/4327745.cms
20 Sep 2009 - 4:15 pm | टारझन
वा विजु भाऊ ... जे काही लिहीलंय ते एकदम सुरेख पद्धतीनं लिहीलंय ..
अगदी भावनिक झालो ! खरंच शेजारी मयत झालेली असताना सिरीयल पहाणारे महाभागंच म्हंटले पाहिजेत .. नातेवाईकांच्या वागण्याला काही हिष्टी असावी.
अजुन तरी मी हट्टाकट्टा असल्यानं मरणाचा विचार करत नाही.
-(अंमळ हळवा) टारझन
20 Sep 2009 - 4:18 pm | प्रसन्न केसकर
लिखाण केलंय भाऊ. पुर्वी एकदोनदा बघितलं की अंत्ययात्रेला बरेच लोक आले तरी खांदा कुणी देत नाही. तेव्हापासुन ठरवलं की शक्यतो अश्या ठिकाणी बरोबर कुण्या समविचारी मित्राला घेऊन जायचं म्हणजे वेळेला पुढे येता येतं. पण सोनालीचं पुढे काय झालं. तिच्यावर या घटनेचा खूपच परिणाम झाला असेल ना? ते तिच्या वागण्यात जाणवलं का?
--
Grant me the serenity to accept the things I cannot change, the courage to change the things I can, and the wisdom to know the difference. --Reinhold Niebuhr
20 Sep 2009 - 4:25 pm | प्रभो
अगदी मनातलं बोललात विजुभाऊ..
म्हणूनच कोणीतरी म्हटलय.......मित्र असो वा शत्रू ...सुखात आणी दुख्खात सामील व्हावं... मला तर सोनालीपेक्षा तिच्या नातेवाईकांची जास्त कीव वाटते...
-(वरून टणक पण आतून हळवा) प्रभो
20 Sep 2009 - 4:46 pm | विनायक प्रभू
ये सुसाटी अपणी है विजुभौ
20 Sep 2009 - 4:48 pm | पाषाणभेद
वा विजूभौ, एकदम सुन्न करून टाकल तुम्ही.
अवांतर: काल मागणी केली अन आज चांगला लेख हजर. छान. (अवांतर लिहीणार नव्हतो पण आजकाल ईतर लेख / कौलं असे यायला लागले की लिहावेच लागले.)
-----------------------------------
आणि हो, सांगायच राहूनच गेलं, या विधानसभेच्या ईलेक्शनदरम्यान मी नविन कार घेणार आहे.
- पाषाणभेद उर्फ दगडफोडीची सजा मिळालेला दगडफोड्या
20 Sep 2009 - 5:08 pm | दशानन
सुन्न करणारा अनुभव !
***
राज दरबार.....
20 Sep 2009 - 7:38 pm | अवलिया
हेच म्हणतो. सुन्न करणारा अनुभव.
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
21 Sep 2009 - 2:39 am | गणपा
असेच म्हणतो. सुन्न करणारा अनुभव.
चटका लावून गेल.
20 Sep 2009 - 5:09 pm | चतुरंग
ह्यावर लोकांशी असलेले संबंध ठरतात. तुम्ही लोकांसाठी उपयोगी पडलात तर लोक तुम्हाला निदान शेवटच्या काळात तरी विचारतील.
सोनालीच्या फॅमिलीची हिस्टरी माहीत नाही त्यामुळे आधी नेमके काय घडले, वडिलांचे इतरांशी संबंध कसे होते ते समजणे शक्य नाही, परंतु मेल्यानंतरही ढुंकून बघू नये इतका कोरडेपणा लोकात यावा हे अवघडच.
(लेखाचं शीर्षक जरासं विचित्र वाटतंय - चटकन काही अर्थबोध होत नाहीये.)
चतुरंग
21 Sep 2009 - 1:02 am | चित्रा
असेच म्हणते.
तरी शेजार्यांची उदासिनता खटकण्यासारखीच आहे.
20 Sep 2009 - 6:29 pm | स्वाती२
सुन्न करणारा अनुभव !
20 Sep 2009 - 6:34 pm | बिपिन कार्यकर्ते
लहानपणापासून माझी आई तिच्या वडलांच्या तोंडचं एक वाक्य सांगते... "बारश्याला नाही गेलं तरी चालेल, पण बाराव्याला गेलंच पाहिजे" ... अर्थ हाच की सुखापेक्षा दु:खात इतरांना साथ आणि मदत जास्त करावी. आत्ता पर्यंत तरी त्याप्रमाणे वागायचा प्रयत्न करतोय. अशा प्रसंगी पुढे होऊन सगळे सांभाळून घेऊन नीट पार पाडणे हे मी कर्तव्य आणि एक पुण्यकर्म म्हणून करतो.
बिपिन कार्यकर्ते
20 Sep 2009 - 6:39 pm | दशानन
+१
असेच म्हणतो....
माझे एक नेहमी वापरातील वाक्य... सर्व दरवाजे कधीच बंद करु नयेत.. कोण कधी उपयोगी पडेल सांगता येणार नाही.
***
राज दरबार.....
20 Sep 2009 - 7:13 pm | श्रावण मोडक
+२. अगदी मीही ऐकलेलं आहे हे.
20 Sep 2009 - 8:37 pm | लवंगी
सुखात दिली नाहि तरी दु:खात साथ द्यावी
20 Sep 2009 - 7:07 pm | सुबक ठेंगणी
बिपिनदा, राजे खूप सही बोललात!
विजुभाऊ खरंच सुन्न करणारी, अंतर्मुख करणारी गोष्ट!
20 Sep 2009 - 7:59 pm | अनामिका
विजुभाऊ!
तुमच्या या अनुभव कथनाने मला लिहायला प्रवृत्त केले........३१ऑगस्ट २००९ रात्री परतीच्या प्रवासाला निघायचे या कारणाने सामानाची बांधाबांध व इतर लगबग सुरू असतानाच मोबाईलवर फोन आला,नंबर आत्ये दिराचा असल्याकारणाने काय रे आत्ता आठवण झाली का?हा प्रश्न विचारण्याच्या बेतात होते....पण पलिकडचा कापरा आवाज ऐकुन कोण बोलतय हा प्रश्न आपसुकच विचारला गेला...पलिकडे नुकतच लग्न होऊन कुटुंबात प्रवेश केलेली जाऊ होती.....इतकच म्हणाली "वहिनी आई गेल्या" ...मी एकदम सुन्न झाले ....तरीही मन घट्ट करुन तिला घरी कुणि आहे का ? असे विचारले असता म्हणाली ."घरी कुणीच नाही.. हे थोड्यावेळापुर्वीच ऑफिसला गेलेत्.........मला काही कळत नाहि .मी ताईंना फोन केलाय त्या निघाल्यात यायला.....माझ्या कडे फक्त इतर नातेवाईकांपैकी तुमचाच नंबर होता म्हणुन तुंम्हालाच आधी कळवतेय्....तुंम्ही जरा सगळ्यांना कळवाल का?"मी हो म्हणुन तिला १५ मिनिटात पोहोचते असे सांगुन फोन ठेवला. ....सगळ्यांना कळवताना चुलत सासर्यांना प्रथम फोन केला जे एकाच शहरात राहतात... कधी गेली ?कशी गेली ? कश्याने गेली?इतकेविचारुन त्यांनी फोन संभाषण अर्धवट असताना चक्क ठेऊन दिला......मला वाट्ले धक्का बसला असेल्..मी पण इतरांना कळवुन .तिकडे जायला निघाले.....जवळपास ३ वाजता पुण्याहुन इतर नातेवाईक आल्यावर सासुबाईंना न्यायची वेळ झाली तरी एकाच शहरात राहणार्या सख्ख्या बंधुराजांचा अथवा त्यांच्या चिरंजीवांचा पत्ता नव्हता..अर्थात सगळे कार्य आटोपले तरीही त्यांनी येण्याची तसदी घेतली नाही..आणि नंतरच्या कार्याला देखिल नाही.
सख्ख्या भावंडांमधे इतका कोरडेपणा असु शकतो मुळात हि कल्पना मनाला पटत नाही.......भावंडांमधे वाद असु शकतात पण वैर देखिल असु शकत हे मात्र आकलनशक्तीच्या पलिकडच आहे.?...
"अनामिका"
जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे।
ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।
20 Sep 2009 - 11:33 pm | अडाणि
अश्या वेळी समाज किती निश्ठूर अशू शकतो त्याचा अनुभव येतो...
ह्यावरून मराठीत एक म्हण आहे - कितीही वेगळे राहीले तरी चार खांदेकरी येतील एवढा समजाशी संबध ठेवावा लागतो.
-
अफाट जगातील एक अडाणि.
21 Sep 2009 - 6:43 am | सहज
अश्या वेळी काय करावे याचा एक माहीतीपूर्ण लेख जालावर आला पाहीजे.
21 Sep 2009 - 10:58 am | हर्षद आनंदी
मृत व्यक्तीचा दाखला घेऊन, जन्म-मृत्यु कक्षात जाऊन स्मशान पास घ्यावा.
ससुन, विश्रामबाग वाडा, वैकुंठ अश्या ठिकाणी हि कार्यालये आहेत.
अश्या वेळी समाजातील कोण्या जाणत्या व्यक्तीकडुन आवश्यक वस्तुंची यादी घ्यावी. न मिळाल्यास, असे सामान मिळणार्या दुकानात जाऊन मृत व्यक्तीचे लिंग, जात, धर्म, वय एवढे सांगितले कि सर्व मिळते. अंदाजे खर्च १०००/- पर्यंत येतो.
पुण्यात नेहरु चौक आणि मंडई या परीसरात अशी २ दुकाने आहेत.
21 Sep 2009 - 10:51 am | हर्षद आनंदी
माणुस मेला कि वैर संपवावे... हे आपली संस्कृती रामा-कृष्णापासुन शिवरायापर्यंत सोदाहरण सांगते, आपण मात्र गीतेचे पाठ घोकत, मानवतेपासुन दुर जातो.
शेजारी कोणी मृत पावले असता, टी. व्ही बघत बसणार्यांना मनापासुन सलाम!!
माझी आजी, डायलसीस साठी घरातुन बाहेर पडली ती कायमचीच, बेडवर डायलिसीस चालु होण्याआधीच ती गेली. ती वेळ सकाळी ८:१५. शेजारी मामा एकटाच होता, पुर्ण भंजाळला होता... त्याने आम्हाला कळवले ८:२५ ला... आम्ही पोहोचलो ८:४५ ला.. सर्वांना फोन केले माणसे बोलवली, पण १२:४५ पर्यंत मामा, मी आणि मामाचा १ मित्र एवढेच लोक हॉस्पीटल मध्ये होतो
हॉस्पीटल : दीनानाथ मंगेशकर
मामाचे सख्खे नातेवाईक दीनानाथ पासुन १० मिनिटावर (चालत) रहातात. तरी १२:४५ पर्यंत कोणी आले नव्ह्ते, १२:४५ ला आले, अंतयात्रा ५:०० वाजते आहे हे कळल्यावर ४:५० ला घरी आले. नंतर थेट कार्याला जेवायच्या वेळेच्या आधी ३० मिनिटे आले.
हा अनुभव मला फार धक्कादायक होता, कारण आमच्या समाजातील झाडून सारी माणसे तीच्यासाठी आले होती, पण सख्खे नव्हते. ह्या सख्ख्या माणसांनी एका वेळी मोठी-मोठी म्हणत तीला राबवुन घेतले होते आणि तीने सुध्दा आनंदाने त्यांचे केले होते. आजी माझी सख्खी नाही, पण संबंध सख्ख्याहुन चांगले होते.
22 Sep 2009 - 9:39 am | विजुभाऊ
या सगळ्या प्रसंगात शेजारपाजारच्या घरातून एकही बाईमाणूस ;सोनाली आणि तिच्या आईच्या सांत्वनासाठी किंवा त्याना धीर देण्यासाठी हजर नव्हते. त्या ऐवजी बहुतेक घरातून टी व्ही सिरीयल चे आवाज येत होते.
अंत्ययात्रेसाठी एकदोघे जण आले गाडीपर्यन्त सोबत होते त्यानन्तर गायब झाले.
एकता कपूर च्या सिरीयल्स चुकल्या तर काय? असा प्रश्न बहुतेक बायकाना पडला असावा. पन एकंदर अनुभव सुन्न करणारा
22 Sep 2009 - 2:12 pm | पर्नल नेने मराठे
ह्म्म... माझे वडील गेले तेव्हा आईला वाटत होते कि ति रात्र तरी तिच्या चुलत बहिणीनी आमच्याकडे राहावे. पण त्याना त्यान्चे संसार मह्त्वाचे. त्या कश्या बश्या ति रात्र राहिल्या न दुसर्या दिवशी पहाटेच निघुन गेल्या. लोकाना (नातेवाइकाना ?) वेळ नाही हेच खरे.
चुचु
22 Sep 2009 - 2:15 pm | विदेश
यावर कदाचित सोनालीच भेटीगाठीनंतर प्रकाश टाकू शकेल !