`एनर्जी' आणि `टॉनिक'!

दिनेश५७'s picture
दिनेश५७ in जनातलं, मनातलं
20 Sep 2009 - 9:19 am

हेलिकॉप्टरने हवेत झेप घेतली आणि काळी पट्टी डोळ्यावर बांधून साहेब सीटवर मागे रेलून बसले. बाजूलाच बसलेल्या कार्यकर्त्याने डोळ्यांनीच खूण केली आणि हेलिकॉप्टरमधल्या तीन-चार जणांनी खिडकीतून बाहेर नजर लावली. आता पुढच्या गावात पोहोचेपर्यंत साहेब आराम करणार होते.

... अर्ध्या- पाऊण तासातच खालून धूर दिसू लागला आणि हेलिकॉप्टर घिरट्या घालू लागले. सभेचे गाव खाली दिसत होते. एका मैदानावर जमलेली गर्दी हळूहळू ठळक होत होती. कार्यकर्त्याने हळूच साहेबांना स्पर्श केला आणि क्षणात साहेब जागे झाले. डोळ्यावरची पट्टी बाजूला करून खाली डोकावत ते स्वतःशीच हसले. हेलिकॉप्टर जमिनीवर उतरले होते. पंख्यांचा वेग कमी कमी होत स्थिरावला आणि साहेब बाहेर पडले. त्यांचा चेहरा टवटवीत दिसत होता. हेलिकॉप्टरभोवती गराडा पडला होता. लांबवर एका टोकाला ढोल-ताशे वाजत होते. फटाक्‍यांची लांबलचक माळही तडतडू लागली आणि साहेबांच्या जयजयकाराच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला... साहेबांच्या चेहऱ्यावर खुशीची झाकही पसरली. नमस्कारासाठी त्यांचे हात छातीशी आले. चेहऱ्यावरही उत्साहाची रेषा उमटली. नमस्कार करून ते गर्दीसमोर किंचितसे झुकले. तेवढ्यात, टवटवीत फुलांचा एक हार त्यांच्या गळ्यात पडला. पुन्हा घोषणा दुमदुमल्या. साहेबांचा शीण कुठल्या कुठे पळाला होता. झपाझप चालत ते स्टेजजवळ आले. स्टेजवर बसलेले नेते आणि कार्यकर्ते अदबीने उठले. सगळ्यांचे हात साहेबांच्या दिशेने जोडले गेले. चेहऱ्यावर काहीसे लाचार, नम्र हास्य आणत सर्वांनी साहेबांना नमस्कार केला. हसतमुखाने त्याचा स्वीकार करत साहेब रांगेतल्या मधल्या खुर्चीत बसले, आणि पुन्हा मंडपाबाहेर ढोल-ताशांचा जोरदार तडतडाट झाला...

... हे सारे आपल्यासाठी आहे, याची जाणीव साहेबांच्या स्मितरेषेत स्पष्ट उमटली होती.

सभेला सुरवात झाली. पहिल्या वक्‍त्याने साहेबांचे नाव घेताच गर्दीतून टाळ्या, शिट्ट्या आणि साहेबांच्या नावाचा जयजयकार घुमला... साहेबांनी हवेतच हात उंचावून गर्दीला अभिवादन केले आणि शेजारी बसलेल्या नेत्याकडे त्यांनी मान वळविली. त्याच्या चेहऱ्यावरच्या धन्यतेच्या भावनेने साहेब सुखावून गेले होते... हातातल्या कागदांवरच्या कुठल्या तरी मजकुराकडे बोट दाखवत साहेब त्याच्याशी काही तरी बोलेले. त्यांनी दुसऱ्या दिशेला बसलेल्या नेत्याकडे मान वळविली. समोर छायाचित्रकारांच्या गर्दीतून फ्लॅश दणादण चमकत होते. साहेबांच्या चेहऱ्यावरची स्मितरेषा अधिकाधिक ठळक होत होती...

बाजूच्या माईकसमोर वक्‍त्यांची भाषणं सुरूच होती. साहेबांनी समोर, गर्दीकडे चोहोबाजूंनी नजर फिरवली. त्या भाषणांकडे गर्दीचंही लक्ष नव्हतं. सगळे कान जणू साहेबांचे शब्द साठवायला आतूर झाले होते. मधूनच गर्दीतून टाळ्यांचा कडकडाट झाला... कुणी तरी जिवाच्या आकांताने जयजयकार केला. तो इशारा समजून वक्‍त्याने आपले भाषणही आवरते घेतले. तो जागेवर बसला. साहेबांकडे पाहात त्यानं ओशाळा नमस्कारही केला. साहेबांनी मान हलकेच झुकवून त्याचा स्वीकार केला. टाळ्यांचा कडकडाट सुरूच होता...

... आणि सूत्रसंचालकाने साहेबांना भाषण सुरू करण्याची विनंती केली.

गर्दीला नमस्कार करीतच साहेब खुर्चीतून उठले. पुन्हा टाळ्या, शिट्ट्या आणि जयजयकार दुमदुमले. गर्दीच्या कोपऱ्यातून कुणी तरी ठेवणीतल्या आवाजात लांबलचक घोषणा देत होता. साहेब शांतपणे माईकसमोर उभे होते. घोषणा आणि टाळ्यांचा गजर हळूहळू कमी होत असतानाच साहेबांनी हात उंचावून गर्दीला शांत होण्याची खूण केली आणि क्षणात सगळे आवाज थांबले... हे सगळे आपल्या एका इशाऱ्याने होते, हा अनुभव साहेबांना नवा नव्हता. ते पुन्हा सुखावले. गर्दीकडे पाहात त्यांनी आपली नेहमीची, ठेवणीतली साद घातली. आतापर्यंत हेच शब्द कानात साठवण्यासाठी जणू आतुरलेल्या गर्दीने साहेबांचे शब्द कानावर पडताच बेभानपणे टाळ्यांचा कडकडाट केला. साहेब काही मिनिटे पुन्हा शांतपणे गर्दीकडे पाहात थांबले. त्यांच्या चेहऱ्यावर समाधान ओसंडत होते. पुढे तासभर गर्दीतला प्रत्येक कान साहेबांचे शब्द स्तब्धपणे साठवून घेत होता... सभा आटोपली, लगबगीने गर्दीला नमस्कार करत साहेब स्टेजवरून खाली उतरले. माईकसमोरचा सूत्रसंचालक गर्दी आवरण्यासाठी प्रयत्न करत होता; पण एव्हाना साहेबांभोवती गर्दीचा गराडा पडला होता. पोलिसांची धावपळ उडाली. पोलिसी शिट्ट्या घुमू लागल्या... कार्यकर्त्यांनी भोवती केलेल्या साखळीतून पुढे सरकतच साहेब गर्दीतल्या कुणाचा पुढे आलेला हात हातात घेत होते, कुणाला नमस्कार करत होते... गर्दी त्यांच्यासोबत पुढे सरकतच होती. साहेब हेलिकॉप्टरमध्ये बसले आणि गर्दी हळूहळू मागे होत गेली... हेलिकॉप्टरने पुढच्या प्रवासासाठी हवेत झेप घेतली, तेव्हा साहेबांचा चेहरा प्रसन्न दिसत होता. सोबतच्या पत्रकारांकडे पाहून त्यांनी हलकेच हास्य केले आणि गप्पा सुरू झाल्या... या सभेनंतर विजयाची गणिते आपल्याच पक्षाच्या बाजूने झुकणार असा विश्‍वास त्यांच्या बोलण्यातून डोकावत होता.

त्याच उत्साहात हेलिकॉप्टर पुढच्या गावात पोहोचले... तिथेही तोच अनुभव. तेच फटाके, घोषणा, हार, फुले, टाळ्या, शिट्ट्या आणि जयजयकार... साहेब पुन्हा ताजेतवाने झाले. जोरदार भाषण करून सभा जिंकत पुन्हा पुढच्या प्रवासासाठी ते तयार झाले. आणखी एका गावातली तशीच, सळसळती सभा आटोपलेली असते. उन्हं तळपू लागलेली असतात. सोबतच्या कार्यकर्त्यांच्या खिशातून कागदाची एक घडी बाहेर येते. या वेळी साहेबांना कोणतं औषध, कोणतं खाणं द्यायचं, त्याचं टिपण त्या कागदावर असतं. हेलिकॉप्टरमध्ये गप्पा सुरू असतानाच साहेब यांत्रिकपणे औषधाच्या गोळ्या घेत असतात. दुसरा कार्यकर्ता ताजी फळं कापून साहेबांसमोर ठेवत असतो. प्रवासातच नाश्‍ता सुरू होतो. सकाळच्या वेळी कोणतेही तेलकट, मसालेदार पदार्थ खायचे नाहीत, हे ठरलेले असते. सभा होणाऱ्या प्रत्येक गावात तसा निरोप अगोदरच गेलेला असतो आणि प्रत्येक गावात ताज्या, टवटवीत फळांची; पाण्याच्या बाटल्यांची व्यवस्था झालेली असते. पुढच्या प्रवासाला निघण्याआधी पुन्हा हेलिकॉप्टरमध्ये फळे, पाणी ठेवले जाते...

टळटळीत दुपार सुरू होते, तेव्हा ज्या गावात सभा असते, त्या गावातल्याच एका नामांकित नेत्याच्या घरी नंतर जेवणाचा बेत असतो. घरात कार्यकर्त्यांची गर्दी असते. सभा संपून साहेब इथे येतात आणि ताटकळत थांबलेल्या कार्यकर्त्यांची चौकशी सुरू होते. कुणाच्या पाठीवरून हात फिरतो, कुणी साहेबांच्या पायाला हात लावण्यासाठी वाकलेला असतो... कुणी हातातला कागद हळूच साहेबांच्या हातात कोंबतो. साहेब त्यावर सराईत नजर फिरवून तो सोबतच्या कार्यकर्त्याकडे देतात. तो कागद फाईलमध्ये गेला, हे दिसताच समाधानाने तो कार्यकर्ता बाजूला होतो.

दुपारच्या जेवणाचा बेत अगदी साधा असतो. मसालेदार आणि चमचमीत पदार्थ ताटात नसतात. चपाती आणि भाजी, दही-ताक असा हलकासा आहार घेऊन साहेब उठतात. बाहेर कार्यकर्ते असतात. मोजक्‍याच वेळात एक बैठक होते. वातावरणाची चर्चा होते. कुणाला कुठला निरोप द्यायचा असतो, कुठे कशाची तरी व्यवस्था करायची असते. भराभर सूचना करून साहेब एकीकडे वर्तमानपत्रं चाळत असतात... थोड्याशा विश्रांतीनंतर पुन्हा पुढच्या सभेसाठी निघायचं असतं.... गर्दीचं कोंडाळं मात्र भोवती घोटाळतच असतं... साहेब समाधानानं गर्दीत रमत असतात... अशाच सभांचा आणि गर्दीचा माहोल दिवसभर असतो. सभांचा उत्स्फूर्त प्रतिसाद साहेबांना सुखावत असतो. कार्यकर्ते अवतीभोवती वावरत असतात. रात्री उशिरा जाहीर सभांची वेळ संपते. शेवटच्या सभेच्या ठिकाणी एखाद्या कार्यकर्त्याच्या घरी मुक्कामाची सोय असते. रात्रीची जेवणं आटोपल्यानंतर मुंबईला फोनाफोनी आणि त्या मतदारसंघातल्या प्रमुख कार्यकर्त्यांसोबत बैठक सुरू होते. व्यूहरचनेची आखणी होते. एखाद्या प्रतिस्पर्धी पक्षातील मातब्बरासोबतची बैठकही आटोपायची असते. हे संपेतोवर मध्यरात्र उलटून गेलेली असते. गर्दी घरोघरी परतते आणि साहेब झोपी जातात...

दुसऱ्या दिवशी पुढच्या गावांमधील सभांची माहिती घेतली जाते आणि नवा दिवस सुरू होतो. साहेबांच्या परीटघडीच्या इस्त्रीच्या कपड्यांची एक बॅग अगोदरच गावात दाखल झालेली असते. कडक इस्त्रीचे खादीचे कपडे घालून साहेब नव्या दिवसाच्या कार्यक्रमासाठी उत्साहाने तयार होतात. पुढच्या गावात जाण्यासाठी निघतात. निरोप द्यायला गावातल्या कार्यकर्त्यांची फौज कधीपासून आलेलीच असते. पुन्हा गर्दी दिसताच साहेब टवटवीत होतात...

सोबतचे पत्रकार मात्र अजूनही मरगळलेलेच असतात... कसे तरी आटोपून घाईघाईनं ते हेलिकॉप्टरमध्ये येऊन बसतात आणि गप्पा सुरू होतात...

रटाळ चेहऱ्यानं एखादा कुणी तरी साहेबांना विचारतो, "साहेब, तुम्हाला कालच्या दिवसभराच्या या हेक्‍टिक धावपळीनं थकवा आला नाही?' साहेब मंद हसतात. बाहेर गर्दी हात हलवत निरोप देत असते... तिकडे एक नजर टाकून साहेब उत्तरतात, "हे माझं टॉनिक आहे... आणि कार्यकर्ते ही माझी एनर्जी... मग थकवा कसा येईल?'

पत्रकार आपल्या डायरीत साहेबांचं हे वाक्‍य टिपून घेतो... दुसऱ्या दिवशीच्या बातमीचा मथळा ठरलेला असतो... "कार्यकर्ता ही एनर्जी, गर्दी हे टॉनिक!'...

(http://beta.esakal.com/2009/09/19162913/Featuers-saptarang-on-one-day.html)

समाजप्रकटन

प्रतिक्रिया

दशानन's picture

20 Sep 2009 - 9:28 am | दशानन

मस्त !

तुम्हीच लिहला आहे काय तिकडे :?

***
राज दरबार.....

रामदास's picture

20 Sep 2009 - 12:39 pm | रामदास

मला पण दौर्‍याची गोष्ट आवडली.

विसोबा खेचर's picture

13 Oct 2009 - 1:39 pm | विसोबा खेचर

+१

मला पण

अमोल खरे's picture

20 Sep 2009 - 12:47 pm | अमोल खरे

असेच म्हणतो..........कोणाला उद्देशुन लिहिला आहे ? कॅरेक्टर ओळखीचे वाटताय.

मी-सौरभ's picture

20 Sep 2009 - 12:58 pm | मी-सौरभ

सौरभ
:)

प्रकाश घाटपांडे's picture

20 Sep 2009 - 1:10 pm | प्रकाश घाटपांडे

आत्ताच वाचला सकाळ मध्ये. रण धुमाळीत दिनेशरावांनी निवडणुकिंचा घेतलेला मागोवा नेहमीच वाचतो.
साहेबांच अस मंद मंद हसण फारच अर्थपुर्ण असत ब्वॉ. आज राज ठाकरेंची मुलाखत आहे पुण्यात यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात संध्याकाळी सहा वाजता. जाणार आहे मज्जा येईल
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

सहज's picture

20 Sep 2009 - 6:05 pm | सहज

>रण धुमाळीत दिनेशरावांनी निवडणुकिंचा घेतलेला मागोवा नेहमीच वाचतो.

दिनेशरावांचा अजुन एक छान लेख.

स्वाती२'s picture

20 Sep 2009 - 4:49 pm | स्वाती२

आवडलं

चतुरंग's picture

20 Sep 2009 - 5:18 pm | चतुरंग

चतुरंग

लवंगी's picture

20 Sep 2009 - 5:19 pm | लवंगी

वर्णन आवडल

रेवती's picture

20 Sep 2009 - 5:50 pm | रेवती

अगदी छान लिहिलय.
नेमके वर्णन आवडले.

रेवती

पाषाणभेद's picture

20 Sep 2009 - 7:22 pm | पाषाणभेद

सत्तेच्या रोगावर सर्वच नेत्यांची कार्यकर्ता ही एनर्जी, गर्दी हे टॉनिक असते.

लेख छानच. बारकाईचे वर्णन. चांगली निरीक्षणशक्ती.
-----------------------------------
आणि हो, सांगायच राहूनच गेलं, या विधानसभेच्या ईलेक्शनदरम्यान मी नविन कार घेणार आहे.

- पाषाणभेद उर्फ दगडफोडीची सजा मिळालेला दगडफोड्या

श्रावण मोडक's picture

20 Sep 2009 - 7:30 pm | श्रावण मोडक

अनेक साहेब डोळ्यांसमोर आले.

भोचक's picture

13 Oct 2009 - 12:57 pm | भोचक

दिनेशराव, मस्तय.

(भोचक)

तुम्ही पत्रकार आहात? कोणत्या पक्षाचे?

हा आहे आमचा स्वभाव