वैताग आलाय साला या रूटीनचा!
ऑफिसात मानेवर दगड ठेवून काम करावं लागतं अशातला भाग नाही. पण बराचसा वेळ खर्डेघाशीत जातो, एवढं नक्की. सकाळी दहापर्यंत आवरून जे ऑफिसात पोचायचं, ते तिथून सात-आठला बाहेर पडेपर्यंत इतर काही करण्याची फुरसत नसते. रात्री दमूनभागून घरी आल्यावर कुणाकडे जाण्याची किंवा कुणाला फोन करण्याची एनर्जी नसते. आल्यावर कुलवधू नाहीतर सारेगमप नाहीतर सच का सामना करावा लागतो. काही नाइलाजानं बघावे लागणारे, तर काही दुसरा टाइमपास नाही, किंवा छंद जडलाय म्हणून बघितले जाणारे कार्यक्रम. दिवसभराचं रूटीन हे असं.
गावाला होतो, तेव्हा मजा होती. टीव्ही वगैरे भानगड नव्हती. संध्याकाळी कामंधामं उरकली, की गावातून मस्तपैकी रपेट असालची. कुणाच्या घरी पूजा असायची, कुणाकडे काही समारंभ. तिकडे चक्कर मारायची. रामाच्या देवळाची पायरी झिजवून यायची. रामाचं दर्शन घेणं हा उद्देश नसायचा, पण तिथे गेल्यावर सगळी माणसं भेटायची. मग पारावर बसून जरा वेळ गप्पा छाटायच्या. गावातली सगळी हालहवाल तिथे कळायची. कुणाच्या म्हशीला तीन पायांचं रेडकू झालं इथपासून ते गावात कोण नवीन मास्तर येणार आहे, सरपंचाला निवडणुकीत कशी धोबीपछाड मिळणार आहे, इथपर्यंतच्या सगळ्या इत्थंभूत बातम्या तिथे कळायच्या. काही पसरवल्या जायच्या. काही बातम्या तिथंच निर्माण व्हायच्या. मग तिथून आमच्यामार्फत अन्य गावात पोचायच्या.
रात्री देवळात भजन असायचं. नाहीतर कुणाकडे तरी पत्त्यांचा डाव रंगायचा. मग रात्री दोन-तीन वाजले, तरी शुद्ध नसायची. हुरड्याच्या काळात तर ही रंगत कित्येक पटींनी वाढायची. हुरडा खायला काळवेळ नसायची. विशेषतः रात्रीची पार्टी असेल, तर हुरड्याची चव आणखी रंगायची. मुख्य म्हणजे गावात आपुलकी होती, एकमेकांबद्दल आस्था होती. कधी कुठल्या कारणावरून भांडणं झाली, तरी संकटात मदतीला सगळे हात एकत्र यायचे.
शहरात आलो, नि सगळं बदललं. तरी सुरुवातीला चाळीत राहत होतो, तेव्हा बरं होतं. तिथेही आपुलकीचा अंश दिसायचा. दारं उघडी असायची. कुणाच्या घरात काही शिजलं, तरी अख्ख्या चाळीत सुगंध पसरायचा. मग पोरं-सोरं जमा व्हायची. हातावर काहीतरी प्रसाद पडायचाच. त्यावर समाधान मानून मग दुसऱ्या घराकडे वळायचं. आमचं वय आता जरासं मोठं होतं. त्यामुळे असं थेट कुणाच्या दारासमोर उभं राहण्यात भिडस्तपणा आड यायचा. मग आम्ही पोरांच्या माध्यमातून आपलाही वाटा काढून घ्यायचो.
मुख्य म्हणजे संध्याकाळ, रात्र आपली असायची. एकमेकांच्या सुख-दुःखाची मैफल रंगवायला कुणा सांगावं लागायचं नाही. चाळीतल्या कट्ट्यावर, नाहीतर बाजारात फिरताना आपसूक विषय निघायचा. चाळीतलंही गॉसिपिंग व्हायचं. एकमेकांच्या आयुष्यातल्या घटना-घडामोडींची देवाणघेवाण व्हायची. मोबाईल, एसएमएस नव्हते, तरी वेळच्या वेळी कुठेही जमून ट्रिपला नाहीतर सिनेमाला जाणं अगदी कुठल्याही अडथळ्याविना पार पडायचं. ठरल्या वेळी ठरलेल्या ठिकाणी जमणं, हा दंडकच असायचा.
कुणा मित्राशी एखादी गोष्ट शेअर करावीशी वाटावी आणि तो महिनोन् महिने भेटूच नये, भेटला तरी आपल्यात त्याला इंटरेस्ट असू नये, हा काळ तोपर्यंत यायचा होता. आता मोबाईल आले, ईमेल्स आले, तरी माणूस मात्र माणसाला वेळ देईनासा झाला आहे. वर्षानुवर्षे शेजारी राहणाऱ्याच्या आयुष्यात काय घडतंय, याची खबर आपल्याला त्याचं काहीतरी बरं-वाईट झाल्यावरच कळते. आणि साता समुद्रापारच्या अनोळखी व्यक्तीच्या आयुष्यात मात्र ढवळाढवळ करण्याची हौस आपल्याला हवीहवीशी वाटू लागते. त्याची अधिक माहिती काढावीशी वाटू लागते. त्यानं दाखवलेली बेगडी सहानुभूती आणि आपुलकीचा मुलामाही सोन्यापेक्षा पिवळा वाटू लागतो.
मागे वळून पाहताना असं वाटतं, कुठे गेले ते शाळा-कॉलेजातले मित्र? काळाबरोबर सगळंच इतकं बदललं? कुणाला कुणाची दखलही घ्यावीशी वाटू नये, इतकं? अनेक फोन करूनही मित्राला साधं भेटण्यासाठी वेळ काढता येऊ नये इतकं? भेटल्यावरही मोबाईलचं नवं मॉडेल, वाढतं ट्रॅफिक-रोगराई आणि एसएमएसमधले जोक्स यापलीकडे बोलण्याचे विषय जाऊ नयेत, इतकं? महिनोन् महिने आपण आणि आपले कुटुंबीय, यांच्यापलीकडच्या जगाची गरजेव्यतिरिक्त दखलही घ्यावीशी वाटू नये, इतकं?
काय म्हणायचं या बदलाला?
कालाय तस्मै नमः?
प्रतिक्रिया
21 Aug 2009 - 1:30 am | टारझन
अरारारा ... पारंच भजं झालं कि वो तुमचं !!
हॅहॅहॅहॅ !! समदे मित्र आशे ?
बरंय आमच्या बाबतीत मित्रांचा सुकाळ आहे ... :)
बाकी छाणच लिहीलंय .. जुण्या आठवणींत गेलेले दिसता :)
-(हेराफेर) टारफेर
21 Aug 2009 - 1:55 am | रेवती
चांगले लेखन. चौफेर साहेबांनी मनातलं सगळं कागदावर उतरवल्यासारखं वाटतय. तुमचा दिनक्रमच जर इतका व्यस्त असतो व कामावरून आल्यानंतर दुसर्याकडे जाण्याइतकी एनर्जी नसते तर तसच इतरांचंही असणार. बर्याच वर्षांनी कोणीही दोन व्यक्ती भेटल्यावर बहुधा मधल्या काळात बरेचसे संदर्भ, मतं बदलतात, वयं बदलतात. जबाबदार्या वाढलेल्या असतात. संभाषणाला कुठून सुरूवात करायची ? तासादोनतासांच्या भेटीत काय बोलायचे? असे प्रश्न असले तर भेट नको वाटते. त्या अडथळ्याला पार केले तर कळते की समोरची व्यक्तीही गप्पाष्टकांसाठी आनंदानं तयार असते.
(चांदणीयोग्य मजकूर: टार्या, अजून वीसेक वर्षात बघूया तुझे कीती मित्र तस्सेच जिवलग राहतात ते!;))
रेवती
21 Aug 2009 - 10:09 am | प्रकाश घाटपांडे
रेवती यांचा उत्तम प्रतिसाद.
अधनस्य कुतः मित्रं
अमित्रस्य कुतः सुखम||
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
21 Aug 2009 - 1:59 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
रेवतीताईचा प्रतिसाद आवडला.
माझे काही मित्रमैत्रिणी आहेत, ज्यांना दोन वर्षांनंतर भेटले तरीही दोन दिवसांपूर्वीच भेटलो होतो अशा गप्पा होतात. उरलेल्या लोकांशी संबंध रहात नाहीत फारसे! तेवढे मोजके लोकं आपले...
अदिती
24 Aug 2009 - 8:50 am | लवंगी
हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच मित्र-मैत्रीणी आहेत पण असे कि २ मिनिटात लिंक जुळते अगदि वर्षभर बोललेलो नसलो तरी. बकिचे हळूहळू सुटत जातात.
21 Aug 2009 - 5:54 pm | लिखाळ
आपला लेख आणि रेवतीताईंचा प्रतिसाद आवडला.
-- लिखाळ.
'वाटते आहे', 'कुठेतरी वाचले आहे', अशी संदिग्ध विधाने करणार्याला म. संकेतस्थळां वरच्या चर्चेत मानाचे पान असते असे वाटते ;)
21 Aug 2009 - 9:32 am | अमृतांजन
कालाय तस्मै नमः?- नाही!
पुर्वीही असेच होत असणार- किंबहूना जास्तच. म्हणूनच मी मकरसंक्रांतीपासूनचे सगळे भारतीय सण खोलवर पाहिले की, असे जाणवते की, लोकांना एकमेकांकडे जाण्यासाठी, स्नेह वृद्धिंगत होण्यासाठी अशा सोशल ऑट्लेटचा चांगला उअप्योग करता येऊ शकतो.
आज मित्रांशी संपर्क ठेवायचा म्हणजे, कोठेतरी भेटायचे, दोन पेग मारायचे व मगच गप्पा होतात असा समज झाला असावा का?
21 Aug 2009 - 10:19 am | छोटा डॉन
"कालाय तस्मै नमः " हे अगदी आवडले.
कसल्याही अलंकारीक भाषेचा सोस न धरता मनापासुन केलेले लेखन आवडले व भावले ...
पण एक सांगु का, ह्याला पर्याय नसतो सायबा.
म्हणतात ना "कुछ पाने के लिये कुछ खोना पडता है" तर त्यातला हा प्रकार, कुठल्याशा कातरवेळी ह्या आठवणी त्रास देतात हे नक्की पण हा मार्ग आपणच निवडला असल्याने होण्यार्या परिणामांची जबाबदारी आपली नव्हेच का ?
बरं, एवढ्या सगळ्या गोष्टी जरी मान्य केल्या तरी सध्या जे करत आहात ते कप्लिट सोडुन देणे तरी शक्य आहे का ?
माझे वैयक्तिक उत्तर "नाही" असे आहे ...
असो, काही महिन्यापुर्वी आम्ही ह्याच विषयावर ४ शब्द खरडले होते इथेच ...
कचेरी ते कॉर्पोरेट ऑफीस : एक मनकल्लोळ !!! हे जरा वाचुन पहा ...
अगदी तंतोतंत त्याच्याशीच निगडीत आहे असे नाही मात्र त्याच्या जवळचे आहे हे नक्की .
शेवटी संतुलन राखणे महत्वाचे आहे आणि ते अजुनतरी आपल्याच हातात आहे, बरोबर ?
------
( संतुलीत ) छोटा डॉन
21 Aug 2009 - 5:21 pm | बिपिन कार्यकर्ते
डान्रावांशी पूर्ण सहमत. ही होणारी कुतरओढ फार वाईट असते. त्रास होतो. पण पर्याय नसतो. लेख उत्तमच. आवडला.
बिपिन कार्यकर्ते
21 Aug 2009 - 12:55 pm | मुत्सद्दि
फार॑च सुरेख प्रकटन.
हल्लीच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात तर सर्वच॑ बाबतीत कुठल्यातरी तंत्रज्ञानावर अवलंबुन रहावे लागतेय.
परवाच मी बाहेर जाताना माझा मोबाईल सोबत न्यायला विसरलो.
जवळपास एक तासाने मोबाईल नाही हे लक्षात आले.
जिथे जायचे होते तिथला दुरभाष क्रमांक आठवेना. बायकोचा फोन नंबर लक्षात नाही. एकदम अपंग झाल्यासारख वाटले.
शेवटी कामाचा विचका झालाच.कारण माझा फोन आला नाही म्हणून पली कडची पार्टी निघून गेली.
मोबाईल यायच्या आधी बराच स्वावलंबी होतो त्याची आठवण झाली.
तेंव्हा आपसुकच सर्व फोन नंबर पाठ असायचे. मोबाईल आले अन हे सर्व बंद केले त्याचाच हा परिणाम.
मुत्सद्दि.
21 Aug 2009 - 1:26 pm | Dhananjay Borgaonkar
डॉनशी सहमत आहे.
भाऊ सुट्टी काढा आणि घरी जाऊन या..त्याच रुटीन चा कंटाळा येणे स्वाभावीक आहे..
21 Aug 2009 - 2:15 pm | अनिल हटेला
आवडले...
थोड्या फार फरकाने सर्वाना हा अनुभव येतोच..
२ दिवस सुटी टाका आणी य जाउन गावाला..:-)
(एकटा जीव)
बैलोबा चायनीजकर !!!
I drink only days ,which starts from 'T'...
Tuesday
Thursday
Today ;-)
21 Aug 2009 - 5:10 pm | क्रान्ति
सहज साधं मनापासून लिहिलेलं प्रकटन पटलं आणि आवडलं.
रेवती, अमृतांजन, डॉन यांचे प्रतिसादही आवडले.
क्रान्ति
दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती
अग्निसखा
रूह की शायरी
21 Aug 2009 - 5:56 pm | स्वाती२
आवडल प्रकटन. रेवती आणि डॉन यांचे प्रतिसादही आवडले. बदल अपरिहार्य आहे. जे गमावले त्याबद्दल वाईट वाटणे साहाजिक आहे पण त्यातच गुंतुन राहू नका. काही नविन छंद, समाज कार्य यातून नवे मित्र जोडा. पुन्हा मैफिल रंगेल.
21 Aug 2009 - 6:13 pm | चतुरंग
जाणवते जास्त प्रखरपणे कारण आपण स्वतःला कामाच्या रगाड्यात गाडून घेतो. चार सुखाचे क्षण रोजच आपल्यापाशी येऊन जात असतात फक्त ते आग्रहीपणाने 'आम्ही आलो आहोत' असे सांगत नाहीत, आपल्यालाच त्याच्याकडे लक्ष द्यायला फुरसत नसते.
पैसा, प्रतिष्ठा ह्याने आपण अहं जोपासतो कळत, नकळत. जुन्या मित्रांच्या भेटी झाल्या तरी सुरुवात कोणी, कुठून करायची हा थोडा कळीचा मुद्दा बनतो. अंगावरल्या झुली उतरवून ठेवून मनमोकळे पणाने बोलले तरी पंचाईत होते हा माझा वैयक्तिक अनुभव आहे! हा इतका कसा जवळीक साधतोय ह्याला काही मागायचं तर नाहीये अशी शंका समोरच्याला आलेली आपल्याला जाणवते. त्या व्यक्तीचंही काही चूक म्हणता येत नाही कारण त्याला अशा मतलबी लोकांचे अनुभव मध्यंतरीच्या काळात आलेले असू शकतात. त्यामुळे जितके मोकळेपणाने भेटाल, मनातले विचार बोलाल तितका संवाद सहजसुलभ होईल. बर्याचदा पूर्वग्रह आणी विचार हे प्रत्यक्ष संवादात मोठी खीळ घालतात.
मागल्या भारतभेटीत माझे दोन जीवश्च मित्र मिरजेहून पुण्याला भेटायला आले. आयत्यावेळी निघाल्याने सोयिस्कर गाडी वगैरे मिळाली नाही. पेठनाक्यावरुन चक्क ट्रक पकडून आले. ते माझ्यासाठी आलेले होते ह्याने मला फार बरं वाटलं. त्यांना रिक्षाने घरी यायला सांगणं हा मला त्यांचा अपमान वाटला असता. मग रात्री १२ वाजता त्यांना मोटरसायकलवरुन मी स्वारगेटपासून ट्रिपलसीट घेऊन आलो! कॉलेजातले रात्री-अपरात्री फिरायचे दिवस आठवले! रात्रभर खाणे-पिणे, चहा, मनसोक्त गप्पा झाल्या. सकाळी नाष्टा, चहा करुन नऊ वाजता गेलेही परत. पण एक अविस्मरणीय क्षणांचं देणं देऊन गेले. ह्याभारतभेटीत फक्त फोन झाले भेट झाली नाही पण ते समजून आहेत आणी मीही.
(मित्र)चतुरंग
24 Aug 2009 - 7:22 am | चौफेर
मिपावरचे हे माझे पहिले लेखन.
बरेच दिवस फक्त इतर लेखन वाचत होतो. काही लिहावे वाटत होते, पण मूड लागत नव्हता. जेव्हा लागला, तेव्हा त्याला भरभरून प्रतिसाद मिळाला.
मनापासून धन्यवाद. पुढेही काही लिहिण्याचा हुरूप त्यामुळे मिळाला आहे