यालाच (टायटल प्रमाणे) 'धी बरनिन्ग ट्रैन' किंवा सुरूवातीला बराच वेळ रेल्वे न दाखवता इतर बर्याच गोष्टी दाखवून लोकांची डोकी फिरवल्याने काही लोक याला The Turning Brain असेही म्हणत
फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. जेव्हा डब्यात कारणाशिवाय साखळी ओढण्याला २५० रू. दंड होत असे तेव्हाची. कदाचित त्याही आधीची. एन्ट्रीलाच तीन पोरे नासिर हुसेन बरोबर एका नॅरोगेज यार्डात गप्पा मारत असतात. नासिर त्यांना एकेका इंजिनाकडे बोट दाखवून 'हे खुद्द महाराजा म्हैसूर यांचे आहे...' वगैरे माहिती पुरवत असतो. म्हणजे आजकाल अमेरिकेत जसे CEO वगैरे लोकांच्या स्वत:च्या yachts असतात तसे पूर्वी भारतीय संस्थानिक स्वत:ची इंजिने ठेवून असावेत. तर ही तिन्ही पोरे ठरवात की त्यातील एक मोठा झाल्यावर रेल्वे इंजीन बनवणार, दुसरा कार्स चालवणार आणि तिसरा त्याला घेतले नाही म्हणून ते सर्व तोडून टाकणार. मोठेपणी ते कोण होणार याची किंचितही शंका राहू नये म्हणून त्या तोडणार्याला डॅनीसारखीच हेअर स्टाईल दिली आहे. जेमतेम दोन मिनीटे हे बालपण टिकते आणि एकदम एकेकाच्या एन्ट्र्या. डिझेल इंजीनातून तेवढ्या गरम वातावरणातही लेदर जॅकेट घातलेला विनोद खन्ना, एका वेगवान कार मधून धर्मेन्द्र आणि 'लोको शेड' मधून उर्मट पणा दाखवणारा डॅनी. तेव्हढ्यात विनोद मेहराही येतो, हा एकदम मोठाच झाला बहुतेक.
तसेच ते थेट एका रेल्वे फंक्शन ला जातात, तेथे धरम आणि विनोद खन्ना शेजारी बसतात. मग हेमा व परवीन काहीतरी जुगलबंदी टाईप गाणे म्हणत दोन मोठ्या थाळ्यांतून फुले उधळतात, प्रेक्षागृह भरलेले असताना ती बरोबर सगळी या दोघांच्या अंगावरच पडतात.
आता दोघे त्यांना पटवण्यासाठी एक नाटक रचतात. दोघांपैकी एकाने मवाली होऊन एकीची छेड काढायची आणि दुसर्याने येऊन त्याला बदडायचे वगैरे (मग दुसर्या वेळी उलटे). धर्मेन्द्र मवाली होऊन परवीन ला छेडतो, तेव्हाचा त्याचा ड्रेस अचाट आहे, पण नंतर उलट्या प्रसंगाच्या वेळी त्याचा सभ्यपणाचा ड्रेस बघून आधीचा मवाली ड्रेस बरा होता असे वाटते. यातून त्या दोघी पटतात, पण अजून नाटक उघडकीस येत नाही. मग एका पार्क मधे सकाळी आठ वाजता मिलनेका वादा झाल्याचे हेमा परवीन ला सांगते आणि काय आश्चर्य! परवीन चा ही तसाच वादा झालेला असतो. हे प्रकरण एवढ्यावर थांबत नाही. त्या दिवशी सकाळी विनोद मेहरासकट जगातील सर्व प्रेमिक आप आपल्या प्रेमिकांना भेटायला त्याच पार्कमधे त्याच वेळी आलेले असतात.
त्यात आपल्या प्रेयसीला भेटायला कशाकशाची गरज पडेल सांगता येत नाही म्हणून पोलिसांचे नकली वेष, नकली दाढी वगैरे ही बरोबर घेऊन आलेले असतात. आणि एवढे लोक एकाच वेळी येऊन सुद्धा त्या पार्कमधे सामसूम असते. आणि तरीही रंगिबेरंगी ड्रेस घातलेल्या हेमा व परवीन या दोघांनाही दिसत नाहीत. शॉट ओपन होतो तेव्हा त्या एका झाडामागे उभ्या असतात पण त्या तेथपर्यंत किंवा लगेच दुसर्या त्या विनोद खन्नाजवळच्या झाडापर्यंत कशा गेल्या यांना न दिसता? मग या दोघींना कळते काय नाटक होते ते, ते ही मोठे प्रमेय उलगडून सांगितल्यासारखे एकमेकींना सांगितल्यावर.
तुमच्या ऑफिसमधला नेहमी तुमच्या बरोबर काम करणारा माणूस एक दिवस दाढी मिशा लावून पोलिस इन्स्पेक्टर चा ड्रेस घालून आला तर तुम्ही त्याला ओळखणार नाही का? येथे विनोद मेहरा येतो आयत्या वेळी तेथे, तो त्याच्या प्रेयसीबरोबर तेथे आलेला असूनही त्याच्या कडे तो नकली पोलिस ड्रेस आणि दाढी वगैरे असते. विनोद मेहराला तर कोणीही ओळखायला पाहिजे. अमर प्रेम मधे बालकलाकार सारिका मोठी झाली की तिचा विनोद मेहरा होतो, तेव्हा सुद्धा आम्ही ओळखला होता
यात जळणार्या आगगाडीचा कोठे संबंध आला असा प्रश्न तुम्हाला आला असेल. बहुतेक असे काही प्रसंग व तीन चार रोमॅंटिक गाणी, बागेत पळणे (ते ही दिल्लीतून थेट वृंदावन गार्डन मधे. ही एका मिनीटात दिल्ली हून म्हैसूर ला जाण्याची आयडिया महाराजा म्हैसूर ना ही असली असती तर कशाला इंजीन बिंजीन च्या भानगडीत पडले असते) वगैरे झाल्यावर दिग्दर्शकाला लक्षात येते की रेल्वेवरच्या चित्रपटात थोडीशी रेल्वे दाखवली पाहिजे. आणि मग कथानक पुन्हा त्या रेल्वे इंजीन, लोको शेड मधे परत येते.
नवीन रेल्वे चालू करण्याचे बहुधा दोन मार्ग आहेत्: एक म्हणजे इंजीन व डबे बनवणार्या कंपन्यांकडून उपलब्ध असलेले डबे वगैरे निवडून नवीन गाडी चालू करायची म्हणजे आमदार खासदार मंत्री वगैरेंना त्यांच्या ५ वर्षांत मिरवता येते, किंवा हिन्दी चित्रपटातील उपाय म्हणजे तुमच्याकडे जे दोन तीन हॅन्डसम लोक असतील त्यांना गाडीची 'डिझाईन्स' बनवायला सांगायची. मग यथावकाश ५-६ वर्षांनंतर गाडी तयार होते. मंत्री झाल्यावर आपल्या शहरापासून ते मुंबई, दिल्ली आणि पार झुमरीतलैय्या पर्यंत थेट गाड्या चालू करणारे यातील कोणता पर्याय निवडत असतील ते उघड आहे, पण येथे मात्र आख्खी गाडी एकदमच डिझाईन करतात. ते ही फक्त विनोद (दोघे ही) आणि डॅनी या तिघांचेच फायनल मधे येते. हे तिघे नक्की डिझाइन इंजिनीयर असतात की कोण ते कळत नाही पण गाडी डिझाइन करण्या पासून ते ती तिच्या मार्गावर धावत असताना मार्गातील अडथळे दूर करण्या पर्यंत सर्व 'कंट्रोल' यांच्याकडेच असतो.
आता (जो) मुख्य भाग (असायला हवा होता). गाडी ५-६ वर्षांनी तयार होते. ही नवी 'सुपर एक्सप्रेस' असते. दिल्लीकडून मुंबईकडे 'सौ मील की रफ़्तार से' निघते. येथे अचानक जितेंद्र, नीतू सिंग येतात, इतरही बरेच जण चढतात गाडीत. मग ते आग लागणे, ब्रेक फेल होणे वगैरे होते आणि आता सर्व हीरो लोकांपुढे २-३ प्रश्न निर्माण होतात्: १. आग कशी विझवायची २. इन्जीन मधील इमर्जन्सी ब्रेक लावून गाडी कशी थांबवायची ३. हे सर्व करताना जास्तीत जास्त कॉम्प्लिकेटेड पद्धतीने कसे करायचे
ब्रेक लावायला इंजिनाकडे जायचे असते. गाडीचे डबे आतून जोडलेले असले तरी यांना एकदम आहे त्या डब्यातून थेट टपावरच जावे लागते, ते सुद्धा इतक्या सहज की आपल्याला थांबलेल्या गाडीतून प्लॅटफॉर्म वर उतरायला जास्त कष्ट पडतील. नीट लक्ष दिले तर तुम्हाला कळेल की या गाडीतून रीतसर उतरणार्यांपेक्षा वरती टपावर जाणारे, खिडक्यांच्या गजाला धरून इकडे तिकडे जाणारे आणि वेळोवेळी खाली फेकले गेलेले असेच जास्त असतील. विनोद खन्ना (हा कंट्रोल रूम मधे असतो - आता तेथील चीफ इंजिनियर) ठरवतो की जर गाडीत कोणाकडे रेडिओ असेल तर त्यांना सांगू इंजिनाकडे जाऊन इमर्जंसी ब्रेक कसे लावायचे. येथे कहानी की मांग तयार केली जाते. रेडिओ वर प्रथम सांगितले जाते की कोणी ऐकत असाल तर एक लाल कपडा येणार्या कोणत्याही स्टेशन वर टाका. मग लाल कपड्याची शोधाशोध सुरू होते. एक नवी नवरी आपला 'शादी का जोडा' द्यायला तयार होत नाही तेव्हा एकदम आशा सचदेव कोठून तरी येऊन भराभर आपली साडी लोगोंको बचाने के लिये काढून देते. पण इतर काही लोकांचे लाल कपडे कोणालाच दिसत नाहीत. तसेच एवढ्या लोकांच्या सामानामधे सुद्धा लाल कपडा नसतो. बरं ठीक आहे साडी काढून दिल्यावर तिला कोणी खास फिल्मी स्टाईल ने आपला कोट वगैरेही देत नाही त्यामुळे ती शेवटपर्यंत तशीच राहते. काय अपरिहार्य गोष्ट होती ना? रेडिओ असेल तरी एकदम सर्व कसे सांगून टाकणार? पुन्हा प्रवाश्यांनी सुद्धा लाल म्हणजे लालच कपडा टाकायला हवा. उगाच निळा, पिवळा टाकला तर काहीतरी भलताच अर्थ निघायचा.
ही आग लागलेली असताना एक नवीन लग्न झालेले जोडपे आपल्या कुपे मधे गाढ झोपलेले असते. त्यातील त्या बायकोला कसला तरी वास येतो व धूर दिसतो म्हणून ती नवर्याला जागे करते आणि दार उघडून दोघे जमोरच्या ज्वाळा पाहतात. ती आग पाहूनही तिला पत्ता नसतो की हे काय आहे. मात्र नवर्याने ती 'आग' आहे सांगितल्यावर मात्र एक जोरात "बचाओ" ओरडून मग आता आपण दोघे एकत्र मरू वगैरे चालू करते. समोर जाळ दिसत असताना ती आग आहे हे नवर्याने सांगितल्यावरच तिचा विश्वास बसतो म्हणजे केवढे प्रेम असेल त्यांचे!
शेवटी अनेक आयडिया वापरून हे तीन हीरो आणि मुंबईत असलेला विनोद मेहरा यातून मार्ग काढतात. तरीही आपल्या डोक्यात प्रश्न येतच राहतात. एकतर ती गाडी मुंबई सेन्ट्रल ला धडकेल त्याच लाईन वर कशाला ठेवायला पाहिजे? डिझेल संपेपर्यंत भारतभर फिरवत का नाही ठेवायची? एका शॉट मधे जितेन्द्र इंजिनातून परत डब्यात जाताना मधेच एका रॉकेल वगैरेच्या वॅगन वर ("कृपया लूज शंटिंग न करे" वाली, ते लिहिलेलेही दिसते तेथे) कोठे चढतो? ती वॅगन एकदम चालत्या गाडीला इंजीन आणि डब्यांच्या मधे कोणी जोडली कारण ती इतर शॉट मधे कोठेच दिसत नाही, आणि लूज शंटिंग न करण्यासारखा ज्वालाग्राही पदार्थ या आगीत तसाच कसा राहिला? वगैरे वगैरे...
क्लायमॅक्स मधे मग एक रूळांचा चढ बनवून त्यावर गाडी पाठवायची आणि तेव्हाच कपलिंग उडवून डबे सोडवायचे असे ठरते. यापुढे मुख्य अभिनेत्यांच्या जागी स्टंटमेन वापरतात तसे खर्या गाडीच्या जागी मॉडेल ट्रेन्स वापरून शेवटचे शॉट घेतले आहेत. ते इंजीन तर एका टेम्पो ला डिझेल इंजिनाचा मेक अप लावून एका घरात घुसवले आहे आणि ते त्या एक मजली घरापेक्षाही लहान दाखवलेय. पुण्यातील पेशवे पार्कमधल्या फुलराणीचे इंजिन सुद्धा यापेक्षा जास्त अस्सल वाटेल.
आता काही चांगल्या गोष्टी... 'पल दो पल का साथ हमारा...' मस्त आहे आणि स्टेशनातून निघालेली गाडी जसा हळुहळू ठेका पकडत जाते तसा वेग पकडत ही कव्वाली चालू होते आणि मस्त रंगते. एखाद्या यमकावर १०-१२ वाक्ये झाली तरी चपखल शब्द साहिर लुधियानवीला नेहमी बरोबर सापडत असत (कभी कभी मधले 'तेरा फूलों जैसा रंग...' हे आणखी एक उदाहरण) त्यामुळे 'झूम जबतक धडकनो मे जान है...' ची लेव्हल कधीही सुटत नाही. नाहीतर 'गाडी मे कव्वाली जब शुरू हो जाती है तो एक दो तीन हो जाती है' वगैरे काहीतरी ऐकावे लागले असते
धर्मेन्द्रची कॉमेडी. रेल्वे फंक्शन ला 'भाषण' सुरू झाल्यावर 'का बोअर करताय' चे भाव असले आणलेत चेहर्यावर, आणि मवाल्याचा आविर्भाव सुद्धा तसाच. विनोद खन्ना ला कॉमेडी जमत नसे हे ही दिसते.
यातील क्लायमॅक्स मधल्या मॉडेल्स ला हसलो पण तेव्हढ्यात 'जब वी मेट' पाहिला आणि त्यातील ते सुरुवातीचे मॉडेल ट्रेन्स चे शॉट त्यापेक्षाही हास्यास्पद वाटले. आत्ताची सर्व कॉम्प्यूटर ग्राफिक्स वगैरे सोय असून सुद्धा 'जब...' मधे त्यात ते गाडी हुकताना आणि परत पकडण्याचा प्रयत्न करताना रतलाम वगैरे च्या वेळचे शॉट विनोदी आहेत, रेल्वेचे आणि पांढर्या मोटारीचे मॉडेल वापरलेले. एकदा तर चक्क कोळशाचे इंजीन दिसते! ते पाहिल्यानंतर २५-२७ वर्षांपूर्वीचा असून 'द बर्निंग ट्रेन' लुकास/स्पीलबर्ग च्या लेव्हल चा वाटेल.
प्रतिक्रिया
9 Sep 2009 - 12:51 pm | स्वाती दिनेश
चित्रपटाचे रसग्रहण आवडले, अगदी पटलेच. द बर्निग ट्रेन चक्क थेटरात जाऊन पाहिला होता.
(गेले, ते थेटरात जाऊन पॉपकॉर्न खात खात सिनेमे पाहण्याचे दिन गेले.. )
स्वाती
9 Sep 2009 - 1:18 pm | पाषाणभेद
तुम्ही काहीही म्हणा, पण ७० च्या दशकातले पिक्चर डोक्याला ताप देणारे नसत. आपण मनोरंजनासाठीच चित्रपट पैसे देवून बघतो ना?
-----------------------------------
काय! तुमच्या घरी कॉटवरील गादीखाली, दुकानांत मिळणार्या प्लॅश्टीकच्या पिशव्या ठेवत नाही? नक्कीच! तुम्ही अतीउच्च वर्गीय आहात.
- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या
9 Sep 2009 - 1:40 pm | सहज
भारी लिहलेय :-)
आहाहा कव्वाली! ते अजरामर गीत
9 Sep 2009 - 1:54 pm | अमोल केळकर
मस्त वर्णन
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
9 Sep 2009 - 2:01 pm | बिपिन कार्यकर्ते
=)) =)) =)) =)) =))
फारएंड, धम्माल लिहिलंय. हहपुवा झाली. मी पण बर्नंग ट्रेन बघितल्यावर टर्निंग ब्रेन झाला मला. पण ती कव्वाली मात्र अजरामर आणि अंमळ प्रेक्षणियही आहे.
बिपिन कार्यकर्ते
9 Sep 2009 - 2:19 pm | चिरोटा
बर्मनच्या 'मेरी नझर है तुझपे .."गाण्यात भारतिय,पाश्च्यात्य संगिताचे मिश्रण मस्त आहे. शुटिंगच्यावेळी काही रेल्वेचे खरे डबे जळले होते. चोप्रानी डब्यांचे झालेले नुकसान बरेच वर्षे भरले नव्हते.
भेंडी
क्ष्^न + य्^न = झ्^न
9 Sep 2009 - 2:21 pm | अभिज्ञ
अफाट परिक्षण.
अन
शेवटी अनेक आयडिया वापरून हे तीन हीरो आणि मुंबईत असलेला विनोद मेहरा यातून मार्ग काढतात. तरीही आपल्या डोक्यात प्रश्न येतच राहतात. एकतर ती गाडी मुंबई सेन्ट्रल ला धडकेल त्याच लाईन वर कशाला ठेवायला पाहिजे? डिझेल संपेपर्यंत भारतभर फिरवत का नाही ठेवायची?
हे तर फारच आवडले.
और भी परिक्षण आने दो.
अभिज्ञ.
--------------------------------------------------------
पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.
9 Sep 2009 - 3:32 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
=)) =)) =))
तुफान ... सुपर एक्सप्रेसपेक्षाही सुप्परमहान!
अदिती
9 Sep 2009 - 3:41 pm | योगी९००
मस्त लेख पण एक गोष्ट मान्य करायला हवी की त्याकाळाच्या मानाने हा पिक्चर एकदम मनोरंजन करणारा होता. आज जरी तो विनोदी वाटला तरी...
ब्रेक लावायला इंजिनाकडे जायचे असते. गाडीचे डबे आतून जोडलेले असले तरी यांना एकदम आहे त्या डब्यातून थेट टपावरच जावे लागते,
याचे कारण की मधल्या डब्यांना आग लागलेली असते...
खादाडमाऊ
9 Sep 2009 - 4:14 pm | बाहुली
:)
9 Sep 2009 - 5:50 pm | कानडाऊ योगेशु
हा चित्रपट मी दूरदर्शनवर पाहीला होता.
चिकित्सक होऊन पाहीला नसल्याने बर्यापैकी आवडुनही गेला होता.
आधी मला माहीतच नव्हते की चित्रपटात जितेंद्र आहे त्यामुळे त्याला रेल्वेत शिरताना पाहुन असे वाटले की कदाचित पाहुणा कलाकार म्हणुन असावा.!त्या सरप्राईज मुळे पाहताना मजा आली.
9 Sep 2009 - 6:18 pm | सूहास (not verified)
ह्यात चित्रपटात तो धर्मेंद्र जेव्हा ती आग लागलेली गाडी ..एका डबडा झालेल्या दुचाकी ने पकडतो तो सीन तर अतिशय हास्यास्पद...
सू हा स...
9 Sep 2009 - 6:24 pm | चिरोटा
:D धर्मेंद्रच तो!. त्याच्याजागी अमिताभ असता तर एका हाताने खेचुन इंजिनही थांबवले असते.तो काळच तसा होता.!!
भेंडी
क्ष्^न + य्^न = झ्^न
9 Sep 2009 - 6:22 pm | विसोबा खेचर
छान लिहिलंय.. :)
तात्या.
16 Aug 2010 - 10:20 pm | मुक्तसुनीत
अरे हा लेख माझा कसा वाचायचा राह्यला माहीत नाही. हसून हसून निपचित पडायची वेळ आली आहे.
16 Aug 2010 - 10:38 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
तुझ्या खोदकामामुळे पुन्हा एकदा लेख वाचला आणि पुन्हा एकदा तुफान हसले.
17 Aug 2010 - 12:37 am | अर्धवट
अगदी असेच म्हणतो... मी पण मिसला होता.. आत्ता वाचला..
मेलो हसुन हसून.. माझं प्रेतच लिहितय प्रतिक्रिया..
17 Aug 2010 - 12:46 am | असुर
>>>तुझ्या खोदकामामुळे पुन्हा एकदा लेख वाचला आणि पुन्हा एकदा तुफान हसले.<<<
अगदीच +१.
फक्त 'हसले' च्या ऐवजी 'हसलो'! :-)
--असुर
16 Aug 2010 - 10:36 pm | प्रियाली
मी ही आजच वाचले. फिल्मसिटीला या ट्रेनचा एक डब्बा (एकच कसा होता ते नका विचारू कारण बाकीचे डब्बे मला आठवत नाहीत) बनवला होता त्याचा आम्ही फेरफटकाही मारला होता. चित्रपट थेटरात जाऊन पाहिला होता आणि वा!व्वा! काय आवडला होता. ;)
16 Aug 2010 - 10:52 pm | शिल्पा ब
लै भारी...
एवढे मजेदार पिच्चर कसे काय बघायचे राहून गेले बरं? हा बघितला पाहीजे.. ;)
17 Aug 2010 - 12:50 am | चतुरंग
बरं झालं हा शिणूमा मी पाहिला नाहीये ते, एकदम द टर्निंग ब्रेन झालं असतं माझं!! ;)
(खिदळिंग)चतुरंग
17 Aug 2010 - 12:53 am | असुर
ह शिणेमा इथे पाहता येणे शक्य आहे!!!
17 Aug 2010 - 1:10 am | आत्मशून्य
नाहितर आजचे... नुसताच presentation चा चकचकाट आथवा म्हणे Different Story /direction आहे. पण आधी सारखी picture बघताना story wise emotionally involvement च होत नाहि
23 Nov 2015 - 6:44 pm | धनावडे
एकच नंबर
23 Nov 2015 - 7:53 pm | भिंगरी
आता या शीणेमात आमचा रजनीकांत असता तर ?
यावर चर्चा करा.
23 Nov 2015 - 10:19 pm | सिरुसेरि
साउथ मध्ये रामगोपाल वर्माचा "क्षणक्षणम" हा सिनेमा खुप चालला होता .त्यामधली रेल्वेतली साहसदृष्ये खुप गाजली होती.
24 Nov 2015 - 5:57 am | हेमन्त वाघे
""अमेरिकेत जसे CEO वगैरे लोकांच्या स्वत:च्या yachts असतात "
नाही हो - अमेरिकेत AT&त मध्ये काम करणाऱ्या माझ्या ऎक मराठी मित्राची पण याचत आहे !
24 Nov 2015 - 6:40 am | रुपी
फारच भारी.. आता नक्कीच पहायला हवा!
तुम्ही एकदा दोस्ती या चित्रपटावर लिहाच!
13 Dec 2021 - 5:00 pm | रंगीला रतन
धर्मेन्द्र मवाली होऊन परवीन ला छेडतो, तेव्हाचा त्याचा ड्रेस अचाट आहे, पण नंतर उलट्या प्रसंगाच्या वेळी त्याचा सभ्यपणाचा ड्रेस बघून आधीचा मवाली ड्रेस बरा होता असे वाटते.
डेंजर :=) हा पिक्चर आवडला होता. पल दो पलका ही कव्वाली जाम आवडते. हे परीक्षणही आवडले.
13 Dec 2021 - 8:37 pm | जेम्स वांड
लहानपणीच्या एका आवडत्या सिनेमाच्या पारच चिंध्या केल्या तुम्ही. आम्ही (आजही) मोठे झालो नाहीये असा आई अन बायकोचा जॉईंट आरोप पत्करूनही सांगतो की त्या बाल्यावस्थेत तो पिक्चर लैच सुंदर आवडला होता, इतका की तुम्ही पिसे काढलेले भागही आम्ही भक्तिभावे बघितले होते, स्वप्रमादकबुलीजबाब देऊन सांगतो, विनोदला विनोदी अभिनय जमला नाही हे आज रिव्हिजिट केल्यावर पटलं पण अजूनही जर तो सिनेमा लागला तर आवडीने पाहीन, कारण कितीही अचाट अन अतार्किक सिनेमा असला तरी बादशाह अन त्याची रिमिक्स मल्टीप्लेक्सचे पैसे मोजूनही सहन करण्याइतके मन आम्ही मोठे केलेले नाही बघा.
ता.क. - ते नॅरोगेज यार्ड म्हणजे फंक्शनल रेल्वे यार्ड नसून राष्ट्रीय रेल संग्रहालय उपाख्य नॅशनल रेल म्युझियम आहे, मस्ट व्हिजिट जागा आहे चाणक्यपुरी आणि धौलाकुवाच्या मध्ये सत्यनिकेतन जवळ आहे हे म्युझियम दिल्लीत.
13 Dec 2021 - 8:38 pm | तर्कवादी
आपण हिंदी चित्रपटाला हसतो पण हॉलीवूडच्या चित्रपटांमध्येही भरपूर मसाला खच्चून भरलेला असतो. उदा: crash point हा चित्रपट बघा... सगळा ड्रामा अगदी ठासून भरलाय.. फक्त गाणी नाहीत इतकंच
14 Dec 2021 - 3:20 am | अनन्त अवधुत
फारएन्ड यांचा अजुन एक मास्टरपीस शार्कनेडो - प्यार करे आरी चलवाये... मी या शार्कनेडो सिनेमाचे पार्ट २ आणि ३ पण पाहिलेत. ते पण असलेच अशक्य आहेत.
14 Dec 2021 - 7:23 am | जेम्स वांड
टीपीकल हॉलिवूडपटांची एनलॉजी पाहता काही निरीक्षणे खालीप्रमाणे डोक्यात येतात.
१. ९०% अमेरिकन जनता येनकेनप्रकारेण सीआयए किंवा तत्सम कुठल्यातरी टॉप सिक्रेट संघटनेचे कर्मचारी असतात.
२. अमेरिकन राष्ट्रपती हे कायम सद्गुणविकृतीचे शिकार असतात किंवा अतिशय भोळेभाबडे लोक असतात
३. एलियन/डायन्सॉर इत्यादी मंडळींना पृथ्वी इन्व्हेड करायला अमेरिकेपासून सुरुवात करणे सोयीचे पडते.
४. अमेरिकन आर्मीमध्ये कायम बंडाळी माजलेली असते एखाद रोग (rogue) जनरल कायम विकृत देशप्रेमाने भारलेला असतो, तो सरकारी कोट्यातील शस्त्रास्त्रे प्रेसिडेंटची खोलून मारायला वळती करतो, पण त्याचवेळी हॅकर, कार मेकॅनिक, मॅक डोनाल्डस किंवा तत्सम हाटेलात वेटर असणारी जनता (ह्यात बहुसंख्य "पीपल ऑफ कलर") फक्त सुरे, काटे चमचे आणि थोडी स्लॅपस्टीक कॉमेडी वापरून त्या जनरलचे प्रयत्न हाणून पाडते, कारण मुद्दा क्रमांक १ अंतर्गत ते ऑलरेडी सीआयए, एफबीआय इत्यादींचे कर्मचारीच असतात ना !
14 Dec 2021 - 8:44 pm | तर्कवादी
(white house/olumpus/london ) has fallen हे पण असेच अचाट चित्रपट आहेत. पण वेगवान असल्याने बघायला मजा येते.
पण एक मानायला हवं.. white house वर इतका भयंकर हल्ला झाल्याचं काल्पनिक चित्रण ते बिनधास्त करतात. आपल्याकडे जर असा हल्ला संसदेवर झाला असं काही दाखवलं तर तो चित्रपट सेन्सॉर बोर्ड संमत करणार नाही.
15 Dec 2021 - 7:55 am | जेम्स वांड
कित्येक "राष्ट्रप्रेमी" लोक पण.
14 Dec 2021 - 2:17 pm | विजुभाऊ
आणखी काही मुद्दे
१) सगळे एलीयन्स हे अमेरीकेवरच हल्ला करतात
२) सगळ्या अचाट आपत्त्या अमेरीकेतच येतात.
14 Dec 2021 - 10:17 pm | टर्मीनेटर
काही वेळापुर्वी धनुष आणि किर्ती सुरेश ह्यांची प्रमुख भुमिका असलेला Express Khiladi हा साउथचा डब्ड सिनेमा पाहीला आणि आता हे परिक्षण वाचनात आले. काय तो योगायोग 😀
वरती उल्लेख केलेला सिनेमाही जवळपास संपुर्ण एका एक्सप्रेस ट्रेन मधे चित्रीत केला आहे. त्यातही भरपूर नाट्य आहे पण तांत्रीकदृष्ट्या खुप सरस आहे. (अर्थात काळ आणि तांत्रिक प्रगती नक्कीच मॅटर करते)
‘बर्नींग ट्रेन’ हा मला एकेकाळी आवडलेला चित्रपट होता पण आता हे विश्लेषण वाचुन परत विचार करावा लागेल 😀
तुमची चित्रपट परिक्षणे खुप आवडतात अजुन येउद्यात.
15 Dec 2021 - 6:02 pm | चौथा कोनाडा
आता एक्सप्रेस खिलाडी बघावा लागेल !