मोहक दरबारी

अन्वय's picture
अन्वय in जनातलं, मनातलं
6 Sep 2009 - 11:43 pm

मोकळ्या हवेत, अगदी नीरव शांततेत चांदण्यांनी भरलेले आकाश न्याहाळताना दुरावलेल्या प्रेयसीचा आठव यावा. तिच्या सहवासात घालविलेला क्षणन्‌ क्षण पुढ्यात उभा राहावा, असे दरबारी कानडाचे रुप वाटते.
हा राग मंद्र आणि मध्यम सप्तकात रमणारा असल्याने यात आतर्तबरोबरच गंभीरताही आहे. दरबारी गतकाळातील आठवणीचे प्रकटीकरण करणारा राग आहे, असे म्हणणे कुणालाही गैर वाटू नये.
या रागाचा अस्सल रूप ऐका मृगनयना रसिक मोहिनी...
http://www.esnips.com/doc/146b7493-f0b9-4d57-be06-6cad9fa0ed11/Mrignayan...

यातील रसिक मोहिनीतील मंद्र सप्तकातील पंचम-मध्यम पुन्हा पंचम आणि धैवतावरून निषादाला स्पर्श करून षड्‌जावर विसावणारा स्वर मोहून टाकतो.

कामिनी होती किती मंजूळ मधुरा हे ऐकताना मध्यम पंचममध्ये येणारा धैवत पुन्हा मध्यमावरून पंचमावर येतो. मग हा स्वर गंधारावरून मध्यम आणि रिषभावरून षड्‌जावर येतो त्यावेळी त्या कामिनीची "रेखीव' मूर्ती समोर उभी राहाते.

ही कामिनी नवयौवन संपन्न आहे. गाण्यात पुढे तिचे केलेले वर्णन खूपच सुरेख आहे.

संगीतआस्वाद

प्रतिक्रिया

मिसळभोक्ता's picture

7 Sep 2009 - 6:36 am | मिसळभोक्ता

जिंदाबाद !!!

-- मिसळभोक्ता

घाटावरचे भट's picture

7 Sep 2009 - 10:26 am | घाटावरचे भट

असेच म्हणतो...

श्रावण मोडक's picture

7 Sep 2009 - 10:58 am | श्रावण मोडक

गाण्यातलं काही कळत नाही, त्यामुळं या लेखनाचा पूर्ण आस्वाद घेता येत नाही :(
पण, वसंतराव जिंदाबाद!!!

अन्वय's picture

7 Sep 2009 - 6:14 pm | अन्वय

म्हणतो, गाणे गुणगुणायला सुरवात करा
बघा काय अनुभव येतो. या अनुभवाचा आस्वाद घ्यायला नक्कीच आवडेल.

श्रावण मोडक's picture

7 Sep 2009 - 11:28 pm | श्रावण मोडक

ओके...

बिपिन कार्यकर्ते's picture

7 Sep 2009 - 11:43 pm | बिपिन कार्यकर्ते

वसंतराव जिंदाबाद.

बिपिन कार्यकर्ते

चतुरंग's picture

8 Sep 2009 - 2:20 am | चतुरंग

जी काही नाट्यगीतं फक्त वसंतखांसाठीच निर्माण झालेली आहेत त्यातलं हे एक आहे!!

(वसंतवेडा)चतुरंग

JAGOMOHANPYARE's picture

7 Sep 2009 - 11:28 am | JAGOMOHANPYARE

मन्जुळ मधुरालापिनी रसिक मोहिनी.....

कोई 'मतवाली' आयी मेरे द्वारे... :)

क्रान्ति's picture

7 Sep 2009 - 7:33 pm | क्रान्ति

गीताचं सुरेख विश्लेषण!

हा दरबारीचा अतिशय वेगळा आविष्कार.

क्रान्ति
दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती
अग्निसखा
रूह की शायरी

धनंजय's picture

8 Sep 2009 - 12:33 am | धनंजय

ऐकवून स्थळे सांगितल्याबद्दल धन्यवाद.

क्रान्ति यांनी स्त्री-आवाजात वेगळाच कानड्याचा प्रकार ऐकवला - धन्यवाद.

प्राजु's picture

8 Sep 2009 - 2:49 am | प्राजु

अरे व्वा!!!
आवडलं!
:)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

विसोबा खेचर's picture

8 Sep 2009 - 2:57 pm | विसोबा खेचर

अन्वयराव, छोटेखानी परंतु छान लिहिलंय. वसंतरावांनी या पदाचं सोनं केलं आहे.. येऊ द्या अजूनही अशीच काही छोटेखानी राग-स्फुटं!

पण दरबारी म्हटलं की मला फक्त आमचे अण्णा आठवतात..दरबारीचा बडा ख्याल केवळ अण्णांनीच गावा!

आणि दरबारीतील 'किन बैरन कान भरे..' ही बंदिश माझी अत्यंत आवडती. अफलातूनच आहे. ही बंदिश अण्णा, आमिरखा आणि राशीदखा हे तिघेही मस्तच गातात..

एकदा ग्वाल्हेरला तानसेन समारोहात उस्ताद अमजदअलींनी सरोदवर वाजवलेला दरबारी साला आजही याद आहे. मार डाला था!

एकदा पार्ल्याच्या एका मैफलीत उस्ताद अब्दुल हलीम जाफर यांनी बिहाग वाजवून पूर्ण केला आणि त्यानंतर मिश्र धून वाजवायला लागले. त्यांच्यानंतर तिथे अण्णांचं गाणं होतं. मिश्र धून सुरू असतांनाच तिथे अण्णा आले. आम्ही लगेच तंबोरे उचलून त्यांच्या मागोमाग ग्रीनरूम मध्ये गेलो. स्वारीने निवांतपणे पान जमवलं. त्यानंतर अण्णांनी मला विचारलं,

"जाफरसाहेब कोणता राग गायले?"

"बिहाग!" मी.

"बरं बरं!"

त्यानंतर एकदम स्वारीचा मूड लागला आणि म्हणाले,

"कोई बात नही. आज आपण दरबारी गाऊया!"

आणि त्यानंतर त्या रात्री एकलेला अण्णांचा दरबारी आजही अंगावर सरसरून काटा आणतो!

जाता जाता -

अण्णा पार्ल्याला कार्यक्रमस्थळी येताच तिथल्या एका आयोजकांनी त्यांच्या पुढ्यात साबुदाणा खिचडीची डिश धरली. परंतु त्या भाबड्या आयोजकाला काय वाटलं कुणास ठाऊक, तो एकदम अण्णांना म्हणाला,

"बुवा, तुम्हाला साबुदाणा खिचडी चालेल ना? नाही म्हणजे तशी तुपकट असते, तुमच्या घश्याबिश्याला त्रास नाही ना होणार?"

त्यावर अण्णा अंमळ माफक हसले आणि त्याला म्हणाले,

काही त्रास होणार नाही. आणा इकडे ती डिश. आजपर्यंत नाही नाही त्या गोष्टी या घश्याखाली उतरल्या आहेत आणि आम्ही त्या पचवल्या आहेत!" ;)

असो.. भारतभर हिंडून ऐकलेल्या खूप काही मैफलींच्या/कलाकारांच्या आठवणी गाठीशी आहेत. पण लिहायला वेळ मिळत नाही याचं वाईट वाटतं!

आपला,
(भारतरत्न अण्णा आणि त्यांच्या दरबारीचा चाहता!) तात्या.

अन्वय's picture

8 Sep 2009 - 7:32 pm | अन्वय

तात्या, प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
तुम्हाला आण्णांचा सहवास मिळाला. ग्रेट
आपल्या जवळ असलेल्या कलाकारांच्या आठवणी ऐकायला आवडेल.
खरेच येऊ द्यात...