संगोपन आणि आत्मनिर्णय.

श्रीकृष्ण सामंत's picture
श्रीकृष्ण सामंत in जनातलं, मनातलं
19 Sep 2009 - 10:10 pm

माझा मित्र रघुनाथ खाडिलकर अगदी सुरवातीपासून बेफिकीर वृत्तिचा पण तोलूनमोजून निर्णय घेणारा असा होता.काल त्याची आणि माझी गाठ एका सायन्स सेमिनारमधे पडली.
"अरे,परत तू ह्या विषयात भाग घ्यायला सुरवात कशी केलीस.तू तर सर्व सोडून जवळ जवळ संन्यास घेतलास असं मला मागे भेटला होतास त्यावेळी म्हणाला होतास ते मला आठवलं.सोन्यासारखी कंपनी सोडून तू कसलंच काम न करण्याचा विचार केला होतास.ज्या कंपनीत तू होतास तिला वर यायला तू खूपच मेहनत घेतली होतीस.तुझ्या कर्तुत्वाच्या जोरावर सि.इ.ऒ.झालास म्हणून माझाच एक मित्र तुझा विषय निघाला त्यावेळी तुझी स्तुती करून सांगत होता.तुझं काही खरं नाही बाबा."
रघुनाथला काहीच बोलायला न देता मी माझंच म्हणणं दामटत त्याच्यावर प्रश्नांचा भडिमार करायला लागलो.

"चल आपण ह्या गर्दीतून कुठेतरी निवांत जागी जाऊन बोलूया.त्यावेळी मी तुला सर्व कामधाम सोडून संन्यास घेतला आहे हे सांगितलं ते अगदी खरं आहे.पण त्याला बराच वेळ लोटून गेला.त्यावेळी माझा लग्न करण्याचा विचार नव्हता.
गेली कित्येक वर्षं मी कोण आहे? हे मी काय काय केलं? आणि त्यातून होणार्‍या माझ्या उपलब्धिनुसार तोलून मोलून मला मी ठरवीत होतो.तुला माहित आहे माझ्या शाळेत मी मेहनत घेऊन अभ्यास केला, आणि चांगले मार्क्स मिळवले, छात्रवृत्या मिळवल्या, आणि नावाजलेल्या शाळेत पुढल्या शिक्षणासाठी प्रवेश मिळवला. नावाजलेल्या कॉलेजात प्रवेश मिळवून नंतर त्याच विद्यापिठाची पि.एच.डी घेतली.नंतर एका मोठ्या कंपनीत रिसर्च सायंटिस्ट म्हणून नोकरी पत्करली. त्या तीथे मी राहिल्याने प्रत्येक होणारी गोष्ट परिपूर्ण होईतो त्यातून सुटका नाही अशा वृत्तिच्या माझ्या संवयी मुळे समाधानीत न राहाण्याच्या संवयीला मी प्रवृत्त झालो. संशोधनासाठी माझ्या अंगात असलेल्या आवेशाला जीद्दीची जोड म्हणून उत्पादनाची प्रखर इच्छा असणं, प्रोजेक्ट कार्यान्वित करणं, आणि कामात यशस्वी होणं,ह्या गोष्टी होत्या. आणि ह्या गोष्टींचा दृष्टीकोन ठेवल्यानेमला पुरस्कार मिळाले,आर्थिक स्थिरता आणली गेली, काही तरी करून दाखवल्याची खूमखूमी आली आणि स्वाभिमानी पण झालो.पण त्यामुळे अधिक अधिक आवश्यक्यतेची अभिलाषा सतावू लागली आणि ती वाढू लागली. अधिक समय,अधिक अर्थ,अधिक पूर्ती असावी असं वाटूं लागलं.
"काहीतरी अधिक असावं" ह्या अगतिकेच्या मागे लागून लागून शेवटी कंटाळून मी माझा जॉब सोडला आणि घरी राहायला लागलो." आम्ही जवळच्या लॉनमधल्या एका झाडाखाली बसल्यावर रघुनाथ मला सांगायला लागला.
"पण तू लग्न केलंस म्हणून मला कुणीतरी सांगितल्याचं आठवतं."मी म्हणालो.

"हो,माझं लग्न उशीरा झाल्याने मुलंही माझ्या वयाच्या मानाने अगदीच लहान होती.त्या दोन मुलांच्या संगोपनाची विशेष काळजी घेऊं लागलो.माझ्यासाठी निरनीराळे वेळ जाण्यासाठी चालू व्यवसाय शोधायला लागलो.आज कामाच्या आणि कमाईच्या दृष्टीतून विचार केल्यास मी अनुत्पादक आहे.आता माझ्या घरी प्रोग्रेस रिपोर्ट नाहीत,प्रेझेन्टेशन नाही,स्टाफ मिटींग्स नाहित.संशोधनाबद्दल लिखाण नाही, पेटंट घेण्यासारखं काहीच नाही.प्रत्येक दिवशी घरी मी काय करतो ते महत्वाचं झालं आहे.आणि ते नजरेत भरण्यासारखं नाही.जी काही पुंजी मी जमवून ठेवली आहे त्यात माझं आणि माझ्या बायको पोरांचं भागवीत आहे.माझ्या मुलांना खाऊन पिऊन सशक्त ठेवून त्यांना आनंदात पहात आहे."
अगदी बिनदास्त होऊन मला रघुनाथ सांगू लागला.

"तू तर अगदी जगावेगळा आहेस बघ.मी तुला लहानपणापासून ओळखतो.एकदा कॉलेजमधे प्रो.देसायाना चॅलेंज दिलं होतंस.
आणि शेवटी तुझंच खरं ठरलं.देसायानी पण मान्य केलं.तुझी त्या वयातली ती धमक पाहून मला वाटलं होतं की तू काहीतरी करून दाखवणार हे नक्कीच."
"काही तरी करून दाखवायची माझी खुमखूमी हळू हळू कमी व्हायला लागली.
उलटपक्षी मी कोण आहे? हा प्रश्न माझ्या जीवनात मला माझ्या नजरेत जास्त भरायला लागला आणि तो अत्यावश्यक आहे असं ही मला वाटायला लागलं.उदाहरण म्हणून सांगायचं झाल्यास,इतराना प्रभावित करताना मी कसा आहे,योग्य आहे की अयोग्य?.मुलांवरच्या संस्काराच्या दृष्टीने मी सामाजिक चालचलनात आदर्श आहे का?माझी पोहोंच आहे ?की मी माघार घेतो?.असलीच जर पोहोंच तर ती कुणासारख्यांकडे आहे?मी दयाशील आहे का?मी माझ्यावर प्रेम करतो तसंच इतरांवरही करतो का? दररोजचं मुलांचं संगोपन करताना मी कसा वागतो? अशा तर्‍हेचे प्रश्न माझ्या डोक्यात घर करायला लागले."
मी म्हणालो,
"मुलांचं हंसणं खिदळणं,अश्रू ढाळणं,निराश होणं,आणि त्याबरोबर आईवडीलांनी पण सहनशिलता ठेवणं ह्या गोष्टी संगोपना बरोबर जोड म्हणून येत असतातच. मग त्या गोष्टी तू कशा हाताळत होतास?"

रघुनाथ म्हणाला,
"जीवनाच्या मुल्यांबाबत माझ्या मुलांना शिकवताना, मी कोण? ह्या प्रश्नावर प्रभाव पडायला लागला.माझ्या जीवनात माझी जागा काय आहे? आणि मला भविष्यात काय करायचं आहे? ह्यावर मी कोण?आणि मला काय व्हायचं आहे? अश्या तर्‍हेचे माझ्या मनातले प्रश्न अग्रगण्य वाटायला लागले.
आता माझ्या लक्षात यायला लागलंय की जेव्हडं मला माझ्या ह्या कामातून मिळतं तेव्हडं मला माझ्या डिग्रीमधून माझ्या संबंधीत अनुभवातून वगैरे,वगैरे जे मी माझ्या रेझ्युमेमधे देत असे त्यापेक्षा मिळतं.माझा विज्ञान विषय जास्त आवडीचा असल्याने जीवनातली माझी वर्ष मला सहनशीलता,वयक्तिक शिस्त, महत्वाकांक्षा वगैरे गोष्टींची उपलब्धी करण्याची क्षमता देऊन गेली."
"एव्हडं जर होतं तर मग तू पुन्हा असल्या सेमिनारमधे भाग घ्यायला कसा उद्युक्त झालास.का तुला आता घरी राहायचा कंटाळा आला आणि आता मुलं मोठी झाल्याने तुझा वेळ जायला तुला कठीण व्हायला लागलं?" मी त्याला विचारलं.

"तुझा ह्या प्रश्नाला मला प्रामाणिक उत्तर द्यायलाच हवं." असं म्हणत जरा गंभीर होऊन रघुनाथ सांगायला लागला,
"माझ्या पूर्वीच्या व्यवसायामधे उपलब्धि मिळण्यासाठी पीछ्छा पुरवण्याच्या माझ्या प्रयत्नात मी काही गोष्टी गमावून पण बसलो ह्याचं मला राहून राहून वाटायला लागलं.एका टोकाकडून दुसर्‍या टोकाकडे गेल्याचं माझं मला वाटायला लागलं.मी आता माझ्या जीवनात संतुलन आणण्याचा प्रयत्न करीत असताना त्या जुन्या गोष्टी पुन्हा हळू हळू माघारी येऊ लागल्या आहेत. उदाहरण द्यायचं झाल्यास इतरांचा मनापासून आदर ठेवण्याची वृत्ति,वाचनाची आणि लेखनाची आवड आणि मी कोण आहे? हे जितकं लागू असतं तितकंच मी काय करतो? हे पण लागू असतं ह्या वरचा माझा दृढविश्वास.
ह्या सर्वांवर विचार करीत असताना माझ्या एका मित्राने फोन करून मला ह्या सेमिनार बद्दल कळवलं.मी मनात विचार केला इतक्या वर्षानी मला तुझ्या सारखी जूनी दोस्त मंडळी भेटतील.काही तरी नवीन ऐकायला मिळेल. आणि कुणास ठाऊक कदाचीत काही तरी करून दाखवायची माझी खुमखुमी पुन्हा जागृत होऊन नव्या प्रॉडक्टसाठी काम करण्यासाठी एखाद्याची ऑफर येईल."
"एव्हडं शिक्षण घेतलंस ते काही तू वाया जाऊ देणार नाहीस.तुला नक्कीच कुणाची तरी ऑफेर येवो" अशी शुभेच्छा देत ,
"आपण परत भेटूया"
अशा आशेवर एकमेकाला बाय बाय केलं.

श्रीकृष्ण सामंत

कथालेख