पंधरा ऑगस्टच्या रात्री जेवल्यानंतर शतपावलीसाठी म्हणुन मी व आमचे गृहमंत्री बाहेर पडलो. खारघरच्या शिल्पचौकात एका फुटपाथच्या कडेला झोपलेला दहा-बारा वर्षाचा एक मुलगा दिसला. स्वातंत्रदिनानिमीत्त कुठल्याशा पक्षानं लावलेला कापडी फलक त्याने खाली अंथरला होता, त्याचाच अर्धा भाग अंगावर घेवुन ते लेकरु गाढ झोपलं होतं. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर ६० वर्षे उलटुन गेल्यानंतरदेखील जर आपल्या देशात ५०% च्यावर लोकांची ही अवस्था असेल, तर खरोखर आपल्याला स्वातंत्र मिळालं आहे असं म्हणता येइल का? हे असलं स्वातंत्र्य काय कामाचं?
आईच्यान सांगतु....,
कालच्याला १५ आगस्ट झाला,
मले माझा बापुस म्हनला व्हता,
१५ आगस्टला म्हनं देशाला सवतंत्र्य मिळ्ळं व्हतं !
आईच्यान सांगतु....,
म्या इच्चारलं, बाबा..., सवतंत्र्य म्हंजी रं काय?
बाप म्हनला, त्येची लै मज्जा असतीया पोरा,
खिशावं झेंडा लावाचा आन जय म्हनाचं, मग जेवाया मिळतया !
आईच्यान सांगतु....,
म्या सदर्याच्या खिशावर....,
चांगला रुप्पायाचा, झेंडा लावला...., टाचनीनं,
जण गण मण व्हईपत्तुर.., गळ्याच्यान सांगतु, थुकबी नाय गिळ्ळी !
आईच्यान सांगतु....,
मास्तरबी म्हनलं व्हतं आमास्नी,
झेंडा फडकला की जेवाया मिळंल,
शिळं येफर नी कुरतडलेला पेडा बगिटला...., आन भुकच मेली !
आईच्यान सांगतु....,
गांधीबाबा म्हनलं व्हतं म्हनं तवाच्याला,
आता म्हनं देशात रामराज (?) येनार हाय,
जनमल्यापासुन बगतुया, हितं रामाचा वनवासच सपत न्हाय!
आईच्यान सांगतु....,
पंदरा आगस्टच्या सवतंत्र्याचं न्हाय म्हायीत मस्नी,
पन चौका चौकात बांदल्यालं ब्यानर मातुर कामी आलं
आता थंडीचं दिस येनार..., माजं पांगरुणाचं काम झालं !
विशाल.
प्रतिक्रिया
17 Aug 2009 - 10:20 am | सागर
विशालभाऊ,
शब्दच नाहीत. थेट मनाला भिडले शब्द.
मला पण असे म्हणावेसे वाटते की ...
" आईच्यान सांगतु...., या राजकारणी षंढांना सर्वात शेवटी जेवायला दिले पाहिजे."
तरच आपल्या देशातील गरिबी नाहिशी होईन.
हि स्वातंत्र्याची विदारक सत्याची बाजू असली तरी मोगलांच्या १,००० वर्षांच्या अत्याचारांपेक्षा आणि इंग्रजांच्या अत्याचारांपेक्षा नक्कीच बरी आहे असे म्हणता येईल. किमान आज आपल्या स्वतंत्र देशात गरिबांसाठी हजारो हात एकत्र येऊन काम करत आहेत.
मोगली आणि इंग्रजी राजवटीत किमान आपले घर सुरक्षित राहिले तरी मोठी गोष्ट मानली जायची . असो...
मिळालेल्या स्वातंत्र्याचा आनंद तर साजरा करायलाच हवा. पण देशाचा स्वातंत्र्यदिवस खर्या अर्थाने तेव्हाच साजरा होईन जेव्हा स्वस्त अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या मूलभूत गरजा प्रत्येक भारतवासीयाला उपलब्ध होतील.
जयहिंद
(देशप्रेमी) सागर
17 Aug 2009 - 11:07 am | आशिष सुर्वे
जनमल्यापासुन बगतुया, हितं रामाचा वनवासच सपत न्हाय!
शब्द मनाला भिडले विशाल भाऊ!
-
कोकणी फणस
Me and my girlfriend broke off over religious differences. She thought she was God and I didn't...
17 Aug 2009 - 11:10 am | मदनबाण
असेच म्हणतो.
चट्यागो चझीमा चवडतीआ चलिकामा चतीहो. :)
http://www.youtube.com/watch?v=z3z6limgwMo
17 Aug 2009 - 11:26 am | अ-मोल
डोळ्यांत पाणी आणणारी कविता.
17 Aug 2009 - 11:31 am | फ्रॅक्चर बंड्या
छान आहे कविता विशाल साहेब
आवडली
17 Aug 2009 - 11:47 am | विशाल कुलकर्णी
मनःपुर्वक धन्यवाद !
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
17 Aug 2009 - 12:41 pm | पक्या
छान कविता. आईच्यान सांगतु , आवडली . :)
17 Aug 2009 - 1:25 pm | मनीषा
सुरेख !
18 Aug 2009 - 2:40 pm | क्रान्ति
केलं स्वातंत्र्यदिनाच्या या वर्णनानं. नाण्याच्या या बाजू नेहमीच दुर्लक्षिल्या जातात. त्यांच्यावर प्रकाश पाडून खूप मोठं काम केलंय.
क्रान्ति
दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती
अग्निसखा
रूह की शायरी