सहजसोपे भासते कविता प्रसवणे,
गोषवारा माझिया डोक्यात आहे ||१||
असूदे भारी कितीही लेखणी ही,
पेलण्याची शक्ति या हातात आहे ||२||
कल्पनाविश्वात करितो मी विहार,
दौडण्याची शक्ति या पायात आहे ||३||
जे न देखे रवी तेही पाहतो मी,
दूरवरची चमक या डोळ्यात आहे ||४||
अडचणी येती कितीही अन कशाही,
सोसण्याची धमक या धमन्यांत आहे ||५||
पाहिली सृष्टीत या दुःखे कितीक,
तरीही आनंद या हृदयात आहे ||६||
प्रश्न का बाहेरचे पडतात मजला,
पाहिजे ते सर्व काही आत आहे ||७||
प्रतिक्रिया
8 Sep 2009 - 7:29 pm | प्राजु
कविता खूप आवडली.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
8 Sep 2009 - 7:37 pm | अजिंक्य
प्रतिसादाआधीच विडंबन आलेलं पाहून मला वाटायला लागलं होतं की सगळे विडंबनच वाचतील बहुतेक! पण तुमचा प्रतिसाद पाहून बरं वाटलं. धन्यवाद प्राजुताई.
- अजिंक्य
8 Sep 2009 - 7:54 pm | क्रान्ति
प्रश्न का बाहेरचे पडतात मजला,
पाहिजे ते सर्व काही आत आहे
वा! सुरेख काव्य!
क्रान्ति
दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती
अग्निसखा
रूह की शायरी