वाट सागरदुर्गाची . . . .अर्थात सागरगडाचा ट्रेक

दत्ता काळे's picture
दत्ता काळे in कलादालन
4 Sep 2009 - 8:58 pm

अलिबागजवळील डोंगरावर सागरगड वसलेला आहे.

सागरगडावर जाण्यासाठी वाघेडे गावांत जावे लागते. पेण-पोयनाड मार्गावर असलेल्या पेझारी फाट्यावरुन वाघेडे गावाकडे रस्ता जातो. अंतर अंदाजे अर्धा कि.मी. हे अंतर काटल्यावर आपण वाघेडे गावांत येतो. हे सागरगडाच्या पायथ्याचे गांव. गावाच्या मागच्या ठाकरवस्तीपासनं रस्ता आहे. ठाकरवस्ती डाव्या हाताला ठेवून चालत निघालं कि एक डोंगर लागतो तो पार करायचा आणि चढाई कायम ठेवायची. रस्ता बरोबर असल्याची खूण म्हणजे वाटेतच उजव्या हाताला रस्त्यालगतच भग्न अवस्थेतील एक दगडी नंदी दिसतो.

नंतर अजून एक डोंगराचा टप्पा लागतो इथे वाटेवर सागाच्या पानांचा सडा पडलेला दिसतो. वाटेवर उजवीकडे अरण्य तर डावीकडे उंचावरुन खुणावणारा सागरगड दिसतो. रानवाट टप्प्याटप्प्याने उंच नेत राहते. वेगवेगळी रानफुले आणि झाडे ह्यांनी हि वाट भरलेली आहे.


मग एक उंच चढ लागतो. चढ संपल्यावर समोरच कुण्या गिर्यारोहकाने दगडावर 'माची' अशी अक्षरे लिहिलेली दिसतात. हि गडाची माची. इथे पूर्वी एक मंदिर होतं असं म्हणतात.

पाटीकडे पाठ करुन एक छोटा चढ चढून गेल्यावर समोरच सागरगडाच्या दरवाज्याचे भग्नावशेष दिसतात. दरवाज्याच्या अलिकडे डाव्या हाताला एका मोठ्या खडकावर तलवारीच्या आकाराची खाच आहे. तलवारीचं पातं आणि मूठ स्पष्टपणे दिसतात. इथपर्यंतचा प्रवास अंदाजे दिड तासांचा आहे.

दरवाज्याचे अवशेष ओलांडून गडावर प्रवेश केल्यावर बाजूला थोडी शाबूत असलेली तटबंदी आणि एक गवाक्ष बघितल्यावर गडाचे गतवैभव क्षणभर कल्पनेत साकारले जाते.

गडावर एक शिवमंदिर आहे. शिवलिंगावर एक तांब्याचे पात्र आहे.

शिवमंदिराच्या उजव्या बाजूने चालत गेल्यावर गडाच्या तटबंदीशेजारी एक अतिशय गोड, मधुर चवीच्या पाण्याचं गोमुखी कुंड आहे. गोमुखातून पाणी कुंडात एकसारखं पडत असतं.

कुंडाकडून तटबंदीच्या कडेकडेने चालत राहील्यास गडावरून दूरवर अलिबागचा समुद्र दिसतो. गडाच्या मागच्या टोकाला अतिशय उंच पण गडापासून पूर्णपणे वेगळा असलेला एक सुळका दिसतो. असं म्हणतात कि, ह्या सुळक्याची सध्याची उंची त्याच्या मूळच्या उंचीपेक्षा निम्मीच आहे. वीज पडून सुळक्याचा वरचा भाग तुटला. काही शिवभक्त दर शिवजयंतीला ह्या सुळक्यावर खालपासून वरपर्यंत चढत येऊन भगव्याचे ध्वजारोहण करतात.

तटबंदीशेजारील रस्त्याची साथ सोडावी अन् गडावर भटकंती करावी. आपल्याला जागोजागी ऐतिहासिक बांधकामाचे अवशेष दिसतात. गडावर एक मोठं तळं आहे. इथे वाघेडे गावातल्या लोकांनी चरण्यासाठी सोडलेले कैक रेडे तळ्याच्या पाण्यात डुंबताना तसेच तळ्याकाठी चरताना दिसतात. जवळपास ७ ते ८ महिने हि जनावरे गडावरच वास्तव्य करुन असतात. महिनोनुमहिने गडावर माणसांचा वावर नसल्याने, अचानक माणसे बघितल्यावर ते आक्रमक बनतात तेव्हा इथून जरा जपूनच जावे. नेमकी परतीची वाट तळ्याजवळूनच जाते.

गड बघून झाल्यावर परतीच्या वाटेला लागावं. दाट झाडी आणि असंख्य मोठाल्या वेलींमधून जाणार्‍या ह्या वाटेवर दोन फुटक्या तोफा दिसतात. तटबंदीच्याखाली एके ठिकाणी दहा फुटांवर एक भुयार आहे. ह्याला पांडवकालीन भुयार म्हणतात.

ह्या वाटेवरचा प्रवास जरी काट्याकुपाट्यातला आणि दाट झाडीवेलींमधला असला तरी फार सुखकारक आहे. गडावरचं गार वारं आणि रानराई-हिरवाई शिणवटा येऊच देत नाही आणि 'फ्रेशनेस' कायम टिकवून ठेवतात.

प्रवासभूगोल

प्रतिक्रिया

बापु देवकर's picture

4 Sep 2009 - 10:26 pm | बापु देवकर

फोटु दिसत नाय राव.......

sneharani's picture

5 Sep 2009 - 11:59 am | sneharani

फोटु दिसत नाय

भाग्यश्री कुलकर्णी's picture

5 Sep 2009 - 3:38 pm | भाग्यश्री कुलकर्णी

फोटो दिसत नाहीत. :|

भाग्यश्री कुलकर्णी's picture

5 Sep 2009 - 3:38 pm | भाग्यश्री कुलकर्णी

फोटो दिसत नाहीत. :|

बाकरवडी's picture

5 Sep 2009 - 12:35 pm | बाकरवडी

मस्त आहेत फोटो !

मला दिसत आहेत.

:B :B :B बाकरवडी :B :B :B

बाकरवडी's picture

5 Sep 2009 - 10:57 pm | बाकरवडी

आता मलाही फोटो दिसत नाहीयेत
सकाळी दिसत होते
:| :| :| :| :|

:B :B :B बाकरवडी :B :B :B

पाषाणभेद's picture

6 Sep 2009 - 8:53 am | पाषाणभेद

मला फोटो दिसत आहेत. ते फारच चांगले आले आहेत.
छान वर्णन केलेले आहे. अजून काही ईतर किल्ले भ्रमण केले असतील तर त्यांचीही माहिती येवू द्या.

----------------------------------
"ऑफिसातल्या कंटाळ्याला उध्वस्त करी मिपा... मिपा मिपा खेळत बसा."

- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या

विनायक प्रभू's picture

6 Sep 2009 - 5:09 pm | विनायक प्रभू

फटु

बिपिन कार्यकर्ते's picture

6 Sep 2009 - 5:59 pm | बिपिन कार्यकर्ते

एकही फोटो दिसत नाहीये. काय भानगड ब्वॉ...

बिपिन कार्यकर्ते